Public Program

Rahuri (India)

1976-03-14 Sarvajanik Karyakram Agriculture College Rahuri NITL HD, 46'
Download video - mkv format (standard quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1976-0314, Public Program,Rahuri

 महात्मा फुले विद्यापीठाचे प्राध्यापक साहेब, प्राध्यापक वर्ग तसेच परदेशातून आलेले अनेक सहज योगी आणि सर्वात मान्य म्हणजे उद्याचे नागरिक तुम्ही सर्व विद्यार्थी वर्ग यांना माझा नमस्कार. (टाळ्यांचा आवाज)
सगळ्यात आधी क्षमा मागायला पाहिजे कारण दैवी कार्य आणि मनुष्याचं कार्य याचा मेळ कधीकधी बसत नसतो आणि प्रत्येक गोष्टीची बंधनं असतात. तुमचं घड्याळ एका प्रकारे चालतं आणि परमेश्वराचं दुसऱ्या प्रकारे चालत आहे तेव्हा त्याचा मेळ बसला पाहिजे. मी पुष्कळ प्रयत्न करते कधीकधी असा उशीर होऊन जातो. नंतर त्यांची कारणं कळल्यावर आपण मला खरंच क्षमा करा. असो आपल्यापुढे आज (अस्पष्ट) भाषण दिलंय (अस्पष्ट) एक तास, त्यानंतर एक तास चव्हाण साहेब बोलले असं त्यांनी मला सांगितलं. विषय बोलण्याचा नाहीच आहे मुळी किंवा वाद-विवाद करण्याचा सुद्धा नाहीय. तुम्ही एक साधी गोष्ट की आपण अमिबा पासून माणसं झालोत तर आपण कोणता वाद-विवाद केला, कोणती पुस्तकं वाचली, कोणचं शास्त्र त्यात घातलत, कोणचं आपण टेक्निक लावलत. आणि इतकी आपलं टेक्निक शास्त्रीय ज्ञान वाढल्यावर सुद्धा आज सायन्स अगदी पराकोटीला आपण पोहोचलोय म्हणतो तरीसुद्धा विध्वंसक शक्ती मात्र आपल्याजवळ खूप हातात आलेली आहे पण अशी अजून एकही आपण किमया गाठली नाही की ज्यांनी आपण जिवंत कार्य करू शकतो. आता आपण शेतकरी आहात आपण बघता की बी-बियाणं दिसायला जिवंत दिसत नाहीत पण पृथ्वीच्या पोटात घातल्या बरोबर तिला जिवंतपणा येतो आणि जिवंत कार्य घडू लागते, घडतं, ते करू शकत नाही, आपण त्यासाठी जर समजा एखाद्या बी- बियाणा पुढे मी लेक्चर दिलं तर ते येईल का? ते जमेल का? त्याला अंकुर फुटेल? सगळी जेवढी जिवंत कार्य आहेत ती आपोआप त्याला इंग्लिश मध्ये स्पाँट्यानुएस्ली म्हणतात ते. त्याच्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करतो म्हटलं तर तो नुसता स्वतःचा एक मनाचा विचार किंवा एक मनाचं समाधान म्हणा पण खरोखर आपण आजपर्यंत कोणतंही जिवंत कार्य केलेलं नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे त्याबद्दल आता परवा लंडनमध्ये मी वेल्स म्हणून एक जागा आहे तिथे गेले होते तर एक विद्यार्थी आपले  इंडियनच होते ते म्हणाले वा आम्ही टेस्ट ट्यूब मध्ये आता बेबीज तयार करतो. म्हटलं, ते चुकीचं आहे, त्यातही जे तुम्ही दोन अंश वापरता ते जिवंत आहेत मेलेल्यातून तुम्ही जिवंतपणा काही काढत नाहीत आणि ते काढणं होणारही नाही फक्त एका स्थितीला गेल्यावर मात्र तुम्ही जिवंत कार्य सुद्धा करू शकता. आणि त्याची व्यवस्था परमेश्वराने आपल्या आत मध्ये केलेली आहे त्यावेळेस ते (अस्पष्ट) आपल्या भारतामध्ये अनंत शोध लावण्यात आले. अनादीकाळापासून लोकांनी याच्याबद्दल लिहिलेल आहे. इथपर्यंत ब्रह्मदेवाला सुद्धा हे करावं लागलं हे जाणावं लागलं त्यानंतर दत्तात्रयांनी इंद्राला त्या स्थितीला आणलं असं सुद्धा आपल्या पुराणात सांगितलेलं आहे. आता आपली सगळी पुराण किंवा अशी जी काही मोठी मोठी पुस्तकं झाली त्याला स्क्रिप्चर्स म्हणतो एक तर ते सगळे खोटे होते किंवा ते खरे होते. त्याची सायन्सने हे काही सिद्ध करता येणार नाही की ते खोटे होते तसंच हे सिद्ध करता येणार नाही की ते खरे होते. तेव्हा ह्या बाबतीमध्ये सायन्स काय आपण उपयोग (अस्पष्ट) करू शकत नाही किंवा आपल्या बुद्धीचा आपण उपयोग करू शकत नाही. कारण ही जी गोष्ट आहे ही बुद्धीच्या पलीकडची आहे. बुद्धीही सीमित आहे आणि आपण असीमची गोष्ट करतो. तेव्हा ज्या पलीकडच्या गोष्टी आहेत तिथे गेल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही आणि तिथे जाताना बुद्धीचा उपयोग करता येत नाही. त्याचा अर्थ असा नाही की आपण निर्बुद्ध असलो पाहिजे. बुद्धीही यायलाच पाहिजे होती. माणसांमध्ये बुद्धी आली त्याची उत्क्रांती इतकी झाली की तो माणूस आला त्याच्यात बुद्धी आली बुद्धीनी तुम्ही सायन्स आणलत (अस्पष्ट) आता बघा सायन्स मध्ये कितीतरी गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की त्याचं त्या सायन्सचं सुद्धा एक किनारा आहे. त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत सायन्स आणि त्यामध्ये प्रांजळपणे सगळे सायंटिस्ट म्हणतात म्हणजे हे बघा जर आपण असं म्हटलं की पृथ्वी मध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे बरं हे आहे हे दिसलं ते लिहिलं ते बरोबर आहे ते सत्य आहे. पण ती कशी आहे? ती का आली? आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीला तुम्ही हात घालू शकता का? दहा वर्षांपूर्वी मी एक गोष्ट सांगितली होती. अमेरिकेमध्ये की, पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांच्यामध्ये गणेशतत्त्व असतं आणि गणेशतत्त्व म्हणजेच मॅग्नेटिझम आहे ते मानवातही आहे ज्या माणसांमध्ये गणेशतत्त्व फार जोरात असतं किंवा जागृत असतं त्याला दिशा कुठे उभा असला तरी माहित असतं, कुठे जायचंय आणि त्या मॅग्नेटमुळेच हे पक्षी उडून त्यांच्या जिथे त्यांना जायचं असेल किंवा त्यांच्या आवडीच्या देशांमध्ये बरोबर पोहोचलेत. कारण त्या मग्नेटच्या सहाऱ्याने त्यांना कळतं की दिशा कोणची घ्यायची. नाही तर सैबेरियाचे पक्षी जाऊन कुठल्याकुठे