Parmeswarane Aplya Samrajyat Bolavale Aahe

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

परमेश्वराने आपल्या साम्राज्यात बोलवले आहे पुणे, २५/२/१९७९

पुण्यनगरीतीलपुण्यनगरीतील नागरिकांना माझे त्रिवार वंदन. आपल्यापुढे विस्तारपूर्वक सहजयोगाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण आपण परमेश्वराच्या दृष्टीने जर विचार केला तर माणसापेक्षा. परमेश्वराने ही सृष्टी रचली. आपल्याला माहीतच आहे, इथे पुष्कळ विद्वान लोक आहेत, की कशी पृथ्वीची रचना ओंकारापासून झाली आणि किती त्याच्यावर परमेश्वरानी मेहनत घेतली आहे. त्यापुढे त्या पृथ्वीवर वनस्पती, त्यानंतर अनेक प्राणी निर्माण करून त्यांची हजारो वर्षे जोपासना केली. त्या जोपासनेतून हळूहळू त्यांची निवड करून त्यांना या अशा स्थितीला आणून पोहोचवलंय जिथे आपण त्या प्राण्यांना मात करून आज मानव प्राणी तयार केलेला पहातो आहोत. याचं महत्त्व परमेश्वराला जास्त आहे, १ म्हणजे हा मानव किती मेहनतीने तयार केलेला आहे. हजारो वर्षे याच्यावर मेहनत करून आणि निवडसुद्धा फारच मेहनतीने करून याला आपल्याला जो गरजेंद्र मोक्षाचा प्रसंग माहिती आहे, तिथेसुद्धा मॅमल्स सारखे जे मोठे मोठे प्राणी होते त्यातले काहीतरी वाचवलेच पाहिजेत, पैकी हत्ती हा प्राणी हे देवीचे वाहन आहे. आपल्याला माहीत आहे, ते लक्ष्मीचे वाहन आहे, तसेच गणेशाचे स्वरूपही आहे त्याच्यात. तेव्हा ते वाचवण्यासाठी त्यांनी गजेंद्रमोक्षामधे जे अवतरण घेतलं, श्री विष्णूंनी त्याचं रक्षण केलं, ते काहीच नव्हतं, जे पुढे जाऊन देवीला आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, आपल्याला माहिती आहे त्यांच्या रक्षणासाठी त्यांनी अनेकदा या संसारात जन्म घेतला आणि किती तरी राक्षसांचं पारिपत्य केलं, त्यांच्याशी लढाया केल्या आणि आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे. ही मेहनत हजारो वर्षे चालली. चौदा हजार वर्षांपूर्वी सुद्धा लढाया होत होत्या. त्यानंतर श्रीरामांच्या काळातसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आठ हजार वर्षाचा काळ म्हटला पाहिजे, जेव्हा श्रीराम या संसारात पुरुषोत्तम म्हणून वावरत होते. त्यांना ते कार्य करायचं होतं, की एक आदर्श राजा कसा असला पाहिजे, त्याची चेतना, त्याचा बोध लोकांना व्हावा, तसेच त्याचं आयुष्य संपूर्ण कसं निर्मळ असलं पाहिजे, विशाल असलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे, हे त्यांनी आपल्या अवतारात दाखवलं. त्यानंतर राक्षसांचा वधसुद्धा करताना किती संकोच आणि किती मर्यादा, असं त्यांचं वागणं होतं . ते मर्यादा पुरुषोत्तमाचं अवतरणसुद्धा फार कठीण आणि मेहनतीचं होतं . पण त्यावेळची सर्व सामान्य जनता ही इतकी कृत्रिमपणाची नव्हती. त्यामुळे त्यांच्यामधे आत्मिक संवेदनशीलता फार होती. त्याला आपण स्पिरिच्युअल सेन्सिटिव्हिटी म्हणूया. त्यांनी श्रीरामांना ओळखलं होतं , सीतेला ओळखलं होतं , पण आजची तशी स्थिती नाही. तेवढी मेहनत जी त्यावेळेला झाली, ती नंतर श्रीकृष्णाच्या वेळेस परत दुसर्या तन्हेने बांधण्यात आली, पण श्रीकृष्णांनीसुद्धा फक्त अर्जुनालाच हे सगळं सांगितलं. कारण इतरांना सांगण्यामध्ये काही उपयोग नाही, बाकी सगळे महामूर्ख आहेत, त्यांना जर सांगितलं तर डोकंच फोडतील, नाही तर काही तरी उलटंच करत बसतील, म्हणून त्यांना कोणालाच ही गोष्ट सांगितली नाही. पण बऱ्याच लोकांनी त्यांच्या संहार शक्तीमुळे ओळखलं की, हेच ते श्रीकृष्ण आहेत. त्यानंतर कंसाचा वध वरगैरे झाला आणि त्यांनी हे सिद्ध करून दिलं की श्रीरामांच्या नंतर जे लोकांनी धर्मांधता होऊन आणि अनाचार मांडले होते, त्याला एक दुसरी बाजू आहे, ती परमेश्वराची साक्षी स्वरूपाची आहे. त्यांना सोळा हजार पत्नी होत्या. त्या कोण होत्या ? त्या त्यांच्याच सोळा हजार शक्त्या होत्या. त्यांनी त्यांना जन्म दिला होता. आम्हाला जसे सहजयोगाला सहजयोगी लागतात तसे त्यांना त्यांच्या शक्त्या हव्या होत्या. पण त्या कशा संसारात आणायच्या, तर त्या या रूपांनी त्यांनी १ संसारात आणल्या होत्या. ते योगेश्वर होते. ही गोष्ट काही खोटी नव्हे. त्या त्यांच्या शक्त्या होत्या, त्या त्यांनी स्त्री

