Seminar

(India)

Feedback
Share

कुण्डलिनी शक्ती आणि सात चक्र अहमदनगर, २३ फेब्रुवारी १९७९

अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला आमंत्रण पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्वच आपले फार आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे काही तरी मला विशेष वाटतो. कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे. म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेली आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचे म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेले आहे. ही सगळी तयारी अनादिकालापासून मानवामध्ये झालेली आहे.

 मनुष्य हा एक अमिबापासून वाढत वाढत आज या दिशेला पोहोचलेला आहे की तो परमेश्वराबद्दल विचार करू लागला. तो अमिबापासून या दशेला का आला ? एवढी मेहनत त्याच्यावर का घेतली गेली? तो आज मानव स्थितीत येऊन तरी पूर्णत्वाला आलेला आहे की नाही ? ज्यासाठी त्याला अमिबापासून त्या स्थितीला आणून सोडलेले आहे त्या स्थितीत येऊन तरी काय त्याला सगळे माहीत झालेलं आहे? परमेश्वराबद्दल जे त्याच्यामध्ये कुतूहल आहे, काहीतरी उत्कंठा आहे, जिज्ञासा आहे. परमात्मा म्हणून कोणी तरी शक्ती संसारात आहे, असं प्रत्येक मानवाला वाटत असतं. ते त्यानं कसं जाणलं, कुठून जाणलं? त्याबद्दल त्याने पुष्कळ पुस्तकं लिहिली आहेत, संतांची पूजा केलेली आहे. त्रास ही दिलेला आहे. अशा या मानवाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. वायफळ कुणीतरी इतकी मेहनत केलेली नसणार. निदान परमेश्वराने तरी केलेली नसणार. जर समजा आम्ही हे एक यंत्र बनवलं. त्याचा आधी पाया घातला, त्याची सबंध व्यवस्था केली तर सहजच आपण विचाराल की ‘माताजी, कोणासाठी? काय आहे हे? काय बनवणं चालवलंय तुम्ही? याच्यातून काय होणार?’ हे सगळं बनवायलाच पाहिजे आधी, ही सगळी तयारी करायलाच पाहिजे. आणि सर्व तयारी झाल्यावरच जेव्हा आम्ही हे mains ला लावतो तेव्हा हे कार्यान्वित होतं. तसेच मानवाचे आहे. मानवाला परमेश्वराने एवढ्यासाठी घडवले आहे की ते सुद्धा परमेश्वराचे एक फार मोठे साधन आहे. इतकेच नव्हे तर ते इतकं सुंदर साधन त्यांनी बनवलंय की त्या साधनाला परमेश्वर काय आहे ते कळतं. ह्याला (माईकला) कळत नाही, ह्याच्यातून जरी मी बोलत असले. ज्याने घडवलंय त्याला सुद्धा ते कळत नाही. याचा अवेअरनेस, जी चेतना आहे ती याच्यामध्ये नाही. ती मानवाला चेतना आधी परमेश्वराने दिली आणि मग ती आलोकित केल्यावर, enlighten केल्यावर तो हे समजू शकतो की परमेश्वराने मला का बनवलंय, आणि त्याची शक्ती त्याच्याकडून अशी अव्याहत वाहू लागते. ती जी शक्ती आहे तेच हे स्पंदन आहे. आता म्हणायला अत्यंत सोपं वाटतं, जसे चव्हाण म्हणाले ती खरी गोष्ट आहे.

 एका क्षणात ही गोष्ट घडते. अगदी एका क्षणात. इतकंही म्हटलं इंग्लिशमध्ये split of a second ही घटना इतकी सहजच घडली पाहिजे. कारण इतकी महत्त्वपूर्ण घटना आहे. उत्क्रांतीची ही शेवटची घटना आहे. आपण श्वास घेतो. जर तो विचार करून आणि चिकित्सा करून घ्यायला सुरुवात केली तर अर्धे लोक मुळी संपणार. जेवढ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्यामध्ये आहेत त्या सहज आहेत. सहज. ‘सह’ म्हणजे with, ‘ज’ म्हणजे born. सहज म्हणजे आपल्याबरोबर जन्माला आलेलं किंवा आपला जन्मसिद्ध अधिकार म्हटला तर तो योगाचा आहे. म्हणजे शेवटी आपण काय आहोत. ते झालंच पाहिजे. ते घडलंच पाहिजे. पुष्कळांना मी म्हटलं की काही याच्यात मेहनत नाही केली तरच बरं. तर त्यांना आश्चर्य वाटतं माताजी असं कसं म्हणतात ! पण आपण मेहनत करून परमेश्वराला बोलावू शकतो का? एखाद्या थेंबाने म्हटलं की मी मेहनत करून सबंध सागराला माझ्याकडे बोलावून घेईन. तर शक्य आहे हे? सागरालाच उतरायला पाहिजे त्या थेंबाला आपल्यामध्ये घेण्यासाठी. तसेच आहे हे. जर आपण काही म्हटलं आम्ही मेहनत करू, डोक्यावर उभे राहू किंवा आम्ही काही कसली तरी धरपकड करू, तर त्याने परमेश्वर मिळणार नाही. अशा प्रयत्नाने मिळणार नाही. पण जर तुम्ही स्थिरावलेले आहात, धार्मिक आहात आणि मध्य मार्गावर बसलेले आहात, अतिशय नाही कशामध्ये. अशा लोकांना ही घटना सहज झालीच पाहिजे. जसं झाडाला एक फळ लागतं. आधी एखादंच फळ लागतं जेव्हा झाड लहान असतं, नंतर दोन-चार आणखीन फळं येतात, पण शेवटी बहर येतो, आणि अनेक फुलांची फळे बनतात. तसेच आज विशेष वेळ आलेली आहे. हे कलियुगात घडायचे होते, घडत आहे आणि घडेल. त्याबद्दल एवढा उहापोह कशाला असतो ते मला आजपर्यंत कधीच लक्षात आलेले नाही की असं का? तसं का? जे लोकांच्यात चालते याबद्दल मला फार आश्चर्य वाटतं. अहो, उद्या जर मी म्हटलं इथे हिरा आहे, तर तुम्ही विचार कराल का? आधी धावत पळत घेऊन याल ना! मग सर्व जे जन्मजन्मांतराचे मिळवलेले आहे ते सहजयोगाने तुम्हाला जर प्राप्त होतं असं मी जर तुम्हाला म्हणते तर त्यात उहापोह कशाला करायचा? ही घटना घडविण्यासाठी अनेक अवतार संसारात आले त्यांनी तुमची सगळी काही तयारी केलेली आहे. ती कशी काय केलेली आहे, ते इथे मी दाखवलेले आहे. ते आपण बघावं म्हणजे आपल्याला थोडंसं समजावून सांगते.

 जे काही बाहेर हे शरीर दिसतं आहे हे कशाच्या दमावर आहे? डॉक्टरांना जर विचारलं की काहो, पॅरासिम्परथॅटिक नर्व्हस सिस्टम म्हणजे काय आहे? तर ते म्हणतील की ही ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम आहे म्हणजेच स्वयंचलित आहे. पण हे स्वयं म्हणजे कोण? ते आम्हाला माहिती नाही. निदान या बाबतीत प्रामाणिक आहेत की आम्हाला ते माहीत नाही की ती कशी चालते? कशी कार्यान्वित असते? ते आम्हाला माहिती नाही. म्हणजे आपण जेवल्याबरोबर आपलं अन्न कोण पचन करतं? आपला श्वासोच्छवास असा बरोबर कसा चालू असतो? त्यातूनही जर समजा तुम्ही धावत सुटले तर तुमच्या हृदयाची क्रिया वाढेल आणि हृदय धडधडू लागेल. ते तुम्ही करू शकता, पण ते हळू करण्याचे काम कोण करतं? ही क्रिया कोण साधून घेतं? असं जर तुम्ही डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणतील हे  सांगू शकत नाही. ते आमच्या सायन्सच्या पलीकडचं आहे. तसंच मानसशास्त्रात सुद्धा पुष्कळ लोकांनी प्रयोग करून पाहिलं आहे आणि असं सिद्ध केलं आहे की अशी कोणती तरी शक्ती आहे जी ऑल परवेदिंग आहे, सर्वव्यापी आहे. तिला ते युनिव्हर्सल अनकॉन्शस म्हणतात आणि ती स्वप्नात येऊन तुमचं मार्गदर्शन करत असते आणि त्याच्यामध्ये काही प्रतीकरूपाने मार्गदर्शन येत असतं. एक प्रकारचा जर त्रिकोण दिसत असला तर तो इथं दिसो किंवा ऑस्ट्रेलियात दिसो किंवा अमेरिकेत दिसो त्याला एकच अर्थ असतो. पण ते सुद्धा एका स्थितीत पोहचून असेच म्हणतात की ह्याचे आम्ही काही सांगू शकत नाही. हे आम्ही जे बाहेरून आहे असेच दिसते. पण आतून कसं येत आहे आणि कसं कार्यान्वित होतं आहे ते आपल्याला दिसत नाही. आपला भारत हा फार मोठा देश आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की हा खरोखरच एक फार मोठा देश आहे कारण की ही एक योग भूमी आहे. इथल्या लोकांनी कधीही जास्त प्रपंच किंवा भौतिक गोष्टींकडे लक्ष दिले नाही. त्यांनी नेहमी या गोष्टींचा विचार केलेला आहे की मनुष्य हा संसारात का आला? कसा आला? कुठून आला? त्याचा अर्थ काय आहे? आणि मनन करून, मेहनत करून तुमच्या पूर्वजांनी ही कमाई करून ठेवलेली आहे आणि याचा पत्ता लावून ठेवलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे की ते कार्यान्वित झालं नव्हतं आणि ते आमच्या हातून आज घडत आहे.

जसं की आज आपण ही वीज बघता. या वीजेला केवढा मोठा इतिहास आहे. वर्षानुवर्ष याच्यावर मेहनत केल्यावर मग एकाने याचा पत्ता लावला की अशा रीतीने वीज होते. समजा, जर त्याने पत्ता लावून आपल्यापुरतेच ठेवले असते किंवा दोन-चार लोकांना दिले असते तर आज तुम्ही मान्य केले असते का एडिसन एवढा मोठा मनुष्य होता. न्युटन एवढा मोठा मनुष्य होता. प्रत्येक भौतिकात सुद्धा सापडलेला शोध हा जनसाधारणाला मिळालाच पाहिजे. तसेच हे सुद्धा अध्यात्मातलं सगळ्यांना मिळालंच पाहिजे नाहीतर कुणाला विश्वास वाटणार नाही. तसेच जर आपण पाहिले तर आजपर्यंत आपण एका अमिबापासून माणसं झालेले आहोत असं म्हणतात आणि ती गोष्ट खरी आहे. तेंव्हा सुद्धा सगळे अमिबा काही माणसं झालेली नाहीत. सगळ्या मासळ्या काही रेपटाईल झालेल्या नाहीत आणि सगळे रेपटाईल काही त्याच्या वरच्या वर्गाला गेले नाहीत. त्याच्यातही चयन होत असतं आणि त्या चयनाने उत्क्रांती होता होता आज आपण मानव स्थितीला आलो. जर ह्याच्यावरची कोणती स्थिती असेल तिथे आपल्याला पोहोचायचे आहे. ज्याच्याबद्दल पुष्कळांनी इशारे केलेले आहेत आणि वर्णन केलेले आहे अशी जर कोणती स्थिती असेल तिथे सुद्धा थोडे बहुत चयन व्हायलाच पाहिजे आणि असं चयन होतं. सहजयोगामध्ये दहा माणसं आली तर कदाचित दोन लोकांना होत नाही. आता आम्ही कोवलमला होतो. तिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आमचा प्रोग्राम केला. म्हणजे पहिल्यांदाच गव्हर्नमेंटला काहीतरी सुज्ञपणा आलेला दिसतो. त्यांनी आमचा प्रोग्राम कोवलममध्ये केला होता. तिथे पत्रकार लोक आले होते. आता पत्रकार म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोणत्या दर्जाचे असतात. काही-काही तर फारच अगदी विचित्र प्रकारचे असतात आणि आल्याबरोबर त्यांनी आम्हाला दारूबिरू द्या, नाहीतर आम्ही काही प्रोग्रामला येत नाही. आमची एवढी फी ठरलेली आहे. एक-एक बाटली दिली तरी वगैरे वगैरे, असे प्रकार सुरू केल्यावर मी सरळ सांगितलं की माझे काही छापायला नको तुम्ही. तुम्ही चालते व्हा इथून. आम्हाला मुळीच नको आहे तुमचं काही. त्याच्यावर ते रागावले आणि भलतं सलतं सहजयोगाबद्दल सुद्धवा दोन-चार लोकांनी लिहिलंय. पण त्यातल्या त्यात काही लोकांना मी पार करून टाकलं. त्यामुळे काही लोकांनी चांगलं लिहिलं. काहींनी वाईट लिहिलं. जरी तुम्ही चांगलं वाईट काही लिहिले तरी सत्याला कधीही माग घेता येत नाही कारण सत्य हे सत्यावरच उभे आहे तेव्हा तुम्ही जरी तुमच्या एकंदर शुद्रतेमुळे किंवा एखाद्या मूर्खपणामुळे  काही चूक लिहिलं तरी सत्य हे सत्यच आहे. तेव्हा दहापैकी जर आठ माणसं पार होतात तेव्हा ही गोष्ट खरोखर आहे आणि झाली पाहिजे. आणि त्याचं प्रमाण आपल्याला अनेक दृष्टीने पहाता येते.

