Welcome Puja at Chalmala

Chalmala (India)

Feedback
Share

Shri Mahadevi Puja – Chalmala 21st December 1986 Date: Alibag Place Type Puja

सर्व सहजयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो! सुरुवातीला मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, नंतर मराठीत बोलेन. आता ह्यांना मी असं सांगत होते, की पुष्कळ लोक असं विचारतात की देवाने हे जग कशाला निर्माण केलं? या जगाची काय गरज होती ? तर त्याचं कारण असं आहे, की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वत:ला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही, की केवढा मोठा स्रोत तो आहे. तसेच तुम्ही सहजयोगीसुद्धा त्याचा स्रोत आहात. म्हणून देवाने हा सबंध आरसा त्याच्यासाठी तयार केला. हा आरसा बघण्यासाठी, की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. आणि ह्या की आरशात बघून देव संतुष्ट होतो. पण ह्या आरशात आणखीन एक त्याला बघायचं आहे, ते म्हणजे असं, मानवामध्ये हा आरसा जागृत झाला की नाही. जो मी मानव तयार केलेला आहे, जो मी मनुष्य तयार केलेला आहे, त्या मनुष्यामध्ये हे सौंदर्य आलं की नाही? त्याला ह्याची जाणीव झाली की नाही, की तो किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये किती गुण आहेत, तो किती महत्त्वाचा आहे, तो किती मोठा आहे. हे सगळं जाणण्याची त्याच्यामध्ये पात्रता आली की नाही? तुकारामांनी म्हटलेले आहे की, ‘अणू-रेणूहनही थोडका , तुका आकाशाएवढा.’ मी ह्या अणूरेणूपेक्षा जरी लहान असलो तरी आकाशापेक्षा मोठा आहे. ज्याने हे एकदा बघितलं स्वत:बद्दल, मग तो क्षुल्लक गोष्टींसाठी, भलत्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य घालविणार नाही. व्यर्थ गमवणार नाही आपलं आयुष्य ह्या क्षुल्लक गोष्टीकरता गमावणं फार मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आता अनेक घाणेरड्या गोष्टी आलेल्या आहेत. ते आपल्याला माहिती आहेत. आता दारू पिणे. कोणी म्हटलं, दारू पिऊ नका, तर कोणी ऐकणार नाही. उलट अर्धे लोक तर रागावून निघून जातील. पण जेव्हा तुमचा हा आरसा, म्हणजे तुमचा आत्मा जेव्हा जागृत होतो, तेव्हा त्या आरशात तुम्ही स्वत:ला बघता. ‘आणि ही काहीतरी घाणेरडी वस्तू आहे. ह्या घाणेरड्या वस्तूमुळे आम्हाला त्रासच होणार आहे, हे लक्षात येऊन तुम्ही आपोआप ते टाकून देता. दुसरं आहे, माणसामध्ये अहंकार असतो. त्याचा उद्दामपणा, ज्याने लोकांना आपण दुखावतो, त्रास देतो. ह्या अहंकारालासुद्धा, हा आरसा जागृत झाल्यावर तुम्ही बघू शकता. ते कितीही तुम्ही वाचन केलं, कितीही तुम्ही देवाचं नाव घेतलं कितीही देवाच्या नावाने धिंगाणा घातला, तरीसुद्धा ते दिसणार नाही. फक्त आत्म्याचा प्रकाश जेव्हा स्पष्टरूपाने तुमच्यामध्ये दिसेल, तेव्हा त्या आत्म्याकडे तुम्ही बघायला लागाल, तर तुमच्या लक्षात येईल, की हे काहीतरी आपल्याला विसंगत आहे. आपण इतके सज्जन आहोत, इतके मोठे आहोत, देवाने आपल्याला किती मोठं बनवलं आहे! आपण काही जनावर नाही आहोत. पशू नाही आहोत. माणसाला सुबुद्धी दिलेली आहे. इतकंच नाही तर आपल्याला स्वतंत्रता दिलेली आहे, की जी परम स्वतंत्रता आहे, ती आपण मिळविली पाहिजे. मग ही फालतूची गुलामी कशाला

