Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

मंगळवार, जानेवारी 19th, 1982

महाराष्ट्राचं प्रेम अगाध आहे आणि ते माझ्या नुसतं हृदयात भरून येतं. इतकं प्रेम तुम्ही लोकांनी दिलेलं आहे, कि त्या प्रेमातच सर्व संसार बुडाला, तर आनंदाच्या लहरी, किती जोरात वाहू लागतील याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. त्या प्रेमासाठीसच   धडपडत  ही मंडळी तुमची भाषाही त्यांना येतं नाही, तरी सुद्धा इतक्या लांबून दुरून धडपडत महाराष्ट्रात जायचे म्हणून येतात. असं प्रेम जगात कुठेही नाही. हे अगदी खरं आहे. जरा मराठी भाषा सडेतोड आहे, जरा दांडगी आहे, खणखणते जास्त. पण हृदय मात्रं प्रेमाने भरलेलं आहे. भाषेमध्ये खोटा दांभिकपणा नाही.

पण एकंदरीत प्रेमाची व्याख्या सुद्धा मराठी भाषेतच करता येते. किती तरी शब्द शोधून मला बाहेर सापडत नाहीत. जशी आपल्या मराठी भाषेत आहेत. कारण हृदयामध्ये जो प्रेमाचा प्रवाह वाहत आहे , त्याच्याच लहरी आदळून, आपटून, नवीन नवीन शब्द बनवतात. आणि त्या शब्दांचे तुषार, त्यातनं संगीत जाणवतं. हे असलं अबाधित प्रेम सदा सर्वदा महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. ज्या लोकांचा संबंध बाहेरच्या लोकांशी आला आहे, अश्या लोकांमध्ये मात्र, थोडासा फेरबदल झालेला आहे. त्यामुळे प्रेम काय आहे हे लोकांना कळत नाही. प्रेमामध्ये मनुष्याला त्याग म्हणजे हा जाणवतच नाही. एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल आस्था वाटते. विशेषतः जर एखादं मूल आजारी असलं तर तिचा जीव नुसतं कासावीस होतो त्या मुलासाठी. हे कसं? केवढं तिच्यासाठी हे धन आहे मोठं, स्वतःचा जीव आतमध्ये घालून, डोक्यात घालून, रात्रंदिवस ती त्या मुलाच्या सेवेसाठी असते. हे कुठून येतं? हे एवढे त्यागाचे जीवन पण वाटते का त्याग आहे? कसंही करून मुलगा ठीक झाला पाहिजे माझा. तसंच आपल्या नवऱ्याबद्दल मुलांच्या बद्दल हीच आस्था ह्या देशात बायकांना आहे. आणि आहे. अजून  पुष्कळांना आहे. तेंव्हा बाहेरचं वारं मात्र त्या प्रेमाच्या ज्योतीला लागू देऊ नका. ते  सांभाळून ठेवा म्हणजे बाहेरचे जेवढे आहेत ते तुमच्या पासून शिकतील. ते घालवायचे नाही. आजकाल नवीन वारं सुरु झालेलं आहे की प्रेमबीम काही नाही. प्रेमाला काही अर्थ नाही. प्रेम म्हणजे मूर्खपणा आहे. सगळ्यांशी तोडून वागायचं. सहज योगाला ते  शोभत नाही. चार तऱ्हेची माणसे आहेत. पुष्कळ  सहज योगीही  नसतात. सहज योगाच्या विरुद्ध बोलतात. खरंय. वाटतं हे काय? पण त्यांच्यावर  दया केली पाहिजे. उद्या हे नरकात पडणार. आपलेच भाऊबंद  आहेत. हे नरकात पडणार. तेंव्हा एक तऱ्हेनी त्यांच्याबद्दल  आंतरिक भावना ठेऊन, कोणालाही दुरावलं नाही पाहिजे. सर्वांशी प्रेमानी वागलं पाहिजे.

