Shri Durga Puja

Rahuri (India)

1982-02-01 Durga Puja Talk English, Rahuri, India, 12' Download subtitles: EN,IT,PL,PT,RUView subtitles:
Download video (standard quality): Download video (full quality): View and download on Vimeo: View on Youku: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribe

Feedback
Share

Shri Durga Puja. Rahuri (India), 1 February 1982.

आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी

आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी! अष्टमीच्या दिवशी पूजन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहुरीला, हे माझं माहेरघर आहे. या ठिकाणी पूजन झालं हे त्याहून विशेष आहे. ह्या अष्टमीच्या दिवशी, आपण तो दिवस साजरा करतो, जेव्हा देवीने अष्टभुजा देवी बनून जगात फार पराक्रम केले. मुख्य पराक्रम म्हणजे जे मोठे मोठे दुष्ट राक्षस होते त्यांचं हनन करणं, त्यांचा नाश करणं. तिला नवचंडी असं म्हणतात, चण्डिका ही अष्टभुजा आहे. दुर्गा.. वगैरे तिची अनेक नावं आहेत. आणि तिने ह्या सर्व चंड-मुंड आदी ह्या अशा नवचंडांचा नाश केलेला आहे , म्हणून तिला नवचंडी म्हणतात. इतकंच नव्हे, महिषासुरासारख्या राक्षसाचासुद्धा तिने वध केलेला आहे. त्याच्यानंतर, महिषासुराला मारल्यावर देवांनी तिची फार भक्ती केली आणि तिचं भजन केलं. पण ज्या भक्तांनी तिला बोलवलं ते अत्यंत धार्मिक, सात्विक आणि अत्यंत गुणी होते. त्यांच्या गुणावर प्रसन्न होऊन देवीने अवतार घेतलेला आहे. तेव्हा आपल्यामध्येही ते गुण बाणले गेले पाहिजेत. आपला देवीवर काय अधिकार? ‘माताजी, आम्ही तुमची पूजा ठेवली आहे. म्हणजे जसं काही आम्ही एखादा कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथे तुम्ही या, प्रेसिडेंट बनून,’ तसा काहीतरी प्रकार आहे. म्हणजे पुष्कळदा म्हणतात, माताजी आम्ही पूजा ‘ह्या’ वेळेला ठेवली. तसं ठेवून चालायचं नाही. तशी ठेवता येत नाही. आम्ही असलो प्रसन्न तर बसू पूजेला, नाहीतर नाही. आमच्या ह्याच्यावर अवलंबुन असतं, तर म्हणून देवीला आधी बोलवावं लागतं, आमंत्रण द्यावं लागतं. पाचारण असतं, वगैरे वगैरे … ती काय अशी येऊन बसत नाही- “आता तुम्ही ठेवली आहे तर आम्ही बरोबर घड्याळाला येऊन बसलो बुवा, करा आमची पूजा!” कारण देवीला पूजेची गरज नाही, पूजेची गरज तुम्हाला आहे. तेव्हा प्रसन्नचित्त देवी असायला पाहिजे आणि तिची प्रसन्नता, जेव्हा तिला असं दिसतं की तिच्या मुलांनी चुका केलेल्या आहेत, तिची मुलं अजून फार चुका करत आहेत आणि त्यांच्यामध्ये जी श्रद्धा आहे त्यात खोटेपणा आहे… काही काही लोकांच्यामध्ये. काहींमध्ये श्रद्धा आहेत पण चुका आहेत. काहींच्यामध्ये श्रद्धाच नाहीये, खोटेपणा आहे, वरपांगीपणा आहे, काहीतरी आतमध्ये विष असून वरून दाखवतात की आम्ही फार चांगले आहोत. ह्या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे देवीचंही मन रुष्ट होतं आणि तिला वाटतं, कशाला ह्यांना पूजा द्यायची. हे ह्या योग्यतेला नाहीत. तेव्हा सद्गुणी झालं पाहिजे. 

