Mahashivaratri Puja

Pune (India)

Feedback
Share

Mahashivaratri Puja 8th March 1986 Date : Place Pune : Type Puja

या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात. पण आपल्या शास्त्रात याला पुण्यपट्टणम असे म्हटलेले आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुणे नगरातून वहात आहे आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे, की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत शिव स्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो मनुष्य आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून, त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठीत असतो. आत्मतत्त्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्त्व, मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्त्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे, आत्मास्वरूप आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचे प्रतिबिंब जे हृदयात आहे, ते जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो. एकमेकांना ओळखत नाही, एकमेव एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते. त्याबद्दल भ्रामकता असते. जाणिवेसाठी ज्याला अॅबसल्यूट म्हणतात, तो आत्माच मिळविला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसानसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विद् म्हटलेले आहे, की विद् झाले पाहिजे. ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसानसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही कितीही म्हटलं की आम्ही जातियता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब-श्रीमंत मिटवून टाकू. म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या, की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू किंवा सर्व जगात एकच साम्राज्य आलं पाहिजे अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते बाह्यातून तुम्ही कितीही साध्य केलं तरी ते निष्फळ होऊन जातं. त्याला कारण ज्यांनी हे बनवलं आहे तो मानव, ती मानव जात अजून त्या स्तराला आलेली नाही जिथे ती विश्वात्मकाला जाणेल. विश्वाचा आत्मा आपल्या हृदयात आहे. त्या आत्म्यात आपण जाणू शकतो की हे सर्व विश्व एका परमेश्वराने बनवलेले आहे आणि आपल्या सर्वांमध्ये त्याच परमेश्वराचा अंश हा आत्मा विराजमान आहे. वरपांगीपणाने कितीही आपण म्हटलं, की आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सगळी भावंड आहोत, तरी ती वरवरची भावना राहील. खोल, आतमध्ये, हृदयात तो आत्मा वसलेला आहे. फक्त आपलं चित्त जेव्हा त्याच्या प्रकाशाने आलोकित होते, तेव्हाच मनुष्य समजतो की खरोखरच आपण एकाच शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत. आज आपण विश्व धर्म स्थापन केला तो फक्त अशाच लोकांच्या आधारावर होऊ शकतो, ज्यांच्यामध्ये विश्वात्मकाचं प्रतिबिंब पडलेलं आहे . बाह्यातल्या लोकांचा कोणताही तुम्ही असा विश्वाचा कार्यक्रम काढला तर तो फलित होणार नाही कारण त्याच्यात काहीसुद्धा सत्य नाही. तर सर्वप्रथम आत्म्याची आपल्यामध्ये जागृती ন

ही पूर्णपणे झाली पाहिजे. तो जागृत आहे. पण त्याची जी जागृत स्थिती आहे ती चित्तात आली पाहिजे. बाह्यातून प्रयत्न करूनही होऊ शकते, असं लोकांचं म्हणणं आहे, पणा मला असं वाटतं की ती आतूनच होते. आतूनच ती आपल्यामध्ये जागृती येऊ शकते. ती म्हणजे कुंडलिनी जागरणाने. कुंडलिनी ही शक्ती आपल्यामध्ये व्यवस्थित सुप्तावस्थेत असते. आणि ज्यावेळेला तिचं जागरण होतं , तेव्हा ही शक्ती, जसा एखादा दीप आपण पाजळून ठेवावा आणि त्याच्यावरती एखादी शक्ती किंवा समजा गॅसची धार आली तर ती कशी पेटून निघते, तसच आपलं चित्त आहे, ते सबंध आलोकित होऊन जातं. पण तो आलोक जोपर्यंत आपल्या व्यवहारात, आपल्या वागण्यात, आपल्या समाजात, आपल्या देशात आणि या विश्वात पसरणार नाही तोपर्यंत सहजयोगी होऊनसुद्धा काही फायद्याचे नाही. जो आलोक तुमच्यामध्ये आला त्याच्यामुळे तुमच्या प्रकृतीला आराम पडला असेल. कदाचित तुमची मानसिक स्थिती ठीक झाली, शारीरिक स्थिती ठीक झाली, सांसारिक स्थिती ठीक झाली, तरीसुद्धा अजून तुम्हाला शिवशक्ती मिळालेली नाही. शिवाची जी शक्ती आहे ती विश्वाला आपण एक मानलं पाहिजे. एक मानणं हे काही बुद्धीने नाही होत, पण ती जाणीव आतून येते की आम्ही सर्व एक आहोत. हे सर्वप्रथम शिवाचं दर्शन म्हणजे तो विश्वात पसरलेला आहे आणि त्याचं कार्य इतकं तोलून आहे, इतकं समजून आहे की तो प्रत्येकाला ओळखून आहे. आता समजा तुम्ही