करायची. असे व्यसनं लावून गुलामी कशाला करायची! आम्ही जर स्वत:च एवढे स्वतंत्र आहोत, आमच्या ‘स्व’ च्या तंत्रात आम्ही चालतो, तर आम्हाला ही गुलामी काय कामाची? म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, की स्वधर्म ओळखावा. ‘स्व’ चा ध्म ओळखला पाहिजे. ‘स्व’ म्हणजे तुमचा आरसा, जो तुमचा आत्मा आहे, तो तुमचा आरसा आहे. तो मिळविला पाहिजे. आता खेडेगावातून आपल्याकडे अशा पुष्कळ विचित्र कल्पना आहेत देवाबद्दल, की त्याचं मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं. पुष्कळ लोकांना असं वाटतं की देव वगैरे सगळे अंगात येतात, घुमतात. पुष्कळ बायकांना असं वाटतं , की आपल्यामध्ये देवी येतात. आता सांगायचं म्हणजे देवीला झेलणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. देवीची शक्ती असते आणि त्या शक्तीने कुंडलिनी जागृत होते. ज्या बाईच्या अंगात भुतं येतात, तिला तुम्ही जर देवी म्हणाल, तर तुम्ही परमेश्वराच्या विरोधात आहात. ही भूतं आहेत आणि त्या बाईला त्रास होतो. मानसिक त्रास होतो. इतकंच नाही, तर घरच्या सर्व लोकांना दरिद्रता येते. तिच्याकडे जाणार्या लोकांना त्रास होतो. त्यांना दरिद्रता येते. म्हणून अशा गोष्टींकडे आपण भोळेपणाने गेलं नाही पाहिजे. तसंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात पाहिलं तर एक कोणी ना कोणी तरी असा मनुष्य, अशी बाई असते, जी काही तरी अशी कामं करीत असतात. विशेषत: कोकणात जास्त असतं. आता ह्या वर्षी बरं वाटतंय मला इतकं नाहीये. काहीतरी सांगायचं, की अमक्याकडचं भूत आलंय, तमक्याकडचं भूत आलंय. अशा रीतीने गोष्टी करायच्या, की लोकांना नुसतं भारावून टाकायचं. अशा भारावून टाकलेल्या लोकांना मूर्खात काढून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. ही आपल्याकडची एक प्रथा झालेली आहे. नंतर कोणी तरी येऊन बसायंच, भटजी बनायचं आणि म्हणायचं की एवढे पैसे दे. देवाला पैसे वरगैरे काही कळत नाही. देवाला पैसे नकोत तुमचे. देवाला फक्त एकच गोष्ट पाहिजे, की तुम्ही स्वत:च्या आत्म्याचा आरसा हाती घ्यावा आणि त्यात आपलं स्वरूप बघावं. पण त्याबद्दल असं सांगितलेलं आहे, की जेव्हा हा हाती आरसा येतो, तर ह्याची जी आपल्याला अस्पष्ट कल्पना येत असते, ती स्पष्ट करण्यासाठी आणि स्थिरावण्यासाठी मनुष्याला ध्यान आणि धारणा केली पाहिजे. म्हणून आधी कुंडलिनीचं जागरण आणि त्या नंतर ध्यान-धारणा करून, पूर्णपणे आपण स्वत:ला जबाबदार समजून, स्वतंत्र समजून आपल्या आसनावर आरूढ झालं पाहिजे. आसनावर बसलं पाहिजे. आम्ही काही असे तसे नाही आहोत. आम्ही मानव आहोत. आम्ही काही आमचं आयुष्य असं वाया घालण्यासाठी आणलेलं नाही. आम्ही आमची काही कदर केलेली नाही आजपर्यंत. पण ती आत्म्याची ओळख झाल्याबरोबर लगेच मनुष्य स्वत:ची ओळख करू लागतो आणि त्याच्यातले वाईट गुण आहेत ते झडून पडतात. आता आमच्या इंग्लंडला, जेव्हा मी सहजयोग सुरू केला होता, तेव्हा सात असे लोक आले की जे पुष्कळ इकडचे-तिकडचे व्यसनं घेत असत. आणि एका दिवसात, त्याच दिवशी त्यांची सगळी व्यसनं सुटली. आता व्यसन ही गुलामगिरी आहे. जरी त्याच्यात तुम्हाला आनंद वाटतो, तरी ती एक गुलामगिरी आहे. कोणतीही गुलामगिरी पत्करायची नाही, असं ठरवलं पाहिजे. असं ठरवल्यानंतर हा जो आत्मा आहे, तो स्पष्टरूपाने दृष्टोत्पत्तीस पडतो. त्याचा आपल्याला परिणाम जाणवतो आणि त्या परिणामामुळे जे काही आपल्यामध्ये नको आहे, ते निघून जातं. पण त्याच्याआधी नको तेच आपल्याला आवडतं. जे वाईट तेच आपल्याला आवडतं. जे चुकीचं तेच आपण घेतो. तेव्हा मी एक आईच्या दष्टीने सांगते, की कोणी वाईट वाटून घेऊ नये. जर व्यसन असलं.

