Shri Mahalakshmi Puja

(India)

Feedback
Share

Shri Mahalakshmi Puja Date 31st December 1986: Place Sangli Puja Type

सांगली जिल्ह्यामध्ये सहजयोग हळूहळू पसरत आहे. पण जी गोष्ट हळूहळू पसरते, ती जम चांगला धरते. आणि कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेऊ नये. प्लॅस्टिकची जर आपल्याला फुलं काढायची असली तर त्यासाठी एक मशिन घातलं की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो. मशागत करावी लागते. मेहनत करावी लागते. सहजयोगाबद्दल अजून पुष्कळशा लोकांना काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. पैकी आपल्याकडे पुष्कळसे असे पंथ आहेत, संप्रदाय आहेत, जे आधीपासूनच कार्यान्वित आहेत. पण हे पंथ आणि संप्रदाय ह्यांचा आपल्याला काही फायदा झालेला नाही.

      ‘इतके दिवस आम्ही पंढरीला गेलो, इतके दिवस आम्ही तुळजापूरच्या भवानीची सेवा केली, इतके दिवस आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जात होतो, सगळं काही केलं आम्ही. व्रत- वैकल्य केली. सगळं करून माताजी, आम्हाला काही मिळालं नाही.’ त्यातून तुमची मुलं उद्या मोठी होतील आणि ती तुम्हाला म्हणतील ‘इतका तुम्ही वेळ घालवला, पैसे घालवले, मेहनत केली आणि शेवटी तुमच्या हाती काही आलेलं नाही. म्हणजे परमेश्वरच नाहीये.’ जर तुम्हाला सांगलीला यायचं आहे, तर  सांगलीच्या रस्त्यावर यायला पाहिजे. जर तुम्ही उलट मार्गाने गेलात तर तुम्ही सांगलीला पोहोचणार नाही. तेव्हा इतक्या वर्षानंतरही तुम्हाला सांगली मिळाली नाही,  याचा अर्थ असा आहे, की कोणत्यातरी चुकीच्या रस्त्यावर आपण चाललो होतो.  त्याच रस्त्यावर आपण भटकत आहोत.  त्यातून अजून आपल्याला मार्ग मिळालेला नाही. हा सुज्ञपणाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण आपल्याला अजून काही मार्ग मिळालेला नाही. काही साध्य झालेलं नाही. तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे, असा एक  वेळ तरी  विचार करून सहजयोग काय आहे ते समजून लोकांना सांगितलं पाहिजे. ही गोष्ट लोकांना पटवून देतांना एक गोष्ट फार आवश्यक आहे, म्हणजे ज्या लोकांशी तुमचा संबंध येतो त्यांच्याशी बोलतांना, पटवून देतांना, त्यांच्या भाषेतच आपण बोललं पाहिजे. आपण जर आपली भाषा वापरली तर त्यांच्या लक्षात येणार नाही. चक्रांबद्दल एकदम आपण त्यांना सांगू लागलो तर त्यांना समजणार नाही. पण असं सांगितलं, की आपल्यामध्ये कुंडलिनीची शक्ती आहे, असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे. तुम्ही ज्ञानेश्वरांना माऊली म्हणता आणि त्यांच्या पालख्या काढता, त्यांच्या नावाच्या दिंड्या काढता, पण हे काय लिहिलं आहे ते वाचा. आता तुम्हाला का सांगितल गेल की सहावा अध्याय वाचायचा नाही? कारण तो वाचला म्हणजे हे लोक जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेत आहेत, तुम्हाला लुबाडत आहेत, त्यांचं फावणार नाही. तेंव्हा हे लिहिलेलं आहे. हे जे सहाव्या अध्यायात लिहिलेलं आहे, ते आम्ही तुम्हाला देतो असं सांगितलं, म्हणजे लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल. तेव्हा पहिल्यांदा जी काही गोष्ट सांगायची ती त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीने समजवून सांगितली पाहिजे.

