Public Program – Sugarcane Factory

Rahuri (India)

1985-01-24 Public Program Marathi, Sugarcane Factory Rahuri India DP-RAW, 68'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

कोळपेवाडी साखर कारखान्याचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष तशी इतर कारभारी मंडळी ,इथे काम करणारी सर्व मंडळी तसेच कोळपे वाडीत राहणारी सर्व अबालवृद्ध मंडळी ,सर्वाना आमचा नमस्कार . आजच्या या शुभ दिवशी श्री गणेशाचा जन्म झालेला आहे . आकाशामध्ये बघितलं तर सूर्य नसताना सुध्दा चंद्राची झाक अत्यंत सुंदर आहे . आणि त्या चंद्राबरोबर आज एक विशेष योग मी बघितला तो फार कमी असतो . तो म्हणजे शुक्र आणि मंगळ . चंद्रमा आपल्या योगशास्त्रात मानलेला आहे आणि म्हणूनच तो शंकराच्या डोक्यावर बसलेला आहे . छान असा तो चंद्र आणि शुक्र हि देवता आहे जी प्रेमाची शक्ती आहे . देवाच्या प्रेमाची शक्ती हि शुक्र आहे आणि मंगळ हे श्री गणेश ,अशी आज हि त्रिविध युती झालेली आहे . हे काहीतरी कोळपेवाडी हि विशेष जागा असल्या शिवाय होणार नाही . 

तेव्हा ह्या भारतात तुम्ही जन्माला आलात हेच फार मोठं सुकृताचं लक्षण आहे . असं सर्व शास्त्रात लिहिलं आहे आणि पाश्चिमात्य देशात सुध्दा लोक मानतात कि भारतवासी म्हणजे काहीतरी विशेष लोक आहेत . आज आपल्याला सांगितलं कि माझे यजमान लंडनला फार मोठ्या पदावर नोकरीला आहेत . आणि जरी तुम्ही मला संत म्हणता पण मी एक गृहस्थातील बाई  आहे . आणि मी गृहस्थाश्रमातच सहजयोग थाटलेला आहे . त्यांच्या हुद्याला धरून मला पुष्कळ ठिकाणी जावं लागत . तेव्हा तिथले जे पंतप्रधान आहेत त्यांना भेटण्याचा खूप वेळा योग आला . तेव्हा त्या मला एकदा म्हण्याला कि तुमच्या देशामध्ये लोकांमध्ये असं काय आहे किज्याच्या मुळे  इतकं स्थैर्य त्यांच्या मध्ये आहे . स्थैर्य कुठून आलं आहे . आत्म्याचं बळ असल्याशिवाय इतकं स्थैर्य लोकांमध्ये येऊ शकत नाही . आमच्या लोकांमध्ये हे स्थैर्य नाही . आणि हि गोष्ट खरी आहे . अजून आपल्याला आपल्या मोठे पणाची जाणीव नाही त्या मुळे आपल्यात अहंकार आहे , ह्या देशामध्ये आपण जन्माला आलात हे पूर्वजन्मीचे सुकृत आहे . आणि त्यातूनही आपण ह्या महाराष्ट्रात जन्माला आलात हे विशेष आहे . 

सहजयोगामध्ये आम्ही विशेष तीन शक्त्याचं प्राबल्य समजतो ,हि त्रिविध शक्ती आहे ,एका आदिशक्तीचे तीन नाड्या आपल्या शरीरात धावतात त्या पैकी महाकाली ,महालक्षीमी ,महासरस्वती अशा तीन शक्त्या आपल्या मध्ये धावतात आणि तसेच जी शक्ती कुंडलिनी म्हणून आपल्या मध्ये आहे जी आपल्या मध्ये कार्य करते ,जिच्या मुळे आपल्याला आत्मबोध घडतो ,जिच्या मुळे आपण उच्च स्तीतीला जातो ,जिच्या मुळे आपण संत होऊ शकतो हि कुंडलिनी शक्ती आपल्या त्रिकोणाकार अस्थी मध्ये बसलेली आहे असं सहाव्या अध्यायामध्ये श्री ज्ञानेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे . हि कुंडलिनी जर जागृत झाली तर तुम्हाला आत्मबोध होईल असं आदिशंकराचार्यानी व्यास्तीतीत एका आत्मबोध पुस्तकात लिहिलेलं आहे . त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तक लिहिली . पण  १४ हजार वर्षा पूर्वी मार्कडेय स्वामींनी कुंडलिनीच संबंध वर्णन केलेलं आहे आणि सांगितलेले आहे कि जेव्हा आई ह्या जगात येईल तेव्हाच हे कार्य होण्या सारखं आहे . हि अशी आपल्या देशाची हजारो वर्षाची परंपरा आहे . ती परंपरा वर चढते उतरते ,इतक्या दिवसाची गुलामी आपण उचलली पण अजून आपल्यामध्ये ते स्थैर्य बाकी आहे . त्या बद्दल शंका नाही आपल्या मधलं स्थैर्य अजून इतकं डळमळलेलं नाही जरी आपले धर्म डळमळले तरी स्थैर्य बाकी आहे . म्हणजे भारतीय माणसाला हे समजत कि हे चुकीचं आहे ,आपण जे करतोय ते चुकीचं आहे हे सुध्दा खूप लोकांना समजत नाही . त्याला कारण असं आहे कि कृष्णाने सांगितलेलं आहे कि तीन तऱ्हेची मंडळी असतात . 

एक ज्यांना आपण तामसिक लोक म्हणतो ,दुसरे राजसिक म्हणतो आणि तिसरे सात्विक . बहुतेक मंडळी भारतामध्ये सात्विक प्रवृत्तीची आहेत . म्हणजे त्याच्या मध्ये संतुलन आहे स्थैर्य आहे . पण काही लोक तामसिक आहेत . जास्त लोक आहेत त्यांचं लक्ष जात आपोआप देवाकडे . पण हि तामसिक मंडळी आहेत त्याची ओळख सांगितली आहे कृष्णांनी कि जे चुकीचं आहे त्यालाच खर मानायचं . आणि जसा घाण्याला बैल जोतावा तसे ते त्या चुकीच्या आसपास झापड लावून फिरत असतात . मग कुणिकाय डोकं फोडून जरी सांगितलं तरी तेचतेच करायचं . हे तामसिक लक्षण झालं . पाश्चिमात्य देशांमध्ये राजसिक आहेत . राजसिक लोकांचं लक्षण हि सांगितलेलं आहे कि त्याना चागलं आणि वाईट यातलं कळत नाही . खर काय आणि खोट काय यातला तर फरक अजिबात कळत नाही पण यातलं चागलं काय आणि वाईट काय हेच कळत नाही . हे जे आम्हाला मिसेस थॅचर यांनी आम्हाला विचारलं कि इथल्या लोकांना चांगलं आणि वाईट का कळत नाही . कारण ते राजसिक आहेत . राजसिक माणसाचा कार्य केल्यामुळे अहंकार वाढतो आणि अहंकारामुळे यांच्यात काय वाईट ,त्याच्यात काय वाईट ,असं केलं तर काय चुकीचं आहे ,तस केलं तर काय चुकीचं आहे . असं वाटत त्यांना . पण तामसिक लोकं मध्ये जे लहानपणा पासून सांगतात कि हे असं करा ,ते तस करा ,ते करून करून जे ते शिकून घेतात त्याच्या पुढे ते जायला तयार नसतात . पण सात्विक माणस जी असतात त्याना दोन्ही हि दिसत . आता उदाहरण म्हणून बघू श्री राम जंगलात आले आणि त्यावेळी त्यांनी काय पाहिलं कि एक भिल्लीण तीच त्याच्यावर इतकं प्रेम ,आता भिल्लीण म्हणजे जुन्या काळचे राहिलेले लोक त्यांना आपण आदिवासी म्हणू अशी ती भिल्लीण आणि तिचे सगळे दात पडले होते फक दोनतीन दात होते . ते दात त्या बोरांना लावून तिने ते प्रत्येक बोर चाखून उष्टे केलेले . आपल्यातील अशी किती मंडळी आहेत जी कि अशी बोर खातील . रामांनी ती बोर सगळी खाल्ली आणि सीतेला सांगितलं मी यातली बोर तुला काही देणार नाही . मी असा मेवा कधीच खाल्ला नाही . मग सीता म्हणाली असं काय मला थोडं तरी द्या मी तुमची पत्नी आहे . लक्ष्मणाला तर राग आला हे काय ,हि भिल्लीण बोर काय आणते ,उष्टी काय करते आणि रामाला काय देते तिला काही कळत तरी का . तर मग सीतेला थोडं दिल ,सीता म्हणाली वा वा वा काय छान आहेत . मग लक्ष्मणाला वाटलं सीतेला मिळाल आपणही थोडं मागावं त्यानं सीतेकडे मागितलं ,सीता म्हणाली नको तुम्हाला राग येतो तुम्हाला नको . मग त्यांनी खाल्ल्यावर म्हंटल असं प्रेमाचं मी कधी खाल्लं नाही . प्रेमाचं माहात्म्य जे आहे ते आपल्या अवतरण नातं सांगितलं आहे . 