 आधी मी आपल्याला सांगते की काय आहे कुंडलिनी वरगैरे आणि त्याचं प्रमाण कसं ओळखायचं ते पण तुम्हाला सांगते. आता हे सगळ्यांना दिसतंय का? जसं आता आपण माझे बोलणं ऐकत आहात, जे काही मी बोलत आहे ते आपल्या मनामध्ये येतं, ते आपण माझे ऐकता आणि ते सगळे आपलं जे गत आहे तिथे जाऊन बसतं. अशा रीतीने ही डावी कडची जी बाजू आहे ती इडा नाडी मानली जाते. तिला चंद्र नाडी सुद्धा म्हणतात आणि हठयोगात तिला ‘था’ नाडी म्हणतात. ही परमेश्वराची ती शक्ती आहे, ज्या शक्तीमुळे आपले अस्तित्व बनलेले आहे. अस्तित्व शक्ती आहे ही आणि हे जर आपल्याला पटत असेल तर मी असं म्हणेन की ही शिवाची शक्ती आहे. आणि हिला संस्कृत भाषेमध्ये महाकालीची शक्ती असं म्हणतात. महाकालीची शक्ती आहे. आता डॉक्टर लोक म्हणतील की आमचे येथे काही महाकाली नाही आहे. तर आपलं संस्कृत हे इंग्लिश भाषा येण्याच्या हजारो वर्षापूर्वी लिहिलं गेलं होतं . आणि ह्या गोष्टींचा त्याच्याही आधी हजारो वर्ष आधी पत्ता लागला होता. तेव्हा इंग्लिश लोकांनी आपली चिकित्सा करावी अशी त्यांची अजून लायकी आलेली नाही. डावीकडची जी इडा नाडी आहे, ह्या नाडीमुळे आपल्या अस्तित्वाला सुरुवात झालेली आहे. आपलं 

अस्तित्व यावर अवलंबून असते आणि जेव्हा अस्तित्व नसतं तेव्हा आपण नष्ट होतो म्हणून पुष्कळदा याला डिस्ट्रॉयिंग शक्ती सुद्धा म्हणतात.

 नंतर ही जी उजवीकडे आपली शक्ती कार्यान्वित आहे, जी उजवीकडे आहे, ती वर जाऊन डावीकडे जाते आणि ही (इडा) वर जाऊन उजवीकडे जाते. तर जी उजवीकडची शक्ती आहे त्या शक्तीने  आपण आपली शारीरिक स्थिती, शारीरिक कार्य हे करत असतो आणि ह्या स्थितीने आपण आपलं बौद्धिक कार्य करत असतो. म्हणजे पुढचं प्लॅनिंग करायचे असले, पुढचा विचार करायचा असला की ज्याला आपण म्हणतो की आता आम्हाला हे आरगनाइझ करायचे आहे, आम्हाला हे व्यवस्थित करायचे आहे किंवा घरात बायका सुद्धा उद्या पापड करायचे की चटण्या करायच्या वगैरे वर्गैरे असे जे काही आपल्याला पुढचे विचार येत असतात, ज्याला आपण म्हणू आपल्या भविष्याचे जे काही आपण विचार किंवा त्याचे जे काही प्लॅन करत असतो ते सगळे या शक्तीने आपल्यामध्ये कार्यान्वित होतात. तसंच आपल्या शरीराचे कार्य म्हणजे आपण जर असं ठरवलं की उद्या आपण धावायला जायचं. तर जे आपण धावायला लागतो किंवा आपल्या शरीराची जी काही गती होते ती सुद्धा खालच्या बाजूने होत असते म्हणजे खालची बाजू जी आहे ती त्या गतीसाठी असते. त्याला आपण असं म्हणू मेंटल अँड फिजीकल एक्झिस्टंस, जे काही आहे ते किंवा त्याचं जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी उपयोगात येते. आता मधोमध जी शक्ती आहे त्या शक्तीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. सुषुम्ना नाडीतून ही शक्ती वहात असते. परमेश्वराची कार्यशक्ती जी आहे ती आपण पाहिली. उजव्या बाजूला जी पिंगला नाडी आहे त्याच्यातून कार्यान्वित होत असते आणि मधोमध जी सुषुम्ना नाडी आहे त्याच्यामुळेच उत्क्रांती झाली आहे. त्याच्यामुळेच आपल्यामध्ये धर्म स्थापन होतो. म्हणजे आता कार्बनला चार व्हेलन्सी असतात. आपल्यामध्ये जर केमिस्ट्रीचे प्रोफेसर असले तर त्यांना माहिती आहे की पिरिऑडिक लॉ मध्ये सबंध अगदी व्यवस्थित बसवलेले आहे सगळं. हे पाहिलं की आश्चर्य वाटतं की कुणी प्लॅनिंग केलं असेल आणि कसे एक-एक बरोबर सगळे एलिमेंट्स त्यांनी बसवलेले आहेत. तर कार्बनला जसं चार व्हेलन्सी आहेत किंवा सोनं आहे, सोन्याचा रंग जसा कधी खराब होत नाही. हा त्याचा धर्म आहे. तसाच मानवाचा सुद्धा धर्म याच सुषुम्ना नाडी मुळे बनतो. पहिल्यांदा ह्याच्यात धर्म बनतो आणि त्यानंतर त्याची उत्क्रांती होते. धर्म बदलत बदलत उत्क्रांती होते.

 आपल्या धर्मात आणि सोन्याच्या धर्मामध्ये फरक आहे. आपल्या धर्मात आणि एका प्राण्याच्या धर्मात फरक आहे. पण आता मानव धर्म बनल्यावरती त्याची पुढची स्थिती काय? ती धर्मातीत आहे. ती गुणातीत आहे. म्हणजे हे जे तीन गुण मी आता आपल्याला सांगितले आहेत, ते तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण मध्ये आहे. त्या गुणापलीकडे सुद्धा आपण जातो. ह्या मनुष्याच्याच योनीत आल्यानंतर म्हणजे मनुष्य आता अशा स्थितीला येऊन पोहोचला आहे  की जिथे फक्त आता त्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे. त्याला त्याच्या सर्वव्यापी शक्तीशी संबंधित केलं पाहिजे. आणि त्यासाठी जी आपल्यामध्ये शक्ती खाली स्थित आहे तिला कुंडलिनी असं म्हणतात. ही कुंडलिनी साडे तीन वेटोळे घालून त्याच्यात बसलेली आहे. पण ही एका टेपरेकॉर्डरमध्ये जसा टेप असतो तशी आपल्यामध्ये स्थित असते आणि आपल्यामध्ये जे काही गत असेल, जे काही पाप , पुण्य, जे काही आपण केलेले असेल ते सगळे त्याच्यात असतं, म्हणजे याच जन्मातलं नाही तर अनेक जन्मातलं सगळं काही त्यामध्ये विहीत असते. अशी ती कुंडलिनी आपल्यामध्ये खाली स्थित असते. जसं एखाद्या बी मध्ये त्याचा अंकुर असतो तसेच मानवामध्ये हा अंकुर, ही तुमची आई जन्मजन्मांतर तुमच्याबरोबर जन्माला येते आणि सगळं काही तुमचं जे असतं ते बघत असते आणि त्यावेळेची वाट बघत असते की जेव्हा हे कार्य घडेल आणि तुम्हाला पुनर्जन्म मिळेल.

 आता पूर्वीच्या काळी एक- दोन लोकांना असं झालं, पुष्कळसे लोक आपल्याला माहिती

आहेत, कुठेही असं आपण ऐकलेले नाही की पुष्कळसे लोक एकदम साधू झाले किंवा त्यांना परमेश्वराचा बोध झाला. ज्ञान मात्र लोकांना आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, इकडे गेलो पण बोध मात्र फार कमी लोकांना होतो. आणि त्यामुळेच सगळे घोटाळे उभे झालेले आहेत. सांगायचं म्हणजे कोणताही धर्म, कोणताही अध्यात्म करायचा म्हणजे पहिली गोष्ट आहे तुमच्या आत्म्याशी संबंध जोडलाच पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे लोकांना एवढी लहानशी गोष्ट सुद्धा माहीत नाही. जर आत्मा तुम्ही जाणला नाही, जर तुम्ही आत्म्याशी संबंध केला नाही तर तुम्ही काहीही परमेश्वराबद्दल जाणू शकत नाही. जसं आपल्याला डोळे असायला पाहिजेत हा सुंदर हॉल मला बघायला डोळे असायला पाहिजेत, तसं आत्म्याचे जोपर्यंत डोळे उघडत नाहीत तोपर्यंत परमेश्वराशी तुमचा संबंध होऊ शकत नाही. म्हणूनच सगळे काही धर्म जे आज आपण पहातो आहे त्यांचं वाटोळं झालेलं आहे त्याला कारण आहे. उपटसुंभ लोकांनी या गोष्टींचा फायदा घेतलेला आहे. त्यांनी आपल्याला दुसर्याच मार्गाला नेलेले आहे आणि  आज ही स्थिती आलेली आहे की आपल्याच देशामध्ये नव्हे तर प्रत्येक देशात जी तरुण मंडळी आहेत त्यांचा देवावरचा विश्वास उडाला आहे. अल्जेरिया म्हणून देश आपल्याला माहिती असेल तिथे मुसलमान लोक आहेत आणि तिथे मुसलमान लोक अत्यंत धर्मांध आहेत. आपल्याहीपेक्षा, फारच जास्त. आणि या धर्मांधतेमुळे त्यांची तरुण मुलं जी डॉक्टर झाली, इंजिनिअर झाली, आर्किटेक्ट झाली त्यांनी सांगितले ‘हे फालतूचं आम्हाला काही नको. तुम्ही आपला त्याच्यात वेळ घालवा. पाच वेळा नमाज पढा, डोकी फोडा, नाहीतर त्या काब्याला जा, नाहीतर काही करा. पण आम्ही आता ह्याच्यात पडायला तयार नाही. फार झालं आम्हाला.’

 अशाच वेळेला एक मुलगा माझ्याजवळ लंडनला आला. आणि त्याला मी पार केलं. पार झाल्यावर सगळं मी त्याला समजवून सांगितलं की धर्म म्हणजे काय? मोहम्मद म्हणजे काय? तो कुठे आपल्या उत्क्रांतीमध्ये मदत करतो. नंतर ख्रिस्त म्हणजे काय? त्याच्या पलीकडे राम, कृष्ण या सगळ्या अवतारांचा काय अर्थ आहे आणि त्याच्यानंतर तो तिथे गेल्यावर ह्या सगळ्या मुलांना एकत्र करून त्याने सांगितलं की नाही, ही गोष्ट खोटी आहे. परमेश्वर आहे. सर्वव्यापी शक्ती आहे. फक्त ह्या लोकांचं एवढंच दुखणं आहे की ह्यांच्या आत्म्याची ओळख नव्हती म्हणून हे काहीतरी आंधळ्यासारखं करत होते. पण डोळस होता येतं. आणि त्यानं पाचशे लोकांना तिथे पार केलं. आणि अशा रीतीने आमचा सहजयोग अगदी वेळेवर बसलेला आहे. जेव्हा ते लोक धर्म सोडून अविश्वासात चाललेले आहे तेव्हा मधोमध आमचा सहजयोग आहे, जिथे तुम्हाला परमेश्वराचं प्रत्यक्ष प्रमाण मिळतं. आता ही कुंडलिनी इथे स्थित आहे ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेले आहे. तसंच सगळ्यात जास्त कार्य मार्कंडेय स्वामी आणखीन आदि शंकराचार्यांनी फार मोठं कार्य केलेले आहे. त्यांनी इतकं विषद आणि सुंदर सगळे काही समजावून सांगितले आहे. पण मला आश्चर्य वाटतं की शंकराचार्यांची पुस्तकं कोणीच वाचत नाही. इतकंच काय मी जेव्हा कोवलमला गेले होते आणि तेव्हा ते केरळाचे रहाणारे होते. तिथे कालडी गावात त्यांचे सगळं आयुष्य गेलं होतं. आणि मला आश्चर्य वाटलं की तिथले लोक मला सांगायला लागले की आम्हाला माहितीसुद्धा नाही कोण शंकराचार्य, आदि शंकराचार्य. कोणाविषयी बोलता तुम्ही? इतकं अज्ञान लोकांमध्ये इंग्रजी शिक्षणामुळे आलेले आहे. इंग्रजी शिक्षणामुळे काय काय फायदे झालेले आहेत ते तुम्ही इंग्लंडला जाऊन बघा आणि आपलं जे आपण विसरून आज बसलेले आहोत कारण आम्ही म्हणजे सेक्युलर स्टेट वगैरे झालो म्हणजे धर्माबद्दल पूर्ण अज्ञान हे सेक्युलर स्टेटचं जर लक्षण असलं तर ते आपल्यामध्ये पूर्णपणे पसरलेलं आहे. धर्म आपल्या देशामध्ये इतका गहन आणि इतका मनन करून काढलेला आहे आणि त्याचं एक- एक लक्षण इतकं दिलेलं आहे की आपण साऱ्या संसारावर आपल्या धर्माच्या सत्यावर, सर्व संसारावर राज्य करू शकतो. प्रेमाचं राज्य करू शकतो. आणि सगळ्या जगभर आपल्याला आपल्या देशाबद्दल लोकांनाही कुतूहल निर्माण झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे या देशात हजारो लोक येत आहेत ते हे बघण्यासाठी की हे काय आहे सत्य ह्या देशाचं हे बघायला पाहिजे. पण त्यांच्यासाठी सुद्धा आपण भामटे काढले आहेत आणि ते भामटे त्यांना चांगलेच लुटून काढत आहेत आणि ते कधीही कोणत्याही खऱ्या ह्याच्यात जात नाही. 

