Public Program

Rahuri (India)

Feedback
Share

Public Program At Agricultural University ICU 1st February 1982 Date: Place Rahuri Public Program Type

मराठी माणसाला अजून स्वत:बद्दल विशेष जाणीव नाही. विशेष करून तरूण मंडळींना सांगायचे आहे मला. परवा एका भाषणात एक गृहस्थ मला म्हणाले की आपल्या तरूण मंडळींची अगदी अधोगती होते आहे माताजी आणि त्याबद्दल तुमचे काय कार्य चालले आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. हे लोक उद्या वाया जाणार. दारू पिऊन, अगदी वाट्टेल तसे वागून सगळ्यांची नाचक्की करणार आहेत. यांना कोणाही बद्दल आता श्रद्धा वाटत नाही, कुणाचाही मानपान ठेवत नाही, सगळ्यांची थट्टा करतात आणि अगदी त्यांचे जीवन एखाद्या मूर्खासारखे झाले आहे. मी म्हंटले, ‘इतके काही वाईट नाही आहे हो . असं सगळच म्हणू नका तुम्ही. काही लोक आहेत तसे. आणि सगळ काही इतके बिघडलेले नाही आणि बिघडू शकत नाही.’ कारण अनंत शक्त्या या आपल्या भारत भूमीला आशीर्वादीत करताहेत. या तुमच्या महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी नावाची शक्ती आहे. पण ही कुंडलिनी सुप्तावस्थेत आहे एवढच आहे. पण तिचे परिणाम मात्र आपल्या चरित्रावर, आपल्या संस्कृतीवर आहेत. महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक लोक होऊन गेले ज्यांचे वर्णन करता येत नाही. ज्ञानेश्वर एक असे झाले तरी आपल्याला माहिती आहेत की कितीतरी संत साधू वारंवार म्हणजे तुम्ही दत्तात्रयांच्या वेळेपासून पाहिले तर आदिनाथ सुद्धा – त्यांच्या आधी पासून आदिनाथ-दत्तात्रयांचे जे अवतरण होते सुरूवातीचे आदिनाथांचे, ते सुद्धा या महाराष्ट्रात झाले. इतकच नव्हे तर जे मोठे मोठे संत-साधू झाले त्यांनी नेहमी महाराष्ट्राला भेट दिली. जे बाहेर होते, गुरूनानक होते ते इकडे आले किंवा जे जे असे- वल्लभाचार्य होते फार मोठे ते महाराष्ट्रात येऊन गेले. इतकेच नव्हे तर श्री राम आणि श्री सीता या पुनीत भूमीवर फिरलेले आहेत. त्यांचे चरण या भूमीला लागलेले आहेत. ही भूमी पावन आहे आणि त्या पावन भूमीत तुमचा पावन जन्म झाला आहे. पण आपण पावन आहोत ही कल्पना मात्र फार कमी लोकांना आहे आणि त्यामुळेच सगळे प्रश्न उभे रहातात. तुम्ही पावन आहात म्हणजे तुमच्यात एक फार मोठी शक्ती आहे. ही शक्ती पावित्र्याची शक्ती तुमच्यात आहे. आणि ही जी पावित्र्याची शक्ती आहे ती जास्त वाढवली पाहिजे. ती कमी करू नये. ती आपण कमी करत जातो. सीतेची पावन शक्ती एवढी जबरदस्त होती की रावणासारखा राक्षस सुद्धा तिच्याकडे डोळे वर करून बघू शकत नसे. आपल्या देशामध्ये पावन शक्तीला फार महत्त्व दिलेले आहे आणि ती पावन शक्ती महाराष्ट्रात फार आहे. तुमचा जन्म या पावन भूमीत झाला आहे तर त्या पावन शक्तीला स्मरून सांगते की आपल्यामध्ये आत्मा आहे असे सर्वांनी सांगितले आहे. पण आजपर्यंत सगळ्यांनी सांगितले आहे पण सायन्स काही आत्मा शोधून दाखवू शकत नाही कारण सायन्स फार तर फार आपल्या प्राण शक्तीवरच काम करू शकतो. प्राणशक्ती शिवाय आपल्यामध्ये एक मन:शक्ती आहे. ती डावीकडे असते. त्याशिवाय आपल्यामध्ये धर्मशक्ती आहे. म्हणजे सायन्स या गोष्टीचे उत्तर देऊ शकत नाही की अअिबापासून मनुष्य का झाला ? पृथ्वीमध्ये ग्रॅन्हिटी आहे असे म्हणतात ন