माझं लग्न झालं, ते म्हणजे उत्तर प्रदेशात. तिथेही पाहिलं मी. पुष्कळ साठा आहे प्रेमाचा. पण प्रेम बोलून दाखवायचं फार कठीण लोकांना वाटतं. मी गेल्यानंतर मात्र सर्वांना वाचा फुटली. प्रेम बोलूनही दाखवावं लागतं, सांगावं लागतं, जपावं लागतं. मुख्य म्हणजे कुटुंब व्यवस्था महाराष्ट्रात ही फार चांगली आहे. बायकांनी सांभाळलेली आहे. पण आता बायकांनी जर आपलं धार्जिण्य सोडलं, आपली पद्धत सोडली, दुसऱ्याचं बघून बदलायला लागल्या तर मात्र या देशाचं फार नुकसान होईल. आपल्या जुन्या पद्धती फार वाईट आहेत, असं बायकांनी कधी विचारात घ्यायचं नाही. सहन करावं लागतं. पण सहन करणारा सुद्धा कोण आहे? त्यालाही शक्ती पाहिजे. ज्याला शक्ती नाही तो काय सहन करणार?  बायका ह्या साक्षात शक्तिस्वररूपच असतात कि नाही? आणि जर स्त्रीने ती  शक्ती वापरली नाही तर  ती  काय होणार? पुरुषांचे वेगळे आहे, बायकांचे वेगळे आहे. जसं एका रथाला दोन चाकं असतात एक उजवीकडे एक डावीकडे. डावीकडच्या चाकाने उजवीकडे येण्याचा प्रयत्न करू नये. तो मूर्खपणा आहे. आता बाकीच्या फार पुढारलेल्या देशातल्या बायका, पुढारलेल्या. पुढारल्या कुठे माहित नाही. शिंग निघालेत.  

त्यांचं तरी बघा काय म्हणजे काय स्थिती करून ठेवलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की लंडन इंग्लंड मध्ये प्रत्येक आठवड्याला मी असं ऐकलं होतं कि दोन मुलं मारली जातात. आई मारते. ऐकले का तुम्ही? तुम्ही जन्मात कुठेच ऐकले नाही. पण आता मी ऐकलं हे लंडनला आहे. इंग्लंडची तर गोष्टच होणार.  

प्रेमासाठी सहन ही करावंच लागणार आणि त्याच्यातच आनंद आहे की आम्ही प्रेम करतो. प्रेमाचा आनंद प्रेम आहे. त्याच्या पलीकडे काय? प्रेम करण्यातच खरा आनंद आहे. बाकी कशातच आनंद नाही, तसंही पाहिलं तरी. काय दोन वस्तू मिळाल्यात किंवा नाही मिळाल्यात. 

भांडणापूर्वी नवराबायकोत हेच व्हायचं. नवरा म्हणायचा काय स्वतःचं बघत नाही. सकाळी उठून कामाला आपली लागते. काही व्यवस्था ठीक नाही तुला स्वतःची. काही तरी स्वतःचं करून  घे. लपून छापून सगळे  आहे . घरच्या वडीलधाऱ्या लोकांच्या समोर नसायचं. असं काय आहे? सकाळी नवराच उठून थोडं पाणीबिणी भरून ठेवायचा. मला इतकं माहित आहे आमच्या घराण्यात, की फार काम पडलं तर साडी नेसून त्यांनी पाणी भरलं, की कुणाला दिसलं नाही पाहिजे. कारण बायको बाळंतीण व्हायची आहे आणि तिला त्रास होईल. असे प्रेमाचे पूर्वी प्रकार होते. बाहेरून सर्व व्यवस्थित. पण आतून मात्र अगदी प्रेम, आणि ते जतन करून परत त्याची जाणीव करून द्यायची. हे पुरुषांचं फार चुकतं की बायका इतकंही करून त्याची जाणीव त्यांना देत नाही.  मग त्या उद्धट होतात.  दुःखी होतात. ते वाढत गेलं की वाढतच जातं. मग ऐकायचंच नाही नवऱ्याचं. ही फार वाईट गोष्ट आहे. आणि मुळात, मुळात चुकतं  म्हणजे एवढंसं लहान दिसत ना ते आपल्याला ते फार मोठं आहे. एक छिद्र जसं काही व्हावं संबंध परमेश्वराच्या पदरात, तसं आहे. तेंव्हा दोन शब्द जरी नवऱ्याने काढले तरी हरकत नाही. कारण बाहेरचा सर्व ताप घेऊन घरात येतात तेंव्हा आपल्यावरच येणार. पण नवऱ्यांनी सुद्धा ताल ठेवला पाहिजे.