परवा मी गावाला गेले होते, मुसळवाडीला. तर आमचे शिष्य म्हणायला लागले की माताजी, फक्त सहजयोगाच्या कृपेमुळे आमच्यात एवढी समरसता. आम्ही इतक्यादा हिंदुस्थानात येऊन गेलो पण आम्ही एकाही हिंदुस्थानी माणसाशी बोलू शकलो नाही. फक्त बोललो तर ते हे सगळे अँग्ली स्टाइल, पाश्चिमात्य पद्धतीने रहाणाऱ्या हिंदुस्थानी लोकांशी, जे अगदी इंग्लिश केंब्रिज पेक्षा चांगलं बोलतात. आणि टेल कोट शिवाय बाकी मोठे सगळे ब्रिटीश झालेले आहेत. तेव्हा मला अगदी कंटाळा आला होता या देशाचा. आणि आज ही स्थिती आलेली आहे की हे  लोक तुमच्या संस्कृतीला बघून आणि तुमच्या मनन स्थितीला बघून आश्चर्यचकित झाले. आश्चर्यचकित झाले. आणि त्यांना वाटतं की तुमचे पाय धरावे की काय करावं. तुमच्या या प्रेमाचा सोहळा बघून सुद्धा त्यांना इतकं आश्चर्य वाटतं आहे की आम्ही सगळं विसरलो. त्या इंग्रजी शिक्षणामध्ये त्यांच प्रेम, त्यांचं जे काही मनाचा ओलावा असेल किंवा भक्ती, श्रद्धा जे काही असेल ते सगळं वाहून गेलेले आहे. ते आपल्याकडे झालं नाही पाहिजे. आणि होत आहे म्हणा. फार दुःखाची गोष्ट आहे. की स्वातंत्र्याच्या आधी आपण आपल्या संस्कृतीला चिकटून होतो. जसं स्वातंत्र्य मिळालं तसं आपल्याला वाटलं आता आपण मोकाट झालो. आता वाटेल तसं वागलं तरी चालेल. तसं होत नाही. कारण मानवाने जरी ही स्थिती गाठली नाही तर तो जनावराच्या स्थितीत तरी जाऊ शकतो का? असा मला प्रश्न पड़तो. कदाचित तो राक्षसाच्या स्थितीत जाईल. कारण याच्या पुढची स्थिती म्हणजे अतिमानव होण्याची आहे. तेव्हा ते जनावराकडे कसे जातील. आणि गेले तरी अशा जनावराकडे जातील जे मनुष्य ही नाही आणि जनावरही नाही. ही उत्क्रांतीची स्थिती आपल्यामध्ये पूर्णपणे घटित झालेली आहे. आणि त्या उत्क्रांतीचे एक एक स्टेज ज्याला म्हणतो असे बनवलेले आहे. त्यापैकी पहिल्या स्थितीमध्ये अगदी पहिले जे चक्र आहे, आपल्यामध्ये स्थित आहे.

 खाली चौकोनी जे दिसतंय ह्या चक्राला मूलाधार चक्र असे म्हणतात. मूलाधार चक्र. आता ह्याच्यामध्ये सुद्धा पुष्कळ लोकांनी नाना तर्हेच्या आपल्या कल्पना काढलेल्या आहेत. आपल्या हिंदुस्थानात कल्पकतेला काही कमतरता नाही. जो बसला तोच अध्यात्मावर बोलू लागतो कारण असं आहे त्यांना कोण धरणार? त्याच्याबद्दल काही प्रमाण नाहीच आहे. ज्याला दिसलं तोच गुरू. ज्याला दिसलं तोच आपलं लेक्चर वर लेक्चर. हजारो लोकं बसतात. मला समजत नाही हा मनुष्य बडबडतो तरी काय? आणि लोक ऐकतात तरी काय ? आणि त्याचा लाभ तरी काय? त्याचं प्रत्यक्ष तरी काय आहे? एकच की तुमच्या खिशात पैसे किती आहेत आणि ते किती वाटले? हे मोजून घ्यावे. त्यापलीकडे त्याचं काहीही मिळत नाही. तर हे जे चक्र आहे ज्याला आपण मूलाधार चक्र असं म्हणतो. ह्या मूलाधार चक्रावरती साक्षात गणपती बसवला आहे परमेश्वराने. आता गणपती आहे की नाही. तो शास्त्रात आहे की नाही. आपल्या घरात एखादा डॉक्टर गणपती ठेवतील. पण मी जर म्हटलं की काही रोग गणपतीच्या स्तवनाने जातात तर त्यांना अगदी आश्चर्याचा धक्का बसेल. असं कसं होईल? त्यांना तर ते सगळे मटेरियामेडिका माहिती आहे. हा गणपती घरात जो आहे त्याने काही रोग बरे होतात असं माताजी म्हणतात म्हणजे हे काय? ह्याला काही सत्य म्हटलं पाहिजे का? पण होतात.  पण अधिकार असला पाहिजे तुम्हाला. गणपतीशी तुमचा संबंध काय घडलेला आहे? काहीही नाही. एक आणून आपलं ठेवून कोनाड्यात ठेवला म्हणजे काही गणपती पूजा होत नाही. तोंडाची बडबड केली म्हणजे गणपती पूजा होत नाही. 

पण गणपती म्हणजे काय आणि तो गणपती कसा जाणायचा हे जोपर्यंत तुम्हाला त्याचा बोध होत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्याचा अधिकार परमेश्वराकडून मिळत नाही तोपर्यंत तुम्ही समजू शकणार नाही की हा गणपती कोणत्या कार्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये घातलेला आहे. आता गणपती हा पावित्र्याचं लक्षण आहे. परमेश्वराने फक्त पावित्र्य संसारात बनवलं. आणि गणपती त्याची देवता बसवली. आपल्याला आश्चर्य वाटेल आजकाल इकडें कलीयुगात बघितलं की कोणाला विश्वास नाही वाटायचा की पावित्र्य हे पहिल्यांदा परमेश्वराने संसारात बनवलं. त्याच्यानंतर कारण परमेश्वर हा पिता आणि अत्यंत दयासागर, प्रेमाचा सागर इतकंच नव्हे तर करुणेचा निधी आहे. त्याने आधी असा विचार केला की माझ्या मुलांना ज्याच्यात परम सौख्य मिळेल असं जर मला घडवायचं असेल तर पहिल्यांदा जे सगळ्यात अप्रतिम ते बसवावं आणि त्याने म्हणून संसारामध्ये फक्त पवित्रता बसवली. ही पवित्रता, श्री गणेश ह्यांनी, त्या मूलाधार चक्रामध्ये आपल्यातही बसवली आहे. आता गणपतीवर बोलायचे म्हटले तर मला एक लेक्चर द्यावे लागेल आणि ते फार मोठं आहे. फक्त त्यांना वंदन करून आपण पूढे जाऊया. 

ह्याच्यावरचं जे चक्र आहे त्याला आम्ही स्वाधिष्ठान चक्र म्हणतो. हे सुद्धा आपल्यामध्ये परमेश्वराने बसवलेले आहे. ह्या चक्राने आपण कोणतंही कार्य करत असतो. म्हणजे कला , विचार. नंतर , स्वाधिष्ठान चक्राने जेवढी निर्मिती संसारात क्रीएटिव्ह  पॉवर  आहे ती त्याने वापरण्यात येते . आता आपल्यामध्ये जे स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याच्यामुळे आपण जे काही कलेचे कार्य करतो किंवा पुढचा विचार करतो किंवा जे काही प्लॅनिंग करतो वगैरे जेवढें काही आहे त्याचा ताण त्या स्वाधिष्ठान चक्रावर पडतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मेंदूने आपण विचार करतो. ही गोष्ट खरी आहे. मेंदूने जरी आपण विचार करतो तरी त्याच्यातला जो मेद आहे, ज्याला फॅट म्हणतात तो कुठून येतो? तो आपल्या पोटामध्ये हे स्वाधिष्ठान चक्र तयार करून व्यवस्थित वर पोहचवत असतो. आता जो मनुष्य फार विचार करतो, फार प्लॅनिंग करतो, नेहमी विचारातच असतो अशा माणसाला नेहमी डायबेटिसचा रोग होऊ शकतो. कारण काय? कारण असा मनुष्य अत्यंत विचार केल्यामुळे त्या चक्राला अत्यंत ताण देतो आणि त्या चक्राचं दुसरं कार्य असं असतं की आपलं स्प्लीन, पँक्रियाज, किडनी नंतर युटेरस, लीव्हरचा वरचा भाग ह्या सगळ्यांची देखरेख पहायची. ज्या चक्राला एक कार्य हे करायचे आहे आणि दुसरे कार्य हे करायचे आहे, आणि त्याच्यावर जर तुम्ही एकच भार घातला तर असंतुलन जीवनात येऊन त्याला डायबेटिसचा रोग होतो. एखाद्या खेड्यातल्या माणसाला कधीही डायबेटिस होणार 

नाही. पण एक पांढरपेशीय लोकांना किंवा जे लोक सिडेंट्री हॅबीट्स चे लोकं आहेत त्यांना बहुतेक हा होतो. त्याला कारण हे असं आहे की ते सारखे विचार करत असतात. आता प्लॅनिंग सुद्धा म्हणजे माणसाने करण्यापेक्षा जे परमेश्वराचे प्लॅनिंग आहे ते जर समजून घेतलं तर त्याला हा त्रास करायची गरज नाही की आपण बसून प्लॅनिंग करायचे. पहिल्यांदा परमेश्वराला समजून घ्या. म्हणजे त्याची जी सर्वव्यापी शक्ती आहे ती स्वत:च सगळं प्लॅनिंग करत असते. तेव्हा त्याच्या प्लॅनिंगला जर तुम्ही उतरलात तर तुमचे सर्व कार्य सुव्यवस्थित, सगळे सुंदर होईल. उलट तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर त्याच्यात काही ना काही संकल्प-विकल्प करोती, आणि विकल्प येऊन सगळं प्लॅनिंग, आपल्याला दिसतंच आहे आपल्या देशाच्या प्लॅनिंगची काय स्थिती झालेली आहे ते. तेव्हा माणसाच्याकडून काही होत नाही. सगळं परमेश्वर करतो असं मी जर म्हटलं तर लोकांना वाटेल माताजी काही तरीच सांगतात. पण एकही काम आपण जिवंत करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण कामं काय करतो. आता दगड आहेत इथे मेलेले. ते आणून इथे लावले, फरशा घातल्या, झाड मेले कि त्याचे हे केले, गॅलरी, आणि सांगितले कि आम्ही फार मोठे झालो. आणि सांगितलं की आम्ही फार मोठे काम केले. एकही जिवंत कार्य आपण करू शकतो का? एका बी मधून एक तरी अंकुर आपण काढू शकता का? एक बी तरी आपल्याला घडवता येतं का? मग कसल्या गमजा मारायच्या की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. काहीही तुम्ही करत नाही. सगळे मेलेलं काम आहे. अहो, हे उचलून तिकडे घाला, नाहीतर तिकडून इकडे घाला. त्याच्यात काय फरक पडणार आहे विशेष! उगीचच नसत्या उस्तापऱ्या आहेत. 