श्री कृष्णाचं सांगतात कि विदुराच्या घरी जाऊन ,ज्याला लोक म्हणत असत कि हा अस्पृश्य आहे ,ते जेवायला बसले . आणि दुर्योधनाने बोलावले होते पण जो दुष्ट आहे जो खळ आहे अशा माणसाकडे जेवायला जायचे नाही . पण प्रेमाने कुणी बोलावलं तर त्याच्याकडे जाऊन खायचं हे कृष्णाने आपल्याला शिकवले आहे . अशी अनेक आपल्याकडे उदाहरण आहेत आत्ताच आपल्याला महात्मा गांधींचं सांगता येईल आपल्याला कि ज्यांनी हि जी तामसिक प्रवृत्ती आहे ती काढण्या साठी . आणि त्यांच्या मध्ये हा विचार घालावा कि या पलीकडे पण सगळं काही आहे . कोणतीही गोष्ट घेऊन अति करणं हे धर्माच लक्षण नाही . एकनाथ एकदा आपल्या डोक्यावर कावड घेऊन गेले होते द्वारकेला तिथे वाटेत एका तहानलेल्या गाढवाला पाहिलं आणि त्याला कावडीतलं पाणी पाजलं . लोकांना वाटलं इथून तिथवर न्हेली कावड आणि गाढवाला पाणी पाजलं . लोक म्हणाले काय तुम्हाला झालं तरी काय ?असं कस केलं तुम्ही ?. त्यानी सांगितलं साक्षात परमेश्वर वरून खाली आला आहे . हि जी एक समज म्हणायची ,ज्याला आतमध्ये एक प्रेरणात्मक बुद्धि आहे ,हि जी कुशाग्रता आहे हि आपल्या साधुसंतांनी अनेक ठिकाणी दाखवली आहे . 

साईनाथांचंच उदाहरण घेतलं तर त्यांच्या मंदिरात लिहिलं आहे कि कोणत्याही धर्माची निंदा करण हे महापाप आहे . सर्व धर्माचं सार तत्व हे एक आहे हे अनेकदा अनेकांनी सांगून सुध्दा आपल्याला ते समजलेलं नाही , इतकच नव्हे तर एका धर्मात जन्मलेल्यां लोकं न मध्ये सुध्दा जातीपाती करून आपण फार त्रास देत आहोत . आमचा सहजयोग हा समाजविमुख आहे . हा जंगलात बसून ,गिरिकंदरात बसून किंवा संन्यासी बनून करायचा नाही . हा समाजात राहून व्यवस्तीत रीतीने ग्रहस्ती बनून मुलाबाळान मध्ये वाढवायचा आहे . समाजापासून विपरीत पळालेला पलायनवादी सहजयोग नाही . तेव्हा असा प्रश्न येतो जे जे साधुसंतांनी आपल्याला उधाहरण दिली ,गांधीजींनी एव्हडी मेहनत केली कि आम्ही जातपात मानायची नाही . तर सहजयोगाला काय आधार आहे याचा मी तुम्हाला सांगते . शास्त्रार्थ सांगते . देवीचं वर्णन आहे कारण सहजयोगात आम्ही शक्तीच कार्य करतो तेव्हा देवीचं वर्णन असं आहे कि “,या देवी सर्व भुतेषु जाती रूपेण संस्थिता “हे १४ हजार वर्षा पूर्वी लिहिलेलं आहे . देवीची शक्ती आपल्या मध्ये जाती मधून असते . म्हणजे आपली जात तीन असावी मग ,ती नंतर नाव दिली ती वेगळी . तामसिक,राजसिक आणि सात्विक किंवा संत त्यांना जातच नसते म्हणतात . जाती पलीकडे गुणातीत झालेला . अशे जे तीन गुणातून निघालेले संत आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे उदाहरण तर तीनच जातीत आपण आहोत असं १४ हजार वर्षा पूर्वी लिहिलेलं आहे आजच मी सांगत नाही . मी नवीन काहीच सांगत नाही . हि जात कोणची झाली तर एक महाकालीची ,एक महालक्षीमीच आणि एक महासरस्वतीची ,ह्या तीन ज्या देवी आहेत ती आमची खरी जात . आणि त्या जातीमध्ये लग्न कस करायचं ते सुध्दा सहजयोगामध्ये फार सुंदर आपल्याला समजत . 

जी जात म्हणजे माणसाची जर अशी जात असली म्हणजे तो तामसिक प्रवृत्तीचा ,म्हणजे धार्मिक असतो ,भक्तिमान असतो ,देवा कडे रुळलेला असतो पण जे चूक आहे त्याला देव मानून चालतो . आता उदाहरण सांगते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आम्ही हे सिद्ध केलेलं आहे ,या देवच सिध्द करायची गोष्ट आहे . आता परवा आमच्या कडे एक गृहस्थ आले ते आमचे शिष्य आहेत , गणेश भक्त  आहेत ते फार मोठे अग्निहोत्री आहेत ,फार नाव आहे त्यांचं . आले आणि मला म्हणाय लागले माताजी मला प्रोस्टेड चा त्रास आहे . म्हंटल शक्यच नाही तुम्ही गणेश भक्त आहात तुम्हाला प्रोस्टेटचा त्रास का व्हायचा . गणेश तुमच्यावर रागावणार हे मला पटत नाही . तर मी काय म्हंटल हे बघा माझ्याकडे थोड़ा प्रसाद घ्या थोड़े चणे होते ते दिले ,त्यांनी तो डोक्याला लावला आणि म्हणाले आज मी घेत नाही आज संकष्टी आहे आज उपास करतो . म्हंटल कळलं मला का तुम्हाला प्रोस्टेट चा त्रास होत आहे ते . म्हणाले का ,अहो म्हंटल ज्या दिवशी मुलाचा जन्म होतो त्या दिवशी उपास करतो का आपण ?. त्या दिवशी काय सुतक पाळायचं असत का ?कुणी सांगितलं तुम्हाला उपास करायला . ?हे परंपरागत आमच्यात आलेलं आहे कि गणपतीचा जन्म झाला ,रामाचा जन्म झाला ,कृष्णाचा जन्म झाला कि उपास करायचा म्हणजे हे लोक खुश होणार कि नाराज होणार तुम्हीच सांगा . तुम्हीच विचार करून सांगा तुमच्या घरी जर मुलगा झाला तर तुमचे जे दुश्मन असतील ते उपास करतील . डोक्याचा विचार गेल्या सारखं करायला नाही पाहिजे . हे झालं म्हणजे आपण तामसिक झालो . आणि अशा भलत्या वेळेला आपण उपास करतो आणि जेव्हा करायला पाहिजे तेव्हा करत नाही . तस म्हणजे उपास करायची काही खास गरज नाही . असेही आपण उपाशी मरतो आहे कशाला उपास करायचा . जे लोक उपाशी मरत आहेत ते काय देवा कडे जाणार आहेत . जे लोक देवाच्या नावावर उपास करतात त्यांची फार चुकीची कल्पना आहे . देवाच्या नावावर आनंद केला पाहिजे . उत्साह ,उल्हास केला पाहिजे . उलट हे सोडून रडत बसायचं किंवा उपास करायचा हे कुणी सांगितलं आहे . कुणी सांगितलं ,शास्त्रात कुठे दाखवा म्हंटल तर कुठेच नाही . आणि सांगायचं तुम्ही उपास करा आणि पैसे आम्हाला द्या . तुम्ही उपास करायचा आणि मध्ये जे भटजीबुवा असतील ते पैसे जमा करतात . हा जो आपल्यामध्ये रूढी गत अंधविश्वास आलेला आहे तो धर्माच्या आड येतो . आणि त्यामुळे पुष्कळ वेळा योगसाधना साधत नाही हे मी पाहिलं आहे . जरी आम्ही तुम्हाला जागृती दिली जरी तुम्ही आत्मसाक्षात्कारी झालात तरी वाढ होत नाही ,खुंटते आहे त्याला कारण हे आहे कि बी जे आहे ते थोडं किडके आहे . हे बी किडक होण्याचं कारण असं आहे कि कोणतीही चुकीची गोष्ट असेल ती मान्य करायची आणि त्याला आपण म्हणायचं कि हे बरोबर आहे . मी म्हंटल्यावर लोकांना असं वाटत कि माताजी असं कस म्हणतात . अहो मी तुमची आई आहे . जन्मजन्मांतरा पासून मी तुमची आई आहे . आणि मला सांगायलाच पाहिजे कि हे कोणत्याही शास्त्रात लिहिलेलं नाही . नाहीतर आणून दाखवा मला . कोणत्या शास्त्रात लिहिलेले आहे कि देवाच्या नावावर उपास करायचं ते मला आणून दाखवा . त्यांनी पोट खराब होत ,तब्बेती खराब होतात . बर तुमच्या तब्बेती साठी उपास करायचा तर करा त्याला आमची ना नाही . पण देवासाठी कशाला तुम्ही करता . त्यांनी देव साक्षात तुमच्यावर रागावतो आणि त्यांनी हि दुर्दशा आलेली आहे . ज्या गोष्टीचा तुम्ही शौक कराल देव तेच तुम्हाला देणार . तुम्हाला उपास पाहिजे ना उपास घ्या . 

