Public Program

(India)

1984-12-02 Public Program, Pen Village, India, DP, Marathi, 112' Chapters: Music, Talk
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: View on Youku: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1984-12-02 Public Program, Pen Village, Maharashtra India 

पेणच्या सर्व भक्त आणि प्रेमी जनांना आमचे वंदन असो. मुंबईला सर्व कार्यक्रम ठरवण्यात आला, त्यात काही पेणची मंडळी आली होती आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी म्हटलं माताजी तुम्ही पेणला का येत नाही? आतूनच मला फार ओढ वाटली. मी म्हटले या वेळेला पेणला जायचं माझा प्रोग्रॅम ठरवा तुम्ही दोन तारखेला. ती ओढ का वाटली त्याचं आज प्रत्यंतर दिसलं. ओढ मलाही होती आणि ओढ तुम्हालाही, उशीरही झाला आणि वाटत होतं आणि म्हटलं हि सगळी तिष्ठत बसली असतील, पण हा प्रेमाचा सोहळा बघून सगळी काही माझी चिंता दूर झाली.  ह्या महाराष्ट्र भूमीच वैशिष्ट्य हे आहे, भक्तीचा इतका ठेवा आपल्याला संत साधूंनी देऊन ठेवलेला आहे कि जसं काही सगळीकडे भक्तीची फुलं विखुरलेली आहेत.  वृक्षाला सुरुवातीला एक दोनच फुलं येतात आणि त्यांना पुष्कळ  हालअपेष्टा आणि त्रास सहन करावा लागतो तसंच आपल्या संत साधूंचं झालं पण त्यांनी जी आपल्यासाठी मेहनत केली त्याची हि फळं आपल्याला दिसतात कि इतकी मंडळी भक्तिभावाने स्वतःचा आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी इथे एकत्र झालेली आहेत. आत्मसाक्षात्कार हा शब्द फार मोठा वाटतो आणि तो म्हणायला सुद्धा बराच वेळ लागतो. पण तुमची कुंडलिनी मात्र तत्क्षण, एका क्षणात जागृत होते. झाली पाहिजे. कारण जे फार महत्वाचे आहे ते अगदी सहजच घडले पाहिजे. आपण जो श्वास घेतो तो जर कठीण झाला किंवा त्यासाठी आपल्याला चार पुस्तके वाचावी लागली, किंवा सल्ला मसलत घ्यावी लागली तर किती लोक जिवंत राहतील. जे अत्यंत आवश्यक असे जीवनाला आहे, सर्वात महत्वपूर्ण जे आहे ते सहजच मिळाले पाहिजे. जर ते सहज मिळाले नाही तर ते कुणी मिळावूही शकणार नाही. सगळं संसारातील जेवढं झालेलं आहे. हि जी सृष्टीची रचना झाली आहे हि सहज झाली आहे, अगदी सहजच झाली आहे. जस एखाद बी आपण पृथ्वी मातेच्या पोटात घालावं आणि ते सहजच अंकुरत तसच ह्या सर्व सृष्टीचं झालेलं आहे. ह्या सृष्टीच्या झाडाला आज सुंदर भक्तांची फुलं लागलेली आहेत. आणि हि वेळ सुद्धा अशी आहे कि या वेळी अनेक संत साधू परमेश्वराच्या शोधात जे दरिकंदरातून फिरत होते, जन्माला आलेले आहेत आणि सामान्य जनते प्रमाणे प्रपंचात राहूनच परमेश्वराला शोधत आहेत.

नल दमयंती आख्यान मध्ये असे म्हणतात कि एकदा नलाला कली भेटला आणि तो मिळाल्या बरोबर त्याने त्या कलीला पकडून धरल आणि सांगितलं आता मी तुला मारूनच टाकणार. कारण तू मला इतकं छळल आणि इतका त्रास दिलास. मला तू विभ्रमात घातलंस, त्या विभ्रमामुळे मी आपल्या बायकोला विसरलो आणि नाना ते हाल मी सहन केले अश्या ह्या तुझ्या लीला मला संपवल्याचं पाहिजेत आणि मला तुला नष्ट केलं पाहिजे. त्यावर कलीने सांगितले बाबा तू मला नष्ट कर मी त्याला नाही नाही म्हणत पण आधी माझं महात्म्य काय ते ऐकून घे.  त्यांनी सांगितलं तुझे काय माहात्म्य असणार? कलीने सांगितलं ह्या वेळेला आणि अनेक युगा मध्ये जे लोक परमेश्वराला शोधत गिरीकंदरातून फिरत आहेत ते ह्या कलीयुगा मध्ये एक सामान्य लोकांप्रमाणे सर्व साधारण लोकांप्रमाणे प्रपंचात येतील, गृहस्थ म्हणून जन्माला येतील आणि त्यांना आत्मसाक्षात्कार मिळणार आहे. तर तेंव्हा जर तुला मला मारून टाकायचे असेल तर मारून टाक पण हे लक्षात ठेव कि माझं युग आल्या शिवाय हे महान कार्य होणार नाही.

तेंव्हा ह्याचे भाकीत हजारो वर्षापूर्वी झालेलं आहे. भृगुमुनींनी सुद्धा भाकीत केलेलं आहे कि अशी वेळ येणार आहे जेंव्हा कुंडलिनी सुद्धा सहजच जागृत होईल. इतकंच नव्हे तर त्यांनी सांगितलं कि हॉस्पिटल हि संस्था सुद्धा नष्ट पावेल. लोकांची प्रकृती ठीक होईल त्यांना क्षेम मिळेल. आणि जगामध्ये परमेश्वराचे साम्राज्य येईल. अनेक संत साधूंनी हे सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ह्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे आपण ते ऐकलं असेल. हि जी विशेष वेळ आहे, इथे जो जे वांछील तो ते लाहो. अशी जी स्थिती येणार आहे. ते काही खोटं बोलून गेले नाही. ते द्रष्टे होते. त्यांनी जे जाणलं ते खरं होतं. आणि परमेश्वरावर आपला विश्वास अटळ राहिला पाहिजे म्हणून त्यांनी हि भविष्यवाणी केली होती. ह्या सर्व महान लोकांचे, साधू संतांचे, आवतारणांचे फलद्रूप म्हणूनच आज सहजयोग ह्या स्थितीला आला आहे. त्यात माझं काही देणं घेणं लागत नाही. ह्या सर्व महान लोकांचे, साधू संतांचे, अवतरणांचे फलद्रूप म्हणूनच आज सहजयोग ह्या स्थितीला आला आहे. त्यात माझं काही देणं घेणं लागत नाही. ह्या सर्वानी एवढी मेहनत केली, मशागत केली आणि धार्मिकतेचा वृक्ष ह्या संसारात लावला त्या धार्मिकतेला आज हि फुले आलेली आहेत. आणि त्यांना जर फळं व्हायचं असलं तर त्यात माझं काय देणं घेणं लागतं. मी तुमची आई आहे. काही तुमची गुरु वगैरे काही नाही. तुम्ही आपल्या आईला जाणता. तिला फक्त असं असतं माझे जे सगळे काही प्रेम असेल ते सगळं पूर्ण ओसंडून माझ्या मुलाला दिलं म्हणजे तिला धन्यता वाटते.  जे काही माझ्यात आहे ते सगळं आपल्याला मिळावं, हीच इच्छा एका आईला असते. त्या पलीकडे काहीही विचार तिला नसतो.

आता आपण आजकालच्या धकाधकीच्या काळामध्ये अनेक त्रासात गांजलेले आहोत. कोणाला हा त्रास आहे तर कोणाला तो त्रास आहे. कुणाला पैशाची ददात आहे तर कुणाला मुलं नाहीत तर कुणाला मुलं आहेत म्हणून त्रास आहे. अनेक तरतऱ्हेचे त्रास मला लोक रोजच येऊन सांगत असतात. माझा मुलगाच आजारी आहे. तर माताजी माझ्या आईलाच बरं नाही आहे. त्याहूनही मोठाले त्रास जगामध्ये आहेत. अनेक लोक गरीब झाले, त्यांना खायला प्यायला नाही, दुष्काळ झाले. अशे अनेक त्रास संसारात आज दिसत आहेत. त्यांनी मनुष्य गांजून गेलेला आहे त्याला समजत नाही. आणि आज ह्या कलियुगामध्ये मनुष्य भ्रमित झालेला आहे. त्याला असा भ्रम झालाय कि जर परमेश्वर आहे तर एवढं कशाला आम्हाला दुःखात लोटतो. आम्हाला जन्म दिला तर आमच्या सुखाची तरी त्याला पर्वा आहे किंवा नाही. आणि हा प्रश्न बरोबर आहे पण ज्याला तुम्ही सुख म्हणता ते परमेश्वराच्या दृष्टीने सुख नाही. समजा एखादा मुलगा दारू पितो आणि त्याला वाटतं  कि ह्याच्यात मला फार सुख मिळतं. पण त्याच्या बापाला तसं वाटत नाही. त्याचं जे खरं सुख आहे, ज्याचं त्याच्यामध्ये खरं हित आहे. ज्यांनी त्याच खरंच भलं होणार आहे. आणि ते जर बापाला माहित असलं तर तो तेच देणार मुलाला. बाकीचं जे काही आहे ते सगळं व्यर्थच आहे. जर आपल्याला अमृत मिळालं तर मग आपण इकडचं तिकडचं पाणी प्यायला कशाला जाऊ? तेंव्हा जे अमृत आहे जे मुख्य आहे तेच दिल पाहिजे. आणि ते देता सगळेच प्रश्न एकसाथ सुटतात. 