उलट ही असली कामे करून करून माणसाला आपण भौतिक गोष्टींची फार गुलामी करायला सांगितली आहे. आता समजा ज्यांना खुर्चीवर बसण्याची, आमचे बिचारे हे विदेशी लोक आले आहेत. त्यांना एक त्रास होतो कधी कधी. ह्यांना खुर्चीवर बसण्याची सवय लागल्यामुळे ते खाली बसू शकत नाहीत. आता खुर्च्यांच्या डोक्यावर बसले. तर म्हटलं बरोबर खुर्च्या घेऊन फिरा तुम्ही आमच्याबरोबर. तुमचं कसं काय होणार हे समजत नाही मला. जमिनीवर बसायचं टाकलं. प्रत्येक अशा सवयी जडतात. ही भौतिकता इतकी वाढलेली आहे ती आपल्या डोक्यावर बसते. पण त्याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही संन्यास घ्या. दुसऱ्या याला नाही निघायचं. मी लगेच म्हटल्याबरोबर लोकं संन्यासाला निघतात. संन्यास बिन्यास घेण्याची काही गरज नाही. व्यवस्थित लग्न करावं. लग्न व्यवस्थाही परमेश्वरानेच केलेली आहे. आणि मुलंबाळं सांभाळावी. पण पावित्र्याने राहिलं पाहिजे. अशा आमच्या सहजयोगामध्ये अगदी साधारण, सर्वसामान्य जी लोकं आहेत आणि जी सर्वसामान्य पद्धतीने रहातात त्यांची व्यवस्था केलेली आहे. संन्याशाला आम्ही रियलायजेशन देऊ शकत नाही. जर कोणी मनुष्य संन्यासी बनून आमच्यासमोर येऊन उभा राहिला तर आम्ही त्यांना सांगू की हे बघा तुम्ही साधे कपडे घालून या. म्हणजे हे की जाहिराती लावून फिरायची काही गरज नाही. जो संन्यास आहे तो आपल्या आतमध्येच घडतो. अशा जाहिराती लावून बाहेर स्वत:च्या काहीतरी गमजा करणे म्हणजे खरोखर माकडाचे लक्षण आहे. माणसाने अशा भलत्या गोष्टींच्या नादी लागू नये. आणि त्याच्यामध्ये पडू नये. हे फार चुकलेले आहे तसेच पुष्कळसे गुरुसुद्धा संन्यासी बनून फिरतात. आणि आम्ही फार मोठे गुरू वगैरे दाखवतात. अशा लोकांना गावाच्या वेशीबाहेर ठेवले पाहिजे. सीतेने वाल्मीकी रामायणात सांगितले आहे की कुणी संन्यासी जर दारात आला तर त्याला वेशीच्या बाहेर ठेवायचे. एकच दिवस त्याला गावाच्या वेशीवर राहिले पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्याला पिटाळलं पाहिजे. अहो, आम्ही गृहस्थ लोक आमचा तुमचा काय संबंध? तुम्ही संन्यासी आहात तर जाऊन बसा जंगलात. इथे येण्याची गरज काय? म्हणजे दुसऱ्यांच्या पैशावर कसं जिवंत रहायचं, हे बांडगुळासारखं आयुष्य, हे पॅरासायटिक आयुष्य आणि त्याच्यासाठी आमच्या सहजयोगामध्ये मुळीच वाव नाही. जर असे तुम्ही कुणी संन्यासी असाल, दंडे संन्यासी वगैरे तर आमचा तुम्हाला नमस्कार. आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही. जर तुम्ही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लग्न करून व्यवस्थित म्हणजे बॅचलर्सना पण चान्स आहे. जर असे असले, तर त्यांच्यासाठी आमचा सहजयोग आहे. कारण अश्या माणसांना संतुलन येतं. मुलंबाळे घरात असली, आई-वडील असले तर माणसाला संतुलन मर्यादा येतात. तो काहीतरी व्यवस्थित वागतो. ज्या माणसाला आई नाही, वडील नाही, कुणी नाही  अनाथलायासारखं कुठून तरी आलेला असेल किंवा ज्याला हे माहिती नाही की मर्यादा म्हणजे कशाशी खातात, त्या माणसाला सहजयोग कसा आम्ही द्यायचा? कारण मर्यादेनेच मनुष्य बांधला जातो आणि त्यानेच त्याची प्रगती होते. तुम्ही बघितलेले आहे झाडाचं सुद्धा तसंच आहे. झाडाचं बी- बियाणं जेव्हा फुगतं त्याला मर्यादा घालाव्या लागतात. त्याला संगोपावं लागतं. त्याला बघावं लागतं. आजकाल सगळे मानसशास्त्रज्ञ सांगायला लागले की जिथे जिथे गृह व्यवस्था बिघडलेल्या आहेत, जिथे जिथे समाज बिघडलेला आहे तिथली मूलं अगदी बेकार जातात. आणि जे जगामध्ये आपण एवढ युद्धं इतका कलह तसच लोकांच्यामध्ये भयंकर असंतोष वगैरे बघतो त्याच्या मुळाशी त्यांची घरं तुटलेली आहेत. त्यांना आई नाही, त्यांना वडील नाहीत, ती अनाथासारखे फिरणारी मुलं आहेत. म्हणून हे असं झालेलं आहे असं निदान त्यांनी काढलेलं आहे. 

तेव्हा दुसरं जे चक्र आहे, ज्याला आपण स्वाधिष्ठान चक्र म्हणतो, त्याच्यावरती श्री ब्रह्मदेव आणि त्यांची शक्ती सरस्वती ही आहे. पण जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुमारिका गौरी शक्ती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या गणेशाला गौरीने कसं बनवलं आणि त्याला कसं आपल्या दाराबाहेर उभं केलं ते. आता त्यावरून असं लक्षात घ्यायचं की गणेश हा गौरीचं जे पावित्र्य आहे ते बघत असतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोटोकॉल ते बघत तिथे बसलेले असतात. त्यांच्यावर कुंडलिनीच्या छेदनामध्ये कार्य येत नाही  त्यांचे छेदन होत नाही. ते त्या ठिकाणी बसून फक्त ही संगोपना करत असतात. आता जे लोक या गणेशावर आघात करतात म्हणजे गणेश हा ज्या चक्रावर बसलेला आहे त्याने पेल्व्हीक प्लेक्सस म्हणून जे प्लेक्सस आहे त्याची चालना होते. सूक्ष्मामध्ये जरी ते मूलाधार चक्र असलं तरी त्याची चालना पेल्व्हीक प्लेक्ससमुळे होते. आणि या पेल्व्हीक प्लेक्ससमुळे सेक्ससुद्धा सांभाळला जातो. तर लहान मुलाला सेक्सच काही कळत नाही म्हणून तिथे एक लहान मूल जे कधीही मोठं होत नाही. नेहमी जे बाल्यावस्थेत, पवित्र अवस्थेत असतं अशा गणेशाला तिथे बसवलं आहे. आता जी घाणेरडी मंडळी, बरीच आहेत. तुमच्या पुण्याला सुद्धा एक गृहस्थ उद्भवले आहेत. ते असं घाणेरडं शिकवत असतात, की कुंडलिनी जागृत करायची असेल तर अशा घाणेरड्या पद्धतीने करायची. तर त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे, दिलं तरी त्यांच्या लक्षात येणार नाही. त्यांना आई-बहिणी नाहीतच म्हणा. पण ही जी आई तुमची बसलेली आहे कुंडलिनी तिचं प्रोटोकॉल करणारा गणेश तिथे बसला असताना आपण अशा तऱ्हेची जी भाषा करतो कुंडलिनीला उचलायची, म्हणजे आपल्या आईबरोबरच काहीतरी घाणेरडा प्रकार आपण म्हणत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक हिंदुस्थानी आणि भारतीय माणसाला अशा घाणेरड्या गोष्टींची अत्यंत चीड आहे. आणि आपल्या देशातच अनेक लोक अशा गोष्टी करतात. आणि या तांत्रिकाने अशा घाणेरड्या गोष्टी करून आपल्या देशाला अगदी बरबाद करून टाकलंय. कोणताही मनुष्य जर आपल्या आईच्या पोटातून, उदरातून निघाला असेल आणि त्याची आई असली जगामध्ये आणि तिने पाहिलेलं असलं त्याला ही गोष्ट सहन होणार नाही. आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा घाणेरड्यापणाच्या गोष्टी करणारे आणि पवित्र्यापासून तुम्हाला दूर नेणारे हे जे साधु-संत आपले नुसते पैसे भरत बसलेले आहेत आणि कॅडलक च्या गाड्या घेऊन फिरताहेत त्यांना उचलून लगेच समुद्रात तरी घालावं किंवा परदेशी पाठवून द्यावं. त्यांचं इथे काहीही चालू नाही दिलं पाहिजे. पण आश्चर्याची गोष्ट आहे की अशा लोकांकडे हिंदुस्थानी लोक सुद्धा जातात. मी तर असं ऐकलं आहे की काही मिनिस्टर लोकं सुद्धा तिथे जातात. म्हणजे या लोकांना तुम्ही निवडून तरी कसे देता याचं मला आश्चर्य वाटतं. आपल्या देशामध्ये आई म्हणजे काय? हे जर आपल्याला समजू नाही लागलंय, हे जर आपण विसरलो तर मात्र काहीही या देशाचं रहाणार नाही. एवढं समजलं पाहिजे की आई ही अत्यंत पवित्र व्यक्ती असते. आणि आपल्या आयुष्यात तिने आपल्याला पावित्र्य दिलेले असतं. आणि तिच्याबद्दल जे लोक असे बोलतात, ते लोक किती घातक आणि आपल्या देशाला किती नाशक आहेत, हे ओळखून राहिलं पाहिजे. 

आता त्याच्यावरती जे चक्र आहे त्याला आम्ही नाभी चक्र असं म्हणतो. मणिपूर चक्र असं पण त्याचं नाव आहे. आणि या नाभी चक्रावरती लक्ष्मी-नारायणाचं स्थान आहे. लक्ष्मीनारायण हे धर्म स्थापना करतात. धर्माची आपल्यामध्ये स्थापना होते. आणि लक्ष्मीचे जे सूत्र आहे, जे आपल्याला माहिती आहे ते म्हणजे आपण असा विचार करतो की या माणसाकडे लक्ष्मी आहे म्हणजे तो श्रीमंत असला पाहिजे. असा आपला अर्थ लागतो. पण लक्ष्मी आणि पैशात महद अंतर आहे. पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. आणि लक्ष्मी म्हणजे पैसा नाही. एक अंग त्याचा पैसा जरी असला, त्याने समृद्धी जरी असली तरी लक्ष्मी स्वरूप वेगळं असतं. आता थोडक्यात मी लक्ष्मीबद्दल सांगते. कारण इतकी सगळी चक्र सांगायची म्हणजे , त्याला पुष्कळ लांबलचक  हे पाहिजे. तर आपण लक्ष्मीला पाहिलेलं आहे की  

एक हात असा असतो आणि एक हात असा असतो. आणि दोन हातात तिच्या कमळं असतात. म्हणजे जो मनुष्य लक्ष्मीपती असेल त्याचं हृदय कमळासारखं असायला पाहिजे. ते गुलाबी म्हणजे त्याच्यामध्ये ओलावा असला पाहिजे. प्रेम असलं पाहिजे. तसंच त्याच्या घरामध्ये कमळासारखं सौंदर्य असलं पाहिजे. त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या वागण्यात, कपड्यात, सगळ्यामध्ये कमळासारखं सौंदर्य असायला पाहिजे. जसा एक भुंगा सुद्धा कमळामध्ये जाऊन बसू शकतो. त्याचे सगळे काटे जरी बोचले तरी कमळ जसं त्याला आपलं आवरण घालून घेतं आणि रात्री त्याला झाकून आरामात झोपायला घालतं. तसे एखाद्या लक्ष्मीपतीने करायला पाहिजे. पण लक्ष्मीपती म्हटलं की नंबरी चिडका असतो. तेव्हा अशा माणसाला आपण लक्ष्मीपती म्हणण्यापेक्षा फक्त आपण पैसेवाला म्हटलं तर ते योग्य होणार आहे. असे लक्ष्मीपती आजकाल नाहीत. पण आमच्या काळी  म्हणजे आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो, तरुण होतो, त्यावेळेला आम्ही असे पुष्कळ लोक पाहिलेले आहेत. आता तुम्ही दुर्देवी आहात त्याबाबतीत तेव्हा तुम्हाला सगळे भाडोत्री लोकच दिसतात. आमच्या वेळेला आम्ही खरोखरच काही काही फार मोठी मंडळी पाहिली होती ज्यांना खरच आम्ही लक्ष्मीपती म्हणू शकत होतो. आता दुसऱ्या हातामध्ये हे दान आहे. अशा माणसाच्या हातून अव्याहत दान चाललं पाहिजे. आणि या हातातून आश्रय आहे. जसे आश्रयाला लोक आले तर ते आश्रयाला राहिले पाहिजेत. त्याला लक्ष्मीपती असं म्हटलं पाहिजे. तसंच लक्ष्मी ही स्वतः स्त्री स्वरूप, माता स्वरूप आहे. त्या माणसाचं स्वरूप माता स्वरूप असायला पाहिजे. असं आपल्याकडे अनेक जन्मांपूर्वी, अनंत कालापासून आपण अशी लक्ष्मीची स्थापना या देशामध्ये केलेली आहे. केवढा आपला महान देश आहे. अशी कल्पना ह्या भौतिकवादी लोकांना येणार आहे का? हे तर भोगी लोक आहेत. त्यांच्या डोक्यात येणार आहे का? एकेका पैशासाठी हे दुसऱ्यांचा गळा कापणारे लोक आहेत. त्यांच्या डोक्यात काही घुसणार आहे. हा फक्त आपल्याला एक वारसा मिळालेला आहे. तो वारसा आपण सोडायचा नाही. त्याच्या मध्ये  गर्वाने  राहिले पाहिजे. जरी आपण गरीब असलो तरी हृदयाने आपण श्रीमंत आहोत हे लक्षात असायला पाहिजे. मनुष्य गरिबी आणि श्रीमंतीने श्रीमंत होत नाही. हृदयाने श्रीमंत होतो. आता आम्हाला असं आहे की आमच्याकडे खूप श्रीमंती होती, वडिलांकडे, आणि आमचे यजमानसुद्धा फार श्रीमंत आहेत. पण आम्हाला जर तुम्ही सांगाल तर आम्ही कुठेही झोपडीत झोपायला जाऊ अगदी आरामात, नाहीतर आम्हाला रस्त्यावर म्हणता तर आम्ही तेथेदेखील झोपू शकू. कारण आम्ही अगदी मस्त आहोत. आम्हाला कशाची गरज नाही. असाच मनुष्य ज्याला कशाचीही गरज नाही तोच खरा बादशहा आहे. बाकी ज्याला गरज आहे, दुसर्याकडे इर्षेने बघतो त्या माणसाला आपण बादशहा म्हणू शकत नाही.