जु लोकांनी जेव्हा ख्रिस्त जन्माला आला तेव्हा त्याला सांगितलं कि आम्ही ख्रिस्ताला मानत नाही . कारण ख्रिस्तानी सांगितलं कि मी तुमच्या साठी सगळं तुमचं पाप सहन केलं आता तुम्ही उल्हासात राहा ,आनंदात राहा . झालं सगळं विसरून जा . पण ते आंनद मानायला तयार नाहीत . आम्हाला कसही करून खूप त्रास सहन केलाच पाहिजे . देवा साठी आम्ही एव्हडा त्रास सहन करणार . उपाशी मरणार ,काय काय प्रकार त्यांनी काढले . ते तर जु लोक डोकं फोडून घेतात भिंतीवर . तर त्यांच्या साठी हिटलर पैदा झाला . हवा ना तुम्हाला त्रास घ्या ,झोडपून घ्या स्वतःला . किती त्रास पाहिजे तेव्हडा आणखीन करून घ्या . ज्या गोष्टींचा तुम्ही नाद लावला ते तुमच्या समोरच आहे . कृष्णांनी सांगितलं आहे कि “,योग क्षेम वाहामयं “,जेव्हा तुमचा योग घटीत होईल तेव्हाच तुमचं क्षेम होणार . स्पष्ट सांगितलं आहे कि योगा नंतर क्षेम होणार . असं नाही सांगितलं कि तुमचं क्षेम वहन करिन आणि असं हि सांगितलं नाही किक्षेम करून नंतर तुम्ही योग करा . आधी योग करा हे सांगण्याचं काय कारण आहे ?. योग क्षेम वाहामयं असं कृष्णांनी का म्हंटल ?कारण जो पर्यंत तुम्ही देवाच्या साम्राजाच्या जाणार नाही तो पर्यंत तुमचा त्याचा काय संबंध ?. 

आता तुम्ही इथे हिंदुस्थान सरकारच्या कायद्यात आहे तर त्याला बघु दे तुमचं काय करायचं ते . भलं करायचं का वाईट करायचं . जस करायचं तस करा म्हणावं . पण देवाच्या साम्राज्यात आल्यावर तुम्हाला तो सांभाळणार आहे . पण तिथे तुम्ही आधी जायला तर पाहिजे . ती स्तिती तरी यायला पाहिजे . ती स्तिती आल्या शिवाय तुम्ही जर म्हणाल कि इथे बसल्या बसल्या हरी हरी म्हणून म्हणजे “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी “. मुळीच देणार नाही . पण जर तुम्ही हरीचे झालात ,जर तुमचा योग घटीत झाला तर वाटेल त्या परिस्थितीत तुम्ही असलात तरी तो तुम्हाला देईल . हि देवाची पण भक्ती सुध्दा करतो आहे ती भक्ती सुध्दा खरी नाही कारण तुम्ही भक्त नाही विभक्त आहात . जो पर्यंत तुम्ही देवा पासून विभक्त आहात तर त्या भक्तीला कोण ऐकतंय ?. जर समजा इथे कनेक्शन नसेल तर मी बोलेल ते तुम्हाला ऐकायला येईल का . विचार करा . म्हणजे पहिली गोष्ट देवा शी संबंध झाला पाहिजे . हे सगळ्या साधुसंतांनी मराठी भाषेत लिहून ठेवलं आहे . रामदास स्वामींनी म्हंटलेलं आहे त्या ,नामदेवांनी म्हंटल आहे ते ऐका ,सखूबाईनी म्हंटल ते ऐका ,तुकारामांचं तर काय सांगायला हवं . आणि त्यांनी ते म्हंटल्या बरोबर तुम्ही कुणी बिलंदर किंवा भामटे आहात म्हणून त्याना आपण मारायला आणि छळायला उठलो . कारण आपण तिथे नाही आपण कुठेतरी दुसरीकडे रेंगाळतो आहे . आपल्याला जर कुणी सांगितलं बाबा असं करू नकोस ,जा मारा . आता परवा आपल्या गावा जवळच एक गाव आहे कोमलवाडी म्हणून ,त्या गावाला मी गेले होते तिथे लोकांच्या समोर मी गेले आणि तिथे कानिफनाथांची समाधी आहे . वा ,काय कमाल आहे , म्हणूनच मी तिथे पोहोचले . कानिफनाथ म्हणजे केव्हढे मोठे नाथ होऊन गेले , केव्हडा मोठा जीव ह्या स्वर्गातून इथे आला . तर एक गृहस्थ म्हणाले एव्हडा मोठा जीव इथे आला आणि आमच्या इथे नेहमी दुष्काळ च असतो . पाच पाच वर्षांनी पाऊस येतो आम्ही खूप त्रस्त होतो . अहो म्हंटल त्या कानिफनाथांचे तुम्ही काय हाल केले तुम्हाला माहित आहे का ?. तो मुसलमान ,तो अमका ,तमका त्याला शिव्या देऊन शेवटी असं म्हणतात कि मारून टाकलं त्याला शेवटी तुम्ही लोकांनी . मग काय देवांनी तुमच्या साठी काय आशीर्वाद पाठवायचे वा वा फार छान केलं ,एव्हडा मोठा जीव आम्ही या जगात पाठवला त्याची कत्तल केलीत तुम्ही फार छान केलं ,तेव्हा तुमच्या साठी काहीतरी विशेष आम्ही पाठवतो . अहो देवा जवळ डोकं आहे ,म्हंटल आता असं करा ध्यानात बसा . बघा किती आश्चर्याची गोष्ट आहे , मी म्हंटल तुम्हाला पसायदान पाहिजे देवाचा आशीर्वाद पाहिजे . तर आमच्या सहजयोगामध्ये जी प्रथा आहे त्याच्या प्रमाणे सांगोतलं कि डावा हात माझ्याकडे करा आणि उजवा हात जमिनीवर ठेवा . पण कुंडलिनी हलायला तयार नाही . काही व्हायला तयार नाही . म्हंटल आता असं करा कि डोळे मिटून कानिफनाथांची क्षमा मागा . त्याच्या शिवाय हलायची नाही हि . आणि क्षमा मागितल्या बरोबर खटकन काम झालं . ह्या गोष्टी फार सूक्ष्म आणि बारीक आहेत . छोट्या छोट्या गोष्टीन वरती सुध्दा कुंडलिनी थांबते . जस एखाद लहानसं खुसपट डोळ्यात गेल्यावर जस आकाश दिसत नाही तसच आहे . आपल्या ज्या खुळ्या कल्पना आहेत त्या बाजूला ठेवल्या पाहिजेत . जे सत्य आहे ते च मी बघीन असा विचार स्पष्ट पणे ,इमानदार पणाने देवा जवळ करायला पाहिजे . झालं गेलं ते जाऊदे . जे सत्य आहे तेच मला पाहिजे . तेव्हाच जो आत्मा तुमच्या मध्ये विराजमान आहे तो नुसता साक्षी रूपाने बघतो आहे कि तुम्ही काय करता तो तुमच्या चित्तात उतरेल . हि कुंडलिनी जागृत झाल्या बरोबर, हे  ब्रम्हरंध्रातून छेदन झाल्या बरोबर तुमच्या हृदया मध्ये जो आत्मा बसलेला ,जी परमेश्वराची आपल्यामध्ये प्रति छाया आहे , जे प्रतिबिंब आहे ते आपल्या चित्तात आल्या बरोबर आपलं चित्तच एक नवीन तऱ्हेचं होऊन जात . एकतर ह्या चित्तामध्ये सामूहिक चेतनेची  जागृती होते . सामूहिक चेतना म्हणजे अशी कि आपल्या मध्ये असलेली सगळी चक्र जागृत होतात . 

