Shri Mahalakshmi Puja

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Mahalakshmi Puja Date 6th January 1986: Place Sangli Puja Type

आता सांगलीकरांना सांगायचं असं की ते आपण पूर्वी एक पूजा केली होती आणि आता परत केलेली आहे. सांगलीला बरच पेपरमध्ये वगैरे आल्यामुळे बरच काम झालेलं आहे आणि इथे सहजयोग बसूही शकतो. कारण वातावरण फार छान आहे. शांत आहे आणि इथले एकंदर लोक मदत करायला तयार आहेत. थोडी सांगलीकरांना आमच्यातर्फे एक लहानशी भेट देणार आहोत. तर ती भेट त्यांनी स्वीकारावी. अशी माझी विनंती आहे आणखीन एक वस्तू आहे, पण ती अजून बाजारातच रातहिली आहे. ती आल्यावरती देऊ. कोण घेत आहे ? (भेट) (अनुवाद-श्री.तावडे, जे इथले मोठे सहजयोगी आहेत. त्यांनी भेट स्वीकारली.) आता आजच्या पूजनाला खरोखर महत्त्व असं आहे, की आज महालक्ष्मीचं पूजन आहे. आणखीन महालक्ष्मीचं जे महात्म्य आपल्या सहजयोगात आहे, ते कोणत्याच शक्तीचं नाही. कारण महालक्ष्मी ही शक्ती जिला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो, त्यात वास करते आणि त्याने पॅरासिंपथॅटिक नव्व्हस सिस्टीमचं चालन होतं. ह्या महालक्ष्मीला सशक्त करण्यासाठी आपल्या उत्क्रांतीमध्ये ज्या ज्या घटना झाल्या, त्यात मुख्य म्हणजे महालक्ष्मीचं अवतरण आहे. महालक्ष्मीने अनेकदा अवतार घेतले आणि तिचीच एवढी हिंमत आहे, की तिने एक शरीर धारणा करून ह्या संसारात जन्म घेतला आणि कार्य केलेल आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की आपल्याला सर्व ह्या महालक्ष्मीच्या अवतरणाबद्दल कोणी माहिती दिलेली नाही किंवा इतकं गहन कोणाला त्याच्याबद्दल, सविस्तर वर्णनच माहिती नाही. आता महालक्ष्मीचं तत्त्व म्हणजे लक्ष्मीच्या तत्त्वावरचं आहे. म्हणजे लक्ष्मीची आई महालक्ष्मी म्हटलं पाहिजे. लक्ष्मीची आई म्हणजे लक्ष्मी जी आहे, जेव्हा माणसाजवळ लक्ष्मी येते, लक्ष्मीसुद्धा एक संतुलन असलेली, एक स्त्री स्वरूप देवी आहे. इतकी संतुलनात आहे ती की ती एका कमळावर उभी राहते. तिच्या हाता दोन कमळं आहेत. एक गुलाबी कमळ, त्या कमळामध्येसुद्धा एक नाजूकपणा आहे. त्या गुलाबी कमळाचा अर्थ असा आहे, की जो मनुष्य लक्ष्मीपती असेल, ज्याच्याजवळ लक्ष्मी असेल, त्याच्या स्वभावात एक गुलाबीपणा असला पाहिजे. म्हणजे गोडवा असला पाहिजे. तो रखरखीत नसला पाहिजे. दूसरं असं की एका कमळाकडे आपण पाहिलं तर त्या कमळामध्ये एखादा भुंगा जरी आला तरी त्याला स्थान मिळतं. त्याच्यात एवढे काटे असतात त्या भुंग्याला, पण त्यालाही कमळामध्ये स्थान मिळतं. म्हणजे त्याचही आतिथ्य होतं. तेव्हा ज्या मनुष्याजवळ लक्ष्मी असेल, त्याच्याकडे सगळ्यांचं आतिथ्य असायला पाहिजे. मग तो कसाही असेना का? प्रत्येकाची विचारपूस करायला पाहिजे. मग तो लहान असो, मोठा

