New Year Puja, You All Have to Become Masters in Sahaja Yoga

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Marathi  Transcription – New Year Puja 31st December 2000, Kalve 

Marathi  Transcription – New Year Puja 31st December 2000, Kalve 

मराठीत बोलायचं म्हणजे आपल्याकडे, बायकांना विशेष करून, सगळे सणबीण अगदी पाठ असतात. आणि प्रत्येक सणाप्रमाणे व्यवस्थित अगदी चाललेलं असतं. सकाळी चार वाजता उठून अंघोळ करून, बंबात पाणी घालून, मग बसायचं, कशाला – पूजेला. आणि इतके आपण लोक कर्मकांडी आहोत महाराष्ट्रात, की तिकडे दिल्लीला बरं. तिकडे लोकांना हे कर्मन्ड  कांड  नाही. म्हणून लाखोंनी लोक पागल. पण महाराष्ट्रात शक्य नाही. तिकडे, पंढरीला गेलच पाहिजे टाळ कुटत. आणि एकदा तुम्ही पंढरीला गेलात की पारच होत नाही. खरोखर व्हायला पाहिजे. पण जेवढे लोक पंढरीला जातात ते पार होत नाहीत. उलट वाजत राहतात. नाहीतर डोक्यावर तुळशीची एवढी मोठी घागर घेऊन, कुठे निघाले – आळंदीला. कशाला? कुणी सांगितलं? ज्ञानेश्वरांनी सांगितलं? त्यांच्या पायात वहाणा नव्हत्या, तर त्यांच्या पालख्या  घेऊन येतात.  त्या पालख्या घेऊन जायचं आणि प्रत्येक गावात जाऊन जेवायचं. म्हणजे स्वतःची काही इज्जतचं नाही. त्या ज्ञानेश्वरांच्या नावावर प्रत्येक गावात जायचं आणि जेवत बसायचं. आणि गाववाले म्हणतात, वा वा , आम्ही केवढं केलं पुण्य. अहो भिकारडे लोक आहेत. हे भिकारडे आहेत. ज्ञानदेवाच्या नावावर भीक मागत फिरतात. त्यांचं तुम्ही काय पोट भरता? अशा भिकाऱ्यांना जेववून तुम्ही कोणचा लाभ घेणार आहात? हे असे पुष्कळसे धंदे आपल्या महाराष्ट्रात चालूच आहेत. ते काही संपत नाहीत. रस्त्यानी जाल तर दिसतातच कुठे ना कुठे. तर हे सगळं बंद करा. स्वतः नाही दुसऱ्यांना सांगायचं. काय मूर्खपणा आहे हा ? कशाला हे करता तुम्ही?  कुठे लिहलंय , कोणच्या शास्त्रात लिहलंय? असं ज्ञानदेवांनी लिहलंय का? असं का करता? हे सगळं सुटायला पाहिजे.  

             आता हळदी कुंकू करायचं. त्या हळदी कुंकवाला कधी तरी तुम्ही सहज योगाबद्दल सांगता का? आल्या कि त्यांच्या ओट्या भरा, अमुक करा तमुक करा. आता कुणाची लग्न झाली की ओट्या माझ्यासाठी. मी म्हटलं मला ओटी द्यायची नाही. म्हणे आम्ही माताजी देवीला पण जाऊ. देवीला वाहू. मी नाही मला नको. काय करायचं, ते म्हणजे सहजयोग करा. ओट्या भरल्या. ओट्यांनी काय होणार आहे? मला त्याचा काही लाभ नाही आणि तुम्हालाही नाही. स्पष्ट सांगायचं. ओट्या भरायच्या असल्या तर देवी देवळात जाऊन कराल. पण ते आता संपवा. झालं पण. आता आतमध्ये उतरा तुमच्या, आतमध्ये एवढी संपदा आहे तिला मिळवा.  आणि इतके मोठमोठाले  इथे  संत साधू झाले, आणि त्यांनी काय शिकवलं? हे शिकवलं आहे का आपल्याला? आधी पहिल्यांदा सगळे कर्मकांड बंद. नाहीतर वात्या वळत बसायचं. सगळे कर्मकांड बंद . आणि त्याच्यावरही विशेष माहिती नाहीच. काहीतरी कुणीतरी आईवडिलांनी घालुनी  दिली तीच करत बसायचं. मग त्यात पुरुषांनाही ओढायचं. आपल्याबरोबर. बाईला सुज्ञपणा जास्त असतो आणि समाजाला पोषक असतो. पण जर तिच्यात असली भुतं शिरली, तर त्या ब्राह्मणानी येऊन सांगितलं, “बाई तुमचं हे असं आहे” . झालं. पण त्यानी मुलंही जातात कामातून. नसता वेळ इकडे तिकडे घालवतात. तर कुणी हळदी कुंकवाला जायचं नाही. आणि जी बाई हळदी कुंकवाला बोलवेल ती सहजयोग शिकवेल तरच जायचं. नाहीतर जायचं नाही. असा हिय्या केला पाहिजे.फक्त मलाच सहज योग पाहिजे की तुम्हालाही पाहिजे. आणि इतर लोकांना नको का? त्यांच्यासाठी तुम्ही का सांगत नाही. तिथे तुम्ही सांगणार नाही, की आम्ही सहजयोगी आहोत, आणि आम्ही काय काय मिळवलं. पुरुषांचंही तसच आहे. बायकांच्याच ह्याच्यात म्हणा किंवा काय.  

