Seminar Day 3

Rahuri (India)

1979-02-27 Seminar in Dole Marathi, Rahuri, 40'
Download video (standard quality): Watch on Youtube: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share

विज्ञान म्हणजे सत्याला शोधून काढणे राहुरी, २४/२/१९७९

अनुभव किंवा स्वत:चे विचार सांगितलेले आहेत. वेळ कमी असल्यामुळे ते काही तुम्हाला पूर्णपणे सांगू शकले नाहीत. तरी सुद्धा एक गोष्ट त्यात लक्षात घेतली पाहिजे, की यांच्या भाषणामध्ये आपल्या भारताची केवढी थोरवी यांनी सांगितली आहे. आता आपल्याला ज्या पाश्चिमात्य लोकांनी सहजयोगाबद्दल स्वत:चे इतकेच नव्हे, तर आपल्या देशामध्ये जी मर्यादा आहे, जी श्रद्धा आहे आणि धर्म आहे, किती महत्त्वाची आणि विशेष वस्तू आपल्याजवळ आहे, त्यावर त्यांनी फार भर दिलेला आहे. कारण हे सगळे त्यांनी घालविलेले आहे. परदेशात मी अनेकदा गेले होते पूर्वी, पण तिथली स्थिती इतकी भयंकर आणि गंभीर असेल अशी मला मुळीच कल्पना नव्हती. जेव्हा आमच्या साहेबांची निवडणूक झाली आणि मला लंडनला जावे लागले, तिथे रहावेच लागले, त्यानंतर मी तिथे सहजयोगाच्या कार्याला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा याच लोकांनी सुरुवात करवली कारण यांना लोकांकडून कळले होते, की माताजी इथे आलेल्या आहेत. तेव्हा त्या समाजाशी संबंध आल्यावर मला आश्चर्य वाटले, की सायन्सच्या दमावर हे लोक सत्यापासून किती दूर गेलेले आहेत. सायन्स म्हणजे सत्याला शोधून काढणे. सायनंस म्हणजे जे काही असेल त्यातील खरे काय आहे ते शोधून काढणे, पण यांचे सायन्स जे काही असेल ते सत्यापासून दूर का निघाले, ते आपण बारकाईने समजावून घेतले पाहिजे. मनुष्य जसा आहे, तसा अपूर्ण आहे. तुम्ही अजून पूर्णत्वाला पोहोचलेले नाहीत मुळी. जसे हे मशीन आहे. त्याला मी मेन्सला लावले नाही तर याचा काहीच उपयोग नाही किंवा याला काहीही अर्थ लागत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे आहे. जोपर्यंत माणसाची आत्म्याशी ओळख झालेली नसते, जोपर्यंत त्याचा संबंध परमेश्वराशी आलेला नसतो, जोपर्यंत त्याचे आत्म्याचे डोळे उघडलेले नसतात, तोपर्यंत तो अपूर्णच आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते लक्षात कसे येणार? मनुष्य हा अपूर्ण आहे ते त्याच्या करणीवरून दिसत आहे. तुम्ही त्याला स्वतंत्रता दिली, तर तो अगदी मूर्खासारखा वागतो. जर त्याला पारतंत्रतेत ठेवले तर मिंधा बनतो. त्याला जर तुम्ही बांधून ठेवले तर कामातून जातो. मोकळा सोडला तर मोकाट फिरतो. त्याला स्वत:ची सुज्ञता नाही. स्वत:बद्दल काही कल्पना नाही, इतकेच नव्हे तर स्वत:चा मान ही नाही, प्रतिष्ठाही नाही. लहान गोष्टीसाठी तो आपल्याला विकत फिरतो. वाईट माणसांच्यापुढे आपली मान तुकवतो, माहीत असतानासुद्धा! कधी सत्तेच्या नावावर कधी पैशाच्या नावावर. कधी आणखी काही दुर्गुणांसाठी. तेव्हा काही तरी माणसामध्ये न्यूनत्व आहे हे आपण जाणले पाहिजे. म्हणजे त्याची स्वत:ची ओळख झालेली नाही. त्याने स्वत:ची संपदा ओळखली नाही. भारतामध्ये अनादी कालापासून माणसाचे लक्ष भौतिकवादाकडे नव्हते. त्याला फार मोठे कारण आहे आणि आपले सद्भाग्य आहे, सद्भाग्य असे आहे, की आपल्या देशाची हवा अशी आहे, की आपण जंगलात राहू शकतो, झाडावरही राह शकतो, फार अंगावर वस्त्रे असलीच पाहिजे असे नाही किंवा खायलाही फार जास्त असले पाहिजे असे नाही. हवा इतकी सुंदर आहे आपल्या देशातली की त्या हवेला बाह्यातले फार लागत नाही. आता लंडनला तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाहेर निघायचे म्हणजे पंधरा मिनीटे आधी कोट वगैरे जामानिमा घालून तुम्हाला निघावे लागते. घरात जर हीटिंग नसेल तर तुम्ही बसू नाही शकत तिथे. अंघोळ करून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. लंडनला पुष्कळशा भारतीय लोकांना लंग्जचा कॅन्सर होतो. त्याचे निदान त्यांनी असे

काढले, की या लोकांना आंघोळीची सवय. सकाळी अंघोळ करून बाहेर निघाले की लंग्ज कॅन्सर होतो. मी जेव्हा प्रथम लंडनला गेले तेव्हा मला असे वाटले, की इथे काही प्रकोप आहे, की काय देवाचा! अशी थंडी, असा वारा आणि पाऊस, सारखा चिखल! मला तर लोकांनी असे सांगितले , की इथे फूटबॉलसुद्धा लोक छत्र्या घेऊन खेळतात! ही अशी दर्दशा! म्हणजे पिसाळल्यासारखे सर्व काही. अगदी पिसाळल्यासारखे तिथले वातावरण आहे. त्यामुळे लोक पिसाटले आहेत यात काही आश्चर्य नाही. पण तुमची सश्यशामला भूमी आहे. ही काही तरी विशेष भूमी परमेश्वराने तयार केलेली आहे. ही मंडळी बाहेरून येतात तेव्हा त्यांना या भूमीची विशेषता कळते आणि याचे वैशिष्ट्य कळते. आता इतका त्रास बाहेर असल्यामुळे आणि तिथे जिणेसुद्धा प्रत्येक क्षणी मुश्कील काम असल्याने माणसाची प्रवृत्ती बाहेर जाणारच. की हे कसे पादाक्रांत करायचे, कशा रीतीने आपण एक आव्हानच आहे सगळे. प्रत्येक, आयुष्यातला कोणताही मार्ग म्हटला, की एक आव्हान होते. प्रत्येकाला आव्हानात रहावे लागते. सारखे आव्हान सुरू केल्यामुळे त्यांच्यात इगो ओरिएंटेशन आले, म्हणजे अहंकारवादिता आली. बापाने काही म्हटले तरी सुद्धा त्याला एक आव्हान, आईने काही म्हटले तरी एक आव्हान. सगळ आयुष्य आव्हानातच घालवायचे असल्यामुळे, इतक्या वेडेपणाची आव्हाने आहेत की तुमच्यातले कोणी सांगितले , तुमच्यापैकी कोण तोंडाला काळे लावेल बरे, तर मोठमोठे प्रोफेसरसुद्धा तयार होतील आणि त्याचे तर वेड चढले आहे लोकांना, आव्हानाचे. हे शहाणपण, ही सुज्ञता या भूमीमुळे आपल्याला लाभलेली आहे. कदाचित भारतीयांना माहीत नसेल ही गोष्ट. सहसा भारतीय मनुष्य मूर्खपणा करत नाही. पण या लोकांच्या कृपेमुळे आणि इतकी वर्षे आपल्यावर राज्य केल्यामुळे साहेब दिसला की काहीतरी विशेष असला पाहिजे असे आपल्याला वाटू लागले आहे, पण आपल्या भारतात अनादीकालापासून अनेक ऋषी-मुनींनी या गोष्टीचा पत्ता लावून ठेवलेला आहे की हे सर्व संसारातले कार्यक्रम कसे चालतात, कोण चालवत आहे. तर तुम्ही म्हणाल, की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तर एका सायंटिस्टला ढोबळ डोळ्यांनी जे दिसले-ढोबळ डोळे असतात, सूक्ष्म नसतात, तर एवढे सांगितले की, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, पण ती का आहे, ती कशी आली, त्याचे निदान कोणी सांगू शकत नाही. सल्फर डाय ऑक्साईडमध्ये जी स्पंदने होतात, सल्फर आणि ऑक्सिजनच्या अॅटम्समध्ये, ते तिथे होतात हे सांगू शकतील, पण ते का होतात, कसे होतात आणि कोण करते ते सांगू शकत नाहीत. ही सायन्सची सीमा आहे. त्या सीमेला तुम्ही लांघू शकत नाही. तिला ओलांडायची, सीमा ओलांडायची म्हणजे त्याला दुसरी पातळी पाहिजे. म्हणजे आपल्या सायन्समधले उदाहरण मी सांगते, की जर आपल्याजवळ बघायला यंत्र नसले, तर आपण हिस्टॉलॉजी म्हणजे सेल्स बारीक बघू शकत नाही. ती तसेच आपल्यामधले जे मोठे यंत्र आहे, म्हणजे आपला आत्मा जो आपल्यामध्ये स्थित आहे, त्याच्याबद्दल अनेक ऋषी-मुनींनी आपल्याला सांगितलेले आहे, ज्याच्यावर आजकालच्या शहाण्यांचा विश्वास बसत नाही. अतिशहाणे झालेले आहोत ना आपण! तेव्हा विश्वास नाही. आत्मा-बित्मा कसले काय! तेव्हा जे आपल्यामध्ये आहे, ते तरी आपण ओळखून पहावे. एवढ्या लोकांनी सांगितले आहे ते काही खोटे सांगितले नसणार. ही सायंटिफिक प्रवृत्ती मात्र धर्माच्याबाबतीत आपल्याला नाही. म्हणजे ते लोक काही तरी वेगळे होते आणि त्यांचा-आमचा काही संबंध नाही. ते काही तरी सांगत होते. त्यांचे शोध आमचे नाहीत. ते मानव नव्हते वर्गैरे वरगैरे अशा तऱ्हेचे निष्कर्ष आपण काढतो आणि त्या निष्कर्षावर आजची आपली भारतीय जनता जी