हजारो मैलावर जातात ते कसे? आमच्या नागपूरच्या जवळ एक पक्ष्यांचं स्थान आहे तिथे सैबेरियातले पक्षी उडून येत असत. पुष्कळ वर्ष, हजारो वर्षापासून येतायेत आणि आता ते सैबेरियातले आहेत हे लोकांनी ओळखून काढलं. पण आता तीच गोष्ट सायंटिस्ट सांगायला लागलेत की यांच्यामध्ये  मॅग्नेट असतं इतकच नाही पण त्यांनी पुष्कळशा अशा माशांमध्ये पाहिलय की त्यांच्यातही मॅग्नेट आहे. पण हे मॅग्नेट आहे हे एक (अस्पष्ट) विधान हे सत्य आहे पण त्याच्या पलीकडे सत्य ते सांगू शकत नाही की हे मॅग्नेट त्या माणसाच्या चेतनेतूनच येतं त्याच्या कॉन्शसनेस मध्ये ते कसं? तिथे त्याला कम्युनिकेट कोण करत? आणि त्याला कसं कळतं? बरं ते मॅग्नेट तुम्ही बसवू शकता का? आता मी त्याच्या पुढचं जर म्हटलं की हे गणेश तत्व आहे तर तुम्ही म्हणाल माताजी हे अगदी डोक्यापलीकडचं सांगितलं. पण आहे ते गणेशतत्त्व. ते कसं जाणायचं पुढे त्यासाठी आपली स्थिती जराशी वर जायला पाहिजे. मानव स्थितीमध्ये तुम्ही ते जाणू शकणार नाही. म्हणजे असं आहे आत्ता की समजा आम्ही म्हटलं की एका या शरीरामध्ये जर तुम्ही थोडंसं कातडं काढून पाहिलं तर त्याच्यामध्ये अनेक सेल्स आहेत. तुम्ही माझ्यावरती विश्वास तेव्हाच ठेवाल जेव्हा मी त्याला दाखवीन. त्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोप पाहिजे मायक्रोस्कोप पाहिल्याशिवाय मायक्रोस्कोपचे डोळे तुमच्यामध्ये आल्याशिवाय तुम्ही ते बघू शकत नाही. तसंच जे मी आज सांगत आहे किंवा जे अनादी काळापासून या सर्व तत्त्ववेत्त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्यांना आपण मोठे मोठे अवलिया वगैरे म्हणतो गुरु म्हणतो या लोकांनी जे काही सांगितलेलं आहे त्याची प्रचिती मिळण्यासाठी ते जाणण्यासाठी तुम्हाला काहीतरी आणखीन एक व्हायला पाहिजे. त्याबद्दल सांगितलंय की तुमचा जन्म परत झाला पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे, सगळ्यांनी सांगितलंय की  तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे. आता अमेरिकेचे प्रेसिडेंट साहेब जे पूर्वी होते ते म्हणतात की माझा दुसऱ्यांदा जन्म झालेलाय. ते दुसरे आले तेही सांगतायेत माझाही झालेलाय. आता असं स्वतःला सर्टिफिकेट दिलं तर बोलताच येत नाही, म्हणजे स्वतःला जर कोणी सर्टिफिकेट दिलं की आम्ही आमचा दुसरा जन्म झालाय आणि तुम्ही आपला दहावा जन्म म्हटलं तरी कबूल आता काय त्यांना सांगायची सोय. पण ही एक स्थिती आहे स्टेट ऑफ माईंड. स्टेट ऑफ द (अस्पष्ट) ही स्थिती आल्याशिवाय बाकी असं उगीचंच आपल्याला स्वतःला मानून घेऊन काही होत नाही, काही कन्सेप्ट नाही. परमेश्वर हे काही कन्सेप्ट नाही आहे. की आम्ही परमेश्वराला म्हटलं हा परमेश्वर आहे तो कर्ता धर्ता स्रष्टा अमका तमका आहे म्हणून कशावरून, पण ते बुद्धीच्या याच्यावर जेव्हा बसलं तेव्हा ते सांगता येणार नाही तुमचं कनेक्शन व्हायला पाहिजे पहिल्यांदा. आता या माईक वर बोलतेय मी त्याचं आधी मेन्सशी कनेक्शन झाल्याशिवाय काय मी आपल्याशी बोलू शकले नसते याचा काही उपयोग नाही. आपण हे जे एक इन्स्ट्रुमेंट बनवले गेलो म्हणजे हे तर आपल्याला माहीतच आहे की आपण अमिबा पासून आज या स्थितीला आलेलो आहोत, तेव्हा काहीतरी त्याला कारण असायला पाहिजे. उत्क्रांतीच्या या संक्रमणातनं आपण निघालो आणि आज मानव स्थितीला आलोय त्याला काहीतरी विशेष कारण असल्याशिवाय होणार नाही आणि ते विशेष कारण काय ते जाणणं हे खरोखर. ते जाणू शकत नाही कारण आपला अजून संबंध परमेश्वराशी झालेला नाही. पहिली गोष्ट परमेश्वराशी संबंध झाला पाहिजे मगच बोलता येईल. समजा, आम्ही इथे आलो नाही आमचा तुमचा संबंधच झाला नाही तर काय बोलता येईल? तेव्हा ही घटना आपल्यामध्ये व्हायची राहिलेली आहे. आणि ती घटना ज्या शक्तीने होते तिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. आता या ठिकाणी चार्ट वगैरे नाही आहे पण आपल्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये अशी एक सुप्तावस्थेत एक शक्ती आहे जी जागृत झाली म्हणजे आपला संबंध परमेश्वराशी होतो. आत्म्याशी होतो आणि त्या आत्म्यामुळे आपण परमात्माला जाणू शकतो. आत्म्याला जाणल्याशिवाय आपण परमात्माला जाणू शकत नाही. जाणू शकतच नाही जर कोणी म्हणत असेल की नाही आम्ही जाणलंय परमात्म्याला तर एक तर त्यांना जाणायचं नाहीये आणि दुसरं म्हणजे ते भ्रमात आहेत. हे कनेक्शन जसं ह्याचं कनेक्शन आपण लावलंय मेन्स ला तसंच आपल्यामध्ये ती शक्ती आहे आणि ती शक्ती जसं याच्या बरोबरच याचा कॉइल सुद्धा येतो तसंच आपल्याबरोबर तो कॉइल सुद्धा आलेला आहे. पण ही एक जिवंत क्रिया आहे (अस्पष्ट) अशी नाही की याच्यातून काढून तिकडे लावायची. त्याच्यासाठी कोणीतरी जाणकार पाहिजे तो जाणकार अगदी साधा ही असू शकतो. ख्रिस्ताला बघा सुताराचा मुलगा होता पण जाणकार. आपल्या इथे साईनाथ झाले त्यांच्या आई-वडिलांचा सुद्धा पत्ता नाही. साधारण काही शिक्षण नव्हतं त्यांना काही नाही पण जाणकार होते. रामदास स्वामींच्या बद्दल त्यांनी कुठे शिक्षण घेतलं वैगेरे कुणाला काही माहिती नाही. पण जाणकार होते. ज्ञानेश्वरांचं सुद्धा काही युनिवर्सिटीत वगैरे शिक्षण झालं नव्हतं पण केवढे प्रचंड, प्रचंड ते सांगितलेलंय. आता ते सुद्धा म्हणाले की कुंडलिनी नावाची शक्ती आपल्यामध्ये आहे ती जागृत झाली पाहिजे. तेव्हा एक झाड त्या विश्वाचं झाड जे फार बाहेर सायन्सच्या दृष्टीने वाढत आहे त्याला म्हणायचं एक्स्ट्रो