गुरूत्वाकर्षण शक्ती आहे पण ती का आहे? आणि ती कुठून आली? आणि तिचा उपयोग आपण कसा करून घेऊ अध्यात्मासाठी, ते ते सांगू शकत नाही. यावेळेला आपण पृथ्वीतलावर बसलेले आहात आणि आम्ही तिचा उपयोग करून घेत आहोत. आपण तिथे बसलेले आहात. हे एक फारच मोठ दान आहे की आपण या पृथ्वीतलावर, या पावन भूमीवर बसलेले आहोत. त्याच्यामध्ये जी पावन शक्ती आहे तिचा उपयोग कसा करून घेता येईल? याबद्दल सायन्स काहीही सांगू शकत नाही. म्हणजे एखाद्या उसाचा चिपाड काढावा आणि त्याच्यानंतर या चिपाडातून साखर कशी बनवायची याचा शोध लावायचा त्याप्रकारे सायन्स आहे. कारण सायन्स म्हणजे एकच शक्ती, तिचे समीकरण नाही आहे, तिचे एकत्रीकरण नाही आहे. पण त्या शक्तीला अनेक शक्तीत विभाजून तिचे रपरश्रीळी आहे. आणि त्याच्यामध्ये इतकी स्थिती झालेली आहे की एका डोळ्याला एक डॉक्टर तर दुसऱ्या डोळ्याला दुसरा डॉक्टर. ही सर्व जी काही मानवनिर्मिती आहे किंवा जे काही जीवंत कार्य संसारात बघतो, एका झाडाला फूलं आली, फुलाला फळं लागली आश्चर्याची गोष्ट आहे. एका लहान बी तून एवढं मोठं झाड निघाले. त्याला फूलं आली, त्या फूलांना फळे लागली. एवढी मोठी जीवंत क्रिया – आपण विचारसुद्धा करत नाही. असं वाटत की आपला अधिकारच आहे की आत आपण जमिनीत बी पेरलं , बी मधून रोपं आली पाहिजेत, रोपाला फूल लागले पाहिजेत, त्याचे धान्य झाले पाहिजे आणि आपल्याला ते धान्य मिळाले पाहिजे. आणि हे सर्व करणारं कोण आहे? याची कोण शक्ती आहे? हे मात्र सायन्स सांगू शकत नाही. ते फक्त असं सांगू शकतात की असं बी लावलं की त्याच्यातून रोप निघणार का ते सांगू नाही शकत . ते रोप निघालं, त्या रोपाला तुम्ही जर असं सुकवून घेतलं तर त्याचं तुम्ही असं असं करू शकता. पण असं का होतं हे मात्र ते सांगू शकत नाही. त्यामुळे माणसाला फक्त जे दिसतं समोर तेवढंच माहिती आहे. त्याच्या पलिकडचे माहीत नाही आणि सायन्सने ते दिसणार नाही. कारण सायन्सला आपली सीमा आहे. आता असं म्हणतात की असीम आहे. सर्वत्र पसरलेली अशी परमेश्वरी शक्ती आहे आणि तिला ब्रह्मशक्ती म्हणतात. शंकराचार्यांनी म्हणजे आदि शंकराचार्यांनी ब्रह्म तेवढे सत्य आहे बाकी मिथ्या आहे असे सांगितलेले आहे. ते आता सायन्सवर कसं पटवून सांगायचे हा प्रश्न आहे. मी सुद्धा तुमच्यासारखी म्हणून सायन्स शिकले, त्याच्यानंतर मेडीकल शिकले कारण म्हटल डॉक्टरांच्यासमोर डोकंफोड करायची तर ते आपलंच पहिल्यांदा घेऊन बसणार. तेंव्हा त्यांच्याशी बोलायला मला आधी हे कळले पाहिजे