मी आज एवढ्याचसाठी म्हणतेय कारण परदेशातून आल्यावर मला ही तफावत जाणवली. आणि वाटलं की कुठे माझ्या देशातल्या बायकासुद्धा या मूर्ख बायकांसारख्या कुठे वाहून जाऊ नाही. कारण सबंध शक्तीचं सार   त्यांच्यातच. दिसायला आपलं कुटूंब म्हणजे फार लहान वाटते. पण तसं नाही. ते फार मोठं घटक आहे. आणि एक एक कुटुंब सहज योगामध्ये,  म्हणजे एवढे मोठे घटक आहे, की त्या घटकामध्ये आज फार मोठमोठाले जीव जन्माला येणार आहेत. एवढे मोठमोठाले जीव जन्माला येणार आहेत, त्याची आपल्याला कल्पनासुद्धा करता येणार नाही. त्यासाठी अश्या कुटुंबाची व्यवस्था करायला पाहिजे जिथे मनुष्याला, एक असं वाटलं पाहिजे की विशेष काहीतरी सुंदर पैकी घरटं आहे, की  तिथे  गेलं म्हणजे अगदी शांत. ती  शांती स्थापित करायचं स्थान म्हणजेच घर आहे, कुटुंब व्यवस्था आहे.  

आपण शांतीच्या फार मोठ्या गोष्टी करतो. पुष्कळश्या  बायका मी पहिल्या आहेत आम्ही मेंबर आहोत म्हणे आम्ही शांती देऊ. आणि घरी? घटस्फोट ! तेंव्हा घरामध्ये शांती असल्याशिवाय बाहेरच्या शांतीला काही  अर्थ नाही. तुम्ही कितीही पैशे कमवा , काही करा त्याला काही अर्थ आहे? त्याचा काय उपयोग? पुरुषांनी सांभाळून घ्यायला पाहिजे बायकांनी सांभाळून घेतले पाहिजे. दोन चाकं  आहात तुम्ही एकाच रथाचे. आणि तो रथ एवढा मोठा आहे. त्या रथाचे तुम्ही चाकं आहात. त्या रथाचे वहन तुम्ही करत आहात. आणि केवढी मोठी ती गोष्ट आहे त्याची कल्पना दुसऱ्या देशामध्ये जाऊन कळते. ते छिन्नभिन्न झालेत सगळे ती छिन्नभिन्नता इतकी जास्त जाणवते इतकं दुःख वाटतं आणि आता जोडता, जोडता येत नाही. त्याला जोडणारा आता काही असा त्यांनी ग्लू  काढलेला नाही. तिकडे सर्व तऱ्हेचे बोल्ट काढलेले आहेत. पण नवरा बायकोचे जोडणारा काहीच नाही. 

