Christmas Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Christmas Puja – Stn Pavan Dam 25th December 1986 Date: Place Pune Type Puja

आज मी मुद्दामून इंग्लिशमध्ये बोलले, पण तुम्हा सगळ्या पुणेकरांना इंग्लिश येतंय. तेव्हा जास्त काही त्याचा खुलासा करून सांगायला नको. पण ह्या लोकांना आज, ख्िसमसच्या दिवशी काहीतरी ख्रिस्ताबद्दल सांगावं म्हणून मी सांगितलेले आहे. आता आपल्या संस्कारांमुळे ख्रिस्तांची आपल्याला फारशी माहिती नाहीये. पण ते बरोबर नाही. आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे. ती माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण तो आज्ञा चक्रावर बसलेला आहे. आज्ञा चक्रावर बसलेल्या ख्रिस्ताला जर आपण जाणलं नाही, तर आपण गणेशाला जाणलं नाही. कारण गणेश हाच ख्रिस्त आहे. तेव्हा गणेशाने जगामध्ये येऊन काय कार्य केलं? त्याने अवतरण घेऊन काय काय कमाल केली? त्याने काय आपल्यासाठी केलंय? त्याचं जे काही कार्य आहे आणि त्याचा जो काही प्रादर्भाव आहे, तो आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनात मिळतो. नुसत गणपती, गणपती करून बसतो. गणपती बसला, गणपती हे, ते, पण गणपती म्हणजे काय, करतो तरी काय आपल्यामध्ये? त्याचे काय गुण शुभकारी आहे, अमूक आहे, तमूक आहे. त्याने कसं शुभ केलं! त्याचं जे काही कार्य होतं ते ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून सर्व लोकांनी ख्रिस्ताचं चरित्र वाचून काढलं पाहिजे आणि आहेत ? तो विचारणा केली पाहिजे. आता हे जे काही मागचे संस्कार आहेत त्याप्रमाणे वागून चालत नाही. जसे इकडे हे लोक ख्रिस्ती धर्मातून आलेले आहेत. त्यांनी आपल्याकडचे सर्व अवतार कोणते होते? त्यांनी काय काय कार्य केलं? ह्याबद्दल माहिती करून घेतली. आणि कधीतरी तर ते आपल्यापेक्षाही जास्त आहेत. तेव्हा आपणही खरिस्तांबद्दल, मोहम्मदांबद्दल, इतरही जे मोठमोठाले सद्गुरु झाले त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. ह्याला कारण असं आहे, की उद्या तुम्हाला गुरुपद मिळालं, तुम्ही ब्रह्मनिष्ठ असलात, तुम्हाला जरी ब्रह्म काय आहे ते कळलं , पण जर तुम्हाला उद्या कोणाशी बोलायचं असलं, तर तुमच्याजवळ हे ज्ञान असायला पाहिजे. हे तुम्ही प्रत्येकाबद्दल उघडून, स्पष्टपणे समजवून सांगाल आणि गोष्टीचं निरूपण करू शकाल. जर ही माहिती तुम्ही आज मिळविली नाही, तर ह्या आजच्या आधुनिक काळामध्ये सहजयोग पसरणार नाही. सहजयोग हा आधुनिक काळात आलेला आहे. वेळेला सगळ्यांना सगळ्यांची माहिती झालेली आहे. सगळ्यांना कोण कोण लोक मोठ मोठे झालेले आहेत ते ह्या सगळे माहिती आहे. आपण एकएका विहिरीत आता नाही आहोत. मोठ्या अथांग सागरात आल्यामुळे, सगळ्यांनी सगळी माहिती, सगळ्या जातीच्या लोकांची, सगळ्या देशांच्या लोकांची, सगळ्या धर्माच्या लोकांची माहिती आपण करून घेतली पाहिजे. त्यांचं कुठे चुकलं, आपलं कुठे चुकलं, हे समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपण खरे सहजयोग आणि सद्गुरु होऊ शकता. त्यासाठी थोडासा तरी अभ्यास करावा लागेल आणि सर्वांनी तो मन:पूर्वक अभ्यास करावा, असं मी सांगते. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे.

