Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type

आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच्या या पुण्यभूमीत,  अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे, तेंव्हा गणेशाचे महात्म्य काय आहे, या अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नसतात याचे मला फार आश्चर्य वाटते. कदाचित जे सर्व काही समजत होते, ज्यांना सगळे काही माहीत होते असे जे मोठेमोठे साधुसंत ह्या आपल्या संतभूमीवर झालेले आहेत, त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार. किंवा त्यांचे कोणी ऐकून घेतले नसेल, पण याबद्दल सांगावे तितके थोडे आहे आणि एकाच्या जागी सात भाषणे जरी ठेवली असली, तरीसुद्धा श्री गणेशाबद्दल बोलतांना मला ती पुरणार नाहीत. 

आजचा सुमुहर्त म्हणजे घटपूजनाचा. घटस्थापना ही अनादि आहे म्हणजे ज्यावेळेला या सृष्टीची रचना झाली, अनेकदा. एकाच वेळी सृष्टीची रचना झालेली नाही तर ती अनेकदा झालेली आहे, जेंव्हा या सृष्टीची रचना  झाली तेव्हा आधी घटस्थापना करावी लागली. घट म्हणजे काय? हे अत्यंत सूक्ष्मात समजले पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जी एक स्थिती, परमेश्वराचे वास्तव्य असते, त्याला आपण इंग्लिशमध्ये entropy म्हणू.  जेंव्हा काहीही हालचाल नसते.  त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर ‘परमेश्वराला’ येते तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा समावते.  आता काहीतरी संसारामध्ये सृजन केले पाहिजे. क्रिएट केलं पाहिजे.  त्यांना ही इच्छा का होते? ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते हे समजणे माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. अशा पुष्कळशा गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण जशा आपण त्या सर्व मानून घेतो तसेच हे मानले पाहिजे की, परमेश्वराची इच्छा, हा त्यांचा आपला स्वत:चा शौक आहे. त्यांची इच्छा, त्यांना जे काही करायचे आहे ते करत असतात. ही इच्छा त्यांच्यामध्ये विलीन होते आणि ती परत जागृत होते. जसा एखादा मनुष्य झोपावा आणि परत जागृत व्हावा. झोपल्यावर त्याच्या इच्छा जरी त्याच्या बरोबर झोपल्या असल्या तरी त्या तिथेच असतात आणि जागृत झाल्या की कार्यान्वित होतात, तसेच परमेश्वराचे आहे. जेव्हा त्यांना इच्छा झाली की, आता एका सृष्टीची रचना करायची, तेव्हा या सर्व सृष्टीच्या रचनेची, इच्छेची, जी आपण म्हणू की तरंग आहेत किंवा त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र होतात. आणि त्या एकत्र झाल्यावर ज्या घटात भरल्या जातात, तो हा घट आहे. म्हणजे परमेश्वराची जी इच्छाशक्ती आहे .स्वतः . परमेश्वर जर वेगळा केला आणि त्याची   इच्छाशक्ती जर वेगळी केली व आपण तसे समजू शकलो तर … आपलेही तसेच असते.  आपण आणि आपली इच्छाशक्ती यात फरक आहे. ती  जी शक्ती  आहे ती प्रथम जन्माला येते. जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची इच्छा होत नाही तोपर्यंत   त्याचे रुपांतर होत नाही. म्हणजे आता हे जे एक आपले मोठे सुंदर जग बनवलेले आहे हे सुद्धा कोणाच्या तरी इच्छेचेच फळ आहे. प्रत्येक गोष्ट इच्छा झाल्यावरच कार्यान्वित होते आणि परमेश्वराची इच्छा ही कार्यान्वित होण्यासाठी ती  त्याच्यापासून वेगळी करावी लागते. परमेश्वरातच समाविष्ट राहिली तर ती सुप्तावस्थेत राहते. जेंव्हा ती त्याच्यापासून वेगळी होऊन आपल्या कार्याला लागते , तिला आपण ‘आदिशक्ती’ असे म्हणतो. 

ही प्रथम स्थिती जेव्हा आली तेव्हा घटस्थापना झाली. ही अनादिकालापासून अनेक वेळा झाली आहे आणि आजही आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्या अनादि , अनंत क्रियेला आठवतो. म्हणजे आपण ह्या वेळेला (नवरात्र प्रथमदिनी) ती घटस्थापना करतो. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही! लक्षात ठेवा. त्या वेळेला परमेश्वराने  इच्छा केली, ती कार्यान्वित करण्याच्या अगोदर ती एकत्रित केली. ती एका घटात घातली, ती इच्छा, आज आपण पूजीत आहोत. त्याचे आज आपण पूजन केले. ती इच्छा परमेश्वराला झाली. त्यांनी आज आपल्याला मनुष्यत्वाला आणले. एवढ्या मोठ्या स्थितीला पोहचवले, तेव्हा आपले परम कर्तव्य आहे की, त्याच्या ह्या इच्छेला आधी वंदन केले पाहिजे. त्या इच्छेला, आमच्या सहजयोगाच्या भाषेत श्री महाकालीची इच्छा म्हणतो किंवा महाकालीची शक्ती म्हणतो. ही महाकालीची शक्ती आहे आणि हे जे नवरात्राचे नऊ दिवसाचे (महाराष्ट्रात विशेषकरून) जे समारंभ होतात, ते ह्या महाकालीची, जी काही अनेक अवतरणे झाली त्यांच्याबद्दल आहेत. आताही महाकाली शक्तीच्या म्हणजे इच्छाशक्तीच्या पूर्वी काहीही होऊ शकत नाही. म्हणून इच्छाशक्ती हीआदि आहे आणि अंतही तिच्यातच होतो. पहिल्यांदा इच्छेतून सगळे निघते आणि शेवटी ते इच्छेतच विलीन होऊन जाते. तर ही श्री सदाशिवाची शक्ति,  आदिशक्ती आहे आणि ही महाकाली शक्ती म्हणून आपल्यामध्ये ती वावरत असते. 

(डावी कडचे दाखवा ) याठिकाणी जर हे परमेश्वर आहे असं समजलं, हे विराटाचे सूत्र असे समजले, तर  त्याच्यामध्ये डावीकडे जी शक्ती आहे, ती आपल्या इडा नाडीतून प्रवाहित असते व त्या शक्तीला महाकालीची शक्ती म्हणतात. हिचा माणसामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. प्राणीमात्रामध्ये तितका नाही. आपल्यामध्ये ती आपल्या उजव्या   साईडने जाते.  नंतर डावीकडून जाऊन, त्रिकोणाकार अस्थीच्या खाली गणेशाचे जे स्थान आहे तिथे जाऊन संपते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महाकालीच्या शक्तीने फक्त श्री गणेशाला जन्म दिला. तेव्हा श्री गणेशाची स्थापना झाली. गणेश हे सर्वात पहिल्यांदा स्थापन केलेले दैवत आहे आणि त्याचप्रमाणे जसे महाकालीचे आहे, तसेच श्री गणेशाचे आहे. हे बीज आहे आणि बीजातूनच सर्व विश्व निघाल्यावर परत बीजातच सामाविले जाते. तसंच सगळे गणेश तत्वातून निघून परत गणेशातच सामावले जाते. गणेश हा सर्व जे काही आहे त्याचे बीज आहे. जे आपल्याला समोर दिसते, कृतीत दिसते , इच्छेत दिसते त्याचे हे बीज आहे. म्हणून  गणेश हा सगळ्यात मुख्य देव मानला जातो. इतकेच नाही तर   गणेशाचे पूजन केल्याशिवाय, आपण कोणतेही कार्य करु शकत नाही. मग ते शैवाआईत असोत, वैष्णवाईत असोत, मग ते ब्रह्मदेवाला मानणारे असोत किंवा आणखी कोणी असोत. सगळे आधी  गणेशाचे पूजन करतात. त्याला कारण असे आहे की,  गणेश हे तत्व परमेश्वराने सर्वात पहिल्यांदा या सृष्टीत बसविले.  गणेश तत्व म्हणजे ज्याला आपण ‘अबोधिता’ म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये innocence म्हणतो. आता हे तत्व अगदी सूक्ष्म आहे. ते आपल्याला समजत नाही. बाल्यकालात जे लहान मुलांमध्ये वास्तव्य करते, ज्याचा सगळीकडे आपण अविर्भाव पाहतो व त्याचा सुगंध पसरलेला असतो. त्यामुळेच लहान मुले इतकी प्रिय वाटतात. असे जे ते  अबोधिताचे तत्व आहे,ते ह्या  गणेशामध्ये सामावलेले आहे. आता मानवाला हे समजणे जरा कठीण जाते की असे कसे एका देवतामध्ये हे सगळे सामाविलेले आहे?

 पण जर आपण सूर्याला बघितले तर सूर्यामध्ये प्रकाश देण्याची जशी शक्ती आहे, तशीच श्री गणेशामध्ये ही ‘अबोधिता’ शक्ती आहे. ही जी अबोधितेची शक्ती परमेश्वरांनी आपल्यामध्ये भरलेली आहे, ह्या अबोधितेच्या शक्तीला आपण पूजतो. म्हणजे आम्ही सुद्धा असे अबोध झाले पाहिजे. ‘अबोधिता’ चा अर्थ पुष्कळांना असा वाटतो की, आपण अज्ञानी झाले पाहिजे. अबोध शब्दामध्ये अर्थ असा आहे की, जे एक इंनोसन्स  जो एक भोळेपणा एखाद्या लहान मुलात असतो तो भोळेपणा  आपल्यामध्ये आली पाहिजे. हे किती मोठे तत्व आहे ते आपल्या लक्षात येत नाही. एक लहान मुलगा समजा खेळायला लागला. आजकालची मूले म्हणजे  त्यांना काहीही राहिलेलं  नाही. त्याला कारण आपणच आहोत. आपण  दुसऱ्यांना तरी सांगून काय सांगायचे. आम्हीच आमचे धर्म कसे पाळतो आहोत ? आम्हीच आमच्या धर्मात कितपत आहोत? आमच्या मुलांना किती धार्मिक करतो त्याच्यावर हे  अवलंबून आहे.  हे त्याचेच फळ असे समजले पाहिजे. बरं.  आता ही वेळ ‘अबोधिता’चे लक्षण आहे माणसामध्ये ,   ते एखाद्या लहान मुलाला बघून तुम्ही ओळखू शकता. एखाद्या माणसात   असते, तो कितीही मोठा झाला तरी त्याच्यात ती ‘अबोधिता’  असते. जसे एखादा लहान  मुलगा खेळात असेल तर  तो अगदी शिवाजी बनेल, किल्ला बनवेल, सगळं काही करेल, मग ते सगळे  सोडून तो निघून जाईल. सगळे करून सोडून द्यायचे. सगळे केले ते सोडून त्याच्याबद्दल तटस्थता ठेवायची. त्याच्यामध्ये काही आपले मन गुंतवायचे नाही. Involvement ठेवायची नाही. हे एक मुलांचे साधारण वागणे असते. तुम्ही कोणत्याही मुलाला काहीतरी दिले, तर ते तो जपून ठेवेल. फार वेळ ते जपून ठेवेल. आणखी नंतर मग थोड्या वेळानी त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. जर तुम्ही त्याला भुलवून ते काढून घेतले, तर त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. पण त्यातल्या त्यात काही काही गोष्टी लहान मुलगा सोडत नाही की जे त्याला फारच महत्त्वाचे असते. पैकी एक त्याची आई. त्याची आई तो सोडत नाही. बाकी सगळे  जगातले  काही तुम्ही काढून घेतले ….. त्याला ऐश्वर्य समजत नाही, त्याला पैसे समजत नाहीत, त्याला शिक्षण समजत नाही, काही समजत नाही  , फक्त त्याला त्याची आई समजते . ही माझी आई आहे. ही माझी जन्मदात्री आहे. हिने  मला जन्म दिलेला आहे. हीच माझे सगळे काही आहे. तो आईपेक्षा कोणत्याही गोष्टीला महत्त्व देत नाही. रविंद्रनाथ टागोरांनी एक फार सुंदर गोष्ट लिहीली आहे. एक लहानसा मुलगा बाजारात कुठे तरी हरवला आणि त्याला लोकांनी पकडलं आणि त्याला विचारलं की ‘तुला काय हवं?’ तो सारखा रडत होता. त्यांनी त्याला सांगितलं की ‘आम्ही तुला हे देतो,  घोडा देतो, हत्ती देतो.’ तो म्हणे, ‘काही नाही. मला माझी आई पाहिजे.’ आणि सारखा तो आईसाठी रडत होता. शेवटपर्यंत काही खायला दिलं तरी खाल्लं नाही. सारा दिवस रडत राहिला. त्याची आई जेव्हा मिळाली तेव्हा मग तो चूप झाला. 