ते मराठी भाषेचं वैशिष्ठ्य हे आहे कि बोलतांनाही गोडवा असायला पाहिजे. एक गोडवा आणून बोलता आलं पाहिजे. आणि ते जर साधले नाही विशेषतः पुरुषांनी. सारखं बायकोकडे लक्ष, फक्त तिच्या चुका काढण्यातच असलं तर ती कधी ठीक होणारच नाही, कारण तिला सध्या, नाहीतरी चुकाच काढतच असतात काही केलं तरी, मग कश्याला ठीक व्हायचे? ही गोष्ट जरी आज लहान दिसते लोकांना, की माताजी आज हे काय सांगत बसल्या? राष्ट्राच्या गोष्टी करणं फार सोपं आहे. राष्ट्र फार मोठं मोठे झाले पण ज्यांची कुटुंब व्यवस्था बिघडलेली आहे ते राष्ट्र आज रसातळाला निघाले अगदी रसातळाला त्यांचं काहीही  भलं होणार नाही. तेंव्हा ही दोरी इकडचं संभाळून ठेवा. खुंटीला जास्त महत्व आहे. एकदा जर का खुंट सुटली तर बेफाम होऊन जाईल सबंध संसार. म्हणून आज प्रथम तुम्हाला विशेष करून सांगते, की कुटूंब व्यवस्था सांभाळून घ्या.   

आता रोज बघते, अमेरिकेला जाऊन आल्यापासून, तर तिथल्या लोकांना बघून मला आश्चर्य वाटले  इतके तापट लोक आहेत. इतके तापट आहेत की ज्या दिवशी मी तिथे पोहोचली तर बातमी होती की जरासं एका माणसाचं दुसर्याशी भांडण झालं तर ह्यांनी पिस्तूल काढून त्याला मारलं. रस्त्यावरच. ओळख ना देख. लहानश्या एका गोष्टीवरून भांडण झालं की पिस्तूल काढून मारतात? एवढे तापट व तामसी  लोक आहेत तिथे. म्हणजे त्यांच्या आईचा आणि वडिलांचा पत्ता घेतला तर कळेल, की त्यांनी किती तरी लग्न बिग्न करून ह्या मुलांचा सत्यानाश केला. जर तुम्हाला राक्षस तयार करायचे असले तर तुम्ही घरात भांडण तयार करा. बायकांवर फार मोठी जबाबदारी आहे. घरामध्ये सर्व काही शांती आहे आणि शांतीचंच लेणं बायकांनी घातलं पाहिजे, पुरुषांनी दिलं पाहिजे आणि बायकांनी घातलं पाहिजे. ज्यानी आपल्या घरातली शांती शुद्ध होईल अश्या गोष्टी कराव्यात. सहज योग्यांनी असा मनाचा निर्धार केला पाहिजे की बोलायचे तर गोडच बोलायचं, दोन चुका क्षमा केल्या पाहिजे. आई तरी आमच्या कितीतरी चुका क्षमा करत होती. आणि तसेच बायकांनी तसेच दुर्लक्ष पुरुषांकडे (माफ) केलं पाहिजे. इतकी जरुरीची गोष्ट आहे. इतकी महत्वाची गोष्ट आहे.

ह्या देशाचे सगळे धागे तुटून जातील आणि जर काही धागे तुटायला सुरवात झाली तर सर्व वस्त्रहरण होऊन जाईल, म्हणून आपल्या देशाबद्दल म्हटले आहे की –

‘यत्र नाऱ्या पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता’  .   

 इथे देवीची पूजा होते इथे गृहलक्ष्मी वसते. त्या गृहलक्ष्मीचे जिथे स्थान असते, गृहलक्ष्मी म्हणजे ती लक्ष्मी होण्यालायक असायलाच पाहिजे. सारखं भिकाऱ्यासारखं मला हे घेऊन द्या मला ते घेऊन द्या हे कधी गृहलक्ष्मीचं लक्षण नसते. म्हणजे तुम्ही भिकारी, राणीपद कसलं? राणी असाल तर तिला पद असतं. मग नवऱ्यांनी फोर्स केला तरीसुद्धा, नको कश्याला घरात एवढं सगळं आहे, राहू द्या, काय करायचे आहे? म्हणजे किती ही बाजू एकमेकांना पेलावी लागते त्याचा अंदाज नाही आणि त्याच्यात रस कश्याचा असतो? प्रेमाचा. प्रेमाशिवाय सहज योग् होणार नाही. प्रेमाशिवाय सर्व संसार बदलणार.  नाही .प्रेमाशिवाय काही मार्ग मला दिसत नाही. जो पर्यंत आपापसांत प्रेम होणार नाही नुसत्या वरच्या ऑरगॅनिझशननी आणि नुसत्या इकडच्या तिकडच्या गोष्टी करून काहीही होणार नाही. प्रेम हे मुख्य आहे. 