रूपात या संसारात आणल्या होत्या आणि त्याचं पतित्व स्वीकारून त्यांचा उपयोग केला. शक्तीशिवाय कोणतेही कार्य होऊ शकत नाही. कंसाला मारण्याची गोष्ट आली तेव्हा राधालाच त्यांनी म्हटलं की, तुलाच येऊन त्याच्यावर आपला प्रहार केला पाहिजे. आता या गोष्टी फार गहन आहेत आणि मानवाच्या पलीकडच्या आहेत म्हणून त्या जास्त मी सांगत नाही कारण त्यांनी फक्त अविश्वासच निर्माण होईल. आता या कलीयुगामध्ये, ही जेवढी मेहनत परमेश्वराने केली, ही जी मानवाची रचना केलेली आहे ही जी बात सृष्टीची रचली आहे, तिला काही तरी अर्थ लागला पाहिजे. जर आम्ही एखादं घर बांधलं आणि त्याच्यावर कळस नसला तर त्या घराला काही अर्थ नाही. त्याच्यात कोण रहाणार? त्याचा उपयोग काय? तसंच मानवाने जोपर्यंत स्वत:चा अर्थ लावला नाही तोपर्यंत त्याच्यावर एवढी मेहनत केलेली वाया जाणार. त्याने स्वत:चा अर्थ लावलाच पाहिजे. त्याला कळलंच पाहिजे की त्या अमीबापासून मनुष्य का झाला आणि परत त्याला हे समजलं पाहिजे की जो परमेश्वर, ज्याने त्याला बनवलेले आहे, ज्याने सर्व सृष्टी रचलेली आहे, तो कोण आहे ? कसा आहे? काय आहे ? त्याची शक्ती काय आहे ? इतकंच नव्हे पण ती शक्ती त्याच्यातून वाहिली पाहिजे आणि त्यांनी जाणलं पाहिजे की ही परमेश्वराची शक्ती तशीच माझ्यातून वाहत आहे. जसे मुरलीमधून श्रीकृष्णाचे संगीताचे सूर वाहत होते. हे व्हायलाच पाहिजे. ते जर झालं नाही तर परमेश्वराला तरी कसा अर्थ लागणार ! परमेश्वराने सृष्टी घडवली, मानव घडवला की मानवाने परमेश्वराला जाणलं पाहिजे आणि ही साधी गोष्ट आहे. तुम्हाला मुलगा होतो, तुम्ही त्याला मोठं करता आणि आपली सगळी संपदा त्याला लिहून देता. तसंच परमेश्वराचं आहे. त्यांनी तुम्हाला निर्माण केलं, त्या स्थितीला आणून पोहोचवलं. आता त्याची अशी इच्छा आहे, की त्याची शक्ती तुम्हाला मिळावी. जसं तुमच्या संसारात आहे, तसंच परमेश्वराच्याही संसारात आहे. नाही तरी या संसारात जे काही आलेले आहे ते तिथूनच आलेले आहे. जसे तुमचे वडील तुमच्यावर प्रेम करतात, तसंच परमेश्वराचं तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. तुमच्या वडिलांमध्ये जो अंश आहे तो त्या सागरातलाच एक अंश आहे. अशा प्रेमळ पित्यापासून तुम्हाला जे काही मिळालेलं आहे ते तुम्ही अजून जाणलेलं नाही. ते तुम्हाला माहीत नाही. म्हणून त्याच्या अनेक तऱ्हा निघालेल्या आहेत. आता आमचा जन्म आम्ही महाराष्ट्रात का घेतला? महाराष्ट्र खरंच जसं नाव आहे तसाच महा+राष्ट्र आहे. ही संतांची भूमी आहे. हा परत एक इतिहास आहे. संतांनी या भूमीला सुंदर केलेलं आहे. आपल्या भक्तीनी, तुमचे धर्म सांभाळलेत, तुमचं पावित्र्य सांभाळलंय त्यांनी. हे कशासाठी ? रात्रंदिवस आपण यज्ञ करतो, पाठ करतो, मंदिरात जातो, चर्चमध्ये जातो, नमाज पढतो, ते कशासाठी ? करण्यासाठी म्हणून नाही तर काही तरी त्याचा हेतू पुढचा आहे. तो जो हेतू आहे तो आत्मज्ञानाचा आहे. आम्ही आपल्या आत्म्याला जाणलं पाहिजे, आत्म्याला ओळखलं पाहिजे ही त्याच्यामध्ये ओढ आहे म्हणून आपण हे सगळे करतो. १ पण आपण आत्ताच करून टाकलय हे सगळ काही. खर तर म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या आत्म्याला ओळखत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या नावाने आपण काही जरी केलं तरी ते परमेश्वराला पोहोचत नाही. ज्याप्रमाणे या इन्स्ट्रमेंटला हे कॉईल लागलेलं आहे, ते जोपर्यंत मेन्सला लागत नाही तोपर्यंत माझा आवाज तुमच्यापर्यंत जाऊ शकत नाही. तसंच जोपर्यंत संबंध परमेश्वराशी लागत नाही, तुमच्या आत्म्याच्या द्वारे, तो पर्यंत परमेश्वर काय आहे, त्याच्या मूर्तीला काय अर्थ आहे, त्याच्या पूजनाला काय अर्थ आहे किंवा तुम्हालाच काय अर्थ आहे, हे काहीही कळू शकणार नाही. ही एक साधी गोष्ट आहे. ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला हे कळू शकेल की सर्व धर्मांमध्ये इतकी धर्मांधता का आहे! तुमचा म्हणजे आपला टेलिफोन असला आणि त्या टेलिफोनचा जर आपण संबंध मेनशी लावला नाही तर त्या टेलिफोनवर आपण कितीही टेलिफोन केले तरीसुद्धा आपल्याला काहीही उत्तर मिळणार नाही. उलटा टेलिफोन खराब होईल. आत्म्याची ओळख पहिल्यांदा झालीच पाहिजे. ते अत्यावश्यक आहे, पण धर्म सांभाळावा

लागतो. जर तुमच्यात मानव धर्मच नसला, जर तुम्ही समजा पशू धर्मातले असलात तर कोणत्याही पशूला ही स्थिती येऊ शकत नाही. म्हणजे समजा या इन्स्ट्रमेंट मधून फक्त हा भाग तयार झालेला असला तर याला मेन्सला लावता येईल का? जोपर्यंत मानव तयार होत नाही तोपर्यंत कुंडलिनी वर येऊ शकत नाही. तेव्हा फक्त मानवालाच अधिकार आहे, की आपल्या आत्म्याला जाणायचं. जेव्हा हा आत्म्याला जाणण्याचा अधिकार मानवालाच मिळाला आहे तेव्हा मानवाचा जो धर्म आहे तो धर्म समजावून घेतलाच पाहिजे. आजपर्यंत जे साधू-संत झाले त्या सर्वांनी फक्त आपला धर्म सांभाळलेला आहे. दसरं काहीही केलेले नाही. त्यांनी आपला धर्म सांभाळला की तुम्ही धर्मामध्ये संतुलन ठेवा. धर्मात बरोबर वागाल. आपल्या देशामध्ये इतके साधू-संत झाले. नानक, कबीर झाले, आता, आपल्या इथे तर फारच मोठमोठे संत झाले. ज्ञानेश्वर झाले, तुकाराम झाले. सगळे संसारातच राहिलेले लोक आहेत. जंगलात पळून त्यांनी काहीही केलेले नाही. सगळं संसारात कार्य केलेले आहे. लोकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांनी कार्य केलेले आहे. कोणी जंगलात बसून, पहाडावर बसून त्यांनी काही केलेले आपल्याला माहिती नाही. आदिशंकराचार्यांनी जरी संन्यास घेतलेला होता, कारण कोणत्याही कार्याला वाहन घ्यायचं पूर्णपणे