     दुसरं आपल्याला, नामदेवांची, तुकारामांची, गोरा कुंभारांची, जनाबाईंची, मुक्ताबाईंची, ज्ञानेश्वरांची, रामदासांची, सगळ्यांची साथ असल्यामुळे, त्यांची पुस्तकं वाचून सुद्धा त्याच्यात ओवीबद्ध काय काय लिहिलेलं आहे ते पाहिलं पाहिजे. म्हणजे अशा भ्रामक कल्पनेमध्ये जाणारे लोक, व्रत-वैकल्यात पडणाऱ्या लोकांच्याबद्दल त्यांनी काय लिहिलेलं आहे? स्वत: ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव पुस्तकामध्ये इतकं स्पष्टरूपाने लिहिलं आहे की जर त्यांचं कुणी पुस्तक वाचून, ते मनन नुसतं करायचं, विचार करायचा काय आहे ते . नुसतं वाचत रहायच नाही. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की स्पष्टरूपाने जे मी म्हणते आहे, त्याहीपेक्षा स्पष्टरूपाने त्यांनी तिथे सांगितलेले आहे. रामदास स्वामींनी, तुकारामांनी शिव्यांच्या लाखोल्या वाहिलेल्या आहेत अशा लोकांना. तरीसुद्धा हे उपटसुंभ अजून सगळ्यांची दिशाभूल करीत आहेत.

      कालच एक गृहस्थ मला म्हणाले, ‘माताजी, बुक्का लावायचा नाही, असे तुम्ही म्हणालात, ते का?’ बुक्का लावतो आपण आज्ञा चक्रावर, आज्ञा चक्रावर सूर्य आहे. सूर्याला आपण काळं लावतो का? पण सहजयोगाच्या दृष्टीने विचार केला, तरीसुद्धा एक साधी गोष्ट विचारायची त्यांना, की जे लोक तुम्हाला बुक्का लावायला सांगतात, म्हणजे हे जे पंढरपूरला बसून, भटजीबुवा आहेत तिथले, त्यांना बडवे असं नाव सार्थ आहे. ते बडवतातच लोकांना. ते बडवे, ते कधीही बुक्का लावत नाहीत. कोणताही भटजी काळं  डोक्याला लावत नाही. मग तुम्ही कशाला काळे लावायचं? असे जर तुम्ही त्यांना बरोबर प्रश्न सांगितले तर त्यांच्या डोक्यात ही गोष्ट येईल आणि उद्या जर त्यांचा मुलगा वाईट मार्गाला लागला, तर त्याला कारणीभूत तुम्ही आहात. कारण तुम्ही जे परमेश्वर , परमेश्वर म्हणून म्हणत होता, त्या परमेश्वरामुळे काहीही मिळवलेलं नाही. काहीही तुम्हाला लाभ झालेला नाही. हे स्पष्टरूपाने सांगितलं पाहिजे. हे स्पष्टरूपाने सांगितल्यानंतरच त्यांच्या लक्षात येईल. शंभरातला एक जरी मनुष्य ठिकाणावर आला, जर  एक जरी मनुष्य ठिकाणावर आला तरी समजायचं आपण, पुष्कळ लाभ झाला. पण जर एखादा मनुष्य, फारच हट्टाला पेटला, जिद्दीस पेटला तर त्याला सहजयोगाबद्दल सांगायची गरज नाही. ख्रिस्तांनी स्पष्ट सांगितलं आहे, की डुकरांपुढे मोती ओतायचे नसतात. त्यांना काही कळतच नाही, तेव्हा त्यांच्यासमोर कशाला मोती ओतायचे? हे मोती आहेत. हे जीवनातले मोती आहेत. तुम्हाला समजायचं नाही. तुमचं भाग्य पाहिजे. तुम्हाला भाग्य नाही. कुठेतरी झोपलेलं दिसतंय! किंवा कुठेतरी नष्ट झालेलं दिसतय. तेव्हा ह्याला भाग्य लागतं. नंतर ह्याच्यामध्ये वीरतापूर्ण लोक पाहिजे. 

