Seminar

(India)

1980-12-09 Seminar India (Marathi)

Sahaj Seminar Date : 9th December 1980 Place Mumbai Туре Seminar & Meeting Speech Language Marathi CONTENTS | Transcript Marathi 02 – 15 English Hindi || Translation English Hindi Marathi

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सांसारिक गोष्टींकडे लक्ष, जसे माझ्या मुलीचं लग्न, झालं माताजींचे पाच तास त्याच्यात. इथे जागृती नाही. लंडनला हृदय आहे. इथे लोकांना हृदय राहिलेलं नाही. हृदय गेलं त्यांचं, संपलं. ते मागेच पार वितळून गेलेलं दिसतं कुठेतरी. संपलय. ते हृदय नाही कुठे फ्रोजन हार्ट , थिजलंय हृदय त्या लोकांचं. झालं. तिसरं झालं, युरोप, ते दारूने सबंध भरलंय ! तिथलं लिव्हर कसं असणार ? तेव्हा ही दशा झालेली आहे विराट पुरुषांची. आता तुम्ही जागृत व्हावं. तुमचं लक्ष परमेश्वराकडे वेधलं पाहिजे. काही नाही, आम्ही जातो की हनुमानाला. एखादा नमस्कार घातला की झालं. सकाळी जातो ना! बरं बुवा झालं. पुष्कळ झालं. आम्ही नमस्कार तर करतो. आहे आमचा विश्वास हं परमेश्वरावर! अगदी उपकारच आहेत परमेश्वरावर सगळ्यांचे! अहो, तुम्हाला काही मिळवायचं आहे की नाही असा प्रश्न चार लोकांना विचारायला पाहिजे. सहजयोग्यांचं मुख्य कार्य म्हणजे असं आहे, की प्रकाश मिळाला दिव्याला, की तो काय करतो ? सहजयोगानंतर मग काय करायचं? प्रकाश द्यायचा. किती लोकांना प्रकाश दिला आम्ही ? केवढा सुगंध आहे तुमच्यात. केवढा आनंद आहे तुमच्यामध्ये! तो वाटला का तुम्ही का स्वत:च आनंदात बसले. माझी साधना चांगली असली म्हणजे झालं. ‘मी साधना खूप करतो माताजी, माझ्या घरी बसून आणि काहीच प्रगती होत नाही.’ होणार कशी? पसरायला पाहिजे नां! जोपर्यंत कलेक्टिव्हिटी येणार नाही, जागतिकता येणार नाही, सार्वभौमिकता येणार नाही, तोपर्यंत तुमच्या सहजयोगाला काहीही अर्थ नाहीये. अगदी बेकार आहे. जंगलामध्ये जर एखादं फूल आलं, आणि त्याला कितीही सुगंध असला, तरी त्याचा काय उपयोग आहे? तेव्हा सर्व समाजामध्ये, सर्वसाधारण लोकांमध्ये ही वार्ता जायला पाहिजे. बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे, की आम्ही सहजयोगी आहोत. तुम्ही आपली कुंडलिनी जागृत करून घ्या आणि पार होऊन घ्या. ह्या महाराष्ट्र भूमीचे एवढे पुण्य आहे! संत भूमीच नाही, अष्टविनायक इथे ठाकलेत. अशा ह्या संतभूमीमध्ये लोकांचं लक्ष आहे कुठे? म्हणजे तुम्ही आहात काय? आणि कोण आहात ? इकडे लक्ष द्या. तुम्ही मेन ऑफ गॉड, परमेश्वराचे पुत्र आहात तुम्ही. विशेष करून तुम्हाला परमेश्वर त्याचे साम्राज्य द्यायला बसलेला आहे. ते सोडलं एकीकडे आणि भलत्या ठिकाणी कुठे लक्ष घातलं आहे तुम्ही. सहजयोग्यांच्यासाठी फार आनंदाची गोष्ट ही आहे, की मी जवळजवळ सात देशांमध्ये फिरले. पोर्तुगाल, स्पेन, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, फ्रान्स, फ्रान्सला उत्तरेला आणि दक्षिणेला दोन्हीकडे आणि ह्या सर्व देशांमध्ये २००-२०० पक्के सहजयोगी तयार झालेले आहेत. अल्जेरियाचं सांगितलं मी तुम्हाला. पक्के हं! ‘अॅडव्हेंट’च पुस्तक पाठ . माझ्या टेप अगदी पाठ आहेत सगळ्यांना. ऑस्ट्रेलियाला दोनशे- अडीचशे मंडळी आहेत. सगळ्यांना माझ्या टेप्स पाठ आहेत. तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या कहाण्या त्यांना पाठ आहेत. तुम्हाला विचारलं तर, माताजी कधी बोलल्या होत्या का? माहीत नाही बुवा! म्हणजे सिनेमाची गाणी पाठ आहेत. हा 2

Original Transcript : Marathi काही सहजयोग नाही आणि ही काही सहजयोगाची पद्धतही नाही. एवढ्या उदात्त कार्याला लागलेल्या लोकांना फार उदात्त जीवन घालवायला पाहिजे आणि त्यागाचं जीवन आहे हे. ‘येऱ्यागबाळ्याचे काम नोहे’. ते मावळे मराठे लढले, त्यापेक्षाही हे मोठं काम आहे. साऱ्या जगाची निगेटिव्हिटी घालवायची आहे. सगळ्या जगाच्या फेनेटिसिजमला घाला घालायचा आहे. सगळ्यांच्या राजनैतिक डोक्याला जरा अक्कल द्यायची आहे. ते कसं काय होणार आहे, तुम्ही मला सांगा. ती शिवाची वरात आली होती नां, तसा प्रकार आहे थोडाबहत सहजयोगाचा. आता मुंबईहून येतात पत्र! वाचण्यासारखी आहेत! तुम्ही जर वाचली, पुष्कळांची पत्र, तर तुम्हाला समजेल माताजी काय म्हणतात ते! काही काही लोक मात्र पोहोचलेले आहेत हं ! पण काही काही लोकांचं मात्र तेच रडगाणं. २८ पानांची पत्र. बरं त्याच्यामध्ये सबंध सारार्थ हा, मी तरी काय करणार? मला वेळ नाही हो २८ पानं वाचायला. म्हणजे टप्प्याटप्प्याने मी जरी वाचली , तरी ह्या आशेने की बुवा, कुठेतरी सहजयोग येईल मध्ये. नाही तसं नाही. आईला तसं सांगितलं तर झालं. उगीचच आनंद होईल तिला. कशाला? उगीचच तिला थोडसं प्रसन्न केलं तर कशाला? सगळ्यांची रडगाणी. पण त्यातल्या त्यात काही काही लोक मात्र असे आहेत, की कमळासारखे. नुसतं पत्र आलं की व्हायब्रेशन्स सुरू, बरं तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिकडे विलायतेतले लोक त्या घाणीत जन्माला आले, पण काय त्यांच्या बैठकी, काय त्यांच्या पद्धती आहेत, तुम्ही अगदी पहाण्यासारख्या आहेत. ते तुम्हाला देवासारखे पूजतात हो. प्रत्येकाला. त्यांना वाटतं हिन्दुस्थानातला मनुष्य म्हणजे काय, वाह ! तो आधी साधु-संत असेल म्हणूनच त्या देशात जन्माला आला. आम्ही घाणेरडे म्हणून इकडे जन्माला आलो. तुम्ही म्हणजे खरे साधु-संत. तुमच्यासाठी माळा घेऊन येताहेत आता. तुमच्या दर्शनानेच आम्ही पावन होऊ, अस त्यांना वाटतं तिकडे. त्यात सत्यांश ही पुष्कळ आहे. परमेश्वराला मिळवणं फार सोपं आहे, पण त्याला (संतपद) मिळवणे फार कठीण आहे. त्यात बसणं कठीण. माणसाचं जरासं हृदय उघडाव लागतं. त्या उघड्या अंत:करणाने आपलीच उदात्तता पहावी लागते आधी. तेवढं उदात्त असलं पाहिजे आणि ते नसलं, तर काहीही त्यात बसू शकणार नाही. त्या कॅमेऱ्यामध्ये काहीही येऊ शकणार नाही. सगळं आऊट ऑफ फोकस आहे. ते फोकसिंग करावं लागतं. त्यासाठी मेहनत पाहिजे. दुसरं असं, की योगभूमीच्या आशीर्वादाने कमी मेहनतीत काम होऊ शकतं. फार कमी मेहनत आहे. थोड्या मेहनतीत होऊ शकतं, मात्र लक्ष परमेश्वराकडे असायला पाहिजे. जर परमेश्वराकडे लक्ष असलं, तर मग काहीही नको आणि एकदा जर का त्याची आवड बसली तर मग दुसरं काही बरं वाटत नाही. सगळे तुमचे प्रश्न सुटतील. आता एक साधारण गोष्ट सांगते. कालच एक बाई आल्या होत्या आमच्याकडे. त्या मला सांगायला लागल्या, ‘माझे हिच्याचे दागिने हरवले.’ ‘बर मग?’ ‘मी तुम्हाला पत्र पाठवले आणि ज्यादिवशी तुम्हाला पत्र मिळालं असेल, त्याच दिवशी माझे दागिने मला मिळाले.’ खरं सांगायचं म्हणजे मी पत्र वगैरे काही वाचलं नव्हतं. पण ते आलं नां माझ्या हातात. झालं. पण ते काही दागिने मिळवण्याचं माझ कार्य नाही. ते पोलिसांचं कार्य आहे. माझें आहे का? पण मिळाले. पण त्यांचं मला आवडलं ते हे त्याच्यातलं की, ‘तुमचं काही उत्तर आलं नाही, तर मी असा विचार केला, की मी कोण होते माताजींना त्रास देणारी, माझ्या दागिन्यांसाठी ? आणि त्यांनी जरा धडा 3