आणि त्यावेळी हीच प्रथा होती. नाही तर लग्नाशिवाय राहता येत नाही, मग हे करा, ते करा. आज तशी स्थिती नाही. त्यामुळे जरी त्यांनी संन्यास घेतला होता तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे, की काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत ते फिरले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी धर्माची स्थापना केली आणि बरोबर समजावून सांगितलं की आपला हिंदु धर्म काय आहे! आता हिंदू धर्माचं फार मोठं वैशिष्ट्य आहे हे आणि त्याने नुकसानही झालंय थोडंबहुत, की आपला हिंदू धर्म हा ऑर्गनाइज्ड नाही. ऑर्गनाइज्ड धर्म असला, जसा ख्रिस्ती धर्म आहे, मुसलमान धर्म आहे, त्याचे दोष दुसरे असतात की ख्रिस्तांनी सांगितलं ते तुम्ही ऐकलं पाहिजे किंवा मोहम्मदांनी जे सांगितलं ते ऐकायचं, पण स्वतः मात्र शोध लावण्याकडे अशा लोकांचं लक्ष नसतं कारण स्वतंत्रता नसते त्यांच्यात. त्यांनी ऑर्गनाइज्ड करून घेतलेलं असतं. त्याच्याबाहेर गेले की गेले. जर कोणी सुफी झाला तर तो मुसलमान मानला जात नाही. म्हणजे आपले शिर्डीचे साईनाथ आहेत, त्यांना मुसलमान लोक मानत नाहीत. तसंच ख्रिस्ती धर्मात जर कोणी सेंट झाला तर त्याला लोक धर्मातून काढून टाकत असत कारण त्यांचा धर्म ऑर्गनाइज्ड आहे. हिंदू धर्मात जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे, पुष्कळ लोक इथपर्यंत आहेत, आश्चर्य आहे. मी केरळला गेले होते. जिथे साक्षात आदिशंकराचार्यांचा जन्म झालेला आहे, तिथले गृहस्थ म्हणाले, ‘आम्हाला माहिती नाही त्यांचा जन्म कुठे झालेला आहे वगैरे. त्यांच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही.’ म्हटले , ‘तुमचा धर्म कोणता?’ तर म्हणाले, ‘हिंदू धर्म.’ मी म्हटलं, ‘चांगलं आहे.’ म्हणजे काहीही त्या धर्माबद्दल माहीत नसलं तरीसुद्धा लोक आपल्याला हिंदू म्हणवू शकतात हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. इतकंच नाही तर राजकारणात जरी कोणी म्हणालं की ‘आम्ही हिंदू धर्मी आहोत’ तरी चालेल. त्यांना धर्माबद्दल एवढीही कल्पना नसली तरी आपण हिंदू धर्मी होतो. याचा एक फायदा आणि नुकसानही आहे. एक त्यामध्ये मोठा फायदा असा झाला की, ज्या लोकांना परमेश्वराची ओळख करून घ्यायची होती, आत्म्याला शोधून काढायचं होतं त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य होतं आणि त्यामुळे कधीही कोणताही संत संसारात आला, मग तो मुसलमान असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कोणीही असला पण तो जर संत असला की हिंदू धर्मातल्या लोकांनी त्याला उचलून धरलेलं आहे. कारण त्यांनी संतपणा ओळखलेला आहे. त्यांच्या स्वातंत्र्यामुळे कधी कधी दूसरे परिणाम होतात आणि त्यातला दुसरा परिणाम असा आहे, की हिंदू धर्माबद्दल फारच थोड्या हिंदना खरी कल्पना आहे. असा मला फारच विरळा हिंदू मिळतो की ज्याला हिंदू धर्माबद्दल खरी कल्पना आहे. एक तर ब्राह्मणाचार नाही तर स्त्रियाचार ज्याला आपण म्हणतो त्याच्यात आपल्याला काहीही माहीत नाही. हे

ही आपल्याला माहिती नाही. हे का करायचं? कसं करायचं? आपण उगीचंच करायचं म्हणून करतो. देवळात गेले तर करतो. त्याबद्दल आपल्याला एक तऱ्हेचा आळसच म्हटला पाहिजे किंवा इन्डिफरन्स ज्याला म्हणतात तशी एक आपली स्थिती आहे, पण याच हिंदू धर्मामध्ये अनेक संत झाले आणि सगळ्यांनी एकच सत्य सांगितलं कारण संत झाल्यावर एकच दिसतं. केवढी गोष्ट या स्वातंत्र्यामुळे मिळाली आहे, पण तरी सुद्धा जी दूसरी पिढी ज्यांनी धर्माबद्दल कधी विचार नाही केलेला किंवा ज्यांनी धर्मांधता पाहिली आणि धर्माच्या नावावर चाललेले अनाचार पाहिले त्या लोकांनी मात्र अविश्वासाचं असं पांघरूण आपल्यावर घेतलेलं आहे की त्यांना समजावून सांगणं फार कठीण जातंय. इंग्लंडमधल्या लोकांना समजावणं सोपं आहे, पण हिंदुस्थानातले असे साहेबी लोक फार कठीण. मी तर त्यांना सगळ्यात शेवटी ठेवलेलं आहे की हे साहेब लोक येतील तेव्हा नंतर बघू. तरी ही स्थितीसुद्धा, ही वेळ सुद्धा सहजयोगाने बरोबर गाठलेली आहे. म्हणजे ऐतिहासिक वेळ आलेली आहे. प्रत्येक टप्प्याटप्प्याने मनुष्य वाढत वाढत विशुद्धी चक्रावर, आज्ञा चक्रावर तो स्वत:च आलेला आहे. त्याला तिथपर्यंतच ज्ञान आलेलं आहे. त्याला सहस्राराचं ज्ञान नाही. पण ज्ञान आणि बोध यांच्यामध्ये फार मोठे अंतर आहे. तुम्ही पुष्कळ पुस्तकं वाचली असतील, गीता वाचली असेल, ज्ञानेश्वरी वाचली असेल, नूसती वाचली आहे. वाचून बोध होत नाही. काहीही वाचलं नसेल त्याला सुद्धा बोध होऊ शकतो आणि ज्यांनी सगळं काही वाचलंय त्याला काही सुद्धा बोध होऊ शकत नाही. बोध ही आतील बांधलेली गोष्ट आहे. बांधलेली स्थिती आहे. आतमध्ये ती अवस्था आहे आणि वाचन हे बाह्यातले आहे. दोन माणसं ज्ञानेश्वरीची बसवली तर आपापसात वाद करतील. पण बोध झालेले दोघं बसवले तर आनंदात आपापसात प्रमोदात बसतील, की बुवा किती व्हायब्रेशन्स