म्हणजे आपल्या सर्वांमध्ये लहानपणापासूनच हे बीजतत्व आहे. की आपण आपल्या आईला सोडत नाही. ती आई आपली जन्मदात्री आई आहे. आपल्याला माहिती असते तिने आपल्याला जन्म दिला आहे. पण त्याशिवाय एक दुसरी आई परमेश्वराने आपल्यामध्ये आपल्याला दिली आहे आणि तीच आई म्हणजे  ही ‘कुंडलिनी’ आहे. कुंडलिनी माता, जी आपल्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये वेटोळे घालून  बसवली आहे. ती आपली आई आहे आणि आपण तिला सारखे शोधत असतो. आपल्या सर्व शोधामध्ये मग ते राजकीय असोत, सामाजिक असोत वा शैक्षणिक असोत. कोणत्याही गोष्टीचे तुम्हाला वेड असो, त्या सर्व वेडांच्या मागे   तुम्ही त्या   आईला शोधत असता. ही कुंडलिनी आई जी तुम्हाला त्या परमपदाला पोहचविते, की जिथे सर्व तऱ्हेचे समाधान तुम्हाला मिळते. ह्या आईचा शोध, आईप्रती ओढ, जी आपल्यामध्ये अदृश्यामध्ये असते, जी आपल्याला खेचते ती जागृत राहते  गणेश तत्वामुळे. ज्या माणसाचे श्री गणेश तत्व अगदी नष्ट पावलेले आहे, ज्याच्यामध्ये अबोधिता नाही. अबोधितामध्ये अनेक गुण माणसामध्ये दिसून येतात. म्हणजे आई, बहीण, भाऊ कितीही मोठे झाले तरी त्यांची पवित्रता ठेवणे. व्यवहारात राहतांना, समाजात राहतांना, संसारात राहतांना,  एक आपली पत्नी आणि बाकी सर्व जगाचे लोक जे कोणी आहेत, त्यांचे आपले पवित्र नाते आहे, असं जर तुम्ही समजलं की  असे परमेश्वराने  सांगितले आहे. आणि जर असे तुमच्या व्यवहारात दिसायला लागले तर मात्र मानले पाहिजे की, ह्या मनुष्यामध्ये खरी अबोधिता आहे. ते त्याचे खरे लक्षण आहे. अबोधितेचे लक्षण हे आहे की, माणसाला सगळ्यांच्यामध्ये पावित्र्य दिसते. कारण स्वत:मध्ये पावित्र्य असल्यामुळे, तो अपवित्र नजरेनी कोणाकडे बघत नाही.

 आता आपल्याकडे पवित्रता समजावून सांगायला नको. आपल्याकडे माणसाला पवित्रता काय आहे हे माहीत आहे. इंग्लंडमध्ये, अमेरिकेत समजवायला पाहिजे कारण त्यांची डोकी फिरलेली आहेत. पण तुम्ही अजून सुज्ञ आहात. देवकृपेने विशेषतः ह्या भारतात तरी , अष्टविनायक कृपेने म्हणा किंवा आपल्या पूर्वपुण्याईने म्हणा, किंवा आपल्या गुरुसंतांनी केलेल्या सेवेमुळे म्हणा या पृथ्वीवर ही (महाराष्ट्र)   एक अशी भूमी आहे की इथून ही पवित्रता मात्र अजून हललेली नाही. ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्या पवित्रतेचे तुम्ही आज पूजन काढलेले आहे. म्हणजे पूजन करतांना तुमच्यामध्ये ती पवित्रता आहे किंवा नाही इकडे लक्ष दिले पाहिजे. 

आता आमच्या सहजयोगात ज्यांच्यामध्ये गणेश तत्व नाही, त्यांच्यामध्ये पावित्र्य नाही. तो मुळी कामातून गेलेला आहे . त्यात आम्ही हात घालत नाही. पण तोंडावर सांगायची काही सोय नसते  की तुमच्यातलं हे पवित्र तत्व गेलेलं आहे. सगळं आम्हाला समजत असून सुद्धा आम्ही सांगू शकत नाही    कारण हा जो गणपती बसवलेला आहे  तिथे, तो म्हणजे श्री गौरीचा पुत्र आहे आणि गौरी म्हणजेच आपल्यामध्ये प्रादूर्भाव करणारी जी कुंडलिनी शक्ति आहे ती ही गौरीशक्ति आहे. म्हणजे आज श्री गौरीपूजन आहे आणि आज गणेश पूजन आहे ,म्हणजे केवढा मोठा दिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्यामध्ये जे  गणेश तत्व आहे, ते  गौरीला सांगते की, हा मनुष्य ठीक आहे किंवा नाही.  म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्था किती सुंदर केलेली आहे ती बघा.  की वरून ज्या दोन नाड्या येत आहेत इडा आणि पिंगला, आता सहजयोगाचं अगदीच वाचन आपण केलं नसेल तर थोडं कठीण जाईल. पण जरी लक्षात घेतलं तर इतकं कठीण नाहीये. इडा आणि पिंगला या दोन नाड्या आपल्यामध्ये आहेत. पैकी एक महाकाली आणि एक महासरस्वती. ह्या दोन नाड्या आहेत. ह्या महाकालीतूनच महासरस्वती निघालेली आहे. म्हणजे ती क्रियाशक्ती आहे. पहिली इच्छाशक्ती आहे आणि दुसरी क्रियाशक्ती आहे. या दोन्ही शक्तीतून, जे काही आपण ह्या जन्मात केलेले आहे, पूर्व जन्मात केलेले आहे, जे काय आपले सुकृत आहे आणि जे आपले दुष्कृत आहे, या सगळ्यांचा पाढा तिकडे बसून लहानसे आपल्यामध्ये जे श्री गणेश देव आहेत ते घेत असतात. ते बघत असतात की ह्या माणसांनी किती पुण्य केलेले आहे. आता पूण्य कशाशी खातात हे आजकालच्या मॉडर्न लोकांना माहीत नाही आणि त्याबद्दल त्यांचा विचारही नाही. लोकांना असे वाटते की, ह्याला काय अर्थ आहे ? पुण्य किती आहे ?   जर ती  पुण्ण्याची भावनाच नाही, तर पाप आणि त्याचे क्षालन वगैरे ह्या गोष्टी कळण्यात काही अर्थच राहत नाही. पण मानवाला पाप आणि पूण्य याचा भाव आलेला असतो. जनावराला तो नसतो. जनावरालाअ नेक भाव नसतात. आता समजा एखाद्या जनावराला तुम्ही शेणातून घेऊन गेलात किंवा घाणीतून घेऊन गेलात तर त्याला वास येत नाही. त्याला सोंदर्य कशाशी खातात ते माहीत नाही. तुम्ही मानव झाल्याबरोबर तुम्हाला पाप – पुण्याचा विचार येतो. तुम्हाला समजते की हे चुकलेले आहे. हे पाप आहे हे करु नये. हे पुण्य आहे, हे केले पाहिजे. पाप- पुण्ण्याचा निवाडा आपण करण्यापेक्षा, पाप –पुण्ण्याचा सबंध रोखाठोखा हा श्री गणेश आपल्यात बसून करत असतात. प्रत्येक मानवामध्ये श्री गणेशाचे स्थान आहे आणि ते प्रोस्टेट ग्लँड च्या जवळ असून, त्याला आम्ही मूलाधार चक्र असे म्हणतो. त्रिकोणाकार अस्थीला मूलाधार असे म्हटले आहे. तिथे कुंडलिनी आई बसलेली आहे. त्या त्रिकोणाकार अस्थीच्या खाली, श्री गणेश आरामात जाऊन तिथे तिची रक्षा म्हणण्यापेक्षा, तिच्या लज्जेचे रक्षण करीत असतात. 

आता आपल्याला असे माहीतच आहे की, श्री गणेशाची स्थापना श्री गौरींनी कशी केली. तिचे लग्न झाले होते, पण अजून पतीशी भेट झालेली नव्हती. त्यावेळी ती आंघोळीला गेली होती आणि आपल्या अंगातला मळ काढून…   आता बघा हातामध्ये सबंध जर व्हायब्रेशन्स आहेत, म्हणजे त्या सगळ्या शरीराला सुद्धा चैतन्य लहरी  असल्या आणि हे चैतन्य जर वाहत असेल आणि ते जर  तुम्ही मळात घेतले, तर त्या मळालाही ते चैतन्य येते. त्या मळाचा तिने गणपती केला आणि तो आपल्या नहाणीच्या बाहेरच्या बाजूला ठेवला. आता बघा आपल्या नहाणीच्या बाहेरच्या बाजूला ठेवला, समोरच्या बाजूला ठेवला नाही कारण नहाणीतून सगळी घाण वाहत असते. आपल्याकडे पुष्कळांना माहीत असेल की, नहाणीतले पाणी जेव्हा वाहते तेव्हा त्याच्यावर पुष्कळदा अळूची पाने किंवा कमळाची फुलेसुद्धा लोक लावतात आणि तिथे ती चांगली लागतात. आश्चर्याची गोष्ट आहे की, जिथे फार डबकं असेल तिथेच कमळाची फूले लागतात. त्याचेच उदाहरण श्री गणेशाचे आहे. म्हणजे घरातला सर्वात घाणीचा जो प्रदेश आहे, त्या घाणीवरती हे कमळ लागलेले आहे आणि तो आपल्या सुगंधाने ,त्या सर्व घाणीला सुगंधीत करत असतो. ही जी त्याची शक्ति आहे, ती शक्ति आपल्या आयुष्यात सुद्धा फार मदत करते. आपल्यामध्ये आसपास जी काय घाण दिसते ती ह्या गणेशतत्त्वामुळे सुरक्षित होते. आता ह्या गणेश तत्त्वाने कुंडलिनीचे म्हणजे श्री गौरीचे आधी पूजन करावे लागते. म्हणजे तुमच्या श्री गणेश तत्त्वाने आधी तुम्हाला आपल्या कुंडलिनीचे पूजन करावे लागते. म्हणजे काय,… आपल्यामध्ये अबोधिता आणायला पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल की हे जे गणेश तत्व आहे, ज्यावेळी आपले कुंडलिनीचे जागरण होते,( श्री माताजी इतरांशी बोलत आहेत) त्यावेळेला श्री गणेश तत्त्वाचा सुगंध सबंध शरीरात पसरतो. पुष्कळांना विशेषत: सहजयोग्यांना, ज्या वेळेला कुंडलिनीचे जागरण होते, तेव्हा सुगंध येतो. कारण श्री गणेश तत्व हे पृथ्वी तत्वातून  बनविले आहे.  किंवा पृथ्वीलाच गणेश तत्वातून बनवलंय. ह्या श्री महागणेशातून पृथ्वी बनवलेली आहे. तर आपल्यामध्ये जो गणेश आहे तो सुद्धा पृथ्वी तत्वातून बनवला आहे.

 आता आपल्याला माहिती आहे की, सगळे सुगंध पृथ्वीतून येतात. सगळ्या फुलांचे सुगंध पृथ्वीतून येतात. त्यामुळे कुंडलिनी जागरण होतांना पुष्कळांना अनेक तऱ्हेचे सुगंध येतात. इतकेच नाही तर सहजयोगी मला सांगतात की, श्री माताजी तुमची आठवण आली की, अत्यंत सुगंध येतात आणि तुमच्या शरीरातून पण असे सुगंध येत असतात असं लोक सांगतात. पुष्कळांची कधी कधी गैरसमजूत होते की, श्री माताजी काही तरी सेंट लावतात, पण तसे नाही. जर तुमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत असेल तर आतून सुगंध येत असतो. तऱ्हेतर्हेचे सुगंध माणसाच्या अंगातून येत असतात.