वर्जन मध्ये बाहेरच्या बाजूला ज्याची फार वाढ होत आहे त्या झाडाचं पाळे मुळे सुद्धा आतमध्ये जायला पाहिजे. त्यांनी सुद्धा शोधून काढलं पाहिजे की या झाडाला आश्रय देणारा असं जे तत्व आहे ते काय आहे. आणि त्याच कारणामुळे आजच्या ह्या मॉडर्न जीवनात जेव्हा माणसाला सर्व प्रकारची आयुधं मिळाली आणि तो पूर्णपणे बाहेर विकसित झालेला आहे तेव्हा हाही शोध लागला की तो कोणच्या तत्वावरती आहे आणि ते तत्त्व त्याने कसं काढायचं? जर ते तत्त्व त्याने गाठलं नाही तर उलथून पडेल. आणि अशी स्थिती आहे. आज जर तुम्ही विदेशात जाऊन पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर्वांना एक तर्‍हेचा धाक बसलाय की कधी आम्ही उलथून पडू आणि आमचं काय होईल. कुठून आमच्यावर अटॅक येईल हे समजत नाही. आता कॅन्सरसारखाच रोग बघा. कोणाला कॅन्सर होईल? कधी होईल? काही सांगता येत नाही. तसंच परदेशात जाऊन हे आपले प्राध्यापक आलेत जर त्यांना आपण विचारलं आजकालच्या काळात तर 65% लोकांना वेड लागलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे अगदी वेडे झालेले नाही त्याचे अनेक प्रकार असतात. पण 65% लोक सायकॉलॉजिस्ट कडे जातात. म्हणजे हे किती मोठं विध्वंसक कार्य मनुष्याच्या आतून होतंय. त्याशिवाय बाहेर आपण ॲटम बॉम्ब बनवून ठेवलाय म्हणजे सबंध सायन्स चोळून पिऊन काय बनवलं तर ॲटम बॉम्ब एखाद्या राक्षसासारखा बसवलेला आहे आणि त्याच्या भीतीनेच मुळी सगळे युद्ध आता थांबलेली आहेत. म्हणा ही कृपाच आहे म्हणा राक्षसाची सुद्धा. याप्रमाणे सर्व जगामध्ये एक तर्‍हेची भयंकर भीती, आशंका पुढे काय होईल? असं एक विचित्र वातावरण आहे. आता मी माझ्या यजमानांच्या बरोबर सर्व जगात फिरलीय. सगळीकडे गेलेय. एकीकडे फक्त गेले नव्हते म्हणजे ऑस्ट्रेलिया तिथे सुद्धा आता जाणार आहे आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक तर्‍हेची फार भयंकर भीती आहे. त्यामानाने आपण बरे आहोत. कारण अज्ञानात आहोत. अजून आपण अवेअरच नाही आहोत. आपण  सुप्त अवस्थेत आहोत एका अर्थी बरं आहे. आपल्याला माहितीच नाही की काय होण्यासारखं आहे? म्हणून आपण आनंदात आहोत. पण बाहेर जर आपण पाहिलं तर लोक आशंकेत आहेत. भयंकर आशंकेत आहेत. आपल्याला असं वाटतं की परदेशात लोकांनी फार समृद्धी केली. फार पैसे कमवले आणखीन आफ्ल्यूएन्स आलंय त्यांच्यामध्ये  तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्या प्रोग्रामला एक अठरा एकोणीस वर्षाची मुलगी आणि एक सतरा अठरा वर्षाची मुलगी असे दोघी अगदी तरुण मुली आल्या होत्या. स्वीडनहून आल्या होत्या. आणि मी त्यांचे व्हायब्रेशन्स पाहिले तर जसे प्रेताचे व्हायब्रेशन्स यावे तसे आले तर मला इतकं आश्चर्य वाटलं या तरुण मुली या वेळेला आनंदाच्या गोष्टी करण्याच्या ऐवजी या मरणाच्या काय गोष्टी करत आहेत. मी त्यांना घरी बोलावलं आणि फार प्रेमाने जेवायला घातलं आणि त्यांना मी विचारलं की तुम्हाला झालं काय? तुम्हाला काय रोग आहे? तुम्हाला काय त्रास आहे? नाही मला काही रोग नाही काही त्रास नाही. फार विचारपूस केल्यावर रडू लागल्या दोघी, म्हटलं झालं काय? म्हणे आम्हाला सारखं असं वाटतं की आम्ही जीव देऊन टाकावा आम्ही आत्महत्या करावी पण का? म्हणे, आमच्या पुष्कळ मैत्रिणींनी मित्रांनी जीव देऊन टाकलेला आहे. आणि आम्ही सुद्धा त्यातच प्लॅनिंग करत असतो की आम्हीसुद्धा आता जीव देऊन टाकावा. एवढी समृद्धी मिळाल्यावर एवढं सगळं ऐश्वर्य तुमच्या पायावर लोटांगण घालत असताना तुम्ही असा विचार का करता? त्या समृद्धीत काही नाहीय अहो त्याच्यात आनंद नाहीय त्याच्यात प्रेम नाहीय काही नको आम्हाला. आत्ता जे आम्हाला मिळालं नाही ते जर तुम्ही देत असलात तर मात्र दुसरंय बाकी आम्हाला या गोष्टींचा काहीही आता नाद राहिलेला नाहीये आणि अगदी वीट आलाय. तर मी म्हटलं बर मग त्या पार बीर झाल्या आता त्यांचं आयुष्य वेगळय ही दुसरी गोष्ट. पण मनुष्य कितीही उच्च दशेला गेला म्हणजे संसारीक दृष्टीनी आपल्याला असं वाटतं कुणी जर मोठा मिनिस्टर झाला म्हणजे त्याला फार सौख्य मिळालं तुम्ही जाऊन बघा त्याला अगदी डोकं (अस्पष्ट) विचारा. कोणत्याही उच्च पदाला मनुष्य गेला म्हणजे तो सुखी झाला अशी आपल्याला कल्पना आहे. पण तो सुखी होऊच शकत नाही. त्याला कारण दोन आहेत. एक तर त्याच्यावर जबाबदारी ही पडते आणि एकटा तो जबाबदारी घेऊन फिरतो. पार झाल्यावर मात्र त्याच्यात काही जबाबदारी राहात नाही सगळी परमेश्वराची जबाबदारी आणि परमेश्वर सगळं काम फटाफट करत असतो. त्याचा अनुभव अनेक सहजयोग्यांना आलेला आहे. त्याला काही करावंच लागत नाही. निदान असं भासत तरी नाही की आपण काही करतोय. दुसरी गोष्ट अशी की माणसाला काहीही झेपत नाही. त्याला तुम्ही पैशे दिले कोणत्याही माणसाला तुम्ही एकदम शंभर रुपये रस्त्यावर जाताना एखादा भिकारी भेटला त्याला शंभर रुपये तुम्ही देऊन बघा. सरळ तो दारूच्या गुटख्यावर जाणार. जर तुम्ही दहा रुपये दिलेत तर दुसरं काहीतरी करणार. कारण त्या वेळेला अक्कल राहत नाही माणसाला आणि कोणचंही शुभ कार्य त्याच्या हातून होईल असं सांगता येत नाही. कोणालाही तुम्ही मोठी पोझिशन देऊन बघा ते त्याला झेपणार नाही आणि त्याने जर तो झेपण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा त्रास होईल (अस्पष्ट) काय जर एखादा मनुष्य म्हणेल की मी प्रामाणिकपणे कार्य करतो आणि मी हे झेपून दाखवतो. तर ते त्याला अशक्य आहे. त्रासदायक आहे. दुःखदायी