येत आहेत, किती थंड वाटते आहे आणि कसं काय आहे. एकच गोष्ट सगळे म्हणतील. कारण बोध हा सत्याचा असतो आणि ज्ञान हे सत्याचं ही असू शकतं आणि असत्याचही असू शकतं. त्याला जाणण्यासाठी अॅब्सल्यूट काही नाही. त्यामुळे बोध हा माणसाला झालाच पाहिजे. आणि हा बोध आत्म्याशी संबंध जोडल्यावरच होतो. म्हणून आत्म्याशी हा संबंध झालाच पाहिजे. आता सुशिक्षित लोकांचा मला जास्त ऋ्रास होतो. कारण कुठले तरी अमके होते, त्यांच्या पुस्तकात माताजी असं लिहिलं होतं. म्हणजे आता मी सगळी लायब्ररी वाचत फिरायला पाहिजे. पण मी मुख्य सांगते ते हे की तुम्हाला बोध घ्यायचा आहे नं, तर सगळी पुस्तकं तुम्ही जरा बाहेरच ठेवा. ते सगळे तुमच्या डोक्यात आहे. हृदयात काही सुद्धा नाही. तुम्ही हृदयातून विचार करू शकता का ? सहजयोग हा हृदयातून विचारतो. तेव्हा जेवढं काही तुम्ही वाचन केलं असेल ते बाहेर ठेवून यावं. याचा अर्थ असा नाही की, त्याला तुम्ही तिलांजली द्यावी. बुद्धीने माणसाने हे जाणलं पाहिजे, की या बुद्धीने आपण परमेश्वराला जाणू शकत नाही. ती अजून तोकडी पडते. बुद्धी जोपर्यंत प्रबुद्ध होत नाही, तोपर्यंत त्याबुद्धीने तुम्ही परमेश्वराला जाणू शकत नाही. कारण ती बुद्धी सीमित आहे. आणि असीमाला जाणायचं असेल तर या बुद्धीची सीमा तोडायला पाहिजे. हे अंतर तर लक्षात आलं तर सहजयोगाचं माहात्म्य, तुमच्यापेक्षाही परमेश्वराला अधिक आहे आणि त्यासाठी वाटेल ते करायला त्याची तयारी असलीच पाहिजे. आता नसते प्रश्न घेऊन काहीही वाद करू नयेत. आता यांनी आपल्यासमोर सांगितलं की, आदिशक्ती आहेत वगैरे हे बघितल्यावर सगळ्यांचे घोडे तयार होतात आमच्यावर यायला. ते सगळं विसरून जा. त्याला काही अर्थ नाही सध्या. त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला लागला पाहिजे. कारण माणसाचं डोकं इतकं विचित्र असतं, ते आम्हाला शिकण्यासाठी एवढी वर्षे लागली आणि आधुनिक मानव कसा आहे ते शिकण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यात पन्नास वर्षे खर्ची घातली. तेव्हा जाऊन कुठे आम्हाला सहजयोग, ज्याला म्हणतात, तो जमला. इतके परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स माणसाच्या डोक्यात असतात आणि त्याचे प्रकार इतके विक्षिप्त असतात की त्या प्रकारांना हे उघडायला गेलं तर ते बंद होतं आणि ते उघडलं तर हे बंद होतं अशी स्थिती आहे.

आता एक छोटीशी गोष्ट म्हणजे अशी की लंडनला एक गृहस्थ, ते खूप वाचन करून आलेले होते. तिथल्या लोकांना वाचनाची तर हौस खूप आहेच. पण एक शास्त्र घेतलं तर ते इत्थंभूत वाचून काढतात, तसं कुंडलिनीचं शास्त्र त्यांनी फार वाचलेलं होतं , ते वाचून ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, की आम्ही तर ऐकलंय की कुंडलिनीला एवढा त्रास होतो, त्याच्यामध्ये कुंडलिनी वर आली, की माणसं नाचायला लागतात. त्याच्यामध्ये त्यांना फोड येतात, अमूक होतं. आता मी बघतेच आहे हे सगळे मला माहितीच आहे आणि त्याच्यामध्ये हा त्रास होतो, तो त्रास होतो. फार कठीण काम आहे. वर्षानुवर्षे मेहनत करावी लागते वगैरे. एखाद्या बाईला पुरणपोळी छान करता येते. समजा ती त्यात माहीर आहे आणि तिला कोणी येऊन सांगितलं की ‘ही पुरणपोळी नाहीच मुळी, पुरणपोळीला फार त्रास पडतो. त्याला असं करावं लागतं, पीठ असं भिजवावं लागतं, त्याला तसं करावं लागतं, तर जमतं. हजारो वर्षात एखाद्यालाच जमलंय असं मी वाचलेलं आहे.’ एखाद्या पुरुषाने पुरणपोळी वर पुस्तक लिहिलंय समजा, तो ते असंच व्हायचं आणि त्याची अशी विल्हेवाट लागायची आणि त्याचा त्रास या बाईला पुरणपोळी येते तिला व्हायचा. तर सरळ म्हणायचं, ‘अहो, खाऊन तरी बघा. पुढे बोलू या!’ पण आधीच वाद की ‘हे फार कठीण आहे ! असं होतं, तसं होतं. याच्यात हे झालंच पाहिजे, त्याच्यात बेडकासारखं उडालंच पाहिजे. अमके तमके म्हणाले आणि तिकडे फलाणे म्हणाले,’ म्हणजे पूर्वीचा हा प्रकार वर्षानुवर्षे अजून माझ्या डोक्यावर आहे. तेव्हा लंडनलाच एका गृहस्थांनी, आमच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिलं, फार मोठं. त्या उत्तरामध्ये, मला वाटतं आता आपल्याला चव्हाणांनीही सांगितलंय, त्याचं उत्तर आहे. त्यांनी असं सांगितलं की कितीही काही कठीण असलं आणि जर ते होते आणि घटित होतं आणि आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलंय, मातारजींच्या पायावर आल्यावर कुंडलिनीचे स्पंदन हजारो लोकांचं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. तेव्हा तुमचं काही आम्ही मानायला तयार नाही. तुम्ही पुस्तकं वाचलीत पण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. स्पंदनं होतात. कुंडलिनी उठते, वर जाते. मग त्याचा निष्कर्ष काय काढायचा की ‘माताजी कोणी तरी विशेष आहेत.’ हे तुम्ही डोक्यात धरलं पाहिजे आणि ते तुम्ही डोक्यात धरा म्हणजे तुम्हाला कळेल कारण ‘माताजी फार मायावी आहेत आणि त्या काही तरी माया खेळतात आणि त्यामुळे तुमच्या लक्षात नाही येऊन राह्यलंय. तरी तुम्ही पार होऊन माताजींना जाणून घ्या. वाद घालू नका.’ तेव्हा ते मुकाट्याने पुरण पोळी खायला बसले. हा असला माणसाचा प्रकार असतो डोक्याचा. परमेश्वराने असा विचार केला नव्हता की माणूस डोक्याने एवढा विक्षिप्त होईल. त्यामुळे एका आईवर हे कार्य घातलं. कारण आईला एवढा पेशन्स असतो. आई शिवाय हे श्रीकृष्णाला जमलं नसतं. त्यांनी आपलं सुदर्शन चक्र चालवलं असतं. त्यांना जमणार नव्हतं. त्यांनी चूपचाप आपली चक्र चालवली असती किंवा श्रीरामांनी बाण लावले असते. त्याला आई पाहिजे मेहनत करायला आणि समजून घ्यायला, की माझी मुलं आहेत त्यांना पार न्यायचं आहे, त्याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. कधी बोलतील, कधी ओरडतील, पण माझी मुलं आहेत, जितक्यांना वाचवता येईल तितक्यांना वाचवलंच पाहिजे, हे आईलाच समजतं आणि तिला परमेश्वर तेवढी शक्ती सुद्धा देतो. मूल जन्मताना आईला इतक्या वेदना होत असतात, पण मूल जन्मल्याबरोबर सगळ्या वेदना ती विसरते आणि पहिला प्रश्न ‘मूल ठीक आहे नं ?’ हे थोड्या प्रेमाचं तुम्ही तिथे बघता. पण अनंत सागराचे सागर आईने पोटात घालून हा सहजयोग काढलेला आहे आणि त्या प्रेमामुळे कदाचित सहजयोग इतका कार्यान्वित आहे. मला स्वत:लाच इतकी कल्पना नव्हती. असं कधीही आमचं कोणत्या जन्मी झालेलं नाही, जे या जन्मी लोकांनी समजून घेतलं. पूर्वी आपल्याला माहिती आहे. संत म्हटला म्हणजे त्यांच्यासाठी पहिल्या तलवारी तयार व्हायच्या. नाही तर त्यांना क्रूसावर चढवून द्या. त्यांना विषाचे प्याले द्या, त्यांच्यावर साप सोडा, हे सगळे प्रकार झालेले आपल्याला माहिती आहेत. कोणाला संन्यासी म्हणून म्हणायचं, कोणाला काही म्हणून म्हणायचं. संतांचा छळ करणे हे लोकांचं ब्रीद वाक्य होतं , सर्वसामान्य लोकांचं. ते आता बदलून कलीयुगामध्ये बघा कशी

स्थिती आली आहे. तुम्ही सगळी कलीयुग म्हणता, पण मला तर अत्यंत आश्चर्य वाटतं की या धकाधकीच्या काळातच आज माणसाला सहजयोग पाहिजे आणि ती सर्व स्थिती अशी मंथनासारखी तयार झालेली आहे. आज त्याच्यातून लोणी निघालंच. सगळी स्थितीच अशी बनली आहे. ऐतिहासिक स्थिती अशी बनलेली आहे. या थराला गोष्टी पोहोचलेल्या आहेत की सहजयोग हा लाभला पाहिजे. यशस्वी झाला पाहिजे. त्यासाठी एवढंच सांगायचंय, तुम्ही काहीही करायचं नाही, काहीही तुम्हाला मेहनत नाही, आम्हालाच करायला लागणार आहे. तुम्ही जन्मलात, मानव देहात आलात यासाठी काय मेहनत केली तुम्ही? अमीबाचे माणसं होऊन बसलात, काय मेहनत केली आपण? परमेश्वर मेहनतीला आपल्याला घालत नाही. आपण आरामात असावे, पण पार झाल्यावर मात्र जेव्हा तुमची मोटार सुरू झाली तेव्हा मग तुम्ही ती वापरू शकता. पार झाल्यावर मात्र थोडीशी मेहनत करावी लागते. कारण जरी सहजयोगामध्ये अत्यंत सहज, सुलभ आणि हजारो लोकांना याचा लाभ होऊ शकतो, तरीसुद्धा ही अत्यंत सूक्ष्म स्थिती आहे. म्हणजे तुमच्यातला अंकूर फुटून त्याचा वृक्ष व्हावा. त्याचं फळ व्हावं आणि तुम्हाला आत्मबोध व्हावा, फारच सूक्ष्म स्थिती आपल्यात घडते. तेव्हा पार झाल्यावरच स्थिरावणं कठीण जातं आणि ती मेहनत थोडीशी करावी लागते. स्थिरावल्यावर मग मनुष्याच्या लक्षात येतं की आपण कुठे होतो आणि कुठे पोहोचलो. आमचे लंडनचे पुष्कळ सहजयोगी आता इथे आले आहेत. तसे या पद्धतीचे अजून तीनशे सहजयोगी तरी तिथे आहेत. त्याशिवाय हजारो लोकांना आम्ही पार केलेले आहे, पण याच्या-त्याच्यात हे संत नाहीत. त्यांनी आपल्याला पूर्णपणे स्थिरावून घेतलं आहे आणि काही काही याच्यातले लोक सहा महिन्यापूर्वी आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात सहा महिन्यात आम्ही किती विद्वान झालो, आमचं इतकं शिक्षण आहे, शिक्षित, सुशिक्षित, डॉक्टर्स, इंजिनियर्स आहेत. पण ते म्हणतात जे आम्ही सहा महिन्यात शिकलो माताजी, जे आम्ही जाणलंय, ज्याचा आम्हाला बोध झालेला आहे, किती प्रचंड आहे. आणि त्या बोधाचं एक सूक्ष्म तत्त्व आहे. फारच सूक्ष्म आहे आणि ते आपण समजून घेतलं तर लक्षात येईल, की परमेश्वराने तुम्हाला आपल्या साम्राज्यात बोलावलं आहे. आपले साम्राज्य तुम्हाला द्यायचंय त्याला. त्याची तयारी त्यांनी तुमच्यात केलेली आहे, तुमच्यात सगळे बांधून टाकलंय, तुमच्यात सगळें बिल्ट -इन आहे. आपल्यामधे फक्त त्याचा धागा, त्याचा अंकुर परमेश्वराशी मिळाला पाहिजे. तो मिळाल्याबरोबर तुमच्यातून ती शक्ती साक्षात वाह लागते आणि त्या शक्तीचं अवलोकन तुम्ही करू शकता, तिचं कार्य तुम्ही बघू शकता आणि किती ती प्रचंड शक्ती आहे, तिला तुम्ही जाणू शकता. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे नं कोणी तरी, सगळं काही! हातातून थंड वारे वाह लागतात. पुष्कळांनी मला विचारलं, की महर्षी रमण हे पार होते, रियलाइज्ड सोल होते मग त्यांना कॅन्सर कसा झाला आणि माताजी, सहजयोगाने कॅन्सर ठीक होतो, मग हे कसं काय ? मग सांगावं हे लागलं की त्यांची आई नव्हती त्यांना रिअलायझेशन देताना. त्यांना अपरोक्षपणे पार करण्यात आलं होतं. जर त्यांची आई असती तर सांगितलं असतं सिंपथेटिक नव्व्हस सिस्टीम काय असते , पॅरासिंपथेटिक काय असते आणि त्याचा संबंध कुंडलिनिशी काय आहे, हे सगळें तुम्हाला सांगायला कोणी तरी पाहिजे नं ! आता परवा आम्ही एका गुरूना भेटायला गेलो होतो. ते पाण्यात बसतात. मी त्यांना म्हटलं तुम्ही पाण्यात का बसता? ते म्हणाले, ‘मला सगळ्यांचं जळतं माताजी, मी काय करू? सगळ्यांच्या पासून आग येते मला, म्हणून १ मी पाण्यातच बसतो.’ आणि त्याच्यामुळे इतकं झालंय की, त्यांचे पाय अगदी लहान झाले आहेत आणि मासोळ्यांनी वर्गैरे पाय खाल्ल्याने फार दखापत झाली आहे. मी त्यांना मग बरं वगैरे केलं. त्यांनी मला ओळखलेलं आहे. माझ्या जन्मापासून त्यांना माहिती आहे. मी संसारात आलेली आहे. मी म्हटलं, ‘तुम्हाला माहिती आहे नं स्वत:ला कसं बचावून घ्यायचं.’ ते म्हणाले, ‘म्हणूनच मी जंगलात राहतो. मला ही माणसं नकोत. मला कोणाला भेटायचं नाही.’ सहजयोग्यांना संसारातून जायची गरज नाही. कारण ते सुद्धा त्यांना मला सांगायचंय आणि ते समजतात. एकदा तुम्ही शिकलात की बंधनं कशी घालायची? कसा स्वत:चा बचाव करायचा ? तर या संसारात

राहूनच व्यवस्थित, इथेच, ज्या स्थितीत तुम्ही वावरता, तुमची आई, वडील, पत्नी, मुले सगळे धरून इथेच हा योग घटित होतो. काही सोडावं लागत नाही. कुठे पळावं लागत नाही आणि इथेच सगळा लाभ होतो. त्या लोकांबद्दल माझे एवढेच म्हणणे आहे, की बिचारे त्या वेळेला एखाददुसराच पार व्हायचा आणि त्याला पूर्णपणे ज्ञान नसायचं. हळूहळू चाचपडून काय ते समजत असत. पण तरी सुद्धा त्यांनी आपली स्वच्छता करून घेतली होती. आणि ती स्वच्छता केल्यामुळे त्यांच्यामध्ये शक्तीचा संचय जास्त आहे. जरी शक्ती फार वाहत असली तरी हे ज्ञान नसल्यामुळे बचाव कसा करायचा? हे वेगवेगळे सैतानी प्रवाह कसे वाहतात? त्यांना कस कंट्रोल करायचं? त्यांच्यापासून कसं दूर रहायचं? त्यांच्यावर मात कशी करायची ? हे सगळं ज्ञान त्यांना कोणी न सांगितल्यामुळे ते जंगलात आणि दूर जाऊन राहतात. असे अनेक लोक मला भेटले आहेत. आमच्या सहजयोग्यांना भेटलेले आहेत आणि सगळे मला सांगतात, ‘माताजी, तुम्ही बारा वर्षे मेहनत करा, मग आम्ही येऊ. तुम्ही चौदा वर्षे मेहनत करा मग आम्ही येऊ.’ असो, पण तरीसुद्धा एवढी गोष्ट मात्र खरी आहे, की सहजयोग एकदा स्थिरावला म्हणजे शक्ती खरच प्रचंड येते. इतकी प्रचंड शक्ती येऊन जाते की आश्चर्य वाटतं की आमच्या हातातून हे वहातय तरी काय? सहजच तुम्ही कुंडलिनी वर करू शकता, सहजच लोकांना पार करू शकता. दूसरे म्हणजे ही वेळ अशी आलेली आहे, की जवळ-जवळ दहा वर्षापासून निदान मागच्या पाच वर्षात अनेक मोठमोठाले लोक जन्म घेत आहेत. माझ्याच घरी माझ्या तीन नाती आहेत आणि एक नातू आहे. चारही जण एकावर ताण एक आहेत आणि त्यांना इतकं बारीक समजतं सहजयोगातलं. आता अडीचच वर्षाची माझी नात आहे एक धाकटी. तिच्याकडे आमच्याकडची एक मुलगी गेली होती, इंग्लिश मुलगी. तिने तिला विचारलं, ‘अनुपमा मला काय आहे?’ तर तिने लगेच सांगितलं, ती थोडं इंग्लिश शिकलेली आहे आता, तिने तिला सांगितलं, ‘तुझी लेफ्ट नाभी आणि लेफ्ट विशुद्धी आहे.’ ती अगदी आश्चर्यचकित झाली. एवढ्याशा मुलीने लगेच कसं सांगितलं. लगेच तिने ते काढायला सुरुवात केली. हे बोध झालेले लोक आहेत. प्रबुद्ध लोक आहेत. ते जन्मापासूनच हे सगळं कुंडलिनी शास्त्र जाणतात आणि असे अनेक लोक या जगात जन्माला येतील. अजूनही पुष्कळ असे जीव संसारात येणार आहेत. आपल्या देशामध्ये तर विशेष लोक आहेत. आता दूसर्या देशामध्ये, मुलं काही विशेष जन्माला येणार नाहीत. त्याला कारण असं आहे, की इतकी नरकगती आहे सगळीकडे, पाश्चिमात्य देशात तर नुसता नरक उतरलेला आहे. त्या नरकामध्ये कोणी शहाणा जन्माला येणार नाही. वेडे येतील तर येतील किंवा अतिदृष्ट लोक येतील. आणि मग तिथून येतील तुमच्याकडे. तुमच्या पुण्याला काही येऊन राहिले आहेत तिथले. ते लोक असे का वागतात याचं कारण आहे. अतिशय निम्न स्थितीतले ते लोक आहेत. तसेच फार मोठ्या साधू-संतांनी तिथे जन्म घेतलेला आहे. ते सहजयोगाला प्राप्त होतात. फार मोठ्या साधू-संतांनी जन्म घेतलेला आहे. आता आपल्या देशामध्ये ही योगभूमी असल्यामुळे, फार महान भूमी असल्यामुळे असे मोठमोठाले संत जन्माला येतील, पण त्यांच्याबद्दल ही तुम्हाला बोध झाला पाहिजे, की ही मूलं काय आहेत ? यांचं वैशिष्ट्य काय आहे ? हे काय करतात? म्हणजे आता एका दुसर्याच दुनियेत आपण जाणार आहोत. हे आपल्याला आतपर्यंत दिसतंय. आपल्याला माहिती आहे की याच्यात इलेक्ट्रसिटी जाते म्हणून त्याच्यात लाईट येतो. हे सगळं मेलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काही जिवंत कार्य नाही. आता आम्ही जर हा खांब बांधला तर एक झाड नष्ट झालंय, त्याच्यापासून हा खांब केला आहे. जिवंत कार्य तर हेच आहे. मनुष्याने जर कधी जिवंत कार्य केलं असेल तर हेच की कुंडलिनीचे जागरण करणं आणि उत्क्रांतीची ती शेवटची पायरी आहे आणि या व्हायब्रेशन्समुळे इतकी जिवंत कार्य होत आहेत, की एखाद्या माणसाला समजा एखादा रोग झालेला असला, आता तो सांगतो, त्याला फार त्रास आहे. आई, मला फार त्रास आहे, लहानपणापासून. समजा या घराचा पाया मजबूत नसला, तर कितीही मेहनत केली तरी हे घर आपण मजबूत करू शकत नाही. तसंच, मानवाचं सुद्धा होऊ शकतं. लहानपणापासून तो जर खराब झालेला असला, मूलाग्रच त्याचं