आहे, ती प्रगती करीत आहे. प्रगती आहे की काय आहे मला सांगता येत नाही, पण मी प्रगतीची अधोगती पाहन आल्यावर सांगते, की त्या प्रगतीला आता तरी लक्षात आणून वेळीच आळा घातला पाहिजे. आणि तो आळा कशाने येणार संपूर्ण ज्ञानाने येणार आहे. अर्धवट लोकांच्याने येणार नाही. इतकेच नाही तर मला आश्चर्य वाटते तुम्ही तरुण मुले असूनसुद्धा तुमचे चित्त थोडा वेळ सुद्धा एकाग्र होत नाही. मी मघापासून बघते आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. आम्ही तुमच्या वयाचे असताना गांधीजींनी इथे लढाई काढली होती आणि कोणाच्या डोळ्याची पापणीसुद्धा हालत नसे, इतके एकाग्रतेने आम्ही लोकांची भाषणे ऐकत असू. एवढा महत्त्वाचा मुद्दा मांडत असतांना एकाग्रता असायला पाहिजे. जरासे कोणी आले, की तिकडे पाहिलेच पाहिजे दुसर्याला. आजपर्यंत जसे आम्ही कोणाला पाहिलेच नाही. सगळे आयुष्य इकडेतिकडे १ पाहण्यातच घालवायचे की स्वत:ला कधी तरी पाहायचे आहे? स्वत:लासुद्धा पाहायला पाहिजे. ती सुद्धा वेळ आली पाहिजे आणि ती वेळ आज आलेली आहे की आम्ही स्वत:ला पाहिले पाहिजे , जाणले पाहिजे, तेव्हाच पूर्णत्व येणार आहे. अपूर्ण दशेमध्ये तुम्ही कोणताही राजकारणाचा डाव मांडा किंवा तुमच्या अर्थशास्त्राचा कोणताही प्रकार तुम्ही चालू करा तो फसणार आणि गोत्यात जाणार. तुमचे सगळे प्लॅनिंग फसणार आहे आणि तुम्ही जे ठरवलं ते चूक ठरविले जाईल. ‘संकल्प विकल्प करोति, ‘ असं शास्त्रात म्हटलेले आहे. आता आत्मा आहे की नाही, हा प्रश्न फार लोकांच्यासमोर अगदी असा उभा आहे. जसे काही बुद्धीनेच हा प्रश्न तुम्ही सोडविणार आहात. त्या बुद्धीला सीमा आहेत, हे तरी आपल्याला माहिती आहे नां ? आणि सीमेच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सीमित बुद्धीने कशा जाणल्या जाणार? परत तुम्ही जेवढे काही सायन्स जाणलेले आहे, आताच रुस्तुमनी सांगितले आहे, ते तुमच्या अचेतनमधून सहजच तुमच्यात आलेले आहे. तुम्ही प्रयत्न करून जाणलेले नाही. आईनस्टाईनने तर स्पष्टच सांगितले की, ‘मी माझ्या बागेमध्ये आरामात पडलो होता आणि साबणाचे फुगे काढत होतो कारण मी अगदी कंटाळून गेलो होता प्रयोगशाळेत आणि फ्रॉम सम व्हेअर अननोन, कोठून तरी अनकॉन्शस मधून, सबंध थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी माझ्यासमोर येऊन नाचू लागली. ‘ केवढे मोठे सत्य ! केवढे मोठे सत्य तुम्हाला त्यांनी सांगितलेले आहे! त्यावरून तरी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की हे अनकॉन्शस काय आहे, हे अचेतन काय आहे, ही सर्वव्यापी शक्ती, ज्याला त्याने युनिव्हर्सल अनकॉन्शस म्हटलेले आहे, हे काय आहे? हे बरोबर तिथे जाऊन पोहोचले, जे आपल्या ऋषी-मुनींनी सांगितले आहे, की परमेश्वराची शक्ती सर्वव्यापी आहे. जर ती सर्वव्यापी शक्ती सर्व कार्य करीत आहे आणि आपण इकडून तिकडे उगीचच लुडबुड करीत आहोत किंवा मी कधी कधी उदाहरण देते, काही गावातले लोक पहिल्यांदाच विमानात बसल्यावर त्यांना सांगितले, जास्त सामान नेऊ नये, ओझे होते, तर त्यांनी आपल्या डोक्यावर सामान ठेवून घेतले. तसेच आपण काहीतरी कामे करीत आहोत. ही शक्ती सर्व कार्य करीत असताना त्याचे सायन्स जाणून घेणे हेच खरे विद्येचे लक्षण आहे आणि त्यानंतर या सायन्सलासुद्धा अर्थ निघतो. उदाहरण सांगायचे म्हणजे असे, आपण कोणतेही सायन्स, म्हणजे केमिस्ट्रीचे सायन्स घेऊ या, काल आपल्या केमिस्ट्रीच्या प्रोफेसरशी मी बोलत होते, तर मी त्यांना सांगितले , की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पिरियॉडिक लॉज पाहिले आहेत नां! पिरीयॉडिक लॉज केमिस्ट्रीतले जर पाहिले तर बरोबर असे दिसते, की त्यामागे काही तरी कार्यक्रम आहे आणि बरोबर सगळे आठवून ठेवलेले आहे. त्याच्या वेव्हलेंथ ही अगदी वेगळ्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या वेगळ्या व्हॅलन्सीज आहेत, त्या बदलत नाहीत आणि त्या कशाही जरी असल्या तरी त्यांचे

अॅक्शन होते. हे कसे शक्य आहे ? तिथे कोणी ऑर्गनायझर नसला तरी इतके व्यवस्थित ते बसवलेले आहे. पृथ्वीचे गरगर फिरणे तेही इतक्या वेगाने, तेही बरोबर अंतराने, सगळे ग्रह- तारे आणि सगळे फिरत असतानासुद्धा आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण एवढ्या मोठ्या पृथ्वीवर बसलेलो आहोत. ही सगळी कमाल दिसत असतानासुद्धा, परत सायन्समध्ये जे लोक आता पुढे गेलेले आहेत, ज्यांनी सायनसमध्ये अगदी शेवटचा कप्पा गाठलेला आहे, तिथे ते आता बोलायला लागले, की आता हात टेकले, की आता काही समजत नाही. याचे उत्तर आम्हाला मिळत नाही. आम्हाला सांगता येत नाही, की हे सगळे का होते. एखाद्या सायंटिस्टला, डॉक्टरला असे विचारा, की आपल्या बॉडीमध्ये काही जरी आले तरी आपण ते बाहेर फेकतो, पण जे फीचर म्हणून लहान मुलाचे आईच्या पोटामध्ये जे स्थान येते, त्यावेळी त्याचे संगोपन होते, इतकेच नाही पण बरोबर टाईमशीर ते बाहेर पडते, हे कोण करते ? किंवा आपल्यामध्ये ज्या दोन नव्व्हस सिस्टीम्स आहेत, ऑटोनॉमस आणि सेंट्रल नव्व्हस सिस्टीम , त्यांच्यामध्ये अॅसिटोकोलीन आणि अॅड्रेनलीन म्हणून दोन केमिकल्स आहेत. त्या केमिकल्सची वागणे कधी एकेठिकाणी दूसर्या प्रकारचे, म्हणजे गळ्यामध्ये दसर्या प्रकारचे असते, इथे वेगळे असते. त्याला इंग्लिशमध्ये ऑगमेंटेशन रिलॅक्सेशन म्हणतात, ते वेगळे वेगळे असते, असताना ते तसे का होते, म्हणजे एका केमिकलचे रिअॅक्शन एकच व्हायला पाहिजे. ते तसे कोण घडवून आणते, असे जर त्यांना विचारले, तर ते म्हणतात, आम्हाला सांगता येत नाही. त्याबद्दल प्रामाणिक आहेत. म्हणतात ‘मोड ऑफ अॅक्शन वुई कॅनॉट एक्सप्लेन’ पण प्रामाणिक असले तरी ते प्रबुद्ध नाहीत. त्यांना या गोष्टीचा बोध झालेला नाही. म्हणून एवढे जे काही ज्ञान आहे ते बोधरहित आहे. प्रथम बोध झाला पाहिजे. बोध झाल्याशिवाय ज्ञानाला काही अर्थ येत नाही. बोध आत्म्यामुळे होतो आणि या आत्म्याला आपण जाणले पाहिजे. आता याला कसे जाणायचे? याच्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये काही व्यवस्था केली आहे का? परमेश्वराचे सगळे प्लॅनिंग एका पिरीयॉडिक लॉमध्ये इतके सुंदर दिसून येते, सगळे एलिमेंटस असे सुंदर वाटलेले आहेत, ते व्यवस्थित सगळे केलेले आहे. ते केमिकल रिअॅक्शन आणि प्रत्येकालासुद्धा परमेश्वराने इतके बांधून दिलेले आहे, गुलाबाच्या झाडाला गुलाबाचीच फुले येतात आणि आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात, त्याचे जर नियम बांधलेले आहेत, तर तुमच्या बाबतीतसुद्धा परमेश्वराने काही तरी बांधणी केलीच असेल. इतकेच नव्हे तर तुम्ही या सर्वांच्यावरती ते बसविले गेले आहात , त्या सर्वांचे जे तुम्ही कंट्रोल करू शकता, सायन्समधून परमेश्वराचे जे तत्त्व वरवर दिसते ते बघू शकता, ते सुद्धा तुम्ही मानव आहात आणि मानव ही सर्वात उच्च श्रेणीतली परमेश्वराची कृती आहे. पण फक्त एक गोष्ट मात्र मानवाला सहज साध्य आहे ती म्हणजे मूर्खपणा. तो इतर कोणालाही नसतो. कोणत्याच प्राण्याला मूर्खपणा कशाशी खातात ते माहिती नाही. माणसाला मूर्ख होता येते आणि चांगलेच मूर्ख बनता येते. ही माणसाची विशेषता आहे. त्या एका स्वतंत्रतेमुळे फार मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे, पण ही स्वतंत्रता मान्य करायलाच पाहिजे. तुमच्यात स्वतंत्रता नसली तर तुम्हाला राज्यपद कसे द्यायचे ? म्हणून ही तुम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे. त्यात सूज़ञपणा हा ठेवून आपली उन्नती करून घेतली पाहिजे. खरी उन्नती आहे ती आत्मोन्नती आहे. मनुष्याला जे बनविलेले आहे, त्याचा संबंध जे काही काही आहे बनविलेले ते अशा प्रकाराने आपल्यामध्ये आहे. आता याबद्दल आपल्याला सांगायचे म्हणजे त्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत. पण तरी मी थोडक्यात आपल्याला सांगते. प्रथम म्हणजे ज्याला मी आत्मा असे म्हणते, किंवा परमेश्वराची आपल्यामधली जी झाक