Original Transcript : Marathi दिला मला चांगलाच. फार दागिन्यांवर माझं लक्ष होतं.’ ते म्हटलं बरं निघालं. तेवढं मात्र माझं काम होतं. ती अक्कल आली, ते माझं काम आहे. ते पोलिसांचं नाही. अशा रीतीने अनेक कार्य तुमची संसारातली होऊ शकतात. पण परमेश्वराने सांगितलेले आहे, की ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ योग आधी घडू द्या. क्षेम मी बघतो की. पण आधी योग घडू द्या. हे सांगितलेलं सगळे विसरतात. सिद्धिविनायकाला पार झाल्याशिवाय काय म्हणता हो जाऊन तुम्ही? तुमचं कनेक्शन कुठे आहे ? तिथे फक्त त्या भटजीबुवाशी तुमचं कनेक्शन आहे. म्हणजे भटजीबुवा जे काही मिळवायचं ते मिळवतात. बाकी परमेश्वराशी तुमचा कुठे संबंध आहे ? म्हणे मी फक्त विठ्ठलाला बोलवत होते. विठ्ठल, विठ्ठल करायचे. कशाला ? काही असेल तरी विठ्ठलाला सांगायचं. मग ? मला दृष्टांत झाले. मग? म्हटलं, विठ्ठलाचं तुमच्यावरती काही कर्ज वगैरे आहे का? तुम्ही त्याला खिशातून काढून, ‘अरे विट्ठला, अमुक कर. अरे विठ्ठला, तमुक कर.’ त्याच्याशी कनेक्शन तर होऊ द्या. आधी कनेक्शन होऊ द्या, मग संबंध ठीक करून घ्या. बसवून घ्या स्वत:ची पातळी. मग काय सांगायला नको. मग कृपेचा पाऊस पडतो. पण सगळ्यात मोठी कृपा, परमेश्वरावर प्रेम करता आलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी कृपा आहे. ती त्या प्रल्हादाला अक्कल होती बरं. जेव्हा साक्षात् परमेश्वर नरसिंह रूपात उतरले , त्यांनी विचारलं, काय पाहिजे तुला? जगातलं काय पाहिजे ते मागून घे. साक्षात् विष्णू होते. त्यांनी काय सांगितलं, ‘तव चरणा रविंदे….’ आठ वर्षाच्या मुलाला ही अक्कल होती. ते एकदा जर अमृतासारखं मिळालं, मग दुसरं काहीही नको. तेच मिळवावं , असं सहजयोग्याने एक व्रत घ्यायला पाहिजे. कारण ही फार आणीबाणीची वेळ आहे. जर आपण जिंकून घेतलं तर स्वर्ग काय? पण परमेश्वराचं सर्व साम्राज्य आपल्या हातात आहे आणि हरलो तर सैतानाचं राज्य येणार. तेव्हा ही वेळ आणीबाणीची आहे. आणि ह्या वेळेला फक्त विरक्त्वालाच यश येणार आहे. विरक्त्वापासून मुकल नाही पाहिजे. तुमच्या आईला कोणत्याही जगाची भीती नाही, तुम्हाला माहिती आहे. कोणाच्या धमकीची भीती नाही, कशाची भीती नाही. तुम्हाला कशाची भीती आहे ? तेव्हा निधड्या छातीने सरसावलं पाहिजे. ह्या आपल्या देशाची परंपरा फार मोठी आहे. त्या परंपरेला धरून, त्या व्यवस्थेला धरूनच सगळे कार्य व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामध्ये गोडवा, सामंजस्य, सहिष्णूता, हे विशेष गुण यायला पाहिजे. आपापसातले संबंध देण्याचे झाले पाहिजे. घेण्याचे नाहीत. तुमच्या आईचे तर देण्याचेच आहेत ना संबंध, का काही घेते वरगैरे मी तुमच्याकडून? देतच राहिलं पाहिजे. देण्याची जी मजा आहे ती घेण्याची नाही. सगळ्यांना माहिती आहे, जसं हातातून वहात राहतं, इतकं वहातं की बोलतासुद्धा येत नाही. तसेच वहायला पाहिजे. आता परम मिळाल्यावर हे दगडधोंडे काय करायचेत. असा एक साधा विचार केला पाहिजे. सहजयोगाला फळं लागायला सुरुवात झाली आहे. पाच वर्षात फार मोठे कार्य होणार आहे. पण तुम्ही कुठे रहाणार त्याचा अंदाज घेतला पाहिजे. कारण आऊट ऑफ सक्क्युलेशन सहजयोगातून पुष्कळ लोक जातात, एकदम टँजंट म्हणतात तसं. तेव्हा आऊट ऑफ सक्क्युलेशन मात्र जाऊ नका. चिकटूनच रहा आणि चिकटवून घ्या. वजन असायला पाहिजे. तब्येतीत वजन असायला पाहिजे माणसाच्या. लहान लहान गोष्टीमध्ये प्रतिष्ठित लोक हलत नाहीत. प्रतिष्ठेला वजन पाहिजे. एका वजनाने रहायला पाहिजे. कोणी म्हणे, की आमच्या देशामध्ये कोणी आहेत म्हणे, त्यांना म्हणे सारखे बंगालीच पाहिजे, कोणाला मद्रासीच पाहिजे, मग महाराष्ट्रियन्सना महाराष्ट्रीयन का नको ? सगळे जर गाढव आहेत तर तुम्ही 4