आहे. त्याचं कोणी ऐकून घेणार नाही. अशी परिस्थिती असताना आपण असा विचार केला पाहिजे की काहीतरी असमर्थता आपल्यामध्ये आहे आणि आपल्याला समर्थ झालं पाहिजे. स म र्थ आता हा शब्द फार छान आहे. सम अर्थ म्हणजे आपलं जे नाव आहे मानव त्याला त्या अर्थाला आपण प्राप्त झालं पाहिजे. आणि ते तेव्हाच होईल जेव्हा आपल्यामध्ये जी खरी शक्ती आहे आत्म्याची ती आपण जाणून घेऊ. जेव्हा आपल्यामध्ये आत्मा प्रकाशित होईल जेव्हा आपण आत्मन जेव्हा आपलं चित्त आपलं अटेंशन आत्म्यामध्ये विरघळून जाईल तेव्हाच ती प्रचंड शक्ती आपल्यामध्ये येईल आणि तेव्हाच आपण खरे समर्थ होऊ तेव्हा कोणतीही गोष्ट पेलणं कठीण जाणार नाही. कोणताही त्रास आपल्याला होणार नाही. तेव्हा माणसाला वाटेल की आपला अर्थ मिळाला. म्हणजे आता समजा एखादा दिवा आम्ही तयार केला. त्याला नाना तऱ्हेने शृंगार त्याचा केला आहे सजवला आणि जर तो पेटवलाच नाही तर अजून कार्य बाकी आहे. पण पेटवल्यावर त्याला अर्थ मिळाला मग तो काय करतो? मग तो प्रकाशतो. फक्त प्रकाशच देण्याचं काम आहे आणि प्रकाश आपोआप वाहतो. त्याला काही करावं लागत नाही त्याला काही धरावं लागत नाही त्याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत. सरळ असा वाहत राहतो प्रकाश. जसा सूर्याचा प्रकाश आपोआप वाहतो तसाच अशा मानवाचा प्रकाश वाहतो. आता ह्या लोकांनी बाकी सगळं सांगितलंच असेल टेक्निक वगैरे तुम्हाला सहजयोगाच. आणखीन टेक्निक आहे (अस्पष्ट) प्रत्येक गोष्टीला टेक्निक असतं. तसंच हे जे सगळं विश्व आहे त्याचं सुद्धा फार मोठं टेक्निक आहे. आणि ती विद्या जी आहे ती सर्व विद्यांच्या वर विद्या आहे. पण ते मिळवण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा आपल्यातून शक्ती वहन झाली पाहिजे. शक्ती वहन झाल्यावर मगच त्याचं टेक्निक आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आता या खोलीत तुम्ही आलात आल्यावरती जर इथे अंधार असला तर फक्त दिवा लावायला एक बटन दाबलं की दिवा येणार पण ह्याच्या मागे किती मोठे किती मोठं ऑर्गनायझेशन आहे. किती मोठी शक्ती आहे. आणि हजारो वर्षाची ही इलेक्ट्रिसिटीची जी काय त्यांनी मांडणी केलेली आहे तिच्यात कितीतरी इव्होल्युशनस आले कितीतरी उत्क्रांती झाली आणि आज तुमच्या पुढेही अशी स्थिती आली की तुम्ही बटन दाबल्या बरोबर तुम्हाला सगळीकडे लाईट दिसतात. तसेच परमेश्वराने सुद्धा आपल्यामध्ये अशी फारच सुंदर कोमल, अगदी अशी व्यवस्था केलेली आहे, की नुसतं बटन दाबल्या बरोबरच आपल्या मध्ये प्रकाश येऊ शकतो. आणि प्रकाश आल्यावरच आपण आपले दोष बघू शकतो. त्याच्या आधी जर कोणी सांगितलं की तुमच्यात हा दोष आहे तर ते आपल्याला बरं वाटत नाही. आणि ते चांगलं ही नाही. तसं जर कुणी म्हटलं की हा इथे साप आहे तुम्ही सापाला धरलेलंय लोकांना राग येईल की काय मी मूर्ख आहे मला समजत नाही की हा साप आहे की काय. पण जर प्रकाश झाला तर लगेच तुम्ही हातातून सोडून द्याल हो बुवा दिसतोय साप आता नको. तेव्हा ही स्थिती माणसाची व्हावी ही परमेश्‍वराचीच योजना आहे. सहजयोगामध्ये पहिल्यांदा पार करायचं. पहिल्यांदा माणसाला पार करून टाकायचं. लाईट जरी थोडासा चालेल. हलका असला तरी चालेल. हळूहळू लोकांना दिसू लागलं म्हणजे ते आपल्याला स्वच्छ करून घेतील. आधी स्वच्छ करत बसत नाही. ही पूर्वीची प्रथा होती ती सोडावी लागली कारण त्याला फार वेळ लागतो. आणि स्वच्छ केल्यावर ही लोक ते परत स्वच्छ करायला तयार होत नाहीत. तेव्हा आधी पार करून टाकायचं. सगळ्यांच्यामध्ये आधी दिवा लावायचा. मग चिमण्या साफ करू लागतात स्वतःच. सगळी काही सफाई स्वतःच सुरू होते आणि कोणालाही त्याचं वाईट वाटत नाही. हा एक सहजयोगाचा म्हटलं पाहिजे फारच प्रॅक्टिकल प्रकार आहे. सहजयोग नेहमीच घडत आलेला आहे सबंध हे जे काही विश्व रचलं गेलं हे सहजच झालेलं आहे स ह ज सह म्हणजे बरोबर आणि जन्मलेली. जसं एका झाडा बरोबरच विश्व होण्याचं भाग्य जन्मलेलंय तसंच तुमच्याबरोबर परमेश्वराशी योग होण्याचं सुद्धा भाग्य (अस्पष्ट) आणि योग झाल्यानंतरच मग क्षेम आला तर त्याला एक सौष्ठव येत. त्याचं एक सौंदर्य असतं. आणि अशा माणसाला जी काही समृद्धी मिळेल त्याची जी काही वाढ होईल त्यानी सर्व जनसाधारणचा फायदा होईल. ही अशी फार मोठी गोष्ट आहे आणि हे फार मोठं कार्य आहे. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे ह्या राहुरी गावातच आता पेट सुटून आलेलय. सगळ्या विश्‍वात तुमच्या राहुरीचं नाव झालेलय. आणि लोक आता पाहिलं आपण इथे जसं काही एखाद्या तीर्थयात्रेला यावं तसं ते राहुरीला येत आहेत. तेव्हा राहुरीकरांवरती विशेष जबाबदारी पण आहे. की हे लोक ज्या आशेने तुमच्याकडे येतात ती त्यांची आशा बाळगून ठेवावी. आणि आम्हीही परमेश्वराला शोधत आहोत. आम्ही परमेश्वरापासन दूर नाही. आमच्याही मनामध्ये परमेश्वराला शोधण्याची फार इच्छा आहे असं दाखवलं पाहिजे. आहे सगळ्यांच्या मध्ये खूप इच्छा आहे फक्त दडपलेली आहे झोपलेली आहे. एक इंग्लिश पोएट विलियम ब्लेक झाले त्यांचं पुस्तक आत्ताच मी थोड्या दिवसांपूर्वी वाचलं ‘मिल्टन’ म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी सबंध भाकीत सहजयोगाचं केलेल आहे आणि सांगितलं की लंडन हे जेम्स (अस्पष्ट) होणार आहे. लंडन हेच मूळी तीर्थयात्रेचं स्थान होणार आहे. इतकंच नव्हे पण ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या जागेचं नाव तसं ज्या ठिकाणी आश्रम आहे त्या जागेचं