की ह्याला ते काय म्हणतात, ब्रह्माला काय म्हणतात ते त्यांना माहिती नाही. हे ब्रह्मतत्त्व चारीकडे आहे. या ब्रह्मतत्त्वानेच कार्य होत असतात. तुमच्या शेतात तुम्ही जे काही लावता, उस लावता, त्याची लागवड करता आणि उस पुढे मोठे होऊन आणि जे काही जीवंत कार्य घटीत होतं ते सबंध या ब्रह्मशक्तीने होते आणि ही सर्वव्यापी ब्रह्मशक्ती आहे. आता असं मी म्हणते. समजा सायन्समध्ये अस मी म्हंटलं की तुम्ही दोन इलेक्ट्रोड्स लावले तर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी येते तर तुम्ही ते फक्त ऐकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आम्ही ते सिद्ध करून दाखवू. एकदा सिद्ध झाल्यावरती ही जी पहिली धारणा होती ते सिद्ध केल्यावरती ते सायन्स होईल. तसंच हे परमेश्वरी सायन्स आहे. पण हे फार मजेदार सायन्स आहे. ते असं की जर मी तुम्हाला म्हंटले की आता आपण सगळे इथे बसलेले आहात , आता पृथ्वीची जी

गुरूत्वाकर्षण शक्ती आहे, मॅग्नेट आहे हे गणेश तत्त्व आहे. तिथेच अडकणार सहजयोगी. त्याच्याहीवर जे सहजयोगी नाहीत ते ही अडकू शकतात ते गणेश तत्त्व. आता हे गणेश तत्त्व आपल्यामध्ये सुद्धा आहे. आणि जर का अशी माझ्यात शक्ती असली की मी त्या गणेश तत्त्वाला जागृत करू शकले तर तुमच्यातले गणेश तत्त्व जागृत होईल. हे गणेश तत्त्व तुमच्यात जागृत झाल्याबरोबर काय होईल ? हे गणेश तत्त्व तुमच्यात जागृत झाल्याबरोबर तुमच्यात सुबुद्धी आणि विवेक येणार. कारण श्री गणेश हे सुबुद्धी दाता आहे. इतकच नाही तर तुमची कुंडलिनी जागृत होईल. कुंडलिनी नावाची एक शक्ती आपल्यात असते, तिनी सबंध आपलं ब्रह्मांड रचले आहे. आणि शेवटी ती वाट बघत असते त्यावेळेची जेंव्हा असा कोणी अधिकारी पुरूष परमेश्वराकडून त्या कुंडलिनीचे उत्थापन करू शकेल. म्हणजे असं की बी असलं आणि बी ला तुम्ही असं ठेवलं तर काही त्याच्यावर परिणाम होणार नाही. पण त्या बी मध्ये ती सुप्त शक्ती आहे की ज्याने त्याच्यामध्ये अंकुर फुटू शकेल. जेंव्हा तुम्ही त्या बी ला आपल्या पृथ्वीच्या उदरात घालाल तेंव्हा ते जाणून घेईल आता आम्ही पृथ्वीच्या उदरात आलो आणि त्यात अंकुरिले. तशीच ही शक्ती तुमच्यात वास करत असते. जेंव्हा तुम्ही अशा एखाद्या महायोग्याच्या सन्निध येता तेंव्हा ती कुंडलिनी आपोआप उभी राहील. ही कुंडलिनी म्हणजे तुमच्यामध्ये असलेली इच्छा शक्ती आहे. ती इच्छा जिथे तुम्ही परमेश्वराला एकाकार झालं पाहिजे. ही तुमच्या मध्ये सुप्तावस्थेमध्ये ही इच्छा आहे आणि त्या इच्छेमुळेच तुम्ही अमिबाचे मनुष्य झालात, मानव झालात. ही मानवाकृती तुम्ही अशी मिळवलीत की ह्या मानवाकृतीतच अस काही आहे एक मंदिर आहे. आत्म्याचा दिवा पेटवला जाणार आहे. ही कुंडलिनी जेंव्हा जागृत होते तेंव्हा ती सहा चक्रांना भेदून ह्या डोक्याला इथे ब्रह्मरंध्रावर येऊन धकधक असा तिचा आवाज पुष्कळांना ऐकू येतो. पुष्कळांची दिसतेसुद्धा