Sahaja Yoga is a big blessing

(India)

Feedback
Share

Sahajayogacha Upyog Saglyani Karun Ghyava ICI 25th March 1977 Date : Place Kalwe Public Program Type Speech Language Marathi

यांनी हा सुंदर योग घडवून आणलेला आहे, की मी आज आपल्याला सर्वांना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. असे योगायोग जुने असतात. जन्मजन्मांतरातले असतात ते. आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी कशी होते ते आपल्या एवढं लक्षात येणार नाही, कारण आपल्याला आपले पूर्वजन्म माहीत नाहीत. पण हे पूर्वजन्माचेच योगायोग आहेत. आणि त्यामुळेच आज परत, या जन्मातसुद्धा आपणा सर्वांना भेटण्याचा, हा उत्तम योग आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे की तो मी खरंच शब्दांनी वर्णन करून सांगू शकत नाही.

ग्रामीण विभागात, सहजयोग, फार उत्तम तऱ्हेने पोहोचला जाईल हे मला माहीत आहे. कारण शहरात राहणारे हे लोक, ही मंडळी स्वत:ला फार शहाणी समजतात. एक तर बहुतेक पढतमूर्खच असतात. पढतमूर्ख नसले तर पैशाच्या व सत्तेच्या दमावर स्वत:ला काही तरी विशेष समजतात. त्यांना असं वाटतं की सगळं जग त्यांनीच निर्माण केलेलं आहे. हे आकाशसुद्धा त्यांनीच निर्माण केलेले आहे आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत आणि परमेश्वर नावाची वस्तु काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतंही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही, की आपण हे अधर्माचं कार्य करीत आहोत. अजून आपल्या देशातली ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मंडळी परमेश्वराला आठवून आहेत. आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे आणि रामाने आणि सीतेनी पायी प्रवास करून सर्व भूमीला पुनीत केलेले आहे, पवित्र केलेले आहे. ग्रामीण समाजामध्ये, जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परम भक्ती आहे, त्याचा दुरुपयोगसुद्धा लोक करतात म्हणजे पुष्कळसे लोक खोट्या गोष्टी सांगून पैसे उकळतात. काही तरी भोळ्याभाबड्या लोकांना भिववून काही तरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये विचित्र तऱ्हेच्या भावना उत्पन्न करून, त्यांच्याकडून पैसे उकळत असतात. हे प्रत्येक खेड्याखेड्यातून चालले आहे. ही अत्यंत दु:खाची गोष्ट आहे. पण भोळ्याच्या मागे साक्षात शंकर बसलेला आहे आणि तो सगळ्यांचं रक्षण करीत असतो. परमेश्वर हा भोळ्यांच्या साधेपणाला भुलतो आणि नेहमी त्यांच्या मदतीला तो उभा असतो. पण परमेश्वराचा विश्वास एक क्षणही सोडला नाही पाहिजे. साध्या साध्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या की, आपण परमेश्वराला बाजारात विकत घेऊ शकत नाही किंवा परमेश्वराचा जो मनुष्य असेल तो कोणत्याही प्रकारचा पैसा तुमच्याकडून घेऊ शकत नाही. जर त्यांनी तुमच्याकडून पैसे लुबाडले, तर तो परमेश्वराचा मनुष्य नाही. मग तो कोणत्याही कारणाने पैसे मागत असेल तर, त्याला सरळ सांगायचं की,’ हे बघा, आम्हाला तुमच्याशी काही कर्तव्य नाही.’