जर इथे दिवा लावला तर या दिव्याला हे समजणार नाही की कोठपर्यंत प्रकाश पोहोचवायचा किंवा कोणत्या गोष्टीला आलोकित करायचं किंवा कोणती अशी जागा आहे जिथे हा प्रकाश गेला पाहिजे, तो विचार हा दिवा करणार नाही. पण आत्म्याचं तसं नाही, एकदा जर तुम्ही आत्मा तेवला तर तो चैतन्य रूपाने तुमच्या हातातून वाहू लागतो आणि त्याच्यामध्ये ही जी आलोकित झालेली बुद्धी आहे ती त्या चैतन्यातून वाहते. ती तुम्हाला बरोबर सांगते की इथे तुमचं चुकत आहे, इथे तुम्ही ठीक चालले आहात, इथे तुम्ही पुढे चला. म्हणजे साऱ्या परमेश्वराची जी बुद्धी आहे ती या आत्म्यातून वाहते. साऱ्या विश्वातलं जे कार्य आहे, परमेश्वर करतो आहे ते तुमच्या हातूनसुद्धा त्याचप्रमाणे तो करवून घेत आहे. म्हणून सर्वप्रथम आत्म्याला प्राप्त झालं पाहिजे, शिवाला प्राप्त झालं पाहिजे. आता बाह्यातून कसं आपण शिवाकडे जाऊ शकतो, ते पाहिलं पाहिजे. शिवत्त्वामुळे सत्य जाणलं जातं, कारण मी सांगितलं की विश्वाची सर्व शक्ती जी आहे ती एका शरीरातून वाहिल्यासारखी आहे, त्यामुळे कुठेही काही होत असलं तरी तुम्ही या शक्तीच्याद्वारे सामूहिक चेतनेत सत्य जाणू शकता. सत्य काय किंवा असत्य काय. हे जे केवळ सत्य आहे, जे अॅबसल्यूट आहे, ते तुम्ही आत्म्यामुळे जाणू शकता. आणि या प्रकाशाचा जो विशेष आहे की जेव्हा हा प्रकाश आपल्या हृदयात येतो तेव्हा मनुष्य आनंदात रमण करू लागतो. आनंदाच्या उमी गुण त्याच्या अंगात उठू लागतात. त्याच्या बुद्धीत, त्याच्या वागण्यात, सर्व गोष्टींमध्ये एक चमक येते. एक विशेष मोहीत करणारं, उच्च पदाला नेणारं असं एक व्यक्तित्व त्याच्यात जागृत होतं. अशा मानवाजवळ जो मनुष्य येईल त्याचा उद्धार होतो, त्याचं कल्याण होतं. तो सन्मार्गाला लागतो. उत्तम मार्गाला तो येतो आपोआपच हे घटित होतं. त्या संगतीतच हे सगळे घडून येतं, पण त्याही पलीकडे असा मनुष्य नेहमी आनंदात मग्न असतो. आनंदाला दोन बाजू नसतात, फक्त केवळ आनंद असतो, त्याला आपण निरानंद म्हणतो.

केवळ आनंद म्हणजे त्याच्यामध्ये आणि दु:ख अशा एका नाण्याची दोन बाजू किंवा दोन स्थिती सुख नसतात. मनुष्य एकमेव स्थितीत असतो आणि ती एकमेव स्थिती म्हणजे आनंद स्थिती आहे. यात तो साक्षी स्वरूप होऊन सुख आणि दुःखाच्या लाटांना बघत असतो. जसा काही नावेवर बसला आहे आणि समुद्राच्या कितीही लाटा आल्या तरी त्यांना तो मजेत न्याहाळून राहिला आहे. ती स्थिती, त्या न्याहाळण्याची स्थिती, ती स्थिती तुमच्यात प्राप्त झाली म्हणजे ह्या आनंदाच्या उमी, आनंदाचं सौख्य आणि आनंदाचं राज्य काय आहे ते लक्षात येतं. पण ते मिळूनसुद्धा आनंद परिपूर्ण होत नाही. कारण जो या आत्म्याचा स्रोत आहे तो विश्वाचा आत्मा आहे. म्हणून जोपर्यंत हा आनंद विश्वाच्या प्रत्येक सीमेवर नेऊन पोहोचवत नाही, तोपर्यंत आपण आनंदात पूर्णपणे येऊ शकत नाही. म्हणजे एखादं समजा, समुद्रामध्ये फूल पडलं. तर ते वहात वहात या किनाऱ्यावर जाईल, त्या किनाऱ्यावर जाईल, मग त्याची हीच गती होऊन जाते. त्यातच त्याला आनंद वाटतो, तसेच एकदा परमेश्वराच्या साम्राज्यात उतरला की त्याला वाटतं कोणाच्या हृदयाला जाऊन भिडावं कोणाला जाऊन मनुष्य सांगावं, कोणाला भेटावं कोणत्या देशात जावं आणि ही सुवार्ता सांगायची की तुम्ही सुद्धा आपल्या आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हा. म्हणून विश्वस्वरूपत्व आल्याशिवाय आम्ही आत्मसाक्षात्कारी झालो, असं म्हणता येत नाही. जे लोक स्वत:ला सहजयोगी म्हणतात ते अजूनसुद्धा जाती-पाती, नसत्या गोष्टींना धरून बसतात. आमच्या जातीतच लग्न झालं पाहिजे. आमची जात, आमचं हे, आमचं ते, या मर्यादेतून निघालं पाहिजे. आमचा देश, आम्ही हिंदुस्थानी, आम्ही इंग्लिश, आम्ही अमेरिकन, आम्ही तुमच्यापेक्षा उच्च, तुम्ही आमच्यापेक्षा नीच, आम्ही उत्तरेत राहणारे, तुम्ही दक्षिणेत राहणारे, पूर्व, पश्चिम या सर्व दिशा मानवाने ठरविल्या आहेत. परमेश्वराने काही बनविल्या नाहीत. त्याने काही या सृष्टीमध्ये वेगळेवेगळे देश वरगैरे काही बनविले नाही, पण वैविध्य आणण्यासाठी इतकी सुंदर सृष्टी केली. पण माणसाचं डोकं प्रत्येक ठिकाणी हे शोधत असतं की आता आपण आपल्याला कसं वेगळं करून घ्यायचं, अलगद कसं करून घ्यायचं. तर आता मग पुणेकर झाले, मग मुंबईकर झाले, मग त्यातल्या त्यात पुणेकर म्हणजे सदाशिव पेठवाले झाले. मग त्यातले आणखीनही आतमध्ये गेले तर आणखीन कोणत्या विहिरीत जाऊन बसतील देवाला ठाऊक! पण सहजयोग्यांनी विहिरीत नाही गेलं पाहिजे, सरोवरामध्ये फुलासारखं फुललं पाहिजे. जो सहजयोगी अजूनसुद्धा अशा विहिरीत आहे त्याने लक्षात घेतलं पाहिजे की तो अजूनपर्यंत