नाव. इतक त्यांनी एक 75 वर्षांपूर्वी सगळं लिहून ठेवलेलं आहे. पण त्यांनी जी एक विशेष गोष्ट सांगितली ती ही की ह्या काळात जे लोक परमेश्वराचे आहेत ‘मेन ऑफ गॉड’ त्यांना परमेश्वर मिळेल आणि ते प्रॉफिट्स होतील, प्रेषित होतील आणि त्यांना एक विशेष शक्ती मिळेल त्या शक्तीमुळे ते इतरांना सुद्धा प्रेषित करू शकतील. सहजयोगाची हीच विशेषता आहे. कोणी गुरु म्हणाले की तुमची जागृती झालेली नाही. काल आमच्याकडे इथे बरेच लोक आले होते, माताजी आमच्या गुरूंनी सांगितलंय की तुमची जागृती झालेली नाही अरे म्हटलं कशावरून म्हणे आमच्या क्रियांवरून म्हटलं काय होतं? म्हणे आमचं अंग असं तसं हलत. म्हटलं हे काय हे तर कुणीही करू शकते त्याने काय फायदा झाला? त्यानी कुणाचं कल्याण होतय का? कुणाला फायदा होतोय का? तुमच्यामध्ये काही शक्ती आली का? तुमच्या सामर्थ्याबाहेर काहीतरी होतंय याला तुम्ही कंट्रोल ही करू शकत नाही ही शक्ती तुमची कशी? एक गृहस्थ सांगायला लागले मी बेडकासारखा उडतो. म्हटलं आता काय तुम्ही बेडूक होणार का? जेव्हा ही शक्ती येते तेव्हा त्या शक्तीचा संबंध ज्ञानी आणि जे काही आहे ते सांगण्यासाठी सहजयोग आहे. नंतर ते तुम्ही स्वतःच पडताळून पाहू शकता. व्हेरिफाय करू शकता की आहे किंवा नाही पण शंकेखोरपणा करणं त्याची सुद्धा एक मर्यादा आहे. जर तुम्ही परमेश्वराची शंका धरून बसली तर परमेश्वर म्हणेल बरं आता बसा तुम्ही शंका करत. ते काही तुमच्या पायावर पडणार नाही. तुम्हाला मागावं लागेल. ही मागणारी मंडळी आहेत. आता हेच यांचं मी सांगत होते की परदेशातल्या लोकांचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं पाहिजे इथे म्हणजे अत्यंत पवित्र लोक आहेत. ही पावन भूमी आहे. पवित्रतेचं फार मोठं इथे तेज आहे. आणि त्या तेजामुळे लोक फार लवकर पार होतात. परवाच्या दिवशी आम्ही गेलो होतो तुमच्या मानोरी गावाला आणि जवळजवळ दीड हजार माणसं असतील किंवा जास्तच असतील सगळीच्या सगळी एकदम पार झाली. पटकन पार होतात पण जमत नाही, रुजत नाही. जसं एखादा अंकुर पटकन फुटावं तसं आहे पण ते रुजत नाही आणि ते जमत नाही. या लोकांचं वेगळंय पार व्हायला यांना वेळ लागतो फार, पण झाले म्हणजे असे जमतात कारण यांना याचं महात्म कळलेल आहे. याच्यापलीकडे काही नाही हे कळलेलं आहे. ह्यांनी आपल्या बुद्धीनी बरोबर हे कनक्लुजन काढलेलंय की हेच मिळवलं पाहिजे. हे झालं म्हणजे झालं. तेव्हा ते सत्य ओळखतात आणि आपण ओळखत नाही. आणि त्यामुळे ते सगळं काही वाया जातं. दुसरी गोष्ट अशी की ह्यांच्याकडे अनैतिकता वाढलेली होती ती जोपासली गेली आणि अनैतिक राहणं म्हणजे काय वाईट आहे असं त्यांना वाटत होतं पण जेव्हा मी सांगितलं की अनैतिक माणसांनी सहजयोग कधीच साधलेला नाही आणि साधू शकत नाही. सबंध गोष्टी त्यांनी सोडून टाकल्या. इथपर्यंत गणपतीची बसून पूजा करतात आणि ह्यांनी गणपतीचं आम्हाला इनोसन्स यावं म्हणून प्रार्थना करतात. मी सांगितलं जमिनीवरच डोळे ठेवा थोड्या दिवस तुमच्या डोळ्यांची हालचाल फार होते त्याने तुमचं चित्त विचलित होतं तर जमिनीवरच डोळे करून बसले. आणि इतकं यांनी सोडलेलं आहे म्हणजे दारू पीत असत भयंकर काही काही लोक तर दारुडे, काही काही लोक तर ड्रग इतके घेत असत तर माझ्याकडे आले तर त्यांना मी दिसत नव्हती आणि प्रकाशच दिसत होता. काही काही लोक कोमामध्ये होते काही काही लोक फार भयंकर रोगात त्रस्त होते. ते सगळं सोडून आणि इतके ते वर आले. पण आपल्याकडे असं होतं की काहीही सोडायला लोक तयार नाही. मी एवढंच म्हटलं की तो काशीचा गंडा नका घालू कारण ते तुम्हाला लुबाडलेलं आहे. एक पैशाच्या दोऱ्याला त्यांनी ब्राम्हणाने तुम्हाला लुबाडून एक रुपया घेतला आणि ते तुम्ही कशाला गळ्यात घालताय. त्याचा अर्थ काय? त्याचं प्रतीक काय? ते प्रतीक फेका. त्याला सुद्धा लोक तयार नाहीत. हा एक प्रकारचा हट्ट आहे. हट्टच नसून हा अहंकार. आपल्याला थोडसं तरी सोडावं लागणार आहे. आणि जे सोडायचं आहे ते असत्य. सत्य धरून असत्य सोडायचंय एवढं जर लक्षात घेतलं तर पटकन या गोष्टी होतील. दुसरी गोष्ट आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये साधुसंत अनेक झाले. आणि त्यात भामटे ही पुष्कळ आहेत. त्यामुळे एकतऱ्हेची ही भावना लोकांमध्ये आलीये की सगळं काही परमेश्वर वगैरे खोटं आहे. याला काही अर्थ नाही. आमचे आई-वडील हे सगळं करत आले याला काही अर्थ नाहीये. म्हणजे एक तऱ्हेचं ज्याला प्रिवलेसनेस म्हणतात ते फार (अस्पष्ट) चंचल प्रवृत्ती फार आलीय. जे काही परदेशी आहे ते फार चांगलंय काहीतरी उडाणटप्पू पणा केला म्हणजे आम्ही फार हुशार. आमच्यामध्ये म्हणजे काहीतरी विशेष विद्वत्ता आहे कारण आम्ही उडाणटप्पू आहे. पण याचा एकच अर्थ होतो की आम्हाला स्वतःची किंमत स्वतःची आम्हाला प्रतिष्ठा नाही. दुसरं आपल्या देशाची प्रतिष्ठा नाही. त्याच्या संस्कृतीची प्रतिष्ठा नाही. इतकंच नाही तर या देशांमध्ये जे एवढं मोठ ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या भंडाऱ्याची कल्पनाच नाही (अस्पष्ट) तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं आपला देश सबंध ब्रम्हांडात शोधून सुद्धा मिळणार नाही. हा एक विशेष देश आहे. ही योग भूमी ह्या देशाच्या एकेका ऋणा ऋणातून चैतन्य (अस्पष्ट) दिलं. आणि त्यावर तुम्ही जन्माला आले हे हजारो वर्षांचं तुमचं पुण्य आज सार्थक आहे. तेव्हा स्वतःची किंमत करून घ्यायला पाहिजे. स्वतःची आम्हाला किंमत