           तर इथे आपल्या महाराष्ट्रात दोन तऱ्हेचे लोक आहेत. एक तर म्हणजे कर्मकांडी तरी आहेत किंवा एक म्हणजे बुद्धिवान. म्हणजे निर्बुद्ध पण बुध्दिबल. आणि बुद्धीनी त्यांच्या डोक्यातच घुसत नाही सहज योग काय आहे, कारण बुद्धी इतकी तीक्ष्ण त्यांची, त्यांना समजत नाही . त्यांना वाटतं  हे काहीतरी दुसरं ढोंगच आहे. अरे बाबा करून बघा. समजून घ्या.

        त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्यात कमी आहे आणि ह्या महाराष्ट्रात मी रक्त ओतलंय. गावो गावी जाऊन काम केलंय. मेहनत केली. वर्षानुवर्ष सगळं करून सुद्धा, महाराष्ट्राची अजून ती स्थिती आलेली नाही.   हे काय? याला कारण काय, मला तरी वाटतं कर्मकांडीपणा सोडायचा. एकदम. काही नाही. त्याची काही गरज नाही. आणि दुसरं, म्हणजे पुरुषांनी सुद्धा जास्त बुद्धी चालवू नये. पण बुद्धी आहे कुठे? सारी बुद्धी अशी जर तुम्हाला चूक मार्गावर नेते तर अशा बुद्धीचा काय फायदा आहे?  महाराष्ट्रात जे हे बुद्धीगामी लोक आहेत, ते म्हणजे कर्मकांडापेक्षाही बदतर. म्हणजे बहकलेले लोक आहेत ते, भटकलेले. त्यांचं मागे येणं कठीण कारण सगळीकडे  अहंकार आहे. आम्ही म्हणजे कुणीतरी विशेष. त्यांच्यामध्ये आजकाल कुणी अवतरण येऊच शकत नाही. कारण ते असे लोक, तर अशा सर्व गाढवांमध्ये अवतरण कशाला येईल. अशी त्यांना एक तऱ्हेची स्वतःबद्दल कल्पना आणि ह्या इथल्या ज्या काही बुद्धिवादी लोकांनी जो जो मूर्खपणा केला आहे त्याचा काहीही अंत नाही. समजून घ्यायचं नाही. ऐकून घ्यायचं नाही. त्याच्यातनं ते  आत्मसात कसं होणार? तर ही जी बुद्धीची जी तेढ आलेली आहे महाराष्ट्रात , ती आणखीनच हानिकारक आहे. पुस्तकावर पुस्तक लिहितात. जे येईल ते भरमसाठ. आणि लोकांनी असं म्हणायचं मी पुस्तकात वाचलं होतं.  अरे, पुस्तकात सगळं काही खरंच लिहितात काय ? हे लोक कोण लिहिणारे? त्यांना काय अनुभव आहे? तुम्ही लोकांनी ठासून सांगायला पाहिजे की आम्हाला हे पटत नाही. फालतूच्या गोष्टी. प्रत्येकाला क्रिटिसाईझ करत राहायचं. कृष्णाला क्रिटिसाईझ करायचं. रामाला क्रिटिसाईझ करायचं. काही नाही तर सगळे हे साधूसंत होते, त्यांना क्रिटिसाईझ करायचं. आणि म्हणायचं  ही सगळी अंधश्रद्धा आहे. अहो तुम्हाला श्रद्धाच नाही तर अंधांवर तरी श्रद्धा कशी असणार? ज्या माणसाला स्वतःबद्दल श्रद्धा असेल तोच सहजयोगात उतरेल.  ज्याला स्वतःबद्दल  श्रद्धाच नाही तो कशाला येईल सहजयोगात. म्हणून असे लोक शोधून काढायचे. असे नितांत चांगले लोक आपल्या देशात आहेत. त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे.