ते अमृत म्हणजे आपल्यामध्ये आत्म्याचे दर्शन होणे. दर्शनाचा अर्थ आत्म्याला बघणं नव्हे. जर तुम्ही ते बघू शकता म्हणजे तुम्ही तिथे नाही. जर तुम्ही हा प्रकाश बघता म्हणजे तुम्ही हा प्रकाश नाही आहात. पण जो स्वयंप्रकाश असतो तो काही स्वतःला बघत नाही. तेंव्हा दर्शन म्हणजे बघणं नव्हे. तर आपल्या चित्तामध्ये त्याचं दर्शन झालं पाहिजे म्हणजे आपल्या नसानसातून आपल्याला जाणवलं पाहिजे कि आपल्यामध्ये आत्म्याचा वास आहे. आपल्या अंतःकरणातून तो प्रकाशित आहे. हि गोष्ट पुष्कळ कमी लोकांना माहिती आहे. 

त्यांना असं वाटतं कि आपण पुष्कळ पारायणं केली, पुस्तकं वाचली, परमेश्वराच्या गोष्टी केल्या तर आपल्याला परमेश्वर मिळेल.  कबूल,..  जर तुम्ही  आता, इथे आलो आम्ही तर तिथे लिहिले होते इथे पेण आहे, तर ती इथे समजा एक जाहिरात होती. किंवा त्याच्याबद्दल इशारा होता कि इथे पेण हे गाव आहे. पण जो पर्यंत आम्ही आतमध्ये येणार नाही, नुसत्या त्या पाट्या जर वाचत बसलो तर आम्ही पेण शहरात कसे येणार? तेंव्हा हे जेवढं शास्त्र वगैरे लिहिलेलं आहे हे सगळं इशाऱ्यासाठी आहे. त्याचं इंगीत काय आहे ते जाणलं पाहिजे आणि इंगीत हे आहे कि ते शास्त्र तुम्ही वाचल्यावर त्या शास्त्रात जे लिहिलेलं आहे ते मिळालं पाहिजे. असं कोणतंही शास्त्र नाही कि ज्याच्या मध्ये असे लिहिलेलं आहे कि तुम्ही आत्म्याला जाणल्याशिवायच परमेश्वर मिळवू शकता. वेदामध्य पहिल्या श्लोकातच म्हटलेलं आहे कि ज्याला विद झालं नाही, विद होणे म्हणजे डोक्यात जाणे नव्हे, विद म्हणजे आपल्या नसानसांवर त्याचा जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत वेद वाचण्यात काहीच अर्थ नाही.

तेंव्हा हे होण्यासाठी काय आपल्यामध्ये परमेश्वराने किमया केली आहे ते आपण पहिले पाहिजे. आपल्याला जे काही मिळाले आहे हा मानव देह मिळाला आहे हि मानव चेतना जी मिळालेली आहे ह्या सर्व गोष्टी आपण घेऊन टाकतो अकस्मात. त्या बद्दल विचार करत नाही. कि बाबा आपल्याला मिळाल्या कशा? परमेश्वराने हे डोळे का दिले? ह्या डोळ्यांनी आम्हाला रंग दिसतो, सुंदरता दिसते आम्हाला समजतं कितीतरी. ह्या कानांनी आम्ही ऐकू शकतो. ह्या कानांनी आम्हाला भाषा समजते त्या भाषेमुळे विचार कळतो. हे परमेश्वराने मानवाला विशेषरूपाने कसं दिलंय? आणि का दिलंय? हा विचार आपण केला पाहिजे. पण तसं नाही आम्ही मानव आहोत हे आम्ही जाणून घेतो. आम्ही मानव आहोत ना मग आम्ही काहीतरी आहोत. अहो पण हे मिळालं कसं आणि का मिळालं? तुम्हाला मानव का करण्यात आलं, ह्या मानवाला काही अर्थ आहे कि उगीचच तुम्हाला करायचे म्हणून मानव करून टाकलेले आहे. फार मोठा अर्थ आहे ह्या मानवाला. ह्या सर्व सृष्टीचं जे विशेष आहे ते म्हणजे मनुष्य, मानव. सगळ्यात उच्च स्थितीला पोचलेलं जे काही आहे तो आहे हा मानव. ह्या मानवाला परमेश्वरानं फार मेहनतीने, फार प्रेमाने, अत्यंत नाजूक पणाने पालन केलेलं आहे त्याचं संरक्षण केलेलं आहे आणि त्याचं पोषण करून आज ह्या स्थितीला पोचविलेलं आहे कि तो त्या मार्गावर आहे तिथे तो परमेश्वराच्या साम्राज्या मध्ये जाऊ शकतो.

हा मार्ग परमेश्वराने आपल्या मध्ये आधीच आखून ठेवलेला आहे. सगळं काही आपल्यामध्ये आतमध्येच आहे. आता जे मी आपल्याला सांगत आहे ते कदाचित आपण वाचलं नसेल, ऐकलं नसेल, असंही असू शकतं. पण जे आपण वाचलं नाही किंवा जाणलं नाही, कदाचित आपण ते पाहिलं नसेल पण ते नाही असं नाही. त्या बद्दल आपण आपली द्रुष्टी जी आहे ती दक्ष ठेवायला पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीला जाणण्याची आपल्यामध्ये पूर्ण उत्कंठा असायला पाहिजे कि हे आहे तरी काय गोष्ट? आपण जे झाड बघतो ते झाड दिसतं पण त्याच्या खाली जी मुळ आहेत ती दिसतात का आपल्याला. आज सबंध मानवतेच हे झालेलं आहे कि हे झाड फार मोठं वाढलेलं आहे. इतकी गरज नव्हती ते वाढण्याची, ते इतकं वाढून गेलेलय आणि त्याच्या मुळांना मात्र काहीच पाणी नाही. मुळांकडे कुणाचं लक्षच नाही कि मूळ आहेत कुठे? आणि त्याचं पोषण कोण करणार? त्यांचं पोषण करणारा जो झरा आहे तो कुठे आहे? तिकडे कुणाचाही लक्ष नाही. लक्ष फक्त एकीकडे आहे कि हे झाड खूप वाढवत जायचं. अहो पण हे झाड कोलमोडून पडेल. ह्या झाडाला जर तुम्ही व्यवस्थित, त्याच्या पूर्ण लायकी प्रमाणे, त्याच्या पूर्ण स्थिती प्रमाणे त्याची वाढ जर केली नाही तर हि वाढ त्याला झेपायची नाही. सबंध झाड अगदी कोलमोडून पडेल. मग पुढे काय होणार? सर्वनाश, सत्यानाश. तेंव्हा आता काय केलं पाहिजे असा विचार पाश्चिमात्य लोकांच्या डोक्यात येतो आहे. विदेशी लोकांच्या डोक्यात येतो आहे. कि आता केवढी मोठी आपल्यावरती जबाबदारी आलेली आहे. फार मोठी आपल्यावर जबाबदारी आलेली आहे. आणि जबाबदारी अशी आहे कि आपण ह्या वेळेला हे जाणून घेतलं पाहिजे कि ह्या वृक्षांच्या मुळांमध्ये काय आहे? त्या मुळांचा पोषक असा तो झरा कुठचा आहे? जर तिकडे आपण लक्ष नाही दिले तर एक दिवस असा येईल कि आपला खरोखरच सर्वनाश होईल. हा झरा आपल्यामध्ये आहे किंवा नाही? ह्या झऱ्याचे स्वरूप काय आहे? ते जाणणे म्हणजेच सहजयोग आहे.

पण ते जाणायच्या आधी, आपल्याला मुळांना जाणायच्या आधी सूक्ष्म झालं पाहिजे.  जर मी म्हटलं तुम्ही आपल्या मुळा मध्ये जाऊन बघा काय आहे, तुम्ही कसं उतरणार? तुमचं आता माझ्याकडे लक्ष आहे, पण मी जर म्हटलं तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या तर तुम्ही कसे लक्ष देणार? काहीतरी आतमध्ये जर घटना झाली तरच ते लक्ष आतमध्ये जाणार आहे. आणि हि घटना म्हणजे तुमच्या मध्ये असलेल्या कुंडलिनीचे जागरण. 