आहे किंवा प्रतिबिंब आहे , ते आपल्या हृदयात आहे. त्याला गीतेमध्ये क्षेत्रज्ञ असे म्हटलेले आहे किंवा साक्ष स्वरूप असे म्हटलेले आहे. त्याला आपण जाणत नाही. म्हणजे आपल्या सेंट्रल नव्हस सिस्टीममध्ये ( मध्यवर्ती मज्जासंस्था) त्याला स्थान नाही. आपल्या कॉन्सशनेसमध्ये तो नाही. तो आपल्याला बघत असतो. आपण जाणतो की तो आहे. पण आपल्याला त्याला वापरता येत नाही. असा आत्मा आपल्या हृदयात आहे आणि हा असा आत्मा आपल्या हृदयात असताना आपण त्याला जाणू शकत नाही आणि त्याला जाणले पाहिजे. ही जर परमेश्वराची इच्छा आहे तर त्याने आपल्यामध्ये काही तरी व्यवस्था केलेली आहे आणि ती व्यवस्था या प्रकारची आहे आणि या बद्दल अनेक साधू-संतांनी तसेच अनेक मोठमोठ्या महंतांनी लिहिलेले आहे आणि आज पाश्चिमात्य देशात याच्यावर फार मोठे अध्ययन चालू आहे. लोक याच्यावर पोहोचलेले आहेत, की जो पर्यंत कुंडलिनी जागृत होत नाही तो पर्यंत मनुष्य पार होऊ शकत नाही. हे ते जरी मान्य करतात तरी कुंडलिनी जागृत कशी करायची याच्यावर तो मूर्खपणा, जे मी मगाशी म्हटले, तो आड येतो. हे परमेश्वराने तुमच्यामध्ये सगळे सूत्र बांधून ठेवलेले आहे. त्यापैकी जे अंकुराला आहे, जे अंकूर मात्र आहे, ते इथे कुंडलिनी म्हणनू शक्ती, जी आपल्याला दिसत नाही, ती स्थित आहे. १ जर आता आपण आमच्या प्रोग्रामला आलात आणि बघितले तर त्याचे स्पंदन आम्ही आपल्याला दाखवू शकतो. इथे असे पन्नास टक्के लोक बसलेले आहेत ज्यांनी आपल्या डोळ्यानी कुंडलिनी जागृती पाहिलेली आहे. म्हणजे त्याचे स्पंदन आपल्यामध्ये त्रिकोणाकार जी अस्थी आहे त्याच्यामध्ये होत असते. अगदी डोळ्यांनी तुम्ही बघू शकता आणि त्याचे स्पंदन होताना तुम्हाला दिसू शकेल. ते नंतर स्पंदन होऊन सहा चक्रांना भेदन जाते. आता ही सहा चक्रे कोणती आहेत आणि सातवे खालचे चक्र कोण आहे ते मी सांगते. हे म्हणजे जसे काही अंकूर आपल्यातून निघतो. पहिल्यांदा हे सांगायचे म्हणजे, की ‘बी’ तून आपल्या जो अंकूर निघतो तो आपण ओढून काढतो बाहेर किंवा त्याच्यासाठी काही पुस्तक वाचन करावे लागते का? ते सहजच आपोपआप जिवंत क्रिया घटित होते. ते बी तुम्ही लावता तेवहा नुसते पाणी त्याच्यावर सोडले पाहिजे. एखाद्या चांगल्या शेतकर्यांनी जर त्याचे संगोपन केले तर आपोआप ती घटना घटित होते. त्याची व्यवस्था आधीच झालेली आहे. बिल्ट-इन त्याला म्हणतात. त्याच्यातच बांधलेली सगळी व्यवस्था आहे. आपोआप त्याच्यामध्ये अंकूर येतो. तसेच आहे. कारण ही जिवंत क्रिया आहे आणि ही उत्क्रांतीची क्रिया आहे. उत्क्रांतीची शेवटची क्रिया आहे आणि आपोआपच ती घटित होणार आहे. ती तुम्ही काहीही मेहनत केली, आम्ही डोक्यावर उभे राहिलो, संन्यास घेतला, हे सोडले आणि ते धरले, त्याने काहीही होणार नाही. तुमच्यामध्ये जे काही आहे ते सगळे तिथेच आहे आणि ते आपोआप घटित होते. त्याला एक जाणकार मनुष्य पाहिजे. जाणणारा पाहिजे. जो त्याच्यामध्ये आपल्या प्रेमाचे सिंचन करून अंकुराला वर उचलून आणतो. त्या अंकुराच्या खालचे जे चक्र आहे, ते त्याच्याखाली आहे हे लक्षात आणले पाहिजे आणि हे चक्र गणेशाचे चक्र आहे. गणेश म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाही. जिथे तिथे आपण, ‘वा! आम्ही गणपतीला जातो, आमचे वडील जात होते. त्यांचे वडील जात होते म्हणून आम्ही गणपतीला जातो.’ पण गणेश म्हणजे काय? त्याचे काय चक्र आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कसला बोध होतो आणि त्यांनी काय कार्य केलेले आहे ? तर गणेश हे पावित्र्याचे लक्षण आहे. पावित्र्याचे प्रतीक आहे. म्हणजे परमेश्वराने सर्व सृष्टी बनविण्याच्या आधी, आपल्याला जन्माला घालण्याआधी, अनादिकालाआधी, पहिल्यांदा गणेशाला म्हणजे पावित्र्याला स्थान दिलेले आहे. पवित्रतेला मुख्य स्थान दिलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे

वैशिष्ट्य असे आहे, की आठ ही गणपती आपल्या इथे पृथ्वीमातेने उगवून टाकलेले आहेत. इथेच उगवले गेले म्हणा किंवा इथेच दर्शित झाले म्हणा किंवा इथे उद्भवले असे स्वयंभू, आठ ही गणपती आपल्या इथे झाल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांची विशेष जबाबदारी आहे, की त्यांनी पावित्र्य हे राखलेच पाहिजे. महाराष्ट्र हा देश म्हणजे विशेष आहे. त्यात तुमचे राहरी म्हणजे त्यांचे हृदय आहे. त्यात इथले विद्यापीठ, जिथे तिथले शेतकरी येऊन शिकतात, हे सर्व महाराष्ट्रात जाऊन आज इथले लेणे घेऊन जाणार आहेत. जे पावित्र्याचे लेणे आहे, ते प्रत्येक खेडेगावातून आणि प्रत्येक शहरातून आज नेण्याची तुमची फार मोठी जबाबदारी आहे. पहिली गोष्ट अशी, की पावित्र्य हे स्थापन केले आणि त्या पावित्र्याचे जे प्रतीक श्रीगणेश म्हणजे नेहमी बाल्य स्वरूप असतात. ही असली आई कुंडलिनी वर बसलेली आहे, ती गौरीस्वरूपा आहे. ती अजून कुमारिकाच आहे, म्हणजे लग्न होऊन कुमारिका स्थितीत आहे, आपल्या नवऱ्याची वाट बघत आहे अशी आपल्याकडे कथा आहे, तर त्या गौरी तिथे बसलेल्या आहेत आणि श्रीगणेश त्यांचे रक्षण करीत आहेत, की १ १ त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. आता कुंडलिनी जागृतीचे जे प्रकार होतात, त्याला कारण हेच मुख्य आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, की आपल्या हिंदुस्थानात इतके घाणेरडे गुरू निघाले आहेत, उघड-उघड ते इतके घाणेरडे प्रकार शिकवत आहेत आणि फॉरेनर्स त्यासाठी इथे येतात, त्यांना काही समजत नाही, इतके बिचारे मूर्ख आहेत आणि महामूर्ख आहेत, की त्यांना असे वाटते, की घाणेरडेपणा शिकण्यासाठी पण एक गुरू लागतो आणि खरे म्हणजे हे सगळे गुरू तिकडे गेले आणि शिकायला बसले, तर तिकडे खरे पदवीधर बसलेले आहेत ! यांना गुरूपण कशाला दिलेले आहे, समजत नाही, पण विचार करून मला असे वाटले, की या लोकांना असे वाटते, की यांची सद्सदुविवेक बुद्धी यांना खात असावी, की या लोकांना वाटते आहे की आम्ही काय काढलेले आहे, काही तरी आमचे चुकलेले आहे. मूर्खासारखे आम्ही वागत आहोत. तेव्हा कोणीतरी साक्षीला पाहिजे म्हणून हा गुरू घेतलेला आहे. पण उद्या हा गुरू तिकडे गेला की हे सुद्धा त्याच्याबरोबर नरकात जाणार आहेत याबद्दल काही शंका नाही. पण हा मूर्खपणा इथे केल्यामुळे कुंडलिनी साक्षात तुमची आई आहे आणि तिच्यावर सेक्सचा आरोप केल्यामूळे, सगळे प्रकार या सगळ्या कुंडलिनींचे प्रकार सुरू झाले. म्हणजे आता मी ऐकले, की दिल्लीला एका गृहस्थाने कुंडलिनीची शाखा काढलेली आहे. त्याला पवित्रता कशाशी खातात ते महिती नाही आणि तो हे घाणेरडे प्रकार करण्यासाठी तिथे जर कुंडलिनीची शाखा काढेल तर इतकेच नाही की त्याचा सर्वनाश होईल, पण आपल्या देशाचा सुद्धा सर्वनाश होऊ शकतो. कारण अशी कामे करणाऱ्यांच्यामुळे पाऊस पडत नाही. सुबत्ता जाते. लक्ष्मी स्वरूप जे काही आहे, लक्ष्मीतत्त्व ते सुद्धा जाते आणि अनेक आपत्ती येतात. जी माणसे अशा वाईट मार्गाला लागतात त्यांच्या घरांवर इतकी तऱ्हेत्हेची आणि भयंकर संकटे येतात की त्याला समजत नाही की मी कोणते असे पाप केले होते, की ज्यामुळे हे झालेले आहे. म्हणजे आपल्या आईवरच असा घाणेरडा आरोप करणारे लोक किती घाणेरडे असले पाहिजेत आणि त्यांना गुरू म्हणून मिरविणारे लोक त्यांच्यापेक्षा हे महामूर्ख, त्यांना काहीही अक्कल नाही हे समजून घेतले पाहिजे. तर ही कुंडलिनी खाली बसलेली आहे. त्रिकोणाकार अस्थीत आणि ती वरच्या १, २ , ३ , ४, ५, ६ अशा षट्चक्रांना छेदते. म्हणजे सेक्सचा काही संबंध या छेदनात येत नाही. फक्त गणपती तिथे बसून आपल्या आईचे रक्षण करीत असतो. प्रत्येकाची आई वेगळी आहे. तुम्ही असे संगोपन केले असेल, तुमचे पावित्र्य जसे राखले

असेल, पूर्वजन्माची जेवढी तुमची संपदा असेल, जे काही पाप -पुण्य तुमचे असेल आणि या जन्माचे जे काही असेल, ते टेपसारखे त्यामध्ये नोंदवून ठेवलेले आहे. ज्यावेळी कुंडलिनी उठते त्यावेळी त्याचेच निदान हातपायात येते. ही कुंडलिनी उठताना तुम्हाला आम्ही दाखवू शकतो. अनेकांनी पाहिलेली आहे. तेव्हा त्याबद्दल शंका करू नये. डोळे उघडून, खरेच जर तुम्ही पट्टीचे सायन्सवाले असाल, तर जे काही हायपोथिसीस आहे ते येऊन तुम्ही बघा. ही कुंडलिनी वर उठताना या षट्चक्रांना छेदून जाते आणि या षटचक्रांना छेदल्यावर जेव्हा ती वर पोहोचते, याला ब्रह्मरंध्र म्हणतात, या इथे पोहोचल्यावर, डोक्याच्या वर पोहोचल्यावर, तिथे शिवाचे स्थान आहे किंवा सदाशिवाचे स्थान आहे, तिथे प्रकाश गेल्याबरोबर हृदयामध्ये असलेला शिव म्हणजे आत्म्याचे तत्त्व जे आहे, ते प्रकाशित होते. ते प्रकाशित झाल्याबरोबर, या आत्म्याची शक्ती म्हणजे अनहत नाद आहे, ज्याला स्पंदन म्हणतात, ते आपल्या हातातून व्यवस्थित वाहू लागते. हा योग सहज आहे म्हणजे तुमच्याबरोबरच जन्मलेला आहे. प्रत्येक माणसाला हा योग मिळवून घेण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे एखादा कॉम्प्युटर मेन्सला न लावल्यामुळे सडून जातो. तसाच आपला जीव सडून जाणार आहे. मेन्सला हे लावलच पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही जाणायचे असले ते अॅबस्ल्यूटमध्ये जाणले पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तुम्ही जे काही सायन्समध्ये शिकता ते हे जाणल्याशिवाय अगदी अविद्या आहे. एक साधी गोष्ट प्लॅनिंगची मी सांगते आपल्याला की असे मी प्लॅनिंग केले, समजा, की आता आम्हाला याठिकाणी जायचे आहे. तर होईल काय तो गृहस्थ भेटणार नाही. काही तरी फिसकटणार आणि काही जमणार नाही. जर तुम्ही असे म्हटले, सहजयोगात पार झाल्यावर, तिथे आम्ही जावे की जाऊ नये असे हात केल्यावर, तर हातावर लगेच व्हायब्रेशन्स येतील. बरे तो मनुष्य तिथे असेल की नाही? तर त्याला तुम्ही अशी बंधने दिली, तर तो तिथे टेलीफोन झाल्यासारखा रस्त्यावरच भेटेल तुम्हाला. अशी अनेक उदाहरणे आहेत. मी एक साधारण उदाहरण सांगितले तुम्हाला. आमच्या गर्वानचेच सांगते की एकदा असे झाले की सहजयोगात यांचा एवढा विश्वास, पण हे डगमग डगमग होत होते कारण हे जास्त बुद्धीवादी असल्यामुळे निर्बुद्ध होतात आणि त्यामुळे त्यांच्या काही लक्षात येत नव्हते, की मी काय सांगत होते. एक दिवस मला म्हणाले की, ‘माताजी, माझ्या वडिलांचे बरेच दिवसात पत्र आलेले नाही तर काय असेल ते बघा.’ त्यांचे वडील स्कॉटलंडला असायचे. तर मी म्हटले असे आहे ना, तुम्ही त्यांची व्हायब्रेशन्स बघा. व्हायब्रेशन्स बघितल्यावर मला सांगायला लागले, ‘इथे भाजतंय मला.’ हे वडिलांचे स्थान आहे आणि हे विशुद्धी चक्र आहे. तर म्हटले, ‘तुम्ही फोन करून बघा. त्यांच्या घशाला नाही तर ब्राँक्रायटिस वगैरे काही तरी आले असेल.’ त्यांनी फोन केल्यावर आई म्हणाली, ‘ते बिछान्यात आहेत. आठ दिवसापासून त्यांना फार ब्राँकारयटिसचा त्रास होतोय.’ लगेच त्यांचा विश्वास बसला की माताजींनी इथेच आधी सांगितलंय. आता ते स्वत:च सांगतात. त्यांना माहिती आहे, की तुम्हाला काय होतंय. लगेच तुम्हाला सांगतील, पण लोकांना डोकं नसतं त्या बाबतीत. परवा असेच झाले. अशा तीन मुली होत्या, आमच्या सहजयोगी आणि तिकडून एक मुलगा आला आणि त्याला आज्ञा चक्र धरत होते. तर त्याला त्या बघत राहिल्या आणि त्याचे आज्ञा स्वच्छ करायचा त्यांनी प्रयत्न