 दुसरी गोष्ट रोगराई वगैरे शहरातली जितकी आहे, त्या मानाने ग्रामीण भागात कमी आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. त्याला कारण स्वच्छ हवा, वातावरण, तसंच पवित्र कार्यसुद्धा आहे. लोकांची मने पवित्र आहेत. पण रोगराई दूर करण्यासाठीसुद्धा आमच्या सहजयोग्यांनी अत्यंत कार्य केलेलं आहे. आणि एकदा तुम्ही सहजयोगामध्ये जर साक्षात्कारी पदाला प्राप्त झालात, तर तुम्हाला औषध, डॉक्टर वगैरे काहीही नको आणि सगळे रोग मानसिक, किंवा शारीरिक रोग नेहमीसाठी निघून जातात. सहजयोगासाठी तुम्हाला काही पैसे द्यायला नकोत. तुम्हाला त्याच्यासाठी काही विशेष मेहनत करायची नाही. काहीच मेहनत नाही.  जसं एखादं बी स्वत: उपजतं तसं तुमच्यात बसलेलं बीज अंकुरतं. तुमच्यामध्ये तो अंकुर आहे आणि त्या अंकुराला विद्वानांनी कुंडलिनी हे नाव दिलेले आहे. जसं प्रत्येक बी मध्ये अंकुर असतो तसं तुमच्या प्रत्येकामध्ये  ते अंकुर आहे. पण एखादं बी जर किडलेलं असलं किंवा त्या बी मध्ये पूर्णपणे वाढ झालेली नसली, तर मात्र त्या अंकुराला फुटायला वेळ लागतो. आम्ही फक्त त्या बी वर किंवा त्या अंकुरावर आपल्या प्रेमाचे पाणी ओततो. दुसरं काही करत नाही. आणि त्यात तुम्ही तरी काय करणार? बी आपोआपच उगवतं, तसं तुमच्यात असलेला परमेश्वरानी ठेवलेला जो अंकुर आहे तो आपोआपच वर येतो. पण एवढंच आहे, जसा एखादा दीप तुम्ही सजवून ठेवलेला असला तरी तो आपोआप पेटत नाही त्याला एक पेटलेला दीप जवळ आणायला पाहिजे, त्याप्रमाणे सहजयोगातसुद्धा जो दीप पेटलेला आहे तोच न पेटलेल्या दिव्यांना पेटवू शकतो. पण जेव्हा दुसरे दिवे पेटतात तेव्हा ते सुद्धा दुसऱ्यांना पेटवू शकतात. ही अशी क्रिया आहे. पण एखाद्या दीपाची वात घसरलेली असते किंवा एखादा दीप फुटका असतो किंवा एखाद्या दीपामध्ये तेल कमी असतं तेव्हा त्याचीसुद्धा व्यवस्था सहजयोगात पहिल्यांदा करता येते. कुंडलिनी ही तुमची आई आहे. ती जन्मोजन्मी तुमच्या बरोबर जन्मते. ती तुमच्यामध्ये वास करते आणि आई किती पवित्र वस्तू आहे हे आपल्याला माहीत आहे पण ही नुसती पवित्रता तुमची आई आहे आणि ती त्या क्षणाची वाट बघत असते ज्या वेळेला अशी कोणी तरी व्यक्ती जी त्या प्रेमाने ओतप्रोत असेल, ती समोर आली की कुंडलिनी आपोआप उभी होते आणि तुम्हाला त्याचा साक्षात्कार घडतो. 

आज आपण त्याचा प्रयोग थोडासा इथे करणार आहोत. पण मला आशा आहे तुमच्यातल्या की  पुष्कळ लोकांना ते होईल. ते इतकं सहज घडतं की कोणाला विश्वास वाटत नाही, की आपल्याला इतक्या लवकर कसं झालं. कारण त्याच्यासाठी इतके उपास केले पाहिजे, तपास केले पाहिजेत, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. नंतर जंगलात जाऊन राहिलं पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. आता असं धरून चाललं पाहिजे की जर कुणाला कळव्याचा रस्ता माहीत नसता आणि त्याला शोधत शोधत मुंबईहून पायी यावं लागलं असतं, समजा पन्नास वर्षापूर्वी.  तर त्याला किती तरी तास लागले असते. पण आज आम्ही मोटारीने आलो तर आम्हाला काही इतका वेळ लागला नाही, तास कशाला किती तरी दिवस लागले असते. आम्ही सरळ तिथून निघालो आणि इथे येऊन पोहोचलो. त्याप्रमाणे आधुनिक काळामध्ये जी प्रगती आम्ही बाहेर केलेली आहे, जशी झाडाने बाहेर प्रगती केली तर त्याच्या मुळानेही प्रगती केलेली असणारच. तेव्हा ही मुळाची जी प्रगती झालेली आहे ती तुमच्या लगेच लक्षात येणार नाही. कारण झाडाची प्रगती लक्षात येते. मूळ पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही. हे मुळाचे काम आहे.  आणि जेव्हा त्याचा स्रोत सापडला, जर स्त्रोतच मुळी हाताशी लागला, एखाद्या झऱ्यालाच जाऊन जर भिडलं ते मूळ, तर प्रश्नच उरत नाही. त्या झाडाच्या मरण्याची किंवा त्याला त्रास होण्याची, कितीही तो फोफावला तरी सुद्धा त्याला ते पाणी मिळू शकतं.