पण काही आपल्याला माहीत असतील की, असेही जगामध्ये साधूसंत आहेत  जे स्वत:ला साधूसंत म्हणवतात आणि त्यांना सुगंध चालत नाही. स्वतःला परमेश्वर म्हणवतात व त्यांना सुगंध चालत नाही. आपल्याकडे व्यवस्थित लिहीले आहे. कोणतेही देवाचे वर्णन वाचलेत. विशेषत: गणेशाचे, तर तो सुगंधप्रिय आहे. इतकेच नाही तर तो कुसुमप्रिय आहे व तो कमलप्रिय आहे. तसेच श्री विष्णूच्या वर्णनात लिहीलेले आहे, श्री देवीच्या वर्णनात लिहीलेले आहे. त्याचा अर्थ असा आहे की, ज्या लोकांना सुगंध प्रिय नाही व ज्यांना सुगंध चालत नाही त्यांच्यात काहीतरी  दोष आहे.  ते परमेश्वराच्या विरोधात आहेत. त्यांच्यात परमेश्वरी शक्ति नाही हे अगदी हमखास. ज्या माणसाला सुगंध मुळीच चालत नाही, त्यांच्यात काहीतरी परमेश्वराच्या विरोधातील बसलेलं आहे. कारण सुगंध पृथ्वी तत्वातले महान तत्व आहे. योगभाषेमध्ये त्याला अनेक नावं आहेत. ते सांगून काही उपयोगाचे नाही . त्यांनी आणखी तुम्हाला विचार येईल पण सांगायचे म्हणजे असे की, जी काही पंचमहातत्व  आहेत आणि त्यांच्या आधी त्याची जी काय प्राणतत्वे आहेत, त्या प्राणत्वातला आद्य म्हणजे सुगंध. त्या तत्वांनीच  आपली पृथ्वीही झालेली आहे. त्या प्राणतत्वानेच घडवलेला हा श्री गणेश आहे. तेव्हा श्री गणेशाचे पूजन करतांना, पहिल्यांदा आपण स्वत:ला सुगंधीत केले पाहिजे, म्हणजे काय की आपापले जीवन हे अति सूक्ष्मातून सुगंधित झाले पाहिजे. बाह्यत: नाही. वरून जितका मनुष्य दुष्ट असेल, वाईट असेल तितकाच तो दुर्गंधी असतो. आमच्या सहजयोगाच्या दृष्टीने असा मनुष्य दुर्गंधी होय.. वरून जरी त्याच्यातून सुगंध येत असला तरी तो मनुष्य काही सुगंधी नाही. सुगंध असा असला पाहिजे की, मनुष्याला आकर्षण वाटले पाहिजे. एखाद्या माणसाजवळ जाऊन आपण उभे राहिलो आणि जर आपल्याला त्या माणसाबद्दल सुप्रसन्न वाटले आणि पावित्र्य वाटले तर तो मनुष्य खरा सुगंधित आहे. नाहीतर  असा मनुष्य असेल की, ज्याच्यातून संपूर्ण लालसा आणि घाणेरड्या प्रवृत्त्या बाहेर वाहत आहेत, अशा माणसाजवळ जाऊन जर आपण उभे राहिलो  तर अशा माणसाला बघून काही काही लोकांना बरेही वाटत असेल, तर हे त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीवर अवलंबून आहे. पण ते लोक काही श्री गणेश तत्वातले नाहीत. श्री गणेश तत्वाचा मनुष्य हा अत्यंत सात्विक असतो, पण तरीसुद्धा त्या माणसामध्ये एक तऱ्हेचे विशेष आकर्षण असते. त्या आकर्षणात एवढे पावित्र्य असते, की ते पवित्र आकर्षणच, माणसाला सुखी ठेवते. आता आकर्षणाच्या कल्पनासुद्धा फार विक्षिप्त झाल्या आहेत. त्या गणेश तत्वाच्या विरोधात आहेत. त्याला कारण असे की, माणसांमध्ये श्री गणेश तत्व राहिले नाही. जर माणसात श्री गणेश तत्व असले तर, आकर्षण सुद्धा आपल्या श्री गणेश तत्वावर असते. सहजच आहे.  आपले आकर्षण आहे ते तत्व आपल्यात असल्याशिवाय तिथे आपले आकर्षण कसे होणार! 

एक फार प्रसिद्ध मोनालिसाचे चित्र आहे. आपण ऐकलच असेल ‘लिओनार्द – द – विंची’ ने ते काढलेले फार सुंदर चित्र आहे आणि ते पॅरिस लूव्र म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. आता त्या चित्राला पाहिलं, त्या बाईला पाहिलं तर ती फार सुस्त बाई आहे. काही विशेष तिच्यात आजकालच्या मॉडर्न बायकांच्या दृष्टीने आणि ब्यूटीच्या ज्या मॉडर्न आयडियाज आहेत त्या दृष्टीने तिला कधीही ब्यूटीक्वीन म्हणणार नाही आणि तिच्या तोंडावर एक त-हेचे स्मित आहे, ज्याला ‘मोबाईल स्माईल ऑफ मोनालिसा’ म्हणतात आणि त्या स्माईलवरच लोकांनी हजारो वर्ष मेहनत करुनसुद्धा त्यांना अशा तऱ्हेचे परत काढता आले नाही. हे जे प्रसिद्ध चित्र आहे, त्यामध्ये मुख्य काय असेल म्हणजे ह्याचं तत्व काय आहे तर ते म्हणजे पावित्र्य. त्या चित्रात इतके पावित्र्य आहे की ते आकर्षक आहे. आणि आजकालच्या आधुनिक काळात, विक्षिप्त आणि विकृत भावनेच्या मागेसुद्धा, मला आश्चर्य वाटते हजारोनी लोक तिथं ते नुसतं चित्र बघण्यासाठी लूव्रला येतात. जर ते चित्र त्यादिवशी नसेल तर कोणीही आतमध्ये येत नाही. इतकं मोठ ते म्युझियम आहे पण कोणीही आतमध्ये यायला तयार नाही. जर ते चित्र बघायला मिळणार नसेल तर. म्हणजे त्या चित्रात काहीही नाही. ती बाई अगदी सध्या वेशात ,साधे तिचे केस आहेत आणि असा चेहरा अत्यंत साधा असतांनासुद्धा त्या चित्रात असं कोणतं आकर्षण आहे? पावित्र्य . पावित्र्य हे त्याच आकर्षण आहे.

पण आजकालच्या आधुनिक काळात जर तुम्ही पावित्र्याच्या गोष्टी केल्या, तर आपले जे मोठमोठाले बुद्धीजीवी लोक आहेत त्यांना मुळीच पटत नाही. त्यांना वाटते ह्या काहीतरी जुन्या कल्पना आहेत आणि ह्या जुन्या कल्पना म्हणजे  हे नका करू, ते नका करू, हे असे नाही केले पाहिजे, ते तसे नाही केले पाहिजे. अशा रितीने तुम्ही लोकांना कंडिशनिंग करता आणि तसे करून मग मनुष्य वाईट मार्गाला लागतो. आता सांगायचे म्हणजे असे की, माणसामध्ये पावित्र्य हे पवित्र आईवडिलांच्या संगतीनं येते. पहिल्या प्रथम आई . ती आईच जर पवित्र नसली, तर मुलाचे पवित्र असणे फार कठीण आहे. पण एखादा जीव असतो सुद्धा की, मी असं पाहिलेलं की, अत्यंत वाईट मार्गाला लागलेल्या बाईच्या पोटीसुद्धा  जन्माला येतो आणि तो एवढ्यासाठीच येतो की, त्या बाईचा उद्धार करावा. आणि स्वत: तो फार मोठा जीव असतो. मोठा पिंड असतो आणि विशेष पुण्यवान आत्मा त्या ठिकाणी जन्माला येतो. म्हणजे असे की, जसे घाणीत कमळ फुलावे तसा तो तिथे जन्माला येतो असे मी पाहिलेले आहे. लंडनला विशेष करून मला फार आश्चर्य वाटलं अशी काही लहान मूलं आहेत ज्यांच्या आयांना आपण दारातसुद्धा उभं करणार नाही. असे जरी असले तरी ही म्हणजे एखादी अपवादात्मक गोष्ट आहे. स्वभावत: जर आई, पवित्र बाई असली तर, मुलगा किंवा मुलगी हे पवित्रपणाला फार सोप्या रितीने पोहोचतात किंवा   सहजपणे त्यांना पवित्रपणा लाभतो. आपल्याकडे म्हणून आई विरूद्ध बोललेलं कुणाला चालत नाही. एक अक्षरसुद्धा आईविरूद्ध बोलले तर धावून येतात . पण अशा किती आया आजकाल आहेत ज्यांच्यामध्ये हे पावित्र्य आहे. पावित्र्यामध्ये आईचे जे मुख्य असते, ते म्हणजे तिला आपल्या पतीसाठी निष्ठा असायला पाहिजे  पहिले. जर  पार्वतीला   शंकराची निष्ठा नसती तर तिला काही अर्थ आहे का ?  पार्वतीला काहीच अर्थ नाही जरी ती शंकराच्या वर शक्तीशालिनी  वाटली, कारण ती शक्ती शंकराची आहे. श्री सदाशिवाची ती शक्ति जरी असली, तरीसुद्धा तीनी पहिल्यांदा शंकराला वरण केलं, त्याच्या पुढे मान झुकवली आहे. आणि तेव्हाच ती शक्तिशालिनी मानली गेलेली आहे. पण ती त्याची शक्ति आहे. 

परमेश्वराचे किंवा देवतांचे वेगळे असते आणि माणसांचे अगदी वेगळे असते. त्यांना हे समजायचे नाही. त्यांना हे समजतच नाही की, नवऱ्याचे आणि बायकोचे इतके पटलेले की, त्यांच्यात दोन भागच नाही. जसा काही चंद्र आणि चंद्रिकाअसो किंवा सूर्य आणि सूर्याचे किरण असो  तसा एकपणा माणसाला समजतच नाही. माणसाला असे वाटते की, बायको आणि नवरा यांच्यात भांडणे ही झालीच पाहिजेत. जर भांडणे नाही झाली तर काहीतरी अस्वाभाविक गोष्ट आहे. अशा रितीचे एक अत्यंत पवित्र बंधन नवऱ्यात आणि बायकोत किंवा आपण म्हणू श्री सदाशिवात आणि श्री पार्वतीत होते व त्यांचा पुत्र हा श्री गणेश, पार्वतीने नुसत्या आपल्या पावित्र्याने जन्माला घातला म्हणजे त्याच्यात तिने बापाचाही भाग घेतलेला नाही. म्हणजे नुसत्या आपल्या पावित्र्याने व आपल्या संकल्पाने तिने  गणेशाला जन्म दिलेला आहे. ही  केवढी मोठी गोष्ट आहे. तिच्या पावित्र्यानी, ते संकल्पानी तिने हे करून दिलेले आहे. सहजयोगातसुद्धा फक्त आमचे जे काही पुण्य असेल, ते आम्ही पणाला लावलेले आहे. त्या पणानी  ज्या लोकांना व जितक्या लोकांना जन्म देता येईल तितक्यांना द्यायचा असा आमचा, आपल्या जीवनाचा आम्ही हाच एक अर्थ काढलेला आहे. 