केला. त्या मुलाने सांगितले की, तो माताजींच्याकडे गेला होता. तर त्या मुली माझ्याकडे बघत होत्या आणि अगदी भेसूर दिसायचा मनुष्य. म्हटले अहो, तुमच्याकडे कधी तरी मुलींनी बघितलं आहे का? तुम्ही इतके भेसूर आहात म्हटले, की तुमच्याकडे कोणी बघत नाही म्हणून तुम्हाला कॉम्प्लेक्स झालेला दिसतो आहे. त्या मुली उलट सांगत होत्या की त्या माणसाला इतका भयंकर आज्ञा चक्राचा त्रास होता की आम्ही असा विचार केला, की त्या माणसाकडे आम्ही असे रोखून पाहिले तर तो पळून जाईल तिथून. म्हणून म्हणते ही सगळी अविद्या आहे हे समजले पाहिजे. हे जे काही आहे, आपल्यामध्ये ही चक्रे आहेत आणि ही कार्यान्वित असतात आणि हे सगळे अंडर करंट्स आपल्यामधले त्याने सगळी गती होते. सबंध शारीरिक जेवढे काही आहे, शारीरिक आपले जे काही आजार आहेत किंवा मानसिक त्रास आहेत ते या तीन नाड्यांवरती चालतात. त्यापैकी पहिली जी नाडी आहे तिला आम्ही इडा नाडी म्हणतो. त्याच्यामुळे लेफ्ट सिंपथेटिक नव्व्हस सिस्टीमची चालना होते. जी उजवीकडे आहे तिला आम्ही पिंगला नाडी म्हणतो. हिच्यामुळे राईट सिम्पथेटिक र्हस सिस्टीमची चालना होते आणि मधोमध जी नाडी आहे तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. या नाडीमुळे आपल्या मी याला उत्क्रांती म्हणते. याची चालना होते. पण उत्क्रांतीसाठी पहिला आपला धर्म जमावा लागतो. जसे आज यांनी धर्माबद्दल सांगितलेले आहे, की माणसाला दहा धर्म आहेत. ते जर स्टॅबिलाइज (प्रस्थापित) झाले, जसे बोट तयार करताना त्याचे दहा धर्म ठीक आहेत हे आपण पाहिले तर आपण त्याला समुद्रात सोडतो. ज्या मनुष्याचे दहा धर्म स्टॅबिलाईज होतात त्याच्यामध्ये तेव्हा तो धर्मातीत होतो. म्हणजे तेव्हाच त्याची कुंडलिनी मधले जे चक्र आहे, ज्याला आम्ही नाभी चक्र म्हणतो आणि त्याच्या आसपास सर्व गुरूंचे स्थान आहे, ते गुरू तिथे बसून ते धर्म स्टॅबिलाईज करीत असतात आणि गुरू सगळे अनेकदा या संसारात आले आहेत आणि अनेक कार्ये त्यांनी केली आहेत. त्यांच्याबद्दल यांनी सांगितले आहे, की ते कसे कसे होते आणि शिर्डी साईनाथसुद्धा त्याच्यातले शेवटले गुरू आहेत आणि ही जी आपली नाभी चक्रावरची लक्ष्मी आहे आणि विष्णूचे जे स्थान आहे, त्यानेच आपल्याला उत्क्रांतीची इच्छा होते. त्यानेच आपण परमेश्वराचा विचार करतो. त्यानेच आपल्याला असे वाटते, की बिरयाँडमध्ये काहीतरी आहे, काहीतरी अनकॉन्शसमध्ये आहे. ही दृष्टी आपल्याला या चक्रामुळे मिळते. आता हे जे चक्र आहे हे फारच महत्त्वपूर्ण आहे. हाच प्रश्न असतो की या चक्राला कसे गाळायचे. याच्यामध्ये गॅप आहे आणि ही गॅप कशी भरून काढायची. तेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे असे हात करून कारण बसाल, आताही बसाल तर बरे होईल. म्हणजे लवकर घटना घटित होईल, असे सगळे हात करून जोडे काढून बसा. तर आता काय होते की आमच्यातून जशी शक्ती वाहत आहे, तशीच तुमच्यातून वाहणार आहे. जसा एक दिवा दूसर्या दिव्याला पेटवतो तसाच सहजयोगामध्ये प्रकार घटित होतो म्हणजे एक दिव्याला पेटवतो, मग तो दुसर्याला पेटवू शकतो. ही शक्ती तुम्हालाही मिळू शकते आणि तुम्ही ती वापरू पेटलेला दिवा दुसऱ्या शकता आणि त्याचा पूर्णपणे तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. आता ही मधली गॅप जी आहे त्या गॅपमध्ये जेव्हा आम्ही बोलत आहोत आणि तुम्ही हात आमच्याकडे केलेले आहेत, तेव्हा ती शक्ती जाते. त्याच्यामध्ये एक सोपान तयार होतो म्हणजे एक ब्रिज तयार होतो. तो ब्रिज आल्याबरोबर कुंडलिनीला आमंत्रण होते आणि तिला समजते, की आम्हाला जाणणारे आले आहेत आणि ती कुंडलिनी शक्ती सहजच उठून वर येते. आता काही

काही लोकांना मी पाहिलेले आहे, की ही शक्ती इतक्या लवकर वर जाते, स्प्लिट ऑफ ए सेकंद म्हटले तरी चालेल, आता फार काही काही तर फार मोठ्या लोकांना हे झालेले आहे म्हणजे ‘हेग’ हायकोर्टमध्ये डॉ.नागेंद्रसिंग म्हणून पहिले भारतीय न्यायाधीश तिकडे गेले आणि चेअरमन झाले. त्यांना ही कुंडलिनीची शक्ती इतक्या सटकन मिळाली की मला आश्चर्य वाटले. इतके ते कॉम्प्लिकेटेड लाईफमध्ये राहत होते आणि एवढे मोठे ते सरकारी अधिकारी होते, की प्रेसिडेंटरचे सेक्रेटरी होते, म्हणजे सर्वात मोठे होते आणि एवढे असूनही ते इतके भोळे होते, की असे हात केल्यावर लगेचच घटित झाले आणि त्यांना लवकर पटलेसुद्धा कारण देवीभक्त असल्याने मार्कण्डेय सगळा त्यांनी वाचून काढला होता. स्वतः आयसीएस असूनसुद्धा आपल्या धर्माची माहिती काही त्यांनी सोडली नव्हती. त्यांनी ती माहिती करून घेतली आणि बरोबर त्यांना पडताळा आला. मी लगेच मुंबईला परत आले, तेव्हा त्यांची बायको तिथे नव्हती तर प्लेननी त्यांनी तिला पाठवले, की जाऊन श्रीमाताजींकडून जागृती घे. त्यांची माझी ओळख पुष्कळ वर्षाची होती जुनी. पण मी कधी सांगितले नाही, की मी माताजी आहे वरगैरे. कारण माझ्या दुसर्या आयुष्यात, तुम्हाला माहिती आहे, आमचे यजमान म्हणजे कोण आहेत वगैरे आणि त्यांच्याबरोबर असल्याने त्यांना माझी ही माहिती नव्हती की माझे हे सुद्धा एक दूसरे जीवन आहे. मग त्यांना हे कळल्याबरोबर त्यांनी आपल्या बायकोला पाठवले की तुम्ही हिला पार करून घ्या. तसेच आपल्यामधले जस्टिस वैद्य म्हणून होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘मी माताजींकडे असा हात करून बसलो होतो.’ त्यांना आधी माझ्याजवळ बसवले होते. ते एवढे मोठे जस्टिस वैद्य असून त्यांना माझ्याबरोबर बसवले होते. ते म्हणाले, ‘नाही. मी माताजींसमोरच बसणार आहे.’ अत्यंत नम्र होते आणि बसल्याबरोबर त्यांनी सांगितले, ‘माझ्या हातावर जसे काही बर्फाचे दोन गोळे येऊन पडावेत आणि वितळत वितळत वर जावेत, असे झाले.’ त्याच्यानंतर त्यांची जी जागृती झाली ती त्यांना फार लाभदायक झाली. त्याच्यानंतर आणखी जस्टिस, म्हणजे कलकत्त्याचे जस्टिस मिश्रा वगैरे जे आहेत, ते पण पार झालेले आहेत. असे अनेक प्रकार झालेले आहेत. पण त्याचे असे आहे, की जोपर्यंत तुम्हाला झालेले नाही, तोपर्यंत त्याचा काहीही अर्थ तुम्हाला लागत नाही कारण याला काही जाहिरातबाजी नको, याला काही व्होटिंगची सिस्टीम नाही किंवा त्याच्यात आम्हाला काही मिळवायचे नाही. हे तुम्हालाच मिळायचे आहे. तुम्ही टिवल्याबावल्या केल्या समजा, हे फारच सोपे काम आहे. आजकालच्या काळामध्ये सगळ्यात सोपे काम आहे टिवल्याबावल्या करणे. टिवल्याबावल्या केल्या म्हणजे आपण अगदी फुशारकी मारून फार शिष्ट झालो. पण मिळाले काय? तुम्हाला मिळाले काय? तुम्हाला मिळवायचे आहे नां! आम्ही द्यायला आलो आहोत. तुमच्यापासून काही घ्यायला आलेलो नाही. असा विचार केला पाहिजे, की आम्हाला जर घ्यायचे आहे, पण ते आम्हाला मिळाले नाही. एक खेड्यातला मनुष्य हे समजतो, ‘माताजी, आम्हाला मिळाले नाही,’ म्हणून तो हट्ट धरून बसेल. ‘माताजी, आमचे झाले नाही हे कसे ?’ त्याला हे समजते. कारण त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल सेन्सिटिव्हिटी जी म्हणतात, ती सेन्सिटिव्डियु आहे. शहरात आल्यामुळे आणि शहराच्या या खोट्या आणि भ्रामक कल्पनांमध्ये राहिल्यामुळे आणि कृत्रिम जीवनामध्ये राहिल्यामुळे, आपल्यात इतकी कृत्रिमता आलेली आहे, की जे काही खरे आहे, जे काही इन्सेंशियल लाईफचे आहे, ते आपल्या हातून सुटलेले आहे . आणि त्यामुळे पुष्कळांना लवकर घटना होत नाही. तरीही जर लंडनसारख्या नरकामध्ये आम्ही हे कार्य केलेले आहे, तर राहुरी म्हणजे मला एक पुण्यक्षेत्रच वाटत आहे, आणि इथे तुमच्यासारखी शेतावर काम करणारी जी खरी मंडळी आहेत त्यांना तर हे झालेच पाहिजे आणि होणारच. पण फक्त हे की टिवल्याबावल्या करणे असे मूर्खपणाचे प्रकार ज्या लोकांना फार मान्य असतात, अशा लोकांना ही घटना होत नाही.