 तसाच सहजयोग हा या आधुनिक कलियुगामध्ये सापडलेला आहे आणि त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा. फक्त सहजयोगाला फार उथळ मनाची माणसं चालत नाही. म्हणजे टर उडवणं, टिंगल करणं वगैरे अशा पद्धतीची लोकं जर असतील तर त्यांना जरी व्हायब्रेशन्स आली तरी ती सुटून जातील. श्रद्धा ही पाहिजे.  परमेश्वराप्रती श्रद्धा पाहिजे. कितीही म्हटलं, तरी जर तुम्हाला एखाद्या प्रती जर श्रद्धा नसली तर त्यांनी कां तुमचं भलं करावं? तुम्ही म्हणता ‘आमच्या मुलाला बरं करा, पण माताजी, आमची तुमच्यावर श्रद्धा नाही.’ तर आम्ही का बरं करावं? एक साधा विचार करा. जरी मी प्रेमाने म्हटलं की नाही तरी मी तुम्हाला ठीक करते, पण जे त्याला ठीक करणारे अनेक देवता बसलेले आहेत त्यांनी मान्य केले पाहिजे. हनुमानाला पटलं पाहिजे, गणेशाला पटलं पाहिजे, शंकराला पटलं पाहिजे, कृष्णाला पटलं पाहिजे की हा मनुष्य ठीक आहे. नाही तर ते म्हणतात यांना मदत करण्याची काही गरज नाही. हे नुसते उथळ्या मनाचे लोक आहेत. तेवढ्यापुरते आलेले आहेत. त्यांना मदत करण्यात काही अर्थ नाही. सहजयोगाद्वारे हजारो लोक बरे झालेले आहेत. रोग बरे झालेले आहेत. त्याशिवाय साक्षात्कार हजारो लोकांना झालेला आहे. ज्या लोकांना साक्षात्कार झालेला आहे, ते सुद्धा दुसऱ्या लोकांना ठीक करत आहेत. सहजयोगामध्ये हे एक फक्त लक्षात ठेवलं पाहिजे, की मानवाला सगळी काही आपल्याबद्दल माहिती नाही. त्याला हे समजत नाही, की आपण मेल्यावर आपलं काय होतं, जन्माच्या आधी आपण कोण होतो, पुढे काय होणार, या सर्व गोष्टी त्यांना स्वत:बद्दल माहीत नसतात. तेव्हा जे सहजयोगाचे काही थोडे बहुत नियम आहेत ते करावे लागतात. म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे, की सहजयोग्यांनी कोणाहीकडून कुंकू लावून घ्यायचं नाही. जो कोणी पार असेल त्याच्याकडून फक्त कुंकू लावून घ्यायचं. कपाळाला हात लावू द्यायचा नाही. तर सहसा तुम्ही पृच्छा कराल, विचाराल प्रश्न, ‘माताजी, असं का?’ प्रत्येकातून तरंग वहात असतात. आपण म्हणतो ना याचा हात चांगला आहे, याचा हात बरा नाही. याचा हात शेतीला चांगला आहे. याचा हात वैद्यकीला चांगला आहे. त्याला कारण असे की आपल्या हातातून हे तरंग वाहतात. ज्या माणसाच्या हातातून वाईट तरंग वाहतात, त्याने तुमच्या कपाळाला हात लावला तर तुमच्यातही वाईट विचार येऊ शकतात. म्हणून आपल्या कपाळाला  फार जपून राहायला पाहिजे, असा एक सहजयोगातला नियम आहे. हे कपाळ माणसाचं परमेश्वरानी फार विचार करून बनवलेलं आहे आणि ते कोणासमोर नतमस्तक करायचं, म्हणजे फार विचार करून करायला पाहिजे. प्रत्येक माणसासमोर डोके वाकवत जर तुम्ही फिरला आणि तो जर एखादा राक्षस निघाला तर त्याच्यातले जे  दुर्गुण, तुमच्यात ते सहज येणार. असे थोडे बहुत नियम आहेत, ते जर पाळले तर सहजयोगाला तुम्ही प्राप्त व्हाल आणि सहजयोग हा मोठा वरदानाचा भाग ठरतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की सहजयोगाचे अनुभव इथल्या काही लोकांना सांगितले तर तुम्हाला विश्वास वाटणार नाही, की एकदा एका आगगाडीतून सहजयोगी जात होते आणि ती आगगाडी उलथून पडली. सबंध आगगाडी उलथून पडली. पण आगगाडीतील एकालाही अपघात झाला नाही. त्याच्यात त्यांचं लहान मूल होते ते फार लांब जाऊन पडले, पण त्यालासुद्धा काही झाले नाही. लोकांना अगदी आश्चर्याचा धक्का बसला की हे कसं? अॅक्सिडेंट वगैरे यांनी फार टळतात. म्हणजे हे कसं होतं ? तुम्ही म्हणाल हे कसं होतं ? आता आपण हुनुमानावर फार विश्वास ठेवतो. येता-जाता ‘हनुमाना रे! हनुमाना रे!’ करीत असतो. गावात येताना एक हुनमानाचे देऊळ असेल. पण आपल्याला हे नाही वाटत की हनुमान हा सगळीकडे पसरलेला आहे. त्याचा आपला संबंध नाही. नाही तर हनुमानाला हाक मारल्याबरोबर तो तिथल्या तिथे उभा राहतो. इतकंच नाही पण एक सहजयोगी जिथे फिरेल, कारण त्याचा संबंध परमेश्वराशी झालेला असतो. त्याचा पाठीराखा असतो. गणपती सगळीकडे असतात. आपल्याला असं वाटतं गणपती देवळातच बसलेले असतात. तो  सगळ्यांचा सहाय्य करणारा आहे. सगळीकडे उभा असतो. जर कोण्या सहजयोग्याला त्रास झाला, तर गणपती त्याचे निवारण करतो. आपण सगळे म्हणतो की, ‘गणपती आहे, मारुतीराया आहे. दत्तात्रयांची जयंती करायची आहे. शंकर आहे.’ सगळ्यांना आपण मानतो, पण हे आपल्याला समजत नाही की हे जे आपलं शरीर आहे आणि हे ज्या डोळ्यांनी आपण बघतोय आणि या ज्या वातावरणात आपण आहोत, हे सगळं त्या लोकांनी भारावलेलं आहे आणि ते सगळीकडे व्यवस्थित पहारा देतात. या गोष्टीची जाणीव परमेश्वराची आणि तुमची गाठ पडल्याशिवाय होणार नाही. कसं आहे, आता माईकवर मी बोलत आहे आणि जर याचं कनेक्शन ‘मेन’ शी लागलं नाही तर तुम्हाला काहीही ऐकायला येणार नाही. तसं जोपर्यंत तुम्ही परमेश्वराशी एकाकार होत नाही किंवा तुमचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराला हाका मारत राहिलात तरी तो कसा ऐकणार तुम्हाला? आपण परमेश्वराचं नाव घेत राहतो रात्रंदिवस, आणि कधी कधी इतक्या वाईट हेतूने नाव घेतो की जसं काही तो आपला नोकरच आहे. सारखी त्याला कामं सांगत असतो. ‘तू हे कर रे, तू ते कर रे , माझ्या बापाला हे कर रे, तू माझ्या मुलाला हे कर .’ पण तुमचा काय अधिकार आहे परमेश्वरावर? तुम्ही परमेश्वरासाठी काय केलं आहे ? तुमचा संबंध आहे का परमेश्वराशी? म्हणजे समजा आपले राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींना जर तुम्हाला भेटायचं असलं तर तुम्हाला त्यांना पत्र पाठवायला लागतं. त्यांच्याकडून परवानगी घ्यायला लागते. जर तुम्ही सरळ तिथे जाऊन  दत्त म्हणून पोहोचाल आणि म्हणाल, ‘ए राष्ट्रपती, इकडे ये. माझं हे कार्य कर.’ तर पोलिस तुम्हाला बांधून ठेवतील की नाही? तेव्हा तुम्हाला अधिकार नाही आणि त्या अधिकाराची ओळख अशी असते, की जेव्हा मनुष्य आत्मसाक्षात्कारी होतो तेव्हा हातातून चैतन्य लहरी वाहतात असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि तेच आज घटित होत आहे. परमेश्वराच्या नुसत्या बाता नाहीत. आज परमेश्वराला आम्ही सिद्ध करू शकतो. तुम्ही सिद्ध करू शकता. तेव्हा हा मार्ग, म्हणतात ना ‘येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.’ 

या मार्गाला येणाऱ्या लोकांमध्ये श्रद्धा असायला पाहिजे. साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराला जाणण्याची उत्सुकता असली, तर कुठल्याकुठे तुम्ही सगळे पोहोचू शकता. भगवे वस्त्रं घालून आणि केस काढून संत मनुष्य होता येत नाही. तसं म्हटलं तर मेंढ्यांचे रोजच केस कातरले जातात तर त्या काय संत होतात का? कपडे बदलून कोणी संत होत नाही. बाहेरचे हे प्रकार करून कोणी संत होत नाही. आपल्याकडे केवढी संत मंडळी झाली. तुकारामबुवा झाले. त्यांनी काही संन्यास घेतला नव्हता. कोणत्याही संताला संन्यास घेण्याची काही गरज नसते. कारण तो आतूनच संन्यस्त होऊन जातो. आतूनच ती वृत्ती बदलते. म्हणून बाहेरचे देखावे, बाहेरचं प्रदर्शन हे करायची काही गरज नाही. जी गोष्ट घटित व्हायची ती आतमध्ये होते त्याची जाणीव आतमध्ये होते. आता या पैकी काही लोकांना असे अनुभव येतील की थोडावेळ वाटेल आम्हाला हातावर तरंग आले, ‘ माताजी  आम्हाला वाटलं आमच्या हातात तरंग आले’ आणि मग थोड्यावेळानी असं होईल की चार-पाच जणांना नाहीत. दहा जणांना येतील चारला नाही येणार. आणि मग ती चार मंडळी ज्यांना नाही आले, ते त्वेषाने बोलू लागतील की नाही हे काही तरी खोटं आहे, अमकं आहे, तमकं आहे. मग हे दहा आहेत ते जाणार त्या चारांबरोबर. माणसाचं डोकं जे  असतं ते अर्धवट असतं. हा अगदी नवीन अनुभव आहे आणि या नवीन अनुभवाला जमलं पाहिजे. तुम्ही म्हणाल एका क्षणात आणि एका मिनिटात होईल. ते होतं पण ते जमण्यासाठी तुम्हाला थोडंसं   बसावं लागतं. तुमची बैठक असावी लागते. थोडीशी मेहनत करावी लागते. मेहनत ही पार झाल्यावर करायची असते. आधी नसते.

 आज कळव्याला यांनी मला बोलावलेलं आहे आणि मला माहिती नाही आणखीन पुढचा काय कार्यक्रम आहे. पण माझी अशी इच्छा होती की आपण ध्यानाला वगैरे जावं सगळ्यांनी आणि ध्यानामध्ये जर पार होता आलं तर बरं होईल. आणि त्याच्यानंतर काही रोगी वगैरे असले तर त्यांना बघीन. यापुढे आपल्याला जर प्रश्न असले थोडे बहुत तर विचारा मला फार आनंद होईल. आहेत का प्रश्न? हं, विचारा. 

एका प्रश्नाला उत्तर देतांना श्री माताजी म्हणाल्या समजा स्मशान आहे. स्मशान नेहमी म्हणतात  गावाच्या बाहेर असलं पाहिजे. पण लोक काय करतात स्मशान असो की काही असो, जागा आहे नं, आता आमच्या मुंबईलाच स्मशान आहे आणि त्या स्मशानामध्ये लहान मुलांची खेळायची जागा बनवून टाकली. आता लहान मुलं जितकी तिथे जातील त्यांना त्रास होईल की नाही? कारण त्यांच्या सगळ्या तिथे कबरी आहेत. त्याचा काही विचार कोणी मनुष्य ठेवत नाही. आजकालच्या आधुनिक माणसाला ही अक्कल नाही आणि अशाच रीतीने आज कॉलनी वगैरे बनविलेल्या आहेत. तेंव्हा यांना सुद्धा आणि तुम्हाला कुंकू वगैरे आपल्या बचावासाठी घेऊन गेलं पाहिजे. नंतर जेव्हा तुम्हाला कळेल की काय आहे तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल केवढ्या मोठ्या त्रासातून तुम्ही बचावलेले आहात. म्हणून लोक वेडे होतात, पागलखान्यात जातात. आजारी होतात, मरतात. त्यांना हेच लक्षात येत नाही की आजार आला कुठून? हे झालंच कसं आमच्या घरात? लहान लहान मुलंसुद्धा. कारण तुम्हाला स्वत:बद्दल कल्पनाच नसते. दुसऱ्यांच्याबद्दल कशी कल्पना येणार? ह्यांना काय झालेलं आहे, हे कोण आहेत? 

इतकंच नाही एक साधी गोष्ट घ्या. तुम्ही देवळात गेलेले. देवळामध्ये परमेश्वर आहे, देव आहे, त्यांना नमस्कारच केला पाहिजे. देऊळ फार जरूरी आहे. प्रत्येकाच्यासाठी आहे. पण समजा एक भामटा तिथे पुजारी आहे. समजा. आणि तो वाईट धंदे करत असला, काही चाळे, काळी विद्या वगैरे करीत असला, आणि समजा त्याने तुम्हाला प्रसाद दिला तर तुमच्या पोटात जाणार की नाही जाणार? तुम्हाला कसं कळणार ? जर तुम्ही साधी माणसं असाल तर काही कळणार नाही. जर तुम्ही सहजयोगी असाल तर लगेच तुम्हाला उलट्या होऊन ते निघूनच जाणार. राहणारच नाही पोटात. अशी काही वस्तु पोटात गेली की ती निघूनच जाणार. ती राहणारच नाही. मग घरी आलं की एकदम पोटात दुखायला लागलं मग जोरात हे झालं, हॉस्पिटलमध्ये तडकाफडकी गेले. काय झालं माताजी कळलं नाही. हे सगळं कळण्याचं लक्षण सगळं काही तेंव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही स्वत:ला ओळखता आणि त्यामुळे दुसऱ्याला ओळखता. कारण स्वत:ची ओळखच पटली नाही. आपली शक्ती आतमध्ये किती जबरदस्त आहे ती आधी जाणली नाही. ती जाणताच मग तुम्हाला हे कळेल की या माणसामध्ये काय दोष आहे, त्या दुसऱ्या माणसामध्ये काय दोष आहे आणि तो दोष आपल्यालाला त्रासदायक असेल तर त्याच्यापासून बचावही करता येईल. त्याची ओळख कशी असणार. ह्या ओळखीला समजलं पाहिजे. 