Original Transcript : Marathi शेपूट लावून गाढव कशाला होता ? तुम्ही शहाणपण का धरत नाही. उद्या ही वेळ येणार आहे, सर्व जगामध्ये मराठी लोक शिकणार आहेत. माहिती आहे का ? म्हणजे तुम्ही शहाणपणा धरला तर हं! नाहीतर फ्रेंच शिकावं लागेल. सगळे लोक मराठीच शिकत आहेत. लंडनला सगळे मराठी शिकत आहेत. कारण मराठी भाषेमध्ये कुंडलिनीवर सगळ्यात जास्त पुस्तक आणि चर्चा आहे. पण महाराष्ट्रीन लोक मात्र सगळे साहेब झालेत. साहेब इथे आले, की ते चक्रावतात, की ह्यांना तर मराठी येतच नाही आणि आम्ही मराठी शिकून उपयोग काय? हिंदी तर मुळीच येत नाही. हिंदी. हिंदी बोलायचं म्हणजे काय! अहो, काय खेडूत आहोत की काय हिंदी बोलायला ? त्या लंडनला एक मनुष्य नाही मिळणार हिंदी बोलणारा. तुम्हाला आश्चर्य वाटेल. सगळे इंग्लिश. म्हणजे गुजराती आपले. पक्के इंग्लिश झालेत तिकडे जाऊन. आश्चर्य वाटतं. एवढी जुनी परंपरा आपल्यामध्ये होती, ती कशी अशी नष्ट झाली ? आता परवा त्यांनी तिकडे एका मासिकामध्ये फार वाईट आर्टिकल लिहिलं की ती रास करतात नाही का ! त्या रासमध्ये सगळी मुलं-मुली जातात दारू पिऊन आणि नाचतात. त्यांचे फोटो वगैरे दिले. आणि देवीचा फोटो. त्या देवीसमोर नाचतात दारू पिऊन. त्यावेळेला मुलं आपापसामध्ये सिलेक्शन करतात आणि त्यावेळेला अलाऊड आहे, तुम्ही वाट्टेल ते केलं तरी. काय म्हणावं, देवीचा फोटो. म्हटलं हे तांत्रिक दिसतात कुठले तरी. आणि नवरात्रीत नऊ दिवस हा प्रकार. पूजन वरगैरे गेलं एकीकडे. ते दारू पिऊन आठ तास म्हणा, नाहीतर दहा तास, झिंगायचं. आणि म्हणे देवीसमोर नाच! कधी ऐकल्या नव्हत्या अशा तऱ्हेच्या पूजा आजकाल सुरू झालेल्या आहेत. सहजयोगाच्या लोकांना सत्य काय आहे? धर्म काय आहे? त्याचं सत्य स्वरूप, निर्मळ स्वरूप काय आहे ? ते सगळे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यावर उभं रहायला पाहिजे. हिमतीने. आता आमचे शेजारी आम्हाला म्हणतात, ‘दारू प्या, मग माताजी कसं करायचं? आता असं आहे की आम्ही जरा मोठे ऑफिसर आहोत नां. म्हणून आम्ही जास्तीच शेण खातो. आता परवाच एक येऊन आम्हाला असं म्हणाले. म्हटलं, ‘असं का. तुम्ही केवढे मोठे ऑफिसर आहात हो दारू पिण्यासाठी?’ म्हणजे प्यायलंच पाहिजे म्हणे. ‘असं कां? नाहीतर काय होणार आहे तुमचं?’ हे ऐकूनसुद्धा मला आश्चर्य वाटतं. बाळबोध घराण्यातले आम्ही. ‘दारू ही चाललीच पाहिजे, म्हणजे काय प्रमोशन नाही व्हायचं आमचं.’ म्हणजे हे डिमोशन घेऊन प्रमोशन कशाला पाहिजे! मग सिगरेट शिवाय सोशल लाइफ कसं होणार? आणि म्हटलं, जेव्हा तुम्हाला कॅन्सर होइल थ्रोटचा, तेव्हा माताजी उभ्या राहतील तुम्हाला ठीक करायला. नाहीतर तंबाखू पाहिजे. म्हणजे सोशल नाही का! म्हणजे ज्याने सोशल लाइफ झिरो होईल ते कार्य करायचं. जे स्मोकिंग करत नाही त्यांना विचारा स्मोकचं. एक जर स्मोकर आला तर नको रे बाबा हा मनुष्य असं वाटतं. पण सहजयोगात सगळं सुटतं हं ! सुटलच पाहिजे आणि जर सुटलं नाही तर तो सहजयोगी नाही. म्हणून घेऊ नका मुळी सहजयोगी स्वत:ला. एक होते माताजींच्या पाठीमागे प्यायचे कधी कधी. मला कळलं. आले मग प्रोग्रॅमला आणि सांगायला लागले, माझं तोंड हनुमानासारखं फुगतंय. म्हटलं, असं का ? काय चालतं काय तुमचं माझ्यामागे ? सोडा म्हटलं ती तंबाखू, ती सुटली तेव्हा बरे झाले. दुसरं, तुम्हाला माहितीच आहे. दुसरे प्रकार तुम्हाला माहितीच आहे. सांगायला नकोच. सहजयोग म्हणजे 5

Original Transcript : Marathi इतका सेल्फ करेक्टिंग फोर्स आहे, की तुमच्यादेखतच दिसतंय. हं माताजींना काय कळतं ? असंच म्हणतात. आता आलं नां! केवढी मोठी चूक आहे, की आपल्या विशुद्धी चक्रावर हा आघात करायचा. केवढी मोठी चूक आहे! जरा त्याची कल्पना करा. विराटाचं स्थान आहे. विराटावर तुम्ही आघात करता. म्हणजे काय तुम्हाला स्वत:ची काही किंमत आहे की नाही! हे सहजयोग्याने समजलं पाहिजे आणि आताही सहजयोगी जे स्वत:ला म्हणतात आणि सिगरेट पितात त्यांनी, ‘आम्ही सहजयोगी नाही’ म्हणून कपाळावर लिहन टाकायचं. म्हणजे सहजयोग्यांना अशी कल्पना कधीही नाही झाली पाहिजे, की आमच्या हातून कोणतही पाप झालं तरी आम्ही सहजयोगी. म्हणजे हा एक सटल टाइप ऑफ इगो (सूक्ष्मातला अहंकार) मी म्हणते त्याला. हा सूक्ष्म तऱ्हेचा अहंकार सहजयोग्यांमध्ये येतो की, ‘आता आम्ही सहजयोगी, मग काय! आम्ही काही केलं तरी सब खून माफ. अहो, त्याच्या उलट आहे. जितके उंच चढाल तितकेच खाली आहे. म्हणून पड़ू नका. जितके चढले ते गच्च धरून बसा. तुम्ही हलले की जाणार खाली. एवढ्या मेहनतीने चढायचं आणि त्या दोन पैशाच्या घाणेरड्या तंबाखुसाठी खाली उड्या मारायच्या. हे शहाणपण कोणी सांगितलं! आता हे झालं म्हणून मी सांगते तुम्हाला. एक प्रकार झालेला आहे. सगळे सहजयोगी लागले होते तिकडे जसलोकला. चला. उद्या कोणी तंबाखू घेऊन जर त्याला त्रास झाला तर मुळीच कोणी जाऊ नका. मी सांगते. मरू देत. आज मेले तर उद्या येणारच आहेत माझ्या डोक्याशी. त्याच्यासाठी पत्र, तार माझ्याकडे, अमकं तमकं. झाले बरे म्हणा. त्यांचा कॅन्सर झाला बरा. आता मात्र करणार नाही. कशाला तंबाखू खायची? आता इतकी वर्षे माझ्याजवळ आहात, तबाखू अजून खाता. मग तंबाखूच खा. आता पुढे मात्र मी चालू देणार नाही. कधी पत्रे आली नव्हती, तितकी ह्या तंबाखुवाल्यांसाठी माझ्याकडे पत्र आली. सगळ्यांची एनजी त्यांच्यासाठी. आल्याबरोबर सगळ्यांची लेफ्ट नाभी धरलेली. सगळ्यांचं स्प्लीन खराब. स्पिडोमीटर खराब. आता ह्यांचे मी ठीक करू परत! सिंपर्थी (सहानुभूती) नको अशा माणसांसाठी! आता सांगायचं सरळ माताजींनी सांगितलंय, की ज्याने तंबाखु घेतली तो सहजयोगी नाहीच. त्याला आणायचेच नाही मुळी सहजयोगात! आधी तंबाखू सोड. मग, खोट बोलणं. अगदी वज्र्य करायला पाहिजे. जीभेतून तुमची अगदी सरस्वती शक्ती निघून जाणार. खोटं बोलायच नाही. सगळें म्हटलंच पाहिजे असं नको. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की कोणी दिसलं, अहो, तुम्ही…. आहेत असे शहाणे! एकदम तोंडावर फटकळपणा करायचा नाही. सगळ सांगितलंच पाहिजे असं नाही काही पण जे काही सांगाव ते खरं सांगावं. नाहीतर सांगू नये. खोटेपणा करायचा नाही. आता त्याचेही अनुभव आलेत बरेच आम्हाला म्हणून सांगते. माझ्याशी खोटे बोलण्यात काय अर्थ आहे हो! मला तुमच्या पार सात तिकडे नी सात तिकडे नी सात तिकडे सगळं दिसतंय. तर माझ्याशी कशाला खोटे बोलायचं? तेव्हा खोटेपणा मात्र अगदी सोडलाच पाहिजे. अगदी! जसं काही महारोग असतो नां, लेप्रसी, तसं समजलं पाहिजे. आपल्या देशाचा दोष म्हणजे खोटेपणा. कोणतेही खोटे सर्रास बोलूनच टाकायचे. काय होतं ? खोटेपणा सोडायला पाहिजे. सहजयोग्यांनी व्रत घ्यायला पाहिजे, की आम्ही खोटे बोलणार नाही. बोलू नका वाटलं तर. सांगू नका. अनाधिकार कोणाला सांगायची गरज नाही. समजा एखादा मनुष्य आला कोणाला मारायला आणि मला विचारलं, ‘माताजी, कुठे आहे तो सांगा?’ तर तो कोण अधिकारी आहे मला विचारणारा ? 6