असो, प्रत्येकाच्या दर्जाप्रमाणे त्याची विचारपूस करायला पाहिजे. तिसरं म्हणजे एका हातामध्ये त्यांच्या, एक हात असा आहे आणि एक हात असा आहे, ह्याचा अर्थ असा, की दान असायला पाहिजे. ज्या माणसाच्या हातात दान नाही तो लक्ष्मीपती नाही आणि दानत ही आहे. दानामध्ये जो आनंद आहे, तो कोणत्याही गोष्टी मिळविण्यात नाही. दान करण्याची शक्ती ज्याने मिळवली तो सगळ्यात महान मनुष्य आहे असं मला वाटतं. कारण त्याने मनुष्याच्या ज्या चरम सीमा आहेत त्या गाठलेल्या आहे. दान देता आलं पाहिजे आणि ते डाव्या हाताने जे दान लक्ष्मी करते तसच जो लक्ष्मीपूत्र असेल त्यानेसुद्धा आपल्या डाव्या हाताने असं दान केलं पाहिजे. म्हणजे डाव्या हाताचं उजव्या हाताला कळलं नाही पाहिजे. डाव्या हाताने म्हणजे सहज. त्याला काही मेहनत करायला नको. सारी इच्छा दानाचीच असायला पाहिजे. खरोखरच जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्यांना एकच, मला तरी वाटतं एकच महत्त्व आहे, की त्या वस्तू आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. त्यात आपलं हृदय ओतू शकतो. त्यात आपलपण दाखवू शकतो. म्हणून प्रत्येक वस्तूला महत्त्व आहे. नाहीतर बाकी वस्तूला काही महत्त्व नाही. स्वयंभू जेवढ्या मूत्त्या आहेत त्यातील महालक्ष्मीची मूर्ती आपण फार मानतो. आपण सहजयोगात. कारण तिच्यामुळे आमची कुंडलिनी जी आहे, तिला उठायला एक मार्ग किंवा नाडी ती प्रस्तुत करते. ही नाडी, महालक्ष्मीची नाडी जी आहे, ती लक्ष्मी तत्त्वाच्या वर जेव्हा हा हात आहे, हा आश्रय. ह्याला दोन अर्थ आहेत. आश्रय, सगळ्यांना आश्रय देणे. सगळ्यांचं रक्षण करणं. त्याने हा हात आहे. पण उलट जर पाहिलं, तर जे लक्ष्मीपती असतात त्यांचावर सगळ्यांना धाकच असतो. भीतीच असते. ती नुसती साधी ते कमळावर उभी असते. आपलं काही विशेष दाखवत नाही. नाहीतर लोकांना मोटारी लागतात, हे लागतं, लागतं दाखवण्यासाठी, की आम्ही म्हणजे फार काही तरी सुसंपन्न आहोत. दुसऱ्यांच्या मानाने फार उच्च आहोत . त्याची इतकी म्हणजे आपलं वजन ती लोकांवरती घालत नाही, कोणत्या तऱ्हेचं प्रेशरायझेशन ज्याला म्हणतात ते करत नाही. ती हलक्या ह्याने उभी राहते. अलगद. तिचा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. लक्ष्मीपती खरा जो असतो, तो कुठेतरी कोपऱ्यात येऊन बसेल. अगदी श्रद्धेने, शांतपणाने बसेल आणि हळूच निघून जाईल. त्याला दान जरी द्यायचं असलं, तरी म्हणेल, ‘माताजी, हे माझं दान आहे, पण माझ नाव सांगायचं नाही. ते असच ठेवा तुम्ही. कसंतरी करून. तुम्ही दिलंय. तुमच्या चरणी दिलं. झालं. आता मला काही पुढे नको.’ ‘अरे बाबा, पण मला सांगायला लागणार. ट्रस्टकडे ते पैसे जाणार. मी पैसे घेत नाही.’ ‘ते तुम्ही कोणाचही नाव सांगा. माझी त्याला हरकत नाही. पण हे मी दिलं तुम्हाला. माझं नाव नको. फक्त तुम्हाला इन्कमटॅक्सचा जर काही प्रॉब्लेम असला तर त्याच्यासाठी मी उभा आहे. पण बाकी तसं माझ नाव नको. काही नको. ‘ अगदी नम्रपणाने हसत असतात. ह्याला म्हणायचं म्हणजे लक्ष्मीपती! पण त्या लक्ष्मीचा हात जो असा वर आहे त्याचा अर्थ असा आहे की लक्ष वर असायला पाहिजे. तेव्हा लक्ष्मीतून जेव्हा मनुष्य लक्ष्मीपती होतो तेव्हा त्याचं लक्ष असं, की झालो बाबा लक्ष्मीपती, पण परमेश्वर