 तेव्हा हे लक्ष्मीचं आपल्या नाभीवरती एक फार मोठ दैवत आहे. या लक्ष्मीला आपण जपलं पाहिजे. हे सौष्ठव आपल्यामध्ये सांभाळालं पाहिजे. आणि त्या सौष्ठवाला आपल्या देशात अजून लोक जपून आहेत. अजून त्यांना त्याची माहिती आहे की पैसाच म्हणजे सगळे काही नाही. त्याच्याही पलीकडे धर्म ही फार मोठी गोष्ट आहे. आणि धार्मिकतेने रहाणे म्हणजे देवळात जाऊन पोपटपंची करणं, असं मी म्हणत नाही. धार्मिकतेचा जो अर्थ आहे तो आपल्याला अनेक गुरूंनी सांगितलेला आहे. आणि अशा आपल्या या संतांच्या भूमीमध्ये अनेक गुरू आलेत आणि त्यांनी त्याबद्दल पुष्कळ चर्चा केली, की धर्म काय? या गुरूंचे जितके उपकार मानावे तितके थोडे आहेत पण आपण त्यांची कोणतीही गोष्ट ऐकत नाही. त्यापैकी दहा मुख्य गुरू झाले आणि ते अनेकदा या संसारात आले आहेत. पैकी मोहम्मद साहेबसुद्धा दत्तात्रेयाचे साक्षात अवतरण आहे. मोहम्मद साहेबांनंतरसुद्धा जे अवतरण झाले ते नानकसाहेबसुद्धा त्यांचे साक्षात अवतरण आहे. जनक सुद्धा त्यांचे अवतरण आहे. तसेच आदिनाथ वरगैरे जे महावीरांचे आदि झालेले आहेत ते सुद्धा ह्यांचेच अवतरण आहे. 

त्यानंतर अगदी आपण फारच नशीबवान आहोत. विशेषत: अहमदनगरचे लोक की आपले इथे साईनाथ जे इथं शिर्डीला येऊन राहिले ते सुद्धा साक्षात दत्ताचेच अवतार आहेत. एकच तत्त्व जे आहे गुरूचं ते अनेकदा संसारात येतं आणि त्यांनी ज्या अनेक गोष्टी शिकवल्या त्या धर्माच्या संतुलनाबद्दल. त्यांनी रियलाझेशन वरगैरे देण्याच्या गोष्टी नाही केल्या. आत्मज्ञान देण्याच्या फारशा गोष्टी केलेल्या नाहीत. 

पण जी मुख्य गोष्ट त्यांनी सांगितली आश्चर्याची सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की दारू प्यायची नाही.ते सगळे एकतर वेडे होतील किंवा आजकालचे जे लोक दारूच्या विरूद्ध लिहितात ते तरी वेडे असतील. तर दारू प्यायची नाही त्याला कारण म्हणजे फार सायंटिफिक आहे. परवा मी केमिस्ट्रीच्या प्रोफेसरना सांगत होते की किती सायंटिफिक रिझन आहे की ज्याने दारू प्यायची नाही. दारू आणि कॅन्सर एकच    तऱ्हेचा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे ओएच आयन असतं त्या ओएच आयनची अशी स्थिती होऊन जाते, दारू आणि कॅन्सर दोन्हीमध्ये एकच स्थिती होऊन जाते. तुमच्यामध्ये जी काही गरमी होते किंवा जी हीट, काम केल्यामुळे जी हीट निर्माण होते ती तुमच्या रक्तवाहिन्यातून वाहू शकत नाही. कारण त्याच्यातलं जे पाणी आहे, त्याचं जे ओएच आयन आहे ते शोषण करू शकत नाही. कारण त्याची पद्धती बदलते. आणि त्यामुळे संबंध गरमी तुमच्या लिव्हरमध्ये, पोटामध्ये तन्हेत्हेच्या गरम्या एकत्र होतात. आता मी सांगायचं म्हणजे कॅन्सर हा सहजयोगानेच ठीक होऊ शकतो, आणखीन कशाने होऊ शकत नाही. आणि हे आम्ही केलेले आहे. 

आता लंडनला आम्ही एका कॅन्सरच्या पेशंटला बरं केलेले आहे. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या तिथल्या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांनी आता तिथे आमचं मेडिकल कॉलेज वगैरे बरंचसं काढलेले आहे की तुम्ही आता इथे बोला वगैरे. आता बघू गेल्यावर काय होईल ते. तर त्याच्यामध्ये त्या बाईला इतकी हीट होती अंगामध्ये. सारखी हीट निघायला लागली. आणि इतकी लंडनला थंडी पडत असतांनासुद्धा तिने सगळी दारं उघडी टाकली आणि ती म्हणे की माझ्या अंगात तर इतकी हीट निघती आहे आणि सगळ्यांना वाटायला लागले की हिटर आहे. तसंच दारुड्या माणसाचं होतं. दारूडा जो असतो, जो मनुष्य दारू पितो, त्याच्यासुद्धा लिव्हरमध्ये हीट जमा होते, मग त्याच्या किडनीमध्ये हीट जमा होते. मग त्याच्या संबंध रक्तवाहिन्या ज्या असतात त्या हार्डन होऊन जातात. आता त्यांनी सांगितलं की तुम्ही दारू पिऊ नका. आता हे मी असं म्हटलं की तुम्ही दारू पिऊ नका तर तुम्ही मुळीच ऐकणार नाही. उलट कोणी इथं येणार नाही. परवा मी जरा म्हटलं की तुम्ही शपथ घ्या की तुम्ही दारू पिणार नाही तर अर्धे लोक उठूनच गेले. अहो म्हटलं मी म्हटलं तुम्ही नुसती शपथ घ्या. मी काही म्हटलं नाही की त्याच्यासाठी तुम्हाला काही पेमेंट करावं लागेल. पण तेवढं म्हटल्याबरोबर अ्धे लोकं उठून गेले. आता दारू इतकी नुकसानाची वस्तू आहे की कुणी आई म्हणेल का की तुम्ही आपलं नुकसान करून घ्या. ‘ये बाई मला मार’ अशातली स्थिती आहे तुमची. ते आपले रस्त्याने ठीक चाललेले आहेत. उगीचच कशाला, म्हणजे पैसे जातातच आणि त्याशिवाय झिंगलेला मनुष्य तुम्ही पाहिलेला नाही का. आता रस्त्यानेच येतांना आम्ही तीन अॅक्सीडेंट पाहिले. त्यातील एक मनुष्य दारू पिऊन रस्त्यात असा लोळत पडलेला होता. आणि हे म्हणजे अगदी रोज आपण बघतो आहे. तरीसुद्धा लोकांनी मला सांगितलं की हिंदुस्थानात आता दारू वाढलेली आहे. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. तेव्हा ही जी आपली फार मोठी दुश्मन आहे अशी जी आपली शत्रू आहे तिला आपण आपल्या डोक्यावर बसवून काय शहाणपण दाखवतो आहे मला समजत नाही. पण तरीही सहजयोगात आम्ही कुणाला म्हणत नाही की तुम्ही दारू सोडा. जसं आता चव्हाण साहेब म्हणाले की, ‘माताजी, काही सोडायला सांगत नाहीत.’ ही गोष्ट खरी आहे. आम्ही काही सांगत नाही. तुम्ही आज सोडा. किंवा आत्ता सोडा. पण पार झाल्यावर तुम्ही सोडणार. आता इथे जी मंडळी आली आहेत परदेशातून अशी तीनशे मंडळी आम्ही लंडनला फार सुंदर तयार केलेली आहेत. त्याशिवाय हजारो लोकांनी रियलायझेशन घेतलेले आहे. पण तीनशे मंडळी फार छान आहेत. त्यातले बहुतेक दारूडे होते, ड्रग्ज घेत असत. पण ह्यांचं सगळ्यांचं सुटलं. कसं सुटलं? म्हणजे असं आहे जेव्हा आत्म्याची ओळख झाली, आत्म्यात तसे स्पंदन सुरु झाले, जेव्हा आतला आनंद येऊ लागला तेव्हा मनुष्याला हे सगळं सुचतच नाही. आपोआप सगळं सुटतं. हा आनंद इतका आगळा आहे मग त्या आनंदापुढे काही सुचतच नाही. म्हणजे अशी दारू प्या जी उतरतच नाही मुळी आणि ती दारू प्यायल्यावर बाकी सारं काही विसरून जातं.

त्यानंतर हे जे काही लक्ष्मीतत्त्व आहे, त्या लक्ष्मीतत्त्वामुळे जेव्हा हे जागृत होतं तेव्हा एक मोठं कार्य घडतं आणि ते असं की तुमची सांपत्तिक स्थिती सुद्धा सुधारते. आश्चर्याची गोष्ट आहे. लोकांना आश्चर्य वाटेल की माताजी हे काय सांगताहेत. आमचं इकॉनॉमिक्स एकीकडे गेलं आणि सांपत्तिक स्थिती कशी सुधारेल. तर असं आहे की लक्ष्मीतत्त्वाने अशी सांगड बसते की त्या सांगडीमुळे सांपत्तिक स्थिती फार सुधारते. आता आमचे जसे हे विद्यार्थी आहेत तिथून आलेले. तर यांना मी विचारलं, ह्यांच्याजवळ पूर्वी काहीही नव्हतं अगदी भणंग भिकाऱ्यासारखे रहात होते. आणि एवढे श्रीमंत, ह्यांच्याजवळ एवढे पैसे, सगळं काही. ह्यांना काही रहाण्याची सोय नव्हती, काही नाही. मी म्हटलं की, ‘ही काय तुमची रहाणी आहे. असं कसं रहाता तुम्ही?’ त्याच्यानंतर मग हे माझ्याकडे आले आणि त्यांना पार झाल्यानंतर लगेच ह्यांची घरं व्यवस्थित, त्यांची रहाणी व्यवस्थित, ह्यांच्याकडे रेडिओग्राम, कधी काही, कधी काही म्हटलं हे कुठून आणायला लागले. तुमच्याजवळ पूर्वी खायलासुद्धा पैसे नसायचे. म्हणे आता दारू बंद झाली ना! तिकडे जातात अर्धे पैसे. आता महागाई भत्ता कशाला? गुत्त्यात जायला. तुम्हाला काही खायला मिळत नाही अशातली गोष्ट नाही. पण त्याच्यामध्ये काही हरकत नाही तुम्ही गुत्त्यात जरी गेले, पण त्यानं होतं काय? तुमची लक्ष्मी पडते. इकडून बाटली आली की तिकडून लक्ष्मीबाई गेल्या. कोणत्याही दारुड्या  माणसाचे आपण पुतळे का उभे करत नाही कारण त्यांची स्थितीच नसते पुतळे उभे करण्यासारखी. आणि म्हणून दारू, सिगरेट या सर्व गोष्टींना ह्या लोकांनी मना केले होते. आणि हे फार महत्त्वाचे आहे. ह्याचे आपल्याला महत्त्व समजत नाही. फारच महत्त्वाचे आहे हे माणसाला. कारण ते चेतनेच्या विरूद्ध जातं. ज्या चेतनेने परमेश्वराला जाणायचे आहे त्या चेतनेच्या विरूद्ध जी  गोष्ट जाते. ती किती वाईट असेल आणि किती हानीकारक असेल हे लक्षात आणलं पाहिजे. 

त्याच्या वरती जे चक्र आहे त्याला हृदय चक्र असे म्हणतात. हृदय चक्र. कारण ते हृदयाच्या मध्ये इथे, फुफ्फुसाच्या मधोमध असते. आणखीन हे फारच महत्त्वाचे आहे. कारण या चक्रावर जगदंबेचे स्थान आहे. मनुष्याला जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा तो आपल्या आईला आठवतो. जर त्याच्या लक्षात ही गोष्ट आली की तुझी आई ही जगन्माता आहे. अत्यंत शक्तीशालीनी आहे. वाट्टेल ते जरी झालं तरी ती तुझा बचाव करेल. आपण आता जगदंबेविषयी पुष्कळ ऐकलेले आहे. केवढ्या   राक्षसांना मारून टाकले. काय काय त्यांनी केलेले आहे. तसंच एकदा फार रागावल्या होत्या आणि त्यांनीच तांडव नृत्य सुरू केल्याबरोबर शंकराला समजेना की आता काय होणार? आई बिघडली तर काय होणार? स्वत:च तिच्या मुलाला तिच्या पायाखाली घातल्याबरोबर अगदी अलगद आपला पाय ठेऊन एवढी मोठी जीभ त्यांनी काढलेली आहे असं आपण वाचलेले आहे. आणि सगळी गोष्ट खरी आहे. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्या आयुष्यात येतं म्हणजे जेव्हा मनुष्य ज्याला सेन्स ऑफ इनसिक्युरिटी म्हणतात किंवा जेव्हा त्याला असुरक्षित असं वाटायला लागतं किंवा आता माझ्यावरती काहीतरी संकट येणार आहे, काही तरी होणार आहे आणि  त्यावेळेला आपलं हृदय धडधड होऊ लागतं. हृदय धडधड होण्याचे हे कारण आहे की आपले हे चक्र जे आहे ते भ्रमित होते. तिथून ती शक्ती नष्ट होते किंवा लुप्त पावते. ज्या माणसाला विशेष करून काहीतरी भूतबाधा वगैरे अशी जी भीती वाटते की आम्हाला भूत लागले आहे, आम्ही बाहेर गेलो तर आम्हाला काहीतरी धरलंय वगैरे असे वाटत असते त्यांचीसुद्धा हीच स्थिती. जेव्हा हे चक्र रक्षित होते, जेव्हा हे चक्र आलोकित होते तेव्हा माणसाची रक्षा वाढते. 

