Birthday Puja

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Birthday Puja Date 21st March 1987 : Place Mumbai Puja Type Speech Language Marathi

आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, इंग्लिश भाषेत जाऊ दे. कारण आपल्या संस्कृतीत आणि इंग्लिश संस्कृतीत फार तफावत आहे. तेव्हा ती आधी हिंदीतच फोफावी लागते. जरी आपली मातृभाषा कोणतीही असली, तरी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. मग त्यापासून तुम्ही इतर संस्कृत वरगैरे सगळे शिकू शकता. पण आधी हिंदी भाषा शिकली पाहिजे. सगळे फारेनर्स आता हिंदी भाषा शिकत आहेत आणि मला म्हणतात, ‘माताजी, ह्या लोकांना तरी हिंदी येतं ! मराठी लोकांना तर हिंदी येतच नाही. मग त्यांच्याशी कसं बोलायचं?’ म्हणजे त्यांनी चौदा भाषा शिकायच्या का? आता आपलं विश्वाचं कार्य आहे. आता राष्ट्रभाषेचे तसेच धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे त्यांनीच काढलेले आहेत. निदान आपण तरी महाराष्ट्रात त्याला नीटपणे सजवलं पाहिजे. मी राष्ट्राभिमान म्हणून म्हणत नाही. पण मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. हिंदी भाषेशिवाय ही संस्कृती आपण जगभर कशी पसरवू शकतो? एक तर सगळ्यांना मराठी भाषा शिका म्हणून म्हणावं लागेल. तसं काही जमायचं नाही. पण आता हिंदी भाषा तरी शिकली पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांना कठीण नाहीये हिंदी भाषा शिकणं! ती शिकली तर बरं होईल. तसं महाराष्ट्रात फिरत असतांना मी मराठीतच बोलत असते आणि अध्यात्माला फार पोषक आहे, हे सर्व जरी असलं, तरीसुद्धा समयाचाराप्रमाणे ह्या वेळेला जर सगळ्यांना हिंदी भाषा आली तर काम सहज होऊ शकतं. त्यामुळे हिंदी लोकांचं काही माहात्म्य वाढणार नाही. नाही म्हटलं तरीसुद्धा सहजयोग उत्तरेला जायला अजून निदान मला वाटतं ५ वर्षे तरी लागतील. अजून दिल्लीतच…. त्यातून उत्तर हिंदुस्थानात तर त्याहून कठीण काम दिसतंय. बिहारमध्ये तर त्याहून कठीण काम दिसतंय. तेव्हा भाषेचा व सहजयोगाचा काही संबंध नाहीये. तो विचारच सोडला पाहिजे, की आम्ही जर हिंदी भाषेत सगळे सुरू केलं तर हिंदी लोकांचं राज्य येईल. सहजयोगात अस राज्य येत नाही. सहजयोगात प्रेमाचं राज्य येतं. पण आपापसात बोलायला जी भाषा लागते, ती कोणती तरी एक असायला बरी आहे. आता आपल्याकडे इटालियन, अमके-तमके असे चौदा भाषिक लोक आहेत. आता त्यांना मी आपल्या चौदा भाषा शिकवायला सांगून लक्षात कोणती तरी भाषा नको का? आता सगळ्यांना मराठी भाषा फार कठीण वाटते. ही म्हणजे गंगा नाही. गंगेच्या पलीकडची भागीरथी. त्याच्याही पलीकडची अलकनंदा आहे. तिथपर्यंत पोहोचायला कठीण काम आहे. हे सगळं कठीण आहे. आधी गंगेत तर उतरू देत, मग पुढे व्हा अलकनंदेत. अशी ही प्राचीन भाषा आहे. असे हे मराठी, प्रत्येकाला आलेच पाहिजे, पण आम्ही मराठीतूनच बोलणार, असले हट्ट करायचे नाहीत. हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. हिंदी भाषेत…. झाली तर सर्वांना ही समजू शकते. प्रत्येकाने हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.