आता इथे माझ्या आधी इतके वक्ते माझ्याबद्दल सांगून गेले. तुम्ही त्याचा काही विचार घेऊ नका. आधी जोपर्यंत तुम्हाला माझ्याबद्दल काही मिळत नाही, अनुभव मिळत नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टीत अडकू नका. या गोष्टीनी लोकांच्या डोक्यांना आठ्या पडतात. इतकच नाही लोकांना राग येतो. आता या मुलाला सुद्धा राग आला. कारण हे म्हणाले की श्री माताजी देवी आहेत. असं म्हटलेलं लोकांना अजिबात आवडत नाही.(माताजी इतर सहज योग्यांशी बोलतात ही पार मंडळी आहेत ). त्याचा रागच येतो. आणि  राग येणं हे माणसाच्या स्वभावाला अनुसरून आहे. की तुम्हाला कोणी देवी म्हटलं की झालं. देवी म्हटलं की लोकांना राग येतो. पण मूर्ख लोकांनी आपण स्वत:ला देवता किंवा भगवान म्हटले तरी मात्र लोक त्यांच्यापुढे अगदी डोके टेकतात. त्यांना मग हे अगदी भगवान वाटतात .  त्यांना अगदी नागवे करून जरी नाचवले किंवा त्यांना अगदीच पैशांनी वगैरे जरी नागवे केले तरी चालेल. पण त्यांना भगवान म्हणतील. पण जे खरे आहे ते समजून घेतलं पाहिजे.  आणि जर ते आपल्याला मिळाले,   समजले  की, त्याला काय अर्थ आहे आणि का असे म्हणावे लागते ? व का असे मानावे लागते ? ते मी आज सांगणार आहे. 

म्हणजे श्री गणेशाला जर तुम्ही देवच नाही मानले तर तुमचे काहीही चालू शकत नाही आणि चालत नाही. पण ते प्रत्यक्षात दिसत नाही म्हणून लोकांना कळत नाही. म्हणजे एक डॉक्टरसुद्धा घरी श्री गणेशाचा फोटो ठेवेल. त्याला कुंकू लावेल अथवा त्याला टिळा लावेल. आणखीन जर त्याला मी सांगितले की श्री गणेश तत्व हे तुमच्यामध्ये शारीरिकरीत्या स्थित असते तुम्हाला त्याने शारीरिक फायदा होतो, तर कधीही तो मानायला तयार होणार नाही. पण त्याला मी सांगितले की, तुम्ही श्री गणेशाचे फोटो काढून ठेवा तर ते ही मानायला तयार होणार नाहीत. पण जर मी म्हटले श्री गणेश तत्वाशिवाय तुम्ही चालू हलू शकत नाही तर ते ही गोष्ट मानायला तयार नाहीत. त्यांना असं वाटतं की त्यासाठी डॉक्टरच पाहिजे.  आता देवत्व आपण मानत नाही    गणेशांचे. पण सहजयोगात हमखास मानावे लागते. त्याला कारण असे आहे की, जो काही त्रास तुम्हाला जर ह्या श्री गणेश तत्वामुळे झालेला असेल तर मात्र तुम्हाला श्री गणेशालाच आळवावे लागते. म्हणजे असे आहे की, गणेश तत्व  – समजा प्रोस्ट्रेटे ग्लॅण्डचा त्रास असला …. आता एक अनुभवाची गोष्ट सांगते. आमचे शिष्य आहेत अग्नीहोत्री म्हणून. त्यांचे नाव राजवाडे पण त्यांनी अग्नीचे मोठे मोठे यज्ञ केले म्हणून अग्नीहोत्री राजवाडे असं पडलं आहे. फारच पट्टीचे सहजयोगी आहेत. २- ३ वर्षापूर्वी एक दिवस माझ्याकडे आले व म्हणाले, ‘मला काही त्रास नाही, फक्त प्रोस्टेटचा त्रास आहे.’ मला मोठे आश्चर्य वाटलं. हा एवढा मोठा गणेश पूजक व सहजयोगी, त्यांना प्रोस्टेट चा त्रास कसा होणार? कारण प्रोस्टेटचा त्रास गणेश तत्वाच्या त्रासाने किंवा गणेश रुसण्यान होतो.  यांच्यावर गणेश रुसण्याचे कारण नाही. कारण हे पट्टीचे सहजयोगी आहेत आणि माझ्यावर त्यांची श्रद्धा आहे व अत्यंत भोळा मनुष्य. मग हे गणेश तत्व त्याच्या हातात कसे उलटे चालू लागलं ते माझ्या लक्षात नाही आले. मी त्यांना म्हटले, “घ्या की थोडा प्रसाद.” प्रसाद म्हणून चणे असतात. ते दिल्यावर त्यांच्या बरोबरचे म्हणाले,”आज दादा काही खात नाहीत. ” म्हटलं “का? म्हणे आज संकष्टी आहे. म्हटलं आज का नाही खात तुम्ही?” म्हणे, “सगळ्यांनी सांगितलयं की संकष्टीला चणे नाही खायचे.” म्हटलं हेच चुकलंय. संकष्टी म्हणजे  गणेशाचा वाढदिवस. आता बघा तुम्ही सगळे शिकलेले. कोणी काही सांगितलं तरी बुद्धी वापरली पाहिजे. सतर्कतेने घेतले पाहिजे. संकष्टीला आम्ही उपवास करतो. संकष्टी किंवा गणेश चतुर्थी हे त्याचे जन्मदिवस आहेत. त्याच्या जन्मदिवशी तुम्ही उपास करता, म्हणजे काय सूतक पाळायचे आहे का? एक साधी गोष्ट आहे, मनुष्याचे जे expression असते किंवा मनुष्य जे दाखवतो दुःख झाले किंवा सुख मिळाले. जर घरात कोणी मनुष्य मेला तर आपण जेवत नाही. आता जर तुमच्या घरी मुलगा झाला किवा नातू झाला तर तुम्ही पेढे वाटाल, मेजवान्या द्याल, समारंभ कराल. मग श्री गणेश जन्माला आले तर तुम्ही उपाशी बसाल, तर मग होणारच प्रोस्टेट चा त्रास, मग युट्सचा कॅन्सर. तो सुद्धा याच्यामुळे होतो. श्री गणेश तत्वाला जर तुम्ही नीट वागवले नाही तर म्हणजे तुमच्या मुलाला नीट वागवले नाही तर, जर तुमच्यामध्ये मातृत्व नसले तर, ह्या सर्व गोष्टीमुळे युट्रसचा त्रास होतो. श्री गणेश तत्वाचे काही काही फार अगदी पवित्र नियम आहेत. ते जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला युट्सचा त्रास होतो. पण हा त्रास, एक डॉक्टर, श्री गणेशाशी लावू शकत नाही.  त्याचा संबंध श्री गणेशाशीच आहे. ते तो लावू शकत नाहीत. तो फक्त इथपर्यंत येतो की, प्रोस्टेट ग्लॅन्ड खराब झाली आहे किंवा फार तर पेल्व्हिक फ्लेक्सिस खराब झाले आहे. पण ह्याच्या मागचे जे अंडर करंट्स आहेत किंवा ह्याच्याअंतर जे परोक्षज्ञानाने जे जाणले जातात किंवा ज्याला म्हटले पाहिजे की अलख आहे, जे तुम्हाला दिसत नाही, त्यासाठी तुमच्याजवळ अजून डोळे नाहीत, त्यासाठी तुमच्याजवळ अजून संवेदना आलेली नाही, अजून तुमची परिपूर्ती झालेली नाही. तेव्हा तुम्ही कसे लक्षात घेणार की, हा त्रास श्री गणेश तत्व बिघडल्यामुळे झाला आणि श्री गणेश च आमच्यात रागावलेला आहे. तेव्हा त्या दैवताला प्रसन्न केल्याशिवाय आम्ही सहजयोग करु शकत नाही. असे म्हटल्याबरोबर ते डॉक्टर एकदम घसरले. गणेशाचे नाव घेतल्याबरोबर सगळे  डॉक्टर एकदम घसरतात की आम्ही श्री गणेशाला मानायला तयार नाही. आम्ही फक्त सायंटिस्टना मानतो. मग बसा. तुमचा कॅन्सर वगैरे त्रास  गणेश तत्वाला मानल्याशिवाय ठीक होणार नाही. श्री गणेश तत्व बिघडल्यामुळे कॅन्सर होतो. श्री गणेश तत्व जर आपल्यामध्ये बिघडले कारण ते हर एक ठिकाणी प्रत्येक अणू-रेणूत सगळीकडे संतुलन बघत असते.  तेंव्हा ते जर बिघडलं तर आपल्याला कॅन्सरचा रोग होतो. आता आम्ही कॅन्सर ठीक करतो, केला आहे आणि करणार, पण आमचा काही हा धंदा नाही.  म्हणजे आता तर मी म्हटलंय , तुम्ही सर्व कॅन्सर पेशंट्सना शोधून काढून नका कृपा करून. कारण आम्ही पुष्कळांना ठीक केलं आणि बिलकुल बेकार गेले ते. इथे सुद्धा दोन चार बसलेले असतील. पण बहुतेक ते मग सहज योगाला येत नाहीत. पुढे वाढवत नाहीत. परत कॅनसर झाला की ” माताजी तुम्ही आम्हाला एकदा बरं केलं होतं, तर परत कसा झाला ? तुम्ही सहज योग्य केला का  पुढे? तुम्ही त्याच्यावर मेहनत केली का? विचार केला का? तुम्ही गणेश स्तवन केलं का? तुम्ही गणेशाला समजले का? तसे काही नाही. आम्ही तुमचा फुकट ठीक केला कॅन्सर. एक पैसे घेतला नाही. परत आम्ही तुमचा ठीक करायचा आणि तुम्ही जरासुद्धा पुरुषार्थ करू नये?   

 तेव्हा श्री गणेश तत्व किती महत्त्वाचे आहे, त्याला किती महात्म्य द्यावे तेवढे थोडे आहे. हे अत्यंत सुंदर असे चार पाकळ्यांचे श्री गणेश तत्व आपल्यामध्ये असते आणि ह्या चार पाकळ्यांच्या श्री गणेश तत्वामध्ये बसलेला मधोमध गणेश, जो आहे तो आपल्यामध्ये ज्याला आपण पेल्विक प्लेक्सस म्हणतो, म्हणजे ही नुसती फिझिकल साईड आहे. नुसत्या फिझिकल साईडला तो बघत असतो. म्हणजे आपल्या शारीरिक साईडला     त्याच्यातले एक एक अंग आहे. म्हणजे त्याला जे  अनेक अंगे आहेत. त्यापैकी पहिले अंग म्हणजे शारीरिक अंग म्हणा किंवा मानसिक अंग. आता मानसिक अंगाचे जे बीज आहे ते श्री गणेश तत्व.  तुम्ही पाहिलं आहे, आता मी दाखवलं की इच्छाशक्ती म्हणजे जी डावीकडची शक्ती आहे जी आपल्याला सगळ्या भावना देते. त्या भावनेच्या मुळातच   गणेश बसल्यामुळे ज्या माणसाला वेड लागले असेल, त्याचे श्री गणेश तत्वच खराब असले पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की, तो मनुष्य अपवित्र आहे. पण त्याच्या  पवित्रतेला धक्का लागला. त्याच्या पवित्रतेला कुणी ठेच मारली, तरीही त्याला होऊ शकते. एखाद्या माणसाला जर दुसऱ्या माणसाने खूप छळले, तरी त्यांचे श्रीगणेश तत्व  बिघडू शकते कारण त्याला असे वाटते की परमेश्वर आहे    तर मग ह्या माणसाचा छळ का नाही करत ? हा मनुष्य मला इतका सतावतो का? जर परमेश्वर आहे, जर गणेश आहे, तर याचा वध का नाही करत ? त्याच्या हातात परस आहे, तर त्याला मारून का नाही टाकत?  असे प्रश्न त्या माणसाला उभे झाले की, हळूहळू त्याची डावी बाजू खराब होत जाते आणि ती खराब झाली म्हणजे मग त्याला वेड लागायची पाळी येते.