कसा मिळणार मला? जेव्हा ही स्थिती माणसामध्ये येते. जेव्हा संपत्ती, धन मनुष्याला मिळतं, तो अगदी श्रीमंत होतो, तेव्हा त्याच्यातली आतली जी खरी श्रीमंती आहे, ती मिळाली आहे, त्याची जाणीव आली म्हणजे महालक्ष्मीचं तत्त्व सुरू होतं. आणि त्या महालक्ष्मीच्या तत्त्वामध्ये कुंडलिनी जागृत होते आणि ती जागृत झाली, म्हणजे तिला आपण म्हणतो, ‘उदो, उदो अंबे!’ म्हणजे कुंडलिनी तु जागृत हो. महालक्ष्मीच्या देवळात जाऊन म्हणतो. कारण महालक्ष्मीच्याच सूत्रात ती जागृत होऊ शकते आणि मग ती चक्र वरची आहेत त्यांच्यामध्ये भेदून त्यांना आणि वर सहस्रारात महालक्ष्मीच्या सूत्रात जागृत होऊन ही जी नेऊन पूर्ण भेदन करते. आता ह्या महालक्ष्मीचे किती अवतार आपल्याकडे झाले. बघू. सर्वप्रथम जे महालक्ष्मीची तत्त्व आहे, त्याचं गुरूशी फार जवळच नातं आहे. आणि अत्यंत प्रेमाचं आणि पावित्र्याचं. सुरूवातीपासून पाहिलं तर जे जे मोठाले गुरू झाले त्यांची एकतर मुलगी किंवा बहीण ह्या नात्याने तिचा जन्म झालेला आहे. जसं जनकाची मुलगी जी सीता, ही महालक्ष्मी स्वरूप आहे. हे महालक्ष्मीचं तत्त्व आहे. सीता ही महालक्ष्मी आहे आणि जनकाची ती मुलगी होती. नंतर नानकांची जी बहिण नानकी, ही महालक्ष्मी. तिच नातं बहिणीचं होतं. तसच मोहम्मद साहेबांची मुलगी फातिमा. ती महालक्ष्मी होती. त्याच्यानंतर राधा, राधा ही महालक्ष्मी स्वरूप आहे. त्याच्यानंतर मेरी. मेरी ही महालक्ष्मी होती आणि तिचा संबंध पावित्र्याचा होता. इतकी पवित्र होती, की तिच्या पावित्र्याने खिस्ताला जन्म दिला. अत्यंत पवित्र स्वरूप अशी ती कन्या होती आणि कन्यास्वरूपिणी असल्यामुळे, तिच्या शुद्धतेमुळे, तिला ख्रिस्तासारखा शुद्ध मुलगा झाला. तर तीसुद्धा महालक्ष्मी अशा महालक्ष्मीच्या अवतारांनी आपल्यातले जे वरचे चक्र आहेत ते बांधले गेले आहेत. म्हणजे रामाच चक्र राईट साईडला हार्टला असतं. इथे ती सीता स्वरूप आहे. इथे राधास्वरूप आहे. इथे मेरीस्वरूप आहे. पुढे जाऊन ह्या ठिकाणी तिनही शक्ती मिळतात, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तीनही शक्त्या मिळतात. आणि तीनही शक्त्या मिळाल्यामुळे एकच शक्ती जी आदिशक्ती तयार होते. म्हणून सहस्रारात आदिशक्ती एकच असते. पण अस म्हटलेलं आहे, की सहस्रारे महामाया. आदिशक्ती आहे, पण ती महामाया आहे. म्हणून ही ह्य्या तिनही शक्त्यांचा प्रादूर्भाव झाला तो असा, की त्यामुळे एक महामाया स्वरूप आदिशक्ती संसारात येते आणि ती सर्वांचं सहस्रार भेदन करू शकते. आणि ते आता तुमच्यासमोर, माहितीच आहे तुम्हाला काय आहे ते. सांगायला नको. तर अशा रीतीने ह्या महालक्ष्मीतून कशी पुढे आदिशक्ती अवतरीत झाली, तर तिला दोन्ही दोन शक्त्या मिळाल्या. जिच्यामध्ये महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी अशा तीनही शक्त्या समावलेल्या आहेत. आणि ह्या महालक्ष्मी तत्त्वातून जी आपली शुद्ध इच्छा अशी अंबा आहे, ती महाकाली शक्ती आहे खरं म्हणजे. तर तिचं उत्थान होऊ शकतं. ती करू शकते. आदिशक्तीचं महत्त्व आहे. कारण हे ह्या तीन म्हणून शक्त्यांमधून सर्व जरी तयारी झाली पण शेवटी जे कार्य साधायचं आहे त्याला आदिशक्तीच आहे. म्हणजे