राहिलेली नाही. त्याला मला आश्चर्य वाटतं की आजकालच्या तरुण मंडळींमध्ये हे एक का? आम्ही गांधीजींच्या वेळेला तरुण होतो आणि त्या वेळेला आम्हाला असं वाटायचं की आमचं हे प्राण या देशासाठी आम्ही वाहून घेतोय. प्रत्येक रक्ताचा एक एक कण या देशासाठी दिला पाहिजे. आणि आज बघतो की हे असे प्रीवलस लोक कुठनं आले बुवा. ज्या देशासाठी लोकांनी आपल्या प्राणाचा त्याग केला सबंध काही (अस्पष्ट) तन-मन-धन तिथे हे असे प्रीवलस लोक कुठनं जन्माला आले काही लक्षात येत नाही. तेव्हा आम्ही कितीतरी मोठे आहोत पण त्याची किंमत जाणली पाहिजे. आज जे इथे बसलेले इतके परदेशी आहेत ते तुम्हाला भेटायला आलेत. भारतीय म्हणजे किती मोठा आहे असं सगळ्यांना वाटतं. एक दिवस असा येईल की जेव्हा सारं विश्व तुमच्या पायावर  येणार आहे. कारण जे सगळं काही जे भौतिक आहे ते नश्वर आहे. आपल्याकडे जे आहे ते चिन्मय आहे. ते अनंत आहे. आणि ते आपण त्यांना देऊ शकतो फक्त ते जाणून घेतलं पाहिजे. कारण ते आपलं आहे म्हणून कवडी (अस्पष्ट) ते जाणून  घेतलं पाहिजे. हे जर झालं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की खरोखरच या देशात आपण जन्माला आलो हे काहीतरी पूर्व जन्माचं फार मोठं सुश्रुत आहे. आणि हे लोक तसंच (अस्पष्ट) की हे लोक फार (अस्पष्ट) हे पॅरेडाइज् मध्ये (अस्पष्ट) सगळ्यांनी मला सांगितलं की हे पॅरेडाइज् आहे. आणि  आपल्याला त्याची कल्पना नाही. हिऱ्याला स्वतःची कल्पना नसते. पण तुम्हाला असावी, तुम्ही जाणावं सहजयोगातून आपली या देशाच्या संस्कृतीची पूर्ण ओळख करून घ्या. त्याशिवाय सर्व जगामध्ये तुमचं काय स्थान आहे? कलेक्टिविटीमध्ये तुमचं काय स्थान आहे? सबंध विश्‍वाच्या चेतनेत तुमचं काय स्थान आहे? ते जाणून घ्या. आणि जर तुम्ही का वाया गेलात तर सगळ्या या विश्वाच्या कार्याची जेवढी काही नुकसानी होईल त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर. असं आता सहजयोग जर घडला आज तर पुढे तो कसा करायचा वगैरे इथे फार मोठी मोठी मंडळी आहेत. म्हणजे चव्हाण साहेब वैगेरे आमचे फार मोठी मंडळी आहेत. आणि ह्यांचं सगळीकडे फार नाव आहे. देशोदेशी यांचं नाव आहे. आणि सगळ्यांनी मला सांगितलं की माताजी ह्याच्यातले जर एखादे आमच्याबरोबर ऑस्ट्रेलिया आले तर आम्हाला फार आनंद होईल वगैरे सगळे मला सांगत आहेत. तेव्हा सांगायचं असंय की स्वतःची किंमत करून हे मिळवा आणि जो हिरा तुमच्यात आहे जो मला दिसला त्याला चमकवून द्या. नसत्या वादविवादात पडण्यात काही अर्थ नाही. जे प्रॅक्टिकल आहे ते बघावे. हे मिळवा आणि जो हिरा तुमच्यात आहे जो मला दिसला त्याला चमकवून द्या. नसत्या वादविवादात पडण्यात काही अर्थ नाही. जे प्रॅक्टिकल आहे ते बघावे. आणि ते झालं पाहिजे ते होऊ शकतं ते फक्त तुम्ही कसंतरी जपून, संभाळून, जोपासून, रुजलं म्हणजे झालं. तुम्ही सगळ्यांनी इतकी माझी वाट पाहिली आणि मला ही संधी दिली म्हणून तुम्हा सगळ्यांचे मी अनंत आभार मानते. (टाळ्यांचा आवाज) प्रश्न असले तर विचारा एक-दोन. विचारा प्रश्नाला हरकत नाही.  नवीन साधकाने प्रश्न विचारला (अस्पष्ट) कबूल आहे अगदी अगदी तुमचं म्हणणं पूर्णपणे मला कबूल आहे. पण असंय की माझे यजमान आधी आमचे यजमान इंडियन फोरेन सर्विस मध्ये होते तिथनं मी त्यांना रिझाईन करून आई. ए. एस. ला जॉईन करायला सांगितलं. आणि आम्ही इथेच होतो इतके वर्ष आणि नंतर असं झालं की 112 देशांनी साहेबांची निवडणूक केली आणि युनायटेड नेशनची एक (अस्पष्ट) ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे जसं डब्ल्यू. एच. ओ. वगैरे आहे ना अशा पुष्कळशा एजन्सीज आहेत. त्याच्यात त्यांना सेक्रेटरी जनरल म्हणून निवडून दिलं. आता माझे पती तिथे असल्यामुळे मला तिथे राहिलं पाहिजे. मी राहत नाही तिकडे राहाते इथेच. त्यांना जर विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की माझी बायको घरी नसतेच मुळी कारण चार महिने मी हिंदुस्तानात असते. आता बघा जाणारेय ऑस्ट्रेलियाला तिथे एक महिना राहणार. तिथून आल्यावर मला युरोपला जायचंय. त्याच्यानंतर अमेरिकेला जायचय. तेव्हा माझं वास्तव्य कुठे आहे असं नाही. आणि मी बरेच वर्ष हिंदुस्थानातच होते. फक्त आता सात वर्ष तिथे राहिले आणि परत त्यांनी इलेक्ट करून दिलंय. तेव्हा आणखीन पाच वर्ष राहावं लागेल. पण माझा अजून एड्रेस मुंबईचाच आहे. आणि पासपोर्ट सुद्धा इंडियनच आहे. आणि मी हिंदुस्थानातलीच आहे आणि इथेच राहणार आहे. आपण जरी हिंदुस्तानी अज्ञानी असलो कबूल आहे आणि इथे कार्य करायचंय पण जी गरज बाहेर आहे ती इथे नाही. कारण तुम्ही परमेश्वराला अजून शोधत नाही. तुम्ही डेव्हलपिंग कंट्री, तेव्हा आता नायलॉन कसं बनवायच याच्याकडे लक्ष आहे परमेश्वराकडे लक्ष आहे का हिंदुस्थानात लोकांच कुणाचं तरी आहे का? मग इथे आम्ही राहून काय करायचं? आमचा काय फायदा? इथे सिनेमा अक्टरेस पाहिजेत. ते भरपूर आहेत तुम्हाला. तुमचं लक्ष जर परमेश्वराकडे आलं तर आम्ही इथे पर्मनंट वास्तव्य करू. तसं आश्रम आता अजून आम्ही कुठेच बांधलेले नाहीत कुठेच जागा केलेली नाही पण तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. अज्ञानी लोकांसाठी फार इच्छा आहे पण अज्ञानी लोकांनी निदान हे तर म्हणायला पाहिजे की आम्हाला रियलायजेशन द्या माँ. आहे ना ठीक (अस्पष्ट) ( श्री माताजी हसत आहेत)
मी तर खेडोपाडी फिरतच असते जितका वेळ मिळतो माझे यजमान आज-काल हिंदुस्थानातच आहेत पण मी इथे आलेली आहे.