 आता बघा की श्री गणेश तत्वाचे किती संतुलन(Balancing) असते. जर तुम्ही कितीही परिश्रम केले आणि कितीही त्रास घेतला किंवा जर बुद्धीने पुष्कळ मेहनत केली आणि पुढचा विचार केला, प्लॅनिंग केले, आजकालच्या लोकांना हा एक आजार लागलेला आहे जरा बुद्धीने विचार करण्याचा.-म्हणजे फार विचार सुरु झाला आणि त्या   विचारामध्ये जर संतुलन राहिले नाही तर तुमची डावी बाजू एकदम कामातून जाते म्हणजे थिजून फ्रोझन होऊन जाते, थिजते  आणि उजवी बाजू जास्त वाढू लागते. त्यामुळे डाव्या बाजूचे जेवढे रोग आहेत ते श्री गणेश तत्व बिघडल्यामुळे होतात. पैकी मधुमेह. हा रोग श्री गणेश तत्व आपल्यात बिघडले म्हणजे….   गणेशाचे जे (balancing)  आहे ते  ठीक करण्यासाठी आपले लक्ष मधुमेहाकडे श्री गणेश घालतात.   डायबेटीस चा  मनुष्य लगेच कमी काम करु लागतो. त्याचप्रमाणे हृदयविकारसुद्धा. जर तुम्ही अत्यंत डोक्याचे काम केले तर हृदयविकार होतो. आता हे बघितले का संतुलन ? डोक्याचे काम केले तर हार्ट अटाक येतो. हे गणेशाचे कार्य आहे . कारण गणेशाचं आपण पाहिलं आहे कि त्याचं स्वस्तिक आपल्या शरीरात अशा रीतीने आणि असं बनविलेले असते, ते म्हणजे दोन ह्या ज्या शक्त्या एकात एक  अशा येतात. पैकी डावीकडून जी अशी शक्ति येते, ही म्हणजे महाकालीची शक्ति. उजवीकडून येते ती महासरस्वतीची. मधोमध जिथे त्यांचा मिलनबिंदू आहे, तो मिलनबिंदू मात्र महालक्ष्मीच्या लाईन मध्ये आहे. डावीकडची सिंपथेटीक नर्वस सिस्टीम जी आहे ती महाकालीच्या शक्तिने चालते म्हणजे इच्छाशक्तीने चालते. आता एखाद्या माणसाच्या इच्छेविरुद्ध विरुद्ध फार कार्य झाले आणि त्याला फार त्रास झाला, त्याच्या कोणत्याही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, तर त्याला वेड लागेल. त्याला हार्ट अॅटॅक नाही येणार. हार्ट अॅटॅक त्या माणसाला येईल, ज्याला पुष्कळ पाहिजे. त्याला हे ही  पाहिजे, ते ही पाहिजे, पुष्कळ प्लॅनिंग पाहिजे. ते करायला पाहिजे, देशकार्याला निघाले. राष्ट्रकार्याला निघाले. काही काही उगीचच. डोक्याचे नुसते भ्रम आहे म्हणा यांचे. काही कुणी कार्य केलेले नाही. केलेले असते तर दिसले असते समोर . नुसते भांडणं लावून ठेवले आपापसात.  

आता हे जे कार्य आहे ते बाहेरचे आपण फार कार्य करतो. हे कार्य केलं पाहिजे ते कार्य केलं पाहिजे  याच्या बद्दल विचार केला पाहिजे, या सर्व गोष्टींमुळे आपली जी लेफ्ट साईड आहे , जिला आपण इदा नाडी असे म्हणतो किंवा महालक्ष्मी जे तत्व आहे ते कमजोर होऊन जातं. ते कमजोर झाल्याबरोबर त्याच्यामुळे जे काही प्लावीत आहे किंवा त्याच्यामुळे सप्लाय जे काही आपले ऑर्गन्स आहेत त्याच्यावर धोका संभवतो. ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की युटेरस , किडनी , डायबेटीस ज्याला पंक्रीआस  स्प्लीनचं काम तसंच   हार्ट अटॅक हे सगळे रोग माणसाच्या अति विचाराने होतात आणि त्याचा बॅलन्स श्री गणेशाने होतो. हे श्री गणेशाचं कार्य आहे. म्हणून तुम्ही पाहिले असेल की लोक जरी घाईत असले तरी श्री गणेशाचे देऊळ दिसले तर नमस्कार करुन घेतात तेवढ्यातल्या तेवढ्यात. सिद्धिविनायकाला सुद्धा किती रांग लागते. पण त्याला काही अर्थ आहे काय ? ते तरी करुन तेव्हाच फायदा होईल, जेव्हा तुमच्यामध्ये आत्मसाक्षात्कार आलेला आहे. जर तुमच्यात आत्मसाक्षात्कार आला नाही, जर तुमचे परमेश्वराशी कनेक्शन  नाही, तर तुम्हाला हेही कळणार नाही कोणता खोटा गुरु आहे, कोणता खरा गुरु आहे हे ही तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणजे हे जे बीज तुमच्यामध्ये    गणेशाचे आहे ते  कुंडलिनी उठल्यावर, कुंडलिनीला सगळ्यात प्रथम श्री गणेश समजून सांगतात की या गृहस्थाला हे हे त्रास आहेत व ही कुंडलिनी दाखवते की …. तिला इंफॉर्मर  म्हटलं पाहिजे ती सर्व सांगत राहते. आता ही कुंडलिनी उठली की लगेच तुमच्या लक्षात येईल एखाद्याला समजा लिव्हरचा त्रास आहे, तर ती तिथे जाऊन धकधक करेल. तुमच्या डोळ्यांनी दिसते. जर नाभिचक्र धरलेले असेल किंवा नाभिचक्रावरती पकड असली, तर नाभिचक्राच्या खाली जेव्हा कुंडलिनी  उठेल, तेव्हा तुमच्या डोळ्यांनी तुम्ही तिचे स्पंदन अथवा धकधक बघू शकाल. ती त्या ठिकाणी एखाद्या माणसाला जर समजा भूतबाधा असेल, तर सबंध पाठीवरती ती अशी धकधक करेल . तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्ही त्याच्यावरती फिल्म घेतलेली आहे.   कुंडलिनी जरी उठते आमच्यामुळे  होते ह्याच्याबद्दल काही शंका नाही. कुंडलिनी उठते, पण जर श्री गणेश तत्व खराब असेल तर तो  परत तिला खाली ओढून घेईल. ती वरपर्यंत आली तर परत धपकन खाली जाणार. असे अनेक इथे गुरु आहेत, पुण्याला गुरु होते ज्यांचे अनेक किस्से आहेत. म्हणजे काय करत असतात माहित नाही. पण त्यांचे वैशिष्ट्य हे की कुंडलिनी जरी आम्ही वर आणून बांधली तरी पटकन ते खाली ओढून घ्यायचे आणि त्यांनी काय गणेश तत्वाला हानी केली ते मला ठाऊक नाही.  …त्यांनी कुठे काय हात घातला की काय केलं ते माहिती नाही, पण त्यांचे जे आम्ही पाहिलेले आहे ते हे की कुंडलिनी हमखास खाली पडते. पाच वेळा जरी कुंडलिनी उचलली तरी खाली पडते. तेव्हा ते काय करत होते म्हणून मी बऱ्याच वेळेला गुरुघंटालाकडे जाऊन सुद्धा आले, बघण्यासाठी, पाहण्यासाठी. करतात तरी काय ? तेव्हा मी हे पाहिलेले आहे पुष्कळशा लोकांना की अत्यंत घाणेरडे आणि अनुचित प्रकार करत असतात. प्रथम ते गणेश तत्व खराब करतात. काही ना काही बहाण्याने. ते म्हणतात ‘कुंडलिनीला उचलायला आम्हाला खाली हात घालायला पाहिजे म्हणजे बघा. गणेश तत्व, लहान बालकासारखे तिथे बसलेले आहे, आपल्या आईच्या लज्जा रक्षणार्थ. आणि गणेश तत्त्वाने आपल्या सेक्सची  चालना मिळते. तेव्हा जे लोक असे म्हणतात की सेक्सने आम्ही, कुंडलिनी जागरण करु म्हणजे ते असं म्हणू लागले की गणेशाचा वाईट संबंध त्याच्या आईशी म्हणजे कुंडलिनीशी लावतो. तो तिथे बसलेला आहे. त्या मार्गाने कोणी गेला तर तडाक मारतो. आमच्याकडे पुष्कळ मंडळी आली आहेत ज्यांनी सांगितलं की ‘माताजी, आमची कुंडलिनी जागृत झाली’. म्हटलं ‘असं का? मग काय होतय ?’ ‘ आता आम्ही तुमच्यासमोर   बसलो असतांना असं असं सुरु झालं .’ म्हटलं ‘असं का झालं तुमचं ?’   कुंडलिनी जागृत झाली म्हणजे हातात थंड वारा यायला पाहिजे. पण त्यांच्या गळ्याला सबंध मोठमोठाले फोड आले ब्लिस्टर सारखे आणि त्यातून सारखं पाणी निघतंय. काही लोकांच्या अंगात कमालीची गरमी. दिल्लीला एका माणसाने मला तिनदा तार केली की ‘माताजी, माझी कुंडलिनी जागृत झाली मी काय करु?’ तेव्हा मी मुंबईला होते. म्हटलं त्याला तार करा आणि बोलवून घ्या. पण मी तिथून दिल्लीतून निघाले आणि तो तिथे पोहोचला. तर माझ्या वहिनी सांगत होत्या तो सारखा इथून तिथून धावत असायचा. जसे काही त्याला हजार मुंग्या किंवा हजार विंचू चावले आहेत. इथून तिथून धावत असायचे. दिल्लीला एक गृहस्थ आहेत डॉ.बत्रा म्हणून.. ते असेच एका प्रोग्रॅमला आले होते. जसे तुम्ही आला आहात. त्यावेळेला मी क्युरिंग करत होते लोकांचे, आता काही करत नाही. तर ते म्हणाले, ‘ माताजी, मला बघा . महिन्यापासून मी असा छळला गेलोय. मला विंचू चावून राहिले आहेत. माझी कुंडलिनी जागृत झाली आहे.’ लोक म्हणतात, अमुक झालं तमुक झालं. तेव्हा मी म्हटले बसा दोन मिनीटं, तरी त्यांना अगदी धीर धरवेना. तेव्हा मी त्यांच्याजवळ गेले व पाच मिनीटांत त्यांना शांत केले. कारण ही पृथ्वी. ते जमिनीवर उभे होते. तुम्ही आज जमिनीवर बसलात. मला फार आनंद झाला. आज अगदी बरोबर सबंध योग जुळलेला आहे. त्या पृथ्वी मातेने त्यांची संबंध उष्णता ओढून घेतली. आता ते तुम्ही कसे पृथ्वी मातेला सांगणार की, हे पृथ्वी माते, तू माझी सबंध गरमी ओढून घे. ओढूनच नाही घेणार ती, पण सहजयोग्याची ती ओढून घेते. त्याला कारण असे आहे की, एकदा ते  तत्व तुमच्यात जागृत झाले तर तेच तत्व या पृथ्वीत असल्यामुळे, त्याच तत्वावर ही पृथ्वी चालत असल्यामुळे ती अगदी ओढून घेते व म्हणूनच आपल्यामध्ये ते तत्व जागृत ठेवले पाहिजे व ते पावित्र्य ठेवले पाहिजे माणसाने. इतकेच नाही तर सहजयोगमध्ये , मग त्या   पावित्र्याचा जो पुतळा व त्याला चालवणारा जो राजा   आहे. त्या देशामध्ये (शरीरामध्ये) जो राज्यकर्ता आहे. अशा श्री गणेशाला ‘त्रिवार’ नमस्कार करून आणि त्याच श्री गणेशासारखे आपल्यामध्ये पावित्र् आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