डाव्याहातावरची सात  आणि उजव्या हातावरची सात ,हि सगळी चक्र जागृत झाल्या मुळे त्यातल्या देवता जागृत होतात आणि त्यातल्या देवता जागृत झाल्यामुळे तुम्हाला हातामध्ये अशा थंड थंड लहरी ,चैतन्य यायला लागत . ज्या चैतन्या मुळे हि सर्व सृष्टी आज जिवंत आहे . जेव्हड जिवंत कार्य जगात होत ते परमेश्वर करतो . तुम्ही एकतरी जिवंत कार्य केलेलं आहे का सांगा ?. एक झाड पडलं त्याच फर्निचर केलं त्या मेलेल्या झाडाचं मेलेलं फर्निचर केलं . आणि आपल्याला वाटत कि आम्ही फार मोठं काम केलं . हे कोण ठरवतंय ,तुमच्या हृदयाचं स्पंदन कोण करतय . अवघा डोळा आपला एक कॅमेरा आहे ,काही ऍडजेस्ट मेन्ट लागत नाही काही नाही . आपलं संबंध बुध्दिचा जर बळ पाहिलं तर काय कंप्युटर आहे , विचार करत नाही आपण ,हे असं एक अद्वितीय असं आपलं शरीर देवान तयार केलेलं आहे तेच बघितलं कि वाटत कि काय तो बनवणारा आणि काय त्याची कमाल . असा जो कमाल करणारा जो आहे तो परमेश्वर त्याला आपण अजून आपल्या खिशातच घातलेलं आहे . त्याला खिशात घालून आम्ही जे करतो तो कायदा , आम्ही जे करतो ते बरोबर अशी चुकीची कल्पना घेऊन आपण देवाचा टाहो फोडतो आणि त्या देवाला बदनाम करतो . हा देव ज्याला आपण म्हणतो तो नुसता प्रेमाचा सागर आहे . म्हणजे प्रेम हवेत असत तस नाही . तो तुमच्या आयुष्याला एक वेगळच वळण देतो . कोणचंही कार्य करायचं झालं तर आता तुम्ही नुसता संकल्प केला तरी ते कार्य झालेलं असत . तुम्ही म्हणाल माताजी हे असं कस शक्य आहे ?का शक्य नाही ?,अहो तो परमेश्वर आहे ,आमच्या सारखा नाही ,ज्यांनी त्याला मिळवलं तो मग काय म्हणाल ते करायला तयार आहे . 

माझी आजी लहानपणी मला एक गोष्ट सांगायची कि दोन माणस एकदा एका प्रवाशाला भेटले . तर प्रवाशाने विचारलं तुम्ही कुठे चालले तर ते म्हणाले आम्ही देवांकडे चाललो . मला काम आहे देवा कडे . अगदी जशी आपल्या आजीआजोबाची गोष्ट तशी पण मजेदार गोष्ट आहे . म्हणे मी चाललो देवाकडे . पण पहिला जो माणूस भेटला त्याने सांगितलं हे बघा तुम्ही देवाकडे जाऊन सांगा मी फार मेहनत केली ,रात्रंदिवस देवाचा टाहो फोडत असतो ,टाळ कुटत असतो ,भक्ती केली , काय काय केलं नाही पण मला काही देव दिसतच नाही . त्यांनी सांगितलं बर सांगतो . मग पुढचा माणूस भेटला त्या माणसाने म्हंटल ,तो आरामात झोपलेला होता रस्त्याच्या कडेला म्हणाला ते देवाला सांगा माझ्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत उशीर झालेला आहे त्या पाठवून द्या तेव्हड्या व्यवस्तीत . याला वाटलं हा माणूस बघा देवाला सरळ ऑर्डर पाठवत आहे . आता ते वर गेले त्यांनी त्यांचं काम केलं देवाला सांगितलं कि खाली दोन माणस बसलेली आहेत पैकी एकत्र रस्त्यावरच पडलेला मला सांगतो कि तू देवाला सांग कि अजून माझं जेवण आलेले नाही म्हणून ,देव म्हणतो अरे त्याच अजून जेवण नाही झालं अरे बाबा लवकर जेवण पाठवा बर . कशी करून त्याची व्यवस्था करा आधी . दुसरा माणूस त्याच्या बद्दल सांगितलं त्यांना सांगा म्हणे अजून थोड़ा वेळ तुम्ही आता वाट बघा ,अजून थोडा वेळ टाळ कुटायला बसा . इतक्यात काही जमायचं नाही मला . याला मोठं आश्चर्य वाटलं ,देव म्हणाला तू काय आश्चर्य वाटून घेऊ नकोस . तू एक गोष्ट जाऊन त्यांना सांग आणि बघ तू एकाच कस होत आणि दुसऱ्याच कस होत ते . देव म्हणाला तू असं जाऊन सांग कि देवा कडे गेलो होतो आणि देवाकडे एक उंट होता आणि तो उंट त्याने एका सुई च्या भोकातून संबंध असा उंट काढला . असं तू त्या दोघांना सांग . तर हे गेले खाली तर तो टाळ सुटणार माणूस डोक्यावर उभा होता म्हणाला आता मी आसन च करतो देवाला बोलवायला . टाळाणी काही होत नाही आता आसन च करतो . त्यांनी तिथे धुनी पेटवून सगळी तयारी केली होती . त्यांनी विचारलं काय देव काय म्हणाला ,ते म्हणाले थांबा थोडावेळ अजून इतक्यात काही जमायचं नाही . असं का . त्यांना फार वाईट वाटलं ,निराश झाले ते . त्यांनी विचारलं तू देवाकडे काय पाहिलं . त्यांनी सांगितलं एका सुईच्या भोकातून उंट काढताना मी देवाला पाहिलं . तो म्हणे तू आता काय देवा कडे जाऊन आलास तर आम्हाला काय गप्पा सांगतोस काय . मग दुसऱ्या माणसाकडे गेले तो मजेत खात बसलेला होता , त्यांनी विचारलं का बाबा तुम्हाला खायला प्यायला व्यवस्तिथ मिळाल का ?. हो म्हणे ,अरे तो नेहमी माझी व्यवस्था करतो तुला काय सांगू म्हणे . याला खूप आश्चर्य वाटलं . परत त्याने विचारलं तू काय पाहिलंस देवा कडे ?, आश्चर्य पाहिलं मी कि एका सुईच्या भोकातून अख्खा उंट देवाने बाहेर काढला . तो म्हणे आश्चर्य काय तो देव आहे तुम्ही समजले काय ?. तो देव आहे . हे म्हंटल्या बरोबर यांनी त्याचे पाय धरले आणि म्हणाला आता कळलं कि तुझ्या ह्या विश्वासाला त्या देवाने मान्य केलं आहे .हि गोष्ट खरी  कि तो देव आहे हे जाणलं पाहिजे आणि तो जिवंत देव आहे आणि तो कार्यान्वित आहे . तो तुमच्यावर प्रेम हि करतो आणि तो तुम्हाला सन्मार्गाला हि लावतो . पण सगळ्यात मोठी गोष्ट देवा बद्दल जाणायची आहे ती म्हणजे आज तो आतुर आहे कि तुम्ही त्याच्या साम्राज्यात यावं . कृष्णांनी जे सहा हजार वर्षा पूर्वी म्हंटल होत कि “योग क्षेम वाहामयं “, ते आज सिद्ध करायची वेळ आलेली आहे . आणि सहजयोग जो आहे तो सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला योग . 