पुष्कळांची तुम्ही बघूसुद्धा शकता. ज्यांना अटकाव असतो त्यांची दिसते सुद्धा शकता. आणि त्याच्यानंतर तिथे फोडून, हे ब्रह्मरंध्र फोडून तुम्हाला सूक्ष्म दशेला घेऊन जाते. आता तुम्हाला मी म्हंटले तुम्ही सूक्ष्म व्हा म्हणजे सूक्ष्म होऊ शकत नाही. मी लेक्चर दिले तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही सूक्ष्म होऊ शकत नाही. काहीही करून तुम्ही सूक्ष्म होऊ शकत नाही. ही घटना घडावी लागते. आता एखाद्या बी ला म्हंटले की तू आता अंकूर हो तर होईल का अंकूर ? डोक्यावर तुम्ही उभे राहिले, आसनं केली अमूक केले तरी होईल का? ते घडावं लागतं. बी घडावं लागतं. जोपर्यंत ते बी घडलं नाही तोपर्यंत ते अंकुरले नाही आणि कोणी सांगितले ते अंकुरले तरी तुम्ही विश्वास करणार का? तर ही घटना तुमच्यात घटते आणि घडल्याबरोबर तुमचा आत्मा आणि तुमचा जीव यांच्यामध्ये एकत्र असतो. आता हा आत्मा तुमच्या हृदयामध्ये असतो पण त्याचे स्थान हे असल्यामुळे त्यांचे जे एकीकरण झालेले आहे, त्यांची जी समग्रता मिळालेली आहे त्यामुळे आपल्या हातून या अशा थंड थंड लहरी वाहू ही लागतात, जाणवूही लागतात. ह्या ज्या थंड थंड लहरी जाणवू लागतात हेच आपल्या हाती ब्रह्म लागले आहे. जे ब्रह्म, ज्याच्यामध्ये क्रियाशक्ती, मन:शक्ती, धर्म शक्ती तिनही शक्त्या सामावलेल्या आहेत अशी ही त्रिगुणात्मक शक्ती आपल्या हाती लागली आहे. मग ती शक्ती तुम्ही वापरू लागलात की त्याचं सबंध सायन्स हळूहळू तुम्हाला समजू लागतं. ह्याचं सायन्स काय आहे वरगैरे वगैरे हे नंतर बघितलं पाहिजे. मी आधी नेहमी सांगत असते की जर समजा इथे दिवा नसता आणि आम्ही सांगितलं असतं की याच्यावर इथे छत आहे, त्याला निळा रंग आहे, पिवळा आहे, जांभळा आहे वरगैरे वगैरे तर तुम्हाला काही

कळलं नसतं. त्यात जर डोळे आंधळे असते तर आणखीनच कळलं नसतं. तुम्ही एक खांबच धरून बसले असता की खांबच म्हणजे सायन्स आहे, अमूक म्हणजे सायन्स आहे. तर जे काही तुम्ही सायन्समध्ये जाणलेलं आहे ते अजून आंधळे आहे. त्याची अजून परिपक्वता अजून आलेली नाही. कारण जे काही तुम्ही जाणलेले आहे ते काय आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. तेंव्हा सायन्समध्ये एवढाच प्रामाणिकपणा आहे की आम्ही त्याबातीत आंधळे आहोत असं ते मानतात. जर त्यांना विचारलं तुमचं याच्या पुढचं काय. माहीत नाही. त्याचं आम्हाला माहीत नाही ते स्पष्ट सांगतात. त्याच्या पलिकडचं आम्हाला माहिती नाही, जेवढं माहिती तेवढं माहिती. याबद्दल ते प्रामाणिक आहेत की आम्ही अजून आंधळे आहोत, पण जर तुम्ही आंधळे नसता तर तुम्हाला सगळं दिसलं असतं. तेंव्हा हा आंधळेपणा गेला पाहिजे. आणि तो जाण्यासाठी आत्म्याचा दिवा आपल्यामध्ये लावला पाहिजे. आता कसा लावायचा दिवा? तुम्ही मानव झालात तर कसे झालात? काही तुम्ही विशेष कार्य केलं होतं का त्याच्यासाठी. काहीही केलं नव्हतं. आपोआपच