सर्व प्रथम महाराष्ट्रामध्ये सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीचे वर्णन केलेलं आहे. आणि सांगितलंय कि ह्याच कुंडलिनीच्याद्वारे आत्मसाक्षात्कार होतो. विशेष्य करून ह्या महाराष्ट्रामध्ये जी नाथपंथी लोकांनी मेहनत केलेली आहे ती सबंध कार्याला लागलेली आहे. कारण त्यांनी एकेका माणसालाच पूर्वी आत्मसाक्षात्कार दिला. हजारो लोकांच्या मधून एखादया माणसालाच आत्मसाक्षात्कार मिळत असे. पण तोही लपून छापून गुप्त रीतीने होत असे. त्याच फार प्रदर्शन होत नसे. आज अशी वेळ आलेली आहे कि त्यांनी जे कार्य करून ठेवलेल आहे त्या कार्याला आपण काहीतरी विशेष स्वरूप देणार आहोत. आणि त्या कार्याला आज फळं येणार आहेत. आपल्यामध्ये असलेली कुंडलिनी शक्ति हि प्रत्येक माणसात असते. प्रत्येक माणसामध्ये हि कुंडलिनी शक्ति असते आणि ती जागृत करणं एखाद्या जाणकारालाच येतं. प्रत्येक माणसाला ती जागृत करता येत नाही. पुष्कळ लोक असे म्हणतात कि कुंडलिनी जागृत झाली कि खूप गर्मी होते, काहीतरी त्रास होतो, लोक वेडे होतात, असं होतं तसं होतं. असं कसं होईल बरं? कुंडलिनी हि तुमची आई आहे. ती तुमची आई आहे. तुमच्या आईने तुम्हाला जेंव्हा जन्म दिला तेंव्हा सगळी दुःख तिने सहन केली. कधी सांगितलं तरी का कि मला दुःख झालं तुला जन्म देताना. तशी हि तुमची स्वतःची, प्रत्येकाची वेगळी वेगळी व्यक्तिगत आई आहे. हि आई त्या दिवसाच्या वाटेवर बसलेली आहे ज्या दिवशी तुम्ही आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हाल. हीच तुमची जन्मदात्री आहे. तीच तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे. अशा कुंडलिनी बद्दल जे लोक असे सांगतात, कि ह्याला त्रास होतो, अशी गर्मी होते किंवा असं होतं वगैरे असं जे लोक सांगतात त्यांच्या बद्दल तुम्ही एवढ लक्षात ठेवलं पाहिजे कि हि सर्व मंडळी जे असं सांगतात त्यांना ह्याचा अधिकार नाही. ते काहीतरी वाईट लोकं आहेत. 

तर हि कुंडलिनी शक्ति आपल्यामध्ये त्रिकोणाकर अस्थिमध्ये साडेतीन वेटोळे घालून बसलेली आहे. असं सर्व सांगतात आणि म्हणतात. पण ती आहे किंवा नाही आणि असं जे म्हणतात त्याला काही आधार आहे का? त्याला काही प्रमाण आहे का? म्हणजे साधुसंत खोटे नव्हते बोलत पण तरी त्याला आधार काय? आता गोष्ट अशी आहे समजा आम्ही लंडनला राहतो आणि लंडनला जे मी बघते ते जर मी येऊन सांगितलं तर त्याला आधार काय? तुम्ही लंडनला गेल्याशिवाय आधार कसा देणार? तुम्ही जो पर्यंत त्या गावी जात नाही, आता पेणला अशी जागा आहे असं जर मला कुणी सांगितलं तर त्याला आधार काय? स्वतःच जाऊन त्याचा अनुभव घेतला पाहिजे ना. स्वतः अनुभव झाल्यावरच त्याला आधार येणार कि नाही. नाहीतर त्याला काहीच आधार नाही. जर तुम्ही म्हटलं कि मला तुम्ही आता इथे आधार द्या तर मी एवढंच म्हणीन कि तुम्ही हे प्राप्त करून घ्या. हे मिळवून घ्या आणि जर तुम्हाला मिळालं नशिबवाले असले तुम्ही तर तुम्हाला त्याचा आधार मिळेल.

हि कुंडलिनी शक्ति आपल्यामध्ये सहजच जागृत होते असे सगळ्यांनीच सांगितलं आहे, नानक साहेबांनी सांगितले आहे, कबीराने सांगितले आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. पण ती सहजच जर जागरुक होते तर मग काय केले पाहिजे माताजी म्हणजे काहीच नाही केले पाहिजे ना. “सहज” – सह म्हणजे तुमच्या बरोबर, ज म्हणजे जन्मलेला. हा योग करण्याची जी काही क्षमता आहे ती तुमच्या बरोबर जन्मलेली आहे. आज पर्यंत सबंध सृष्टी सहजच झाली पण सहजयोग हि जी क्षमता आहे हि फक्त मानवाला आहे. दुसरे आम्हाला तुम्ही म्हणाल आणखी कोणत्या जानवराला माताजी तुम्ही पार करा तर नाही बाबा तसं काही जमायचं नाही कारण त्यांची कुंडलिनी अजून त्या दशेला आलेली नाही. तुमची उत्क्रांती मध्ये हि स्थिती आज आलेली आहे कि तुम्ही आता तयार आहात. नुसतं कुंडलिनीला थोडीशी चालना जर मिळाली तर ती पटकन तुम्हाला आत्मसाक्षात्कार देईल. तुमचा पुनर्जन्म होईल. त्याला काही कठीण काम नाही आहे. तेंव्हा पुष्कळसे जे लोक वाद विवाद घालतात त्यांना असं सांगायच कि तुम्ही आता शांत राहा वाद विवाद फार झाले. वाद विवादाने काय फायदा होणार आहे? रामदास स्वामींनी सांगितले आहे “मिटे वाद संवाद ऐसा करावा”. तेंव्हा वादच तुमचा मी मिटवून टाकते, अनुभव झाल्याबरोबर तुमचा वाद मिटून जाईल. 

मी जेंव्हा मेडिकल कॉलेज मध्ये शिकत होते. तेंव्हा मला इतकं आश्चर्य वाटत होतं डॉक्टर लोकांना अजून सूक्ष्मातलं काहीच माहिती नाही. जे माहिती आहे ते बाह्यातलं माहिती आहे. आता एखादया झाडाला समजा कीड लागली, समजा एखाद्या पानाला कीड लागली तर तुम्ही त्या पानाची ट्रीटमेंट केलं, इलाज केला तर त्या झाडाचा होईल का इलाज? मग दुसऱ्या झाडाला लागेल, मग दुसऱ्या पानाला लागेल. त्याला जर इलाज करायचा आहे तर तुम्हाला मुळात उतरावं लागणार आहे. मुळा पासून त्याचा इलाज करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला मुळाचा काहीही मागमूस नसला, त्याच्या बद्दल तुम्हाला जर कल्पनाच नसली. असं काही आहे आपल्यामध्ये हे जर तुम्हाला कुणी सांगितलंच नाही तर वर वरच तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट करून राहिलात. त्या ऐवजी जे म्हणतात लोक ते ऐकावं आणि जर असं असलं तर का करून घेउ नये. असं एक मोघम शहाणपणाच वागणं असायला पाहिजे. पण मनुष्याचं शहाणपण कुठं विरून गेलाय ते समजत नाही. उठल्या सुटल्या प्रत्येक गोष्टीवर वादायला लागतात. मी म्हटलं, अहो जर मी असं म्हटलं इथे एक हिरा आहे आणि हा तुम्हाला फुकट मिळणार आहे. तर तुम्ही दुसऱ्यांदा विचार करणार का? घ्या, अहो लंडनहून काय ऑस्ट्रेलियाहुन लोक येतील घ्यायला. तसंच मी म्हणते तुमच्यामध्ये एक हिरा आहे तो म्हणजे तुमचा आत्मा, तो फक्त मिळवून घ्यायचा आहे. त्याला काही तुम्ही पैशे द्यायचे नाहीत काही करायचं नाही. तुमच्यामध्येच आहे ते, तुमचंच आहे ते सगळं. फक्त कुंडलिनी जागृत करून दिली आणि जेंव्हा ती ब्रह्मरंध्राला छेदते तेंव्हाच तुमचा सहजयोग घडतो, म्हणजे काय कि तुमचा आणि परमेश्वराशी संबंध लागतो. पण आधी आत्म्याशी संबंध झाला पाहिजे. आत्म्याशी संबंध झाल्याशिवाय परमेश्वराशी संबंध होऊ शकत नाही. म्हणून आधी आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे त्या नंतर परमेश्वर साक्षात्कार होतो. 

ह्या सहजयोगाला आज मेहनत करून आम्ही जवळ जवळ बारा वर्ष घालवली. तपच केलेलं आहे ते. आणि आता बघते मी कि लोकांच्या डोक्यात प्रकाश पडू लागला आहे. त्यांना आता लक्षात असं येतंय कि काहीतरी असं आपल्यामध्ये विशेष आहे. काहीतरी आपल्यामध्य आणखीन आहे. जे आपल्याला माहिती नाही. आपण काहीतरी विशेष आहोत काहीतरी मोठे आहोत. परमेश्वराने आपल्याला मानव काहीतरी विशेष करण्यासाठी केलेलं आहे. उगीचच आयुष्य असं घालवण्यासाठी नाही. आणि तेच विशेष काय आहे ते अनेक साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते फलद्रुप झालं पाहिजे. आज त्या सर्व साधू संताना, त्या सर्व अवतरणांना आणि त्या सर्व शास्त्रांना सिद्ध करण्याचे आमचे कार्य आहे. ते सिद्ध तेंव्हाच होईल जेंव्हा हे कार्य घडेल, त्याच्या आधी आम्ही सिद्ध करू शकत नाही. नुसत्या वादावादी होतील. आदिशंकराचार्यांशी सुद्धा लोकांनी एवढा वाद घातला ते कंटाळून गेले. नकोरे बाबा हे वाद. मग शेवटी त्यांनी सौंदर्यलहरी म्हणून पुस्तक लिहिलं त्यात फक्त आईचं वर्णन लिहिलं आणि सांगितलं ह्याच्याशी बोलायलाच नको, ह्या लोकांशी. लोकांनी सांगितलं अहो तुम्ही एवढे एवढे ग्रंथ लिहिले, विवेकचुडामणी वगैरे आणि आता तुम्ही हे काय? आईची काय स्तुती मांडली आहे? ते म्हणाले, हे बघा ते सगळं वाचण्यात बेकार आहे, लिहिण्यात बेकार आहे जे आहे ते आहे. तुम्ही आईची स्तुती करा आणि पार होऊन घ्या. जे सहज सरळ आहे. जे सुगम आहे त्याला आपण इतकं दुर्गम करून टाकलेलं आहे कि त्या बाबतीत कधी कधी जर जरासही सांगितलं तर लोकांना आवडत नाही. 