आता पुष्कळ बायकांना ब्रेस्ट कॅन्सरचा आजार असतो. आता ते लोकांना असे वाटते की ब्रेस्ट कॅन्सरचा आजार म्हणजे काहीतरी दुसऱ्या कारणामुळे झालेला आहे. पण अगदी सरळ गोष्ट आहे की जर त्या बाईला असुरक्षित वाटत असेल तर तिला ब्रेस्ट कॅन्सरचा आजार होईल. तसंच आपल्याला पुष्कळांना श्वासाचा आजार असतो. आम्ही अनेक श्वासाचे रोग काढलेले आहेत आणि बरे केलेले आहेत. आपले काश्मिरचे जे गव्हर्नर, सहाय साहेब होते. भगवान सहाय साहेब, त्यांना पंचवीस वर्षाचा श्वासाचा रोग होता. तो ही पाच मिनिटात आम्ही बरा केला. म्हणजे जर तुम्ही हे चक्र व्हायब्रेशन्स देऊन किंवा चैतन्य लहरी देऊन बरोबर स्थित केलं तर अगदी मनुष्याला नेहमीसाठी बरं वाटतं कारण त्याचं ते चक्र ठीक झाल्याबरोबर जगदंबा जागृत होऊन त्याच्यामध्ये जी असुरक्षितपणाची भावना आहे ती नष्ट होऊन तो अगदी सुखासमाधानाने राहू लागतो. हृदय चक्राच्या वर जे चक्र आहे हे विशुद्धी चक्र. हे फारच महत्त्वपूर्ण आहे. कारण हे चक्र, या चक्रामुळे मनुष्य जनावरापासून मानव झाला आहे. 

  त्याने आपली मान खालून वर उचलली आहे. त्याठिकाणीच तो मानव झालेला आहे. आणि ही जी मान आहे, त्या मानेला कोणाही समोर झुकवायचे नसते. असत्याच्या पुढे तर मुळीच झुकवायचे नसते. पण साक्षात परमेश्वरच असला किंवा साक्षात खरोखर असा मनुष्य असला की जो वंदनीय आहे त्याच्यासमोरच ही मान झुकवली पाहिजे. आणि त्यामुळे आपण उठल्यासुठल्या ज्याच्या त्याच्या पायावर येतो. मग ते भूत असे ना, ते ढोर असे ना सगळ्यांच्या पायाखाली येतो. आपले हात घालायची काही गरज नाही. आमच्याही पायावर येऊ नये. जोपर्यंत तुम्हाला काही प्रचिती येत नाही तोपर्यंत मुळीच तुम्ही पायावर येऊ नये. आणि याबद्दल मी दोन अनुभव पाहिले.

 आम्ही लंडनला असतांना लोकांना वाटायचे की माताजींच्या पायावर काय यायचे ? काम सगळे आमचे पाय करतात तर करू तरी काय? तर त्यांना हा राग की माताजींच्या पायावर का यायचे आम्ही. म्हणजे पार झाल्यावरसुद्धा. आणखीन इथं मी म्हटलं परवा गावात की आता नको दर्शन फार झालं. तर सगळ्यांना वाईट वाटलं की माताजींनी  दर्शन  सुद्धा आता आम्हाला दिलेले नाही. म्हणजे अशी दोन टोकं आहेत जगामध्ये. सांगायचे असे आहे की सुज्ञपणाने हे समजले पाहिजे की मानव हा अत्यंत उच्च कोटीतला एक विशेष बनवलेला प्राणी आहे आणि त्याने प्रत्येक माणसासमोर आपली मान वाकवायची नाही. तसेच हे विराटाचे स्थान आहे. तर विराट म्हणजे सबंध जे आहे. असाच परमेश्वर सबंध आहे आपल्यासारखाच. आणि त्याच्यातील आपण एक एक लहान लहान पेशी आहोत. सेल्स आहोत. ह्या ज्या सेल्स आपण आहोत अगदी परमेश्वरासारखेच बनवलेले आहोत. जेव्हा ह्या जागृत होतात तेव्हा त्या विराटाला जाणून घेतात. हे असं विराट स्वरूप हे इथून जाणलं जातं. मग लोक जे तंबाखू खातात, आता नगरला तर मला तंबाखू इतकी पिकते की नाही माहीत नाही. पण प्रत्येकाच्या गळ्यात तंबाखू दिसते मला. तर ही तंबाखू कुठून आली नगर जिल्ह्यात, हे काही मला समजत नाही. पण इतकंच नाही तर बायकासुद्धा ते काहीतरी काळबिळे लावत असतात. ते काय असं करतात? तशा तऱ्हेची तंबाखू कुठून आली ते मला ठाऊक नाही. पण त्या तंबाखू मुळे हे चक्र मात्र असं जाम बसलेलं आहे की त्यांच्या मुलांना खोकले, त्यांच्या मुलांच्या मुलांना खोकले आणि त्यांनाही सारखा त्रास, श्वास लागलेला अशी सर्व स्थिती या तंबाखुमुळे होते. पण सांगून कोणी ऐकत नाही. म्हटलं तंबाखू सोडा. तर सोडवत नाही. फक्त सहजयोगात आल्यावर मात्र या तंबाखूला सोडावं लागतं. आणि ती सुटते कशी वगैरे असे बरेच मजेदार अनुभव लोकांनी सांगितले. पैकी एक गृहस्थ ते सहजयोगात आल्यावर फार कार्य करीत असत आणि फार आम्हाला प्रिय होते. सगळे काही असतांना सुद्धा त्यांना तंबाखू पूर्णपणे सोडता येईना. कधीकधी हुक्की यायची त्यांना. शेवटी एकदा मी आले असतांनासुद्धा त्यांनी तंबाखू घेतली होती. माझ्या लक्षात आलं. त्यांना वाटलं की माझ्या काही लक्षात आलं नसेल. त्याच्यानंतर मी उगीचच कानाडोळा केला. म्हटलं बघू या आता कसं काय होतय ते.

तर त्याच्यानंतर ते मला सांगायला लागले की, ‘अहो, माझं तोंड, माताजी, एकदम हनुमानासारखं होतय कधीकधी. असं वाटतं की जसं फुगायला लागलं. हे कसं काय? हे सहजयोगाने मी काय हनुमान होतोय की काय मला समजत नाही.’ मी म्हटलं हे बघा तुम्ही तंबाखू घेता की नाही?’ ‘हो माताजी, आम्ही घेतो’ आणि कानाला हात लावला. तर आता माझ्यासमोर वचन द्या. तुमची सोडवते मी. जरासा प्रयत्न करा. कारण आता पार झाल्यामुळे त्याची विशेष काही गरज वाटत नाही. म्हणे ‘आता सुटलंच आहे.’ म्हटलं ‘जे आता थोडसंच आहे ते ही सोडा म्हणजे हे हनुमानपणा जाईल.’ आणि त्याच्यानंतर त्यांनी ती सोडून टाकली. असे सहजयोगाने फार सहज इलाज होतात. आणि अगदी मजेदार इलाज होत असतात आणि सगळ्यांनी ते अगदी मजेने बघावे असे इलाज असतात.

 त्याच्यानंतर हे जे विशुद्धी चक्र आहे, त्याचे महत्व सांगावे तेवढे कमी. कारण सोळा हजार नाड्या त्या चक्रावर अवलंबून आहेत. तेव्हा तुम्ही हे लक्षात आणलं पाहिजे की तुम्ही सहज जी दोन आण्याची सिगरेट घेऊन पिता ते त्या तुमच्या सोळा हजार नाड्यांना तुम्ही नष्ट करत आहात. आणि त्या किती मुश्किलीने बांधल्या गेल्या आणि त्या कुठून कुठून, कशा कशा धावतात वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला जराशी सुद्धा माहिती नाही. आता लंडनला इथपर्यंत झालेलं आहे की डॉक्टर सांगतात. इतकंच नाही तर प्रत्येक सिगरेट वर लिहिलेलं असतं की याने तुमचा प्राण जाईल, याने तुम्हाला कॅन्सर होईल तरीसुद्धा लोक घेतात. अहो बसा, तुम्ही काय सिगरेट पिता का निघाले कशाला? बसा बसा.  असं मधूनच उठून जाऊ नका. सिगरेट प्यालेले लोक निघाले. अहो मी काही आता सोडायला म्हणत नाही. ( माताजी हसतात). अगदी बरोबर मला कळतं कोण सिगरेट …तर त्या सिगरेटचा एवढा कॅन्सर झाला तरी लोकांना सुटत नाही. आणि मला हे समजतं कारण सवय अशी गोष्ट आहे की सुटत नाही. फक्त त्याला सहृदयतेनं समजून घेतलं पाहिजे. आणि आपले व्हायब्रेशन्स ठीक केल्यावरती आपोआप सुटेल. ती अगदी सहज सुटते आणि ह्या सगळ्या सवयी सुटून मनुष्य अत्यंत अशा वातावरणात येतो की त्याला आपण म्हणू शकू की परमेश्वराच्या साम्राज्यात येतो. 

त्याच्यावरचे जे स्थान आहे ते आज्ञा चक्राचं. आता मी आपल्याला सांगितलच आहे की सर्व धर्म जे आहे ते एकाच झाडावरची फुलं आहेत. आणि त्याबद्दल आपण उगीचच वाद घालत बसतो की ‘हे माझे फूल आहे, ते तुझे फूल आहे.’ एकाच शक्तीवर पोसलेली. अनेक वेळेला वेगवेगळ्या लोकांनी या संसारात येऊन हे कार्य केले आहे. जसं मी आपल्याला सांगितलं आहे की दहा गुरू आले होते. तसंच हे चक्र जे डोक्यावरती आहे, हे जे आपण इथे कुंकू जिथे आम्ही लावतो आहे, ते जे आहे ते आज्ञा चक्र. त्याच्या वरती महाविष्णूचे स्थान आहे. आता हा महाविष्णू कोण आहे ? ते जर देवीमाहात्म्य आपण कोणी वाचलं असेल तर कळेल. आणि हे म्हणजे ह्याचे जे तत्व आहे ते गणेशाचे तत्व आहे. म्हणजे जर समजा एखाद्या रुपयाची एक बाजू गणेश असेल तर दुसर्या बाजूला महाविष्णूचं स्थान आहे. आणि त्याला महाविष्णूने अवतरण एकदाच घेतलेले आहे आणि ते ख्रिस्ताचे अवतरण आहे. म्हणजे ख्रिस्त हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला महाविष्णूच आहे. आणि त्याचं जर तुम्ही महाविष्णूचं वाचाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तंतोतंत त्याचं सगळे काही त्या महाविष्णूबरोबर अगदी तसच्या तसं वर्णन केलेलं आहे. आणि ख्रिस्त, ह्याची आई मेरी जी होती, ती स्वयं साक्षात राधाच होती. त्या महाविष्णूच्या वर्णनात आहे की त्या राधेने स्वत:च आपला पुत्र तयार केला होता आणि वडील त्याचे विष्णू होते म्हणून त्याला ख्रिस्त म्हणतात. हे कुणालाही तिथे समजलं नाही की कृष्णाला ख्रिस्त का म्हणतात? कारण कृषी वरून कृष्ण शब्द झाला. कृष्णाने कृषी केली आणि त्याचं फळ हे ख्रिस्त आहे. आणि त्याच्यात हे वर्णन आहे कृष्णाने आपल्या मुलाला आपला सोळावा अधिकार दिलेला आहे. तसंच तो सर्व जगाचा आधार होईल. लोकांना हे दाखविल जे कृष्णाने सांगितलेलं होतं ‘नैनं छिन्दंति शस्त्राणि | नैनं दहती पावक: । ‘ तर हे दाखवेल की ही जी शक्ती आहे ती कशाही तऱहेने नष्ट होऊ शकत नाही. आणि त्याचं उद्धरण होईल. आणि ते आपल्याला त्याच्या पुनरुत्थानात दिसलेलं आहे. तेव्हा ही सगळी मंडळी एकत्र, नात्यात असताना आपण उगीचच मध्ये भांडाभांडी करतो कारण आपल्याला त्यांच नातं जुळलेलं नाही. हे रियलायझेशन नंतर सगळ्यांना कळतं. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीचा कसा उपयोग करायचा ते समजून घेतो. त्याच्या त्या एकंदर मदतीमुळे आपल्याला सुद्धा ती सर्वव्यापी शक्ती इतकी मदत करते की आपणसुद्धा लहान लहान क्षुद्र जे काही आजपर्यंत शिकलेलो आहोत, ज्या क्षुद्र कल्पना की आम्ही हिंदू, ब्राह्मण, ख्रिश्चन वरगैरे वरगैरे, अशा ज्या आपल्या क्षुद्र भावना आहेत त्या मिटवून आपण जागतिक मानव होऊन जातो.