     सुरुवातीला पुष्कळ बघे लोक येतात. प्रोग्रॅमला मी बघते पुष्कळ बघे असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी जो प्रोग्रॅम होईल त्याच्यात पुष्कळ गर्दी असणार. भरमसाठ गर्दी. दुसऱ्या दिवशी प्रोग्रॅम होईल त्यात निम्मे राहतील. कारण काय, बाकीचे बघे, ते वगळले गेले. बरं झालं नाही तर डोकेदुखी होते. आता जसे बघे असतील पुष्कळ लोक, ते सहजयोगी होणार नाहीत. पण बघत राहतील. ते बघे वगळले गेले, तर त्याच्यानंतर निम्म्याने राहिले. निम्म्यातलेसुद्धा जे वीर असतील, जे शूरवीर असतील, येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, स्पष्ट सांगितलं आहे, येऱ्यागबाळ्याचे काम नोहे. म्हणजे त्याला पाहिजेत जातीचे. मराठी भाषेत सगळ्याला अगदी तोड आहे. आणि सहजयोगाला इतकी शोभिवंत    भाषा आहे आणि इतकी उपयोगी आहे ती. जर मराठी भाषा तुमच्या हातात आहे आणि मराठी लोकांशी बोलायचं असलं तर सहजयोग तुम्हाला पटवता आलाच पाहिजे. म्हणजे तार्किक दृष्टीनेसुद्धा तुम्हाला पटवता आला पाहिजे. त्याला पाहिजेत जातीचे. तुम्ही जातीचे नाहीत, तेव्हा नमस्कार तुम्हाला. जा. शब्द आहे जातिवंत, आणि

देवीबद्दल म्हंटलं आहे, या देवी सर्वभुतेषू जातिरूपेण संस्थिता। 

जी जात तुमच्यात आहे. ज्या जातीचे तुम्ही नाहीच. त्याच्यात तुम्हाला, त्या जमातीतनं मी तुम्हाला कशी देणार? जातीचा अर्थ ब्राह्मण किंवा क्षूद्र वगैरे असा नाही. जात म्हणजे आतली जी आपली प्रवृत्ती आहे, ज्याला अॅप्टिट्यूड म्हणतात, प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती काय आहे ? त्या प्रवृत्तीवरून अवलंबून असतं, की मनुष्याची जात काय आहे ? आणि मग देवीच्या वर्णनात सगळं लिहिलेलंच आहे. सबंध वर्णन आहे. ते एक एक वर्णन तंतोतंत तुम्हाला सहजयोगात मिळणार. शोभना सुलभ गती – शोभना सुलभ गती. सुलभ गती. ह्याची जी गती आहे ती सुलभ आहे. म्हणजे जे सोप्यानं होतं आणि शोभीवंत आहे. म्हणजे ह्याच्यात काही ओरडायला नको, आरडायला नको, असं झिंगल्यासारखं ते दिंड्या घालायला नको. काही वेड्यासारखं वागायला नको. काही नाही. शोभना सुलभा गती. आता पुष्कळसे लोक उडत असतात नुसते. आता तुम्ही बघा काही काही लोकांचे मेडिटेशन असे असतात, की नको रे बाबा ते मेडिटेशन. किंचाळून, ओरडून, कपडे फाडून अश्या तऱ्हेने त्यांचे प्रकार चाललेले असतात.