सद्गुणामध्ये सगळ्यात मोठा गुण शंकराचार्यांना, आदिशंकराचार्यांना विचारलं की सगळ्यात मोठा गुण कोणता? तर त्यांनी सांगितलं देवीभक्ती, आईभक्ती ! ती देवी आहे, तुमची आई देवी आहे हे समजून तिची भक्ती करा. आणि त्या भक्तीमध्ये खोटेपणा नसला पाहिजे. पहिला गुण, सर्वोत्तम गुण हा आहे की ज्या माणसामध्ये हृदयापासून देवीबद्दल भक्ती असेल त्याचे सर्व दुर्गुण नष्ट होतील, त्याला प्रकाश मिळेल, मोक्ष मिळेल. म्हणून त्यांनी नेहमी देवीची स्तुती केली आहे, सुरुवातीला पुष्कळ त्यांनी वर्णन केलं, आणखीन, पुष्कळ त्यांनी मोठमोठाले ‘विवेकचूडामणी’, वगैरे पुस्तकं लिहिली. पण शेवटी त्यांनी नुसतं म्हटलं, ‘देवीला फक्त प्रसन्न केलं की सगळं मिळतं तर कशाला करायला पाहिजे काही? एवढे वादविवाद तरी कशाला करायचे, एवढं विवेचन तरी कशाला करायचं, एवढं डोकं कशाला फोडायचं, आपलं बस, देवीची स्तुती करा म्हणजे झालं, सगळं काही जे मिळायचं ते मिळतं.’ त्यांचं शहाणपण फार कमी लोकांना असतं, सांगायचं म्हणजे. ते शहाणपण जेव्हा आपल्यामध्ये येईल तेव्हा मग तुमचा अधिकार देवीवर होतो. तसंच, काहीही न करतानासुद्धा आता आम्ही प्रसन्नच आहोत. आणि तुम्ही किती चुका केल्या तरी त्या सर्व आम्ही क्षमा करतो. तसं केल्याशिवाय व्हायचं नाही म्हणून. फार मोठ्ठं हृदय घेऊन आलोय. आणि सर्व तुमच्या चुका आम्ही क्षमा करतो. पण खोटेपणा मात्र आमच्याबरोबर केला नाही पाहिजे. दुसरं असं की ‘आमचं चुकलं .. चुकलं’ म्हणून सारखं रडतही बसलं नाही पाहिजे. तसं केलं तरसुद्धा देवीला त्रासच होतो. तेव्हा, “काय चुकलं माकलं तर क्षमा करा, आता आम्ही पुढे करणार नाही” , अशी आज तुम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे.  कारण आजची अष्टमीला भीष्मअष्टमी असं म्हणतात. 

भीष्मअष्टमी! आता भीष्माचं काय होतं – भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती तुम्हाला माहितीय आणि ती, कोणत्याही स्थितीत त्याने ती प्रतिज्ञा मोडलेली नाही. तेव्हा आज प्रतिज्ञा करण्याचा एक दिवस आहे, म्हणून ह्या अष्टमीला तुम्ही जी प्रतिज्ञा कराल त्या प्रतिज्ञेप्रमाणे सर्व जगाला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणजे ह्या लहानशा जागेत आपण बसलो आहे , तर इथं आपलं हे लावलेलं आहे आणि ही सगळी काही व्यवस्था केलेली आहे, म्हणजे असा विचार नाही केला पाहिजे की इथे कसं होणार? हे फार मोठ्ठं, आपण केंद्र आहे, ह्या वेळेला. जिथे आम्ही बसलो तिथे सर्व विश्वाचं केंद्र आलेलं आहे. तेव्हा ह्या वेळेला ज्या तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण भक्तीने जी तुम्ही प्रतिज्ञा कराल त्याचं फळ सर्व संसाराला मिळणार आहे असं समजलं पाहिजे.