 आता ज्या गोष्टी सांगू नयेत आणि जे लोक सांगत आहेत, ज्याबद्दल पुष्कळ वाच्यता झाली आहे आणि लोक बोलत आहेत आणि अशा रितीने पुष्कळ तांत्रिकांनी सुद्धा आपल्या देशामध्ये आक्रमण केले आहे. त्यांचे आक्रमण राजकीय नसले तरी इतके अनैतिक आणि इतके घातक आहे की, त्याचेच आपण आज भोग उचलतो आहोत. या तांत्रिकांनी सगळा घाणेरडेपणा सहाव्या शतकांत अतिशय केला. त्याला करणं अशी की, त्या वेळचे राजे म्हणजे फार खुशाल चेडू असे ,लोकांच्या पैशावरती…. जास्त पैसा झाला म्हणजे हेच होते. आधी   गणेशतत्व खराब करा. पैसा माणसाजवळ जर अती झाला म्हणजे तो श्री गणेश तत्वाच्या मागे लागतो. तरुण मुलींच्या मागे लागणे, लहान अबोध मुलींच्या मागे लागणे हे त्याच्यातून फोफावते. हे लोकसुद्धा जे काय करतात. त्यांच्यातही तेच आहे की कोणतीही अबोधिता दिसली की त्याला हाणायचे. कुणीही अबोध मनुष्य दिसला की त्याला मारायचे. आपलीच अबोधिता खतम करुन घ्यायची. हे शेवटलं . तर या खुशालचेंडू आणि चैनी लोकांच्या साठी, म्हणजे त्यावेळचे राजे महाराजे म्हणजे एकदम विलासी. आणि त्यांचे जे मंत्रीगण होते ते बहुतेक जैन लोक होते. आता या जैन लोकांचे एका स्थिती ला जाऊन इतकी कर्मठता त्या लोकांमध्ये आली, इतकी मूर्ख कर्मठता आली की तितकी मला वाटत   हिंदुस्थानातल्या कोणत्याही धर्मात आली नाही. अत्यंत कर्मठ लोक झाले ते.  कारण इतर धर्मांमध्ये थोडस संतुलन (ब्लांसिन्ग) आहे पण जैन लोकात अत्यंत कर्मठता आली आणि  मी एका जैनाला विचारलं. एक फार मोठे जैनी साधू माझ्याकडे आले होते. मी म्हटलं की ‘ काहो, तुम्ही महावीरांनी मनन करायला सांगितलं होत आणि तुम्ही देवळं बांधून आणि हे केस वपन करून आणि नागवं फिरून हे काय नेमकं चालवलंय? हे कशाला करता तुम्ही ?ह्याची काय गरज आहे तुम्हाला . आधी मनन करा. मननानी  परमेश्वराला मिळवा. तर त्यांनी सांगितलं की आम्ही अशासाठी करतो कि मनन वगैरे केलं की आमच्यात सिद्ध्या येतात. सिद्ध्या आल्या की आम्ही भुतासारखे ओरडायचो. हे करायचो, ते करायचो.करा म्हटलं , कमी होईल.   त्यावेळला  ते झालं असेल तुमचं.अतिशय याच्यामुळे ते झालं असेल. पण आता ही स्थिती आलेली आहे की तुम्ही मननाला बसा आणि पार होऊन जा. पण अजूनही आमच्यात  आहेत. पुष्कळ जैन लोक आलेले आहेत. आता नगरला अनेकजण या गोष्टीमुळे पार झालेत. कारण त्यांना दिसलं कि हे फालतूचे धंदे करून, आजपर्यंत काही आपल्याला परमेश्वर मिळाला नाही .  असे अनेक लोक ज्यांनी परमेश्वराकडे  आटोकाट प्रयत्न करुन जर परमेश्वर मिळविलेला नाही, तर आता काहीतरी नवीन असलं तर बघावं म्हणून आलेले, सहज योगात पार झालेले आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की  आपल्यामध्येही   कर्मठ लोक फार आहेत. कर्मठता आपल्यामध्ये कमी नाही. महाराष्ट्रात तर फारच कर्मठता आहे. म्हणजे सकाळी त्रेसष्ठ वेळा हात धुतले पाहिजे. कुणी सांगितले माहीत नाही. पण त्या बाईंनी जर बासष्ठ वेळा हात धुतले आणि त्रेसष्ठ वेळा धुतले नाही तर रात्रभर तिला झोप येणार नाही. काहीतरी  इतक्या वाती वळल्याच पाहिजे. अमुक लाख तमुक केलच पाहिजे, पण जे करायला पाहिजे ते मात्र होत नाही, म्हणजे वाती वळायच्या आणि त्या वेळेला आपल्या सुनेच्या किंवा मुलीच्या काहीतरी वाईट गोष्टी सांगत बसायचे. असे आपल्याकडे प्रकार आहेत. त्यापैकी सांगायचे म्हणजे असे की, सहजयोग हा प्रत्येकाला मिळणार नाही. येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.

 श्री रामदासांनी सगळी आमच्या कार्याची जी काही पूर्वपिठीका सांगितली आहे. जर तुम्ही दासबोध वाचला, तर आम्हाला मुळीच तुम्हाला काही सांगायला नको. त्यांनी हे सगळे सांगून ठेवलेले आहे आणि तेच खरे आहे. ज्या माणसामध्ये कॅलिबर असते (ती कुवत असते) आणि जो खरोखर त्या पट्टीचा असेल, त्याच माणसाला खरोखर सहजयोग साधेल. सगळ्यांना साधत नाही. होतो, म्हणजे व्हायब्रेशन्स येतील. पार व्हाल. पण परत गेले कामातून. अशा आम्ही हजारो लोकांना व्हायब्रेशन्स दिली. या मुंबई शहरातच निदान तरी दहा हजार लोकांना व्हायब्रेशन्स दिली आहेत. पण किती लोक त्यातले खरोखरच पुढे आले. तर म्हणायला फार कमी. कारण लोकांची दृष्टीच मुळी उलट्याकडे जाते. 

एक आमचे गुरू आहेत मोठे ते आम्हाला मानतात सुद्धा. ते आम्हाला म्हणत होते गाढवांना गाढवांचेच काम दिले पाहिजे. तुम्ही कशाला रियलायझेशन देत बसतात. तुम्हाला इतकी काय गरज पडली आहे. म्हटलं गरज च पडली आहे , वेळ आली आहे तशी. जर आता रियलायझेशन झालं नाही तर, हा शेवटला  निवाडा आहे. लास्ट जजमेण्ट आहे. आता चालायचे नाही म्हटलं.   आता जजमेण्ट लिहून घ्या स्वतःचं. ह्यच्यावरती जे काही होणार आहे , तुमचं जे काही नफा नुकसान होणार आहे, त्याच्यामध्ये अकरा रुद्र येणार आहेत. अकरा रुद्र,                                           एकच रुद्र ह्या सबंध विश्वाला संपविण्यासाठी समर्थ आहे, पण जेव्हा अकरा रुद्र येतील तेव्हा तुम्ही त्याची कल्पना करु शकत नाहीत. ते अगदी सबंध संपवून टाकतील. त्याच्या आधी ज्या लोकांचा निवाडा व्हायचा आहे, तो निवाडा आताच सहजयोगाने झाला पाहिजे आणि तो लोकांनी घेतला पाहिजे. पण बहुतेक लोकांचे असे असते की लहान लहानशा गोष्टीत लोक बिथरतात आणि लहान लहानशा गोष्टीवरून निघून जातात. पैकी जर आम्ही पैसेबिसे घेत असतो, आणि तमाशा वगैरे केला असता, तर लोकांना जास्त आवडेल. मी म्हटलं की तुम्ही किती पैसे देणार ते सांगा आधी मला. किती पैसे आहेत तुमच्याकडे द्यायला?  म्हणजे मनुष्याच्या अहंकाराला पुष्टी दिली तर मनुष्य यायला तयार असतो. पण सहजयोगामध्ये हे सांगायचे असते की हे सगळे काही परमेश्वर करतो. हे सहज घडते. 

एका फूलातून जसे फळ निघते तसेच तुमचे सुद्धा होणार आहे आणि जसे तुम्हाला नाक, डोळे, तोंड आणि ही मानवस्थिती आलेली आहे, तशीच अतिमानव स्थिती सुद्धा परमेश्वरच तुम्हाला …. ही एक गिफ्ट आहे,  दान आहे.  परमेश्वरच तुम्हाला देणार आहे. तुम्ही या बाबतीत काही करू  शकत नाही. ही भूमिका मानायला मनुष्य मुळी तयार होऊ शकत नाही. त्याला एवढा अहंकार झालेला आहे. त्याला वाटते डोक्यावर जोपर्यंत मी दहा दिवस उभा राहणार नाही, तोपर्यंत मला काही मिळणारच नाही. आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्या परमेश्वराने अशा अनंत गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, ज्या आपण काहीही करु शकत नाही. कोणतेही जिवंत कार्य आपण करु शकत नाही, तिथे आपण अतिमानव तरी कसे होऊ? तोच करणार. पण एवढेच होते की, पार झाल्यावर फक्त मनुष्य योनीतच मनुष्याला समजते की, आपण पार झालो, ही पहिली गोष्ट. दुसरी, त्याच्यात जी शक्ति येते की,  तो दुसऱ्यांना  पार करु शकतो. त्याच्यातून ती शक्ति वाहते. तो एक-एक असा अनेक होऊ शकतो. म्हणजे त्याला देवत्व प्राप्त होईल. तो स्वत: देवत्वात येईल. आता असे पुष्कळसे लोक आहेत. ज्यांनी गुरु वगैरे ठेवले आहेत. मोठमोठाले आहेत, पण त्यांच्या शिष्यांमध्ये कोणा मध्ये देवत्व आलेले मी  पाहिलेले नाही. काही ट्रान्सफॉर्मशन झालेलं पाहिलं नाही. ते जिथे होते तिथेच आहेत. जरी झाले तरी, ते भयानी किंवा श्रद्धेनी. पण आतून ते घटीत झालेलं नाही. ती घटना घडलेली नाही. ते ट्रान्सफॉर्मशन(परिवर्तन) आतून झालेले नाही. म्हणजे यांचा जर रेडिओ ठीक करायचा म्हटलं किंवा फुलाचे फळ करायचे म्हटले, म्हणजे संबंधच बदलते. तशी स्थिती मात्र कोणाला आलेली नाही, तेव्हा,  सांगायचे असे आहे की, त्यासाठी आपले गणेश तत्व जे आहे, त्याला आपण आधी सांभाळले पाहिजे. आजकालच्या काळामध्ये नाना तऱ्हेच्या जाहिराती पाहतो  आणि सबंध जाहिराती म्हणजे सो कॉल्ड अड्वान्समेंट किंवा डेव्हलपमेंट जे वेस्टर्न कंट्रीस मध्ये झालं, ते खड्यात पण गेले आहेत.  त्यांचा सर्वनाश झालेला आहे. ते इतक्या दुःखात पडले की, आता रात्रंदिवस ह्याच योजना करत बसलेत की, आता आम्ही आत्महत्या कोणत्या प्रकारची करावी. ही त्यांची स्थिती आलेली आहे. तेंव्हा तुम्ही त्या मार्गाला जातांना एक वेळ विचार करून बघितला पाहिजे की आपण का हे सगळे करत आहोत. त्याला काही तरी अर्थ लागला पाहिजे. आपण आज मानव स्थितीला आलो आहोत, तर आपल्याला सुद्धा काही तरी अर्थ लागला पाहिजे. आयुष्यभर तेच तेच करण्यात काही अर्थ नाही. तसंच जी मंडळी परमेश्वराला  सोडून निघाली तशी ही मंडळी परमेश्वराच्या नावाला नुसती चिकटून आहेत. सकाळपासून देवाला दिवा दाखवला, घंटी मारली की चालले. त्या रितीने  किंवा जे मी त्रेसष्ट वेळा हात धुण्याच्या  काहींच्या कर्मठपणाबद्दल सांगितले, अशा तऱ्हेची जी कर्मठ मंडळी आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की, अशा तऱ्हेच्या फुकाच्या गोष्टींनी परमेश्वर कदापि मिळणार नाही. परमेश्वर आपल्यामध्ये आहे. तो जागृत केला पाहिजे, जागृत राखला पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मध्ये जागृत केला पाहिजे. हा सहजयोगाचा संदेश आहे.