परत हेही लक्षात ठेवलं पाहिजे की इज्जत किंवा आपण ज्याला अब्रू म्हणतो ती पुरुषांनाही असते, बायकांनाच असते असं नाही. पुरुषांनी आपल्या इज्जतीचा खयाल ठेवला पाहिजे त्याचा विचार ठेवला पाहिजे. असं नाही मला काही इज्जतच नाही, मी म्हणजे पुरुष मग काय? घोड्यासारखं उधळलं तरी मी पुरुषच आहे किंवा गाढवासारखा जरी वागलं  तरी मी पुरुषच आहे.काही केले तरी मी पुरुषच आहे. आणि माकडासारख्या जरी उद्या मारल्या तरी मी पुरुषच आहे. मग तुम्ही माकड व्हाल गाढव व्हाल, पण माणूस होणार नाही. पुरुषाला आपली अब्रू पाहिजे. जशी बाईला आपली अब्रू पसंत आहे तशी पुरुषाला असली पाहिजे. लक्ष्मणासारखा पुरुष बघा – कसे डोळे खाली करून चालायचा. स्वतः आपल्या वाहिनीच्या पायाशिवाय वरती काही बघितलं नाही. तेंव्हा या पाशवी प्रवृत्ती आपल्यातल्या काढून टाका आणि स्वतःची इज्जत करा.  हे दुसरं भिकारीपण आहे की सगळ्या बायकांच्या कडे भिरभिर बघत फिरायचं. त्यांच्या मागे लंपटासारखं धावायचं. हे एक प्रकारचं भिकारीपण आहे.कोणत्याही गोष्टीसाठी एवढं अगदी हे मला हवंच, मला पाहिजेच. तर पुरुषांचं, हे दुसरं भिकारीपणाचे लक्षण. जो राजा बादशाह असतो त्याला काय तुम्ही जमिनीवर बसवा किना कुठंही बसवा. सहजयोगामध्ये कसंही  बसता आलं पाहिजे, कसंही करता आलं पाहिजे. सगळ्याच्या वर आहात तुम्ही. आत्म्याचे स्वरूप झाल्यावरती तुम्हाला कश्याची गरज आहे? कशाचीच नाही. 

आता हे लोक जे आले आहेत फॉरेन वरून त्यांच्यातलं आम्हाला बरं आहे तिकडे.  म्हणजे गाड्या घेतल्यात, इथून तिथपर्यंत त्यांच्या कारपेटी लागल्या आहेत. त्यांच्या झोपायचे व्यवस्थित इतके काही व्यवस्थित अगदी काही विचारू नका. बिछान्यातून उठले नाही की बाथरूम तिथे जवळच. कधीही उठा, अकराच्या आधी तर कधी उठतच नाही. अकरा वाजता उठतील. अंघोळी मात्र वर्षभरात एक दोन केल्या तर फार. जसं पाहिजे तसं वागत असतात. म्हणून ते इथे येऊन जी शिस्त लागते त्याच्यासाठी ते मुद्दामून खर्च करून इथे आले की शिस्त लागते. परत अडी अडचणीत राहता येतं. जीवाला जरा तस पडते. ते तस घेण्यासाठी पैशे जुळवून इथे आले तुमच्याकडे, आणि तुम्ही त्या तशी पासुन का पळता? शरीराला कसे तावून सुलाखून ठेवले पाहिजे.  म्हणून गृहस्थाला गृहस्थाश्रम म्हटले आहे. आश्रम आहे. आराम करण्याची जागा नाही. आराम म्हणजे अगदी बेकार वस्तू आहे. मला समजतच नाही. आरामाची गरजच काय आहे एवढी? माणसाला कसे अगदी तडकाफडकी असायला पाहिजे. आराम करायला लागले, म्हणजे जे काही जगातले आहे ते डोक्यावर बसणार. एकदा खुर्चीवर बसले तर खाली बसू शकणार नाही तुम्ही. आरामपसंत व्हायलाच नको. म्हातारपण निघायचं नाही. अशे लोक असतात की त्यांना उठायला सुद्धा एक मनुष्य लागतो आणि बसायला एक मनुष्य. हे असलं जीवन तुम्हाला जर करून  घ्यायचं असलं तर आरामात राहा.   

