Puja by the Krishna’s river

Brahmapuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Devi Puja Date 27th December 1986: Place Brahmapuri Type Puja

आता ही पाहणी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की, ‘कृपा करून ह्या सगळ्यांना आमच्यातर्फे हार्दिक धन्यवाद द्या. आणि त्यांचे आम्ही फार अनुग्रहित आहोत आणि आभारी आहोत.’ त्याबद्दल मी अनेकदा त्यांना सांगितलं की, मी मराठीत त्यांना सांगतच असते, पण तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना सांगा. म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्यांची ओळख करून घ्या. त्यांची मैत्री साधून घ्या. त्यांची नावं जाणून घ्या. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, की खेडोपाडी आमचे बांधव आहेत. आपण सगळे एका सूत्राने बांधले गेले आहोत. तुम्ही कोणत्याही देशातले असलात, कुठलेही असलात, तरी सगळी माझीच मुलं आहात. तेव्हा त्यात काहीही भेदभाव न पाळता सगळ्यांनी आपापसात मित्रता साधली पाहिजे. आणखीन सगळ्यांनी एकमेकांना ओळखून घेतलं पाहिजे. म्हणजे कोण कसं आहे, काय आहे. आता सांगायचं म्हणजे आजचा दिवस विशेष आहे. शनिवारचा दिवस, कृष्णा नदीच्या काठी. म्हणजे कृष्णाचं सगळें सुरू झालेलं दिसतंय साम्राज्य इकडे. आणि ह्या सगळ्या त्याच्या साम्राज्यात आजची तुम्ही पूजा मांडलेली आहे. पूजेत सांगायचं काहीच नसतं खरं म्हणजे. कारण स्वत:च चैतन्य वाहून तुम्हाला भरपूर करून टाकत असतं. तेव्हा तेच फक्त तुम्ही आपल्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे. सहजयोगाची विशेषता ही आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्यान-धारणा करावी लागते. जर तुम्ही ध्यान- धारणा केली नाही, तर मात्र सहजयोग जमत नाही. म्हणून थोडा तरी वेळ ध्यान- धारणेस दिला पाहिजे. आणि आपल्यामध्ये कुठे चुकतं ते तुम्हाला ध्यानातच कळू शकेल. ते तसेच पाळत ठेवायचं नाही. ते काढून टाकलं पाहिजे. ते काढून टाकल्याबरोबर त्याचे जे काही आपल्याला लाभ होतील, त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, की किती त-्हेचे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडून येतील. आणि तुम्ही ते इतरांनासुद्धा सांगू शकाल. आज ब्रह्मपुरीला एक विशेष रूप आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये इतके दुसर्या देशातले लोक आलेले जे आहेत. सबंध जगभर ह्याचं नाव पसरलेलं आहे. तेव्हा जी एक गोष्ट आपल्याला लहानशी आठवते ती, रामदास स्वामी फक्त महाराष्ट्रात गाजलेले होते, ते आज सबंध देशामध्ये गाजलेले आहेत. तुकारामाचे अभंग हे गाऊ लागले आहेत. नामदेवांचं नामस्मरण हे करतात. म्हणजे कुठल्या कुठे आपण पोहोचलेलो आहोत! म्हणजे महाराष्ट्राची कुठवर महती पोहोचलेली आहे ! त्याची महती कुठवर पोहोचलेली आहे, ते बघण्यासारखं आहे. आणि त्यांना ह्या सगळ्यांचे किती कौतुक वाटतं, ते बघण्यासारखं आहे. नाहीतर कोण कोणाला ओळखतं ह्या देशात! कोणीच कोणाला ओळखत नाही. उत्तर हिंदुस्थानाच्या लोकांना जर विचारलं, की रामदास स्वामी कोण होते? तर त्यांना काही माहीत नाही. शिवाजी महाराज कोण होते? ते माहीत नाही. ही परिस्थिती आहे. तेव्हा तिथपर्यंत आपण आपल्या महाराष्ट्राचं लोण पोहोचवलं आहे. आणि तिथून ही मंडळी तुमच्या दर्शनाला आलेली आहेत. असं समजून ह्या साधु-संतांना, जसं आपण साधु-संतांचं पाचारण करतो, आणि त्यांच्याशी वागतो, तसंच सगळ्यांनी प्रेमाने वागलं पाहिजे. आणि त्यांनी तुमच्यासाठी पुष्कळशी बक्षिसे घेऊन आलेले आहेत. ते गणपतीपुळ्याला निघायच्या विचारात आहेत. तरी सर्वांनी गणपतीपुळ्याला यावं. जितक्यांना जमेल तितक्यांनी यावं, इथून काही दूर नाहीये. वाटलं तर तीन दिवसासाठी या किंवा पाच दिवसासाठी यावं. तिथे फक्त खाण्या- पिण्याचे, राहण्याचे खर्च आहेत. तेवढेच फक्त लावलेले आहेत. आणखीन दूसरा काही विशेष खर्च लावलेला नाही. एकंदर ५० किंवा ५१ लग्न तर आता ठरलीच आहेत. त्याच्यावर पुढे झाली तर माहिती नाही. आणि प्रत्येकी जर हिशेब लावला, तर फार तर फार सहा आणे प्रत्येकी तुम्ही बक्षीस दिलेलं आहे लग्नाचं. तर ते काही विशेष दिसत नाही. तरीसुद्धा आनंदाने सगळे गोड मानून घ्यावं. आणि एकदाच ही पर्वणी असते. समजा आता आपल्याला कुठे जायचं असलं, समजा एखाद्या यात्रेला जायचं असलं. तर आपण किती पैसे खर्च करू. तेव्हा माताजींनी सुंदर व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी तिथे यावं. मनसोत्त रहाव. आणखीन आनंद उचलावा. त्यामध्ये किल्मिषं काढत बसायचं नाही. प्रेमाने आलं पाहिजे. अशी सगळ्यांना माझी विनंती आहे.