तर कुंडलिनी ही आई आणि श्री गणेश ही त्यांची कृती आहे आणि  गणेश हे तिचे मुल आहे. आपल्यामध्ये असलेली कुंडलिनी श्री गणेशाच्या नुसत्या हातावर फिरत असते.  गणेशाच्या हातात काय असते ते तुम्ही पाहिले असेल. तसेच पोटावर त्यांच्या सर्प बांधलेला असतो किंवा पुष्कळवेळा त्याच्या एका हातामध्ये …… म्हणजे गणेशाला तसे म्हटले तर चारच हात आहेत पण खरे म्हणजे त्यांना अनंत हात आहेत. पैकी एका हातामध्ये कधी कधी साप  दाखवतात, तीच ही कुंडलिनी. तसेच आमच्या सहजयोग्यांना, जे पार होत आहेत त्यांच्या मध्ये  त्यांच्या नुसत्या हातावर कुंडलिनी चढते. ह्यांनी हात असा वर केला म्हणजे  कुंडलिनी वर जाते. म्हणजे आता लहानसा सहजयोगी मुलगासुद्धा कुंडलिनी वर उचलतो. दोन दोन वर्षाची मुले, पाच-सहा महिन्याची मुले सुद्धा तुम्हाला सांगतील, तुमची कुंडलिनी  कुठे  आहे ते.  माझी नात सहा  महिन्याची होती. तेव्हा हे श्री मोदी माझ्याकडे आले होते आणि त्यांचे आज्ञाचक्र धरलेले होते. तर बोलता बोलता तिला काही समजेना. ती अशी रांगत होती तरी  ती हातामध्ये माझा कुंकवाचा करंडा घेऊन आली आणि त्यांच्या कपाळाला कुंकू लावले आणि त्यांचे आज्ञाचक्र तिने सोडवून टाकले. सारखी तिला हीच मेहनत असते. तेच मी माझ्या इतर सहजयोग्यांच्या लहान-लहान मुलांमध्ये पण पाहिलेले आहे. कि ते जन्मजात पार आहेत. जन्मजात.म्हणजे केवढी मोठी ही गोष्ट, परमेश्वराने आता सुरवात केली आहे. म्हणजे साक्षात जन्मजात पार मंडळी आज संसारामध्ये जन्माला येत आहेत. त्यांच्यासाठी संन्यास घ्यायला नको. संन्यास वगैरे घ्यायची ज्याला गरज वाटते त्याला  अजून पार होता आले नाही. पार झाल्यावरती तुम्ही आतून आपोआप सुटत जाता. सुटत गेल्यामुळे बाहेरचा संन्यास काही घ्यायला नको. म्हणजे संन्यासघ्यायचा , जगामध्ये त्याच्या जाहिराती लावायच्या की आम्ही संन्यासघेतला म्हणजे आतून जर काही घडलं नसेल तर जाहिराती लावायची काय गरज आहे? जर तुम्ही पुरुष असला, तर चेहरा बघूनच लोक सांगतील की हा पुरुष आहे की बाई. त्याच्या काय जाहिराती लावून फिरता  की आम्ही पुरुष आहोत, आम्ही बायका आहोत. तशातलाच हा प्रकार आहे की संन्याशी जर तुम्ही मनाने झालात तर आतून सन्यस्त आहात. वरून काही जरी असलं तरी आतून तुम्ही तिथे आहात आणि ही स्थिती सहजयोगामध्ये सहज गाठता येते. त्याला संन्यास वगैरे घेण्याची काहीही गरज नाही. संसारातून जाण्याची काहीही गरज नाही. श्री शंकराची जी स्थिती आहे किंवा श्री शंकरांनी जी स्थिती प्राप्त करुन घेतली आहे त्याला सुद्धा गणेश निर्माण करावे लागले तसे तुम्हाला सुद्धा ते श्री गणेश निर्माण करायला पाहिजे. आता आपल्या कडे लोक असं म्हणतात की लोकसंख्या हिंदुस्थानात जास्त आहे. कबुल आहे. मी मानते की लोकसंख्या जास्त आहे.  इतर कुठे वाढावी लोकसंख्या?इंग्लंडला मायनस होतेय, जर्मनीला मायनस होतेय, अमेरिकेला मायनस होतेय कारण तिथे कोणी शहाणा जन्माला येणारच नाही. सगळे आपल्याच इथे येणार. कारण तिथे जर मुलांना प्रत्येक आठ दिवसामध्ये म्हणजे स्टॅटिस्टिक आहे – इंग्लंडला आई- वडिल दोन मुलांना मारत असतात. हे तिथले स्टॅटिस्टिक आहे तर कोण शहाणा तिथे जन्माला येईल. म्हणून आपल्या  देशात  हे जन्माला येतात.या सगळ्यांचा मूर्खपणा आपण सहन करतो आहे आणि आपल्याला दूषण लागते आहे. ही मुलं दुसरीकडे जन्माला येणारच नाही कारण इतकी वाईट स्थिती आहे मुलांची दुसऱ्या  ठिकाणी. फक्त आपल्या देशात मुलांचं कौतुक आहे.

आजच एक लहान मुलगा माझ्याकडे आला त्याला मराठी येतं व म्हणाला दुडूदुडू धावण्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे ? म्हटलं त्यांच्याकडे कुठं असणार? लहान मुलांना बघतात तरी का कसे धावतात ते. आपल्याकडे दुडूदुडू धावणे आणि हा वात्सल्य रस. आपल्याकडे श्रीकृष्णाचे वर्णन वाचावं किंवा श्रीरामाचे लहानपणाचे वर्णन वाचावं म्हणजे अगदी कौतुक वाटते. 

कुठेही तुम्हाला  ख्रिस्ताचे लहानपणाचे वर्णन मिळणार नाही. फक्त आपले रेव्हरंड टिळक होते त्यांनी मात्र ‘हीच अंगुली मुखी घालूनी, मधू गोष्टी वदसी’ वगैरे वगैरे असं लहान मुलाचं  वर्णन केलेले आहे कारण त्यांच्या हृदयामध्ये भारतीयता असल्यामुळे त्यांनी ख्रिस्ताचे सुद्धा लहानपण कसं असेल  त्याचं वर्णन केलं आहे. पण तुम्हाला कुठेही दुडूदुडू  ह्याला शब्द मिळणार नाही इंग्लिश भाषेमध्ये. मला सुद्धा समजेना की याला कसं समजून सांगावं कारण लहान मुलांचे जे अंगभाव आहेत, अंगविक्षेप आहेत, जसं बाळसं धरणं आपण म्हणतो, त्याला काय इंग्लिश भाषेत काही अर्थ नाही. उलट ते म्हणतात की मुलांनी फॅट नसावं, थीन असायला पाहिजे कारण आत्तापासून सिनेमा, अक्टर्स आणि एक्टरेसेस होत आहेत. अशा रितीच्या नवीन नवीन कल्पना काढून त्यांनी त्यांच्यामधील अबोधिता आहे ती काढून घेतली आहे. आणि ते आपण करु नये आणि त्यांच्यापासून आपल्याला घेण्यासारखे काही नाही. लहान मुलांना जन्मल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण मला असंच वाटत होतं तुमच्यासारखं. कोणताही लहान मुलगा जन्मला की आपण केवढं सांभाळतो. पण हे लोक दुसऱ्या खोलीत टाकून देतात त्याला न्यापी लावून. आणि कुत्रे आणि मांजरी मात्र आपल्या बेडरूम मध्ये ठेवतात. मला समजलं नाही असं का? तर म्हणे डिस्टर्ब होतो रात्रीचा. म्हटलं तुम्ही आले कशाला जगात?  मी जेव्हा माझ्या मुली येणार होत्या, त्यांची मुलं येणार होती तर आमच्या साहेबांच्या सेक्रेटरी, त्या बऱ्याच म्हाताऱ्या बाई आहेत. त्यांना मुलंबाळे काहीच नाही, त्या मला म्हणाल्या, ‘तुम्ही अपसेट असाल ?’ म्हटलं    ‘अपसेट कशाला? मला तर खूप आनंद झाला आहे मुलं येणार आहेत म्हणून.’  नाही. ‘म्हणे तुमचं घर बीर  घाणेरडं होईल.’ म्हटलं झालं. आमच्याकडे असे विचार सुद्धा डोक्यात कधी येणार नाहीत. म्हणजे संबंध इगो ओरिएंटेशन येतं. म्हणजे तुम्ही गणेश तत्वाकडे  लक्ष दिले नाही तर ‘इगो ओरिएंटेड होतो.  त्याला भयंकर अहंकार येतो. अहंकारी माणसाचा असा गणेश तत्वाचा झगडा आहे. आपण पहिलेच असेल हे जे मोठे राजकीय नेते असतात त्यांचे चारित्र्य आपण पाहिले तर झिरो. त्याला कारण आहे. कारण इगो मनुष्याला आला, की तो राईट साईड ने वाढत जातो आणि राईट साईडच्या वाढल्यामुळे मनुष्याला इगो येतो आणि इगो  मुळे श्री गणेश तरी काय किंवा श्री गणेश तत्व तरी काय? पवित्रता म्हणजे काय? मीच म्हणजे सर्व काही आहे असे समजून व त्यांच्यातले हे गणेश तत्व नष्ट पावते, पण त्यातले दुसरे एक उदाहरण म्हणजे असे की जे लोक संन्यास घ्यायचा आणि लग्न करायचे नाही. घराच्या बाहेर रहायचे, आणखी कुणाशी संबंध ठेवायचा नाही. ते सुद्धा हे दुसरे लोक आहेत. श्री गणेश तत्व जर आपल्यात जागृत असले, तर संसारात राहूनच परमेश्वर मिळवता येतो आणि जर देवत्व मिळवायचे असेल, तर संसारात राहिले पाहिजे. ब्रह्मर्षिपद मिळू शकेल, जर तुम्ही अगदी फारच कडक अगदी तीव्र वैराग्य आचरले तर. पण मला असे आता वाटायला लागले आहे की, ब्रह्मर्षी सुद्धा एवढे मोठे पोहोचलेले आहेत, मी यांना ओळखते, पुष्कळसे लोक आहेत पण ते आता काही करायला तयार नाहीत. त्यांना एवढी आंतरिकता नाही आणि ते इतकी मेहनत करायला तयार नाहीत. मला कधी कधी वाईट वाटते आणि त्यांचे असे मत आहे की, जे हे त्यांचे भक्त आहेत, त्या भक्तांची अजून तयारी नाही. जर मेहनत केली तर आपण तयारी करु शकतो आणि त्याला पुढे आणू शकतो. पुष्कळदा मला असे वाटते की, हे सगळेजण जर आता माझ्या मदतीला आले तर बरे होईल.

