Talk to yogis, Dhyana Madhe Nirvicharita

Aurangabad (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Dhyanamadhe Nirvicharita “VIC 8th December 1988 Date : Place Aurangabad Seminar & Meeting Type

मी मराठवाड्याची महती सांगितली आहे. आजसुद्धा पेपरात आलेले आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतं आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहजयोग्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोमरोमात पोहोचवण्यासाठी सहजयोग्यांची फार जोरात तयारी पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे सहजयोग्यांनी ध्यान- धारणा करणे. आपली चक्रे स्वच्छ करणे. खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजे. निदान दोनदा तरी ध्यान केलेच पाहिजे. ध्यानामध्ये निर्विचारिता स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते. आणि हे आत्म्याचं जे फळ मिळालं आहे त्याचं खरं स्वरूप आपल्याला मिळू शकतं. पण जर आपण ध्यान-धारणा केली नाही, तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही. त्यासाठी ध्यान-धारणा करायलाच पाहिजे. आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते काढण्याचा प्रयत्न करायला नको, फक्त त्यांच्याकडे बघितलं तरी ते निघून जातील. तेव्हा जसं काल भारूडामध्ये सांगितलं की या संसारातून वेगळं निघा आणि मग या संसाराकडे बघितलं. कारण जोपर्यंत तुम्ही या संसाराच्या उलाढालीमध्ये गुरफटलेले असाल तोपर्यंत तुम्हाला याच्यातले प्रश्न सोडवता येणार नाही. तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले, तर तुम्ही बाहेर कसे येणार ? तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे. जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटांगळ्या जाऊन त्याच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल. त्यानंतर तुम्ही इतर लोकांनासुद्धा पोहण्याचं शिकवू शकता. तसंच अध्यात्माचं आहे. आधी तुम्ही स्वत:ची स्थिती दुरुस्त करायची आणि त्यायोगे तुम्ही दुसर्यांचीसुद्धा स्थिती सुधारू शकता. पुष्कळदा मला असंही लोक सांगतात, की सहजयोग्यांमध्ये अजून काही प्रगती झालेली नाहीये. काही प्रगल्भता आलेली नाही आहे. आपापसात अजून वैमनस्य आहे, वगैरे वरगैरे. तेव्हा हा असा सहजयोग कसा? सांगायचं म्हणजे असं की आपल्या सहजयोगाचं दार सगळ्यांना उघडे आहे. कोणी कसेही असेनात का, सगळ्यांना तुम्ही सहजयोगाला या अशी मागणी आहे. आमंत्रण आहे. त्यामुळे होतं काय की वाट्टेल त्या तऱ्हेचे, वाट्टेल त्या परिस्थितीतले, वाट्टेल त्या कुसंस्काराचे लोकसुद्धा ह्याच्यात येतात. त्याबद्दल आपण काही त्यांच्यावरती आधी मज्जाव करीत नाही. पण एकदा का कुंडलिनी जागृत झाली आणि आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे ‘आधी कळस मग पाया’ याप्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी सुरू होते आणि त्या बांधणीमुळे तुम्हाला स्वत:च त्या प्रकाशामध्ये दिसतं की आमचं काय चुकलेलं आहे ! आम्ही कुठे चुकलो? आणि त्या प्रकाशामध्ये तुम्ही जाणता, की तुम्हाला काय ठीक केलं पाहिजे ? काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करून घ्यायचं? मी काही तुम्हाला सांगत नाही. तुम्ही स्वत:च बघून ठीक करता. कारण तुम्हाला दिसतं की त्याने ন