आज आपण बहुतेक पूजा जी आहे ती गायनानेच करूयात. मी पूर्वी सांगितलेलेच आहे, की ख्रिस्ताची आई राधा म्हणजे महालक्ष्मी होती आणि महालक्ष्मी असूनसुद्धा तिने इतकं शांतपणाने सगळे काही सहन केलं आणि जशा रीतीने वागली ते फक्त एवढ्यासाठी की ख्रिस्ताचं जे काही उदाहरण होतं , ते अगदी पूर्णपणे जमलं पाहिजे. कोणत्या तऱ्हेची त्याच्यामध्ये अशी खोट आली नाही पाहिजे, की लोकांनी म्हटलं पाहिजे की त्याच्या आईमुळे असा दोष आला. त्या बाईने जसं सहन केलं. आपल्या मुलाचा जसा त्याग केला, त्याला क्रॉसवर जातांना पाहिलं. ह्या सर्व गोष्टी ज्यांनी इतक्या सहन केल्या, अशा या महालक्ष्मी स्वरूपात, मेरीच्या उदाहरणात असं पाहिलं पाहिजे, की जे आपण मुलांबद्दल, ‘माझा मुलगा, माझा मुलगा’ करत बसतो, ते सोडून ‘माझा मुलगा आत्म्याच्या दृष्टीने किती पुढे आलेला आहे,’ ते पाहिलं पाहिजे. आत्म्यामध्ये त्याचा किती लाभ झालेला आहे, हे पाहिलं पाहिजे. आपण सर्व आता सहजयोगी झालो आहोत आणि सहजयोगामध्ये येऊन आता पुष्कळ कमवलंय. आणि मुलांना देण्याचं काय आहे आपल्यामध्ये, ते पाहिलं पाहिजे. आणि ते देण्यासारखं एकच आहे, ते म्हणजे आत्म्याचं ज्ञान. ते मिळालं पाहिजे. ते सर्वांना दिलं पाहिजे आणि सर्वांनी मिळवलं पाहिजे. ह्यावेळेला मुद्दामहून मी म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी इतक्या लांब या. कारण इतक्या लांब आल्यावर आपल्या लक्षात येईल, की किती काबाडकष्ट करून लोक चालतात, लोक राहतात. आपल्याला लहान लहान गोष्टींचा त्रास होतो आणि आपण थोडासाही त्याग करायला तयार होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला गोंजारून सांगावं लागतं, असं करा, तसं करा. अशा रीतीने सहजयोगामध्ये तुम्ही कसे पारंगत व्हाल आणि पुढे वाढाल. जरासासुद्धा त्याग करायला मंडळी तयार होत नाहीत. हे बरोबर नाही. आणि पुणेकरांबद्दल सारखं मला ऐकायला मिळतं , की इथले लोक अगदी फुकटखोर आहेत, ते कधीच एक पैसा काढणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही आपली प्रवृत्ती बदलणार नाहीत. तोपर्यंत हे पुणेकर कसे बदलणार! तुम्हीच त्यांचे पुढारी आहात. तुम्हीच त्यांचे उदाहरणं आहात . ज्याने की ही लोक बघतील की ही लोक काहीतरी विशेष आहेत. आणि तुमच्यामध्ये जर ह्याच्याबद्दल, त्याच्याबद्दल, पैशाबद्दल एवढी तळमळ पाहिली, तर ते लोाक म्हणतील, की सहजयोग करून फायदा काय? सगळे आमच्यातलेच आहेत. दूसरं म्हणजे, वारंवार मी म्हटलेले आहे, की भाऊबंदकी. आपल्यामध्ये हा एक शाप आहे. आणि ते मी परत बघते. पैशाला धरूनच भाऊबंदकी करतात. हे पैसे कुठे गेले, इतका पैसा कशाला खर्च केला? हे काय झालं, ते काय झालं? सगळी भांडणं पैशाला धरून करायची. याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. तुमच्यासाठी आम्ही सगळं करायला तयार आहोत. पण फुकटात घ्यायचं! म्हणजे आत्मसन्मान माणसाला पाहिजे. माताजींनी खर्च करायचा आमच्या खाण्या-पिण्याचा. हे काही ठीक नाही. वर्षभरात जरी तुम्ही थोडेसे पैसे एकत्र केले, तरी सहज होऊ शकतं. तशी ही मंडळी खर्च करतातच आणि आम्हीही करतोच. पण बरं दिसत नाही. आत्मसन्मानाला धरून नाहीये. आता ही तुम्ही कोठे खेडेगावात गेलात, आता परवा मी नारायणगावला गेले होते. लोकांनी सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. मला बसवलं, सगळें दिलं. त्यात काही पैसे पाहिजेत वगैरे असं काही म्हटलं नाही.