नवीन साधकाने प्रश्न विचारला (अस्पष्ट) हो हे बरोबर आहे. प्रश्न बरोबर आहे. आता हठयोग हठयोगामध्ये सुद्धा कुंडलिनी जागृती ही सहजच होते. पण हठयोगामध्ये आणि सहजयोगामध्ये एक अंतर आहे आणि ते काळानुसार झालेलं आहे. कारण जेव्हा हठयोग लोक करत होते त्या काळी आपल्याकडे चतुर्वर्ण्य संस्था होती. आणि जे विद्यार्थी गुरूकडे जाऊन राहत असत त्यांना त्याच्यातले जे विद्यार्थी परमेश्वराच्या शोधात होते अशाच लोकांना ठेवून जे गुरु रियलाइज सोल्स होते ते त्यांच्यावर मेहनत करत असत. आणि त्यांची सफाई करत असत (अस्पष्ट) त्या वेळेला जसं आपलं कॉलेज आहे आता समजा तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचं गोत्र म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीचं नाव होतं. आणि एका यूनिवर्सिटी तल्या मुला मुलींचा संबंध भाऊ-बहिणी सारखा असायचा. इतकंच नव्हे पण आत पर्यंत सुद्धा जर आपण एका गोत्रातले असलो तर सगोत्र आपण विवाह करत नाहीत. एवढी त्या वेळेला ब्रह्मचर्याची कल्पना होती. आणि एवढी सेलेबसी युनिव्हर्सिटीच्या मुलांमध्ये असायची. त्यापलीकडे गृहस्थ जीवन सुद्धा फार अत्यंत पावन रीतीने असायचं. पण गृहस्थांसाठी मात्र हठयोग नव्हता. कोणत्याही गृहस्थांसाठी हठयोग नव्हता. फक्त जे लोक ब्रह्मचर्यात राहत असत त्यांच्यासाठी पातांजलीनी हठयोग सांगितला. आणि पातांजलीचा जो हठयोग आहे तो फार थोडया लोकांसाठी कारण त्यावेळेला थोडीच फुलं होती. इतकी फुलं नव्हती तेव्हा थोड्याच लोकांसाठी सांगितला होता. आणि त्यांना अत्यंत मेहनतीने तयार करत असत. त्यातलेही पुष्कळ गाळून टाकायचे. आता काय झालं की काही लोकांनी जवळजवळ ही गोष्ट मला वाटतं काहीतरी पंचवीस पन्नास वर्षांपूर्वी सुरू झाली. की काही लोक अशेच परमेश्वराच्या शोधात त्यांना वाटलं आपण निघालोय आणि ते काही गुरूंच्याकडे वगैरे गेले. आणि गुरूंनी दया करून त्यांना थोडीबहुत आसनं बिसनं शिकवून आणि त्यांचे चक्र सुधारण्याचा प्रयत्न केला. आसन पद्धतीसुद्धा ही फारच सायंटिफिक आहे. आता आपण प्रत्येक तऱ्हेचं आसन आपलं करतो. आणि तसं करणं म्हणजे सबंध मेडिसिनचा बॉक्स पोटात घालण्यासारखे आहे. आम्ही सुद्धा आसनं वापरतो रियलायजेशन नंतर पण रियलायजेशनच्या आधी एवढ्यासाठी वापरत नाही कारण कोणचं चक्र धरलेलं आहे ते कळत नाही. त्याचं फार मोठं सायन्स आहे. पण त्याच्यातली सगळ्यातली जी मुख्य गोष्ट होती ती ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराला पहिल्यांदा प्राप्त करणे. म्हणजे रियलायजेशन म्हणजे सहजयोग. ईश्वर प्रणिधान झाल्याशिवाय हठयोग होऊ शकत नाही. आपल्यासारखं थोडं आहे की आता कोणीही उठला तो हठयोगी बसला. हे अगदी चुकीचं आहे. ईश्वर प्रणिधानाशिवाय हठयोग होऊ शकत नाही. पण पातंजल शास्त्र वाचतं कोण? कुणीतरी इंग्लिश माणसाने लिहिलेलं पुस्तक इकडे आलं म्हणजे आपण करतो आणि ते कशासाठी सगळ्यांना सिनेमा ॲक्टर व्हायचंय म्हणून. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हठयोग करणाऱ्या माणसाचं नेहमी हृदय चक्र धरलेलं असतं. म्हणजे काय तो मनुष्य इमोशनलेस होतो. त्याच्या इमोशन्स कमी होतात आणि तो अत्यंत कडक स्वभावाचा असा होतो. विशेषतः हठयोगी लोक जेवढे माझ्याकडे आलेत बहुतेकांच्या बायका पळालेल्या आहेत किंवा त्यांनी डिवोर्स केलेला आहे. बायकांच्या कारण बायकांशी वागतांना जी एक मृदुता पाहिजे ती त्यांच्यात राहात नाही. म्हणजे जे आपण आपलं भलं करायला जातो त्या ठिकाणी आपण रोगी होतो आणि भावना नष्ट होतात असा मनुष्य भावनाशून्य होतो. दुसरी गोष्ट आपण सांगितलं आणखीन तऱ्हे तऱ्हेची आहे. जसं आता राजयोग आहे. राजयोगावरती मी आपल्याला सांगते. राजयोग म्हणजे आपल्यामध्ये जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा आत मध्ये काय काय होतं बंध वगैरे पडतात. कारण कुंडलिनीचं जागरण मी सांगितलं एक मोठं भारी टेक्निक आहे. आता जेव्हा एखाद्या बी मधून अंकुर निघतं ते काही असं सरळ निघून असं निघत नाही त्याच्यामध्ये सुद्धा टेक्निक आहे. काहीतरी घटना होतात त्या ज्या घटना आहेत त्याला राजयोग म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला बंध पडतात खेचरी घडते म्हणजे जराशे डोळे आत म्हणजे आपली जीभ आहे ती आत मध्ये ओढली जाते. डोळे विस्फारित होतात. डायलेटीशन ऑफ द प्युपील घडतं. हे घडतं आपण घडवून आणायचं नाही. पण मी अशे अशे विचित्र हठयोगी पाहिले आहेत की जे स्वतःची जीभ काटतात आणि आत मध्ये घालतात. तसं करून नाही होणार म्हणजे आपण जर अन्न खाल्लं तर जसं आपलं पचन घडतं तसंच कुंडलिनी जागृत होताना राजयोग हा घडतो तो घडवून आणायचा नाही. इथपर्यंत की लोक डोळ्यांमध्ये औषध घालतात की आमचे प्युपील डाइलेट्स होतील पण प्युपील डाइलेट होऊन काही कुंडलिनी जागृत होणार नाही. कुंडलिनी जागृत झाली म्हणून प्युपील डाइलेट होतात. त्याप्रमाणे इतके मिसनाँमर्स याला म्हणायचे आणि विपर्यास आहे. कोणचंही चांगलं काम द्यायचं त्याचं विपर्यास करण्याचं माणसाचं म्हणजे वैशिष्ट. त्यामुळे हे राजयोग काय आहे ते सुद्धा मला आश्चर्य वाटतं की जीभ कापून आतमध्ये घालतात. जीभ कापून आतमध्ये घातली म्हणजे काय कुंडलिनी जागृत होईल का? अशाप्रकारे प्रत्येक गोष्टीचा त्यांनी विपर्यास करून ठेवलेला आहे. आणि सगळं जे काही कार्य आहे ते सहजयोगानीच होतं. सहज म्हणजे स्पोटानिअस. फक्त हठयोग जो आज आपण मानतो तो खरा हठयोग नाही. ईश्वरप्रणिधानाने सुरू केलेला हठयोग हा खरा आहे पण तशी आज परिस्थिती नाही आणि इतका उशीर लावण्याची गरजही नाही.
( नवीन साधकाने प्रश्न विचारला) (अस्पष्ट) कुंडलिनी ही वनस्पतीने जागृत होते किंवा जन्माने होते बरेच प्रकार आहेत.
वनस्पतीने कशी होईल बेटा?
नाही मी एका ठिकाणी असं वाचलेलं आहे.