झालात, सहजच झालात. आणि म्हणून सहजच म्हणून तुम्ही ते होणार. हे झालंच पाहिजे. हे जर झालं नाही तर सबंध मानवनिर्मितीला अर्थ राहाणार नाही. समजा की सुद्धा आम्ही एक काहीतरी साधन केलेले आहे पण याला जर आम्ही मेन्सलाच लावले नाही तर याला काही अर्थ रहात नाही. म्हणून मानवालासुद्धा काही अर्थ राहिलेला नाही. आणि जेव्हा मनुष्य हे समजतो की मला काही अर्थ नाही तेव्हा मात्र त्याच्यामध्ये या सर्व अशा गोष्टी येतात ज्याला आपण म्हणतो त्या अधोगतीला नेतात. त्याला वाटतं की याच्यात काय ठेवलंय, उगीचच्या उगीच हे कशाला करायचे, ते कशाला करायचे, त्याच्यात काय ठेवलेले आहे, उडाणटप्पूपणाने राहिला काय हरकत आहे, उगीचच आपल्या जीवाला त्रास कशाला करून घ्यायचा. तेव्हा त्यांचही चुकत नाही कारण त्यांच्या जीवनाला काही अर्थ लागलेला आहे. आणि जे लोक फार धर्म धर्म म्हणून फिरतातसुद्धा ते अत्यंत भ्रष्टाचारी, खोटे बोलणारे, त्यांच्यामध्ये काहीही पावित्र्य नाही. तेव्हा एका तरूण माणसाला ज्याचं डोकं फार ज्ञानाने भरलेले आहे आणि ज्यांनी सायन्समध्ये पुष्कळ काही जाणलेले आहे त्याला वाटतं की हे सगळं खोटं आहे. याला काही अर्थ नाही. परमेश्वर म्हणून कोणचीच वस्तू नाही. पण परमेश्वर हा आहे हे सहजयोगाने सिद्ध होऊ शकते. तर आजचा हा सहजयोग एक महायोग आहे कारण सहजयोगाने पूर्वी एक दोन माणसं पार होतं असत, एक- दोन फळे या झाडाला लागायची पण आज हजारो पार होतात. दुसरं सबंध सायन्स तुम्ही सहजयोगाने समजू शकता. इतकचं नव्हे तर ही शक्ती तुमच्यात जागृत झाल्यावर तुम्ही अत्यंत शक्तीशाली स्वत: होता. तुमच्यातले दोष जाऊन तुम्ही तुमच्या तत्त्वावर, त्त्व एकदा मिळाल्यावर सर्व वस्तू आपोआप ठीक होतात, सर्व परिस्थिती आपोआप ठीक होते. एखाद्या झाडाला समजा कीड लागली. तुम्ही त्याची पान जर स्वच्छ केली. सायन्स म्हणजे पानाला स्वच्छ करणे. बाहेरून तुम्ही त्याला काही केलं तर ते झाड ठीक होईल का? त्याच्या मुळातूनच जायला पाहिजे. आणि त्या मुळातून तुम्ही कसे जाणार? जोपर्यंत ते मूळच शोधलेले नाही. आणि ते मूळ म्हणजे आपल्या त्रिपर्णाकार अस्थीमध्ये बसलेली कुंडलिनी आहे. तिची जागृती झाली पाहिजे. आणि ती जागृती झाल्यावर तुम्हालाही नविन सूक्ष्मदेही, नविन जागृती आणि नविन जाणिव येते. एखाद्या जनावराला म्हंटले की या घाणेरड्या गल्लीतून जा तर तो सरळ जाईल, त्याला काही त्रास होणार नाही. पण एखाद्या माणसाला म्हंटले तर तो म्हणेल की काय घाण आहे, आम्ही कसं जाणार माताजी. आमचे तर फार हाल होणार. पण त्याला जर एखादं पाप करायला म्हंटले तर त्याला त्रास नाही होणार. काही काही लोकांना होतो पण काही काही लोकांना सरळ पापाच्या गल्ल्यात जायला काही वाटत नाही. काही पाप करायचे म्हंटले तर काय झालं? थोडसं केलं तर काय झालं? पण जेव्हा तुम्ही पार होता तेव्हा आपोआप सटकन सगळ संपतं कारण तुमच्यात धर्म जागृती होते.