आता ही जी सहा चक्रे आहेत आपल्यामध्ये, त्यातले हे पहिले चक्र, त्याच्या नंतरचे म्हणजे दूसरे चक्र आपल्या हिशेबात धरले पाहिजे. त्याला स्वाधिष्ठान चक्र असे म्हणतात आणि या स्वाधिष्ठान चक्राने आपल्यामध्ये आपण कार्यान्वित होतो, म्हणजे यानेच विचार करतो. प्लॅनिंग करतो, यानेच आपण पुढचे सगळे जे विचार आहेत ते करीत असतो. म्हणजे तुमचा अभ्यास ज्याच्याबद्दल, तुमचे सायन्स वगैरे जे काही आहे ते तुम्ही यानेच करीत असता. यानेच तुमच्या काही काही ऑर्गन्सलासुद्धा काम असते. म्हणजे तुमच्या इथे लिव्हर, पँक्रियाज, किडनी, युट्रस या सगळ्या गोष्टींना या चक्रामुळे कार्यान्वित व्हावे लागते. म्हणून एका चक्रावर अनेक कामे असल्यामुळे, जर तुम्ही सारखा विचार करायला सुरुवात केली आणि अत्यंत विचार करायला सुरुवात केली, तर हे बाकीचे ऑर्गन जे मी सांगितले आहेत त्यांना काहीही पुरवठा होत नाही. त्याच्याचमुळे डायबेटिससारखे रोग किंवा लिव्हरचे रोग किंवा किडनीचे रोग होतात. आता मी जर तुम्हाला म्हटले, विचार करू नका तर तुम्ही लगेच म्हणणार, ‘माताजी, विचार केल्याशिवाय कसे होणार?’ आता सांगायचे असे, की एक असतो विचार आणि एक असते प्रेरणा. तुमचे जे काही सायन्स संसारात आले आहे ते प्रेरणात्मकच आहे. ते प्रेरणेमुळे आले आहे. विचार करून नाही आले. तुम्ही विचार करायला बसा, बघा आता विचार सुरुवात करा. म्हणजे कुठे चालला बघा वाहत, की आता माताजी बोलतायंत, खादीची साडी घातली आहे, कुठल्या व्हिलेजमधून आलेत, मग तिथल्या म्हशीवर आणि म्हशीवरून कुठे आणखी जाणार. असे विचार नुसते वाहत जातात. यांना काहीही अर्थ नसतो. यांचे काहीही फळ नसते, पण जर तुम्ही निर्विचारितेत आलात, समजा जर अशी घटना झाली, की तुम्ही निर्विचार झालात, तर त्यांच्यात प्रेरणा होते आणि प्रेरणात्मक जे ज्ञान आहे तेच बोध आहे. प्रेरणात्मक जे नाही आणि बाकी जे आहे तो नुसता विचार आहे आणि ते कृत्रिम आहे आणि त्याने काहीही लाभ होत नाही. ही विचार करण्याची जेव्हा एकदा सवय लागली म्हणजे परदेशात हे फार झालेले आहे-तेव्हा असे होते की, मनुष्य त्याला नुसती शिंगे फुटावीत असा विचार करू लागतो. त्याला विचार थांबविताच येत नाहीत आणि रात्रंदिवस तो त्या विचारात वाहन जातो. तर या सहा चक्रांमध्ये जे दूसरे चक्र आहे, त्याला आम्ही स्वाधिष्ठान चक्र म्हणतो, हे श्रीब्रह्मदेव आणि सरस्वती यांचे स्थान आहे. जेव्हा हे स्थान कुंडलिनीच्या आगमनामुळे जागृत होते, जेव्हा हे स्थान आलोकित होते तेव्हा माणसाला अनेक त्हेची काव्ये किंवा रंगसंगती वगैरे सुचतात. तो मोठा कलाकार होतो. आता आमच्या सहजयोगात एक गृहस्थ होते. त्यांची नोकरी सुटली आणि ते माझ्याकडे आले. त्यांचे हे चक्र फार छान होते. त्यांनी कधीच कलेचे काम केले नव्हते. त्यामुळे ते अगदी जसेच्या तसे होते तेव्हा हे चक्र एकदम आलोकित झाल्यावर, ते म्हणाले, ‘श्रीमाताजी, मी तुम्हाला काय करावे असे वाटते?’ मी म्हणाले, ‘तुम्ही इंटिरिअर डेकोरेशन करा.’ ते म्हणाले, ‘कधी मला हे माहिती नाही लाकूड कशाशी खातात. हे लाकूड कसले, ते लाकूड कसले याचे माझे कधी शिक्षण झालेले नाही.’ म्हटले, ‘तरी तुम्ही करा.’ मग त्यांनी एका शिपवरती त्यांना इंटिरिअर डेकोरेशन काम मिळाल्यावर आता ते लाखोपती झालेले आहेत आणि ते फार मोठे सहजयोगीसुद्धा आहेत. सांगायचे असे, की जर तुमचे हे चक्र आलोकित झाले तर अलौकिक अशी तुमच्यामध्ये धारणा शक्ती येते. त्या शक्तीमुळे तुम्ही अनेक कार्ये करता. यांच्यापैकी या ज्या इथे बसलेल्या आहेत, या लेखिका आहेत आणि त्यांनी लेखनाचे फार कार्य केलेले आहे. पण सहजयोगात पार झाल्यापासून त्यांचे जे लेखन कार्य सुरू झालेले आहे, ते अप्रतिम आहे आणि त्याला इतकी मागणी येते, की त्यांना समजत नाही की, ‘आता मी लिह तरी किती आणि काय.’ आता तुमच्याबद्दलही त्या लिहिणारच आहेत, की इथले कसे विद्यार्थी होते आणि त्यांनी कसे

ग्रहण केले आणि त्यांना कसा फायदा झाला. भाषण मात्र आज त्यांनी पहिल्यांदा दिले आणि मला म्हणाल्या, ‘मी कधीच भाषण दिलेले नाही.’ म्हटले, ‘तुम्ही नुसत्या उभ्या रहा. तुमच्यात सरस्वती बोलू लागेल. तुम्हाला काही काळजी नाही’ आणि अशा रीतीने तुमची सरस्वती जागृत होते. त्यानंतर आमच्या सहजयोगामध्ये अशी मुले होती की त्यांचे वडील त्यांना घेऊन आले, की आमचा मुलगा शिकत नाही. त्याचे शिक्षणाकडे लक्ष नाही. फार त्रास होतो वगैरे वगैरे आणि आज तोच मुलगा बी.एस.सी. प्रथम वर्गात आला. अशी अनेक उदाहरणे आहेत आणि तसेच तुमचेही होईल, जर तुमचे हे चक्र बरोबर जागृत झाले तर असे व्हायला काहीही वेळ लागणार नाही. त्याच्यावरचे जे चक्र, मी आपल्याला नाभी चक्र सांगितलेले आहे, ते विशेषतः शेतकरी लोकांना फार महत्त्वाचे आहे. कारण खाद्यान्न जे आपण खातो ते या नाभी चक्रातूनच पचविले जाते. आता आमच्या पुतण्या इथे आल्या नाहीत, त्यासुद्धा इथेच असतात. त्यांचीसुद्धा शेती आहे, अनेक आपले इथे जे प्राध्यापक आहेत त्यांनी शेती केलेली आहे. आपले माने साहेब आहेत. त्यांच्या घरी आम्ही त्यांना तीन सुकलेले नारळ दिले होते. त्यांनी विचारले, ‘याचे काय करायचे माताजी?’ म्हटले तुमच्या तिथले वातावरण जरा ठीक नाही, तेव्हा तुम्ही ते आपल्या घरात पेरून टाका. पेरल्यानंतर कोणी चुकून त्याच्यावर फरशीसुद्धा बसवली. पण त्याच्यात एवढे चैतन्य निर्माण झाले, की ते फरशी फोडून वर निघून आले. मी चव्हाण साहेबांकडे मागच्या वर्षी गेले होते. ते एक ब्रशचे लहानसे झाड त्यांच्याकडे होते आणि आज येऊन बघते तर त्याच्या डबल साईज झालेले ! तर ते म्हणाले, ‘श्रीमाताजी तुम्ही इथे आलात, उभ्या राहिलात, थोडीशी तुम्ही व्हायब्रेशन्स दिली असतील. कारण तुम्ही सांगितले की, याच्या पानांना थोडासा वास येतो वरगैरे आणि अगदी डबल साईजचे झाले आहे.’ तर अशाप्रकारे आपल्यामध्ये हे जे आलोकित झालेले हे व्हायब्रेशन्स येतात, हे स्वत: चैतन्य, शाक्तिमय आहेत आणि शक्तीच नाही तर सर्व संसाराची शक्ती, ज्याच्यावर हे विश्व चाललेले आहे, ती शक्ती आपल्या हातातून स्पंदित झाल्यामुळे ती बरोबर या गव्हांना आणि जे काही आपण खातो त्या अन्नाला वगैरे लागून आता प्रथमच मनुष्य आपल्या हातातून काही तरी निसर्गाला देतो आणि निसर्गाला प्लावित करतो. आता गव्हाचेसुद्धा मला अनेक लोकांनी सांगितलेले आहे, ‘माताजी, आम्ही गह लावले. आम्ही जेवढ्या एरियात गह लावले होते, तर त्या गव्हांना कीड लागली नाही.’ एक आणखी मजेदार गोष्ट कोणी तरी सांगितली. गह अगदी पाहण्यासारखे असतात. एवढे एवढे मोठे आणि पाणीदार असतात ते गह. त्यांनी सांगितले, ‘आम्ही हे गह एका कोठारात बंद करून ठेवले होते. आणखी पुष्कळ पोती होती. उंदरांनी सर्वतन्हेच्या गोष्टी ते पेंडसुद्धा खाल्ली. पण या गव्हाला त्यांनी हातसुद्धा लावला नाही.’ तांदुळाचीसुद्धवा अनेक उदाहरणे आम्हाला लोकांनी सांगितली. ज्या भागामध्ये तांदळ फारच थोडा होत असे तिथे दहा पटीने तांदूळ झाला आणि याचा स्वयंपाक केला तर इतका वास दरवळतो, की आपल्याला माहिती आहे, की बासमतीला एवढा वास नसतो, याला इतका वास आणि त्यांनी मला स्पेशली ते तांदळ आणून दाखवले आणि मला फार आश्चर्य वाटले, तसेच इथे एका ठिकाणी मी आले होते. मागच्याच्या मागच्या वर्षीची गोष्ट आहे. पपईचे झाड अगदी मरायला लागले होते. म्हटले, ‘तुम्ही याला काढू नका. मी व्हायब्रेशन्स देते. बघू काय होते.’ त्याला व्हायब्रेशन्स दिल्यावर दूसर्या वर्षी मी आले होते, तेव्हा पाहिले की, त्याला मोठमोठ्या पपया लागलेल्या होत्या. त्याचा रंग म्हणजे इतका गोल्डन आणि इतका सुंदर! तसेच इथे मी व्हायब्रेटेड केळ्यांचा रंग पाहिला. तर अगदी हे म्हणजे सायंटिफिकली बघण्यासारखे आहे, की व्हायब्रेशन्स देऊन कसे सकस धान्य निघते. त्यातून मग त्याच्यावर