योग झाल्या शिवाय ,आत्म्याचा बोध झाल्या शिवाय जे काही अब्सुलूट आहे म्हणजे जे काही प्रमाणित आहे ,जे खर प्रमाणित आहे ते तुम्हाला कस कळणार ?. कारण अंधारात बसल्या वरती सापाला आपण दोरी समजत होतो ,दोरीला साप समजत होतो . पण जेव्हा प्रकाश त्या आत्म्याचा येतो तेव्हाच माणूस बघतो कि खरं आणि सत्य काय आहे ते . हि किमया आपल्या मध्ये घडू शकते ,आपल्या नगर जिल्ह्या मध्ये हे कार्य मी आज बारा वर्ष झाली करते आहे आणि आज बारा वर्ष त्याची पूर्ण झाली आहेत . बारा वर्षांपासून हि मेहनत नगर जिल्ह्यात आहे . आश्चर्याची गोष्ट आहे कि या नगर जिल्ह्यात माझं इतकं प्राबल्य वाढलं ह्या सहजयोगाचं याच मला फार आश्चर्य वाटलं . कारण नगर जिल्हा हे माझं माहेरघर आहे . मी शालिवाहनाच्या वंशजातील आहे . आणि ह्या माझ्या माहेरघरी इतकं कार्य व्हावं हि म्हणजे खरोखरी देवाची काहीतरी विशेष योजना दिसते . कि मी ह्या तुमच्या तालुक्यात यावं जिथे आमचे बाप दादे ज्यांनी हजारो वर्षे इथे राज्य केलं , म्हणजे ज्या वेळी कृष्णाचं महाभारत व्हावं तेव्हा पण शालिवाहनांनी त्यांना मदत केली असं लिहिलेलं आहे . म्हणजे हजारो वर्षांपासून ते तुमच्या महाराष्ट्रात आले जरी राजपूत होते सुरवातीचे ,तरी महाराष्ट्रात येऊन राहिले . आणि त्यांच्यातलंच माझ्यात रक्त आहे आणि ह्या महाराष्ट्रात ह्या नगर जिल्ह्यतच ह्या सहजयोगाचा एव्हडा मोठा प्रसार व्हावा हि म्हणजे देवाची कृपा नाहीतर काय म्हणायचं . म्हणजे तुम्ही लोक काहीतरी विशेष असल्या शिवाय असं होईल का . नाथाची भूमी ,नाथांची मेहनत हि काय वाया जाणार आहे का ?. जरी तुम्ही त्यांना किती छळलं असेल किती त्रास दिला असेल ,काही असलं तरी ते तुमच्या वरती कृपाच धरणार ,त्यांचा  तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे . आणि एक ना एक दिवस तुम्ही त्याना स्वीकाराल अशी पूर्ण त्यांना आशा आहे त्या मुळेच त्यांचं केलेलं कार्य  काही वाया जाणार नाही . ह्या पृथ्वी वर सगळ्यात उत्तम भूमी या नगर जिल्ह्याची आहे . कारण असे संतसाधु इथे जे साक्षात देवाचे अंश स्वरूप होते त्यांनी इथे जन्म घेतला तेव्हा तुम्ही लोक किती भाग्यवान असाल ते मला सांगता येत नाही . 

पण भाग्याची आणखीन गोष्ट हि कि ह्या वेळी ,ह्या वशेष वेळेला आपला जन्म झालेला आहे आणि याच वेळेला हे कार्य होत आहे , तेव्हा मनुष्य देवता स्वरूप होणार आहे ,देवाच्या स्तीती ला पोहोचणार  आहे . त्याच्या आत्मा हा सत्चिदानंद स्वरूप  होऊन त्याच्या चित्तात जाऊन त्याला त्याच्या आनंदाची अनुभूती देईल जी देवांनी सांगितलेली आहे . म्हणजे सत्य काय , जे प्रामाणिक सत्य ,सतचित आनंद ,अब्सुलूट सत्य म्हणतात ,ते सत्य तुम्ही ओळखाल . आता एखादा मनुष्य म्हणेल कि  बाबा हि स्वयंभू जागा आहे कि नाही ,इथे खरच देव आहे कि नाही हे कस ओळखायचं ? हा माणूस खोटा कि खरा ,हा साधू आणि हा जेल मधून आला आहे आणि भगवे कपडे घातले नि लागले त्याच्या पाठीमागे ,एका बाईच्या अंगात भूत आलं संचार झाला म्हणे देवीचा लागले पाठीमागे ,अहो ते भूत आहे कसला संचार आणि कसलं काय . वेडेपणाच लक्षण आहे हे . ज्या बाईमध्ये देवी असेल तिच्यात काही पावित्र्य नको ,काही तेजस्विता नको  का ?. कहीतरी अद्वितीय व्यक्ती असली पाहिजे ना ती . देवी काय अशा मोलकरणीच्या अंगात येणार आहे का ?. तिला अक्कल आहे देवीला . पण तुम्हाला पाहिजे ,तुम्ही त्या भुतांच्या पाया वरती जाता . त्याचे त्रास होतात आजार होतात ,आता परवाच एका घराण्यात झालं .मोठं घराणं प्रसिध्द आहे . ते लोक सहजयोगात आधी आले होते आणि त्याचा  कडचा एक मनुष्य वारला . आणि त्यांनी सहजयोग सोडला . मी म्हंटल शक्य नाही ,सहजयोगात असं होणं शक्य नाही . अशक्य . साहजयोगातला एक माणूस जर गाडीत असेल आणि त्याला अपघात झाला तर सगळेच्या सगळे बचावतील . अशी अनेक हजारो उदाहरण आहेत . मग कळलं कि त्यांच्या घराण्या मध्ये तो माणूस जो मेला तो आणि एक बाई त्यांच्या मध्ये वाईट अशी किंवा दुष्ट असे संबंध होते . हे कळलं कस ?तो माणूस तर मेला पण ती बाई जेव्हा माझ्या समोर अली तेव्हा लटलट अशी कापायला लागली ,सगळं अंग कापायला लागलं . ती माझ्या पायावर आल्या बरोबर नुसते आगीचे लोट च्या लोट माझ्या पायावर यायला लागले . आणि डोकं तीच इतक्या जोरात हलायला लागलं कि भूकंप होतोय कि काय असं वाटायला लागलं . मी म्हंटल हे बघा हे सहजयोगी आहेत हे सांगतील . तेव्हा कोण खर आणि खोट हे हि ओळखायची क्षमता आपल्यामध्ये येते . नाहीतर कुणीही बाबाजी आला कि झालं ,तो कुठून आला ,तो कोण ,खरा कि खोटा हे सगळं तुम्ही बुध्दीने जाणू शकणार नाही . आत्म्यानी ओळखायचं असत . आत्माच आपल्याला सांगू शकतो कोण खरा आणि कोण खोटा ते . त्यामुळे तुमचा आत्मा जागृत झालाच पाहिजे . कितीतरी असे भामटे हे तुमच्या महाराष्ट्रात आणि नगर जिल्यात आहेत . मी बघतच असते . आता परवाच म्हणे मी नाशकाला होते तर पालखी अली होती निवृत्ती नाथांची . सगळे भामटे रस्त्यानी चालले होते ,मोठी मोठी अशी वस्त्र घालून सगळी . सगळे भामटे आहेत इथून तिथवर मी सांगते तुम्हाला . आणि ते साधूबाबा मोठे घोडे ,हत्ती घेऊन आले म्हणून तुमच्यावर त्यांचं इम्प्रेशन पडलं ,म्हणजे तुम्ही बुध्दी कुठे ठेवली आहे ?. बुध्दीने विचार करू नका . देव जो असतो त्याचा योग फक्त असतो ,तो तुमच्या कडून पैसे घेणार नाही .    