      शोभना सुलभा गती, असं देवीचं वर्णन आहे. ती तुम्हाला शोभना सुलभा गती देते. हे जर देवीचं वर्णन आहे, त्याप्रमाणे जर घटित होतं, तर मग कशाला तुम्ही उगीचच पाय घासत तिथे जाता? ही पायपीट कशाला? पण त्याचा अर्थ असा नव्हे, की पुंडरीकाक्ष, जे होते, संत झाले आणि त्यांना आम्ही मना करतोय किंवा त्यांच्याबद्दल काही असं बोलत  नाही.  किंवा साक्षात् श्रीकृष्णही आहेत. तसेच त्यांचं स्थान पंढरपूरला आहे. त्याच्याबद्दल काही शंका नाही. पंढरी ही खरी आहे, पण तिथे बसलेले भामटे, प्रत्येक चांगल्या ठिकाणी हे भामटे बसलेले आहेत, म्हणून पंढरी काही खोटी होत नाही आणि हे काही खरे होत नाहीत. सोन्यामध्ये जर दगड बसवला तर दगड काही हिरा होत नाही. दगड बसवला म्हणून सोनं काही पितळ होत नाही. म्हणून जरी ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या असल्या, की एक सत्यावर आणि एक असत्यावर असले आणि त्यांची जरी जबरदस्ती सांगड घातलेली असली, तरी नीर- क्षीर विवेक करून आपण त्यांना दाखवलं पाहिजे, की हे नीर-क्षीर विवेक आहे. ते दाखवल्यावर त्यांच्या लक्षात येईल, की अहो, हे काय ? हे तुकारामासारखे बोलू लागले. त्यांचं बोलणच वेगळं आहे.

     तसेच सप्ताह करणे, अमूक, तमूक. हे प्रकार आपल्याकडे सामाजिक स्वरूपाचे आहेत. सप्ताह करणे एक सामाजिक स्वरूप आहे. सप्ताह झाला, मग त्याच्यानंतर जेवणं झाली . बसले. त्यावर कबीरदासांनी म्हटलं आहे, पढी पढी पंडित मूरख भये. वाचत बसायचं.   कहे नानक बिन आपाची ने , मिटा न भ्रम की काई, म्हणत बसायचं. आपलं मनोरंजनार्थी पाठ करत बसायचं. मग एक पोपट आहे. त्याला त्याच्या मालकाने शिकवलं की तू रघुपती राघव राजाराम म्हण. तो शिकला. तो बोलायला लागल्यावर दुसऱ्या पोपटानी त्याचं ऐकून  तोही बोलायला लागला. म्हणजे हा पहिला पोपट त्याचा गुरू  त्या दुसऱ्या पोपटाचा. असे गुरू वरच्यावर वाढत जाऊन जाऊन सगळी चर्पटपंजरीची जी ही वंशावळ वाढते, त्याला म्हणावं हे बघा, तुम्हाला जर खरं हवं असलं ना तर ह्या चर्पटपंजरीतून निघायला पाहिजे. तेव्हा मराठीत विनोदसुद्धा इतका भरपूर आहे, तेव्हा ह्या भाषेला सहजयोगासाठीच निर्माण केलंय असं मला वाटतं. प्रत्येक शब्दामध्ये इतकी खोच आहे. तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत असून पूर्णपणे वापरावी ही भाषा. जसं आपल्याकडे म्हण आहे, अती शहाणे त्याचे बैल रिकामे. एक तर शहाणे, त्यात अती शहाणे. हे कोणत्याही भाषेत सांगता येणार नाही. शहाण्यावर परकोटी म्हणजे अती शहाणे आणि त्यांचे बैल रिकामे. हे कोणत्याही भाषेत सांगता येणार नाही. आपल्या मराठी भाषेतच सांगता येईल. तेव्हा ह्या भाषेचा पूर्णपणे उपयोग घेतला पाहिजे. 