सहजयोगात पूर्णपणे उतरलेला नाही. तर सर्वप्रथम आपल्यामध्ये विश्वाचं जे स्वरूप आहे ते मान्य केलं पाहिजे. तरच आपण शिवतत्त्वाला उतरलो आहोत. हे कसं आपण बाह्यातून मिळवू शकतो ते आपण ध्यानधारणेत समजावं. जेव्हा आपण ध्यान करतो ध्यानाच्या वेळी, लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे, दुसऱ्यांकडे नाही. स्वत:कडे लक्ष देऊन बघायचं की आता कसले विचार आपल्या डोक्यात येत आहेत. माझ्या डोक्यामध्ये कोणकोणत्या धारणा मी करून ठेवलेल्या आहेत. त्या बघितल्या पाहिजेत. एकतर मी अमका आहे, मी तमका आहे, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या धर्माचा, त्या कर्माचा, प्रत्येकजण आपल्याला अती शहाणा समजतो. त्यात मी आहे का? मी त्याच्यामध्ये सामील आहे का? मी कोणत्या तरी एखाद्या ग्रुपचा किंवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या लहानशा गल्लीतला

एक नागरिक आहे का? की मी परमेश्वराच्या साम्राज्यातला नागरिक आहे ! स्वत:कडे आपण जेव्हा लक्ष देतो ध्यानामध्ये, कारण आपला संबंध आता आत्म्याशी झाला आहे, तसाच हा प्रश्न तुम्ही स्वत:ला टाकाल. लगेच आत्म्याचा झोतच्या झोत तुमच्यासमोर येऊन उभा राहील आणि आश्चर्य वाटेल की नाही बुवा, आपण विश्वातले एक आहोत. एखाद्या लहानशा थेंबाने एका मोठ्या महासागरात मिसळावं आणि आनंदात रमावं असं का वाटू नये त्या थेंबाला. उलट त्या थेंबाचे आणखीन अणू-परमाणू होण्याकडे लक्ष का असावं त्याचं? कारण मानवामध्ये अनेक अशा गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. त्याला आपण अहंकार म्हणतो, प्रती अहंकार म्हणतो, मानसिक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींच्यामुळे त्याची जी बुद्धी आहे किंवा त्याचं जे मन आहे, ते एकाप्रकारे मर्यादित झालेलं आहे आणि त्या मर्यादा तो तोडू शकत नाही. तो समर्थ नसतो. त्याच्यामध्ये शक्ती नसते की या मर्यादा तोडल्या पाहिजेत. माझा समाज काय म्हणेल? माझे बाप काय म्हणतील ? माझी आई काय म्हणेल? म्हणून जे आदि शंकराचार्यांनी सांगितलं की, ‘मला आई नाही, बाप नाही, मला कोणी नाही. मी शिवत्त्व आहे. म्हणजे तिथे शिवतत्त्वामध्ये मला मर्यादा नाही राहिलेल्या. अमर्याद, अनंत असा मी शिव आहे. आणि जो अनंत शिव आहे त्याला या अशा क्षुल्लक आणि मर्यादित करणाऱ्या गोष्टींचा कोणत्याही प्रकारे त्याबद्दल विचारच यायला नको. पण विचार जरी आला तरी त्याबद्दल दिलगिरी वाटायला नको, की मी असं का केलं नाही, मी अशा धर्माचा आहे, मी अमका आहे. जो काही कोतेपणा आपल्यामध्ये आहे, तो सगळा या आपण धारणा केलेल्या गोष्टींमुळे आहे किंवा आपल्यामध्ये ज्या धारणा केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे आहे. लहानपणापासून आता जर आपल्याला शिकवलं की बुवा, कोणत्या तरी जातीचे लोक फार वाईट असतात! मग आपल्या डोक्यात ते बसलं म्हणजे बसलं. त्याने मर्यादा आल्या म्हणजे कोणी काही सांगितलं तरी सुटत नाही. पण एकदा का तुमच्यात विश्वधर्म म्हणजे काय आणि त्याचा प्रकाश किती सुंदर आहे तो पाहिला म्हणजे वाटतं की काय मूर्खासारखं आजपर्यंत मी या अशा मूर्खासारख्या गोष्टींमध्ये कसा रमलो होतो, मी का घोटाळत होतो. ही जेव्हा स्थिती येते तेव्हा म्हटलं पाहिजे की आपली प्रगती उत्थानाकडे झालेली आहे. म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्म्याची पूर्ण जाणीव व्हायच्या आधी आपल्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रकाश पडला पाहिजे. जे बुद्धीवर पांघरूण पडलेले आहे, जो अंधार आहे, तो अंधार आपल्यामधून गेला पाहिजे आणि त्यासाठी फक्त स्वत:कडे लक्ष नुसतं द्यायचं. आता एखादा मनुष्य अत्यंत क्रोधी आहे समजा. लहानपणापासून त्याला क्रोध येतो कारण वातावरण त्याचं असं होतं. अशा वातावरणात राहिला जिथं त्याला क्रोधी व्हावं लागलं, तुम्ही म्हणाल मनुष्य कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरच बोजा घालतो त्याचा. स्वत:वर घेत नाही. किंवा असं म्हणू की त्याच्या आईने त्रास दिला किंवा वडिलांनी त्रास दिला किंवा काहीतरी झालं म्हणून तो असा झाला समजा. आता त्या क्रोधी माणसाला जर तो क्रोध अजून जाचतो आहे, तर अजून त्याच्या हातात आत्म्याची तलवार आलेली नाही. आणि ही आत्म्याची तलवार ही प्रेमाची आहे आणि फुलांनी गुंफलेली आहे. तर तिसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवण्याची अशी आहे की आत्मा हा प्रेमस्वरूप आहे. निव्वळ प्रेम आहे. पण त्या प्रेमाला समजायला आपल्यालासुद्धा आत्मसाक्षात्कारच पाहिजे. ‘आत्मण्येव आत्मने तष्टाः’ आत्म्यानेच आत्म्याला जाणता येतं असं म्हणतात.