अहो, तुम्ही वाचायला गेलं ना तर इतका वेडेपणा आहे की मी एवढे पर्यंत ऐकलं आहे की कुंडलिनी पोटात आहे. एकाने सांगितलं नाकात आहे. आता काय करायचं? म्हणजे देवावरती कोणी लिहावं? हिटलरने सुद्धा लिहिलेलं आहे. कारण देव काही येऊन तुमचा हात धरणार नाही. अनाधिकार चेष्टा (अस्पष्ट) काहीही लिहितात. तसं काही नाही जे म्हणतात त्यांना म्हणावं त्याचं प्रत्यक्ष दाखवा. ज्या माणसाने आता जसं कालच सांगितलं त्या गृहस्थाला तुम्ही मला हे सांगा ह्या माणसाची कुंडलिनी कुठे आहे? ते म्हणे हे कसं माहिती? म्हटलं तो तुम्हाला सांगतो आता हा ऑस्ट्रेलियाचा आहे. पण हा सांगू शकतो की तुमची कुंडलिनी कुठे आहे? तो तुमची जागृत करून दाखवू शकतो. वर नेतो म्हणजे त्याला कुंडलीनीचं ज्ञान आहे. आणि त्याची कुंडलिनी जागृत आहे. उगीचच कोणी म्हटलं की आम्ही राजे आहोत म्हणून त्यांना मानायचं का राजे?
(नवीन साधकाने प्रश्न विचारला) कुंडलिनी जागृत होते म्हणजे काय होतं? आणि ती आपल्याला कशी जाणवते जेव्हा होते त्यावेळेला?
हे बघ हा प्रश्न बरोबर आहे. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा प्रत्येकाच्या जाणीवेप्रमाणे ती जाणवते. म्हणजे काही लोकांचं जर नाभी चक्र धरलेलं असलं तर तुम्हाला अगदी डोळ्यांनी दिसेल की त्रिकोणाकार अस्थीमध्ये ती कुंडलिनी अशी धब धब धब धब  वाजते. आणि तिचं वर चढणं सुद्धा दिसेल. एखाद्याला जर लिवर असेल तर लिवर वर जाऊन ती अशी मारते आणि दाखवते की लिवर खराब आहे. त्याच्यावर ती जेव्हा वर येते तेव्हा इथे ब्रम्हरंध्रावर तेव्हा इथे जोरात धकधक धकधक असा अनहताचा आवाज येतो. असं कबीरांनी म्हटलेलं आहे की, ‘शून्य शिखर पर अनहत बाजी रे.’ इथे येऊन तो असा धक-धक आवाज येतो. पुष्कळांचा तो ही आवाज होत नाही. जर फारच स्मुद एरोप्लेन  असलं तर त्याचा टेक ऑफ कसा पटकन होतो तसा अगदी माणसाने जर कोणताच गुरु केलेला नसला फार वाचन केलेलं नसलं इकडेतिकडे डोकं घातलेलं नसलं आणि अगदी साधा सरळ एखाद्या मुलासारखा असला तर त्याची कुंडलिनी फटकन वर निघून जाते. त्याला कळत सुद्धा नाही आणि हातातून अशा झर झर चैतन्याच्या लहरी वाहू लागतात.
(नवीन साधकाने प्रश्न विचारला) त्याची आपल्याला जाणीव होते का?
हो अगदी नक्की, होणारच. ती जर झाली नाही तर तुम्ही पार नाही. स्वतःच तुम्ही स्वतःला सर्टिफिकेट द्यायचं ह्याच्यात काही मिझमेरिस्म  वगैरे नाही. इतकच नाही पण आल्यावर त्या लहरीने तुम्ही जाणू शकता. ह्या बोटांमध्ये तुम्ही असे हात जर केलेत तर तुम्हाला कळेल की ह्या माणसाला समजा तुम्हाला इथे काहीतरी जळल्यासारखं वाटेल. जर तुम्ही त्या माणसाला विचारलंत तर त्याला ब्रोंकाइटिसचा रोग असला पाहिजे. उदाहरण अर्थ पहिल्यांदा सुरुवातीला मी एका आरक्यालाँगिस्टला रियलायजेशन दिलं लंडनला. आता ते फार चिकित्सक असतात. त्याला काही विश्वास वाटेना की माताजींनी सांगितलं आत्ता तुम्हाला कलेक्टिव्ह कॉन्शसनेस आला तुमच्यामध्ये जागतिक चेतना आली हे कसं काय? तर तो म्हणाला की माताजी बरं माझ्या वडिलांचं कसं असेल ते सांगा आधी. म्हटलं हे बघा तुम्ही असा हात करून वडिलांचा विचार करा. केल्याबरोबर त्याला इथे जळू लागलं. म्हटलं हे सगळे वडिलांचे चक्र आहेत. उजव्या हाताला ही जी आहेत ती वडिलांची आहेत. आणि तुम्ही ह्या चक्रवरती बघता हे चक्र विशुद्धी चक्र आहे. म्हणजे त्यांना मी इंग्लिश मध्ये म्हटलं ही मस्ट बी डाऊन विथ सिवियर ब्रोंकाइटिस. हा शब्द हे मी वाक्य वापरलं. त्याचे वडील स्कॉटलंडला होते. त्याने लगेच फोन केला माझ्यासमोरच. आणि त्याच्या आईने सांगितलं तुझे वडील बिछान्यात आहेत आणि ही इज डाऊन विथ सीवियर ब्रोंकाइटिस. आणि ते आत्ता आमचे परम शिष्य आहेत. याची ओळख सुद्धा याची प्रचिती मिळते. तुम्ही स्वतः त्याची प्रचिती बघू शकता.
(नवीन साधकाने प्रश्न विचारला) हे कसं प्राप्त होत?
काय?
हे ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होतं?
हे बरोबर सांगितलं. त्यांना घाई झालेली आहे. तसंच असायला पाहिजे. हा बरोबर प्रश्न आला. आत्ता ह्या प्रश्नावरती कसं करायचं ते सांगते.
हा प्रश्न आला म्हणजे मग ठीक झालं. (श्री माताजी हसत आहेत)
आत्ता याच्या पुढे काही प्रश्न विचारायचा नाही.
(नवीन साधकाने प्रश्न विचारला) तुम्ही आत्ता जे (अस्पष्ट)
अहो सगळ्यांचं सांगते ना आता, तेच तर सांगते बसा बसा तुमचंही सांगते. (श्री माताजी हसत आहेत) सगळ्यांच सांगते आणि तुम्ही सांगाल आत्ता झाल्याबरोबरच तुम्ही सांगू लागाल. लगेच म्हणजे हे कनेक्शन झाल्याबरोबर हे वर्काउट होतं की नाही तसंच तुमचं कनेक्शन लागल्या बरोबर तुम्ही सांगू शकाल. लागलं पाहिजे मात्र आणि जर नाही लागलं (श्री माताजी हसत आहेत) जर कनेक्शन थोडं लुज असलं तर तेही ठीक करून देऊ. ( सगळे हसत आहेत)
थोडेसे कधीकधी स्क्रू ढिल्ले असतात लोकांचे ते कसावे लागतात. विशेष करून हा स्क्रू फार लूज असतो लोकांचा. अतिविचार करून होतो तो लूज. तेव्हा तेही बघायला पाहिजे. आत्ता कसं करायचं आत्ता ह्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की नाही मला माहीत नाही की हातामध्ये सिंपेठेतिक नर्वस सिस्टमस जी सगळी चक्र आपल्या बोटांमध्ये आहे पाच बोटं सहा आणि सात अशी सातही चक्र आपल्या हातांमध्ये आहेत. तेव्हा ते माझ्याकडे असं जर तुम्ही केलं सध्या म्हणजे एका लाईट ने दुसरा लाईट पेटवायचा असतो. तेव्हा आता माझ्याकडे असं करा. आणि दोन्ही पायातल्या जरा चपला काढा त्याला कारण असं की पृथ्वी मातेच फार वरदान आहे.