Original Transcript : Marathi मी त्याला काही सांगणार नाही. पण ह्याच्यात कोणता खरेपणा आहे, की बुवा तिथे लपलेला आहे. जाऊन त्याला मार. ज्याला सारासार बुद्धी म्हणतात, डिस्क्रिशन, ते डेव्हलप करायला पाहिजे सहजयोग्याने. काही खोटं बोलण्याची गरज नाही. खोटं ते लोक बोलतात, ज्यांना कशाची भीती असते. ज्यांना कशाची गरज असते. अरे, तुमच्यामध्ये जर परमेश्वरच जागृत झाला तर कशाला खोटे बोलायचं? जेव्हा सत्यच जागृत झालेलं आहे तर खोटं कशाला बोलायचं? तेव्हां हे एक व्रत घ्यायला पाहिजे, की आम्ही खोटे बोलणार नाही. हे दूसरं व्रत घ्यायला पाहिजे, की आम्ही व्यसनं करणार नाही. व्यसनं सोडलीच पाहिजेत आणि खोटे आम्ही बोलणार नाही. हे व्रत आहे आमचं. आणि मग बघा, काय मजा आहे हो. स्वतःच्या गुणांचा आस्वाद घेणं म्हणजे केवढी मजेची गोष्ट आहे! बसावं आणि ते बघत रहावं. अहाहा, काय रंग पसरतात आपले. आपल्याबरोबर थोडावेळ बसलो, म्हणजे आनंद वाटेल. स्वत:च्या सद्गुणांचा आनंद घेणे. दुसऱ्यांच्या सद्गुणांचा आनंद घेणे. दुर्गुणांकडे दुर्लक्ष करणे. जर गावात कुठे घाण असली तर आपण जाणार नाही तिथे. नाकावर कपडा ठेवणार. पण एखाद्या माणसात जर घाण असली तर ती आपण चार-चौघात फिरवल्याशिवाय आपल्याला चैन नाही. मग ती पेपरमध्ये यायला पाहिजे. ‘अहो, तुम्ही ऐकलं का त्यांची सून, अमकं, ठमक, तमकं.’ त्याच्याच वाढवलेल्या आवृत्त्या आहेत ! हे सहजयोग्यांना शोभण्यासारखं नाही. इकडच्या गोष्टी तिकडे, अशा क्षुल्लक आणि क्षुद्र गोष्टींकडे लक्ष देणं आणि त्याबद्दल एवढ्या गोष्टी करणं, आपल्याला शोभणार नाही. आपण प्रतिष्ठित लोक आहोत. समाजातले अतीप्रतिष्ठित जीव आहात तुम्ही! तेव्हा ती प्रतिष्ठा सांभाळायला पाहिजे. आता बातमीदार आले. बघतील काय? माताजी साडी घालून आल्या. तर कशी त्यांची साडी होती आणि अमुक होतं, तमुक होतं. त्याच्या पलीकडे त्यांना दृष्टी नाही. ते बातमीदार आहेत. पण तुम्ही साक्षी आहात. तुमच्यामध्ये गहनता यायला पाहिजे. क्षुल्लक आणि क्षुद्र गोष्टींबद्दल विचार करणं, तुम्ही ह्यांचं ऐकलं का ? त्याला गॉसिप म्हणतात इंग्लिशमध्ये. असल्या गोष्टींमध्ये सहजयोग्यांनी जर आपला वेळ घालवला, तर झालं. एकच आयुष्य मिळालेलं आहे फार महत्त्वाचं, ते असं दवडू नका. ते ही फार आहे. कारण आमच्याकडे तसे लोक येतात, ‘माताजी, तुम्ही ऐकलं का आम्ही त्यांचं असं ऐकलं होतं.’ आम्हाला काय ? सगळ्या गावच्या गप्पा. अमका तिच्याबरोबर पळाला आणि ती त्याच्याबरोबर पळाली. पळू देत. तुमचं काय जातंय ? अशा घाणेरड्या गोष्टींकडे लक्ष तरी कशाला द्यायचं. त्याबद्दल वाचा तरी कशाला उघडायची. आपली ही शुद्ध वाचा परमेश्वराच्या कार्यात घालायची सोडून ह्या सगळ्यांच्या गप्पा मारण्याची काही गरज नाही. हे तिसरं व्रत घ्या. क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष नको. दोन पैसे रिक्षाला द्यायचे की तीन पैसे द्यायचे. अहो, तीनच द्या. काही हरकत नाही. तो धापा टाकत तुम्हाला घेऊन आला. कशाला त्याचा आणखीन श्वास घेता तुम्ही. तीन पैसे त्याला दिले तर तुमचं काय कमी होईल? द्यायचं शिका थोडं. पैशाची आकडेमोड फार नको. नाहीतर लागतील त्रास व्हायला. भयंकर पैशाच्या मागे धावणारे लोक असतात, त्यांना भयंकर पैशाचा त्रास होतो. तेव्हा तुम्ही अकाऊंटन्सी एक – एक पैशाची करू नका आणि कद्रुपणा कमी करा. हे चौथं व्रत आहे. स्वत:च्या बाबतीत मात्र हे केलेलं बरं. खाण्यापिण्याच्या बाबतीत, विशेषकरून चमचमीत खाणे, वगैरे. आल्याबरोबर लिव्हर सगळ्यांचं धरलेलं. मी म्हटलं होतं अहो, तळलेलं इतकं खाऊ नका, चमचमीत. हे आमच्या बायकांचं विशेष आहे. नवऱ्यांना 7

Original Transcript : Marathi चमचमीत घालायचं आणि काबूत ठेवायचं, की सरळ ऑफिसमधून घरी. आज मी अमका बेत केला आहे, की नवरा सरळ घरी येणार.. जातो कुठे? चमचमीत जेवण आहे नां! घरीच येणार. कूठे जातो बरं. पण त्याचं लिव्हर कुठे जातं इकडे लक्ष दिलं पाहिजे. लिव्हर हेच आपल्या तत्त्वाला मुख्य धरून आहे आणि ते तत्त्व म्हणजे लक्ष, आपलं अटेंशन जे आहे ते ह्या लिव्हरमुळे कायम असतं. तेव्हा खाण्याकडे लक्ष अती, की मला हे पसंत आहे. मला आज श्रीखंड पाहिजे. झालं. गेले सहजयोगातून. माताजींचे पाहिलं, काहीही दिलं तरी आमच्या बुवा लक्षातच रहात नाही. जे मिळालं ते. जैसे राखवू, तैसेही रहूँ, ‘हे आम्हाला चालत नाही,’ हे सहजयोग्यांनी म्हणायचं नाही. खाण्याच्या बाबतीत लक्ष जरा कमी करायला पाहिजे. हिंदुस्थानाच्या लोकांचं खरं म्हणजे जीभ जी आहे, ती सगळ्यात अॅक्टिव्ह आणि सेन्सिटिव्ह. डोळे नाहीत तितके. नाक आहे म्हणा थोडं बहुत. पण कान आणि डोळे नाहीत. जर शिव्या दिल्या, तर सगळ्यांना अगदी विनोद वाटतो इथे. शिवी कोणी दिली एखादी, शिवीगाळ करणं, म्हणजे एक मोठं, भारी, काय म्हणायचं त्याला, एक विनोदाचा सागर उसळल्यासारखा आहे. कान सेन्सिटिव्ह नाहीत आपले. कसलीही घाणेरडी गाणी असली तरी वाह, वाह काय मजेदार गाणी चालली आहेत! त्या बाबतीत कानामध्ये सेन्सिटिव्हिटी नाही. काहीतरी मधूर वाटलं पाहिजे. ‘सदासर्वदा योग तुझा घडावा,’ असं काहीतरी व्हावं, असं काहीतरी सुंदर कानावर पडलं पाहिजे. तिकडे लक्ष नाही. आणि डोळ्यात तर मुळीच नाही. सौंदर्यदृष्टीचं वातावरण इतक बदललेले आहे, दयार्द्रता डोळ्यांमध्ये नाही आणि एकंदर लोकांकडे पहाण्याची दृष्टी चिकित्सक तरी असेल किंवा अत्यंत गलिच्छ तरी असेल. ते सहजयोग्यांना शोभणार नाही. फक्त दयार्द्र, करूणामय, फक्त देणारी दृष्टी, फक्त प्रकाश घेणारी दृष्टी, काही घेणार नाही अशी दृष्टी पाहिजे. एक दष्टी पडली तर कुंडलिनी खट्कन उभी राहिली पाहिजे तरच तो सहजयोगी म्हटला पाहिजे. एका दृष्टीने. मग पुढची स्थिती संकल्पाने. नुसता संकल्प करायचा, की जागृती व्हायलाच पाहिजे. ही शक्ती यायला पाहिजे. अहो, मराठा आहात तुम्ही, शिवाजीच्या राज्यातले. ते गेले आता इंग्लंडला जन्माला आले. आता हे तिकडचे बाजारबुणगे आलेत इकडे. असं म्हटलं तरी चालेल. कारण त्या लोकांची …… बघते तर मला आश्चर्य वाटतं. अशा त्या देशामध्ये त्यांनी सगळ्यांची डोकी पिकवून ठेवलेली आहेत. सगळ्या ब्रिटीशांची डोकी ठिकाणावर लावली. तर त्याच्यातलं सार हे आहे, की एक विशेष श्रेणीतले लोक आहात तुम्ही. एक विशेष प्रतिष्ठित मंडळी आहात. तुमच्यासाठी परमेश्वराने आपलं साम्राज्य उघडं केलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपण येणार. तेव्हा तुमची परिस्थिती काय असायला पाहिजे ? तुमचं अस्तित्व कसं असायला पाहिजे? तुम्हाला पाहताच काय वाटलं पाहिजे? आरशासमोर उभं राहून फक्त स्वत:ला म्हणायचं की, ‘मी सहजयोगी आहे.’ एवढं मोठं कार्य आहे तुमच्या हातात. लाखातून एक एक मनुष्य हुडकून काढला, तो काही असा नाही काढलेला आम्ही. आमच्या दृष्टीमध्ये काही फरक नाही. आम्ही काही चुकलेलो नाही, मात्र तुम्ही आम्हाला चुकवू नका. तुम्ही होतात काही तरी म्हणून तुम्हाला हुडकून काढलेले आहे. म्हणूनच तुम्हाला सगळं काही दिलं आहे. इतकं कुंडलिनीचं ज्ञान आत्तापर्यंत कोणालाही नाही. इतकं तुम्हाला आहे! जाऊन विचारून बघा. पुष्कळ मोठमोठाले आहेत. विचारा. कोणालाही सहजयोग्यांपेक्षा जास्त कुंडलिनीचं ज्ञान नाही. आणि तुमचीच कुंडलिनी हातावर फिरते. तुमची किती 8.