खराब झालेलं असलं, अगदी पूर्णपणे तो वाया गेलेला असला तर त्याला आपण कसं ठीक करणार? म्हणजे आम्ही अशी माणसे पाहिली आहेत, की आम्ही सिंगापूरला गेलो होतो. तेथे एक मुसलमान मनुष्य होता. तो इतका बिघडून गेला होता की त्याची बायको त्याला घेऊन आली होती, की माताजी काही तरी तुम्ही याचं भलं करा, म्हणजे दारू पिण वरगैरे. त्याला काहीच नव्हतं. बाकीचे सगळे प्रकार तो करीत असे. आणि सर्वनाश त्याच्या फॅमिलीचा झालेला होता. आणि सहजयोगात पार झाल्यावर तो इतका पार बदलून गेला, की सहा महिन्यात लोक म्हणाले, की हे तेच गृहस्थ आहेत हे लक्षातसुद्धा येत नाही. कारण त्याने तुम्हाला आपल्या आत्म्याची ओळख होते. जेव्हा आत्म्याचे स्पंदन येऊ लागतं तेव्हा ते सगळीकडे पसरतं आणि आजपर्यंत जेवढी आपल्या मधली बिघडलेली यंत्रे आहेत मग ती मनाची असोत, बुद्धीची असोत किंवा शरीराची असोत, सगळी व्यवस्थित चालू होतात आणि हळूहळू असा मनुष्य पार बदलून जातो आणि तो बदललेला मनुष्य मुख्यतः फार संतोषी असतो. संतोषी असूनही त्याच्यामध्ये एक प्रचंड शक्तीचा वेग वाहत असतो आणि तो शक्तीचा वेग प्रेमाच्या शक्तीचा असतो. कुंडलिनी शक्ती ही प्रेमाची शक्ती आहे. ती तुमची आई आहे. जिला परमेश्वराने खास तुमच्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला अगदी वेगळी वेगळी शक्ती दिलेली आहे. केवळ तुमच्यासाठी म्हणून तुमच्यात ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तुमची उत्क्राती होणार आहे. अशी शक्ती कधी तुम्हाला दुःख देऊ शकेल का? तुमच्या आईने तुम्हाला कधी असं दुःख दिलेले आहे का? तुमच्या आईची जी आई आहे, ही कुंडलिनी शक्ती. ती सर्वांची आई आहे आणि तुमची विशेषकरून आई आहे. जे नुसतं आईपण आहे अशी शक्ती तुम्हाला कशाला त्रास देईल ? आणि परमेश्वराने तरी कधी अशी योजना केली असेल का? जे इतके परम दयाळू, कृपाळू आणि प्रेममय आहे, ते अशी व्यवस्था तुमच्यासाठी करतील का की तुम्ही कुंडलिनीची जागृती मागितली तर विंचवासारखं वाटेल, विंचू चावतात असे वाटेल किंवा आतून एखादा बेडूक निघाल्यासारखं वाटेल! एक गृहस्थ तर बेडकासारखे उडत असत. मला काही माहीत नव्हते. माझ्या प्रोग्रॅमला आले आणि माझ्याकडे असे दोन्ही पाय करून बसले कोल्हापूरला. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, ‘अहो, माताजींच्याकडे निदान पाय तरी करून बसू नका.’ ‘अहो,’ म्हणे, ‘असच बसू द्या मला. माझी कुंडलिनी जागृत झाली आहे आणि मी बेडकासारखा उडतो. जर असे पाय ठेवले तर मी बेडकासारखा उडायला लागेन.’ आता एक साधी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की जो मानव अतिमानव व्हायचा त्याला कोणी बेडूक करेल का? आता म्हणजे काय तुम्ही बेडूक, पिसवा आणि ढेकूण होणार आहात ? निदान आपली डोकी तरी गहाण ठेवू नये! पण अशा ठिकाणी मात्र लोक अगदी डोकी गहाण ठेवून जातात. फक्त आमच्या सहजयोगात म्हणजे वाद- विवाद करण्यात पटाईत. अगदी पटाईत असतात. आमच्या लंडनला एक लामासाहेब आले आणि त्यांच्याकडे एक मुलगी जात असे. तिनी मला सांगितले, की तो उपाशी ठेवायचा. त्यांना जेवण द्यायचच नाही म्हणजे असं की त्यांना अगदी अळणी जेवण द्यायचं. म्हणजे त्यांना संन्यासच घ्यायला लावायचा खाण्याच्या बाबतीत. वाटेल तसे वागले तरी चालेल. म्हणजे तुमचे कल्चरच असे आहे. तुम्ही कितीही मुली ठेवल्या, मुलं ठेवली काही हरकत नाही. फक्त खाण्याच्या बाबतीत तुम्हाला भुकं मारायचं. म्हणजे असे बिचारे आले त्यांच्यासमोर म्हणजे त्यांना म्हणे, तुम्ही आमच्यापुढे एक हजारदा वाकत रहा आणि त्यांनी जेव्हा सुरुवात केली, त्यांच्यात काही तरी भुते घालतात की काही कळत नाही बिचार्यांना. त्याच्या नंतर त्यांची अशी स्थिती करून टाकतात की सगळे काही, सगळे पैसे तुम्ही आमच्यासमोर देऊन टाका. हे सुशिक्षित लोक, इतके हशार म्हणविणारे, जगावर राज्य करणारे हे इतके मूर्ख कसे? मला हे समजत नाही की वाटेल तसे पैसे त्या माणसाला देतात. त्यांनी इतकं सांगितलं की एक प्रकारचा दगड असतो, त्या दगडाचंच मला हे पाहिजे. तो दगड मला पाहिजे आणि त्या दगडावर मी बसणार, उठणार आणि सगळे काही माझे व्हायला पाहिजे. त्यांनी तो आणला. तो दगड इराणला मिळतो आणि कुठून तिथून तो दगड आणला आणि तो दगड त्या माणसाच्या तिथे खाली लावला.

