Puja

Nashik (India)

Feedback
Share

Saptashrungi Puja Date 17th December 1985: Place Nasik Type Puja

आता मी इंग्लिशमध्ये जरी बोलले असले तरी आपल्याला सगळे कळलं असेल. पण तरी सांगायचं म्हणजे असं की आपला सहजयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.’ तर सहज हा जो योग घडतो, तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमच सहस्रार भेदन, इथपर्यंत आमचं तुमचं देणं-घेणं आहे. आता पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखाद बी घातलंत, तर तिचं देणं-घेणं एवढच आहे की, ‘बाबा, तुझ्यामध्ये मी अंकूर फोडते.’ पण त्यानंतर बघायला नको. तेव्हा जरी हे अगदी सहज असलं, तरी आता आम्ही संत झालो, हे समजण फार कठीण आहे. आता आम्ही बी घडलो. हे समजणं फारच कठीण गोष्ट आहे. अजून आम्ही तेच आहोत, असं सारखं आपल्याला वाटत असतं किंवा तस नाही वाटलं, तरी आपली वागणूक तशीच असते. तर ती बदलायला पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आता आम्ही संत झालोत . संतांची किती लक्षणं सांगितलेली आहेत रामदास स्वामींनी! प्रत्येकाने सांगितलेली आहे. त्या संतांमधली आपल्यामध्ये कोणती लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजे. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ती लक्षणं आपल्यामध्ये दृष्टीगोचर का होत नाही? लोक आपल्यामध्ये ते शोधत का नाहीत ? ते आपल्यात त्यांना दिसत का नाही ? त्याला कारण काय हे पाहिलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण असा विचार केला पाहिजे, कि परमेश्वराने आपल्याला अंकुरलं आहे. बरं, झालं. आता पुढे काय? आम्ही काय केलं त्या परमेश्वरासाठी ? आम्हाला सहजयोगामध्ये हे माहिती आहे, की प्रत्येकाला आशीर्वादित करतो परमेश्वर. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ योग मिळाला तुम्हाला, क्षेम घ्याच. ते त्याच्याच बरोबर येतं समजा. बिल्ट इन. त्याला काही करायला नको. क्षेम घ्या. पण क्षेमाबरोबर एक आणखीन यायला पाहिजे, कृतज्ञता. ती येत नाही. कृतज्ञता आली तर लगेच हा विचार येईल की, ‘मला एवढं फुकटात मिळालं, आम्ही काय केलं होतं ? कशाला असं मिळालं ? कसं मिळालं? आता मी काय देऊ? जीव का प्राण!’ असा विचार यायला पाहिजे. पण ये रे माझ्या मागल्या! ‘माताजी, असं झालं. नोकरी तर लागली. पैसे मिळू लागले. पण अजून माझ्या मुलीचं लग्न झालेलं नाही.’ बरं, ते झालं . मग ‘अमकं राहिलं.’ म्हणजे तेच चालू आहे तुमचं. जे मागचं होतं तेच पुढे सुरू आहे. त्याला काही अर्थ आहे का ? आता सहजात तुम्ही आले, ह्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही पहिल्यांदा संत झाले. आता दुसरा जो शब्द योग आहे, त्याच्याकडे लक्ष जर दिलं योगाला अर्थ दोन आहेत. योग म्हणजे परमेश्वराशी आपला संबंध होणे किंवा जीवा-शिवाचा संबंध होणे. त्यांची सांगड बसणे. ते झालं. पण सांगड नाही बसलेली. नुसतं तुमचं संबंध झालेले आहेत. फक्त असं समजायचं आपल्याला. पण योगाला दसरा अर्थ असा आहे, की युक्ती, कौशलम. कुशलता पाहिजे. सहजयोगाची तुम्ही युक्ती शिकलेत का ? त्याची कुशलता