Original Transcript : Marathi चक्रे धरलेली आहेत, तरी ती निर्मळ उभी राहते सबंधच्या सबंध. कोणाचं रियलायझेशन चुकत नाही. तुमची चक्रं धरलेली असली तरी. तुमच्यात कितीही गडबड असली तरी त्या तुमच्या जागरणात येत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्याबद्दल मला सांगायला नको. एवढी प्रचंड शक्ती आपल्यामध्ये असल्यावर त्या शक्तीला साजेसं आपलं रूप असायला पाहिजे, की नाही! एक तऱ्हेचं व्यक्तित्त्व, विशेष व्यक्तित्त्व आहे. लोकांना वाटलं पाहिजे, की हा मनुष्य आहे बुवा काहीतरी, विशेष आहे. काही म्हणा, असं वाटलं पाहिजे तुम्हाला पाहिल्याबरोबर की काहीतरी आहे बुवा ह्यांचं वैशिष्ट्य. आता ही बाजू तर ही समज. ह्या समजेने जर राहिलात तर ती डिग्निटी आपल्यामध्ये येऊ शकते आणि ते सोडली, तर बाकी बाजू मात्र सुंदर आहे. मुख्य म्हणजे अशी की कधीही जगामध्ये इतके पार लोक नाहीत. एवढा मेळावा नव्हता, म्हणून हा महायोग आहे. कधीही जगामध्ये इतक्या सट्कन लोक पार झाले नव्हते. म्हणजे काय हे, तयारी बघा, तयारी काय आहे! अहो, सुरुवातीला दोन वर्षे पंचवीस माणसांवर मेहनत करून, ओरडून आरडून, बारा माणसांना कसंतरी पार केलं होतं आणि नंतर जे सुरू झालं सटासट् ते तुम्हाला माहिती आहे, की कसे लोक पार होताहेत! काय दशेला आलेत म्हणजे काय आहे ? इतक फास्ट ज्याला म्हणायचं कार्य कधी झालेलं कोणी पाहिलेलं नाही. माझ्या तरी बुवा कधी लक्षात आलेलं नाही. पौराणिक स्थितीतसुद्धा नाही. ज्याला आपण सत्ययुग म्हणतो तेव्हासुद्धा नाही. इतके लोक पार होणं हे एक विशेष आहे. आणि तुमच्या शक्तीला पारावार नाही. खरोखर नाही. प्रचंड शक्ती आहे. फक्त तुम्ही वापरून बघा. आता म्हणजे राहिलं काय आहे कमी! असा विचारावा प्रश्न म्हणजे, ‘माताजी, काय कमी राहिलं आहे? सांगा आता. तुम्ही आम्हाला असं म्हणता, मग राहिलं काय?’ एकच कमी राहिलं आहे, की तुम्ही काय आहात? तुम्ही कोणत्या प्रतीचे हिरे आहात ? तुमचे पैलू किती आहेत? ते एकदा जाणून घ्या बरं. बस! मग मला काही सांगायला नको. आधी स्वत:च फक्त जाणून घ्या. आणि जाणण्यासाठी तुम्हाला चित्त दिलं आहे आम्ही. प्रकाशित झालेलं चित्त आहे तुमच्याजवळ. त्याने जाणून घ्या आधी तुम्ही काय आहे ते. मग पुढे काही मला बोलायला नको. सांगायला नको. साक्षातच दिसणार आहे ते. भक्तीची साथ आहे, इतक पवित्र सगळं आहे. फक्त स्वत:बद्दल कल्पना नाही. हा तेवढा दोष आहे. मी कोण आहे, ते ओळखा. ते जाणून घ्या आणि स्वत:ची इज्जत करायला शिकलं पाहिजे. जर स्वत:चीच आम्ही केली नाही, तर दुसऱ्यांची आम्हाला काहीही वाटणार नाही. आधी स्वत:ची किंमत करून घ्या. माझ्यासाठी तुम्ही कितीही महान असलात तरी तुमच्यासाठी तुम्ही महान व्हायला पाहिजे. मग त्याची ऐट बघा. झालं एकदा हे सुरू झालं, मग आमचं काही कार्य रहात नाही. तुम्ही तुम्हाला ओळखलं नं, मग झालं. आम्हाला कारय करायचंय ! एवढेच एक कार्य आहे आणि ते जुळवून घेतलं पाहिजे. सहजयोग हा इतका मोठा ज्ञानाचा भांडार आहे. इतका मोठा सागर आहे नुसता ज्ञानाचा. तो सबंध तुमच्यातून वाहू शकतो. सबंध सत्य तुमच्यातून ओसंडून वाहू शकतं. सगळ्या जगाला तुम्ही पाणी पाजू शकता. ही तुमची स्थिती आहे. तेव्हा ‘माताजी, आम्ही काय आम्हाला फक्त पाचशे रुपये पगार आहे. त्याने काय होणार?’ त्या ख्रिस्ताला केवढा पगार होता हो? ज्याने सर्व विश्वाला हलवलं. ‘आम्ही, म्हणजे काय खड्डेघाशी. आम्हाला काही नाही.’ ‘बरं, आणखीन.’ ‘आम्हाला काय माताजी, 9

Original Transcript : Marathi आम्ही तिकडे फक्त एक साधारण सुताराचं काम करतो.’ सुताराचा मुलगा होता ना तो! त्यानेसुद्धा कोणाला पार नाही केलेले. ते तुम्ही केलेले आहे. तेव्हा स्वत:ची किंमत करा आणि किंमत लावून घ्या. बघू या आता. सगळ्यांना अनंत आशीर्वाद ! अनंत प्रेमाने आवाहन, की ह्या महायोगामध्ये सामील व्हायला पाहिजे. एकाहून एक हिरे सजले पाहिजेत. त्याच्यापेक्षा आम्हाला काहीही नको. ह्या देशाचं जे काही दारूण आहे, ते सगळं काढायला पाहिजे मात्र. ते कार्य तुमच्या हातात आहे. तुम्ही करत असणार. भारतीय आहात तर भारतीयांचं डोकं ठीक करा. सहजयोगाशिवाय होणार नाही. सहजयोगच पाहिजे त्याला. त्याच्याशिवाय होणार नाही. सहजयोग लादा त्यांच्यावरती. आता काय करता! तसं सरळ जर डोक्यात येत नाही, तर सहजयोग लादला पाहिजे त्यांच्या डोक्यावरती. बाकी आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. कारण हा सहजयोग्यांसाठीच आहे. नवीन मंडळी किती आली? हात वर करा बरं. अहो, बरीच दिसताहेत. आता माझं तिकडे जाऊन काही छापू नका, उलटसुलट. छान, आता नवीन मंडळी पुढे येऊन बसू देत. आणि आमच्या सहजयोग्यांना काही प्रश्न असेल तर विचारा. चार्ट नाही का? बरं काही हरकत नाही. आपण कुंडलिनी विषयी ऐकलेलेच आहे. पण जे काही सांगितलेले आहे ते अगदी खरं आहे. आपल्यामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती त्रिकोणाकार अस्थिमध्ये स्थित असते आणि त्या अस्थीला लॅटिनमध्ये सेक्रम असं म्हणतात. तेव्हा लॅटिन भाषेलासुद्धा ही कुंडलिनी शक्ती ज्या घरामध्ये बसलेली आहे, तिला सेक्रम म्हणजे सेक्रेड म्हणण्याची सुबुद्धी लोकांना झाली. म्हणजे त्यांना तरी त्याच्यात काहीतरी गम्य होतं असं वाटतं. दुसरं संस्कृत भाषा ही नॉर्वेमध्ये खरी म्हणजे झालेली आहे. सुरुवातीला जी भाषा होती तिला प्री-लॅटिन भाषा असं म्हणतात किंवा संस्कृतच्या आधीची भाषा. ती भाषा आल्यानंतर लोकांच्या असं लक्षात आलं, की कुंडलिनीचं जे भ्रमण आहे, त्या भ्रमणाने गुंजारव होतात. आणि त्या भ्रमणाचे निनाद आपल्या चक्रांवरती ऐकायला येतात. आणि त्याच्यावर अवलंबून त्यांनी ही आपली जी देवनागरी भाषा आहे ती बनवली. म्हणजे आता विशुद्धी चक्रावरती सबंध अ, आ, इ, ई, उ, ऊ, जे आहेत सबंध त्याचा निनाद आहे. तेव्हा ही भाषा देवांना माहिती आहे म्हणून ह्याला देववाणी म्हणतात. अशा रीतीने संस्कृत भाषेचा अर्थ आहे सन+कृत, सन म्हणजे शुद्ध किंवा पवित्र, कृत अशी जी भाषा, त्यानंतरची ती संस्कृत झाली, त्यानंतर बाकीचं जे राहिलं ते लॅटिन झालं. अशा रीतीने ह्या संस्कृत भाषेचा आविर्भाव झाला आणि ती भाषा भारतामध्ये वापरण्यात येऊ लागली. म्हणून संस्कृत ह्या भाषेला देववाणी म्हणतात. कारण ती देवांना कळते त्याचे जे निनाद आहेत, ते आपल्यामध्ये स्थित असलेल्या देवतांना कळतात, म्हणून संस्कृत भाषेचे महत्त्व आहे. त्याप्रमाणे सेक्रम हा शब्दसुद्धा सेक्रेडपासून आलेला आहे. आणि ती जी भाषा वाचलेली होती, जी लॅटिन होती, त्या भाषेमध्ये तिला सेक्रम म्हणतात. म्हणजे त्यांनासुद्धा कुंडलिनीबद्दल माहिती ही होती. नाहीतर त्यांनी त्याला सेक्रम म्हटलं नसतं. नंतर मेडिकल सायन्सचं असं म्हणणं आहे, की सबंध शरीर जरी जळून गेलं तरीसुद्धा ही त्रिकोणाकार अस्थी जळत नाही. म्हणून त्यांनी तिला सेक्रेड असं म्हटलेले आहे. आता ही शक्ती आपल्यामध्ये 10