आदरातिथ्य होतं. जसे चार पाहणे आपल्या घरी आले, त्यांच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. सहजयोग्यांमध्ये विशेष करून अजून आश्चर्य वाटतं की भाऊबंदकीचा शाप दिसतोय. लहानलहान गोष्टींसाठी लोक भांडणं करतात. त्यांचं हे झालं , त्यांचं ते झालं . समजा एखाद्या लीडरला म्हटलं की आता हा लीडर झाला. तर तो लीडर नाही त्याचं भांडण. म्हटलं की ह्या माणसाला व्हायब्रेशन्स नाहीत त्याला सध्या बंद करा तर ते भांडण. प्रत्येक गोष्टीमध्ये भांडकुदळपणा. लग्नातसुद्धा आपल्याकडे इतकी भांडणं आपण करतो. जेव्हा लग्नासारख्या शुभस्थळी आपण हे करतो, तर आपल्याला असं वाटतं, की कुठेही भांडणं केली तरी भांडणं हे काही वाईट नाही. हे फार वाईट आहे. परमेश्वराच्या दृष्टीने हे फार चुकीचं आहे आणि ते केलं नाही पाहिजे. त्याबद्दल ख्िस्तांनी एक शब्द वापरला आहे, ‘मरमरिंग सोल्स’, जे लोक मागे काहीतरी बोलत असतात सारखे, ह्यांना काहीतरी बोलायचंय, त्यांना काहीतरी बोलायचंय. इकडून तिकडे लावालावी करायची. अत्यंत क्षुल्लक आणि क्षुद्र गोष्टी आहेत. आणि तुमच्या पुण्याला आम्ही पुण्यपट्टणम म्हणतो, पुण्याला सगळी पुण्याई आणलेली आहे म्हणतो, सगळं काही म्हणतो आणि तेवढं करून ही अशीच परिस्थिती आहे, ते पाहून फार वाईट वाटतं. पुढच्या वर्षी सगळ्यांनी अगदी जोमाने प्रयत्न करायचा. इथली मुलंसुद्धा शहाणी आहेत. त्यांनीसुद्धा आपले पैसे जमा करून सगळ्यांनी दिले. माझा अगदी जीव भरून आला. किती चांगली मुलं आहेत ही! ती तुमचीच मुलं आहेत ना! मग मोठ्यांना काय होतंय? मोठे असे का वागतात ? थोडं तरी हृदय उघडून काम केलं पाहिजे सहजयोगात. काही तुमच्यावरती बोजा नाही सहजयोगाचा. काही तुमच्याकडून आम्ही काही घेत नाही. काही तुमच्याकडून आम्हाला नकोय. कितीतरी आम्ही तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे वस्तुमात्र दिलेले आहे. नुसतं वस्तुमात्र पाहिलं तर किती तरी दिलेलं आहे. पण तरीसुद्धा अशा तऱ्हेच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या की मला फार दुःख होतं. तेव्हा तुम्ही आपल्या आत्म्याला परत क्रूसावर टांगू नका. परत पुनर्जन्म झाला आजच्या दिवशी असं समजून, आता आम्ही खुल्या दिलाने राहू असं ठेवायचं आणि मान-पानाने रहायला पाहिजे. आत्मसन्मानाने रहायला पाहिजे. एवढं कृपा करून तुम्ही लक्षात ठेवा. आजच्या शुभदिवशी मला परत म्हणावं लागतं. कारण पुण्याला आता तुमची माझी परत भेट केव्हा होईल मला सांगता येत नाही. तेव्हा कृपा करून ह्याबद्दल तुम्ही काळजी घ्यावी. असं वागू नये. नाहीतर सगळे एकाबरोबरच खाली जातील. आजच्या ह्या दिवशी सगळ्यांनी एक तरी व्रतनिश्चय ठरवला पाहिजे, की ज्या ख्रिस्तांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं. तिथे