आता काल एक गृहस्थ आले, त्यांना इथे(माताजींनी आज्ञेकडे दर्शविले) त्रास आहे. मी म्हटलं तुम्ही नाकामध्ये थोडस तूप घातलं तर बरं वाटेल. ते म्हणे मी तूप खायचं टाकलंय. म्हटलं कशाला? मी तूपच खात नाही. दुसरा एक आला तो म्हणे मी अन्न त्याग केलं आहे. म्हटलं कशाला हो? झालं काय तुम्हाला अन्न त्याग केलं, अमका त्याग केलं. अमुक झालं. अगदी काडी पेहलवान. आता होणार काय ह्या माणसाचे, अन्न त्याग केल्यावर आता त्यांचा देह त्यागच होणार. आणि कशाला पाहिजे म्हटलं? अहो आपल्या देशात तसेच लोकांना अन्न मिळत नाही. आणखीन हे कशाला तुम्हाला शौक आलेले आहेत, अन्न त्याग करायचा हे खायचं नाही ते खायचं नाही. मग एक गृहस्थ आले ते म्हणायला लागले माताजी मला फार सर्दी होते, म्हणे मी ओलेतीनेच पूजा करतो. हे कुणी सांगितलं, ओलेतीने पूजा करायला सांगितलं कुणी? आमच्याकडे एक आहेत त्यांनी सांगितलं. ते कोण? ते करतात का ओलेतीने पूजा? नाही ते नाही करत. ते पोचलेले आहेत, आम्हाला सांगतात. हि दुसरी बाजू आली. एकीकडे वितंडवादी लोक आणि दुसरीकडे धर्मभोळे. धर्मभोळेपणा म्हणजे इतका जास्त आहे कि आता खेडेगावातून गेलो आणि सांगितलं कि माताजी पैशे बीयशे काही घेत नाही हा. तर एका बाईने दहा पैसे टाकले. अरे बाबा पैसे नाही घेत. बरं मग पंचवीस पैसे घेता का माताजी तुम्ही? इतका धर्मभोळे पणा कि काहीही करायला सांगितलं देवाच्या नावावर तर करायला तयार. आता एक हि झाली बाजू आणि दुसरी बाजू असली कि सगळं डोक्याने काढायचं. परमेश्वर तुम्ही बुद्धीने जाणू शकत नाही आणि या मनाने जाणू शकत नाही. ते फक्त आत्म्यानेच तुम्ही जाणू शकता. म्हणून आत्मा आधी तुमच्या चित्तात आला पाहिजे आता आत्मा शब्द म्हटलं म्हणजे मोठा संस्कृतचा शब्द वाटतो आपल्याला पण तसं काही नाही हं. अगदी सोपं सरळ आहे ते आणि विशेष्य करून जी मंडळी या सर्व चक्करात नाहीत त्यांना फार लवकर फायदा होतो. ज्या मंडळींना रात्रं दिवस हेच आहे सकाळी आज चार वाजता उठायचं मग अंघोळी करून अवदुंबरावर जायचं मग हे करायचं आणि ते करायचं ती पूजा करायची आणि त्याची पूजा करायची आणि ह्याची पूजा करायची त्यांचं त्याच्यातच आयुष्य चालू आहे. पण हा विचार केला पाहिजे हे सगळं करून आमच्या स्वभावात काही फरक आला का? आमच्यामध्ये काही पुनरुत्थान झालेलं आहे का? काहीतरी… अशी मंडळी अत्यंत तापट, रागीट, जितका वेळ पूजा करतील तो पर्यंत असं वाटेल कि आता त्राही त्राही सगळं होणार आहे. त्या परमेश्वरावर सुद्धा रागवायचं कधी कधी, त्यालाही फुलं फेकून मारायची. आणि असा मनुष्य पूजेला बसला कि नकोरे बाबा हा हनुमानाचा अवतार आता फार झाली पूजा असं वाटायला लागतं. दुसरं म्हणजे जे फार आपल्याला वितंडवादि आणि सांगतात आम्ही हे शिकलो, आम्ही गीता केली, आम्ही अमुक केलं, तमुक केलं. ते म्हणजे ब्लॅक मार्केट करणार, वाट्टेल ते धंदे करणार, त्यांना काहीही धर्म नाही ताळतंत्र नाही. म्हणेज धर्माची पुस्तकं वाचता कशाला वाचून तर तुमच्यात धर्म जागृतच नाही होत तर मग धर्माची पुस्तकं कशाला वाचायची? मग एक तिसरा मार्ग निघतो. ते म्हणतात धर्म बिर्म सगळं थोतांड आहे. परमेश्वर बिरमेश्वर काही नाही आता हे सगळं सोडून तुम्ही फक्त जडवादी व्हा. मग एक तिसरी टूम निघते.

पण जे खरं आहे ते असं आहे कि परमेश्वर हा आहे आणि निरंतर आहे आणि तुमच्या हृदयामध्ये तो आत्मास्वरूप बसलेला आहे. हि गोष्ट खरी आहे. आणि फक्त एकच क्षण पाहिजे त्या कुंडलिनीची जागृती जर झाली तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडून येईल. पण त्या एका क्षणासाठी सुद्धा मला तीन तीन तास बोलावं लागतं, जेंव्हा लोकांना समजतं कि हो माताजी तुम्ही म्हणता ते खरं आहे. तेंव्हा आपल्यामध्ये आत्मा आहे. तो जागृत झाला तर आपल्या चित्तामध्ये जो प्रकाश येतो. त्यांनी आपल्यामध्ये अनेक गोष्टी घडून येतात. सर्वप्रथम कुंडलिनी जागृत झाली म्हणजे काय होतं. सर्वप्रथम कुंडलिनी जागृत झाली म्हणजे सर्वप्रथम तुमची तब्येत ठीक होते. आता परवाच एक गृहस्थ फार मोठे इथले बिझिनेसवाले, मी म्हणा मोठे श्रीमंत वगैरे असे असले कि त्यांना दुरूनच नमस्कार करते. तर ते माझ्याकडे इकडून तिकडून मेहनत करून आले बिचारे. मला म्हणाले मला जायचंय ह्युस्टनला, माताजी आता मी काय करू, मला हार्ट अटॅक आला. त्यांनी सांगितलं, फारच सिरिअस ऑपरेशन आहे. असं का? म्हटलं बरं मग. तुम्ही एका फार मोठ्या माणसाचे केलाय ठीक तर माझं हृदय ठीक करून दया. म्हटलं बरं करतो आम्ही, बसा. त्यांच्यावर मेहनत केली. एकदोनदा मेहनत केल्यावर म्हटलं आता तुम्ही ठीक झाले. असं कसं. म्हटलं झाले म्हणते म्हणून झाले. आता पुढे तुम्हाला काय करायचं ते करा. तर ते लंडनला आले. लंडनला आले परत म्हटलं, बरं बाबा तुमच्या समाधानासाठी परत एकदा. आता तुम्ही ठीक झालात. तुम्ही काय करता? तुमच्या हातात व्हायब्रेशन्स यायला लागले, आता तुम्ही ठीक झालात. नाही नाही म्हणे असं कसं? म्हटलं जा तुम्ही ह्युस्टनला. तिथे जाऊन त्यांनी स्पेशली अंजिनोग्राफी केली, तर डॉक्टरांनी सांगितलं  अहो तुमच्या जसलोकला डॉक्टर्स आहेत कि काय आहेत? तुमचं हार्ट तर एकदम फर्स्टक्लास आहे. काहीच नाही त्या हार्ट मध्ये. सगळ्या नाड्या उघड्या, हे सगळं काय तुमचं जसलोक खोटं सांगतात तुम्हाला. त्यांच्या मशिनी खराब झालेल्या दिसतात. तो मनुष्य आपले पेपर्स घेऊन परत आला. कसलं म्हणे ऑपरेशन करायचं. आम्हाला काय वेड लागलंय तुमचं ऑपरेशन करायला. अगदी तुमच्या सारखं तर आम्ही हार्टच पाहिलं नाही. आता हे झालं कसं? हे कसं घडतं? 

कुंडलिनीचं जागरण झालं म्हणजे ती सर्व चक्राना शक्ति देते. आणि तशीच ती हृदय चक्राला सुद्धा शक्ती देते. शक्ति मिळाल्याबरोबर जे आपलं चक्र खराब असतं ते ठीक होतं. चक्र ठीक झाल्यावर त्याच्यावर आधारित सर्वच आपल्या ज्या संस्था आहेत त्या ठीक होतात. सोपं काम आहे. अगदी सोपं काम आहे. त्याला काही विशेष करावं लागत नाही. हे सोप्यातलं सोपं काम आहे शारीरिक तुमचा आराम देणं. पण त्याचा अर्थ असा नव्हे. आता काल आम्ही भाषण देत होतो, जवळ जवळ पाच सहा हजार माणसं असतील, तिथे अँब्युलन्स मध्ये घेऊन आले एक गृहस्थ. अहो म्हटलं इथे मी काय कोणाला बरं करायला नाही आलेली, इथे मी लोकांना साक्षात्कार द्यायला आले. नाही मी अँब्युलन्स मुद्दामून करून माताजी घेऊन आलो. म्हटलं तुम्ही कशाला केली? मी म्हटलं होतं का तुम्हाला? ठीक आहेत आजारी आहेत, तुम्हाला मी नंतर बघते पण ह्या इथे कशाला? हि आता इतकी मंडळी आहेत ह्यांच्या समोर कशाला तुम्ही आपले सगळे आजार घेऊन आलात? 