म्हणजे असं आहे की जर समजा तुम्हाला डोळे नसले तर तुम्ही स्वत:चे डोळेसुद्धा आरशात बघू शकत नाही. तसच जोपर्यंत तुम्हाला आत्म्याची ओळख झालेली नाही तोपर्यंत तुम्ही या आत्म्याचं स्वरूपसुद्धा जाणू शकत नाही. आणि ह्याचं नुसतं स्वरूप म्हणजे हा नुसता प्रेमाचा पुंज आहे. प्रेम. पण या प्रेमाला आपण जसं जाणतो, तसं प्रेम नव्हे. त्या प्रेमामध्ये लालसा नाही, कोणत्याही तऱ्हेची उद्दामता नाही किंवा त्या प्रेमाला कोणतीही इच्छा राहत नाही. हे प्रेम सतत वाहत राहतं. वाहत राहतं आणि त्यातून जे काही उत्तम आहे, जे हितकारी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बेनोव्हेलन्स म्हणतात, ते घडून आणत असतं आणि ते घडवतांना कोणत्याही तऱ्हेची दुखापत, इजा किंवा जबरदस्ती तो दुसर्यांवर करीत नाही, ते आपोआपच घडून येतं. आपोआपच घटित होतं. जे आपोआप घटित होतं, जे सहज आहे, ज्याला आपण स्पाँटेनियस इंग्लिशमध्ये म्हणतो, ती सहज स्थिती तुमच्यामध्ये आली आणि आपोआपच त्यात प्रेमाची शक्ती जर वाहत सुटली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की या प्रेमाच्या शक्तीने सर्व कार्य होतं. तुम्ही काहीही करायला नको. पण फक्त त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण ज्याला प्रेम म्हणतो ते कोणत्या प्रकारचं आहे. पहिल्यांदा निरपेक्षिता पाहिजे. की आता एक लहानशी गोष्ट. समजा, आम्ही अमेरिकेवरून साड्या घेऊन आलो. कुणाला सांगितलं, काहो, तुम्ही असं करा, आम्ही इतक्या आणल्या आहेत, अकरा साड्या, आता अकरा लेडिज शोधून काढा. तर एक आपली आई, एक आपली बहीण, एक मुलगी किंवा एक आमची वहिनी असं करून त्यांनी सगळे नातलग आपली जोडून आणून ठेवले माझ्यासमोर स्वत:. म्हटलं, ‘अहो, निदान आडनावं तरी वेगळं असलेलं बरं असतं ! एकदम, एकजात एकाच आडनावाची अकरा माणसं कशी उभी केली?’ ‘अहो, पण माताजी, ते असं आहे ना, मी त्यांना ओळखतो. त्यामुळे ते मला माहिती आहेत.’ ‘असं कां? मग तुम्ही सहजयोगी आहात ना! मग तुम्ही इतरांना ओळखत कसे नाहीत?’ मग आता दसरं कोणाला तरी बोलवा. त्यांनी अशीच चार नांव आणली. म्हणजे मी बुचकळ्यात पडले, की आता करायचं तरी काय करायचं? तेव्हा ज्या प्रेमाला निरपेक्षिता आहे, आता हे निरपेक्ष प्रेम कसं असतं. तिथे माझी भावना तुटते. माझं घर, माझा मुलगा, माझा भाऊ, माझी बायको, ही जिथे भावना राहिली, तिथे निरपेक्षिता नाही. अर्थात् प्रत्येकाशी जसा तुमचा संबंध आहे, तो संबंध आहेच, पण त्याठिकाणी चिकटलं नाही पाहिजे. मी पुष्कळदा उदाहरण देते, की जेव्हा जमिनीतून शक्ती निघते आणि ती एखाद्या झाडात वावरते, त्यावेळेला ते समजा जाऊन ती एखाद्या फुलात अडकली, तर ते झाड तर मरून जाणारच, पण फूलही मरून जाणार. तेव्हा ही निरपेक्षिता ही सगळीकडे वाहते आहे. ज्याला जे पाहिजे ते देत आहे. आता ही बघा, आपल्या इथे बसलात तुम्ही. इथे सगळ्या तऱ्हेची ही वीज शक्ती, इलेक्ट्रिसिटी येत आहे. त्यांनी काही इथे लहान लहान दिवे लावले आहेत, काही मोठे दिवे लावलेत, काही तिकडे फोटोग्राफ चाललेत, इकडे हे मी बोलते आहे हे माझं भाषण ते उचलत आहेत, सगळीकडे पंखे चालले आहेत, बघा. कितरी तरी कामं करताहेत. ज्याला ज्याची गरज आहे ते करताहेत, पण ती कोणाला चिकटून आहे का? ती शक्ती चिकटून नाही, पण जेव्हा जिवंतपणा येतो माणसाला, तेव्हा तो चिकटायला लागतो आणि मनुष्य झाला म्हणजे अती चिकट होतो. फारच चिकटतो. म्हणजे मी कधी कधी म्हणते की माणसाला चिक्कू म्हटलं पाहिजे. कारण चिक्कू शब्द बरोबर शोभतो त्याला. प्रत्येक गोष्टीला चिकटायचं.