कशी कृपा असते परमेश्वराची! कशी पाखरे, उंदीर खात नाहीत. त्यांनासुद्धा पावित्र्य समजते, की काही तरी पवित्र वाटत आहे आणि कशा रीतीने त्याचे संगोपन होते. पण हे सगळे तत्त्व समजून घेतले पाहिजे. त्याच्याही पेक्षा ते मिळविले पाहिजे. एखादा मनुष्य अगदी खेड्यातला असतो. त्याला काही सायन्स समजत नाही. आपल्या साईनाथांना काय सायन्स माहिती होते का? आपल्या ख़िरिस्तांनी कोणती युनिव्हर्सिटी जॉईन केली होती का? पण आज त्या ख्रिस्ताला मोठमोठे युनिव्हर्सिटीवाले जाऊन मानतात आणि म्हणतात, आम्हाला ख्रिस्तांनी हे दिले, ते सांगितले, ख्रिस्तांच्या सांगण्यात हे आहे. त्यांच्या वाक्यातून एक एक आज त्यांना एवढे दिसत आहे. म्हणजे काय, की हे जे शिक्षण आहे ते बरोबर आहे. शिक्षणाला काही माझा विरोध नाही. जी अविद्या आहे तिला जर विद्येत रूपांतर करायचे असले तर परमेश्वराचेच शिक्षण घेतले पाहिजे, की परमेश्वराने सृष्टी का केली, आम्हाला का केले, त्याची काय शक्ती आहे. ते सगळे वापरता आले पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही केवढे मोठे प्रचंड अधिकारी आहात. तुम्हाला ती शक्ती मिळू शकते आणि जनावराला काही ती मिळू शकत नाही. कोंबड्याला मिळू शकत नाही. आणखी कोणालाही ती मिळू शकत नाही. ही शक्ती फक्त मानवालाच मिळू शकते आणि तोच फक्त परमेश्वराला जाणू शकतो आणि तोच फक्त परमेश्वराच्या शक्तीचे चालन करू शकतो. तेव्हा आता जर अशी स्थिती आलेली आहे तर त्याला काही अमान्य करण्यात अर्थ नाही. प्रत्येक चक्र सांगायचे म्हणजे फार वेळ होईल म्हणून सगळे सांगत बसणार नाही. त्यासाठी आमचे हे सहजयोगी, त्या तिघांचे नाव म्हणजे लंडनला काय, स्वित्झर्लंडला काय सगळीकडे मानलेले आहे. आता जे पुस्तक छापण्यात येणार आहे, त्याच्यात राहरीचा फार विशेष उल्लेख केलेला आहे. अशा रीतीने या लहानशा दिसणार्या राहरीमध्येसुद्धा फार मोठे कार्य होत आहे. इथे येऊन या तीर्थभूमीत राहूनसुद्धा जर तुम्ही हे मिळविले नाही तर लोक तुम्हाला म्हणतील की तुम्ही राहरीत होता आणि हे एवढे मोठे कार्य तिथे होत असताना तुम्हाला कसे कळले नाही आणि माहीत झाले नाही. त्याला कारण काय? त्याला कारण असे, की आपण हे एवढ्या गहन स्थितीला पोहोचलो नाही. त्याला काही विशेष करावे लागत नाही. पुष्कळांना वाटते, की आम्ही योगात गेलो, की आम्हाला हे सोडावे लागेल, ते सोडावे लागेल वगैरे. काही सोडायचे नाही. या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. जर धरलेच नाही, तर सोडायचे काय असणार ? या सुद्धा कल्पना आहेत की आम्ही काही तरी धरले आहे आणि सोडायचे ही दसरी कल्पना आहे. तेव्हा काही सोडायचे नसते किंवा त्याच्यामध्ये काही मोठा त्याग करायला नको. फक्त माणूस असायला पाहिजे. आता समजा एखादा मनुष्य हिटलरसारखा असेल आणि मला म्हणेल, की माताजी तुम्ही आम्हाला दिलेच पाहिजे. तर तुमचा अधिकार नाही तो. थोडा परमेश्वराजवळसुद्धा बँक बॅलन्स पाहिजे की नाही? जर तसे असेल तर अवश्य मिळेल. एखाद्या मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली असेल किंवा आपल्या आईला मारून टाकले असेल किंवा फारच उपमर्द केला असेल किंवा त्यांनी कोणता तरी मोठा असा गुन्हा केला असेल की ज्याची परमेश्वर क्षमा करू शकत नाही, अशा वेळेला त्यांना पार होणे फार कठीण होते, पण अशी मी फारच कमी मंडळी बघितली आहेत. अजून तरी मला कोणी असा माणूस भेटलेला नाही. कारण परमेश्वर करुणेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. तो अनंत आहे आणि त्याच्यामध्ये सगळी तुमची पापे धुऊन निघतात. हे स्वत: मी डोळ्यांनी पाहिले आहे आणि असे लेक की ज्यांना मी कधीही समजत नव्हते, की पार होतील, ते सुद्धा अगदी सहजच पार झालेले आहेत, ही सुद्धा मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.