Original Transcript : Marathi आहे आणि ती तुम्ही बघू शकता डोळ्याने. जेव्हा कुंडलिनीचं जागरण होतं, तेव्हां पुष्कळ लोकांमध्ये नाभी चक्र, जे वरचं चक्र आहे, ते गच्च असं दबलेलं आहे. त्याच्यामुळे ही कुंडलिनी जागृत होते ती त्याला उघडण्यासाठी धक्का देते . ते बंद वगैरे जे आपण राजयोगात वाचतो ते आतमध्ये घटित होतं. ते करावं लागत नाही आर्टिफिशिअली. ती आतमध्ये घटना घटित असते आणि त्यावेळेला आपल्याला डोळ्याने बघता येतं. कुंडलिनी अशी धकधक, धकधक , त्रिकोणाकार अस्थिमध्ये जसं काही हृदय असं व्हावं असं होतं. अगदी अँक्च्युअली असं होतं. पण ज्या लोकांची स्थिती साधारण मध्यगा आहे, जे लोक फार जास्त एक्स्ट्रिमला जात नाही, अति वर नसतात. त्यांची कुंडलिनी सट्कन चढते. त्यांना काही त्रास होत नाही किंवा ज्यांना काही शारीरिक, मानसिक, बौद्धिक असे काही त्रास नसले त्या लोकांची कुंडलिनी सट्कन चढून ते पार होतात आणि काहीही त्रास होत नाही. विशेषत: लहान मुलं वगैरे असली, त्यांना तर मुळीच त्रास होत नाही. पुष्कळशा अशा वयोवृद्ध लोकांनासुद्धा पाहिलं आहे, त्यांना काहीही त्रास न होता एका क्षणात कुंडलिनी चढून ते पार झालेले आहेत. तेव्हा ही शक्ती प्रत्येकामध्ये आहे. ही आपल्यामध्ये एका सुप्तावस्थेत असते. जशी अंकुराची शक्ती एखाद्या बीमध्ये सुप्तावस्थेत असते, त्याप्रमाणे. मातेच्या गर्भात, पृथ्वी मातेच्या गर्भात घातल्यावर बी रूजू लागतं. आणि त्याची जी शक्ती सुप्त असते. ती जागृत होऊन तिच्यातून अंकुर फुटू लागतो. तसेच आपल्यामध्येसुद्धा अगदी जिवंत हे कार्य आहे आणि हे जिवंत कार्य घटित होतं. ते त्याचवेळेला घटित होऊ शकतं, जेव्हा त्याला जागृत करण्याची शक्ती त्याच्यासमोर साक्षात् असते. ही शक्ती एखाद्या इलेक्ट्रिकसारखी नाही. इलेक्ट्रिकला काही समजतंय का मी काय बोलते ते! ही प्रेमशक्ती आहे. ही प्रेमाची शक्ती आहे. परमेश्वराचं हे प्रेम आहे. तेव्हां तिला सगळं समजतं. मी कोण आहे ते तिला माहितीये. तिला हे ही माहिती आहे, की तुम्ही कोण आहात? तिला हे ही माहिती आहे, की तुम्ही काय काय चुका केल्या आहेत! सगळं टेप्ड आहे तुमच्याकडे. ती टेप आहे तुमची. पण ती तुमची आई आहे. आई आहे आणि ती तुमचीच आई आहे. तुमची कुंडलिनी तुमची आई आहे. तिला दुसरा मुलगा आणि मुलगी नाही. तुम्हीच तिचे पुत्र आणि तुम्हीच तिचे सगळे काही आहात. त्याच्या पलीकडे तिला काही इंटरेस्ट नाही. कसं तरी करून माझ्या मुलाला दुसरा जन्म दिला पाहिजे. हीच तिची जन्मानुजन्माची धडपड आहे आणि तेच ती करते. तेव्हा अशी कुंडलिनी तुम्हाला त्रास देते वरगैरे, असं जे म्हणतात, ते महामूर्ख आहेत. त्यांचं मुळीच ऐकू नका. तुमची जी आई रात्रंदिवस तुमच्या हितासाठी धडपडते आहे, ती तुम्हाला कसा बरं त्रास देईल! बरं, ह्यांना होतं काय, अनाधिकार चेष्टा हे करतात. म्हणजे आता समजा खेड्यातून एखादा मनुष्य आला आणि त्याने दोन्ही बोट प्लगमध्ये घातले आणि सांगितलं की इलेक्ट्रिसिटी शॉक देते. तर तुम्ही काय म्हणाल ? तसेच आहे हे, की, जाणकार मनुष्य ज्याला म्हणतात, जो जाणतो, तोच…. पण हा जाणणारा मनुष्य बुद्धीने जाणणारा नव्हे. त्याच्या स्थितीने जाणणारा पाहिजे. त्याची अवस्था जाणणारा पाहिजे. त्याच्या जाणकारीची एक अवस्था असते. बुद्धीने जाणकार नसतो तो. पण एका अवस्थेत असतो आणि ती अवस्था कुंडलिनी जागृत झाल्यावर सगळ्यांना प्राप्त होते. त्या अवस्थेला आत्मसाक्षात्कार अस म्हणतात. ही कुंडलिनी फक्त सहा चक्रांना छेदते. सातवं चक्र हे कुंडलिनीच्या खाली आहे. हे ही एक मोठं लक्षात 11