 महाराष्ट्रात विशेष मला वाटतं , फार कार्य करण्याची गरज आहे. आम्ही भांडणात हुशार. म्हणून राजकारणात आमचं चालतं सारखं भांडण भांडण भांडण. पण सहज योगामध्ये किती मंडळी अशी आहेत जी हिय्या करून काहीही असलं तरी पूर्ण आपल्या ध्येयपुर्तीला  लागतील. असे किती लोक आहेत? एक लीडर असला की त्याचेच खुस्पटं काढत बसतात. त्यांचं असं आहे माताजी, त्यांचं तसं आहे. तर ते जरी म्हटलं आपण सोडलं, त्यांना जरी काढून, तरी इतर गोष्टींचं फार. माझ्याजवळ. माझी आजी आजारी आहे. अरे बाबा म्हातारी असेल, आजारी असेल तर असून दे. तू कशाला तिकडे जातो. माझी आजी. म्हणजे कोण? सारं जग तुझी आजी. सारं जग तुझे नातलग.तू सहज योगी आहेस. तुझी आजी, तुझा बाप, तुझी आई असं कसं होऊ शकेल? तुम्ही सर्व जगाच्या ह्याच्यावर आहात ना. तुमची पातळी बदलली आहे नं. तुमचे नातलग बदलले आहेत. पूर्वीच्या काळी असं असायचं की ब्राम्हणाचे  लग्न ब्राम्हणाशीच. दुसऱ्या जातीचं लग्न कॅन्सल. आता तसं राहिलं आहे का?  अगदी सगळं सरमिसळ झालंय. मग सहज योग्यांनी असा विचार का करायचा की ही माझी आई आहे आणि ही तुझी आई आहे. माझी तुझीच आहे तिलाच… आता सर्व जग तुमचं आहे. काय ज्ञानेश्वरांनी असं कधी म्हटलं का, आपल्याकडे एवढे साधू संत झाले. तुकारामांनी कधी असं म्हटलं का? माझी तुझी असं केलंय का त्यांनी कुणीतरी? ह्या संतांच्या नुसत्या ओव्या म्हणत राहायच्या सकाळी, पाठ करून. त्याचा अर्थ काही डोक्यातच जात नाही.        

    तेंव्हा हे सगळं सोडून स्वतःबद्दल मनुष्याला अत्यंत इमानदार असायला पाहिजे. हे मी काय करतोय स्वतःचं? मी स्वतःसाठी काय केलंय ? मला काय करायचंय ते पाहिलं पाहिजे आणि मग ते करून त्याच्या नंतर मग तुमच्या लक्षात येईल, अगदी प्रकाश पडेल. अरे तुम्ही सहज योगी आहे. जगात कधी सहजयोगी होते का इतके ? दोन चार झाले त्यांनीही छळ सहन केला. तरी काय काय सुंदर कविता लिहून  ठेवल्या. एवढ्या  मोठ्या  देशात तुम्ही आला आहात याचं  नावंच महाराष्ट्र आहे . इथे येऊन असे लहान बेडका सारखे कसे होणार तुम्ही. आता हे नातलग सोडा आणि नातलग तेच ,” हेचि सोयरे होती” असं म्हटलं आहे ज्ञानेश्वरांनी. तुमचे सोयरे हे आहेत. दुसरे कुणी आमचे सोयरे नाहीत असं स्पष्ट म्हटलेलं आहे. पण ते लक्षात यायला पाहिजे ना. नुसतं वाचत राहायचं. पसायदान. वाचलं झालं पाठ. सर्व पाठ करून ठेवायचं, बस. समोर पाठ आणि मागे सपाट.

   तेंव्हा महाराष्ट्रीयन लोकांनी स्वतःकडे जरा विनोदी वृत्तीने बघितलं  पाहिजे की मी करतोय काय? माझं कार्य काय? तुम्ही दिल्लीला येऊन बघा. तिथे दोन तीन महाराष्ट्रीयन फार चांगले आलेत. तर ते म्हणतात की माताजी तुम्ही महाराष्ट्रातनंच लोक बोलवायचे. ते फार चांगले असतात. म्हटलं असं का? थोडे दिवस जाऊन बघा तिकडे म्हणजे कळेल. सहजयोगात बहुतेक याला          मेहनत पहिली. मी म्हणत नाही की तुम्ही हिमालयावर जाऊन एक  पायावर उभे राहा. नाही. पण मी कुठे चाललोय? माझं  काय चाललंय? मी कशा साठी जितोय  ते बघायला पाहिजे? मग आशीर्वाद आशीर्वादच. आशिर्वादाला सुद्धा सहस्त्रार उघडं करायला पाहिजे. पूर्णपणे. स्वतःची किंमत केली पाहिजे. स्वतःची किंमत नाही त्याला. का असं झालं माहित नाही आत्म्याचं माझ्या, की आपल्याला आपली किंमतच नाही. मी हे करू शकतो ते करू शकतो असा मनामध्ये एक हिय्या पाहिजे आणि असे  मोठमोठाले स्वप्न पाहायला पाहिजे की मी इथे जाईन , या खेडेगावात जाईन , तिकडे जाईन  असे स्वप्न बघायला पाहिजे. अशा मोठमोठाल्या कल्पना केल्या पाहिजे.    