तुकारामांचं उदाहरण बघा ,अहो शिवाजी महाराज ते स्वतः साक्षत्कारी केव्हढे मोठे होते , स्वतः शिवाजी नि येऊन त्यांच्या बायकोला दागिने दिले , नको ते आपल्याला ,सगळं परत केलं तुकारामांनी . गरिबी होती ,दशा होती   तरीही सगळं परत केलं . तुकारामांचं एव्हडं मोठं उदाहरण असताना सुध्दा ,जो माणूस तुमच्या कडून पैसे  काढतो त्या माणसाला तुम्ही देव कस मानता ?. दुसरी गोष्ट म्हणजे  मी खेडेगावात गेले आणि म्हंटल माताजी पैसे वैगेरे काही घेत नाहीत , ते म्हणाले बर दहा पैसे नाहीतर पंचवीस पैसे तरी घ्या . त्यांना हे समजतच नाही कि देवाला पैसे समजतच नाही . अहो मला पैसे समजतच नाहीत तुम्हाला आश्चर्य वाटेल . मी जर बँकेत गेले तर दुसऱ्यांना सांगते तुम्ही चेक लिहा . लाखो रुपयाचे चेक माझ्या हातून लिहिले गेले असतील ,पण मला चेक स्वतःला लिहिता येत नाही तस फार डोकं आहे . बाकी धर्म शास्रात फार हुशार आहे पण अर्थ शास्त्रात काही समजत नाही मला . आणि जर कुणी मला म्हणाल कि शिकून घ्या आता तर मला रडायला येत मला कि हे आता कुठून काय शिकायचं . पण मला कधीही कशाचा प्रश्न येत नाही . पण जर देवच पाठीमागे आहे  तर काय कोण आपल्याला बिघडवणार आहे . तो आपलं सगळं करणारा आहे तर आपल्याला कशाची ददादा नाही . आता तुम्ही म्हणाल माताजी तुम्ही संन्यासी नाही काही नाही ,आतून सगळं सुटलेलं आहे ,पकडलेलंच नाही तर सुटायचा काय ? . आम्ही कोणतीच गोष्ट पकडून ठेवलेली नाही तर सोडायची काय हो . काय सोडायचं जर धरलंच नाही तर सोडायचं काय . सरळ प्रश्न हा आहे . आता अत्यंत श्रीमंत वडील होते ,राजघराण्यातील लोक होती . सासरी सुध्दा श्रीमंत लोक आता आमचं राजमहाला सारखं घर आहे लंडनला . पण तुम्ही जर म्हणालात ,मला आरामात झोप लागते ,कितीही कोणी बँड वाजवूदेत .मी झोपले म्हणजे झोपले  आणि जरजागायचं म्हंटल तर चार दिवस जागून काढेन मला काही व्हायचं नाही . आता ६२ वर्षाचं माझं वय आहे अजून मी सगळी कडे फिरते आहे ,दुसरा जर कोणी आला तर दोन दिवसात आजारी पडेल . कारण काय तर देव बरोबर आहे . त्याची शक्ती आहे मग ती अव्याहत चालू आहे ,अखंड चालू आहे . ती काही संपत नाही उलट जितकी ती द्यावी तितकी ती वाढत जाते . जितकी तिची प्रशंसा करावी तितकी ती तुम्हाला प्रशंसित करते . कि काय कमालीची वस्तू आहे ,ती सर्वानी मिळवून घ्यावी ,सगळ्यांना मिळावं ते कारण ते तुमचं आहे तुमच्या जवळ आहे ,जे तुझं आहे ते तुझं पाशी ते द्यायला मी आलेली आहे . ते घ्यावं तुम्ही . आमचं देणंघेणं काहीही लागत नाही ,आईला कसलं देणंघेणं लागत . तुम्हाला पण आया आहेत ,आईला असं वाटत जेव्हड माझं आहे तेव्हड सगळं वाटून टाकावं . कधी घेतील सगळं अगदी ती उतावीळ झालेली असते द्यायला . जेव्हडी शक्ती माझ्याजवळ आहे ती सगळी तुम्ही घेतलीत तर झालं आम्ही सुटलो . पण ती मिळवून घ्या ,नुसती प्रेमाची शक्ती . दुसरं काही नाही . 

याने कँसर सारखे रोग बरे होतात ,वाट्टेल ते रोग याने बरे होतात . असे असे रोग बरे झालेत कि आश्चर्य वाटत मला . ह्यांनी सगळ्या तऱ्हेची व्यसन सुटतात ,माणूस समर्थ होतो . सम  अर्थ म्हणजे तुम्ही जो आत्मा आहे त्या अर्थाला जागता . तुम्ही समर्थ होता . तुमचा स्वार्थ हा शब्द सुध्दा साधूसंन्याशांनी फार सुंदर मांडला आहे . स्वचा अर्थ म्हणजे स्वार्थ . जो आपल्याला शिवाजी महाराजांनी सांगितलेला आहे ,कि स्वधर्म ओळखावा . काय आहे तो स्व धर्म त्याच तंत्र जाणणे म्हणजे स्वधर्म ओळखणे आहे . स्वतंत्र म्हणजे राजकीय स्वतंत्र  नाही .असं  स्वतंत्र होऊन  काही फायदा विशेष झालेला दिसत नाही . आम्ही जेल मध्ये गेलो आणि मर खाल्लेला आहे इंग्रजांचा पण काही विशेष सुखाचं काही वाटलं नाही . पण आता काहीतरी स्व च तंत्र आपण ओळखलं पाहिजे . स्व म्हणजे आपला आत्मा आहे . त्याच तंत्र जेव्हा आपल्याला कळलं मग बघा सगळ्या पाश्चिमात्य देशातून ,सगळी कडून लोक म्हणतील हि जी भूमी सस्यश्यामला म्हंटल तिला ,वंदेमातरम म्हंटल तिला हि खरीच तशी भूमी आहे , पण अजून चिखलामध्ये कमळ अजून लपलेले आहेत ,दडलेले आहेत ते वर त्यांचं उत्थान होऊन त्यांची फुल एकदा उमलली कि म्हणजे त्याचा सुगंध चारीकडे दरवळला कि झालं . आणि ते होणार त्यामुळे तुमचे मानसिक विकार , शारीरिक विकार जी काही तुमची इतर अडचणी आहेत म्हणजे लक्ष्मी तत्व जागृत झाल्यावर पैशाचा पण प्रॉब्लेम निघून जातो . इतके वेगवेगळे आशीर्वाद आहेत ते मी तुम्हाला एका लेक्चर मध्ये सांगितले आहेत . अशी माझी हजारो भाषण मराठीत आहेत , तेव्हा सांगायचं असं कि जे आहे सत्य ते आम्ही जाणू हि भावना ठेऊन आणि जे असत्य आहे ते आम्हाला नको कारण आत्म्याला  असत्य चालत नाही असं म्हणून आता जर तुम्ही ते मिळवायची इच्छा करून जर का बसलात तर तुम्हाला सगळ्यांना योग मिळू शकतो . 