सहज योगी म्हणजे कसा अगदी तत्पर असायला पाहिजे. तत् पर. तेंव्हा आपल्या संस्कृतीत महाराष्ट्रात सकाळी आपल्या ४:३० ला अंघोळी बिंघोळी करून. आमचं म्हणजे लहानपण असं गेलेलं आहे. ४:३० ला उठायचं. वडील आमचे ५ ला फिरून बाहेर यायचे. ५ वाजता घर सगळं स्वच्छ करून सगळे जण तयार होऊन सर्व मुलं, हे ११ जण असायचे. आता ते तसं राहिलं नाही बाकीच्यांमध्ये. सगळे आपले शिस्तीत. कधी एक कागद बाहेर टाकायचा म्हणजे वडिलांनी मात्र त्याच्या वरती ओरडायचं. एक कागद नाही. अजून माझी सवय आहे. एखादा जरी हातात कागद  मी आपल्या हातात घेऊन फिरते की कुठेही काही दिसलं की घालायचं. डस्टबिन. पण आपल्याकडे नसतातच. आपलाकडे वैय्यक्तिक आपण स्वच्छता फार आहे. पूर्वी मानसिक पण फार होती म्हटलं तरी चालेल. मन कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे. मन स्वच्छ ठेवा. मनात घाण नाही ठेवली पाहिजे. घाण ठेवली म्हणजे कसले तरी आपण वाईट आक्षेप लोकांना करतो. वाईट काहीतरी बोलतो. काही तरी अविधायक घडतं. काहीतरी दुष्ट असं घडतं. अजाण म्हणून तसं बोलायचं, तसं करायचं नाही. हे कसं करणार? त्याच्या तत्वावर  आलं की कळतं, की कां होतं? कारण आपल्या मनामध्ये जर विष ठेवलं तर  सापा सारखे  आपण कुणालाही लावले की लावले. चावले बुआ. अमुक ते चावले. चावरे असे आडनाव मी तरी ऐकलेलं नाही महाराष्ट्रात. सगळे आहे. पण चावरे नाही. पण बरेच लोक आहेत चावरे. आणि त्यांचं नाव  चावरेच ठेवावं. आडनाव बदलून. त्यांच्याशी कोणी बोलायला गेलं की डसले.काय भेटले का तुम्हाला? हो. मिळाला एक. काय? 