तर पहिली गोष्ट हि कि प्रकृती उत्तम होते कांती नितळ होते. चेहेऱ्यावर तेज येतं. कमीत कमी. दुसरं म्हणजे तुम्ही लोकांना ठीक करू शकता. नुसता हात असा केलात तरी ठीक होतं. त्यानंतर दुसऱ्या स्थिती मध्ये काय होतं कि कृष्णांनी सांगितलेलं आहे कि योग क्षेम वहाम्यहं, योग झाला तर तुझा मी क्षेम बघीन पण आधी योग सांगितला आहे. क्षेम योग नाही सांगितलेला. पुष्कळसे लोक सांगतात अहो माताजी आम्ही एवढी देवाची आराधना करतो, आम्हाला काही मिळलंच नाही. परमेश्वराने काही दिलेलंच नाही. अहो तुमचा संबंध झाला का? तुमचं कनेक्शन लागलय का परमेश्वराशी? कुणाला फोन करत होते तुम्ही? तुमचं कनेक्शन झालेलं नाही.  त्याच्यामुळे तुम्ही जे काही करता तुमचा फोनच खराब झालेला आहे त्याला करणार काय? म्हणून आपला आधी परमेश्वराशी संबंध झाला पाहिजे. आपलं कनेक्शन लागलं पाहिजे. आणि ते लागल्या बरोबरच क्षेम होतं. ज्यांना नोकऱ्या मिळत नाही त्यांना नोकऱ्या मिळाल्या, ज्यांचे पैशे बुडाले त्यांना पैसे मिळाले. अशा अनेक गोष्टी झाल्या आणि लोकांना मोठं आश्चर्य वाटलं माताजी हे होतं कसं? आता ते मी तुम्हाला समजावून सांगते.

काहीही तुम्ही बघता जगामध्ये काहीही, कोणचा त्रास असला, तुमच्या समोर कोणाचाही प्रश्न असला, प्रॉब्लेम असला. त्याला एक कारण लागतं. एक कारण लागतं. आता त्या कारणामुळे झालेला हा परिणाम आहे. कारण आणि परिणाम. तर तुम्ही काय करता, मानवीय चेतने मध्ये त्या कारणाशी किंवा परिणामाशी भांडत असता. आणि त्याला काही उत्तर नाही आणि तोड नाही आहे. फारच कमी आहे त्याला तोड. तर मग काय करायला पाहिजे. तुम्ही कसही करून जर त्या कारणाच्या पलिकडे गेलात तर कारणच संपल्यामुळे त्याचे परिणामही संपून जातात. आता तुम्ही म्हणाल माताजी आम्ही हे ऐकले आहे पण कारणाच्या पलिकडे कसे जायचे. कुंडलिनी जागृतीने कारण एका नवीन चेतनेत तुम्ही आल्यावर तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आलात. ते साम्राज्य म्हणजे फार मजेदार साम्राज्य आहे. त्याच्या मध्ये कोणतीही गोष्ट खोटी पडत नाही. इथे बसल्या बसल्या तुम्हाला वाट्टेल त्या माणसाचा विचार जर तुम्ही डोक्यात आणला तर त्याच्यावर तुम्ही प्रयोग करून त्याला बरं करू शकता. कुणाचं वाईट नाही करू शकत पण भलं करू शकता. असे त्याच्या जवळ बिनतारी यंत्र आहे. या साम्राज्य मध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला कधीही नुकसान होणार नाही. आणि जर एखादा असा मनुष्य समजा एखाद्या आगगाडीत असला किंवा बस मध्ये असला, तर अक्सिडेंट जर झाला तर त्यातल्या कोणत्याही माणसाला दुखापत होणार नाही.  कोणाचाही त्याला त्रास होणार नाही. कारण परमेश्वराचे देवदूत तुमच्या मागे पुढे धावतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल कशा गोष्टी घडून येतात. कसं सगळ्यांचं भलं होत आणि सगळा संसार असा सुखाचा झाला पाहिजे ते करण्याचं कार्य हे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही सहयोगाकडे आलाच नाही आणि गुत्त्यावरच जाऊन बसलात तर आम्ही काय करणार? त्यांनी काही फायदा होणार आहे का पण जर तुम्ही आलात तर मात्र कुंडलिनीचं जागरण काही कठीण नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्यांच्यामुळे तुमच्या मनाची स्थिती ठीक होते. पुष्कळसे वेडे लोक ठीक झाले. पुष्कळांनी वाईट सवयी होत्या त्या सोडून टाकल्या. आमच्याकडे असे असे लोक आलेले आहेत, कि ज्यांना अगदी अल्कोहोलिक्स आणखीन ड्रग एडिक्ट वगैरे वगैरे अशा पदव्या आहेत. आणि ते लोक सुद्धा सगळे ठीक झाले. तेंव्हा ते काही काठीण काम नाही कारण तुम्ही कारणाच्या पलीकडे जाता. प्रत्येक गोष्टीच्या कारणाच्या पलीकडे जाता. 

पण सगळ्यात मुख्य म्हणजे आत्मा स्वरूप झाल्या नंतर मनुष्य एकदम साक्षी स्वरूप होतो. आणि साक्षी स्वरूप झाल्यावर त्याच्या मध्ये आनंदाचा झरा वाहू लागतो. अशा माणसामध्ये अनेक शक्त्या जागृत होतात. अशा माणसाच्या डोळ्यामध्ये कोणच्याही तऱ्हेचं पाप कधी राहू शकत नाही. आणि त्याने जर एखाद्या गोष्टीवर दृष्टी टाकली कि ती वस्तू तो मनुष्य किंवा ती व्यक्ति एकदम पवित्र होऊन जाते.  असे अनेक चमत्कार सहजयोग मध्ये आता झालेत आणि पूर्वीही झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे कि रेड्याच्या तोंडून वेद बोलावला, गोरा कुंभाराचा मुलगा परत आला. हे झालं कसं? आपल्याला असं वाटतं काहीतरी किंवदंती असेल. असं नाही अगदी सगळं होतं. आणि आमच्या सहजयोगामध्ये प्रत्येक देशामध्ये लोकांनी अनेक चमत्कार बघितले आणि त्यांना फार आश्चर्य वाटलं. 

आता उदाहरणार्थ मी आपल्यलाला एक सांगते. आता मी वॅटफोर्डला एक दिवशी प्रोग्रॅमला गेले होते आणि खूप गर्दी होती. जवळ जवळ सातला प्रोग्रॅम सुरु झाला.  आणि आठ साडे आठच्या जवळ जवळ एक मुलगा कुठेतरी खूप ऐशी फुटांवरून एका ब्रिज वरून खाली पडला. खाली पडल्या बरोबर सगळ्यांनी विचार केला कि हा तर अगदी संपलाच असेल. कारण त्याची बाईक होती तिचा तर सबंध नाशच झाला असेल. आणि हा काय बचावणार? तर त्यांनी अँब्युलन्सला निरोप केला. ते अँब्युलन्सवाले यायला वेळ लागला. तेवढ्यात बघतात काय कि हा मुलगा आपला व्यवस्थित उठून वर आला. तेवढा ऐशी फूट चढला त्याला काही समजलं नाही. हा आहे का ह्याच भूत आहे? असा वर कसा आला. फार आश्चर्याची गोष्ट! वर आल्यावर त्याला अँब्युलन्सवाल्यानी विचारलं बाबा तू आलास कसा वर? तर पोलीस केस झाली. पोलीसपण गेले. हॉस्पिटलमध्ये गेले त्याला विचारलं, तू कसा आलास? म्हणे एक इंडियन बाई आहे. पांढरी साडी नेसून, पांढऱ्या गाडीतून आमची पांढरी गाडी. पांढऱ्या गाडीत आल्या, माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी मला हात दिला आणि सांगितलं मी तुला ठीक करते. आणि मला सगळं त्यांनी ठीक करून दिलं आता खाली दुखतंय त्यांनी सांगितलं ह्याच्यासाठी तू माझ्याकडे ये. तर म्हणे हे कसलं काय चमत्कार? असं शक्यच नाही. पण आता समोरच दिसतंय ना साक्षात. मी त्या वेळेला लेक्चर देत होते. पुष्कळ दूर आणि बरीच मंडळी होती. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी माझा फोटो पाहिला म्हणे ह्याच होत्या त्या. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं, ह्याच होत्या म्हणजे कसं काय? हो म्हणे ह्याच होत्या. मग त्यांनी फोन केला लंडनला ह्या कोण आहेत? काय आहेत? पोलिसवाल्यानी, त्यांनी सांगितलं, माताजींचं अनेकदा हिंदुस्तानात झालंय पण इथे झालं आता आम्हाला ह्याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही. कारण हे काही कठीण काम नाही. तर तो मुलगा जेंव्हा पडायला लागला तेंव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला. एकदम मनुष्याला ज्यावेळेला वाटतं काही आता बचावता येत नाही आता परमेश्वराचा धावा करावा आणि त्यावेळेला एकदम काय होतं मनुष्य मानवीय चेतनेतून वर उठला जातो. आणि त्याच वेळेला असे चमत्कार होऊ शकतात. पण हे क्षणिक होतं. जेंव्हा तुम्ही सहजयोगात येता तेंव्हा निरंतर असे चमत्कार आपल्याला बघायला मिळतात. पण चमत्काराचा अर्थ असा नव्हे मी तुम्हाला चार अंगठ्या काढून देईन. अंगठीत काय ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही जाऊन कुठेतरी डाका घाला, आणखीन दोन चार अंगठ्या काय शंभर अंगठ्या तुम्ही घेऊ शकता. अंगठीत काय आहे? दुसरे अनेक चमत्कार म्हणजे धतींगा सारखे लोक करतात आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. हे चमत्कार नव्हे. 

सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे आपला आत्मसाक्षात्कार होणं हे आहे. तेच तुम्ही मला आधी मागून घ्या. जे मुख्य आहे ते मागून घ्यायच. बाकीचं नंतर होतंच. एकदा हे मिळालं कि सर्व मिळणार आहे. असं समजून आधी माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या. असंच तुम्ही मागून घायचं, जे अस्सल आहे ते घेतल्यावरती मग सगळं होणारच आहे. आता समजा तुम्हाला पन्नास वस्तू विकत घ्यायच्या आहेत. तर तुम्ही जाऊन सांगितलं मला एक वस्तू द्या, बरं घे. दुसरी द्या, बरं घे. मग तिसऱ्या वस्तूला वडील म्हणतील अरे राहू दे फार असतं तुझं. पण जर तुम्ही जाऊन सांगितलं मला चार हजार रुपये द्या तुम्ही सगळी काम करायची आहेत. एकदा चार हजार मिळाले कि सगळी कामं होणारच कि नाही होणार. तेंव्हा जे सर्व कारणांचं जे मूळ आहे तेच तुम्हाला मिळालं, ज्याची मात आहे सर्व कारणांवर मग तुम्हाला कशाचा त्रास होणार नाही.

आता आईचं कसं असतं बाळकडू द्यायचं तर त्याच्यावर थोडं चॉकोलेट घालावं लागतं. म्हणून हे आधी तुम्हाला याचा फायदा होईल. पण त्याच्यावर असा विचार करायचा कि बावा देवाने आपल्याला लाईट कशाला केलं, प्रकाश कशाला दिला? आता हा दिवा आहे. हा दिवा का पेटवला आपण. प्रकाश देण्यासाठी. आधी तुम्ही प्रकाश मानता मग तुम्ही प्रकाश मागता आणि तो प्रकाश झाल्यावर तुम्ही प्रकाशमान होता. प्रकाशवान दिवे कुणी दगडाच्या खाली लपवून ठेवत नाहीत, दिवठणीवर ठेवतात म्हणजे दुसऱ्यांना प्रकाश देण्याची शक्ति तुमच्यात येते. त्याला तुम्हाला आपला प्रपंच सोडायला नाही. प्रपंच कशाला सोडायचा. लोक भीक मागतात आणि म्हणे आम्ही एवढ्यासाठी भीक मागतो. हरे रामावले म्हणतात आम्ही एवढ्या साठी भीक मागतो कारण आम्ही काही काम करत नाही.

आम्ही फक्त परमेश्वराचं काम करतो, म्हणजे भीक मागतो. अहो करंट्याना, रामदास्वामींनी सांगितलं करंट्याना का योग मिळणार आहे? रामदासस्वामींचे शब्द म्हणजे जरा जास्त जबरदस्त आहेत. त्यांनी सांगितलं करंट्याना काही मिळणार नाही आहे योग. प्रपंचात जी मंडळी राहिली ते यज्ञ केलेलं आहे. प्रपंचात ज्यांनी राहून आणि त्या यज्ञात राहून, परमेश्वराची ज्यांनी भक्ति केलेली आहे. त्यालाच योग मिळणार आहे. तेंव्हा आमच्याकडे जर कुणी संन्यासी वगैरे आला तर त्याला आम्ही सांगतो बाबा हे कपडे तू बदलून ये. आम्ही तुला काही आत्मसाक्षात्कार वगैरे देऊ शकत नाही. कारण संन्याशासाठी आमच्याकडे काही जागा नाही. अहो कसले संन्यासी तुम्ही? कपडे घातले म्हणून का? संन्यास हि आतली स्थिती आहे. जो मनुष्य संन्यस्त असतो तो बादशाह असतो बादशाह. त्याला कशाची पर्वा नसते. कधी तुम्हाला गादया गिरद्यांवर लोळायला मिळालं आहे तर ठीक आहे आणि नाही तर आम्ही चिखलातही जाऊन झोपू शकतो. असा जो मनुष्य असेल त्याला मानलं पाहिजे. कि तो खरा आहे.  पण जो नुसता तुमच्या खिशाकडे बघून चालतो अशा माणसालाच तुम्ही देव समजता मग आम्ही काय करणार? पैसा हा कधीही देव असू शकत नाही. पैसा देवाला माहिती नाही. हे तुम्ही माणसांनी बनविलेलं काहीतरी सूत्र आहे. ते देवाला समजत नाही. पैशाच्या पलीकडे, ह्या सर्व संपत्तीच्या पलीकडे जे आपल्यामध्ये लक्ष्मी तत्व आहे ते जागृत जर करून घेतलं, तर मनुष्यामध्ये एवढं समाधान येतं कि त्या समाधानामध्ये तो अत्यंत गौरवपूर्ण होऊन जातो. त्याची एक आपली शान असते. त्या शान मध्ये रहातो तो. तो काही सगळ्यांच्याकडे भीक मागत फिरत नाही. किंवा माझ्याजवळ हे नाही माझ्याजवळ ते नाही म्हणून रडत बसत नाही. जो बादशाह असतो त्याला तुम्ही देणार तरी काय? तो बादशाह आहे त्याला काय देणार तुम्ही? बादशाहालाच द्यावं लागतं तसे तुम्ही सगळे बादशहा व्हा आणि या अमर पदाला मिळवून घ्या. हि तुमची आपली सत्ता आहे. हे तुमचं आपलं स्वतःचं आहे. ते आपल्याला मिळालं पाहिजे अशी मनामध्ये इच्छा जरी केली तरी सुद्धा हि कुंडलिनी जी तुमच्या मध्ये शुद्ध इच्छा आहे ती प्राप्त होईल. हि खरी शुद्ध इच्छा आहे. बाकीच्या इच्छा शुद्ध नाहीत. जर त्या इच्छा शुद्ध असत्या तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच इच्छा राहिल्या नसत्या. तेंव्हा ह्या शुद्ध इच्छेची आपल्यामध्ये जी शक्ती कुंडलिनी आहे तिला आवाहन करून तिचं जागरण झालं पाहिजे.

आता उशीर झालेला आहे तरी पाच दहा मिनिटं तुम्हाला काय प्रश्न असले तर विचारा. आणि मग त्याच्या नंतर आपण जागृतीचं कार्य करू. विचारा प्रश्न असले तर, नसले तर मग आपण जागृतीचा कार्यक्रम करूया. आहेत का प्रश्न? वाह पेणची मंडळी फारच प्रगतिशील आहेत. म्हणूनच मी पेणला आले. हं काय तुम्हाला काय प्रश्न? आहे का? नाही ना? बरं. 

आता मी आपल्याला सांगितलं कि सहज सगळं काही आहे. काहीही विशेष करायचं नाही सगळं सहज घडतं. आता आपण सगळं काही विसरून जायचं. म्हणजे पहिल्यांदा कि मी हे पाप केलं, मी ते पाप केलं, मी असा वाईट, मी असा पतित वगैरे वगैरे हि रडगाणी आधी बाहेर ठेऊन यायची जोड्याबरोबर.  तुम्ही आईकडे आलात तिथे रडायला नको. तुम्ही काय आहात, काय नाही ते परमेश्वराला बघूद्या. तुम्ही त्या बद्दल काय बोलायचं नाही आणि स्वतःला दुःखात घालायचं नाही. हि पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अशी कि तुमच्या पोटाला वगैरे कुठं आवळून धरलं असेल किंवा घट्ट होत असेल तर ते जरा हलकं करून घ्यायचं. त्याने तुमचं चित्त इकडे तिकडे जाणार नाही. डोक्याच्या टोप्या काढून घ्यायच्या कारण सहस्त्रार भेदलं पाहिजे. आईकडे आपण टोपी घालून येत नाही. आई समोर आपण जातो का टोपी बीपी घालून.

(सहजयोग्याबरोबरचे संभाषण)

आपल्याइथे आपण सेन्टर सुरु करूया तिथे ट्रीटमेंट देऊ, आणि तसंही थोडं बहुत बरं वाटेल सगळ्यांना कुंडलिनीचं जागरण जर झालं. आधी पहिल्यांदा आमच्या कुंडलिनीच जागरण झालं पाहिजे अशी इच्छा ठेवायची मग पुढचं बघूया. त्याच्यातच  अर्धे रोग तर तसेच बरे करते ना. कदाचित सगळेच रोग बरे होतील. हं. तर दुसरं असं सहजासनात बसायचं म्हणजे फार आवळून वगैरे बसायचं नाही. सहजासनात म्हणजे पाय पसरून व्यवस्थित आरामात बसायचं आणि फार वाकायचं नाही, मागे पुढे वाकायचं नाही जास्त. सरळ अशी मान ठेवायची. अगदी सहज बसायचं. 