आपण सर्वानी एव्हड्या मानानी मला बोलावलं इथे आणि अगदी शांत पणे सगळं ऐकून घेतलं हे बघून मला खूप आनंद झाला आहे . परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो आणि जी परमेश्वराची किमया आहे ती तुमच्या बाबतीत घडो हीच इच्छा . काही प्रश्न असतील तर विचारा नाहीतर आपण योगाची क्रिया करूयात . 

प्रश्न -माताजी हि जी सात चक्र आहेत त्या विषयी थोडक्यात माहिती सागा . बर ,छान प्रश्न विचारला यांनी ,अगदी मूलभूत प्रश्न विचारला गुरुजींनी . 

प्रश्न -हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं सगळं ते आम्ही तुमचं शांतपणे ऐकून घेतलं हे सगळं फक्त शाब्दिक आहे कि याच प्रॅक्टिकल क्रिया पण आहे ?. बरोबर विचारलं तुम्ही ,अगदी १००टक्के प्रॅक्टिकल क्रिया आहे , असच तुम्ही विचारलं पाहिजे ठासून . 

आता पहिला प्रश्न जो आहे तो आहे सात चक्रांवर . आता हि सात चक्र इथं दाखवली आहेत हे सगळं समजून घ्या . हे यंत्र आपल्या सगळ्यामध्ये आहे . आणि हे यंत्र कस जागृत होत आणि यामध्ये कशा शक्त्य येतात ते मी तुम्हाला सांगते . आता ह्या चार्ट वर बघितलं तर कुंडलिनी हि त्रिकोणाकर अस्थी मध्ये ज्याला आपण माकड हाड म्हणतो त्यामध्ये बसलेली आहे . हिला मूलाधार म्हणतात ,मूलाधार म्हणजे मुळाचा जो आधार ,म्हणजे आपल्यामध्ये जे मूळ आहे त्याचा आधार ,त्याचा स्थान ते आहे . हि गौरी आहे . जिचं लग्न शिवाशी झालं आहे पण ती अजून कुमार अवस्थेत बसली आहे . आणि तिने गणपती करून आपल्या बाहेर असा ठेवला आहे . स्वतःच्या लज्जा रक्षणार्थ . तो जो गणपती आहे तो कुंडलिनीच्या खाली बसला आहे . आणि तोच तिथून कळवतो कुंडलिनीला कि हा माणूस कसा आहे . जेव्हा कुंडलिनीच जागरण व्हायला सुरवात होते तेव्हा ,त्याच्या परवानगीशिवाय कुंडलिनी उठणार नाही . त्यांनी सांगितल्यावर कुंडलिनी उठते आणि प्रत्येक चक्रावर त्याचा आशीर्वाद होत शेवटी ब्रम्हरंध्रावर जाऊन त्याचा आशीर्वाद झाला पाहिजे , तेव्हा ती कुंडलिनी बरोबर चालते . ते ओंकार स्वरूप श्री गणेश हे पृथ्वी तत्वाचे बनले आहेत . आणि मूलाधार चक्र सुध्दा हे पृथ्वी तत्वाचं बनलेलं आहे . मूलाधार चक्र आणि मूलाधार यात फरक आहे ,चक्र बाहेर आहे आणि मूलाधार वर आहे . त्याच्या वरती चक्र आहे त्याला आम्ही नाभी चक्र असे म्हणतो . हे खर दुसरं चक्र आहे पण समजण्यासाठी म्हणून तिसरं चक्र म्हणतात . कारण असं आहे कि यातून एक चक्र निघालं ते स्वाधिष्ठान चक्र आहे , यावर श्री ब्रम्हा बसले आहेत . आणि हे चक्र चारीकडे असं पोटावर फिरत कधी वर कधी खाली आणि म्हणून स्वाधिष्ठान चक्राला दुसरं चक्र म्हणतात . तिसरं चक्र हे नाभी चक्र आहे यावर लक्ष्मी नारायण बसले आहेत . हे स्वाधिष्ठान चक्र जे चारीकडे फिरत आणि लक्ष्मीतत्व ज्या चक्रात आहे असं नाभी चक्र याच्या मधली जी जागा आहे ते गुरूच तत्व आहे . आणि इथे दहा गुरु जे झालेले आहेत म्हणजे आपल्याकडे अनेकदा या दहा गुरूंनी जन्म घेतला आहे ते गुरुतत्व आहे . हा धर्म आहे . . गुरूंनी काय केलाय तर आपल्या मध्ये धर्माची स्थापना केली आहे . ज्यांनी आपल्या मध्ये संतुलन येईल . पण त्याच्या नंतर मग वरती जे आहे ते हृदय चक्र म्हणतात ते बरोबर इथे मध्ये जे हाड आहे त्याच्या मध्ये आहे . हे चक्र त्याच्यावरती जगदंबेच स्थान आहे . ती तिथे बसून ज्या साधुसंतांनी या भावसागरा तुन वर निघायचा प्रयत्न केला त्याची मदत करते त्यांचं रक्षण करते . हे खराब झालं म्हणजे माणसामध्ये भीती ,भय अशा गोष्टी होतात . याच्यावर जे आहे ते विशुद्धी चक्र आहे ,हे कंठावरती विशुध्दी चक्र आहे , ते श्री कृष्णाचं चक्र आहे . या ह्रदय चक्राच्या उजव्या बाजूला श्रीरामाचे चक्र आहे आणि डाव्या बाजूला शिवतत्व आहे म्हणजे तुमचा आत्मा आहे . त्याच्यावरती विशुद्धी चक्र आहे हे कृष्णाचं स्थान आहे आणि त्याची शक्ती राधा आहे .उजवीकडे विठ्ठल आहे आणि डावीकडे विष्णुमाया आहे . त्याच्या वर हे महाविष्णूचं स्थान आहे ,या महाविष्णूच्या स्थाना मध्ये दोन्ही अहंकार आणि आपलं मन अशी जी आपल्यामध्ये संस्था आहे त्याच्यावर ते बसलेलं आहे . आणि ते जेव्हा उघडत तेव्हा आपल्यातील जी पूर्वजन्माची कर्म वैगेरे आहेत ते ते खाऊन घेत . किंवा आपण जी पापकर्म केलेली आहेत ती . किंवा आपल्याला ज्या शंका कुशंका असतील त्या ते सगळं ओढून घेतल्या मुळे ,शोषून घेतल्या मुळे त्या दोन्ही संस्था खाली आल्या बरोबर आपली हि टाळू उघडते . आणि मग ब्रम्हरंध्रातून बाहेर कुंडलिनी निघते . तर ज्या ब्रम्हरंध्राच्या खाली जी पोकळी आहे त्याला लिम्बिक एरिया म्हणतात ते सहस्रार आहे . जर आपण ब्रेन ला कापल तर असं दिसत जस हजार अशा कमळाच्या पाकळ्या आहेत . आणि जेव्हा तुम्ही सहस्रार बघू शकाल तेव्हा तुम्हाला दिसेल कि हजार पाकळ्या जशा काही जोती असाव्यात . सुंदर जोती अनेक रंगाच्या जोती . त्या सगळ्या अशा हळू हळू अशा उमलायला लागलेत . त्या खर तर ज्वाला सारख्या आहेत पण शांत ज्वाला आहेत .. अशा त्या पाकळ्या उघडताना दिसतात . तर हि चक्र सुध्दा तुम्ही नंतर बघू शकता आणि जाणू  शकता . पण आधी तुम्ही जेव्हा हे होता तेव्हा  दिसत नाही . जेव्हा तुम्ही प्रकाश नव्हता तेव्हा काय दिसणार तुम्हाला ?तेव्हा आधी प्रकाश झालं पाहिजे . हे मुख्य आहे . तेव्हा बोलाचाच भात बोलाचीच कढी असं नाही आहे ,तेव्हा हे होणार . आणि हे सगळ्यांनी करून घ्यायचं . हि मागणी केली आहे याचा मला फार आनंद झाला आहे . हि मागणी सगळ्यात उत्तम आहे . कि हे झालं पाहिजे . हे घटीत झालं पाहिजे . पुष्कळ केली भक्ती आता देवा दे ते . सूरदासांनी संबंध सुरसागर लिहिल्यावर म्हंटल श्री कृष्णाला , “सूरदास कि सभी अविद्या दूर करो नंदलाला “,कंटाळले ते . हि स्तिती . 