त्याच्यावर जे चक्र आहे, ते सहस्राराचं चक्र आहे. हे चक्र जेव्हा कुंडलिनी छेदते, जेव्हा ब्रह्मरंध्रातून ही कुंडलिनी छेदून जाते तेव्हाच मनुष्य पार झाला असे म्हणतात. त्याला ख्रिस्ताने बाप्तीझम म्हटलेले आहे, महम्मदाने पीर म्हणून म्हटलेले आहे. सगळ्या धर्मांमधे सांगितलेले आहे की तुमचा पुनर्जन्म झाला म्हणून. तुमचा द्विज झाला पाहिजे. आता या बाबतीतही फार गोंधळ झाला आहे. द्विज म्हणजे जन्मत नाही. त्याचा पुनर्जन्म होईल तेव्हाच त्याला द्विज म्हटले पाहिजे. आता आपल्याकडे ब्राह्मण म्हटला की कुणी आपण नोकरीवरही ठेवू शकतो. वाट्टेल ते करू शकतो. आता ब्राह्मणत्त्व काय आहे ते मात्र त्यांच्यात नाही. जे जन्मतात ते ब्राह्मण नाही. ज्यांचा पुनर्जन्म होतो तेच खरे ब्राह्मण आहेत. आणि या दृष्टीने पाहिले तर आपण चोखामेळांना पण ब्राह्मण म्हणू शकतो. आणि पुष्कळ ब्राह्मणांना शुद्र म्हणू शकतो. अशी स्थिती आहे. आता परवा आम्ही पुण्याला प्रोग्रामला होतो तर तिथे एका ब्राह्मण सभेमध्ये आमचा प्रोग्राम होता. त्यांना लगेच कळलं की माताजी काही ब्राह्मण नाही. तर त्यांनी सांगितलं की, ‘माताजींना आम्ही काही प्रोग्राम करू देणार नाही.’ तर त्यांच ते बघा. ‘माताजींच्या बद्दल सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जर असं केलं तर पेपरात येईल की तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणेतर आहात. हा काहीतरी वाद काढला तर तुमचीच बदनामी होईल.’ बर तर म्हणे, आता काय केल्यासरशी होऊ दे. आता काय करता. आता पेपरातच दिल्यामुळे म्हणून. कसंतरी हे त्यांनी मान्य केल्यावर. मला काही या लोकांनी सांगितले नाही. म्हणजे आतल्या गोष्टी हे काही सांगत नाही. मी जाऊन उभी राहिले आणि मी आपलं सहज बोलता बोलता म्हटलं की ‘अहो, तुमच्यात कोणी ब्राह्मण असले तर माझ्यासमोर या. पट्टीचे असायलाच पाहिजे.’ तर तीन-चार येऊन खरेच उभे राहिले. म्हणे ‘आम्ही आहोत ब्राह्मण.’ म्हटलं ‘असं का. मग आता माझ्याकडे असे हात करा.’ तर कापायला लागले. म्हटलं ‘हे काय होतय तुमचे?’ म्हणे ‘माताजी, तुम्ही शक्ती आहात म्हणून आम्ही हलतोय.’ म्हटलं ‘अहो, आम्ही शक्ती आहोत कबूल आहे मला. पण तुम्ही का हलता. बाकी कुणी हलत नाही. पण हे दोघं हलतायेत.’ म्हटलं ‘विचारा कुठून आले?’ ती पागलखान्यातून, ठाण्याहून आणलेली दोन माणसे होती. म्हटलं हे बघा. तेव्हा स्वत: बद्दल नसता अभिमान करून घेणं. आम्ही हे, आम्ही ते असं म्हणून होत नाही. व्हायला पाहिजे. हे घटित झालं पाहिजे. आणि असे जे खोटे लोक असतात त्यांनी नेहमी संतांना छळून काढले आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वरांना किती या लोकांनी छळलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे शिर्डीला सुद्धा साईनाथांना या लोकांनी छळलेलं आहे. कुठेही सोडलेलं नाही.

 इतकेच नाही पण शंकराचार्यांना, आदि शंकराचार्य जेव्हाआपली आई वारली म्हणून घरी गेले आणि त्यांनी सांगितले की तिचा दाहसंस्कार मला करायचा आहे. त्यांनी सांगितले की, ‘तू करू शकत नाही. तू संन्यासी आहे.’ आणि कोणीही त्यांच्या त्या दाहसंस्काराला आले नाही. तेव्हा कालडी गावामध्ये त्यांनी स्वत:चेच झाड वाढवून घेतलं आणि केळाच्या झाडाला आग लावून त्यांनी आपल्या आईचा दाहसंस्कार केला आणि शापित केलं सबंध केरळला, की तुम्ही लोक आपल्या घरासमोर दाहसंस्कार कराल किंवा इथेच आपली प्रेत गाडाल. आजसुद्धा तिथे तसंच होत आहे. अशा रीतीने त्या सर्व अनाधिकार लोकांनी सर्व संत साधुंचा फार अपमान केला आहे. आपल्याच देशात नाही, प्रत्येक देशात हे झाले आहे. महम्मद साहेबांच्या वेळेला देखील तुम्ही जर पाहिलं तर महम्मद साहेबांना इतका त्रास दिलेला आहे आणि त्यांचा इतका छळ केलेला आहे की त्याचं जर वर्णन केलं की वाटतं की ज्ञानेश्वरांचा इतका छळ नाही केला जितका त्या महम्मद साहेबांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा झालेला आहे. म्हणजे सगळ्यांना गारद करून टाकलं. हे असं संतांना छळणारे लोक आजसुद्धा सगळे अधिकार पदावर बसून ‘आम्ही फार धर्मात्मे, आम्ही फार दंडे संन्यासी, आम्ही फार बंडे संन्यासी आणि आम्ही भोंदू संन्यासी’ बनून फिरत आहेत. अशा लोकांना मुळीच भीक घालू नये.

आमच्या सहजयोगामध्ये फार मोठी क्रांती घडतेय आणि ती म्हणजे धर्माचे खरे स्वरूप उभं झाल्यामुळे, धर्म पूर्णपणे स्थापन झाल्यामुळे त्यांच्या लक्षात हे येतंय की हे फालतूचे जे पंडवे बसून आपल्याला नुसते लुटत असतात. त्यांना यापुढे आम्ही काहीही भीक घालणार नाही. परंपरा म्हणजे मुर्ख बनण्याची परंपरा, काही कामाची नाही. ज्या परंपरेने मनुष्य सुज्ञ बनत जातो आणि वरच्या पातळीवर येत जातो आणि खरोखरच अध्यात्मामध्ये ज्याला आलोकित होता येतं तीच खरी परंपरा मानली गेली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजपर्यंत कोणत्याही संताला,  कोणत्याही संताला ह्या लोकांनी जिऊ दिले नाही. सर्व सामान्य माणसांनी जरी त्यांना उचलून धरलं, ख्रिस्ताला सुद्धा त्यांनी क्रुसावर धरलं. सर्वसामान्य माणसांनी जरी त्यांची ओळख करून घेतली तरी सुद्धा या अशा लोकांनी त्यांना कधीही मान्य केलं नाही. आमच्यावरही पुष्कळ लोकांचा राग आहे. पण आम्ही जरा दुसऱ्याच पद्धतीत आहोत. तेव्हा आमच्यावर काही चालणार नाही त्यांचं. परवा असच झालं. एकाच्या प्रोग्रामला एक गृहस्थ एका बाईला घेऊन आले. तिला मिरगीचा रोग येत होता. असे काही रोग असले की मी सांगते की त्यांना जरा मला विचारून आणत जा. माझ्याबरोबर भुताटकी लोक असतात ते हलू लागतात. मिरग्यावाल्यांना असे झटके येतात. मी म्हटलं की मला विचारल्याशिवाय तुम्ही आणत नका जाऊ. तर तिला परत मिरगीचा झटका आला. आल्यावर मी म्हटलं की तुम्ही कशाला घेऊन आला मला न सांगता. मला सांगितलं असतं तर मी लक्ष ठेवलं असतं. आता आला की नाही तिला मिरगीचा झटका! आणि बोलताना व्यत्यय आला. तर उठून आपलं राजकारण सुरू केलं त्यांनी की ‘अहो, आम्ही असे ब्राह्मण आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तिथले पुजारी आहोत. तुम्ही संत साधुंनी तर सेवाच केली पाहिजे. आणि काय असंच केलं पाहिजे.’ म्हटलं, ‘असं का? तुमचे जोडेही खाल्ले पाहिजे. म्हटलं चालते व्हा इथून.’ तरीही जायला तयार नव्हते. म्हटलं, ‘खबरदार परत तुम्ही इथं आलात तर. प्रत्येक वेळेला संतांवर एवढी जबरदस्ती झाली. आता एकही आम्ही चालू देणार नाही. झालं तेवढं फार झालं.’ तेव्हा मग ते उठून निघून गेले. अशा रीतीने म्हणजे या लोकांनी इतकच नाही छळलं तर वरून अरेरावी. संतांना छळलंच पाहिजे. आम्ही दोन थोबाडात दिल्या तर दहा थोबाड्यात त्यांनी खाल्ल्याच पाहिजे. कारण आम्ही फार शहाणे, धर्मात्मा लोकं. अशा रीतीने संतांवर सुद्धा आम्ही इतका अन्याय केला आहे, इतका अन्याय केला पण तरी सर्वसाधारण जनता हे बघत राहिली. त्यांनी विरोधही केला त्याबद्दल त्यांचा छळही झाला आहे. तरी सर्वसामान्य जनतेने मात्र नेहमी संतांना ओळखलंय आणि संतांची पूजा केली आहे. आणि म्हणूनच आमचं कार्य सर्व आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठीच आहे. 

नंतर जे वरचे, जे सहस्राराचे चक्र आहे, त्याच्यामध्ये एक हजार पाकळ्या आहेत. तर डॉक्टर लोकांचे म्हणणे आहे की नाही ९९८ नाड्या आहेत. दोन कमी एक हजाराला. म्हटलं ९९८ असोत नाहीतर हजार असोत तुमच्या बापाचा काय जातंय त्याच्यात हे मला समजत नाही. याच्यावरून वाद घेऊन आम्हाला सहजयोग करायचा नाही. म्हणून निघाले पाठमोरे. अशा पढतमूर्खांना काय म्हणावे! मी स्वत:च यासाठी मेडिसीन केलं म्हटलं या शहाण्यांच्याबरोबर मला बोलायचे आहे ना! म्हणून मला सुद्धा शिकलं पाहिजे. आमच्याबरोबर दोन सुज्ञ डॉक्टर आलेले आहेत. एक रशियन आहेत आणि एक आपले पारशी डॉक्टर आहेत. बरेच वर्ष त्यांनी लंडनला राहून प्रॅक्टिस केली आहे. मानसशा्त्रज्ञसुद्धा आहेत. सगळे इथे फार शिकलेले, विद्वान लोक आलेले आहेत. आणि यांनी तुमच्यासुद्धा योगशास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. इतकचं नव्हे तर प्रत्येक देवता म्हणजे काय? त्या देवतांचे अर्थ काय? म्हणजे मी सहजयोग यांना शिकवायला बसवल्याबरोबर यांनी युनिव्हर्सिटीच मांडली मुळी आणि प्रत्येक गोष्टीचं सॉर्टिंग आऊट ज्याला म्हणतात ते करून घेतलेलं आहे. इथे मी चौऱ्यांशी (84) आजपर्यंत मोठ मोठ्या टेप्स, लेक्चर्स करून घेतलेले आहेत. त्याचे सगळे वर्गीकरण करणे. ते काय आहे, काय नाही, हे कसं शिकून घेणं ह्या रोगाला काय? ह्या माणसाला हा त्रास आहे. कुंडलिनी कशी उचलायची? त्याचा काय त्रास आहे? कुठे ती अडकते? काय झालं? वगैरे सगळं इत्थंभूत. तुमचे देवता वगैरे काय करतात? त्यांच्यापासून तुम्ही शिकणारं. कारण आपण नेहमी इंग्लिश लोकांकडूनच शिकतो. माताजींचे शिकवलेलं एवढं चालत नाही. तेव्हा मी त्यांना बरोबर घेऊन आले आहे. पण असं आहे की आपल्या संस्कृतीचा एवढा मोठा वारसा आपल्याकडे आहे! एवढं मोठं आपल्याला काही मिळालं आहे त्याची तुम्हाला कल्पनासुद्धा नाही. आणि या अशा काहीतरी अगदी त्याला कुचकामी शिक्षा पद्धती ज्याला मी म्हणते, ज्याच्यामध्ये काहीही तुम्हाला माहिती होतं नाही की काय खरं आहे. सर्वव्यापी शक्ती काय आहे? त्याच्याबद्दल काहीही त्याच्यामध्ये विचार नाही. विचार विनिमय नाही. अशा या कुचक्या शिक्षा पद्धतीने जर तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागलात तर असेच म्हणता येईल की सगळे सौंदर्य, संपदा, एवढे ऐश्वर्य घरात असताना सुद्धा तुम्हाला भीकेचे डोहाळे लागलेत.