आता कुंडलिनीबद्दल मी हजारो भाषणं दिलेली आहेत. तेंव्हा एवढ्या लहानशा भाषणांत मी सगळं काही सांगू शकले नाही. पण काही हरकत नाही जे सांगते ते आपण ऐकून घ्यावं आणि मी म्हणते तसं करा म्हणजे बरोबर होऊन जाईल. पहिलं तर हे मी जेंव्हा म्हणेन डोळे मिटा त्याच्या नंतर डोळे उघडायचे नाहीत. कारण हि कुंडलिनी चित्ता मध्ये धावते आणि जर चित्त तुमचं इकडे तिकडे असलं तर कुंडलिनी उठत नाही. पण डोळे मिटल्या बरोबरच कुंडलिनीला वाव मिळतो म्हणून आपण डोळे उघडायचे नाहीत. पूर्णपणे त्या कुंडलिनीची मदत करायची. दुसरं म्हणजे असं, कि हा जो डावा हात आहे हि आपली इच्छा शक्ति आहे. तर ह्यांनी आपण आपली इच्छा प्रदर्शित करायची, हा असा डावा हात मांडीवर ठेवायचा व्यवस्थित आणि ह्यांनी आपण आपली इच्छा प्रदर्शित करत आहोत कि माताजी आम्हाला आमची जागृती पाहिजे. आम्हाला आत्मसाक्षात्कार पाहिजे. म्हणून सतत हा हात आरामात असा आपल्या मांडीवर ठेवायचा, सतत. उजवा हात जो आहे हि कार्य शक्ती आहे. तेंव्हा हा उजवा हात आपण वापरायचा असतो. पहिल्यांदा हृदयावर ठेवायचा त्याच्या नंतर पोटाच्या वर खाली, परत पोटाच्यावर, हृदयावर, (डाव्या बाजूला मानेवर ठेवून) इकडे, मी सगळं सांगिन तुम्हाला व्यवस्थित. मानेवर असा समोरून नंतर कपाळावर, डोक्याच्या मागे आणि वर, असा टाळूवर असा धरायचा आणि फिरवायचा. हे मी प्रत्येक वेळेला सांगीन आपल्याला कसं करायचं ते. हे सगळं काम आपण डावीकडे करतो उजवीकडे नाही. एवढं लक्षात ठेवायचं. आता प्रत्येक वेळेला मी सांगीन कसं करायचं. ह्याला फार तर फार दहा मिनिटं लागतील पण दहा मिनिटात तुम्हाला आश्चर्य वाटेल कि बहुतेक लोकांची कुंडलिनी जागृत होते.

आता डावा हात माझ्याकडे करायचा. सगळ्यांनी करावा. बाहेर उभे आहेत त्यांनी सुद्धा करावा. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात हृदयावर ठेवायचा. सगळ्यांनी. उभे आहेत तुम्ही कराना. बघेपणा कशाला करायचा. डावा हात माझ्याकडे. असं उभ्या उभ्या. सगळ्यांनी डोळे मिटायचे कुणीही उघडे ठेऊ नका. मग म्हणाल आमचं नाही झालं, तसं नाही झालं, हे नाही झालं. 

आता हा उजवा हात हृदयावर ठेवायचा आणि ह्या हृदयामध्ये साक्षात आपला आत्मा आहे. तेंव्हा डोळे मिटून मला एक प्रश्न करायला पाहिजे. श्री माताजी, मी आत्मा आहे का? हळू आपल्या मनात म्हणा. असा तीनदा प्रश्न करायचा. हा मंत्र आहे. श्री माताजी मी आत्मा आहे का? हा मंत्र आहे. असा तीनदा प्रश्न विचारायचा मला. डोळे मिटून. डोळे उघडायचे नाहीत. काहीही असलं तरी. सगळ्यांनी डोळे मिटले पाहिजेत. तीनदा असा प्रश्न विचारायचा. मान खाली विकायची नाही किंवा मागे करायची नाही साधं ठेवायचं. हार्ट अटॅकला हा मंत्र आहे. विचारायचं माताजी मी आत्मा आहे का? 

आता उजवा हात आपल्या डावीकडे पोटाच्या वर, पोटाच्या वरच्या बाजूला असा दाबून धरायचा आहे. बोटं खुपसून दाबून धरायचा. हे चक्र गुरुचं  आहे. आता मी आपल्याला सांगितलेलं आहे संतांनी फार मेहनत केली, सद्गुरूंनी फार आपलं पोषण केलेलं आहे. तेंव्हा त्यांना स्मरून एक प्रश्न विचाराचा. कारण तुम्हाला मी म्हटलं तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही स्वतःचे गुरुही आहात. कारण आत्मा हाच गुरु आहे. तेंव्हा असा प्रश्न विचारायचा ह्या गुरु तत्वावरती हात ठेऊन डावीकडे, माताजी, मी माझा गुरु आहे का? मी माझा स्वयंचा गुरु आहे का? असा प्रश्न विचारायचा. डोळे उघडायचे नाहीत वारंवार फक्त डोळे मिटून ठेवायचे. सारखे डोळे मिटून ठेवायचे. नेटाने करायला पाहिजे. नेट पाहिजे त्याला. असा प्रश्न तीनदा विचारायचा. 

आता कुंडलिनीच्या जागरणाची आपण जर सुरुवात करायची आहे तर पहिल्यांदा आपण मला परवानगी दिली पाहिजे. आपण स्वतंत्र आहात. जर आपल्याला आत्मसाक्षात्कार नको असला तर आपल्यावर कुणी जबरदस्ती करू शकत नाही. आणि जबरदस्तीने मिळण्यासारखंच नाही आहे. मागून मिळतं. म्हणून हा उजवा हात आता खाली पोटावर, ओटी पोटावर डावीकडे दाबून धरायचा. परत आणि इथे म्हणायचं माताजी मला शुद्ध विद्या द्यावी. आता शुद्ध विद्या हे ज्ञान आहे जे माणसाच्या नसानसातून वाहत, ज्यांनी सर्व परमेश्वरी कार्य घडत असतं. तेंव्हा सहादा असं म्हणायचं, ह्या चक्राला सहा कळ्या आहेत. म्हणून सहादा असं म्हणायचं कि माताजी मला शुद्ध विद्या द्यावी. कृपा करून मला आपण शुद्ध विद्या द्यावी. शुद्ध विद्या म्हटल्या बरोबरच जी शुद्ध शक्ती तुमच्या मध्ये कुंडलिनी आहे तिचं जागरण सुरु होतं. तेंव्हा सहादा असं म्हणायचं. आता काही मंत्र वगैरे म्हणायचा नाही या वेळेला, कोणताच मंत्र म्हणायचा नाही. 

राम कोण होते? सीता कोण होती? श्री कृष्ण कोण होते? किंवा काय ह्या लोकांचे संबंध होते? त्या पलीकडे आणखी बुद्ध महावीर वगैरे कोण होते हे सगळं काही सहजयोगात तुम्ही जणू शकता. हे सगळे आपापसात नातीगोती आहेत. तेंव्हा कृपा करून ह्यावेळेला कोणीही कोणचा मंत्र म्हणू नये, त्याच एक शास्त्र आहे ते समजून घेतल्यावरती मग तुम्हाला मंत्र सिद्धी येईल. सध्या फक्त इथे असा हात ठेऊन एकच मंत्र म्हणायचा माताजी मला शुद्ध विद्या आपण द्यावी.  

आता हा उजवा हात पोटावर डावीकडे परत दाबून धरायचा. डावीकडे वरच्या बाजूला. परत गुरु तत्वावर आलोत आपण. आता ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तेंव्हा पूर्ण आस्थेने आणि विश्वासाने असं म्हणायचं कि माताजी मीच स्वयंचा गुरु आहे. माताजी मीच माझा गुरु आहे. असं दहादा म्हणायचं कारण ह्याची दहा स्थानं आहेत. मीच माझा गुरु आहे कारण तुम्ही आत्मा आहात. तेंव्हा तुम्हीच तुमचे गुरु होणार. दहादा म्हणायचं पूर्ण आस्थेने. स्वतः बद्दल शंका कुशंका करायची नाही. स्वतःबद्दल ग्लानी ठेवायची नाही. काही न्यूनगंडात पडायचं नाही. सरळ म्हणायचं माताजी मी माझा गुरु आहे अगदी. न भिता. तुम्ही आहात का नाही ते सिद्ध करून देते मी. डोळे मिटून ठेवा आणि चष्मे उतरवले तर आणखी बरं होईल. कारण डोळ्यांवरही चांगला परिणाम होतो. आता माझं हे चुकलं, माझं ते चुकलं. मी हे वाईट केलं, मी ते वाईट केलं, असं सगळं मोजत बसायचं नाही.

आता हा उजवा हात हृदयावर परत ठेवायचा. आता आपल्याला मी सांगितलेलं आहे हृदयामध्ये आत्म्याचं स्वरूप आहे, आत्मा आहे आपला. आता इथे पूर्ण आस्थेने आणि विश्वासाने म्हणायचं माताजी मी आत्मा आहे. हे बारादा म्हणा. माताजी मी स्वयं साक्षात आत्मा आहे. असं बारादा म्हणा. दारात जी मंडळी उभी आहेत त्यांनी सुद्धा ध्यान केलं पाहिजे. काही हरकत नाही. हं.