तेव्हा आता चक्रांवर थोडं मी सांगितलेलं आहे . आता आधी तुम्ही आपल्यातला दिवा पेटवून घ्या . सहजयोग आजचा जो आहे तो अशा पद्धतीचा आहे . कि आधी तुमचा दिवा पेटवतो आम्ही ,काहीका असेना का ,कसही करून आधी दिवा पेटवून घ्या . एकदा दिवा पेटला कि धुक धुक अंधारात म्हणा किंवा धुकधुक प्रकाशात म्हणा जे काही तुम्हाला आपल्यातलं वाईट दिसतंय ते तुम्हीच काढणार . मला सांगायला नको तुम्हीच तुमचे गुरु होता . ते बर आहे . म्हणजे भांडंणको ,काही सांगायला नको ,तुम्हाला तुमचं दिसतंय तुम्हीच काढा मग . तेव्हा तो आत्म्याचा प्रकाश जर का तुमच्यात आला तुम्ही सगळं हळूहळू बघू लागता आणि समजता ,हो हे आहे ना ,हे चुकतंय ,हे बरोबर आहे . मग दुसऱ्याचं पण कळू लागत कि दुसऱ्यांना काय झालं ते ,कारण तुम्ही सामूहिक चेतनेत येता म्हणजे जागृत होता . हे काय भाषण नाही , होत ,तुमच्या नसांमध्ये हि जाणीव येते . बोध होतो ,विद होत . विद  होत असं वेदामध्ये लिहिलेलं आहे ,विद होणे  म्हणजे तुमच्या नसांमध्ये जाणवलं पाहिजे . तुमच्या नसामधून आत्मा वाहायला पाहिजे तेव्हा ते विद झालं . आणि सर्वव्यापी ह्या ज्या चैतन्यलहरी आहेत , हि जी सगळीकडे पसरलेली ऋतुंभरा प्रज्ञा आहे ती हाताला जाणवते . हा अनुभव येतो आणि डोक्यातून हि गारगार असं थंडथंङ वाऱ्यासारखं असं यायला लागत . तेच आपल्याला आदिशंकराचार्यानी सांगितलं आहे त्याला सलीलामसलीलाम म्हणतात  त्याला . थंडथंङ असं डोक्यातून गारगार असं येत . आता हि क्रिया फार लवकर तुम्हा सगळ्यांना होईल असं मला वाटतंय . तेव्हा दोनचार गोष्टी मी सांगते तेव्हड्या ऐकायच्या तेव्हा ,

सर्व प्रथम तुम्ही आपले चष्मे काढून ठेवा . नंतर आपल्या टोप्या हि काढून ठेवा ,आई कडे टोप्या नाही घातल्या तरी चालतात . बायकांचे पदर बिदर ठीक आहेत . पण जर गंडे दोरे असतील तर पहिल्यांदा काढून ठेवा . आणि गंडे मुळीच विकत घेऊ नका अहो दोन पैशाचा तो दोरा असतो ते भामटे तुम्हाला दोन रुपयाला विकतात . कशाला तुम्ही घेता ते . काही अर्थ नाही त्या गंड्याला विश्वास ठेवा माझ्यावर . आणि अगदी शांत राहा . आता अगदी साधी गोष्ट आहे हि क्रिया जस सूर्याचा प्रकाश येतो त्या प्रमाणे घटित होते . फक्त मी असं म्हणेन डावा हात हि तुमची इच्छा शक्ती आहे तो माझ्याकडे असा सरळ करा . गणेशाचं नाव घ्यायचं ,कोणत्याही शुभ कार्याची सुरवात गणेशानी करायची ,आणि ह्या तुमच्या पुण्य भूमीला नमस्कार करून उजवा हात त्या पुण्य भूमीवर ठेवायचा . जी मंडळी वर बसलेली आहेत त्यांनी फक्त असा जमिनीकडे हात करायचा . त्याच्या नंतर मी सांगेन उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आकाशाकडे करायचा . डोळे उघडायचे नाहीत ,डोळे बंद केले ते केले . डोळे जर मिटले नाहीत तर कुंडलिनीच जागरण होत नाही ती आज्ञा चक्रावर अडकते तेव्हा डोळे हे मिटले पाहिजेत . आणि मी म्हणेन तेव्हा डोळे उघडायचे . हा अंतरयोग आहे म्हणून डोळे मिटलेले पाहिजेत . चित्त आपोआप आत ओढलं जाईल . तुम्ही चित्ताशी भांडायचं नाही ,काहीही आपल्या मनाशी झगडा करायचा नाही , फक्त लक्ष तुमचं टाळूमधे असलं पाहिजे . आणि कार्य होणार या बद्दल मला शन्का नाही . इथून तिथून सर्व लोकांना हि घटना प्राप्त होवो हि माझी सदिच्छा आहे . आपोआप हि घटना घडेल . सगळे विचार बाहेर ठेवा . मी काहीही पाप ,चूक केलेली नाही असा विचार करायचा ,मी दोषी नाही . हाच विचार करायचा . आता बघा तुमच्या हातातून गारगार वाटायला लागेल . आता एक प्रश्न विचारायचा मनामध्ये हि शक्ती आमच्या कुलस्वामिनीची शक्ती आहे का ?. तुम्ही आणि आमची कुलस्वामिनी एक आहे का ?असा प्रश्न विचारायचा . तीनदा विचारायचा . गार आलं का बघा . येतंय का ? . आता जे खर तेच मी करेन असं म्हणा . आता विचारा परत मनामध्ये श्री माताजी हि प्राणशक्ती आहे का ,हि सरस्वतीची शक्ती आहे का ?. आधी होती ती महाकालीची शक्ती होती आणि आता हि महा सरस्वतीची शक्ती आहे . आता बघा उजव्या हातात येतंय का गार . आता टाळूतून गार येतंय का बघा . उजवा हात आणि डावा हात टाळूवर एकानंतर एक असा धरून बघा . सगळ्यांना क्षमा करून टाका . मी सगळ्यांना क्षमा केली असं सांगायचं सरसकट सगळ्यांना . आता दोन्ही हात आकाशाकडे असं मान वर करून करायचे आणि विचारायचं कि हि परमेश्वरी शक्ती आहे का ,हि ब्रम्हशक्ती आहे का ? . हि परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का मनामध्ये विचारायचं . आता गार येतंय का बघा . आता हात खाली करून बघा गार येतंय का . आता डोळे हळूहळू उघडा ,आणि माझ्याकडे बघा . विचारा शिवाय तुम्ही बघू शकता का मला ते बघा . परत डोळे मिटून घ्या ,टाळूवर लक्ष ठेऊन कि माताजी मला मोक्ष हवा , मला द्यावा कारण तुमच्या परवानगी शिवाय मी काही करू शकत नाही .सात वेळा म्हणा ,दोन्ही हात माझ्याकडे करा . आता शांत वाटतंय ना . मला फार आनंद झाला पुष्कळ लोकांना अनुभूती अली , ज्यांना नाही आली त्त्यांनी सेंटर वर यावं , आणि अनुभूती घ्यावी . सगळं काही ज्ञान घ्यावं . हे सगळं काही अगदी फुकट आहे , इतकं ते अमूल्य आहे . त्याच मूल्य कोणी देऊ शकत नाही . आपण सर्वानी हे पसायदान घेतलं त्या बद्दल मी आपली आभारी आहे .