आता हे आपले आले, मोठे तिथून त्या तिबेटच्या लोकांना नुसतं भाजून खाल्लं होतं त्यांनी. तिथून इथे आले आणि या लोकांकडून पैसे घेऊन आपले बांडगुळासारखे, पॅरासाईट, तिथे बसलेले. आणि लोक त्यांना इतके पैसे देतात, म्हणजे ते कसे करतात, का करतात ? हे बुद्धीवादी लोक मूर्ख बनतात तेव्हा इतके का बनतात, समजत नाही. बहुतेक अहंकार मनुष्यामध्ये येतो असं मला वाटतं. बुद्धीवादी माणसामध्ये अहंकार येतो आणि अहंकार जर जास्त वाढला तर माणसाचं माकड होते. ते मला एकदा एका गावातले काही लोक एका मिनिस्टरला भेटायला गेले. तर त्यांचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी होते त्यांना अहंकार चढलेला होता. ते म्हणजे अगदी इकडून तिकडे माकडासारखे उड्या मारत होते. सगळ्यांना हे ते बोलत होते. तेव्हा त्यांनी त्यांना विचारले, तुमच्याबद्दल काही सांगा. ते हिंदीत म्हणाले, ‘आपको मालूम नहीं मैं पीए हूँ। ‘पीए’ म्हणजे प्यायलेला. ते म्हणाले, ‘अच्छा, अच्छा, अब मालूम हो गया, अब जा रहे हैं हम। त्या अहंकाराबद्दल आपल्या ह्याच्यामधेसुद्धा फार सुंदर गोष्ट रामायणात आहे. नारदाला एकदा अहंकार झाला होता आणि तो मायानगरीत गेला आणि कसा मूर्खात निघाला, तसं दिसतय मला. अहंकारामुळे मनुष्य इतका मूर्ख होतो. त्याला मूर्खात काढणारा आला तर तो मूर्ख बनतो आणि सगळे काही ज्याला आपण सुज्ञता म्हणतो ते सगळं त्या माणसाला अर्पण करतो. त्यामुळे हे लोक असे का झाले आणि असे का वागतात ते आपल्या लक्षात येईल. आता सहजयोगामध्ये मात्र आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. ती फार मोठी गोष्ट आहे. आपण पूर्णपणे स्वतंत्र आहात आणि स्वतंत्र आहात म्हणूनच माझ्याशी वाद घालता. आता त्या गोष्टीला मी फार मान देते आणि मला आवडतं की लोक स्वतंत्रपणे माझ्याकडे येतात. माझ्याशी स्वतंत्रपणे विचार विनिमय करतात, इतकंच नाही तर वाद घालतात, भांडतात, सगळं काही करतात. पण थोडं त्याच्यामधे जरा चुकतं की उगीचच कशाला वेळ घालवायचा. जर आम्ही म्हणतो कुंडलिनीचे वरदान घ्या तर घ्यावं. कारण आम्हाला तुमच्यापासून काय हव आहे ? आम्ही काही इलेक्शनला उभे नाही की आम्हाला काही पैसे नकोत तुमच्याकडून की आम्हाला जाहिरात नको की आम्हाला मोठेपणा नको. आम्हाला काहीही नको. आम्ही जर म्हणतो आहोत की आम्ही द्यायला आलो आहोत तर असा विचार केला पाहिजे की कुठे तरी एखादा असू शकतो मनुष्य की ज्याला काहीही न घेता द्यायचं आहे असा असूही शकतो. असा जर थोडासा विचार घेतला तर बुद्धीजीवी माणसालासुद्धा लक्षात येईल की हा भाग प्रेमाचा आहे. प्रेमात जो मनुष्य पूर्णपणे रंगतो तेव्हा हा विचार करीत नाही की याच्यात माझा काय फायदा होईल ? काय लाभ होईल ? त्याला बस प्रेम देण्यातच मजा वाटते आणि तो प्रेम देत राहतो. तेव्हा थोडासा आपल्या प्रेमाचा भाग जो आपण विसरलेलो आहोत, लहानपणी आईने आपल्याला फक्त प्रेमाने वागवले आहे. ही भारत प्रेमाची भूमी आहे. कितीतरी आपल्याला प्रेम मिळालेले आहे. आपल्या मित्रांनी, आपल्या वडिलांनी, आईने, समाजानेसुद्धा आपल्याला किती प्रेम दिलेले आहे, ते जर आठवलं आपण, तर सहजयोग फार घटित होईल. अशाप्रकारे सहजयोगाबद्दल थोडसं मी आपल्याला सांगितलं आहे, पण हा विषय इतका मोठा आणि विस्तारपूर्वक आहे की त्याच्यात कुंडलिनी कुठे आहे आणि ती कशी चढते ते मी उद्या सांगेन आपल्याला आणि जे फार मोठे आहे ते सगळें कळेल. ते सांगायला बसलं तर त्याला पुष्कळ दिवस पाहिजेत. कधी तरी मग पुण्याला निदान महिनाभर तरी राहीन आपल्याबरोबर, तेव्हा हे कार्य घडेल आता सध्या तरी त्या नरकातच मला रहावं लागतंय. काय करणार जसं नशिबात आहे तसं घ्यावं लागतं. तिथेच मेहनत करीत आहे मी, पण तरीसुद्धा मला पूर्ण आशा आहे की एक दिवस या पुण्यामध्ये मी परत येईन आणि आपल्या सगळ्यांना पूर्णपणे याच्याबद्दल सगळी माहिती इत्थंभूत देईन. आतासुद्धा इथे सहजयोगी मंडळी आहेत त्यांना फार माहिती आहे, त्यांनी फार मिळवलेले आहे. फार मेहनत केलेली आहे.