शिकले का? नाही. मग त्याला काय अर्थ आहे? अर्धवटच झालं ते. म्हणजे आपली समजा बाहेर आम्ही पाटी लावली एक, की इथे सांगवी राहतात. तुम्ही पाटी वाचून गेलात, तर भेटले का सांगव्यांना? तसलाच हा प्रकार आहे. त्याची जर तुम्हाला कुशलता नाही आली. एखाद्या युनिव्हर्सिटीत तुम्ही गेले की, ‘आम्ही गेलो होतो. युनिव्हर्सिटी पाहून आलो. प्रोफेसरांना भेटलो.’ बरं, मग. पुढे काय ? ‘मग आम्ही झालो की, आम्ही ग्रॅँज्यूएट आहोत.’ कसं? ‘नाही, म्हणजे आम्ही जाऊन आलो होतो म्हणून.’ आपल्याकडे इंग्लंडला जाऊन यायचे. काही केलं नाही तिकडे. तसच आलात परत. आपण म्हणतो नां, ‘झक मारून.’ तरीसुद्धा त्याला इंग्लंड रिटर्न आपण म्हणत असू. तसलाच प्रकार आहे. सहजयोगी आम्ही, सहजयोगी, सहजयोगी, सहजयोगी. बरं कां? मग ह्या बोटाला काय अर्थ आहे ? इकडे जळलं म्हणजे काय होतं ? ते माहीत नाही आम्ही सहजयोगी आहोत. बिल्ले लावून आम्ही सहजयोगी बुवा. झालोत. तसं सहजयोगात होत नाही. काहीतरी व्हावं लागतं आणि त्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि त्या करण्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यातला एक त्याग आपण नेहमीच करतो तो म्हणजे बुद्धीचा त्याग. तो नको. ते सोडून. पुढचं बोलायचं. बुद्धीचा त्याग करून मोकळं व्हायचं आणि म्हणायचं सहजयोगाने आमची वाट लावली. तर ते एक सोडून बाकी जर त्यागाकडे दृष्टी असली, आम्ही काय सोडलं? जे बेकार होतं ते सोडलं. त्याला काही अर्थ नव्हता ते सोडलं. असा विचार धरायचा. जसे ते हरे रामाचे लोक आले आणि मला म्हणायला लागले की, ‘तुम्ही एवढे श्रीमंतीत असलेले.’ ते आता माझ्या नवर्याचं आहे सगळं. मी तरी काय करू?’तुम्ही एवढे श्रीमंतीत बसलेले. तुम्ही काय एवढा त्याग केलेला आणि तुम्ही कशा झालात देवी?’ अहो, म्हटलं , देवी त्याग नसते करत. तीच एक त्याग करत नाही. बाकी सगळ्यांना करावा लागतो. तीच भोगते आहे. ‘बरं, कबूल,’ म्हटलं, ‘तुम्ही काय त्याग केले ते सांगा.’ म्हणे, ‘आम्ही हे सोडलं, ते सोडलं, हे सोडलं.’ म्हटलं, ‘असं का! बरं अस करा तुम्ही, माझ्या घरात किंवा माझ्या अंगावर तुम्हाला कोणतही जर त्या श्रीकृष्णाच्या पायाच्या धुळीबरोबर किंवा त्याच्या कणाबरोबर एखादं काही मिळालं तर घेऊन जा तुम्ही. ते सांगा, पण त्याच्या पायाच्या धुळीच्या कणाबरोबर असायला पाहिजे.’ दगड बनले गृहस्थ. तसच त्यांच्या तोंडावर इतक्या सुरकुत्या होत्या, की मोजून घ्याव्यात. आणि म्हणे आम्ही मोठे कृष्ण भक्त. म्हणजे काय कृष्णाला शोभेल का? कृष्ण भक्त म्हणजे कसे अगदी टवटवीत असायला पाहिजे. हे बसलेत ना सगळे. तर मी म्हटलं, ‘अहो, तुम्ही कृष्णभक्त. तुम्ही सांगत का नाही?’ दगड बनले. काही दिसेच नां! म्हटलं काय, दगडधोंड्यांचा त्याग केला काय? हे दगडधोंडेच नां! नाहीतर काय ती राख. तिचा त्याग केला? तुम्ही त्याग कशाचा करायचा? जर काही धरलच नाही, तर त्याग कशाचा करायचा? म्हणजे करायचं काय माणसाने, की काही धरायचं नाही. त्याग करायचा म्हणजे काय ? धरायचं नाही. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही माझी नोकरी, हे माझं घर, हे माझं ते, ते माझं हे. हे माझं आणि मी पण सुटलं पाहिजे आणि हे जोपर्यंत सुटणार नाही सहजयोग जमणार नाही. ती सोडता आलं पाहिजे. ते सोडणं आपल्या महाराष्ट्रात जरा कठीण जातं. कारण मुलगा-मुलगी म्हणजे जीव का प्राण! एक डोळा हा दुसरा डोळा तो. त्यांनी म्हातारपणी लाथा मारल्या की लक्षात येतं, की अरे बाबा, हे काय केलं आपण? ০