     तेंव्हा  जरी तुम्ही ब्रम्हनिष्ठ आहात आणि तुम्हाला ब्रम्ह मिळालेला आहे, त्याला तुम्ही निष्ठेने पाळलेलं आहे आणि तुमच्यातून वहात असलं, आणि चैतन्य जरी सबंध वाहून त्या ब्रम्हाची सगळ्यांना ओळख जरी करून घ्यायची असली तरीसुद्धा, एक गुरू होण्यासाठी, तुम्हाला वंशपरंपरागत जे काही ज्ञान आहे जगातलं, ते माहीत असायला पाहिजे. आणि वेदशास्त्रसंपन्न असायला पाहिजे. म्हणजे वेदशास्त्र म्हणजे वेद वाचले पाहिजे असा नाही, पण इतर साधू जनांनी, संतांनी काय म्हंटलेलं आहे, त्याचा गोषवारा घेऊन, त्याचं ज्ञान असायला पाहिजे. त्याच्यासाठी काहीही विशेष वाचन करण्याची गरज नाही किंवा विशेष काही कार्य करण्याची गरज नाही. फक्त सर्वसाधारण आपली रोजची पुस्तकं थोडासा वाचण्याचा व्यासंग ठेवायचा. वाचून काढलं की सगळ्यांना समजेल. कारण सहजयोगी एकदा झाला, म्हणजे तो कसाही असेना का त्याला सगळं काही समजतं. तेव्हा अशा रीतीने एक दुसरी बाजू तुम्ही मांडू शकता.

      त्यातली तिसरी बाजू म्हणजे अशी, की अती शहाणे जे आहेत, ते तुम्हाला शिकवतील. तुका म्हणे ऐसे, सुरू झालं, की त्यांना म्हणायचं, तुका म्हणे कैसे? ह्याचं उत्तर असायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुका म्हणे ऐसे म्हटल्यावर कोणत्या ह्याच्यात ऐसे. काहीतरी, कुठलं तरी बरळत बसायचं. प्रत्येक तुका आता झाले. त्यांच्यामागे काही लावून द्यायचं शेपूट. तुका म्हणे ऐसे, की बुक्का लावावे. वा, वा. म्हटलं असं का ? त्यांच्या काळी होता का कुठे बुक्का बिक्का. असं म्हणून त्यांच्या नावाने…. ही तिसरी पद्धत आहे. तुम्ही बुक्का लावूनच गेलं पाहिजे. त्यांच्या कोणत्याही काव्यात बुक्का शब्द नसला, तरीसुद्धा. वारकरी हा जरी शब्द नसला, तरी तुका म्हणे वारकरी बनावे. अशी जबरदस्ती त्यांच्या नावाची घेऊन, खोट सांगायचं. आता उद्या म्हणतील, माताजी म्हणे. माझं काय? वाट्टेल ते नाव वापरू शकतो. जर वापरायलाच निघालो तर कोणाचेही नाव घेऊन आपण म्हणू शकतो, की माताजी म्हणे बुक्का लावणे. आता परवाच तिकडे, लंडनला, आमच्याबद्दल काढले की, माताजींचे असे म्हणणे आहे, की उपोषण केले पाहिजे. जेवले नाही पाहिजे. म्हटलं चांगलंय! अशा प्रकारच्या ह्या अनेक तऱ्हेच्या ज्या तुमच्यावरती वारंवार आक्रमक गती येतील, त्यांना तोंड देता आले पाहिजे. थोडा वेळेचा हा लढा आहे. एकदा जर का तो लढा संपला तर ते लोक गारद होतात. अगदी गारद होतात. तो काही औरंगजेबाशी लढा नाहीये. अज्ञानाचा लढा आहे. आणि ज्ञानाचा प्रकाश त्यात पडल्याबरोबर सगळे लोक गारद होतात. कारण त्यांचं त्याच्यात हित आहे. हे तुमच्या हितासाठी आम्ही सांगतो आहे. ज्याच्यात तुमचं हित आहे ते आम्ही सांगतो आहे, असं बोलायचं. त्याने त्यांच्या डोक्यात बरोबर लख्खकन प्रकाश पडेल आणि सर्व ठीक होणार आहे. आजचं आमचं भाषण जरा टेप करून नंतर पाठवून दिलं पाहिजे. व्यवस्थित लिहून.. कारण सगळ्यांना उपयोगी आहे ते.

[Marathi  speech  finished at 18:42]