तिनही गोष्टींना मिळून हे कार्य साधायचं आहे. ती गोष्ट म्हणजे जरी सहज साध्य असली, आपल्याला अगदी सहज मिळते, पण त्याच्यात तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी पूर्ण मेहनत केली पाहिजे. नाहीतर ते कार्य होऊ शकत नाही. फार कठीण आहे. तेव्हा जर ते आदिशक्तीमुळे झालं असतं तर काही एवढा पसारा करण्याची काही गरजच नव्हती. तुम्हाला त्याच्यात मेहनत करावी लागेल. तुमचं त्याच्यामध्ये सहकार्य पाहिजे. तुम्ही आता स्टेजवर बसले आहात. आम्ही नाही. आमची शक्ती तुम्ही घ्या. वापरा. पण तुम्ही स्टेजवर या, म्हणून तुम्ही पूजनीय आहात. तुम्ही विशेष आहात. आमचं काय ? आमचं जे होतं ते होतं . आदिकाळापासूनचं आहे. ते काही विशेष नाही. पण तुम्ही ते वापरलं पाहिजे. तुम्हाला ते मिळालं पाहिजे. ते तुम्ही हस्तगत केलं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवलं पाहिजे. ही जी आदिशक्तीची खरी इच्छा आहे, ती शुद्ध इच्छा हीच आहे. आणि त्या शुद्ध इच्छेसाठी धडपड चाललेली आहे. त्यात तुम्ही सर्वांनी प्रेम सामावून घेतलं , मिळवून घेतलं, प्रेमाने स्वीकारलं आणि पुढे त्याच्यात प्रगती केली. हे फार म्हणजे आम्हाला केवढ मोठ समाधान आहे आणि त्या समाधानातच सगळे विसरून जाते मी, की मागे किती त्रास उचलावा लागला. अनेक वर्षामध्ये किती त्रास झाला. सीतेला किती त्रास झाला. राधेला किती त्रास झाला. मेरीला किती त्रास झाला. ते सगळे गत विसरून अस वाटतं आता काही नाही. झालं हे विशेष झालं. तर ह्या अवतारामध्ये लक्षात हे ठेवलं पाहिजे, की मनुष्य स्वरूपात महालक्ष्मीचं अवतरण झालेलं आहे. मनुष्य, मानवी स्वरूपात. पण देवीचं, जिला आपण महाकाली म्हणतो, तिचं अवतरण मनुष्य स्वरूपात झालेलं नाही. ते देवीस्वरूपातच होतय. देवीस्वरूपात येणं फार सोप्पय. मनुष्य स्वरूपात येणं फार कठीण काम आहे. आणि झगडणं मानवामध्ये त्याहून कठीण आहे. परत मर्यादा मानवाच्या ठेऊन रहाणं हे त्याहून कठीण आहे. हे सगळे कार्य मनुष्य स्वरूपात येऊन ह्या सगळ्या देवींनी केलं, आणि त्याचा आज फलीभूत होण्याचा जो सुप्रसंग आलेला आहे, ते समोर दिसत आहे. गणपतीपुळे अगदी इथे असं घेण्यासारख एक मोठ, एक फार मोठ कार्य झालेलं आहे. आणि पुढे असच होत राहील. प्रत्येक वर्षी निदान ३ -४ वर्ष तरी परत व्हावं. अशी माझी फार इच्छा आहे. आणि जर असं जमलं तर तुम्हा लोकांनासुद्धा त्याची कल्पना येईल की हे गणपतीपासून जे सुरू केलं , ते येऊन कसं सहस्रारापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचलेलं आहे. सगळं म्हणजे ते अद्वितीय आहे, की शब्दात घालून सांगणसुद्धा कठीण आहे. पण ते सगळ तुम्हाला मिळावं, जे काही आमचं आहे ते तुम्ही घ्यावं, हीच माझी शुद्ध इच्छा आहे. आणि ती कार्यान्वित करता आले म्हणजे मला काहीही नको.