 मला फार मानतात असे एक गृहस्थ आहेत कलकत्त्या जवळ. त्यांचे नाव श्री ब्रह्मचारी म्हणून आहे. आणखी ते फार पोहोचलेले आहेत आणि त्यांनी माझ्याबद्दल एका अमेरिकन माणसाला सांगितले की, श्री माताजी साक्षात् आल्यावर आम्ही आता बघत बसलो आहोत त्यांचे काम. आम्हाला हेच कार्य करायचे आहे व बाकीचे काही राक्षसाचा नाश वगैरे ते आम्ही मनन शक्तीने करतो आहोत असे सांगत होते  . पण ते गृहस्थ इथे आल्यावर मी त्यांना म्हटले की, ‘तुम्ही त्यांना अमेरिकेला घेऊन का नाही जात? ‘ ते अमेरिकेला गेले,  पाच दिवसातच तिथनं पळाले आणि मला म्हणाले, मला अशा लोकांना भेटायचे नाही. ते अगदी घाणेरडे लोक आहेत. म्हणजे काय की त्यांना माणसाची इम्युनिटी नाही अली अजून. माणसात न राहिल्यामुळे ते अगदी माणूसघाणे झालेत असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे काय होतं एखादे साधू संत आले तरी तुम्ही त्यांच्या चरणावर जाल. त्यांच्यावर श्रद्धा ठेवाल, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल यात शंका नाही. पण मग रियलायझेशन कसं होणार? कारण त्यासाठी घाणीतच हात घालावा लागतो मुळी. मुलाला ठीक करायचे, मुलाला सांभाळायचे आहे तर आईला घाणीतच हात घालावा लागतो. जर ती घाण-घाण करत असेल, तर मुलाला स्वच्छ कोण करणार आहे ? आणि म्हणूनच हे आईचंच   कार्य आहे आणि  आईचंच   कार्य सहज योगात आम्ही करत आहोत. आपण सर्वांनी त्यामध्ये न्हावून घ्यावे, त्याच्यामधील आनंद उचलावा हीच एक आईची इच्छा आहे. आईची एकच इच्छा असते की, जी काही शक्ती आमच्यात आहे, मुलात यायला पाहिजे. असू आम्ही जे काही दैवी बीवी असू तर आपल्या घरात राहा म्हणावं. तुमचा आम्हाला काय फायदा? असो मोठे भगवान म्हणून नाहीतर काही. त्यांचा फायदा काय आहे? जोपर्यंत जनसाधारणांना ज्याचा फायदा होत नाही, जोपर्यंत जनसाधारण  त्यांच्यातून काही मिळवू शकत नाही, जोपर्यंत त्यांच्या मुलाला त्यांच्या शक्त्या मिळत नाहीत अशा आईचा उपयोग काय ? अशा आई असल्यापेक्षा नसलेल्या बऱ्या. तेव्हा ज्या व्यक्तीला तुम्ही गुरु मानता, किंवा आई मानता किंवा  आपल्यापेक्षा मोठे मानता , त्यांनी जर स्वत:चा च अर्थ लावलेला नाही तर त्यांच्या जीवनाचा तुम्हाला तरी काय आदर्श मिळणार आहे ? सहजयोगामध्ये ‘स्व’ चा अर्थ लागतो. ‘स्व’ चा अर्थ म्हणजे तुमच्या आत्म्याचा अर्थ लागतो. आणि ते पुढच्या लेक्चर मध्ये मी सांगणार आहे. सध्या गणेश तत्वावर मी सांगितलं आहे. आता अगदी सांगायचं म्हणजे मी जवळजवळ त्यांच्यावर पन्नास पानांचं लिहून काढलेलं आहे. मूलाधार  चक्रावरती.   मूलाधार चक्रावर श्री गणेशाचे स्थान कसे आहे. त्याच्यात कुंडलिनीचे आवाज कसे होतात आणि कुंडलिनी कशी फिरते. नंतर प्रत्येक पाकळ्यामध्ये कसे तऱ्हेतऱ्हेचे अंग आहेत आणि ते कशा रितीने पाकळ्यामध्ये  ते कसे शोषण करुन घेतात वगैरे बरेच आहे  त्याच्यामध्ये.  आणि ते ज्ञान सगळे तुम्हाला मिळाले पाहिजे आणि ते मिळणार आणि काहीही आम्ही त्याच्यातले लपवून ठेवणार नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगायला तयार आहोत. पण तुम्हाला सुद्धा पार झाल्यानंतर पुरुषार्थ करायला पाहिजे. जर तुम्ही पुरुषार्थ केला नाही, तर तुम्हाला काहीही फायदा होणार नाही.  तर आजचा हा प्रोग्राम खरं म्हणजे  कुंडलिनी जागृतीचा आहे. तुम्ही त्याच्यात मेहनत करावी असं मला वाटत. आता पूजेमध्ये काय करावे हा प्रश्न लोकांना असतो.  माताजी, श्री गणेशाच्या पूजेला काय करावे ? कारण आम्ही परोक्ष विद्या जाणतो. जे तुम्हाला दिसत नाही, त्याला नानकांनी ‘अलख’ म्हटले आहे. त्या डोळ्यांनी आम्ही बघतो. तेव्हा आम्हाला सांगायचे आहे, पहिल्यांदा पावित्र्य तुमच्यात आहे का ते बघा. आंघोळ वगैरे करणे हे तर झालेच. त्याचे काही नाही. ते नाही केले तरी चालेल, पण एक मुसलमान सुद्धा श्री गणेश पूजा फार छान करतो. आपल्याला आश्चर्य वाटेल. अल्जेरियाचे जवळ जवळ पाचशे मुसलमान  तरुण मुले-मुली पार झालेली आहेत. पण त्यातला जो मुख्य आहे, त्याचे नाव आहे जमेल आणि तो, श्री गणेश पूजा इतकी सुंदर करतो ते अगदी बघण्यासारखे आहे आणि श्री गणेशाला ठेवून स्वत: त्यांची पूजा करतो. म्हणजे सहजयोगामध्ये हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सगळेच येतात आणि त्यापेक्षा त्यांच्या अनेक देवता कशा त्याच्यामध्ये  आहेत ते दाखवले आहे.

 आता गणेशाचं जे  आहे  ते आज्ञा चक्रावर आल्यावर  ख्रिस्त  स्वरूपात या संसारात आलेले आहेत. देवी महात्म्या मध्ये   तुम्ही वाचलं असेल तर देवीचं जे  भागवत   श्री मार्कडेयांनी लिहीले आहे …. मार्कंडेय म्हणजे आमचा सर्वात उत्तम पुत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यांनी, आजकाल कोणी वाचत नाही म्हणा मार्कंडेयांना. पण जर तुम्हाला मिळालं तर,  त्यातील श्री महाविष्णुवरील वर्णन वाचा. त्यांनी सांगितले आहे की, राधेने स्वतःच स्वत:चा पूत्र तयार केला होता. म्हणजे जसा पार्वतीने केला होता, तसाच तिनी केला होता. पण गणेश तत्व हे त्याच बेस  आहे. आणि  गणेश तत्वावर  आधारित, त्यांनी जो पूत्र तयार केला होता, तो ह्या संसारात  ख्रिस्त म्हणून आला. आता ख्रिस्त.कारण राधेने तयार केला म्हणून कृष्णाच्या नावाने तो  ख्रिस्त आहे आणि यशोदा आहे तिच्या नावावर म्हणून येशू .  अशा रितीने त्यांनी हे जे  गणेश तत्व आहे त्यांचे जे पूर्णपणे उद्घाटन केले, ते ख्रिस्त स्वरूपात केलेले आहे. म्हणून हे लोक जे आपल्याला ख्रिश्चन ख्रिश्चन म्हणवतात त्यांना हे सुद्धा माहीत नाही की हे आधी श्री गणेश तत्व आहे आणि  गणेश तत्वाचा हा प्रादुर्भाव आहे आणि तोच आता अकरा रुद्रामध्ये कसा येणार आहे, ते मी नंतर आपल्याला सांगणार आहे.   पण सांगायचे असे आहे की, ‘आज्ञा चक्रावर’    गेल्यावर, जे परस हातात ठेवून  गणेश सगळ्यांना थाडथाड मारत होते, ते ह्या ठिकाणी जाऊन क्षमेचे एक साधन झालेले आहेत. क्षमा करणे हे मानवाचे सगळ्यात मोठे साधन आहे  त्याला हातात तलवार नको. काही नको. नुसती जर त्यांनी लोकांना क्षमा केली, तर त्यांना काहीही त्रास होणार नाही आणि म्हणूनच आजच्या ह्या काळामध्ये, आम्ही  सहजयोगामध्ये आपले जेंव्हा  आज्ञाचक्र धरते, तेव्हा सांगतो की, सगळ्यांना क्षमा करा आणि त्यांनी किती फायदा होतो ते अनेक लोकांना माहीत आहे आणि सहजयोगातल्या लोकांनी ते मान्य केलेले आहे आणि त्यांनी पाहिले आहे कारण सगळे काही सहजयोगात प्रत्यक्षात आहे. जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुमचे आज्ञाचक्र सुटणार नाही. तुमची डोकेदखी जाणार नाही, तुमचा त्रास जाणार नाही    व तुमचा ट्युमर खाली येणार नाही. तेंव्हा क्षमा ही केलीच पाहिजे. कारण जोपर्यंत नाक धरले नाही, तोंड दाबलं नाही तोपर्यंत मनुष्य गोष्टीला तयार होत नाही. म्हणूनच हे सगळे आजार आलेले आहेत असे मला वाटायला लागले आहे. कारण जोपर्यंत माणसाला अगदी कितीही समजावून सांगितले तरी तो एकावर एक आपली शक्कल काढत असतो की याला काहीतरी दुसरा अर्थ असेल. त्याला काहीतरी दुसरा अर्थ असेल.  तर तुमचा अर्थ अजून लागलेला नाही. तुमचे अजून  कनेक्शन नेमके लागलेले नाही, तेव्हा ते लावून घ्या. ‘आधी आत्मसाक्षात्कार करुन घ्या’ हेच आमचे सांगणे आहे. त्यात काहीतरी शक्कल काढू नका. ते काही विचारांनी, विवादांनी किंवा पुस्तक वाचून होत नाही, ते आतून व्हायला पाहिजे. ते झाले पाहिजे. ही घटना झाली पाहिजे. त्यावर काही वेळेस इतके महामूर्ख लोक असतात विशेषत: शहरात, खेडेगावात नाही. ते म्हणतात, ‘अहो, आमचं झालंच नाही बघा, आम्ही कसे ?’ म्हणजे फारच उत्तम तुम्ही अगदी! काय विचारता ? अहो, तुमचे  झाले नाही, म्हणजे काहीतरी मोठा दोष आहे तुमच्यात. शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, तो काढून घ्या. ते काही चांगले नाही. झाले पाहिजे. झाल्यावरच आनंद येणार आहे, असे मनामध्ये समजून घेतले  म्हणजे सगळे ठीक होईल.

 आता यापैकी जो अहंकाराचा भाग आहे, तो मात्र श्री गणेशाच्या चरणी आज वाहन करावा. हे सगळ्यावर आज तुम्ही जर केलं तर आमचे अर्धे प्रश्न सुटतील. गणेशाला आपला अहंकार, कास तरी करून की बाबा तू आमचा अहंकार घे, असं जर म्हणून तुम्ही आज त्याला दिलं, तर माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट होईल. कारण गणेश सारखा पुत्र सर्वांना असावा असे आम्ही सांगतो. आणि त्याच्या नुसत्या नावानी सबंध शरीर माझं अगदी चैतन्य लहरींनी वाहू लागत. त्या अश्या सुंदर गणेशाला नमन करून मी आजचं माझं भाषण संपवते.   

प्रश्न आहेत का प्रश्न? प्रश्न असलेच पाहिजेत. आम्ही काही पोलिटिकल लीडर नाही आहोत. आणि तुमच्याकडे काही इलेकशन साठी आलेलो नाही आहोत, की आम्हाला वोट द्या वगैरे. तुम्ही स्वतःला वोट देता की नाही हे बघायचं आहे. आता इंग्लिश मध्ये सांगते की नथिंग इस सेल्लिंग हियर सो डोन्ट कम विथ द   ऍटिट्यूड ऑफ या पर्चेझर, बट इट इस समथिंग टू बी गिफटेड . हं, विचार एखादा प्रश्न- प्रश्न विचारा. आता असं आहे की हाताचं वायब्रेशन्स आमच्या सहज योग्यांच्या हातातून वाहतात आणि आपलं ही वाहतील  आणि ते चैतन्य लहरी वगैरे काय आहे आणि आदी शंकराचार्यांनी या बद्दल काय लिहलंय ते सांगणारच आहे. पण ह्या ज्या                              .वायब्रेशन्स आहेत, त्या वाहताना त्याचं बंधन कसं …. ( माताजी बोलत आहेत .. ‘. थोडंसं सांगते बसा न .. तुम्हाला घाई आहे का ? हो हो उद्या सांगणार आहे , या. पण नुसतं सांगणं ऐकायला येऊ नका. मेहेरबानी करून. काही घ्यायला या. मी काही प्रवचन देत नाही. . काही तरी घ्यायला या. आणि घरच्यांनाही घेऊन या. वाट बघत बसू नका. उद्या सगळ्यांना घेऊन या आणि पार होऊन जा. बघा आता. बसा बसा.अहो एवढ्या घाई घाईत होत नाही. म्हणजे  परवा  एक डॉक्टर आले. म्हणे मी आ म्हटलं विझिटला चाललो होतो, तर रस्त्यात आहे म्हणून येऊन गेलो. म्हटलं असं का? मग आता जा म्हटलं तुम्ही विझिटला, तेच बरं होईल. ( बसा बसा) परमेश्वरासाठी वेळ नसतो आपल्याला . त्यांनी सगळं काही आपल्याला त्याचं वेळेसाठी दिलंय. सगळी काही जी सृष्टी रचना करून त्यात एवढं जे सायन्स आलेलं आहे, ते  सायन्स याच्याच साठी आलेलं आहे.   सायन्स फक्त मननासाठी परमेश्वराने दिलंय पण मानवाला ते समजत नाही.