Original Transcript : Marathi घेण्यासारखं आहे. म्हणजे हे रजनीशसारखे जे गाढव आहेत, गाढव म्हणणं म्हणजे गाढवाचाच अपमान आहे म्हणा. ह्या लोकांना हे माहीत नाही मला वाटतं , की कुंडलिनी ही खालच्या चक्राच्या वर आहे. तेव्हा हिचा संबंध ह्या गोष्टीशी नाही. तिथे गणपती बसवलेत. जो चिरबालक गणपती आहे तो तिथे बसवला आहे. त्याला ह्याच्याशी काही संबंध नाही. ही कुंडलिनी जेव्हा जागृत होते, तेव्हा अत्यंत सूक्ष्म अशी केसासारखी ब्रह्मनाडीतून, आता मी सगळ्या नाड्यांची नावं सध्या सांगत नाही. नाहीतर फार कन्फ्युजन होईल. पण सगळ्यात ही अंतर्तम नाडी येते, त्याच्यातून निघते आणि वर येऊन हे ब्रह्मरंध्र जिथे फाँटनेल बोन एरिया आहे, ज्याला आपण मराठीत टाळू म्हणतो, तिथे येऊन त्याला छेदते. म्हणजे टाळू कशी एकदम नरम होऊन जाते. आणि तुम्हाला इथेसुद्धा थंड थंड येतांना वाटेल. डोक्यातून असं थंड थंड, गार, गार वारं येतं. हातातून असा गार गार वारा येऊ लागतो. आता आपलं आत्म्याचं जे स्थान आहे, ते हृदय आहे. हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे. तर हे हृदय चक्राचं, स्वत:चं आसन आहे . सीट आहे ते. म्हणजे आता आपली सीट दिल्लीला आहे. इथे जरी असले प्रेसिडेंट, तरी आपण कळवतो दिल्लीला. दिल्लीला कळलं म्हणजे पोहोचलं त्याच्यापर्यंत. तर ते जेव्हा भेदन झालं की लगेच तिकडे आत्म्याला कळतं आणि हातातून हे जे थंड थंड वहायला लागतं, हे आत्म्याचे निनाद आहेत. अनहत आहे आणि हे जे वहायला लागलं, हे जे थंड थंड हातातून वाऱ्यासारखं, चैतन्य लहरींचा जो प्रवाह असा वाहू लागतो तो तुमच्या आत्म्याचा द्योतक आहे. आत्मा हा स्वत:च्याच आनंदात असतो. आनंदाचा काही विचार नाही. आनंदाला तो शोधत नसतो. तो आनंदात आहे. तो आनंद स्वरूप आहे. पण जेव्हा त्याला आपल्या चित्तावर त्याचा प्रकाश पडतो, तेव्हा आपल्या चित्तातसुद्धा आनंद प्रकाशतो. तेव्हा आपलं जे मनुष्याचं चित्त आहे ते मानवी चेतनेचं चित्त आहे. हे ह्युमन अवेअरनेस आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आत्म्याचा प्रकाश येतो, तेव्हा सबंध आत्मा प्रकाशित होतो. आपल्यामध्ये जशी एखादी समजा, छोटीशी ज्योत आहे, जसं गॅसलाइटमध्ये आपण पाहिलं असेल, गॅसला काही लाइट नसतो. पण ज्योतीने त्याला स्पर्श केल्याबरोबर एकदम त्याचा उजेड होतो, तसं आपलं जे चित्त एकदम अंधारात जे असतं, ते एकदम प्रकाशित होतं. पण ह्या प्रकाशामुळे आपल्यामध्ये सार्वभौमिकता येते. म्हणजे सांगावं लागत नाही, घटना घटित होते. होताच तुम्ही. ते सांगाव लागत नाही. किंवा तुम्ही सगळे भाऊ-भाऊ आहात किंवा भाऊ-बहिणी आहात असं सांगावं लागत नाही. तुमच्या बोटामधून हे जे वहायला लागतात, हे जे परमेश्वराचं स्पंदन वहायला लागतं , तर ह्या बोटांवरच तुम्हाला कळतं, स्वत:चं कोणतं चक्रं धरलेलं आहे! कारण ही सगळी चक्र आहेत. १, २ ३, ४, ५, ६ आणि ७, डावीकडचं धरलंय की उजवीकडचं धरलंय. ते तुमच्या बोटावर तुम्हाला कळतं. इतकेच नव्हे पण दुसऱ्यांचं कोणतं धरलेलं आहे, ते ही कळतं. आत्ता तुम्ही पार व्हा आणि ह्यांचं तुम्ही सांगू लागाल. त्याला काही नॉलेज लागत नाही. आता ही लहानशी मुलगी आहे नां, ही पार आहे तर ती सुद्धा सांगेल, की तुमचं हे बोट धरलेलं आहे, ते धरलेलं आहे. हे धरलंय, तुम्हाला सर्दीचा त्रास आहे. तुम्ही दहा मुलांना डोळे बांधून जरी उभं केलं तरी ते सगळे एकच बोट दाखवणार. कारण सत्य एकच आहे. म्हणजे हे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे. तेव्हा काही त्याबद्दल वाद रहात नाही. सगळे एकच आहेत. म्हणजे स्वत:बद्दलही सांगायचं असलं, तरी सांगतील ‘माझं आज्ञा चक्र धरलंय माताजी.’ म्हणजे काय ? आज्ञा चक्राचं अहंकाराने येतं. पण एखाद्याला म्हटलं की, तुला अहंकार आहे, तर 12

Original Transcript : Marathi द्यायचा तो एक ठेवून. पण ह्याच्यात मनुष्य म्हणतो मला काढा आता. मला दिसतोय मोठा मोठा अहंकाराचा स्रोत. काढा तो. कारण आपण आपल्यापासून वेगळे होऊन स्वत:ला बघू लागतो. आपल्या साडीवर जर काही घाण पडली आणि कोणी सांगितलं की ‘घाणेरडी झाली हो साडी. ‘ तर बरं बुवा, चला धुवून टाका. पण माणसाचं तसं नसतं. कोणी सांगितलं की, ‘तुला अहंकार आहे.’ तर मनुष्य त्याला मारायला धावतो अरे, तू काही अहंकार नाही. तो अहंकार तुला चिकटलेला आहे. तो सुटलेला बरा. पण शेवटी तो स्वत:लाच बघू लागतो. त्याच्यात साक्षी स्वरूपत्व येतं. आणि जे संसारात आपण सगळे परमेश्वराला विसरलेले आहोत, तर लक्षात येतं की हे सगळे नाटक आहे मुळी. आणि ज्या नाटकामध्ये आपण स्वत:ला शिवाजी समजतो ते कळतं, की नाही. आम्ही नुसते कपडे घालून शिवाजीचंे नाटक करत होतो. बाकी काही नाही त्याच्यात. तेव्हा खरा रंग चढतो जीवनाला आणि जीवन अत्यंत आनंदमय होतं. आता जे काही मी तुम्हाला सांगितलं आधी ते सहज घडतं. ९९% पटलं पाहिजे. आता लोक आमच्या तिथे आले होते, त्यांना मी ड्रगीस्ट आणि केमीस्ट म्हणायचे. म्हणजे कोमास्थितीमध्ये. इतके ड्रग घेत होते. पण दुसऱ्या दिवसापासून सटकन् सगळ सुटलं. दारू, सिगरेट सगळं सटकन्. ९९%. पण १% एखादा असेलही थोडा चिकट. असतो एखादा चिकट मनुष्य. पण त्याने चिकाटी लावायची आणि तो लावतोच. नाही तर धरते मग. विशुद्धी धरली किंवा माझं हे धरलं, ते धरलं. हे लक्षात येतं. म्हणजे दुखतं मग. सोडवलं नाही तर जाता कुठे ? लेफ्ट अशा रीतीने ते आपोआप सहज घडतं. सहज म्हणजे स ह ज. सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा हा जो योग आहे, हा तुमचा अधिकार आहे. हा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो तुम्ही मिळवलाच पाहिजे. पण हा अधिकार परमेश्वराच्या कृपेने मिळतो आणि तो नम्रतेने मागवला पाहिजे. त्याबद्दल तुम्ही म्हटलं की आम्ही स्ट्राइक (संप) वर जातो, किंवा त्यासाठी आम्ही एखादं युनियन फॉर्म करू. तसं काही चालत नाही बरं ! त्याबाबतीमध्ये नम्रता बाळगली पाहिजे. दूसरं काही नाही आणि त्याच्यात घडतं हो ! कसं सांगायचं? होतं नं, तसं झालच आहे तर काय करायचं! आणि ते होण्यासारखं आहे, पण झाल्यावर जे दोष होतात ते आधी सांगितलं तर बरं आहे. त्याच्यात जमलं पाहिजे, नाहीतर वाया जायचे तुम्ही. वाया जाऊ नका. परत दहा वर्षांनी मला भेटाल आणि सांगाल, माताजी, झालं होतं. पण आम्ही गेलो कामातून. मग उशीर व्हायचा. म्हणून ह्याची मजा पूर्णपणे घ्या. एकदा आता आलेत नां तुम्ही! आता पूर्णपणे घ्या. पण असा आहे सहजयोगाचा दोष. पैसे वगैरे काही देता येत नाही माताजींना. माताजींना बांधता येत नाही. वाट्टेल तेव्हा येतील नी वाट्टेल तेव्हा जातील. असा प्रकार आहे हा. तेव्हा माणसाला असं वाटतं की बुवा आपण पैसेच दिले नाहीत. समजा एखादा वाईट सिनेमा असला आणि तुम्ही पैसे दिले तर बसून रहाल तुम्ही. कारण पैसे दिलेत नां! मग इतका त्रास झाला तरी बसा आता. सहजयोगात पैसेच दिले नाहीत. तेव्हा त्याला बंधन कसलं आहे! थोडं तरी आतमध्ये जायला पाहिजे. मग जेव्हा मजा येऊ लागते, तेव्हा जरी मी तुम्हाला म्हटलं सोडा सहजयोग, तरी ‘नको रे बाबा. ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीही नको. हेच पाहिजे,’ असं म्हणाल. पण आधी थोडसं नेटाने पुढे जावं लागतं. ते बघतात. म्हणजे हे हे सगळे तुमच्यातले देव आहेत नां, ते बघतात, की कोणत्या पट्टीचे आहात तुम्ही. जर नसले तर ढकलून देणार. तेव्हा मी तुम्हाला स्वत:च सांगते, की जरी मी तुम्हाला दिसले फार सरळ, तरी तशी नाहीये. पुष्कळ माया आहे. 13