आता हा उजवा हात आपल्या मानेवर ठेवायचा म्हणजे खांदा आणि मान ज्या कोनावर आहे तिथे जरासा पुढे असा सरकून धरायचा. ओढून धरला पाहिजे. समोरून, समोरून, मागवून नाही समोरून धरायचा. डोळे बंदच ठेवायचे. आता हे चक्र विशुद्धीचं चक्र आहे. आता याठिकाणी जे लोक स्वतःला मी पापी, मी अमका, आणि असं तसं काहीतरी सांगत असतात.  त्यांचं हे चक्र धरतं. किंवा तुम्ही सिगारेटचं पित असेल, किंवा दारू पित असेल काही वाईट काम करत असेल तर त्या बद्दल त्याला वाईट वाटतं. त्याला सारखं वाटतं मी कशाला सिगारेट पितो, मी कशाला दारू पितो. हे सगळं आता विसरून जायचं ह्या वेळेला. ते सगळं आपोआप सुटणार आहे. तेंव्हा कृपा करून स्वतःबद्दल कोणतीही न्यूनत्वाची भावना घ्यायची नाही. कोणाचीच नाही. तर मानेवर हात ठेऊन साधा मंत्र आहे, माताजी मी कसलाही दोष केलेला नाही. मला कोणचंच गिल्ट नाही. मी काही चुकलेलो नाही. मी अपराधी नाही. मी मुळीच अपराधी नाही आहे. असं सोळादा म्हणायचं. कृष्णाच्या सोळा कळा आहेत. तेंव्हा सोळादा म्हणायचं. मी कसलाच अपराध केला नाही. परत हे लक्षात घेतलं पाहिजे कि परमेश्वर हा प्रेमाचा सागर आहे, दयेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे.  पण सर्वात मुख्य म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. त्याच्या सागरापुढे तुम्ही काय अशी करणार आहात चूक? जे तो पिऊ शकत नाही. तेंव्हा शरणागत होऊन त्याला, मी काहीही दोष केलेला नाही. मी दोषी नाही. मी कोणाचाच अपराध केलेला नाही. असं स्पष्ट म्हणायचं. ह्या ज्या कल्पना येतात ह्या सर्व चुकीच्या आहेत. हे विचार अगदी बेकार आहेत. सोळादा म्हणायचं.

आता उजवा हात आपल्या कपाळावर असा आडवा धरायचा, कपाळावर आडवा. आणि या ठिकाणी मनापासून, हृदयापासून असं म्हणायचं कि माताजी मी सर्वाना क्षमा केली. हृदयापासून क्षमा केली. आता पुष्कळ असं म्हणतील कि माताजी फार कठीण आहे क्षमा करणं वगैरे. अगदी सोपं आहे. तुम्ही क्षमा केली अथवा नाही केली म्हणजे तुम्ही केलं तरी काय? फक्त तुम्ही नाही केली म्हणजे जे माणसं तुम्हाला त्रास देतात त्यांच्या हातात तुम्ही खेळात आहात. म्हणून ह्यांच्यातच भलं आहे, ह्यांच्यातच गत्यंतर आहे कि म्हणायचं माताजी मी सर्वाना हृदयापासून क्षमा केली, सर्वांना सर-सकट. आठवण काढत बसायची नाही कुणाची. सर-सकट. मी सर्वाना हृदयापासून क्षमा केली आहे. हा मंत्र आहे. आज्ञाचक्रावर. बघा निर्विचारिता येतेय आता. असं म्हटल्याबरोबर हलकं वाटेल. 

आता ह्याच्यापुढे हा हात आपला डोक्याच्या मागे नेऊन प्रांजळपणे परमेश्वराची आपण फक्त क्षमा मागायची. पण काही आपण दोष केला, अपराध केला असा विचार न ठेवताना. नुसतं म्हणायचं कि परमेश्वर मी जर काही चूक केली असेल तर क्षमा कर.  एवढं म्हणायचं फक्त. पण त्या बद्दल काही मी हा अपराध केला तो अपराध केला ह्याची छाननी करायची नाही. नुसतं असं म्हणायचं मोघम. 

आता हा उजवा हात टाळू स्थानी ठेवायचा जिथे लहानपणी आपली टाळू असते, त्याठिकाणी ठेवायचा. जिथे असं हृदय उडत असतं लहानपणी त्या ठिकाणी. त्या ठिकाणी हा हात असा, तळवा हाताचा जोराने दाबून धरायचा. आणि घड्याळाच्या काट्या सारखा फिरवायचा. ह्या ठिकाणी सातदा तुम्हाला म्हणायला लागेल कि माताजी मला आत्मसाक्षात्कार द्या.  कारण मी परत तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. हे म्हणावे लागेल तुम्हाला. ते म्हटल्यावरच हे घडणार आहे. तेंव्हा जोरात दाबून धारा आपल्या टाळूवर आणि आपली टाळू तर फिरवता येत नाही पण हात असा फिरवायचा सातदा म्हणा.

आता हा डोक्यावरचा हात डोळे न उघडता जमिनीवर ठेवायचा बाजूला जमिनीवर ठेवायचा आहे. आता ह्या वेळेला आपला डावा हात डोक्यावर जवळ जवळ चार पाच इंच धरायचा. चार पाच इंच डोक्यावर. डोळे उघडायचे नाहीत. आणि बघा गार येतेय का डोक्यावर? फिरवून बघायचा. वर खाली करायचं . उजवा हात माझ्याकडे करायचा. हात असा आडवा करून बघायचा. डोक्यावर हात असा धरायचा अधांतरी असा हात धरायचा. आतून थंड येत आहे कि नाही. वरती धरा वरती. थोडं वर धरायचं. गार, गार. हे सूक्ष्म आहे. हे जरा बारीक बघितलं पाहिजे. सूक्ष्मात धरलं पाहिजे. हा. आता दुसरा हात वर करून बघा. डोळे उघडू नका. डावा हात परत माझ्याकडे आणि उजवा हात. लक्ष टाळूकडे. लक्ष तालुकडे असलं पाहिजे. परत दुसरा हात फिरवून बघा. जर गार येतेय तर हात खाली करून टाका. आता जर गार गार वाटतंय तर हात खाली करायचा.

हं, आता दोन्ही हात वर करायचे. डोळे उघडा. डोळे उघडून विचार न करता एक प्रश्न करायचा. कि हि ब्रम्ह शक्ती आहे का? तीनदा प्रश्न. परत. आता हात खाली करायचे. पंखे आहेत म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. शंका नाही करायची. आता हात खाली करून बघा. गार येतेय का हातात. ज्या लोकांच्या हातात किंवा डोक्यात गार येतेय त्यांनी हात वर करायचे, दोन्ही हात वर करायचे, बघायचे किती लोकांच्या येतंय? ज्या लोकांच्या हातामध्ये गार, डोक्यात किंवा हातात गार आलेलं आहे त्यांनी दोन्ही हात वर करायचे, म्हणजे कळेल…. 

वाह. म्हणजे सगळ्यांच्याच आलेलं दिसतंय. हेच चैतन्य आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला ती परमेश्वराची शक्ती लाभलेली आहे ज्या शक्तीने सर्व जिवंत कार्य घडतं. आता हि शक्ती तुमच्यातून वाहू लागली, जसं बीला अंकुर फुटलेला आहे पण अजून त्याचा वृक्ष व्हायचा आहे. म्हणून इथे पेणला सुद्धा आमचं सेन्टर आहे, तिथे जाऊन स्वतःला सांभाळून घेतलं पाहिजे. आणि स्वतःच्या आत्मसाक्षात्काराचा पूर्ण अंदाज घेतला पाहिजे. इतकंच नाही त्याची पूर्ण इज्जत केली पाहिजे. जर त्याचा तुम्ही मान ठेवला नाही तर हि कुंडलिनी परत खाली घसरून जाईल. तेंव्हा ती बांधून घ्यायची तिला वाढवून घ्यायचं, तीचा लाभ कसा करून घ्यायचा ते पाहिलं पाहिजे.

आपल्याला आता अत्यंत शांत वाटेल. ह्याच्यावर वादविवाद करता येत नाही, बोलता येत नाही काही नाही. निर्विचरितेत तुम्ही आलेले आहात. ह्या वेळेला तुम्ही माझ्याकडे बघत आहात. निर्विचार होऊन बघा, अगदी विचार येणार नाहीत. हि निर्विचार समाधी इतक्या लवकर लभ्य झालेली आहे पण ती तितक्याच लवकर गळून पडणार जर तुम्ही मेहनत केली नाही तर. आणि थोड्याच मेहनतीने तुम्ही निर्विकल्पात जाल. आणि अगदी सोपं काम आहे, इथे पेणला सुद्धा फार मोठे मोठे सहजयोगी आहेत. तेंव्हा आपण आधीच हि सर्व सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा सगळ्यांनी पूर्ण पणे लाभ घेतलेला आहे. तसाच आपण सर्वांनी घ्यावा. एक नाही सगळे तुमचे नातलग बीतलग सगळ्यांना देण्याचं आहे. एका दिव्यापासून अनेक दिवे लागतात. तसे इथे दिवे लागले पाहिजेत आणि सगळ्यांनी त्याचा प्रकाश सर्व जगामध्ये पसरवला पाहिजे. आपल्या हा भारताचा वारसा आहे आणि त्या वारसाला आपण जपून वापरलं पाहिजे. इतकच नव्हे तर एक दिवस असा येईल कि सर्व देशातून लोक तुमच्या पायावर येतील. फार मोठी आपल्याजवळ परमेश्वराने ठेव दिलेली आहे. ती आपण घालवू नये नाहीतर आपल्या मुलं बाळाचं आणि आपलं काय होईल हा विचार ठेवावा. माझे सगळ्यांना अनंत प्रणाम आणि अनंत आशीर्वाद.