तर त्याबद्दल घाबरू नये. आत्म्याच्या जागृतीने सगळ्यांची व्यसनं सुटणार. सगळ्यांची गुलामी सुटणार. सगळ्यांची गरिबी सुटणार आणि सर्व तऱ्हेचे जेवढे काही क्लेष आहेत, त्रास आहेत, शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच सांसारिक, सगळेच्या सगळे तुमचे त्रास ह्याच्यातून जाणार आहेत आणि ते झालेच पाहिजेत. तेव्हा ह्या गावाला आम्ही आलो, चाळगावाला, आणखीन ह्या लोकांनीसुद्धा इथे येऊन, इथली पवित्रता पाहिली, तुम्हा लोकांना भेटले. तुमच्याबरोबर नाचले आणि खूप आनंदात होते. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढा सत्कार केला, सगळ्यांना स्वयंपाक करून इतकं सुंदर जेवायला दिलं. त्याबद्दल त्यांनी मला सांगितलंय की, ‘माताजी, तुम्ही ह्यांना सगळ्यांना कृतार्थ करा.’ आता आमची जी पद्धत आहे, की आम्ही ज्या गावाला जातो, तिथली जी मालकीण असते, तिला एक काहीतरी बक्षीस द्यायची पद्धत आहे. आणि त्याप्रमाणे इथे, आपले जे, तुम्हाला माहिती आहे, की हरिश्चंद्र कोळी म्हणून जे आहेत, त्यांनी एवढी मेहनत केली, हे घर स्थापन केलं, सहजयोग इथे स्थापन केला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांची एवढी मदत केली. तेव्हा त्यांना फूल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यायचं आहे. बाकी सर्व लोकांनाच काहीतरी द्यायचं आहे. आणि ते काहीतरी द्यायचं म्हणजे ज्याला आपण आशीर्वाद म्हणतो. ह्या आशीर्वादामध्ये तुमच्या कुंडलिनीचं जागरण करून तुम्हाला तुमच्यामध्येच समर्थ करायचं आहे. तुमच्यामध्ये तुम्हाला उभं करायचं आहे. तुमच्या गौरवाची तुम्हाला पूर्णपणे समज येईल, तुमच्या मोठेपणाची तुम्हाला जायचंय. म्हणजे मग पुढच्या वेळेला आल्यावरती इथे सबंध लोक फार सुंदर दिसतील आणखीन त्यांच्या चेहर्यावरती एक तजेला, नावीन्य, त्यातून त्यांच्या हृदयामध्ये जशी काही कमळाची फुलं उमलावीत असं सुंदर समज येईल, त्याची सुज्ञता तुमच्यात येईल, असं काहीतरी करून स्थान परमेश्वरासाठी तयार केलेलं आहे. माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे.