Seminar

(India)

1979-01-19 Seminar Marathi, Kalwe, 74'
Download video (standard quality): Transcribe/Translate oTranscribe

Feedback
Share

Aapan Dharma Janla Pahije Date 19th January 1979 : Place Kalwe Seminar & Meeting Type Speech Language Marathi

लंडनहुन मुंबईला यायचं म्हणजे फार बरं वाटतं कारण लंडन फारच गजबजाटातलं आणखीन अत्यंत यांत्रिक शहर आहे आणि तिथल्या लोकांची एकंदर प्रवृत्तिसुद्धा यांत्रिक झालेली आहे. मग मुंबईहन कळव्याला यायचं की त्याहून बरं वाटतं. कारण शहरातून जी स्थिती आज लोकांच्या मनाची आणि श्रद्धेची होत आहे ती पाहून असं वाटतं की कुठूनतरी दोन-चार मंडळी खऱ्या श्रद्धेची असतील अशा ठिकाणी जावं . आमचा सहजयोग हा खेड्यापाड्यातून होणार आहे , शहरातून होणार नाही. हे मागे मी बोलले होते आणि त्याची प्रचिती आम्हाला येते. आता तुम्ही मुंबईच्या जरा जवळ असल्यामुळे थोडंबहूुत शहराचं वातावरण आलं आहे तुमच्यात, पण तरीसुद्धा ह्या प्रसन्न, नैसग्गिक वातावरणात रहाणाऱ्या लोकांना परमेश्वराची जाणीव सतत असते. परमेश्वर आहे किंवा नाही त्याबद्दल आपण आजपर्यंत जे काही वाचत आलो होतो त्यात काही अर्थ आहे की उगीचच आपल्याला काहीतरी भुलवण्यासाठी म्हणून लोकांनी हे ग्रंथ लिहिले आहेत, हे पडताळून पहाण्याची आणि त्याची पूर्णपणे प्रचिती घेण्याची ही वेळ आहे कारण आपण देवाच्या नावावर अनेक उपटसुंभ लोकच बघत असतो. देवळात गेलं की तुम्हाला पैसे द्यावे लागतात. दोन पैसे द्या तेव्हा तुम्ही जवळ राहणार. एखादा श्रीमंत मनुष्य जर देवळात आला की लगेच पहिल्यांदा त्याच्या गळ्यात हार, सगळ्यात मोठा हार देवाचा त्याला घातला जातो. जसं काही देवालासुद्धा पैशाचं फार समजतं ! त्यातनं जर तो एखाद्या मोठ्या मोटारीतून आला तर त्याला आणखीनच फार जवळ समजलं जातं. पण देव हा भावाचा भूकेला आहे. त्याला पैसा, अडका आणि बाहेरची श्रीमंती समजत नाही. त्याला श्रद्धेची श्रीमंती समजते. तो श्रद्धेचा भुकेला आहे आणि श्रद्धाच त्याला ओळखू शकते. आता श्रद्धेचा अर्थ म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. म्हणजे कोणी घरात आला, कोणी बुवा आला अंगाला फासून कुठलीही, कसलीही घाण आणि त्याने येऊन सुरू केलं की, ‘मी फार मोठ्ा गुरू आहे, अमकं आहे, तमकं आहे.’ लगेच लोकांची डोकी त्याच्या पायावर अशी फुटतात जसे काही नारळ फुटावेत. आपल्या देशातले लोक फार भाविक आणि भोळे आहेत. पण धर्मभोळे असायला पाहिजे , नुसतं भोळं असून चालत नाही. धर्मभोळाचा अर्थ ‘आपण धर्म ओळखला पाहिजे.’ पहिल्यांदा आपण ओळखलं पाहिजे की कोणत्या माणसासमोर आपण आपली मान वाकवली पाहिजे. कोण खरा गुरू आहे आणि कोण खोटा? प्रत्येक रस्त्यावरचा मनुष्य गुरू असू शकत नाही. कदाचित तो आपल्याहीपेक्षा खालच्या दर्जाचा मनुष्य असेल. जो मनुष्य दुसर्यांच्या पैशावर उपजिविका करतो, तो मनुष्य धर्मगुरू किंवा धर्माशी संबंधित असू शकत नाही. अहो, तुम्हीसुद्धा थोडेसे पैसे जरी कमावले तरीसुद्धा आपल्या स्वत:च्या पायावर उभे असता. तुम्हालासुद्धा इतकं स्वत:बद्दल वाटतं की, ‘आम्ही कुणावरती असं अवलंबून राहणार नाही.’ मग ही मंडळी अशाप्रकारे तुमच्या पैशांवर जिवंत राहतात, ती मंडळी

तुम्ही जाणलं पाहिजे की कुठलेतरी उपटसुंभ आणि अत्यंत हलक्या दर्जाचे आहेत. ते तुमच्याजवळून पैसे घेतात आणि तुमच्या जीवावरती राहतात. अशा हलक्या लोकांना गुरू मानणं किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं की, ‘आम्ही फार मोठे गुरू आहोत. आम्ही हे करतो, ते करतो, मोठ्यामोठ्या गोष्टी केल्या’ आणि तुम्हाला जर त्यांनी भुलवलं तर ते लक्षात आलं पाहिजे की हा मनुष्य मुळीच धार्मिक असू शकत नाही. दुसरं असं आहे की धार्मिक माणसाबद्दल किंवा अशा संन्यासी लोकांबद्दल असं म्हटलेलं आहे की त्याला गावात मुळीच रहायला द्यायला नाही पाहिजे. जे संसारी लोक आहेत त्यांनीच गावात आलं पाहिजे. सीतेने एक वाल्मिकी रामायणात सांगितले आहे की कोणताही संन्यासी दारात आला तर त्याला दारात ठेवायचं! त्याने गावात राहिलं नाही पाहिजे. गावाच्या वेशीबाहेर त्याने राहिलं पाहिजे आणि ते ही एकच रात्र. गावाशी संबंध जर संन्यासाचा आला तर तो मग सन्यासी कसला! हे तिने, रावणाने तिला जेव्हा लुबाडलं होतं तेव्हा ते लक्षात ठेवून त्याचे वर्णन केलेले आहे की हे लोक जे असे कपडे घालून तुमच्यासमोर उभे राहतात ते खरोखर म्हणजे तुम्हाला लुबाडण्यासाठी न्यास घेऊन आलेले आहेत. खरं पाहिलं तर असे कपडे घालायची गरज काय ? जो मनुष्य आतून पूर्णपणे संन्यस्त भावाचा आहे त्याला कशाचीच वाण नाही, जो आपल्यामध्ये मस्त बादशाह आहे, त्याला काय गरज आहे असे कपडे घालून फिरायची आणि तुम्हाला फसवण्याची! पण माणसामध्ये उपजतच ही बुद्धी असते की परमेश्वर म्हणून कोणीतरी आहे. विशेषत: खेड्यातल्या लोकांना निसर्गाची एवढी सवय झालेली असते, रोज त्यांचा संबंध निसर्गाशी आहे. पाऊस आला तर शेती होणार! जर शेती चांगली नाही झाली, जर जमीन चांगली नसली तर त्याला ते म्हणतात पृथ्वी आमच्यावर रागावलेली आहे. जर कुठे एकदम आग लागली तर ते म्हणतात की आगीचा आमच्यावरती कोप झालेला आहे, देवीचा आमच्यावर कोप झालेला आहे. घरात जर कोणत्याही रोगाची साथ आली तरी ते म्हणतात की कोणत्या तरी कोपाने हे आम्हाला सगळे भोगावं लागत आहे. अशा परिस्थितीत मनुष्याला निसर्गावरती विश्वास येतो आणि निसर्ग म्हणजे परमेश्वर असं समजून तो परमेश्वराची पूजा करू लागला. परमेश्वराची जाणीव असणं हे अत्यंत मोठं असलं तरीसुद्धा परमेश्वर आपण बनवू शकत नाही. परमेश्वर आहे, तसाच आहे, त्याला आपण म्हणायचं की ‘आम्ही परमेश्वराला असं घडवू, परमेश्वर म्हणजे असा,’ तशी गोष्ट नाही. जसा परमेश्वर आहे तसाच तो आहे. फक्त आपण काय करू शकतो की परमेश्वराच्या ध्यानात जर बसलं आणि परमेश्वराला जर पाचारण केलं तर तो जसा आपल्या समोर येऊन ठाकेल तसं आपण त्याला ओळखता आलं पाहिजे. ही मात्र सुबुद्धी तुमच्यात यायला पाहिजे आणि ती तुमच्यात जाणीव यायला पाहिजे आणि ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इतकंच नव्हे, पण ते तुम्हाला जाणवलं पाहिजे. त्यासाठी काय करण्यासारखं आहे? काय करावं लागेल? आता मला जर तुम्हाला बघायचं असलं र मला डोळे उघडावे लागतात. ह्या डोळ्यांनी मला बघावं लागतं की तुम्ही कोण? कुठून आलात? तुम्हाला विचारावं लागतं. तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात की तुम्ही कुठे राहता ? तुमचं गाव कोणतं ? मी तुम्हाला कशी ओळखते ह्या डोळ्यांमुळे. जर माझे डोळेच उघडे नसते तर मी तुम्हाला ओळखलं नसतं.

परमेश्वराला बघण्यासाठी आपल्यामध्ये दूसरे डोळेदेखील आहेत त्याला ‘आत्मा’ म्हणतात. ह्या आत्म्याचे जोपर्यंत डोळे उघडत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराला बघू शकत नाही, ओळखू शकत नाही. आत्मा जोपर्यंत आपल्यामध्ये जागृत होत नाही, त्याची ज्योत जोपर्यंत आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत आपण जो म्हणून परमेश्वर मानतो त्याच्यात काहीतरी खोटेपणा आहे . त्याच्यामध्ये खरेपणा एवढा राहत नाही. किंवा असे म्हणता येईल की परमेश्वराचं पूर्ण ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. थोडसं होतं. जसं जरासा कोणी आंधळा असला की त्याला थोडसं दिसतं तसंच आहे. म्हणून पूर्णपणे जोपर्यंत आपले डोळे उघडत नाहीत, जोपर्यंत आपल्याला आत्म्याचे चक्षु मिळत नाही, डोळे उघडत नाहीत, तोपर्यंत परमेश्वराला आपण ओळखू शकत नाही. पण आपल्याला असं वाटतं की आपण देव्हाऱ्यात देव ठेवला, हाच आपला परमेश्वर आहे. ह्याला भजत गेलं की झालं! पण तो आपण तिथे बसवल्यानंतर आपलं वागणं कसं असतं! आपण खून करू किंवा मारामाऱ्या करू किंवा काहीही करू तरी आपल्याला वाटतं की परमेश्वर हा आपलाच आहे. कारण तो आपल्या देव्हाऱ्यात आहे. जाऊन त्याला परत काहीतरी दिलं की झालं! मग कोणाला काही वाटत नाही की ‘ मी खोटं बोललो. मी चोऱ्या केल्या, मी मारामाऱ्या केल्या, मी दुसऱ्यांचं वाईट चिंतिले.’ आणि ‘आता काही तरी माझ्या हातून वाईट घडलेले आहे,’ असा विचारच मनात येत नाही कारण परमेश्वर हा देव्हाऱ्यात आपण बसवलेला आहे ना ! त्याची आरती केली की झालं. पुढचं काही बघायला नको. तो काही उठून आपल्याला मारत नाही. तेव्हा असा सोयीस्कर परमेश्वर आपल्याला आवडतो. पण त्याने आपली काही सोय होत नाही. आपली स्वत:ची काहीच सोय होत नाही त्याने. आपल्या धर्माची काही सोय होत नाही. फक्त या संसारात रहाण्याची सोय होते कशीबशी. मग नंतर ते ही पुढे येऊन उभं राहतं. तेही संकट आपल्यापुढे येऊन उभं राहतं. आता मनुष्याला, विशेषत: आजार वगैरे आला की परमेश्वर आठवतो. जेव्हा अगदी सुखात असेल तेव्हा एवढा आठवत नाही, पण आजारात असं वाटतं की, ‘माझं काही तरी चुकलं असेल बुवा! मला आजार कसा आला? काहीतरी मी अपथ्य केलं.’ मानसिक रोग जडले तेव्हा ही असा विचार येतो, हार्टचा त्रास झालां, की विचार येतो, ‘काय झालं माताजी? आमचं काय चुकलं? आम्हाला रोग का आला ?’ खरोखर म्हणजे इतकी काही जाणूनबुजून चूक केलेली नाही. पण तरीसुद्धा आंधळेपणा हा आहे. कारण जर तुमचा आत्मा उघडलेला नाही तर तुम्ही आंधळेच आहात. परमेश्वराबद्दल, धर्माबद्दल तुम्ही काय जाणता? जे काही जाणता ते सगळं अर्धवटच आहे. म्हणूनच अशी व्यवस्था करायला हवी की ज्याने आपल्याला आपल्या आत्म्याचं दर्शन होतं. ही व्यवस्था कोण करणार? आपण करू शकतो का? ह्या डोळ्यांची व्यवस्था आपण केलेली आहे का? हे डोळे कोणी दिले आपल्याला? परमेश्वराने दिले आहेत का? हे नाक किंवा हे तोंड किंवा हे शरीर हे सगळं काही परमेश्वराने दिले आहे. तुम्ही मिळवलेले आहे का? तुम्ही काय केलं माणूस होण्यासाठी ? जनावरापासून तुम्ही मानव झाले ते कसे झाले ? तुम्ही त्यासाठी काय केलं? तेव्हा परमेश्वरासाठी जे आपल्याला डोळे पाहिजेत, जी आपल्याला आत्म्याची ओळख पाहिजे ते सुद्धा परमेश्वरालाच करायला हवं. आपण त्याबाबतीत काय करणार? सकाळपासून संध्याकाळपर्यंत उड्या मारून किंवा देवाचं नाव घेऊन किंवा देवाच्या आरत्या, पूजा करून हे होणार

नाही. आधी परमेश्वराला ओळखून घेतल्यावर त्याच्या आरतीला काही अर्थ आहे, पूजेला काही अर्थ आहे. पण जर दिसतच नाही की परमेश्वर आहे की दगड आहे की धोंडा आहे तर आपल्याला काय त्याचा फायदा होणार आहे ? म्हणून आधी आत्मा हा ओळखला पाहिजे. आत्मा ओळखल्याशिवाय काहीही जमत नाही. जोपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही, जोपर्यंत हा विचार तुमच्या मनात बसणार नाही, तोपर्यंत तुम्हाला माझी गोष्ट आवडणार नाही. आता हा आत्मा कसा उघडायचा? पुष्कळांचा असा प्रश्न असतो ‘माताजी कसं करायचं?’ मी आधीच सांगितलं आहे की त्याबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही. हे परमेश्वराचं करणं आहे, देणं आहे. त्यानेच आम्हाला शरीर दिलं आहे. तोच आम्हाला डोळे देणार. तोच आम्हाला आत्म्याचं दर्शन देणारं. आणि तो देतो. त्याची वेळ यावी लागते. उद्या एखाद्या फुलाला काळजी पडली की माझं फळ होईल की नाही? कसं होणार? काय होणार? त्याने काय फायदा आहे? जेव्हा त्याचं फळ होणार आहे तेव्हा आपोआपच फळ होईल. तसंच तुम्हाला जेव्हा आत्म्याचं दर्शन व्हायचं असेल तेव्हाच ते व्यवस्थित, वेळेवर होणार आहे आणि होणार. हजारो मंडळी सहजयोगाने पार झालेली आहेत. त्यांच्या आत्म्याचे त्यांना दर्शन झालेले आहे. त्यांच्यातून त्यांचा आत्मा बोलू लागला. पार झाल्याशिवाय किंवा परमेश्वराचे दर्शन, त्याला आपण म्हणतो की आत्म्याचं दर्शन, आत्मसाक्षात्कार, ते झाल्याशिवाय तुम्हाला परमेश्वराशी बोलतासुद्धा येणार नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण रामाचं नाव घेत बसतो, पण राम कुठे आहे ? रामाचं नाव घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे का? तुम्ही घेऊ शकता का परमेश्वराचे नाव प्रत्येकजण ? आता आम्ही म्हटलं, आम्ही प्राइम मिनिस्टरचं नाव घेतो तर काय उपयोग ? ते काय धावून येणार आहेत ! ते काय तुमचे नोकर आहेत? परमेश्वराचे नाव घ्यायला तो काय आपला नोकर नाहीये ! त्याच्याशी काहीतरी संबंध झाला पाहिजे. पहिल्यांदा विचारणा केली पाहिजे. त्याच्याशी आपला संबंध जोडला पाहिजे. तेव्हा मग जसे आपण प्राइम मिनिस्टरकडे जातांना परवानगी घेऊन जातो, त्याचप्रमाणे तुम्हालाही आधी परवानगी घेतली पाहिजे. परमेश्वराशी जोडले गेले पाहिजे. जर तुमचा संबंध परमेश्वराशी जोडला गेला नाही आणि त्याची तुम्हाला परवानगी मिळाली नाही, आणि जर तुम्ही त्याच्या दाराशी जाऊन त्याचे नाव जोरजोराने घ्यायला सुरुवात केली तर त्याचे पोलीसवाले तुम्हाला धरतील की, ‘अहो, कोणत्या हक्काने आलात तुम्ही इथे? कशाला परमेश्वराला त्रास देता ?’ म्हणून आधी आपल्या आत्म्याचे दर्शन घ्या. आत्म्याला जाणून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या हातातच मुळी परमेश्वराची शक्ती वाहू लागलीय. मग त्या शक्तीला प्रश्न विचारायचा की, ‘परमेश्वर आहे की नाही?’ तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा ही शक्ती वाहू लागते, असा मोठा प्रश्न विचारल्याबरोबर जोरात ही शक्ती सांगते ‘हो, आहे.’ हातात अशी झणझण झणझण वाहू लागतात. कोणतेही असे प्रश्न विचारले तर ती शक्ती तुम्हाला उत्तर देते. म्हणजेच तुमच्या लक्षात येतं की ही शक्ती जी सगळीकडे, सर्वव्यापी सर्वव्यापी शक्ती म्हणतात, जगामध्ये, असं म्हणतात की परमेश्वराशिवाय पानसुद्धा हलत नाही, ती गोष्ट अगदी खरी आहे. कारण आत्म्याच्या दर्शनानंतरच त्या शक्तीचं दर्शन होतं. आणि तुम्ही ती शक्ती ओळखता आणि तिला पहाता आणि आपल्या हातातून जेव्हा ती वाहू लागते. तिला पूर्णपणे तुम्ही गती देऊ शकता. जेव्हा ही शक्ती तुमच्या हातून वाहू लागते तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची मानसिक स्थिती, तुमची शारीरिक स्थिती एकदम ठीक होऊन जाते. सहजयोगात पार झाल्या नंतर फारच कमी मंडळी डॉक्टरकडे जातात.

सगळ्यांच्या तब्येती अगदी उत्तम होऊन जातात. मानसिक त्रास असतील ते ही ठीक होतात. इतकंच नव्हे तर घराचीसुद्धा परिस्थिती सुधारते. प्रत्येक दृष्टीने परिस्थिती सुधारलीच पाहिजे. आता समजा आम्हाला उद्या इथे यायचे आहे, पाटीलांच्या घरी. तर पाटील आमच्या स्वागतार्थ सगळं स्वच्छ करतील, व्यवस्थित करतील घराला. ठीक ठीक साकार रूप देतील. तसच आहे. तुमच्यात जर परमेश्वराला यायचं झालं तर तुमचं जे शरीर आहे, तुमचं जे मन आहे, तुमची बुद्धी आहे ती सगळी स्वच्छ केली पाहिजे. ती स्वच्छ झाल्यावरच त्याच्यात परमेश्वर येऊ शकतो. आणि ह्याच कारणामुळे पुष्कळ लोकांचे अनेक रोग बरे झाले. पुष्कळ कठीण रोग आम्ही बरे केलेले आहेत आणि करतो, पण असे नाही की आम्ही रोगच बरे करतो. जर तुम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं जर तुमच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश पसरला तर आपोआपच जो काही अंधार असेल, मग तो शारीरिक असो, मानसिक असो किंवा धार्मिक असो कोणताही अंध:कार असला तर तो दूर होणारच. आपोआपच दूर होतो. तुम्ही म्हणाल, ‘कसा ?’ तर आता हा दिवा लावल्याबरोबर इथला अंधार कुठे गेला ? तसच तुमच्यातसुद्धा घडतं आणि म्हणून सहजयोगामध्ये माणसाची सर्वतऱ्हेने उन्नती होते. इतकेच नव्हे तर तो सामूहिक चेतनेला पात्र होतो. हा कठीण शब्द आहे पण अत्यंत सरळ आहे. आपल्या सर्वांच्यामधून एक शक्ती धावत आहे. सगळ्यांच्यामध्ये एक शक्ती आहे. त्या शक्तीला जाणल्याबरोबर तुम्ही सगळे एक आहात, हे आतून व्हायला लागतं. म्हणजे हातावर तुम्हाला कळतं की हा मनुष्य कुठे आहे? ह्याला कुठे त्रास आहे? तसच मला कुठे त्रास आहे कारण आत्मदर्शन झाल्यामुळे स्वत:शीच ‘स्व-दर्शन’ होणार. त्या दोन्हीही गोष्टी घडतात, पण याला काही फार बुद्धी नको. काही पैसा नको. काही डोकं नको विशेष . मनुष्य आहात ना ! जनावर नाही म्हणजे झालं! उलट जास्ती ज्यांच्याजवळ बुद्धी आहे, ज्यांच्याजवळ अती पैसा आहे त्यांना कधी हे होत नाही. साधारण मध्यम स्थितीतल्या लोकांना होतं. जे मध्यम डोक्याचे आहेत. आता गरीब असले, फारच गरीब असले, अगदी ज्यांना खायला-प्यायलासुद्धा नाही त्यांना व्हायचं नाही कारण त्यांना रात्रं दिवस चिंता आहे. ह्याची चोरी करतील, त्याची चोरी करतील, मला आज खायला नाही आत्ता काय ? बरोबरच आहे. त्यांची स्थिती तशीच आहे. पण एकदा असे मध्यम स्थितीतले लोक ह्या ह्याला आल्याबरोबर सबंध समाजच्या समाजच मुळी सुधारतो आणि सगळ्यांना सुबत्ता लाभते. कारण लक्ष्मीचंसुद्धा वरदान ह्याच्यात खूप जोरात आहे. आता सगळ्यांना ही काळजी की, ‘माताजी आमचं कसं भलं होईल ? आमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल? किंवा इतर प्रश्न आम्हाला जे आहेत ते कसे सुटतील? त्याचं कसं काय होणार आहे ? आम्ही ह्या सर्व प्रश्नांना कसं उत्तर शोधून काढू?’ तर ते सांगायचं म्हणजे असं की इथे, तुमच्या इथे सहजयोगाचं सेंटर आहे. जिथे जिथे सहजयोगाचं सेंटर आहे तिथे तिथे परमेश्वराचा वास आहे. जर तुम्ही ह्या सेंटरला आलात तर ह्या सेंटरमध्येच तुमचे प्रश्न सुटतील. घरी बसून सुटणार नाहीत. पुष्कळसे सहजयोगी असे असतात की, ‘आम्ही पार झालो. आता आम्ही घरी बसून आमचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे.’ प्रश्न सोडवण्याचा दवाखाना आहे हा ! ह्या दवाखान्यात तुम्ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला जेव्हाही प्रोग्रॅम असतात तेव्हा तुम्ही आलात आणि हा प्रश्न जर तुम्ही टाकलात तर आत्मदर्शनानंतर सगळे प्रश्न आपोआप सुटतील. त्याचं एक उदाहरण मी सांगते

तुम्हाला. किती सोपं उदाहरण आहे! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असं घडतं, अनेकदा. अनेकदा असं झालेलं आहे आणि इतकी अशी उदाहरणं आहेत. अनंत उदाहरणं आहेत की त्याला नुसतं अनुसंधानच आहे किंवा अंदाजेच बोलताहेत किंवा कदाचित झालं असेल म्हणून झालं असेल अशा रीतीच्या कल्पनाच करू शकत नाही. आम्ही लंडनला असतांना एक मुलगा, अर्जेरीयाचा मुसलमान होता, तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘सहा महिन्यापासून माताजी मी इथे प्रयत्न करतोय. मला स्कॉलरशिप मिळत नाही. आणि आता अगदी शेवटची वेळ आली आहे. मी आता जातो परत म्हणून.’ तो पार झालेला होता. म्हटलं, ‘कधी जातो आहेस?’ म्हणे, ‘मी गुरुवारी जातोय. मी आता गुरुवारी जातो.’ तर मी म्हटलं की, ‘तू मंगळवारी का नाही जात? गुरुवारी जातोयस पण आता मंगळवारी जा.’ तो म्हणाला, ‘बरं , तुम्ही म्हणता तर मंगळवारी जातो.’ सोमवारी तो कॉलेजला गेला आणि पाटीवर त्याचं नाव पहिल्यांदा लिहिलेलं होतं की, ‘तुला स्कॉलरशिप मिळाली.’ हे एक उदाहरणार्थ मी सांगितलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. तुमच्या मुंबईलासुद्धा जेवढी सहजयोगी मंडळी आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं तर प्रत्येकजण एक-एक ग्रंथ सांगेल. एक उदाहरणार्थ मी सांगितलं. असे अनेक प्रश्न आहेत. सहजच सुटतात. अत्यंत सहजच सुटतात. आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सेंटरवर यायला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे जिथे चार माणसं परमेश्वराला पूजतात , तिथेच परमेश्वर असणार. तुम्ही म्हणाल, ‘नाही, माताजी तुम्ही माझ्या घरी या. माझ्या घरी जे काही आहे ते…’ तुमचं घर कोणतं ? तुम्ही जर आमचं-आमचं करत बसले तर परमेश्वर मुळीच येणार नाही सर्वांच्या मध्ये बसून कारण तुम्ही सामूहिक चेतनेत आहात . सर्वजण मिळून जिथे परमेश्वराची आठवण करतात. तिथेच परमेश्वर आहे. एकटा तुमच्यापुरता परमेश्वर नाही. मला येऊन ऑर्डरसुद्धा देतात, ‘माताजी, हे बघा! मला नोकरी मिळालीच पाहिजे. माझ्या मुलाचं सगळं शिक्षण झालंच पाहिजे.’ नंतर ‘माझ्या मुलीचं लग्न झालंच पाहिजे.’ नंतर ‘आमचं घर बांधून निघालंच पाहिजे.’ हे झालंच पाहिजे आणि ते झालंच पाहिजे. तर म्हटलं, ‘का बुवा?’ ‘मी मुद्दामून आलो तुमच्याकडे म्हणून.’ जसं काही हे दुकान मांडलेलं आहे परमेश्वराचं! तिथे तुम्ही येऊन काही म्हटलं तर हे बघा एवढं एवढं तुम्ही आम्हाला हे द्या. इतक्या पैशाचं हे, इतक्या पैशाचं हे, इतक्या पैशाचं हे.. काही दुकानात जावं तसं आपण हे मागतो. तसं नाही मागायचं. उलट असं म्हणायचं की जे काही आमचं हे आहे, परमेश्वरा , ते तुझ्या समोर आहे. तूच बघ! फक्त तू आम्हाला हवा. एकदा तू आम्हाला मिळालास की आम्हाला काही नको. असं म्हटल्याबरोबर सगळे प्रश्न सुटतात. आणि ते प्रश्न परमेश्वराला अगदी काहीही मुश्किल नाही. त्यांना काहीही कठीण नाही. नुसती एक अशी करंगळी फिरवली कि परमेश्वर ते कार्य करतो. आतापर्यंत सगळे हे असं म्हणत होते की परमेश्वर कार्य करतो, असं होतं, तसं होतं. पुष्कळ लोकांनी मला सांगितलं, ‘आम्ही माताजी, वारकरी बनून आम्ही तिकडे गेलो. विठ्ठलाबरोबर एवढं म्हटलं, हे कर, ते कर. आमचं काही झालं नाही. परमेश्वराने आमचं कार्य केलं नाही.’ पण आता तशी वेळ नाही. तुमचं जर आत्मदर्शन झालं नव्हतं, तर तुम्हाला तिथे जाण्याचा परवाना नव्हता. परमेश्वराकडे मागण्याचा परवाना नव्हता. आता आत्मदर्शन झाल्यावर तुम्ही बघा तुमची केवढी शक्ती आहे ती तुम्ही कोण आहात, ते बघा. त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोणतीही गोष्ट तुम्ही जरी म्हटली तरी ती होणारच . कारण तुमच्यावर देवदूतांचं राज्य आहे. तुमच्यावरती गणेशासारखे आणखीन हनुमानासारखे तसेच भैरवासारखे लोक उभे आहेत. आणि ते तुमचं कार्य करण्यासाठी पूर्णपणे संपन्न

आहेत. पण त्याची आपण प्रचिती मिळवल्याशिवाय, नुसतं एखाद्या बुवाने प्रवचन द्यावं तसा हा प्रकार नव्हे. मी इथे बसून काही तुम्हाला प्रवचन देत नाही. पण खरं आहे ते साक्षात करण्यासाठी इथे आलेली आहे. खेड़ोपाडी लोक सरळ असतात, साधे असतात आणि त्यांच्याजवळ एवढे पैसेही नसतात, म्हणूनच कदाचित त्यांना परमेश्वर जास्त समजतो. ओळखताही येतो. खरा मनुष्य कोण आहे हे एखाद्या खेडेगावातल्या माणसाला सहज ओळखता येतं. एवढं शहरातल्या माणसाला ओळखायचे आहे अजून. बहुतेक जेवढे महागुंड, अगदी महाप्रसिद्ध, महाघाणेरडे गुरू लोक आहेत ते सगळे शहरातच आहेत. त्यांना खेड्यापाड्यात येण्याची सोय नाही आणि आवडही नाही. कारण इथे येऊन पैसे कमावता येत नाही नां! त्यांना काही प्रेम नकोय. त्यांना पैसे हवेत. त्यातले आपले एखादे, त्यांच्यातील वाचलेले दोन चार, असे शहरात काही मिळालं नाही मग ते येतात इकडे भटकत. तेव्हा तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत. तुम्हाला देवाने अशा निसर्गरम्य स्थानी आणलेले आहे, त्याला काहीतरी कारणं असली पाहिजेत. त्यातलं मुख्य कारण हे आहे की परमेश्वर हा काय आहे हे तुम्ही जाणलं तर तुम्ही ते उत्तम तऱ्हेने आपल्यामध्ये बिंबवू शकता. तितके एक शहरातला मनुष्य नाही करू शकत . जितकं तुम्हाला हे जमेल तितकं त्यांना हे जमणार नाही. कारण शहरातले जे काही लंद फंद आहेत ते तुम्ही शिकलेले नाहीत अजून. तुमच्यामध्ये या घाणेरड्या गोष्टी अजून आलेल्या नाहीत. अत्यंत घाणेरड्या गोष्टी आहेत ज्या शहरामध्ये चालू आहेत आणि ते सर्व लोकांनी शिकून ठेवलेले आहे. त्यांच्या मनाची स्थिती अशी आहे की त्यांच्यामध्ये कोणतंही बी लावायचं म्हणजे फार त्रास होतो. सांगायचं म्हणजे लंडनला मला जर कोणी म्हटलं, की काम कर तर मला अगदी कंटाळा येतो. थकवा येऊन जातो. आता दिसायला मोठे छान-छोकी, चांगले कपडे घातलेले, गोरे-गोमटे लोक असतात तिथे, पण आतून इतकी घाण असते त्यांच्यात की मेहनतच करवत नाही. उलट कोणी जर म्हटलं की, ‘माताजी, तुम्ही कळव्याला येऊन काम करा.’ तर मी अगदी तयार आहे. इथे एक जर तुम्ही झोपडी बांधली तर मी इथे येऊन रहायला तयार आहे. मला मजा वाटेल त्याची. पण लंडनला मला जमत नाही. कारण फारच घाणेरडे लोक आहेत, आणि त्यांची स्थिती म्हणजे इतकी घाण आहे की त्या लोकांना दारातसुद्धा उभं करू नये. पण य करता, ‘आलीया भोगासी असावे सादर.’ आमच्या साहेबांची नोकरी तिथे झाल्यामुळे आम्हाला तिथे जावं लागलं. आणि तिथल्या लोकांचा उद्धार करण्याची पाळी आल्यावर आम्ही तेही कार्य करत आहोत आणि बरेच इंग्लिश लोक झाले आहेत पार. पण तुमच्या पायाची धूळ त्यांना नाही. एकवेळ श्रद्धा आहे पण तुमचा हा भोळेपणा त्यांच्यात मुळीच नाही. तेव्हा त्यांच्याकडून काहीच शिकण्यासारखं नाहीये. तुम्हाला वाटतं त्यांच्याजवळ दोन-चार कपडे जास्त असले किंवा मोटारी असल्या म्हणजे फार आरामात आहेत ; असं मुळीच नाही. अत्यंत दुःखी लोक आहेत आणि दहा माणसात एक मनुष्य तिथे आत्महत्या करतो आणि दहा माणसात सात माणसांची लग्न मोडतात, असे प्रकार आहेत. तेव्हा अशा देशामध्ये काही धर्म असू शकेल असं वाटतच नाही मुळी. त्या देशामध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-बाप पाडून टाकतात. म्हणजे चांगली मुलं असतात त्यांना मारून टाकतात जीवानिशी. आई स्वत: मारून टाकते गळा घोटून. असं ऐकले आहे का तुम्ही? प्रत्येक आठवड्याला. आपल्याकडे आई म्हणजे मुलावर एवढा जीव टाकेल आणि तिथे हे असे रानटी लोक आहेत. अगदी रानटी. ০
यांत्रिक झालेले आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही भावना नाही. तेव्हा त्यांच्यासारखं होण्याचा काहीच प्रयत्न करू नये. आपल्या देशाची जी अत्यंत जुनी संपदा आहे, प्रेमाचे जे महत्व आहे आपल्याकडे ते राखून ठेवले पाहिजे. कारण परमेश्वराची जी शक्ती, ती ही प्रेमशक्ती आहे आणि तो प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून प्रेमाचंच स्मरण केलं पाहिजे आणि प्रेमात राहिले पाहिजे आणि प्रेमाचीच मजा उचलली पाहिजे. इकडे पाटलांनी फार सुंदर अगदी हे सुरु केलेलं आहे. हळू हळू वायब्रेशन्स फार इथे ठीक झालेले आहेत . हे मला आज जाणवलं आणि त्यावर मला फार आनंद झाला. खरं म्हणजे दारातच मला एकदम ध्यान वाटलं आणि ध्यानातच मी, मला असं वाटलं की एके काळी, सश्याश्यामला ही भूमी होणार आहे आणि हे म्हणजे एक मोठं भारी स्थळ होईल. इतकच नाही पण तीर्थ होईल एकेकाळी, असं मला वाटू लागलं इतके इथे वाय ब्रेशन्स आले.
आता मी इथे अनेकदा आलेली आहे, पण ह्या वेळेला मला फारच आनंद झाला. माझा पूर्ण आशीर्वाद ह्या कलव्याला आहे आणि तुम्हा सर्वांना आहे. देवकृपेने एके दिवशी ही जागा फार मोठी होईल. आणि तुमच्या मुलाबाळांचे फार भले होईल, धार्मिकरित्या.
ती वेळ माझ्या समोरच येवो, माझ्या आयुष्यातच येवो तर फार बरं होईल असं मला वाटतं. सगळ्यांना आशीर्वाद आहे माझा.
प्रश्न असले तर विचार मला……..
आपल्या आतमध्ये बघायचं. डोळे मिटून बघा आणि डोळे मिटले असतांना जर डोळ्याची पापणी लवत असली तर मात्र डोळे उघडायला पाहिजे. पण जर डोळे व्यवस्थित बंद झाले, तर डोळे बंद करा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जर तुम्ही आतमध्ये बघितलं, तर कोणताही विचार डोक्यात येत नाही.अगदी शांत झाल्यासारखं वाटतं आतून. डोळे मिटून आतमध्ये बघा. काही विचार येतोय का? सगळे जण डोळे मिटून आतमध्ये बघा काही विचार येतोय का कारण शक्ती जेव्हा जागृत होऊन आणि आज्ञा चक्राला निघून जाते, तेव्हा कोणताही विचार येत नाही. निरविचारिता येते. काही लोकांच्या हातातून मात्र थंड थंड असं येत असेल.थंड थंड वाऱ्या सारखं. जसा काही एअर कंडिशनर लावलाय. असं थंड येत असेल. ज्यांच्या हातात असं थंड येतंय ते मात्र पार झालेले लोक.