आमचं नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे. तेव्हा तुम्हीच त्या गोष्टीला पायबंद घालता. मला त्याबद्दल काहीच बंदोबस्त करावा लागत नाही किंवा सांगावं लागत नाही की तुम्ही हे नीट करून घ्या, ते करून घ्या, पण तुम्हीच तुमचे गुरू होऊन जाता. पण त्यासाठी ध्यान-धारणा ही पाहिजे. जसे लहानशा दिव्याच्या प्रकाशात आपल्याला सगळे काही दिसत नाही, तसेच जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश पूर्णपणे आपल्या चित्तावर पडणार नाही, तोपर्यंत हे चित्त कुठे कुठे धावतंय, त्याला काय काय प्रश्न आहेत ? त्यांने काय काय नुकसान करून घेतलं आहे? काहीसुद्धा आपल्याला लक्षात येणार नाही. तेव्हा ध्यान-धारणा ही करायलाच पाहिजे. लोकांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही, मला हे नाही, ते नाही. सगळे बहाणेबाजी. सर्व बेकारची कामं करायला आपल्याला वेळ असतो. दोन मिनिटं परमेश्वराजवळ बसायला वेळ नाही. खरोखर म्हणजे परमेश्वराने हे जेवढं सायन्स, ही जी सगळ्या तऱ्हेची आपली व्यवस्था करून दिलेली आहे ती एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आपण हातात घड्याळ बांधतो, ते एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आणि वेळ वाचवायचा तो फक्त ध्यानासाठी वाचवायचा. आणि त्यानंतर इतकी शांती , इतका आनंद मनुष्यामध्ये येतो ! त्याशिवाय आपली प्रकृती, आपलं मन इतकं शुद्ध होतं , सगळ्या प्रकारचे ताप, दु:ख निघून जाऊन मनुष्याची इतकी उत्तरोत्तर प्रगती होत जाते की त्यालाच आश्चर्य वाटतं की कसा मी सहजच या आनंदाच्या सागरात पडलो. तेव्हा प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की हा आमच्यासाठी सहजयोग आहे. माताजींसाठी नाही. मी एवढी दगदग करते. सगळीकडे धावते, सगळ्यांना भेटते, रानोवनी राहते, सगळ्यांची व्यवस्था करते. त्याला कारण मला सहजयोग हवा म्हणून नाही, पण या अंतरात , आतून जी काही मला आपल्याबद्दल कळकळ वाटते त्यासाठी वाटतं, ज्या आनंदासाठी आम्ही आहोत, त्या आनंदात सगळ्या माझ्या मुलांनी यावं. असा विचार ठेवून प्रत्येकाने मेहनत करायला पाहिजे आणि ध्यान- धारणा केली पाहिजे. दूसऱ्यातले वाईट बघू नये. दुसर्यातलं चांगलं बघावं. ते बरं होईल. दुसऱ्यातलं वाईट बघितलं तर त्याने आपला काय फायदा होणार आहे किंवा त्याचा तरी काय फायदा होणार आहे. ज्याने त्याने आपलं वाईट ठीक करावं आणि दुसर्याचं चांगलं बघून त्याचं चांगल्याचं अनुकरण करावं. हे बघितलं पाहिजे. सहजयोगामध्ये पुष्कळशी मंडळी अशी ही आहेत की जी कधी कधी सेंटरला येतील. कधी येणार नाहीत आणि फक्त मी आले की येतात वगैरे. आता त्याबद्दल सांगायचं असं की हे तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असल्यामुळे तुम्ही स्वत:चाच विचार करून केंद्रावर गेलं पाहिजे. ही एक सामूहिक घटना आहे. हे दिवस गेले की एकट्याने घरी बसून पूजापाठ केले किंवा मंत्रोच्चार केले किंवा हे केलं, ते दिवस गेलेले आहेत. आता हे सामूहिकतेत कार्य होणार आहे. सबंध विराटाचे कार्य असल्यामुळे हे एक सामूहिक कार्य आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल, की, ‘आम्ही आमच्या घरी बसून माताजी, पूजा करतो, हे करतो,’ त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि उद्या येऊन तुम्हीच मला सांगाल की, ‘माताजी, आम्ही एवढा सहजयोग केला तरीसुद्धा आम्हाला एवढा त्रास झाला. सेंटरवर येऊन तुम्ही कोणावर उपकार करीत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला सगळं फुकटच आहे. सेंटरवर येऊन तुम्हाला फक्त स्वत:वरच उपकार केल्यासारखं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर स्वत:वर उपकार करायचे असले तर सेंटरवर यायचे, तिथे भाषणं ऐकायची, त्यानंतर ते जागृतीचं कार्य करायचं आणि तुम्ही संपन्न होऊन घ्यायचं.