 आता सहस्रारावर आल्यावर जेव्हा कुंडलिनी छेदन करते तेव्हा तुम्हाला सामूहिक चेतनेचा अनुभव येतो. म्हणजे अनुभव येतो, लेक्चर येत नाही. त्याला actualisation इंग्लिशमध्ये म्हणतात. हा अगदी अनुभव आहे. अनुभव म्हणजे तुमच्यामध्ये ही प्रबुद्धता आहे. तुमची जी चेतना आहे ती प्रबुद्ध होते. तुमच्या हातातून हे चैतन्य वाहू लागते. त्यानंतर ह्या बोटामध्ये तुम्हाला बरोबर कळतं की तुमचे कोणते चक्र धरलेले आहे, दुसऱ्यांचे धरलेले आहे कारण तुम्ही आपल्या सुत्रावर आल्यावर सगळ्यांच्या सुत्रावर जाऊ शकता. इथे आम्ही दाखवले आहे प्रत्येक बोटाला की कोणत्या बोटाला कोणते चक्र आहे. बोटांवर डावीकडे व उजवीकडे कोणती चक्र आहेत आणि ती कशी नीट करायची. म्हणजे लहान मूल सुद्धा सांगू शकेल की तुमचं कोणतं चक्र धरलेलं आहे. परवा माझी अडीच वर्षाची नात आहे, ती जन्मलेल्याच, आजकाल पुष्कळ पार लोकं आहेत, त्यातील माझी चारही नातवंड नशिबाने जन्मलेलेच आहेत असे. त्यातील धाकटी जी आहे अडीच वर्षाची, तिच्याकडे याच्यातलीच एक मुलगी गेली होती, पत्रीषा म्हणून. तिने विचारले, ‘अनुपमा माझे कोणते धरले आहे?’ तिला विशेष इंग्लिश येत नाही तरी तिने सांगितले की लेफ्ट विशुद्धी अँड नाभी. तिला स्पष्ट सांगितलं. एवढीशी अडीच वर्षाची पण तिने सांगितलं. ती म्हणे, माताजी, हिला कसं कळलं? ‘ म्हटलं असं आहे की हे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे. हा जो काही बोध आहे तो आतून झालेला आहे. आता जसं आपल्याला कळतं की गरमं आहे, थंड आहे तसंच त्या मुलांना कळतं. फक्त नावं सांगायची गोष्ट. ते सांगतील हे बघा, हे धरतंय आमचं. हे धरतंय.

 इतकंच नाही आजच आता आम्ही नगरला इथे यायच्या आधी दुसरीकडे गेलो होतो. तर तिथे एक बाई माझ्यासमोर बसल्या होत्या. त्यांचं बोट हलू लागलं. मी त्यांना विचारलं, ‘मुलं-बाळं होतांना, बाळंतपणात तुम्हाला फार त्रास झाला?’ तर म्हणे, ‘फार त्रास झाला. हे झालं, ते झालं’ आणि ते बोट माझ्यासमोर हालतं होतं. आणि हे चक्र जे आहे त्याने युट्रस कंट्रोल होतं. म्हणजे स्वाधिष्ठान चक्राची राईट साईड जी आहे त्याने युट्रस कंट्रोल होतं. असं आम्ही सांगितल्यावर म्हणे माताजी तुम्हाला कसं कळलं? पण ते समोर सगळं दिसतंय आम्हाला. हे जर आपलं झालं, आपल्या प्रत्येकामध्ये हे घटित होऊ शकते आणि झालं पाहिजे. झाल्याबरोबर ही सामूहिक चेतना तुमच्यामध्ये अवतीर्ण होते. ती काही सांगून होत नाही की आम्ही सगळे भाऊबंद आहोत. असं होत नाही. सगळे जे काही या संसारातलं आहे ते याच शरीरात आहे. जे काही तुम्ही आहात ते आम्हीच आहोत. म्हणजे उपकाराच्यासुद्धा या ज्या भावना मिशनरीपणाच्या आहेत त्यासुद्धा काही कामाच्या नाहीत. अगदी कुचकामाच्या आहेत. कारण जर आमचे एखादे बोट खराब झाले तर आम्ही त्याला असं केलं तरी ते ठीक होऊ शकते. जर तुम्ही आमचंच अंग-प्रत्यंग असलात जर आम्ही तुमचं ठीक केलं तर आम्ही स्वत:ला ठीक करतोय त्यात तुमच्यावर उपकार कसले ? ही अशी स्थिती आतमध्ये अवस्था करते म्हणजे हे काही सांगून होत नाही की हे आमचे बंधू आहेत, असं सांगायला नको. ते जाणवतच मुळी. लगेच इकडे हात असे चोळायला लागतात. आता पुष्कळशी मुलं तोंडात बोटं घालतात. याचं निदान मानसशा्त्रज्ञांना लागलं नसलं तरी आम्हाला माहिती आहे. जर ती पार मुलं असली तर अगदी लगेच लक्षात येतं की ती बरोबर तोंडात बोटं घालतायेत, जे तुमचे चक्र धरतं. मग बदलतात ती. आता तिथे एक मुलगी अकरा महिन्याची होती. ती बरोबर सांगायला लागली की ह्यांचे हे धरतंय, त्यांचे ते धरतंय. त्यांची बोटच फिरायला लागतात कारण जळल्यासारखं होतं हातामध्ये किंवा काहीतरी ओढल्यासारखं होतं. ते बरोबर आपल्या हाताने असं करू लागतात. आता हे शास्त्र म्हणजे इतकं अभिनव आणि इतकं विशेष आहे! परमेश्वराला जाणण्याचं हे शास्त्र फार मोठं आहे आणि ही शक्तीसुद्धा आपण जाणली पाहिजे. आपल्यामध्ये ती स्थित आहे फक्त जागृत करून घ्यायची आहे. त्याबद्दल आता लोकांचे पुष्कळ आरोप पण झाले. 

त्यातलं एक विशेष मी बघते ते म्हणजे की कुंडलिनी जागृत करणे हे फार कठीण कार्य आहे आणि ते करतांना आम्ही बेडकासारखे उडतो वगैरे वगैरे असे अनेक लोक मला सांगतात. म्हणजे एक गृहस्थ माझ्यासमोर दोन्ही पाय वर करून बसले होते. तर लोकांनी सांगितले असे बसायचे नसते माताजींच्याकडे. अहो, म्हणे असच बसू द्या नाहीतर मी बेडकासारखा उडेन. त्यांनी म्हटलं असं का? तर म्हणाले आमचे गुरुजी असं म्हणाले की कुंडलिनी जागृत झाली म्हणजे बेडकासारखे उडतात. म्हटलं असं का ? ते उडत होते का? तर म्हणे ते उडायचे. म्हटलं तुम्हाला आता बेडूक करायचे आहे की काय मला. अतिमानव करायच्या ऐवजी कुणाला जर बेडूक करायचे असले, कोणी म्हणे सिंहासारखे ओरडतात काय!! आम्ही हजारो लोकांना, हजारो लोकांना अगदी कोलंबिया, चिली, अर्जेंटिना, रशिया, चायना सगळ्या देशामध्ये माझं फिरणं झालं आहे. याशिवाय तिकडे इराण आणखीन इटली वरगैरे सर्व या ज्याला आपण मेडिटेरियन म्हणतो त्या सर्व जागी माझे फिरणं झालं आहे. आणि अशा अनेक ठिकाणी, अनेक लोकांना जागृत्या दिल्या. पण कुठेही, कोणी बेडकासारखे उडलेले आम्ही पाहिलेले नाही आणि सगळं व्यवस्थित झालं. थोडीबहुत गरमी कधी कोणाला वाटली असेल तर असेल पण जास्त त्रास कोणाला झालेला नाही किंवा म्हटलं पाहिजे की बहुतेक शंभरातले ९९ लोक कधीही त्यांना काहीही त्रास झालेला नाही. थोडीशी कधीकधी गरमी हातात येते फक्त. हलकी गरमी हातात येऊ शकते. त्यावर लोकांचे असे म्हणणे की फार कठीण असतं वगैरे. समजा फार कठीण काम आम्ही अगदी सहज करतो, तर काहीतरी असलं पाहिजे आमचंसुद्धा. असल्याशिवाय नाही होत . तेव्हा ते कठीण आहे त्याच्यामुळे आम्हालाच सर्टिफिकेट मिळतायत. तेव्हा असं लक्षात आणलं पाहिजे की काहीतरी हे कार्य करायचं होतच आणि घडायचं होतं. म्हणून ‘माताजींनी हे शोध लावण्यापेक्षा, काहीतरी त्यांना माहिती आहे, ते त्या घेऊन आल्या आमच्यासाठी. त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण हक्क आहे. म्हणून आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला ते घेतलेच पाहिजे कारण आमचाही हक्क आहे.’ अशा भावनेने जर तुम्ही बसलात तर कोणालाही अहंकार वगैरे जे प्रकार असतात ते येणार आहे कारण लगेच अहंकार डोक्यावर येतो. विशेषतः शहरातल्या लोकांना आणि अहमदनगर हे शहरच असल्यामुळे मला जरा भीत भीतच बोलावं लागतंय .आमचे मुंबईकर म्हणजे आणखीन त्याहूनही विशेष असतात. कारण मुंबईकरांचा डोकं आणखीनच वेगळं आहे . दिल्लीकर त्याच्या वरताण .ते सत्तेवर बसल्यामुळे त्याचा तर डोकं फारच वेगळं आहे. पण जर त्यांना कोणताही  रोग झाला समजा तर मात्र धावत येतात . डॉक्टर असले किंवा काय , आपले जे प्रेसिडंट साहेब आहेत त्यांनासुद्धा कॅन्सर झाला होता तेव्हा मी लंडनला जाऊन त्यांना ठीक केलेले आहे. त्यांना माहिती आहे. आता ते काही मला पेपरात देऊ देणार नाहीत किंवा सांगू देऊ देणार नाहीत. कारण तसं काही सरकारी नसल्यामुळे ते काही करणार नाहीत. असे अनेक प्रश्न मानवाचे असतात. तरी हे आपल्या आईचेच आहे, आपलेच आहे, स्वतःचेच आहे. अगदी काही त्याच्यात विशेष औपचारिकपणा काही करायचा नाही. अगदी साधंसुधं आहे. तुम्ही जरी आमच्या समोर येऊन डोक्यावर येऊन बसले तरी आम्ही आईच आहोत, काही तुमचे गुरू नाही आहोत. पण तरीसुद्धा याला एक मान हा पाहिजेच. आईचा मान केला पाहिजे आणि हे समजले पाहिजे. आणि तो मान जर मनात धरून तुम्ही जर पार झालात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की फार मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात, अनेक आयुष्यातील मिळवलेली ही संपदा तुमची, आज भटकली गेली  पण याच्यानंतर मात्र माणसाला थोडसं जमवावं लागतं कारण पाण्यातून जे बुडत होते लोक, त्यांना काढून बोटीवर जरी बसवलं तरी थोडावेळ असं वाटतं की आपण अजून पाण्यातच आहोत आणि काही काही लोक कोलमडतात सुद्धा. म्हणून त्याच्यानंतर थोडी  मेहनत करून ते जमवून घ्यावं लागतं. ते कसं करायचं, काय करायचे याच्यासाठी आमचे इथे आम्ही सेंटर उघडलेले आहे. त्यांच्या जवळ जाऊन सुद्धा तुम्ही विचारू शकता. याची फारच सोपी पद्धत आहे ज्याने तुमचे अनेक रोग ठीक होऊ शकतात. तेव्हा ते आपले रोगसुद्धा तुम्ही ठीक करून घेऊ शकता. आमच्या फोटोलाही व्हायब्रेशन्स असल्यामुळे त्याचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. ते लोक फार सुज्ञ आहेत आणि त्यांनी फार मोठे मोठे कार्य केले आहे. त्याबद्दल मला मुळीच शंका नाही. एक दिवस या अहमदनगरमध्ये सगळ्यात जास्त सहजयोगी होतील. तरी आपण इथे बोलवलं, माझा एवढा मान केला त्याबद्दल मी फार आभारी आहे.

आता ज्यांना जागृती घ्यायची असेल त्यांनी बसावं ज्यांना नसेल त्यांनी जावं. त्याबद्दल कुणाला जबरदस्ती करता येत नाही कारण सत्य तर तुमच्या पायावर येणार आहे. त्यांना काही दोष नको. तेव्हा ज्यांना हवं असेल त्यांनी अत्यंत नम्रपणे बसावं. ज्यांना घटित होईल त्यांना घटित होईल. त्यानी एकतर तुमचे शारिरीक प्रॉब्लेम्स एकदम सॉल्व होतात .जशी कुंडलिनी वर जाते. आता आम्ही वर्ध्याला परवा एका माणसाला ट्युमर होता ब्रेनचा आणि त्याची कुंडलिनी वर आल्याबरोबर त्याला एकदम मोकळं झालं. आणि त्याचा ट्युमर सुद्धा ठीक झाला .असा हे तत्क्षण सुद्धा होतंय पण सगळ्यांच होत नाही. हे आधीच सांगते मी.  आता राहुरीला एक बाई होत्या. त्यांना अगदी ऐकायला येत नव्हतं. त्यांनी सांगितलं माझे कान एकदम बंद झालेले आहेत आणि मी त्यांच्या कानात एक ‘अहं साक्षात मंत्र सिद्धी’ म्हटल्या बरोबर त्यांना ऐकायला येऊ लागलं. कुणीतरी त्यांच्या मंत्र फुंकून मला वाटतं त्यांना बहिरं केलं होतं.  तेव्हा ते निघाल्यामुळे त्यांना एकदम ऐकू येऊ लागलं कारण ही गोष्ट खरी आहे. त्यातली कुठलीही गोष्ट आम्ही तुम्हाला खोटी सांगत नाही – कारण आम्हाला तुमच्यापासून काही ही घ्यायचं नाहिए. फक्त द्यायचंय. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं नसेल घ्यायचं त्यांनी जावं. त्या बद्दल आम्हाला जराही वाईट वाटणार नाही. आई असल्यामुळे हे जरूर वाटतं की प्रत्येकाचं मंगल आणि कल्याण हे झालंच पाहिजे.  मंगल आणि कल्याण हे झालंच पाहिजे. आता असे हात करून बसा सगळे.