पहिली गोष्ट म्हणजे धर्म जागृती. ते आपोआपच घडत नाही. आता इथे काही काही लोक असे आलेले आहेत की ते ड्रग घेऊन घेऊन अगदी मरणावस्थेत माझ्याकडे आले होते. तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरून वाटणार नाही. मरणावस्थेत. आणि नाना रोगांनी पिडीत. पार झाल्यावर आत ड्रग घ्या म्हंटल तर ‘नको रे बाबा ती घाण . आणि जे आहे ते कसं स्वच्छ करायचं याच्या मागे लागतात. आणि अशा रितीने यांनी आपल्याला एकदम शक्तिशाली करून या सर्व काही या सवयी आहेत ज्यानी त्यांना गुलाम करून ठेवलेले आहे त्या सर्व सवयांनी विजय मिळवला आहे. मनुष्य एक आनंदात आल्यावर त्याला हे असलं काहीतरी आवडत नाही. जो एकदा अमृत पितो. त्याला असलं काहीतरी पाणी आवडेल का ? आणि त्यामुळे त्याचा सबंध स्वभाव बदलून एक तेजस्विता येते. पण सगळ्यात मुख्य म्हणजे हे ब्रह्म इथे साधल्यामुळे, मनुष्य सर्वांमध्येच तो ब्रह्म असल्यामुळे आणि सर्वांमध्ये ती आत्मा असल्यामुळे या विराट पुरूषामध्ये आम्ही सगळे काही एकाकार होतो. या बोटाला हे बोट समजतं . इथे जर दुखलं तर हे बोट त्याला जरास चोळून जे करेल तर कुणी असं म्हणणार नाही की या बोटावर या हाताचे उपकार आहेत. त्यामुळे सामूहिक चेतना ही जागृत होते. परत मी सांगते हे घडतं. ही जागृत होते. जशी तुमच्यामध्ये ही चेतना आहे की यावेळेला याला प्रकाश आहे किंवा याला गरम आहे की थंड आहे. तशी ही चेतना तुमच्या सेंट्रल नव्व्हस सिस्टम मध्ये, तुमच्या मज्जातंतूंमध्ये जागृत होते. आणि तुम्ही आपल्या बोटांवर सुद्धा ते जाणवू शकता. हे शास्त्र फार मोठे आहे. पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे आंधळ्यांना जे दिसत नाही ते आधी बघू देत. पहिल्यांदा दिवा लागला पाहिजे. दिवा लावू देत मग सगळें काही सांगितलेलं बरं. कारण दिवा लावायच्या आधी सगळचं तुम्हाला मी सांगायला लागले तर डोकेदखी व्हायची. जर मी तुम्हाला सांगितलं की ही इलेक्ट्रिसिटी इतिहासात कशी तयार झाली, मग त्याचे कनेक्शन कुठून आणले आणि कुठून इलेक्ट्रिसिटी आणली वगैरे वरगैरे आणि अंधारातच बसवले तर तुम्ही अर्धे निघून जाणार. म्हणून पहिल्यांदा हे जाणलं पाहिजे की आमच्यामध्ये जो आत्मास्वरूप दिवा आहे. आता हा तुमच्यात आहे. तुमच्याजवळ त्याची शक्ती आहे. तुमच्यातच कुंडलिनी तुमची आई आहे. यांचे मिलन करणें सुद्धा तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे असं आहे की मी कुणावर जबरदस्ती करू शकत नाही. आणि कोणीही कुणावर जबरदस्ती करू शकत नाही. परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे. जर तुम्हाला नरकात जायचे असले तर नरकात जा, जर परमेश्वराच्या साम्राज्यात जायचे असले तर परमेश्वराच्या साम्राज्यात जा. त्याबद्दल तुमची स्वतंत्रता परमेश्वर घेणार नाही. एखादं गव्हर्नमेंट तुमची स्वतंत्रता घेऊन घेईल, पण परमेश्वराचं गव्हर्नमेंट तुमची स्वतंत्रता घेणार नाही. तर म्हणूनच तुम्हाला आर्जवून सांगायचं इकडे लक्ष द्या. आजपर्यंत आयुष्यात जे काही झालं ते विसरून जायचं. आणि आता पार होऊन घेतलं पाहिजे. स्वत: ला पार करून घेतलं पाहिजे. तुमच्यातही काही कंटक असतील. मी म्हणत नाही. प्रत्येक वेळेला