काही असलं की चिकटायचं आणि हे चिकटणं जे आहे ते शक्तीला ओढून घेतं आणि त्याला विद्रप करून टाकतं. सुरुवातीला माझा मुलगा, माझा मुलगा, मग शेवटी, ‘माताजी, या मुलापासून मला सोडवा. मला फार छळतोय.’ म्हणजे त्याचेही इलाज होतच जातात. असं नाही की त्याचे इलाज होत नाहीत. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे, की निरपेक्षिता माणसामध्ये असायला पाहिजे. निरपेक्षितेमध्ये मनुष्याने प्रेम केलं पाहिजे. आपली मुलगी आहे, मुलगा आहे, ठीक आहे. तुमची जबाबदारी आहे. ती पूर्ण करायची, पण त्याच्यात अपेक्षा नको, ही पहिली गोष्ट आणि दुसरं, हे माझं आहे म्हणून करायचं असं नाही. उद्या जर तुमच्या दारी दुसरी एखादी मुलगी आली, तर तिच्यावरसुद्धा तितकेच प्रेम करता आलं पाहिजे, तर तुम्ही निरपेक्ष आहात, म्हणजे गुरू आहात. पण जी विश्वावरती प्रेमाची पाखर घालावी लागते, त्याच्यात जो आनंद आहे, तो म्हणजे परमेश्वरालाच विचारला पाहिजे, किती आनंद आहे त्याच्यामध्ये! जर परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं नसतं तर त्याने सृष्टीच रचली नसती. अहो, डोकेदुखी आहे, सृष्टी रचा, मग त्यात माणसं रचा, मग ते तुम्हाला मारायला उठतात, वेड्यासारखे वागतात, परत तुम्ही त्यांना ठीक करा. त्यांना रियलायझेशन द्या, मग त्यांना आत्मसाक्षात्कार द्या आणि तरी ते वेड्यासारखे इकडे तिकडे धावतच असतात. मग कसं तरी त्यांना बोटीत बसवा, जबरदस्तीने बांधून ठेवा. तरीसुद्धा त्यांचं डोकं इकडे तिकडे चाललेले आहे, पण तो निरपेक्ष असल्यामुळे सगळा खेळ आहे. निरपेक्ष आहे. फक्त एकच परमेश्वर हा प्रेमाची भक्ती करीत असतो. प्रेमाच्या आनंदात असतो. मी प्रेम करतो हाच त्याचा आनंद आहे आणि त्या प्रेमातच तो राहतो. त्याला हा विचार येत नाही की याने, दुसर्याने मला मारलं की मला काही म्हटलं, की काही नाही. ‘बाबा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तु काहीही कर मला. माझं तुझ्यावर प्रेम आहे.’ ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे आणि तीच प्रवृत्ती जेव्हा एखाद्या सहजयोग्यात येते तेव्हा मी त्याला निरपेक्षिता म्हणेन. पण तसं दिसत नाही. तसं दिसत नाही. एखाद्याशी जर तुम्ही तुटकपणाने वागत असले तर तसेच वागत राहणार. ते तुटत नाही. म्हणजे चिकटपणा झाला परत. एखाद्याशी जर तुम्ही चांगले वागत असला, तर त्याच्याशी तुम्ही चांगले वागत रहाल, पण दुसर्या माणसाशी तसेच वागत राहणार. समजा जर दोन भावांचं बिनसलं असलं. ते सहजयोगात आहेत, तरी आपापसात बोलताना मात्र एकदुसर्यांना तशाच रीतीने बोलतील. जसं एका भावाशी दुसरा भाऊ बोलतो. मग तुम्ही सहजयोगात कशाला आले. आत्म्याला मिळवायला. आत्मा म्हणजे काय ? आत्मा म्हणजे प्रेम करणारा तुमच्यातला स्रोत. मग त्याला स्वीकार्य केलं पाहिजे. त्याच्या आनंदात उतरलं पाहिजे. त्याला आपल्यामध्ये अशा रीतीने घेतलं पाहिजे, की हे माझे सर्वस्व जे आहे, फक्त त्या आत्म्याच्या प्रेमाच्या भक्तीसाठी. त्या आत्म्याला जी भक्ती करायची प्रेमाची ती करू देत. मला काही आहे, माझं शरीर आहे. बुद्धी नाही, काही नाही. फक्त त्या आत्म्याची जी भक्ती आहे ती मला बघू देत. त्याचा मला आनंद उचलू देत. तेव्हा सगळ्यात मुख्य म्हणजे सांगायचं असं, की आपण प्रेमाच्या दरबारात बसलो आहोत. हा प्रेमाचा दरबार आहे. द्वेष, राग, लोभ, मोह हे सगळे एकच प्रकार आहेत. कोणाला कोणी आवडतं म्हणून किंवा कोणाला कोणी आवडत नाही म्हणून. काही त्याच्यामध्ये फरक मला दिसत नाही. दोन्ही एकच गोष्टी आहेत. फक्त एवढेच आहे, की एक दिसायला बरं दिसतं आणि दसरं दिसायला वाईट दिसतं, पण दोन्ही प्रकार एकच आहेत. प्रेम हे