तुम्ही पण इथे येत जा आणि हे शिकून घ्या. संपूर्ण मास्टरी करून  देतील कुंडलिनीबाबत . हे जे इथे बसले आहेत – मास्टर आहेत कुंडलिनी मध्ये .ह्यांनी हजारो लोकांचे आजार ठीक केले.  हे धुळ्याचे आहेत. तिथे सेन्टर सुरु केलं आहे. यांचा मुलगा डॉक्टर आहे, दुसरा मुलगा मोठा जमीनदार आहे. यांनी एक सेन्टर सुरु केलं. हजारो लोक यांच्या हातून ठीक झाले. आणि ते म्हणतात, ज्या दिवशी हे पार झाले, एक पैश्याचं औषध हे विकत नाहीत. यांची मुलं पार आहेत. सर्व जण पार आहेत. आता तुमच्या कळव्यात हे सर्व आहे , तर तुम्ही हे करायला हवं.. लोकांनी याकडे  लक्ष द्यावं आणि हे मिळवावं. मी म्हटलं ना सहज योगात असं नाहीए की आज तुम्ही पार झालात उद्या सर्व विसरून जा. तुम्हाला कळायला हवं. समजा मी तुम्हाला वीज दिली आणि बटण कसं वापरायचं हे नाही सांगितलं तर तुम्हाला कसं कळेल? पूर्ण शिकून घ्यायला हवं ना. 

पण साधारणतः, जर दोन तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. एक तर बंधन देणे स्वतःला, मीठपाणी अश्या एक दोन गोष्टींनी तुम्ही ठीक राहू शकता. खूप काही करायची गरज नाही. तुम्ही एकदा येऊन परत आलाच नसाल, म्हणून तुम्हाला सर्व माहित नाही. शिवाय यांच्याशी चर्चा करत राहा. असं नाही चालणार ना. परमेश्वराचं काम आहे. थोडं फार शिकावं तर लागतंच.  आता हेच बघा साधं विजेचं काम करायला वर्षानुवर्षे लागतात. हे तर परमेश्वराचे काम आहे. थोडं फार शिकावं तर लागेलच. पूजेला आम्ही कुठलं बोट वापरतो. फुल कश्या पद्धतीनं वाहायची. हे खरं आहे की या लहान लहान गोष्टी आहेत. एवढंही सर्व जाणून घ्यायची गरज नाही. थोडं फार तरी शिकून घ्या.

हं आता  विचार प्रश्न काय असतील तर . आहेत का प्रश्न?  तरुण मंडळींचे आहेत का?       

आता असं की सहजयोगात दारु पिण्यास बंदी आहे. तसं तर आम्ही कोणाला सांगत नाही की दारु पिऊ नका. पण सहजयोगात आल्यावर दारु पिऊच शकत नाही. आणि जर तुम्ही दारु प्यायलात तर लगेच तुम्हाला उलटी होईल. पिऊच नाही शकणार. खूप त्रास होईल. सिगरेटदेखील पिऊ शकत नाही. तुम्ही सहयोगी झाल्यानंतर सिगरेट प्यायला सुरू केले तर खूप त्रास होईल. तुम्हाला मनापासूनच प्यावेसे वाटणार नाही. सोडून द्याल. आमच्या इथे सिगरेट कोणी पीत नाही. सगळ्यांच्याच सिगरेट आपोआपच सुटल्या. मी कोणालाच सोडायला सांगत नाही. आपली आपणच सुटते. एक साहेब होते सिंगापूर मध्ये, ते खूप दारु प्यायचे. त्यांची पत्नी त्यांना दारू सोडण्यासाठी माझ्याकडे घेऊन आली. ते पार झाले, माहीत नाही कसे? त्यानंतर त्यांची परिस्थिती अशी झाली की जेव्हा पण ते दारू प्यायला लागत तेव्हा त्यांना सुगंध येत असे. इतक्या जोरात सुगंध यायचा की ते दारू प्यायचे सोडून सुवासच घेत बसायचे.