कमळाच्या फुलांना कुणाला चावलेलं आजपर्यंत ऐकले नाही. भुंग्या सारख्या माणसाला सुद्धा आपल्याकडे आणून व्यवस्थित, आरामात, झोपा. ते लक्ष्मीच्या हातात आहे. तेंव्हा चावरेपणा आपल्या भाषणातनं शरीरातून काढून टाका. दांभिकपणानं, खोटंन, पण  खरं म्हणजे तुम्ही चावरे  आहात का? आम्ही बुवा खरं बोलतो आम्ही फार स्पष्टवक्ते. हे आपल्या महाराष्ट्रात फार. स्पष्टवक्ते कधी, टिळकांसारखे स्पष्टवक्ते खरे स्पष्टवक्ते आहेत. आगरकरांसारखे. अशे अशे लोक आपल्या देशात झाले, ह्या महाराष्ट्रात तसा स्पष्टवक्ता पुन्हा मी पहिला नाही. स्पष्टवक्ते  म्हणजे लोकांना शिव्या देणे, घाणेरड्या गोष्टी बोलणे, हे स्पष्टवक्ते. आमच्यामध्ये दांभिकपणा नाही. जे करायचं ते आम्ही उघड्या रस्त्यावर   करतो. असं कां ? फार शहाणे आहात तुम्ही. त्या बाबतीत ही एक समज असायला पाहिजे त्या पेक्षा दांभिकपणा बरा मी म्हणते. जी माणसं उघड्या रस्त्यावर घाणेरडी कामं करतात ते म्हणजे सगळी घाणच उघडी करून  टाकतात. कुणाला काही मर्यादाच राहणार नाही. निदान दांभिक मनुष्य एवढा आहे की तेवढ्यापुरतं करतो आणि त्याला भीती वाटते. ते पसरत नाही. पण जे उघड्या रस्त्यावर चालतात प्रकार, ते मात्र थांबत नाही. आणि त्यासाठी स्वतःची ज्याला अब्रूच नाही, प्रतिष्ठा नाही, अप्रतिष्ठित मनुष्य आहे. त्याच काय लागत त्याला?  स्वतःची प्रतिष्ठा कुठे गेली? आणि शांती प्रतिष्ठेशिवाय मिळूच शकत नाही. ज्याला आपली स्वतःची प्रतिष्ठा असते तो हत्तीसारखा आरामात चालतो. त्याची शांती ढळत नाही. आपण प्रतिष्ठित अहो किंवा नाही ते पाहिलं पाहिजे. थिल्लरपणा करणे बाष्कळपणा करणे, चेष्टा करणे, एक दुसऱ्याचं वाईट बघणे, ह्या म्हणजे किती निम्न स्तरातल्या गोष्टी आहेत आणि ते त्या सहज योगानंतर दिसतं आणि तो बदल जर आपल्यात आलेला नसला तर असं समजायचं की अजून आम्ही सहज योगी झालेलो नाही. सहज योग म्हणजे काय तुम्ही मेम्बरशिप करू शकत नाही ते मी कालच सांगितलेलं आहे. त्याच्या मध्ये तुम्हाला डुंबावं लागतं आणि ते इतकं सुंदर आहे, इतकी मृदुता आहे त्याच्या मध्ये. 

पूर्वी मी असं बघितलं होत की आमचे सहज योगी सगळ्यांच्या पहिल्या रांगेत येऊन बसले, कोणाचाही program असला, आधी आम्ही तिथे बसलेले आहोत. अहो, तुम्ही व्यवस्था बघा तिकडे, तुम्ही येऊन बसले. बाकीची व्यवस्था कोण बघणार? म्हणजे घरातल्या बाईंनी आधीच जेवायचं. अजून आपल्याकडे बायका असं करत नाहीत. अश्यातला प्रकार. तुम्ही समोरच येऊन बसले का? हो म्हणाले. तीन चार रांगा राखून ठेवल्या. असं का? बरं. आता बसा म्हटलं तुमची पूजा करते. ते आता बदलत बदलत मागच्या रांगेत गेले आणि आता बघते की बाहेरच बसतात, बिचारे. तुम्ही पुढे इतरांना करा. ज्यांना गरजच  आहे त्यांना. ही गोष्ट जेंव्हा येऊ लागली तेंव्हा समजायचं की सहजयोग् जमतो आहे बुवा आपल्याला. कारण कुठेही असले तरी आपल्या माताजी आहेत. त्यांचच कार्य करतोय. त्यांचंच आम्ही बघतोय. सहज योग त्यांचाच आहे, ते आम्ही सिद्ध करू. असा विचार करून, दुरून ही  केला काय की कुठून ही केला काय, आम्ही तिथे जाऊ . जिथे योग्य असेल तिथे माताजी आम्हाला ठेवा अश्या समाधानाने  व्यक्ती जो वागतो त्याला सहजयोग  लाभतो. 