मोठमोठे जे लोक, आता मी सिंगापूरला गेले होते, तिथे एक गृहस्थ होते. ते रेस खेळायचे त्यांना फार धंदे आणि असे तसे होते ते. त्यांची बायको अगदी कंटाळून गेली होती, तिने मला सांगितले की, ‘माताजी, या माणसाला तुम्ही बदलवले तर मी तुम्हाला मानीन.’ म्हटले, ‘हे बघा, मला आव्हान द्यायचे नाही. बदलले तर बदलले. नाही तर नाही. आम्हाला कसलीच इच्छा नाही.’ त्या माणसाला घेऊन आले आणि ते पार झाले. आज त्या माणसाचे आयुष्य इतके निर्मळ आणि सुंदर झालेले आहे की त्यांच्या बायकोला आश्चर्य वाटले. त्यांनी दारू पिणे, सिगरेट पिणे सगळे काही सोडून टाकले. कारण असे, की आतल्या आनंदाची आपल्यामध्ये भरपूर देन असते. तेव्हा बाहेरच्या गोष्टींची काही मजाच वाटत नाही. मग तेच खावे, तेच बोलावे, तिथेच राहवे, त्याच्यातच रमावे अशी मजेची स्थिती होते. पण त्याच्यासाठी घरदार सोडायचे, लग्न करायचे नाही वगैरे असा काही प्रकार नाही. व्यवस्थित. आई-वडील ज्या घरामध्ये पवित्र भावनेने राहतात, तिथे मुले पवित्र भावनेने राहतात. त्याच ठिकाणी आमचा सहजयोग येणार आहे. या सन्यांशांसाठी नाही. ते नावाचे संन्यासी आहेत. वरती कशाला नावाच्या जाहिराती लावायला हव्यात! संन्यासी आहात ते तुमच्या आतून दिसले पाहिजे. तुमच्या वागण्यात दिसले पाहिजे. आता आपण या देशाची तरुण मंडळी आहात आणि तरुण मंडळींमध्ये जे व्हायचे ते घटित होत असते. परदेशातील तरुण मंडळीत आणि आपल्यात एक फार मोठा फरक आहे. फारच मोठा फरक आहे. तो मला नेहमी जाणवतो. तिथली तरुण मंडळी धक्के खाऊन आता अगदी विशुद्ध झालेली आहेत. त्यांना धक्के मिळाले आहेत पूर्णपणे आणि त्यांना हे कळलेले आहे, की धर्मांधतेत परमेश्वर नाही आणि नंतर मनुष्याला अगदी फार मोठा धक्का बसतो, जसे तिने सांगितले , की आम्ही खड्ड्यात पडलो आहोत. जो मनुष्य अगदी खड्ड्यात पडतो तो मग वरती यायला अगदी परत पूर्णपणे प्रयत्न करतो. पण अजून आपण खड्ड्यात पडलेलो नाही. त्या मार्गावर आहोत. म्हणून धावत सुटलो आहोत तिकडे. ते खड्ड्यात पडले आहेत म्हणून वर यायच्या मार्गावर आहेत. पडा. अशी गोष्ट आहे आश्चर्याची की, तुम्ही या योगभूमीत जन्मले आहात ते काहीतरी विशेष संपदेमुळे जन्मले आहात आणि ती संपदा तुमच्यात असल्याने तुम्हाला पहिल्यांदा लाभ होतो सहजयोगाचा. तिकडे मला फार मेहनत करावी लागते. पण तुम्हाला सहजयोग नको आहे आणि ज्यांना इतका त्रास होतो त्यांना इतका सहजयोग पाहिजे की तुम्हाला आश्चर्य वाटेल, की या लोकांनी मेहनत करून सबंध तुमच्या देवी – देवता अमुक-तमुक, शंकराचार्यापासून सगळे वाचून काढले सहजयोगानंतर. प्रत्येक गोष्टीचा अगदी गहन अभ्यास करून, सगळे शास्त्रीय आणि सारखा यांचा अभ्यास चालू आहे. आता दाखवायला नेले होते. गांधीजींबद्दल, की गांधीजींचे काय आहे ? तर त्यांची पुस्तके घेऊन ते सगळे वाचू शकणार आहेत, अगदी पूर्णपणे त्याच्यात पडलेले आहेत. आणि तुम्ही इथे एक-दोनच बघता. लंडनला अशी तीनशे माणसे आहेत. अगदी पूर्णपणे अभ्यासाला लागलेली आहेत आणि हजारो माणसे पार झालेली आहेत. तेव्हा त्यांच्यात आणि तुमच्यात फार अंतर हे आहे, की अजून तुमच्यामध्ये उच्छूृंखलता आहे. अजून तुमच्यामध्ये ती गहनता आणि ती स्थिरता आलेली नाही कारण एकदा जर तुम्ही पडलात की मग तुम्हाला परमेश्वर आठवेल. पण तसे आलेले नाही. अजून ही चालतं आपलं! हे केले तरी चालते ते केले तरी चालते! अशातली गोष्ट नाही. काहीही चालत नाही ! याच आयुष्यात तुम्हाला याचा अनुभव येईल. पुढे जायला नको. फार महत्त्वाची तुमच्या आयुष्याची ही वेळ आहे. या वेळेला, बांधणी काम जे खरेच करायचे आहे ते या वेळेला. या वेळेला तुमच्यात जे बांधून घ्याल तेच तुमचे पुढे दिसणार आहे. नाही तर तुम्ही अगदी कुचकामाचे, काहीही कामाचे तुम्ही राहणार नाही. तर यावेळेला तुम्हाला हा निश्चय करायला पाहिजे, की काहीतरी अमूल्य मिळवून स्वत:ला मौल्यवान करून घ्या आणि ते मौलिक तुमच्यात आहे. अनेकदा मी सांगते, तुम्ही या देशात जन्मला हेच त्याचे मुख्य तत्त्व आहे आणि या

देशात जन्मल्याप्रमाणे तुम्ही त्या मोठेपणाने आणि त्या गंभीरतेने हे घेतले पाहिजे. आपल्यात बसवून घेतले पाहिजे. या देशाचे जे काही वैशिष्ट्य आहे ते इतके मोठे आहे, की ते साऱ्या विश्वालासुद्धा पुरून उरेल. पण त्याची व्यवस्था तुम्ही करायला पाहिजे. तरुण मुलांनी करायला पाहिजे. पण आज आपला तरुण कुठे चालला आहे इकडे लक्ष दिले म्हणजे मला अगदी घाबरल्यासारखे होते. हे झालंय काय! हे कुचकामाचे कुठून जन्माला झाले या देशामध्ये! काही लक्षात येत नाही! पुष्कळशा ढोरांनी या जगामध्ये जन्म घेतलाय. तो सगळ्यांनी हिंदस्थानात घेतलाय की काय? कारण एका माणसाने ज्या दिशेने ओढायला सुरुवात केली की सगळे निघाले त्या दिशेला! म्हणजे सिनेमाचे नटसुद्धा तुमचे नेते झाले हे बघून मला अत्यंत आश्चर्य वाटले. सिनेमा बघायला काही हरकत नाही. पण ते तुमचे नेते होतात म्हणजे त्यांचे आयुष्य काही तरी गिरविण्यासारखे, कित्ता गिरविण्यासारखे आहे, असे तुम्हाला वाटायला लागल्यावर तुम्ही भारतातले आहात की कोणत्या मंकी प्रदेशातून आलेले आहात तेच मला समजत नाही. आपल्या भूमीचे ते वैशिष्ट्य आहे, त्याच्यातली जी मर्यादा आहे, आपण फार मोठी माणसे आहोत. एक-एक माणसाला हजारो माणसे मोजली तरी असे माणूस तयार व्हायचे नाही. असे आपण लोक आहोत. आपल्या घरा-दारातून अजूनही श्रद्धा वाहतेय , धर्म वाहतोय. आपण फार मोठ्या अशा वीरांच्या देशात जन्माला आलो आहोत. शिवाजी महाराजांसारखे असे चारित्र्यवान ज्या देशात जन्माला आले त्या देशातली ही मुले, वाईट वाटते बघून! पुष्कळदा आश्चर्य वाटते बघून! हे कसं झालेले आहे? का झालेले आहे? याला कारण काय? तशी तुमची प्राध्यापक मंडळी फार चांगली आहेत. जर प्राध्यापक मंडळी खराब असती तरी मला वाटले असते. तुमचे आई-वडील फार मोठे लोक आहेत. ही अशी मधली जनता कुठून आली! आज या जनतेमुळे देशाचे कल्याण होणार आहे. आज हे पुढारी वगैरे जे आहेत ते सगळे संपणार आहेत. तुम्हीच त्यांच्या जागी येणार आहात. तुम्हीच आमचे उद्याचे पुढारी आहात. तेव्हा तुम्ही स्वत:चे महत्त्व जाणून घ्या. स्वत:ची प्रतिष्ठा जाणून घेतली पाहिजे आणि स्वतःचा मान केला पाहिजे. आणि अनुकरण केले पाहिजे सत्याचे आणि जे असत्य, मूर्खपणाचे आणि उच्छृखल आहे ते फेकून दिले पाहिजे. उद्या तुम्हाला परमेश्वराच्या साम्राज्यात बसायचे आहे. तुमचा आम्हाला असाच मान केला पाहिजे, जसा आज या लोकांचा होत आहे. त्यांच्यापेक्षा अधिक मान तुमचा देशोदेशात होईल. मला आश्चर्य वाटते. मी जपानला गेले होते. मला लोक म्हणाले, ‘आम्हाला अजून एक ही हिंदुस्थानी भेटला नाही ज्याला योगाबद्दल काही माहिती आहे किंवा शंकराचार्यांबद्दल काही माहिती आहे. किती शरमेची गोष्ट आहे. मी केरळमध्ये गेले होते तिथे एवढे मोठे पत्रकार लोक आले होते. ते म्हणायला लागले, ‘माताजी, तुम्ही आम्हाला दारूची बाटली वरगैरे दिली नाही, तर आम्ही काहीच छापणार नाही.’ म्हटले, ‘चालते व्हा. दारूच्या बाटलीवर जर तुम्ही मला छापायला लागलात तर मला असे छापणेही नको की प्रसिद्धी नको.’ आणि त्यांना मी विचारले, ‘तुम्हाला आदिशंकराचार्य कोण होते माहिती आहेत का? ते तिथे केरळात जन्माला आले होते.’ तर ते म्हणाले, ‘आम्हाला माहिती नाही.’ म्हणजे ज्ञान तरी आहे का ? बोध तर सोडा. माताजींच्या जवळ येऊन त्यांना दारूची बाटली मागणे, काय म्हणावे यांना! तुम्ही उद्याचे नागरिक आहात. इतकेच नव्हे तर तुम्ही उद्याचे सहजयोगी आहात आणि इतकेच नव्हे तर परमेश्वरी साम्राज्याचे अधिकारी आहात. तुम्ही त्याच्यात रममाण व्हा आणि त्याच्या आनंदात तुम्ही पोहा. हाच माझा तुम्हाला पूर्णपणे आशीर्वाद आहे.