निरपेक्ष असायला पाहिजे. दूसरी गोष्ट की प्रेमामध्ये गोडवा असला पाहिजे. कोणी एक थप्पड थोबाडात द्यायची. थोबाडात देऊन मग म्हणायचं की हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला मारलं. कबूल. म्हणजे लोकांनी म्हणायचं ‘असं कसं?’ नाही मी प्रेमात मारलं तुला. आणि काही काही पद्धत असते. आता कोणाला जर भेटायला गेले तर जोपर्यंत हातातून अर्धा शेर वजन नाही काढणार तोपर्यंत ते हातच शेक करत राहतील तुमचा. वाटतं ही काय भेटायची पद्धत झाली! आणि हृदयात काहीच नाही. वरपांगीपणा. त्या वरपांगीपणामुळे अगदी हात धरून तुमचे हलवतील. ‘वा! वा! काय भेट झाली. अमुक झालं, तमुक झालं. ‘ तुम्हाला वाटेल कधी हात सुटतो, पण हृदयात काय? हृदयात प्रेम पाहिजे. हृदयापासून प्रेम पाहिजे. हृदयातून वाहिलं पाहिजे. तसं होत नाही, वरपांगी आणि या वरपांगी प्रेमाने मनुष्याला कधी कधी अशी भूल पडते की, ‘मी किती चांगला मनुष्य आहे, मी किती प्रेमळ आहे आणि मी सगळ्यांशी प्रेमळपणाने वागतो.’ कारण बिझनेस आहे ना त्याचा, मग, चांगलं वागलंच पाहिजे. पण प्रेमामध्ये मनुष्य अत्यंत गोड असतो. आतून बाहेरून, आतून आणि बाहेरून कडू नसतो. त्याचा कडूपणासुद्धा गोड लागायला लागतो. असा तो गोड असतो. जोपर्यंत तो गोडवा सहजयोग्यांमध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्हाला मानायला कोण तयार होईल. अहो, असे लेक्चर देणारे, भाषण सांगणारे, बाता सांगणारे पुष्कळ आहेत. आपल्या देशात तर अगदी पेव फुटलं आहे लोकांचं. गर्लोगल्ली बसलेत. तुम्हाला पाहिजे तर पुण्यालासुद्धा मिळतील. पण त्याने काय तृप्ती होते का आपली. सगळें खोटं आहे ते. वरपांगी आहे. तेव्हा हृदयातून प्रेम यायला पाहिजे. आता सगळ्यांचं मला पुष्कळदा असं पत्र येतं की, माताजी, आमच्या हृदयातून प्रेम वाहू द्या. आता मी कसं करू ते! अहो, तुम्ही हृदय उघडा की. आता हृदय कसं उघडायचं एवढं मी सांगते तुम्हाला. हृदय कसं उघडायचं? सर्वप्रथम एका लहानशा गोष्टीवरून सुरू करायचं. आधी लिस्ट करायची की कोणत्या कोणत्या लोकांवर माझे प्रेम आहे आणि कोणत्या कोणत्या लोकंबद्दल मला द्वेष आहे. पहिल्यांदा. मग ज्यांच्यावर मला द्वेष आहे त्यांना प्रेमपत्र लिहायची. फार कठीण काम! फारच कठीण! त्यांना लिहायचं की हे बघा मला तुमची फारच आठवण येते. कारण तुम्ही किती थोर आहात! नसले तरी चालतील पण म्हणायला काय हरकत आहे आणि मला बरं वाटेल की तुम्ही या माझ्या पत्राचं उत्तर पाठवाल तर. करून बघा, जमतं का? कारण आत्म्याने तुम्हाला समर्थ केलेले आहे. समर्थ केलंय. पण वरपांगीपणाने नाही. त्याला असं नाही वाटलं पाहिजे की वा! चांगलं पत्र आलं, आता उद्या काहीतरी मागणी येणार. हे पहिलं पत्र म्हणजे इंट्रोडक्शन असणार यांचं. तेव्हा मनापासून, हृदयापासून एक प्रेमपूर्वक पत्र पाठवा. अशा लोकांना ज्यांच्याबद्दल अत्यंत द्वेष वाटतो. वाईट वाटतं, पण सहजयोगी आहेत. पहिल्यांदा सहजयोगात सुरू करायचं. सहजयोगी असले पाहिजेत पहिली गोष्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही जेव्हा पत्र लिहू लागाल, परत तो जो राग आहे तो कुठेतरी येणारच. एखादं त्याच्यामध्ये असं वाक्य येईलच, की ज्याच्यातून तुमचा जो राग आहे तो झळकेल. मग परत दुसरं लिहावं, मग तिसरं लिहावं. करता करता जर शंभर पत्र लिहिली तर एक पत्र अस निघेलच की ज्याच्यामध्ये हा राग निघून गेलेला आहे. ज्या माणसावरती आपला राग आहे तिकडे आपण हृदय उघडून पाहिलं पाहिजे. त्याने जे केलंय ते ০

आपणही करतो, केलंय ना, मग कशाला त्याच्यावर रागवायचं? तो जर अशा रीतीने वागला आहे, तर मी तशा रीतीने वागणार नाही. आणि खरोखर ते प्रेम करून पाहिलं पाहिजे. आता आपल्या देशातले अनेक प्रश्न एवढ्यासाठी आहेत की खरोखर प्रेमाची कल्पना नाही आणि व्याख्या नाही आपल्याजवळ. मुख्य आता बायकांचा जो प्रश्न आहे. नारी लोकांचा म्हणजे दोनच तऱ्हेच्या बायका आपल्या देशामध्ये आहेत, तिसरी तऱ्हा मला दिसत नाही. दिसली तर फार बरं होईल. एक म्हणजे ही की जबरदस्त आणि दसरी म्हणजे सहन करणारी , मधोमध काही नसतं. एक तर जबरदस्त असली तर ती डोक्यावर बसणार आणि नसली तर पायाखाली तुडवणार. म्हणजे ‘जमलं तर सूत नाही तर भूत.’ त्यामुळे काय आहे की एकंदर समाज विक्षिप्त झालेला आहे. आणि तो जी बाई सहन करते तिचाच गळा घोटत जाणार आणि जी जबरदस्त असते तिच्या पायाखाली जात राहणार. त्यामुळे तुम्ही नकळत एका, फार मोठ्या पापामध्ये पडत आहात आणि ते पाप म्हणजे असं की एक दूसऱ्या सहनशील बाईला अशा रीतीने त्रास देणं हे परमेश्वराला कधीही मान्य होणार नाही. अनेक असे प्रश्न आहेत. आपल्याकडे आता समजा, जाती-पाती आहेत. त्याच्यामध्ये उच्च-नीच आहे, गरीब – श्रीमंत आहे, हे प्रश्न आहेत. हे प्रश्न मिटविण्यासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये प्रेम किती आहे ते पाहिलं पाहिजे. अहो, या प्रेमाची वाखाणणी अनेक अवतरणांनी केलेली आहे. तर या प्रेमाची जी पाखर आहे ती किती लोकांवर आपण घालू शकतो? किती लोकांसाठी आपल्या हृदयामध्ये कळकळ आहे ? किती लोकांबद्दल आपल्याला खरोखर प्रेम वाटतं? परवा मी मुंबईला लोकांना प्रश्न विचारला, म्हटलं पुरुषांना फार अगदी असतं की मित्रता आमची फार गहरी असते, बायकांच्या मानाने. तर मी विचारलं की, ‘काहो, तुमचे मित्र कोण?’ तर ते म्हणाले की, ‘हे गृहस्थ आहेत ते माझे मित्र आहेत.’ ‘अहो, काही नाही म्हटलं , खोटी गोष्ट आहे. आता मोटारीत जातांना तुमच्या विरूद्ध खूप सांगत होते मला. तुमचे कसे मित्र हे?’ तर ती मित्रता, आपापसातील जी मित्रता आहे याच्यामध्ये माणसाला एकदुसर्यातलं वैगुण्य दिसत नाही, चांगुलपणा दिसतो. तो वाढत गेला म्हणजे तुमचं हृदय वाढत जातं. दुसरं म्हणजे दानत, ज्याला दानत म्हणतात. दानत म्हणजे देण्याची शक्ती असायला पाहिजे. तुमच्या आईबद्दल तर प्रसिद्धच आहे. तिला भयंकर दानत आहे. पण तुम्ही दानत करून बघा. समजा, तुमच्याजवळ पाच साड्या आहेत आणि एखाद्या बाईजवळ जर कमी असतील, तर एखादी तिला देऊन बघा. तुम्हाला शंभर साड्या नेसण्याचं सौख्य मिळणार आहे. जर तुमचं हृदय उघडं असलं तर. दानत असायला हवी. देण्याची शक्ती असायला पाहिजे. देत सुटायचं. हे घे, तुला हे हवं ना हे घे. तुला ते हवं ना ते घे. दानत असायला पाहिजे. ही दानत सहजयोगात आधी होते आपल्या पूजनात, मी पाहिलं आहे. लोकांचं हृदय उघडायला लागलं की सुरू म्हणजे मग ‘माताजी, तुमच्यासाठी मी खीर करून आणली.’ आता मी खावो अथवा न खावो. ‘मी मुद्दामून मुद्दामून तुमच्यासाठी पुरणपोळी करून आणली.’ आता ती सुरुवात झाली. पण ती पुरणपोळी तुम्ही एखाद्या सहजयोग्यासाठी केलीत तर मला जास्त आनंद होईल. आपापसात तुम्ही जर ते प्रेम वाटून घेतलं तर मला जास्त आनंद होईल. फार आनंद होईल. जर तुम्ही एखाद्या सहजयोग्याविषयी चांगल येऊन सांगितलं तर मला फार आनंद होईल. आणि जर तुम्ही वाखाणणी केली की हा मनुष्य काय बहारीचा आहे! त्याने मला फारच मनुष्य

आनंद होतो. हां, जर तुमचं चुकलं असेल तर मी सांगीन की तुम्ही सांभाळून रहा. पण बहुतेक असं मी पाहिलंय, असे अद्भूत क्षण फार कमी येतात जेव्हा लोक एकदुसऱ्यांची मित्रता आणि एकदुसर्यांचं चांगलं सांगतात. एकदुसर्यांमध्ये रममाण होतात त्यांचा आनंद उचलतात तेव्हा वाटतं की आता सुरू झालं प्रेमाचं रामराज्य ! आणि हे प्रेमाचं आपण अजून वापरलेलं नाही आहे. हे साम्राज्य आपण अजून जाणून घेतलेले नाही आहे. याची शक्ती आपण अजून मानलेली नाही आहे. तिची किती प्रचंड क्रियाशीलता आहे, तिकडे आपलं लक्ष नाही. इतका त्याच्यामध्ये जोर आहे, की सगळी तुमची जेवढी काही मोठमोठाली आज साम्राज्य दिसतात, मोठमोठाले तुम्ही अॅटमबाँब वगैरे करून ठेवलेले आहेत, जे काही तुम्ही द्वेषावर उभारले आहे ते एकदम हाणून पडणार. एकदम जमीनदोस्त होऊन जातील ते. पण ती वापरता आली पाहिजे. तिची जाणीव झाली पाहिजे की मी प्रेमाचा पुजारी आहे. मी प्रेमात आहे. मला राग, द्वेष, लोभ वरगैरे काही माहीत नाही, मी फक्त प्रेमाचा पुजारी आहे, मला भक्ती फक्त प्रेमाची करायची आहे. असं आमच्या आईने सांगितलं. तिने त्या भक्तीत स्वत:शी जोडून घेतलंय आणि आम्ही तीच भक्ती दुसर्यांची करणार. मग कोणत्या जातीपाती, कोण कुठलं आणि कोण काय? द्वेषामध्ये मनुष्य एखादं वैगुण्य बघेल. त्याच्यावरच डोकं धरून बसेल. पण प्रेमामध्ये एखादा गुण, एखादा विशेष आनंददायी क्षण आठवावा. ‘कसं चांगलं बोलले होते बरं त्यादिवशी ते!’ मग त्याच्यावर बांधावी आपली इमारत. हृदयाची इमारत बांधायची, कसं बरं प्रेमाने बोलले हे! किती बरं वाटलं नाही का ? की कसं अलगद येऊन त्यांनी असं म्हटलं. पण कधी जर तुम्ही कोणाला टोचून बोलाल तर ते कधीच तुमच्यासाठी चांगला विचार ठेऊ शकत नाही. तो आपल्या लक्षात कसं येत नाही. आम्ही जर दूसऱ्यांशी वाईट बोललो तर तो आमच्याबद्दल वाईट बोलणारच. कशाला चांगले बोलणार? तो काय म्हणेल का, ‘वा, वा! काय चांगले आहेत. यांनी मला चार शिव्या घातल्या. असं होऊ शकेल का? साध्या, सहज शहाणपणातसुद्धा मनुष्याने समजलं पाहिजे की आपण दुसऱ्याच्या विरुद्ध जर इतकं भाडभाड बोललो, तर तो मनुष्य काय तुमच्या गळ्यात येऊन हार घालणार आहे! तेव्हा हृदय उघडतांना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की या माणसाला आपण आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेले आहे. आता या हृदयामध्ये प्रेमाची शक्ती आहे. ती शुद्धीकरण करते. ती पवित्र करते. ती ह्या माणसाला पवित्र करेल. त्याच्यावर सोडून द्यायचं. आता तो कदाचित तुम्हाला त्रासही देईल थोडासा. प्रयत्न करावा. प्रयत्न करायला काही कठीण काम नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सर्व विश्वाएवढे झालो की काय ? लहानपणी नेहमी मला वाटायचं की विश्वाचं कार्य करायचे आहे. कसं काय होणार? माझी भेट लोकांशी कशी होईल ? तर एकदम असं वाटायचं की माझं हृदय खूप मोठं होत चालले आहे आणि त्यात सगळे सामावत चालले आहे. इतका आनंद वाटायचा त्या गोष्टींनी त्यावेळेला नुसतं चित्र बघत असे. आज ते साक्षात दिसतंय समोर. जागोजागी हजारो सहजयोगी बसलेले आहेत. त्या प्रेमाच्या ह्याच्यात स्नात होते. तसंच प्रेम तुम्ही सर्वांना द्यावं आणि आजचा जो विशेष कार्यक्रम आहे, शिवपूजेचा, त्यात हृदयामध्ये एक विचार ठेवावा की आजपासून मी प्रेमाची भक्ती करणार आहे. आईने सांगितलं आहे. प्रेमाची मी भक्ती करणार आहे. प्रेमच करणार आणि ते करून जरी थोडासा त्रास झाला तरी ती तपस्विता आहे. ती सहन करीन. पण मी प्रेम करीन, साऱ्या जगावर प्रेम करीन आणि निरपेक्षपणे प्रेम करणार आहे. लहानशा कुपमंडूकासारखं आपलं, माझी, माझे करणार नाही. पण

सगळ्यांच्यासाठी जे होईल ते प्रेमाने करेन. मग लोक लाथाडतील. कदाचित काही बोलतीलसुद्धा. माझं तसं केलं पुष्कळ. पण प्रेमाची शक्ती फार जबरदस्त असते. हे जाणून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्या भक्तीने ते केलं पाहिजे. असो, आता पूजेची वेळ झालेली आहे. आता मी पुण्यालाच वास्तव्य करायचे ठरवलेले आहे, आज शिवपूजा इथे करून. सर्व विश्वात भारत ही योगभूमी आहे आणि महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे. कुंडलिनी आहे ही साऱ्या जगाची. महाराष्ट्र म्हणजे केवढा मोठा देश आहे! त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे आणि त्यात महाराष्ट्रात पुणं हे त्याचं हृदय आहे. आणि या ठिकाणी आज शिवाची स्थापना करायची आहे. आणि माझं इथे वास्तव्य झाल्यावर कैलासच इथे उतरला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यात मदत केली पाहिजे. आणि कैलासवासी जसे लोक असतात, कैलासावरती राहन अगदी थंड मनाने, थंड प्रकृतीचे! तसे आपण इथे सगळ्या सहजयोग्यांनी झालं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की पुण्यामध्ये खरोखर साम्राज्य कैलासासारखं, श्री सदाशिवाचं आहे. अशीच सगळ्यांच्याकडून अपेक्षा करून मी इथे वास्तव्य करायचं ठरवलं आहे आणि सगळ्यांनी कृपा करून माझी मदत करावी.