       आता आपल्याकडे इतकं कार्य झालेलं आहे आधीसुद्धा, तुम्ही बघा. झाशीची राणी होती. एक बाई होती, तिनी म्हटलं की नाही, इंग्रजांना आम्ही हरवून सोडणार. ती रणांगणावर गेली आपल्या लहानशा मुलाला घेऊन. आणि धाराशयी गेली. पण तरी इंग्लिश लोकांना सांगितलं, जरी आम्ही झाशीची लेक पण भिडते ती लक्ष्मीबाईच. या अशा अशा बायका तुमच्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत.  आणि आता काय , काही दिसत नाही तसा प्रकार. सगळा नट्टा फट्टाच. मी कां म्हणते असं , की अनुभव फार वाईट आले मला. आता आम्हाला महाराष्ट्रीयन बायको नको असे म्हणता तुम्ही. यांनी जाऊन तिकडे दिवे पाजळले. मराठी भाषा बरी. त्याच्यात काही सांगितलं तरी अनर्थ होणार नाही. पण तरी सुद्धा तुमच्या लक्षात येऊ देत. तिकडे जाऊन ह्या बायका दिवे पाजळतात. आता महाराष्ट्रातली बायको नको. आता शिक्षण नाही, काही नाही तरी लग्न करून दिलं की  बॉ उजवायला हवंय. त्यांनी आम्हालाच उजवून टाकलं. मी अशासाठी सांगितलं की आतापर्यंत काही गाऱ्हाणी मी केली नाहीत. नेहमी तुमचाच उदो उदो करत राहिले. पण तसं चालणार नाही आता. आता मला काहीतरी  माझ्या समोर ठाम असं दिसलं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या वेळेला मी प्रत्येकाला मी विचारणार आहे की किती लोकांना तुम्ही पार केलं. म्हणा तुम्ही गुजरात्यांपेक्षा बरे. ते तर अगदीच ढम्म लोक आहेत. त्यांच्या डोक्यात तर सहज योग जातच नाही आणि तुमच्या डोक्यात गेला  तरी तो वायाच.

     तेंव्हा आता सगळ्यांनी आज मनामध्ये पूर्ण निश्चय करायचा की माताजी नेक्स्ट टाइम तुम्ही आलात तर आम्ही दाखवून देऊ महाराष्ट्रात काय काय होऊ शकतं. अहो कुठे गेले ते मावळे? काय झालं समजत नाही. या मावळ्यांच्या तर्फे त्यांनी एवढं केलं आणि तुम्ही सगळे सुशिक्षित चांगले लोक. सगळे व्यवस्थित.  तुमच्याच्याने आमचं काहीच होत नाही. तेंव्हा हा नंबर वाढला पाहिजे. आणि इतकंच नाही तुमची सुद्धा वाढ झाली पाहिजे. आणि मला दिसलं पाहिजे की महाराष्ट्रात सहज योग नुसता दमला असणार. दमून दमला असं म्हणतात. आता त्याच्यापुढे काही म्हणायलाच नको. असं व्हायला पाहिजे. माझं बोलणंच बंद करून टाका तुम्ही. हे असं झालं तर किती बरं वाटेल. माझा जन्म इथेच झाला आणि मराठी भाषेतच मी सगळं काही  शिक्षण घेतलेलं आहे. मराठी येते म्हणा मला अजूनसुद्धा चांगली. पण काय आहे की मला मनुष्याचं मन नाही समजत मराठ्यांचं. मराठी लोकांचं मला मन समजत नाही. कारण माझे वडील फार उच्च प्रतीचे होते. आई फार उच्च प्रतीची होती. त्यांच्या सानिध्यात मला महाराष्ट्रात असे प्रकार आहेत हे मला माहित नव्हतं. तसंच तुम्ही आता दाखवून द्यायचं की माताजी आम्ही विशेष आहोत. तुम्ही आमच्यावर एवढा बोजा टाकला, भार टाकला आणि आम्ही तुम्हाला खरोखर दाखवून देऊ की, महाराष्ट्र म्हणजे काही कमी नाही. हे सगळे मोठे मोठे वीर आले. त्या वीरत्वाला पात्र झालं पाहिजे न? नुसतं मराठी म्हणून काय? महाराष्ट्रीयन म्हटलं म्हणजे झालं. अशी आजकाल लोकांना कल्पना पाहायला हवीय तुमच्यावरती. तसं नसलं पाहिजे. तेंव्हा सहज योग पूर्णपणे समजून घ्या. तो राबवून घ्या आणि या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करा. माझी अशी अनंत आशीर्वादाची तुम्हाला वाणी आहे, ती स्वीकार करा.