सगळ जग तुमचं कुटुंब व्हायला पाहिजे. हे संतांचं लक्षण आहे. ‘माझ’ पण गेलं पाहिजे. ‘मी’पण गेलं पाहिजे. आणि ते जाण्यासाठी आयुष्य आम्ही सहजयोगाला वाहून दिलंय. आता परमेश्वराशिवाय आम्हाला काय करायचंय? आम्ही परमेश्वराच्या कार्यात रत आहोत. आम्हाला टाइम नाही आता दुसऱ्या गोष्टीसाठी. आमचं हृदय आम्ही परमेश्वराला वाहिलं आहे. आम्हाला कोणत्याही दुष्ट भावनांना हृदय नाही राहिलेलं. आमच्या बुद्धीत दुसरं काही सुचत नाही. फक्त सहजयोग आणि त्या परमेश्वराच्या कार्यासाठी काय करायचंय तेच आमच्या डोक्यात विचार चाललेले आहेत. आमच्या जठराग्नीलासुद्धा दुसरं काही पचत नाही. तुम्ही काही बोलू नका दुसरं, बुवा. आम्हाला चालायचच नाही. परमेश्वराच्या साम्राज्यात बसल्यावर आम्ही दूसरं काही बोलायला तयार नाही. आमच्याजवळ वेळ नाही त्या गोष्टीला. अस जेव्हा होईल तेव्हाच ते सुटणार आहे. इतर गोष्टी सुटल्याशिवाय सहजयोग जमू शकत नाही. त्याबाबतीत जरा कच्चे आहोत आपण. त्यामुळे सहजयोगी तयार म्हणायला फार कमी आहेत. त्याच्यामुळे एका माणसावर सगळं पडतं आणि बाकीची मंडळी नुसती ढम्मू बसून राहतात. नसली तरी थोडंबहुत…. हळूहळू हळूहळू ते वाढत जातं. पण त्याला काय आहे, की वाढीला इतकी इंचाइंचाने प्रगती होत आहे, की त्याने सहजयोग कसा फोफावेल ? हे समजत नाही. कारण इथे काही तरी व्हावं लागतं. काही प्लॅस्टिकचं बनवता येत नाही. की चला, एका मशिनमध्ये घातलंय माताजींनी सगळ्यांना. आता तयार करून ठेवलेत इकडे पुतळे. ते मेलेलं काम आहे. जिवंत कार्य करायचं म्हणजे त्याला वेळ लागतो. हे मलाही माहिती आहे. पण जरा जास्तच वेळ लागला असं व्हायला नको. वाटतं की आता काय करावं ? कसं करावं? नाशिकमध्ये जरा जास्तच वेळ लागतो आहे आणि इथे भागीरथी धावते आहे. रामाने आणि सीतेने इकडे अनवाणी चालून पवित्र केलेले आहे. ही तपोभूमी आहे. सगळे ह्यांना मी सांगते वर्णन करून. त्यात आदिशक्ती गडावरती बसलेल्या आहेत. सगळं इथं असून, सगळ्यात गाडं जे आहे हळू चालते आहे. म्हणजे ज्या रथाला शंभर घोडे लावले, त्याच्यापेक्षा ते दोन घोडे लावलेलं खच्चर चांगलं चालतंय हे बघून आश्चर्य वाटतं नाही कां? की ते जे गाडं आहे, ते बरं चाललेलं आहे दोन घोड्याचं आणि शंभर घोड्याचं कारय झालं, काहीच समजत नाही. आणि केवढी मेहनत घातली तुमच्या पूर्वजांनी इथे. किती साधु-संतांनी येऊन इथे मेहनत केलेली आहे. ह्या तपोभूमीमध्ये. त्याचा विचार करा ! आणि तुम्ही इथे जन्म कशाला घेतला मग? असाही विचार करावा की आमचा ह्या नाशिकला जन्म झाला, एवढ्या पवित्र भूमीत, तर आम्ही काय करायचं? नसत्या गोष्टींकडे लक्ष नसलं पाहिजे. नको ते पाहिजे, ह्या प्रवृत्त्या सोडून जे हवं तिकडे लक्ष दिलं समाधानात राहन, आम्ही आता परमेश्वराच्या कार्याला लागलो आहे. हे आयुष्य आमचं परमेश्वरासाठी आहे. हा जो काही आमच्या प्राणाचा दिवा लावलेला आहे, तो परमेश्वराच्याच प्रकाशाला पसरवेल. अशा उमेदीने तुम्ही जर आलात, तर आनंदाच्या सागरात पोहाल. सगळे काही तुमचं बघण्यात येईल. परमेश्वर सबंध क्षेम देईल. त्याच्यावर अत्यंत समाधानात आणि पूर्ण काही झालं, संपूर्ण आपण आटपून घेतलं, आता पूर्ण झालात, असं तुम्हाला वाटेल. परमेश्वर तुम्हा सर्वांना सुबुद्धी देवो!