आम्ही जर त्याला आमचा मोठा भाऊ मानलेलं आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे. आमच्या हातून काय झालं पाहिजे? आम्ही इतकं सहजयोगात मिळविलेले आहे. आता आम्ही सहजयोगात काय केलं पाहिजे ? काही तुमच्याकडे पैसे वगैरे मागतच नाही आम्ही. पण खाण्या- पिण्याचे आणि वाहतुकीचेसुद्धा तुम्ही पैसे द्यायला तयार नसलात तर कसं करणार? त्यावर पण भांडाभांडी करता. पुढच्या वेळेला असं झालं नाही पाहिजे. लोकांनी सांगितलं की जसं आम्ही वाहतुकीचे आणि खाण्या-पिण्याचे पैसे मागितले तसं कोणीसुद्धा हात वर केला नाही. ४० – ४५ रुपयेसुद्धा जर तुम्ही काढू शकत नसलात, एवढी जर भिकार दशा असली तर सहजयोगात तुम्ही राहिलं नाही पाहिजे. आमच्यावरच बोजा पडणार. म्हणजे सगळ्या भिकाऱ्यांना पाळण्याचा आम्ही काही मतक्ता घेतलेला नाही. जर एवढी परिस्थिती असली तर मुळीच सहजयोगात

राहू नये. ज्या लोकांना इतकंही जमत नाही. ज्या लोकांना फुकट खायचंय, ही काही खैरात वगैरे नाही. आणि ह्या गोष्टी वाहवत जातात कधीकधी इतक्या की त्या जर सांगितल्या नाहीत तर थांबवर्या जात नाहीत. आणि तुमचे लीडरसुद्धा थकून म्हणतात, आम्हाला नको रे बाबा हे! त्यामुळे तफावत आलेली आहे. त्यामुळे लोक असं समजतात की, हे लीडर लोक जे आहेत ते आम्हाला त्रास देताहेत. माताजींजवळ जाऊ शकत नाही. वगैरे वरगैरे. ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. आता आम्ही सगळे एक झालेलो आहोत. सहजयोगासाठी आम्ही आत्तापर्यंत काहीही केलेलं नाही. गांधीजींच्या वेळेला मला आठवतं, की माझ्या आईने तिच्या स्वत:च्या बांगड्या दिल्या. गोठ दिले, पाटल्या दिल्या, सगळं सगळं घरातलं दिलं तिने. आणि आजकाल लोकांना चार पैसे काढता येत नाही. म्हणजे इतकी दर्दशा आहे का आपली? तशी मुळीच नाहीये. ही मंडळी इतक्या लांबून इथे येतात. तितकीच मंडळी तुम्ही इथे आलेले आहात आज इथे. त्यामुळे तुमच्यावर खर्चाचा बोजा नाहीये. हे शोभतं कां! पुण्याच्या सगळ्या लोकांना सांगा, की माताजींनी सांगितलं, प्रत्येक पुण्याच्या लोकांना आजच्या ह्या कार्यक्रमाला कसंही करून उभ राहिलं पाहिजे. कारण हिमालयवरतीसुद्धा की लोक जातात देवाकडे. मग हा हिमालय नाहीये! तुम्हाला एवढं तुडवायला नव्हतं होत. सगळी व्यवस्था केलेलीच होती. पण तरीसुद्धा जेवढे लोक तिथे आले होते, तितके काही आज आले नाहीत. आणि पुण्यात झालं तर आम्ही येऊ, नाहीतर येणार नाही. हे असं करणाऱ्या लोकांना कधीही त्यांची पैशाची स्थिती ठीक होणार नाही. आणि आता गणपतीपुळ्यालासुद्धा व्यवस्थित यावं. पुष्कळांनी यावं. काही त्याच्यामध्ये एवढा खर्च नाहीये. मी सगळा बरोबर करून ठेवलेला आहे. जितका जरूरी लागेल तितका. फक्त खाण्यापिण्याचा असेल तेवढाच. त्या पलीकडे काही नाही. वर्षात