तर तिसरी गोष्ट म्हणजे समाधान माणसामध्ये पाहिजे. समाधानाशिवाय शांती प्रस्थापित होणार नाही. आज कुणाकडी गेले तर त्यांच्याकडे आम्ही आज अमुक बघितलं. ते फार छान आहे. मग गेले बाजारात धडपडत. तेच मिळवलं पाहिजे. आता ज्या लोकांनी मिळवलं आहे इकडे त्यांना ते माती मोलाचं झालाय. सगळं आणून घरामध्ये ठेऊन करायचं तरी काय? लोणचं घालायचं का? जे दुसऱ्यांकडे दिसलं ते आपण आणायचं मग आपलं वैशिष्ठ्य काय राहील? अहो काहीतरी नवीन आणा. आणि सौख्य नाही  त्या माणसाला अश्या माणसाला काही सौख्य नाही. आपोआप गोष्टी घडतात सहजयोग्यांना  सगळं काही मिळतं. त्याचं सौख्य, सौंदर्य सगळं काही मिळतं. पण पहिल्यांदा मनुष्याला समाधान असायला पाहिजे. समाधानाचे एवढं सौख्य काय, कशाला? समाधान! सहज योगानंतर तुम्हाला तुमचा आत्माच मिळाला त्याच्यावर आता समाधानाला आणखी काय पाहिजे? जे स्वतः साक्षात समाधान स्वरूप आहे तेच तुमच्यात जागृत झाल्यावर आता कसले समाधान पाहिजे माताजी ह्याला? पण त्याचा अर्थ असा नाही की भगवी वस्त्र घालून माझ्या समोर उभे राहा. दुसरंही असतं.  आता काय, आता आम्ही सहज योगी झालो, आता आम्ही भगवी वस्त्र मळकी घालू. पण समाधानामध्ये सौंदर्य उगते. जेंव्हा मनुष्याला समाधान असते तेंव्हा तो प्रसन्नचित्त असतो. देवीचं तसंच. तिला समाधान असले कि ती  प्रसन्न असते, नसलं की स्पष्ट दिसते की समाधान काही वाटलं नाही माताजीं. तुम्ही जर समाधानी असला तर तुमचं जे आयुष्य आहे ते सौंदर्यवान, अत्यंत हळुवार. पूर्वी मी पाहिलं होतं लोक ओरडायचे एक दुसऱ्याला सहजयोगात. नुसतं कोकलणं चालायचं. मी म्हणायचे आता कसं होणार लोकांचं? कोणी आला की फटका द्यायचा तलवारीचा. कोणी आलं की दारात,’ आले का तुम्ही? या.’ म्हणजे तो पळायचा. सहजयोग नको रे बाबा. तिथे जहाल लोक राहतात सगळे. तो जहालपणा   आता   मावळला. आता थंड वातावरण झालं आहे. हे आता केवढं छान झालं.

 असं वाटलं पाहिजे की खरोखरच कमळात आलो की काय? हा त्याचा सुगंध, ह्या सुगंधामध्ये आम्ही येऊन आम्ही नाहून राहिलो आहे. असं वाटलं पाहिजे . एका नवीन माणसाला भीती नाही वाटली पाहिजे. त्याला  वाटलं पाहिजे की आलो बुवा आपण कुठेतरी. हा स्वर्ग आहे आणि हे स्वर्गाचे देवदूत बसले आहेत सगळे. परिधान वागणं सगळंच काही स्वर्गासारखे पाहिजे कारण तुम्ही स्वर्गात आलात. आपल्यातला स्वर्ग जागृत झालेला आहे तेंव्हा त्याचा परिमळ हा दरवळलाच पाहिजे. अश्या प्रकारे आपला सहजयोग आज महाराष्ट्रात हळू हळू वाढत आहे.