आम्ही पाहिलेले आहे की कुठेही आम्ही लेक्चर दिले की दोन-चार समाजकंटक म्हणा किंवा परमेश्वरविरोधी तत्त्व असे लोक उभे रहातात. आणि उभे राहून दुसर्या लोकांना फितवून आम्ही जर नरकात आहोत तर यांनी कशाला स्वर्गात जायचं म्हणून लोकांचे पाय ओढत असतात. तेव्हा अशा लोकांकडे लक्ष न देता तुम्ही स्वत: नीट होऊन रहा. आणि उद्या त्यांनासुद्धा वर घेऊन जाऊ शकता. तेव्हा अशा लोकांच्या कह्यात येऊन पुष्कळ लोकांनी सहजयोग त्यागलेला आहे. परत त्यांना त्रास झाला परत ते सहजयोगात आलेले आहेत. तेव्हा त्याने आपली गती कमी होते. आणि काही काही लोक सहज योग स्विकारून आपली प्रगती करून ते आज कुठल्याकुठे पोहोचलेले आहेत. सूक्ष्मदेही होऊन ते आज कितीतरी लोकांचे कल्याण करत आहेत, भले करत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी एक मोठा, नविन पद्धतीची योग पद्धती आहे तिला पूर्णपणे हस्तगत केलेले आहे. आणि अशा लोकांच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो. मी एक आई

आहे आणि आईचं एकच असतं की माझी मुलं कोणच्या थराला जातात. तिचं सगळं काही ऐश्वर्य तिची सगळी मुलं आहेत. तिची सगळी शोभा तिची मुलं आहेत. तिचं सगळं काही मिळवायचे आहे ते मुलांच्यामध्ये. आम्हाला जरी हजारो शक्त्या असल्या, लोकांनी सांगितलं की माताजी अमूक आहे, तमूक आहे असतील, आदिशक्ती असतील तर काय? काही असल्या तर असू देत. तुम्हाला त्याचा काय फायदा झाला? तुम्ही काय मिळवलं? तुमच्यामध्ये काय विशेष झालेले आहे ते बघितलं पाहिजे. आणि ते झाल्याशिवाय मलाही चैन येणार नाही. आता आपल्याला माहिती आहे की माझ्या यजमानांच्या नोकरीमुळे विलायतेत असते. माझं येणं कधी कधी होत असतं म्हणजे वर्षाकाठी येतच असते मी. पण माझंे मुख्य लक्ष आहे ते महाराष्ट्रावर विशेष करून या शेतकरीवर्गातल्या तुमच्या या तरूण पिढीवर आहे. आणि अनेकदा मी सहजयोगावर लेक्चर दिलेले आहे पण मी बघते सहजयोगात अजून गहनता येत नाही. विद्यार्थी वर्गात जी एक गहनता यायला पाहिजे, कॉलेज मध्ये किंवा कृषी विद्यालयात ती अजून गहनता येत नाही आणि ती मोठी जबाबदारी आहे कारण हे मन्मंतर सुरू झालेले आहे. १९७० साली त्यांनी सांगितले हे सुरू झालेले आहे. ही गोष्ट खरी आहे. सगळ्या जगात हे सुरू झाले आहे. सगळीकडे हे सुरू झाले आहे. आता ह्यात जे लोक, बोटीत जे लोक बसले आहेत ते पार होणार आणि बाकीचे मात्र राहून जातील. तेव्हा परत परत विनंती करून सांगायचे आहे की तुमच्यात ही शक्ती आहे. सर्वांनी ती शक्ती आपल्यामध्ये मिळवून घ्या. जर काही नाही झालं तरीसुद्धा प्रयत्न करता येतो. परत परत प्रयत्न करता येतो आणि प्रयत्नांती परमेश्वर सांगितलेले आहे तसंच आपल्यामध्ये जी परमेश्वरी शक्ती आहे, जी इच्छा आहे आपल्याला परमेश्वर होण्याची ती आपण पूर्ण करून घेतली पाहिजे. त्याच्याशिवाय कोणतेही समाधान होणार नाही. तुमच्या सबंध जीवनाला कोणताही अर्थ लागणार नाही. सर्व मानवजातीलाच काही अर्थ रहाणार नाही. तेव्हा कृपा करून आता सर्वांनी शांतपणे हा अनुग्रह, हे प्रेमाचं सांगणं ऐकून घ्यावं आणि अनुग्रह घ्यावा आणि सगळ्यांनी आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हावं.