एकवेळा. आणि इतकी काही तुमची दुर्दशा नाहीये. दोन पैसे जर एकत्र जोडून ठेवले तर तुम्ही वर्षाला थोडे पैसे एकत्र करू शकता. असाच एखादा असला तर आम्ही करू शकतो त्यांची व्यवस्था. पण प्रत्येकजणाने जर अशीच भूमिका घेतली, तर पुण्याहून कोणीच जाणार नाही. खेडेगावात मात्र वेगळं आहे खेडेगावात कधीच हा प्रश्न उभा रहात नाही. शहरात येऊनच आम्हाला प्रत्येक गोष्ट पाहिजे. सिनेमा रोज पाहिजे. हे झालंच पाहिजे. हातात आमच्या बांगड्या असल्याच पाहिजेत. गोठ असलेच पाहिजेत. पाटल्या असल्याच पाहिजेत. हे असलंच पाहिजे. मग आम्ही देवाला गेलो किंवा नाही गेलो, पूजेला गेलो किंवा नाही गेलो. ते एवढ मात्र पाहिजेच सगळं. पाहिजे म्हणजे पाहिजेच. जेवायला भरपूर पाहिजे. जेवायला अमकं पाहिजे, तमकं पाहिजे. ह्या सर्व गोष्टींकडे आपलं जास्त लक्ष आहे, देवाकडे कमी, मग आमची का प्रगती होत नाही. हे लक्षात आणलं पाहिजे. आता आजच्या दिवशी प्रत्येकाने निश्चय करायचा, की आम्ही इकडेतिकडे इतके पैसे वाया घालवतो. त्या पेक्षा थोडेसे पैसे आम्ही वाचवलेले बरे. ह्या लोकांनी सगळे सोडलंय. सगळे छंद सोडलेत आणि आता म्हणे आमच्याकडे पैसे मागतात. करायचं काय पैशांचं? तशीच सगळी जी काही तुम्ही गुलामी केलेली आहे आजपर्यंत ते सगळे सोडून परमेश्वराच्या साम्राज्यात पूर्णपणे उतरलं पाहिजे. आजच्या दिवशी मला सांगायला वाईट वाटतं, पण सगळा जो मागचा इतिहास आहे, तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग मला असं वाटतं की हे सांगितलं नाही तर हे वहावतच जाणार आहे. म्हणून आता आळा घातला पाहिजे. ह्या गोष्टीला पूर्णपणे आळा घातला पाहिजे. आणि आपापसातली भाऊबंदकी

पूर्णपणे सोडून टाकली पाहिजे. एकाच्या विरूद्ध दुसरा, दुसऱ्याच्या विरूद्ध तिसरा असं नाही. सगळ्यांनी मिळून मिसळून, इथे चौदा देशातले लोक कसे मिळून मिसळून बसलेत आणि आपण एका देशातलेच नाही, तर एका प्रांतातलेच नाही, तर एका शहरातले लोकसुद्धा एकत्र येऊन बसू शकत नाही म्हणजे काय म्हणावं ! म्हणजे आपण जन्मलोच हातात सोटे घेऊन असं मला म्हणावं वाटतं. जन्मल्याबरोबर मारामाऱ्या. इतकं आहे पुण्यामध्ये. पुष्कळशा सुंदर गोष्टी आहेत. पुष्कळसे सहजयोगी, जे तरुण सहजयोगी आहेत, ते फार सुंदर आहेत. त्यांच्या मुली फार छान आहेत. सगळ्यांच मला इतकं कौतुक वाटतं. सगळे इतके प्रेमळ आहेत. सगळं काही पण जे मोठे सहजयोगी आहेत, त्यांच्यामध्ये जराशी अजून मेहनत पाहिजे. तेव्हा कृपा करून आजच्या दिवशी सगळ्यांनी व्रत घेतलं पाहिजे, की आम्ही सहजयोगी आहोत आणि सहजयोगाच्या मार्गात आलेलो आहोत. पण ह्यांच्यात अग्रेसर होण्यासाठी जे जे करावं लागेल, ते आम्ही करू. असं व्रत घ्या म्हणजे परमेश्वर सगळ्यांची मदत करणार आहे. परमेश्वर तुम्हा सगळ्यांवर आशीर्वाद देवो.