Original Transcript : Marathi तेव्हा माझ्या चक्करमध्ये येऊ नका. लक्ष स्वत:वर ठेवायचं. बरं का ? कारण माया फिरवल्याशिवाय मी तुमची ओळख कशी करू ? मग फिरवते कधी कधी चक्कर तर चक्करमध्ये येऊ नका. लक्ष ठेवा आणि तुमच्यापेक्षा जे आधी झालेले आहेत त्यांना विचारा. म्हणजे ते सांगतील ‘आम्ही कुठे धडपडलो. आमची कोणती चूक झाली. त्यांनी सांगितल्यावर तुमच्या लक्षात येईल, की हे धडपडले होते नां, आपण कसं धडपडायचं? आता ब्राइटनमध्ये एक गृहस्थ आले आणि दाखवायला लागले शिष्टपणा. येऊन बसले. असं तोंड करून बसले आणि मग मला म्हणायला लागले की, ‘मी तुमची मदत करायला आलो’ वगैरे वर्गैरे. एवढा मोठा आवाज काढून. कोणी अॅबनॉर्मल मनुष्य असला म्हणजे तो सहजयोगी नाही. सहजयोग म्हणजे अगदी नॉर्मल असायला पाहिजे. त्याचे कपडे नॉर्मल असायला पाहिजे. म्हणजे काहीतरी भलते कपडे घालून फिरायला लागला, तर तो सहजयोगी नाही असं समजायचं. अगदी नॉर्मल असला तरच तो सहजयोगी. ती त्याची ओळख आहे. आणि कोणी अॅबनॉर्मली वागू लागला, की मी कोणी तरी विशेष आहे. त्याला म्हणायचं, ‘बरं , ठीक आहे. व्हाल ठीक तुम्ही. आले होते बरेच असे इकडे.’ जसं जवाहरलालजींच आहे नां! एकदा ते पागलखान्यात गेले. तर एका वेड्याने त्यांना विचारलं की, ‘तुम्ही कोण?’ ते म्हणाले, ‘मी जवाहरलाल.’ ‘असं का!’ म्हणे, ‘ते प्राइम मिनिस्टर ( पंतप्रधान) जवाहरलाल ते तुम्हीच का?’ ‘हो, हो,’ म्हणे, ‘मीच. काय हरकत आहे.’ ‘ठीक व्हाल. आम्ही असच म्हणत होतो.’ तशातला प्रकार आहे. तेव्हा स्वत:कडे लक्ष ठेवायला पाहिजे. अगदी नॉर्मल होऊन जाईल. काहीही शो ऑफ करायचा नाही. काहीही विशेष करायचं नाही. शो ऑफ केला की गेलं. आता पुष्कळ पूर्वी यायचे हो. काय त्यांचा तो श्वास चालायचा. ओरडायचे काय ? म्हटलं, हे आहे काय पागलखाना? तसं काहीही करायचं नाही. कोणाला दाखवायचं आहे? स्वत:चेच स्वत:ला दाखवायचे आहे. सर्टिफिकेट स्वत:च स्वत:ला द्यायचं. माताजींच काही सर्टिफिकेट नको. त्यांचं सर्टिफिकेट काय कामाचं? तुमचं काय सर्टिफिकेट आहे ते स्वत:ला द्या. म्हणजे झालं. माताजींचं घेऊ नका सर्टिफिकेट, कारण आम्ही म्हणजे चक्करबाज आहोत. आम्ही सांगू ही तुम्हाला काही तरी. त्या चक्करमध्ये येऊ नका. आम्ही सांगणारच नाही काही. तुम्ही स्वत:च स्वत:ला समजून घ्या आणि तेवढी पात्रता तुमच्यात आहे. तेव्हां तेवढं मात्र, की आम्ही आमच्याशी काही खोटेपणा करणार नाही. कशाला करायचा? अहो, आपल्यालाच ठगवायला निघालो तर मग झालं काय? हे कोणतं शहाणपण आहे? तेव्हा स्वत:ला काही ठगवू नका. मिळवून घ्या. असं आहे, की विचार करून मिळणार नाही. कोणी म्हणेल, की मी विचार करून हे मिळवतो. दुसरं विचारांच्या पलीकडे आहे. हे विचारांच्या पलीकडे आहे. हे सीमेतलं नाही असीमेतलं आहे. तेव्हा जे असीम आहे त्याला सीमेने तुम्ही गाठू शकत नाही. विचाराला सीमा आहे. पण जे तुम्ही गाठाल ते तुम्हाला अगदी लॉजिकल वाटेल. त्याला लॉजिक आहे. इलॉजिकल नाही. पण रॅशनॅलिटी नाहीये. म्हणजे बसले. असं कसं माताजी म्हणतात ? असं कसं होइल? होत नां! बघा. काय होतं ते ! तेव्हा विचार करत बसले. आता परवा आम्ही ते पुस्तक वाचलं. त्याच्यात असं लिहिलं होतं. तुम्हाला मिळालं कां? असा विचार करा. नाही नां मिळालं आत्तापर्यंत! मिळाल नाही नां, हे निर्विवाद आहे. नाहीतर इथे आले कशाला माझ्याकडे ? तेव्हा आता मिळवूनच घ्या आल्यासरशी. आता ह्याच्याहून आणखीन काय सांगायचं बरं! फुकटात मिळवून घ्या. तुमचं तुम्हाला देते ते 14

Original Transcript : Marathi घ्या तुम्ही. आता काही प्रश्न असला तर विचारा. नंतर नको. प्रश्न : कुंडलिनी झाल्यावर काही वाटत नाही. उत्तर : ते झाल्यावर तुम्हाला वाटेल. जेव्हा होईल तेव्हा ते वाटेल. पण वाटेल काय? हातातून असं थंड थंड येईल. आता थंड थंड आल्यावरती हे आम्ही जागृत झालो किंवा नाही, हे कसं ओळखायचं. आता मी तुम्हाला हजार रुपये दिले समजा. आणि तुम्ही इंग्लिश आहात आणि तुम्हाला माहीत नाही रुपये म्हणजे काय. ते बाजारात जाऊन वठवल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार? तेव्हा हे काय झालेलं आहे ते आधी हात चालवून तर पहा. त्याची बुद्धीशी सांगड नाही. त्याचा तुम्ही प्रयोग करून बघा. माताजी म्हणतात नां आम्ही पार झालो, मग काय ? चढवून बघा तुम्ही. चढते का दुसर्यांची? तुम्हाला आश्चर्य वाटेल पॅरिसला एक मुलगा भेटला. तो म्हणाला की, इंट इंज टु गुड टु बो टू मदर. आय डोट नो हाऊ ….. आय … लिफ्टिंग. आय अॅम टॉकिंग अबाऊट गॉड. आय • •• अॅम नॉट टॉकिंग अबाऊट सिंपल थींग्ज. ही इज गॉड अल्माइटी यू से दॅट. बट डू यू नो व्हॉट डज दँट मीन. ही इज गॉड अलमाईटी. म्हणजे काय प्रचंड शक्ती आहे ती. करून तरी बघा. मग दुसरा हा ही विचार येतो, की आमच्यात कसं येईल? अहो, तुम्ही काही तरी विशेष आहात म्हणूनच येतंय. शंभरदा सांगितलं. पण माणसाला हा विश्वासच बसत नाही, की आम्ही काहीतरी आहोत. आता परत परत सांगते की तुम्ही विशेष आहात. आणि ह्या विशेषाला काही तरी झालं पाहिजे, की ते वैशिष्ट्य त्याचं प्रकाशित झालं पाहिजे. ही घटना फक्त व्हायला पाहिजे. आता ते तुम्ही स्वत: एक्स्परिमेंट करून बघा की. खरं आहे की नाही. पण त्याच्यामध्येसुद्धा एक तऱ्हेचा प्रोटोकॉल आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्याने हिरा दिला. तर तुम्ही त्या माणसाला असं म्हणणार का खोटं आहे? हा हिरा नाही. म्हणजे हे काय शोभतं कां? मग तुम्ही हळूच हिरा घेऊन जाल. रत्नपारख्याकडे जा. ‘मी काही तिथे बोललो नाही. हा हिरा कसा मिळाला मला काही समजत नाही. बघा बरं हा खरा आहे का?’ तर तो तुम्हाला साष्टांग नमस्कार घालेल आणि ‘अरे बाबा, हे तुम्हाला मिळालं कुठून ? अलभ्य आहे.’ हं काय? येतंय का थंड ? डोळे मिटा. चष्मे घ्या काढून. 15