Guru Purnima, Sahaja Yoga a New Discovery

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Guru Purnima Puja. Mumbay (India), 1 June 1972.

Translation from Hindi to Marathi

सहजयोगाचा एक अभिनव असा आविष्कार होत आहे. जे सत्य आहे जे ‘आहेच’ त्याचा आविष्कार कसा होतो हे समजून घ्या. कोलंबस हिंदुस्थान शोधायला बाहेर पडला. तेव्हाही हिंदुस्थान होताच; नसला तर शोध कशाचा घ्यायचा? तसेच सहजयोग होताच, पण त्याचा अनुभव आता तुम्हाला घ्यायचा आहे, काही जणांना मिळालाही आहे. सहजयोग हा त्या परमतत्त्वाकडे जाण्याचा एक मार्ग आहे; एक व्यवस्था आहे; एक प्रणाली आहे; मानवजातीला उन्नत स्थितीवर येण्यासाठी जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी ही एक व्यवस्था आहे. ज्यामध्ये मानव या विश्वव्यापी चैतन्याची ओळख करून घेऊ शकेल आणि ते परमचैतन्य आत्मसात करू शकेल. याच परमतत्त्वाकडून सारी सृष्टी चालवली जात आहे व त्याच्यातूनच मानव जन्माला आला आहे. फार प्राचीन कालापासून याचा शोध चालत आला आहे. त्याच्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे; प्रेम, पैसा, सत्ता अशा विविध क्षेत्रांमध्ये मानवाचा हा शोध चलत आला आहे. तरीही मानव अजून स्वतःला नीट ओळखू शकला नाही. तसे पाहिले तर हा एक आनंदाचा शोध आहे. पण मग कुणी संपत्ती मिळाली की आनंद मिळेल असे समजून पैशाच्या मागे लागले, पण त्याचबरोबर ज्यांनी अमाप संपत्ती मिळवली त्यांनाही दुःखापासून सुटका मिळाली नाही; काही लोकांनी तर या निराशेपोटी आत्महत्या करून घेतली. असे करता करता कुठेच आनंद मिळाला नाही म्हणून लोक धर्माच्या मागे लागले. धर्माच्या पाठीमागे लागल्यावरही त्यांचे चित्त बाहेरच्या गोष्टींमधेच अडकून राहिले आणि त्यांना खरी ‘स्व’ (स्वतःची) ओळख झाली नाही. हे असे का होते? कारण माणूस खऱ्या स्व बद्दल अपरिचीत असतो आणि त्यामुळे त्या ‘स्व’ चे वैभव, ऐश्वर्य, महानता, प्रेम हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्या अवर्णनीय आनंदाला तो पारखाच राहतो. मानव स्वतःच आनंदस्वरूप आहे व तोच परमानंद आहे. अर्थात हे सुद्धा बहुतेक वेळा शाब्दिकच राहते. बोलाची कढी, बोलाचाच भात म्हणतात त्याप्रमाणे हे होऊन जाते. हे असे अनादि कालापासून चालत आले आहे. याला कारण मानवाचा विचार सदैव ‘मना’मधून होत असतो व त्या मनाच्या तो पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. आता माझे भाषणही नुसते शब्द समजून राहू नका. त्यातून तुम्हाला परमात्मा समजणार नाही. म्हणून जे आपल्याला शोधायचे आहे व मिळवायचे आहे तेथपर्यंत आपण मनाने पोहचू शकणार नाही. तीच गोष्ट बुद्धीची. म्हणून जे परमतत्त्व आपल्याला जाणायचे आहे त्याच्यासाठी मन-बुद्धीच्या पार झाले पाहिजे. कारण मन-बुद्धी चालवणारी तीच शक्ती आहे. ही शक्ती जाणण्यासाठी कितीही उपदेश ऐका, वाचन करा वा प्रयत्न करा, तुम्हाला ती जाणता येणार नाही. वा त्याचा अनुभव येणार नाही. नानक, कबीरासारखे संत याच शक्तीबद्दल बोलले. हा एक तुमच्या आतमधला अनुभव आहे. म्हणून वर म्हटल्याप्रमाणे कोलंबसला हिंदुस्थान सापडला नाही. अर्थ हिंदुस्थान नव्हता असा नाही किंवा त्याच्याकडे काही कमी होते असा ही नाही. त्याच्यानंतर ज्यांना त्याचा शोध लागला त्यांनाही हिंदुस्थानात काही कमी होते हे दाखवायचे नव्हते. तुम्ही अलग-अलग होऊन याचा विचार केलात तर मी काय म्हणते हे तुमच्या लक्षात येणार नाही. मानवाचा हा शोध जन्म जन्मांतरापासून चालत आला आहे. वास्तविक जन्म-मृत्यू हे एक प्रकारचे जाणे-येणे आहे. हिंदू-मुस्लिम वगैरे सारखे बाद फक्त राजकारण म्हणून चालतात. सहजयोग हे काही राजकारण नाही. पूर्वजन्मी हिंदू हिंदूच होते किंवा मुसलमान मुसलमानच होते असेही नाही. म्हणून हा शोध त्या स्तरावरच झाला पाहिजे. म्हणजे खरा अनुभव येईल. ही सूक्ष्म स्तरावर घडणारी घटना आहे हे नीट लक्षात घ्या. जे सूक्ष्म आहे, तरल आहे त्याचा जडाशी काही संबंध नसतो. परमात्मा खरं पाहिलं तर काहीच देत नाही; तुम्हाला घर, जमीन जुमला, कुटुंब असल्या गोष्टीही परमात्मा देत नाही; त्यामध्ये परमात्म्याला काही स्वारस्य नाही. म्हणजे परमात्म्याला समजून घेण्यात आपण काही तरी चूक करत असतो. जे परम आहे त्याला परम राहण्यातच रस असतो हे नीट लक्षात घ्या. परमतत्त्व मिळवण्यासाठी कुंडलिनी – योग आवश्यक आहे अशी एक समजूत आहे. पण ज्यांना सिद्धी प्राप्त झाली त्यांना कुंडलिनी जागृतीतूनच ती मिळाली हे मात्र खरे आहे. परमतत्त्वाशी योग होणे महत्वाचे आहे. कुंडलिनी तुमची आई आहे; ती फक्त तुम्हाला पुनर्जन्म देते; तुम्ही जे काही बुद्धीमधून मिळवले आहे त्यापेक्षाही ती अधिक समजदार आहे. ती प्रेमाचा सागर आहे; तुम्हाला चुकीच्या मार्गाकडे ती येऊच देणार नाही तिची सर्व रचना परमात्म्याने खूप कुशलतेने केली आहे. बालक जन्माच्या आधी मातेच्या उदरात असतो • तेव्हा जडतत्त्वाकडून त्याचे मन-बुद्धी-अहंकार इ. तयार होतात, पण त्यामध्ये जो प्रकाश येतो तो मस्तकातील ब्रह्मरंध्रातून येतो आणि शेवटी मणक्याच्या शेवटच्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये स्थिराऊन तीन नाडी-संस्था तयार होतात. त्रिकोणाकार अस्थीमधील शक्ती हीच कुंडलिनी या शक्तिबद्दल खूप लिहिले गेले आहे. पण ती जागृत होणे हा भाग महत्त्वाचा आहे. कुण्डलिनी जागृत होण्याची मुख्य खूण म्हणजे आपली बुबुळे मोठी होणे. ही स्पंदनाकार जागृत होत असल्यामुळे शास्त्रीय उपकरणांवर दिसू शकते. ते तुम्ही पाहू शकता व त्याची प्रचीती घेऊ शकता. कुंडलिनी जागृत झाल्यावरच तुम्ही पार होऊ शकता. अर्थात हे परमात्म्याची महाप्रेमशक्तीच करू शकते; जोपर्यंत ही प्रेमशक्ती मानवामध्ये उरतणार नाही तोपर्यंत कुंडलिनी उठणार नाही. विशेषतः नाभी व अनाहत चक्रांमधील पोकळीमधून हे कार्य झाल्याशिवाय कुंडलिनी उठणार नाही. त्याच्या आड येणारे हे अहंकार व प्रतिअहंकार तुम्हाला परमात्म्यापासून अर्थात स्व पासून दूर ठेवतात. हे सर्व मी कुणाच्या विरोधात बोलत आहे असे समजू नका. आत्मसाक्षात्कार हा तुमचा पुनर्जन्म आहे हे लक्षात न घेता आत्मसाक्षात्कारानंतरही तुमचे चित्त व मागण्या तुमच्याच कुटुंबाच्या समस्यांमध्ये पैशामध्ये अडकून राहिले तर काय फायदा? तुमचे चित्त सतत चैतन्याबरोबर राहिले पाहिजे. असे लोक देवतास्वरूप वंदनीय आहेत; फालतू गोष्टी, वादविवाद करण्यात त्यांना रस नसतो; इथे नाव पैसा प्रसिद्धी अशा गोष्टी मिळवायच काम नाही. मनाचे परिवर्तन होणे एवढ एकच ध्येय आहे. कुंडलिनी तुम्हाला सर्व ताप त्रास आजारापासून मुक्त करते. सहजयोग हा कुंडलिनी जागृतीचा आणि परमात्म्याशी योग करून देणारा मार्ग आहे. जे लोक पार झाले आहेत त्यांना विशेष सांगणे असे आहे की याचा जडाशी कधीही संबंध लावू नका; पुरी सतर्कता बाळगून आपणच आपल्या जीवनाचा विचार म्हणजेच सहजयोग करा. भूतपिशाच्य करणाऱ्यांकडून तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुमच्यामधील चेतना शुद्ध व पूर्णपणे जागृत व्हायला हवी व चैतन्याच्याच संपर्कात सर्वकाळ राहण्याचा प्रयत्न करा व तशी सवय लावा. कुंडलिनी जागृतीनंतर तुम्ही काहीतरी विशेष मिळवले पाहिजे. नेहमीचे कुटुंब, पैसा, संस्कार, वाद-विवाद सर्व सोडून द्या. परम मिळवण्यासाठी माणूस पूर्णपणे जागृत असयला हवा. आज गुरुपोर्णिमेच्या शुभदिवशी ‘मला’गुरू होण्याचा मान मिळाला. मातेला गुरु होणे अवघड आहे. कारण ती फक्त प्रेमस्वरूप आहे. मुलांचा गौरव यातच आनंद मिळवा. गुरुला तुम्ही काही देऊ शकत नाही. काही मागायचे असेल तर जे परम आहे ते मागा आणि हे प्रेम दूर दूरवर वाटा. सर्वांना आनंत आशीर्वाद.