अध्यात्माचं जे वैभव आहे त्या वैभवाने तुम्ही अनेक लोकांची जागृती करू शकता. अनेक लोकांना पार करू शकता. आमच्याकडे असे लोक आहेत, ज्यांनी एकेका माणसाने दोन-दोन हजार लोकांना पार करून बसवलेले आहे. तेव्हा मराठवाड्यामध्ये फार मोठं जोरात कार्य व्हायला पाहिजे. तर सहजयोग्यांची स्वत:ची शक्ती प्रबळ असली पाहिजे. त्या समर्थतेतच ते अनेक लोकांना पार करू शकतात. दूसरी गोष्ट म्हणजे एका ठिकाणी गणपतीसारखं बसून चालायचं नाही. चार जागी फिरायला पाहिजे. खेडोपाडी, सगळीकडे जोगवे गायले जातात, भारूड गायलं जातं , सगळ्यांना या संतांची माहिती आहे. मोठमोठ्या संतांनी या मराठवाड्यात जन्म घेतला आहे. येथे मोठमोठाली स्वयंभू देवळं आहेत हे सगळं असूनसुद्धा जर तुम्ही हलला नाहीत तर हे लोक जे धर्मांध आहेत, ज्यांना लोक लुबाडत आहेत, देवाच्या नावाखाली त्यांचा पैसा, आणि त्यांचं सबंध शरीरच वाया जात आहे, त्यांचा बचाव कोण करणार? तेव्हा खेडोपाडी तुम्हीसुद्धा जाऊन असे प्रोग्रॅम घेतले पाहिजेत, त्यांना सहजयोगाबद्दल सांगितलं पाहिजे. त्यांच्याच भाषेत बोललं पाहिजे. फार अशी वाढलेली प्रगल्भ भाषा बोलली तर ते खेडेगावातल्या लोकांना समजत नाही. त्यांच्याच भाषेत त्यांना समजावून सांगायचं की परमेश्वर हा आहे आणि ते मिळविण्याचं साधन अगदी सहज आहे. ते खेडेगावातल्या लोकांना अगदी सहज मिळू शकतं. हा साधेभोळेपणा पुष्कळ आहे. त्याचा उपयोग करून घेतला आहे. इंग्रज लोक तरी इथे इतके दिवस राज्य का करू शकले? कारण आपण असे साधेभोळे आहोत. एकदा जर आपल्यामध्ये चेतना आली आणि आपण चैतन्य स्वरूप झालो , तर मात्र धर्ममारतंडांनी वापरलेला परमेश्वराचं साम्राज्य या जगात येऊ शकतं. आपणच ते आणू शकतो आणि सगळीकडे गरिबी जाऊन, दारिद्र्य जाऊन, सगळ्या तऱ्हेचे कष्ट, दुःख सगळे नष्ट होऊन लोकांना अगदी अबाधित आनंदाचा उपयोग घेता येतो. तेव्हा सहजयोग्यांनी आपल्याकडे लक्षात घेतलं पाहिजे की स्वत:ची स्वच्छता स्वत:चा निर्धार करून आपल्या व्यक्तित्वाला बनवलं पाहिजे. स्वतः आनंदात राहतात सहजयोगी पण दुसर्यांनाही आनंद दिला पाहिजे, ही सामूहिक कल्पना असली पाहिजे. म्हणजे तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक सहजयोग्याने आपल्यावर जबाबदारी घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने समजलं पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे. जसा हा दिवा आहे, हा आपण पेटवला, तर तो आपली जबाबदारी समजतो की मी, माझ्यापुरता सहजयोग नाही, हे माझ्याजवळ ठेवायचं धन नाही आहे, हे वाटायचं धन आहे, ते दसर्यांना दिलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही घ्याल तर सहजयोगात तुम्ही खरोखर पारंगत व्हाल, प्रत्येकाला एक एक गुरू स्थान आहे आणि ते तुम्ही मिळवू शकता. परमेश्वर नुसता आपल्या साम्राज्यात वाट बघतोय, की कधी माझी मुलं येतील आणि मी त्यांना उत्तमपैकी त्यांच्या स्थानावर बसवीन. तेव्हा असा मोघम विचार करून चालणार नाही, की आम्ही आता सहजयोगात आलो आणि आता आम्हाला जागृती झाली, इतिकर्तव्यता झाली की आता ह्याच्यापुढे काही करायला नको. जर खरोखरच तुम्हाला सहजयोगात उतरायचं आहे, तर तुम्ही सामूहिक कार्य केलेच पाहिजे आणि सामूहिक कार्य केल्यावरच तुम्हाला निर्विकल्प समाधी लाभेल किंवा तुम्हाला कळेल की, तुम्ही काही डॉक्टर नाही, तुम्ही काही शिकलेले नाहीत असे असताना तुमच्या हातून रोग कसे बरे होतात! ह्या सगळ्या किमया कशा होतात! जेव्हा या चमत्काराचे अनुभव तुम्हाला येतील तेव्हाच तुमच्या लक्षात येईल, की आम्ही काहीतरी विशेष

झालेलो आहोत, आम्ही योगीजन झालेलो आहे. समजा जर तुम्हाला उद्या आम्ही इंग्रजी पैसे (डॉलर) आणून दिले तर तुम्ही म्हणाल, ‘माताजी, हे आम्हाला काय दिलं तुम्ही?’ ते वापरले पाहिजेत. ते बाजारात नेऊन वापरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तसेच , जे तुमच्या हातामध्ये आम्ही तुम्हाला चैतन्य दिलेले आहे, जी तुम्हाला आम्ही शक्ती दिलेली आहे, ती जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कसं कळेल की ही काय वस्तू आहे ? त्या दृष्टीने मी म्हणते की सर्व सहजयोग्यांनी मेहनत करावी. आता असं पाहिलं की सहजयोगी इथे फार कमी असले तरीसुद्धा ते भरभक्कम आहेत. ज्याचा पाया भरभक्कम आहे त्याचीच इमारत मोठी होते. उगीचच नसते बाजारबुणगे एकत्र करून तरी काय करायचंय ? तेव्हा जेवढे थोडेथोडके लोक आहेत त्यांनी मेहनत करून फार जबरदस्त अशा भरभक्कम पायाची उभारणी केली पाहिजे. त्यावर मग इमारती बांधणं फार सोपं जातं. तेव्हा जेवढे लोक आहेत त्यांनीच मेहनत करून स्वत:ला अगदी व्यवस्थित ध्यान-धारणा वरगैरे करून त्यात आपली वाढ करून एक फार उच्च तऱ्हेच्या सहजयोग्यांचे म्हटलं पाहिजे, टोळकच तयार केलं पाहिजे, की त्यांना पाहिल्या बरोबर लोकांना असं वाटलं पाहिजे की आले कोणीतरी विशेष! अशा लोकांच्या किमया सांगाव्या तेवढ्या कमी आहेत. अशी तीन माणसं जरी झाली तरी गावातली सगळी बाधा पळून जाणार. गावातलं सगळं जेवढं दैन्य आहे ते पळून जाणार. त्यांचा इतका परिणाम होतो. कारण तुम्ही परमेश्वराचे साधन होता आणि त्यांच्यातून परमेश्वर आपलं कार्य करीत असतो. तेव्हा एक जरी मोठा साधु-संत झाला तर त्याचा एवढा परिणाम होतो, तुम्ही तर एवढे मोठे साधु-संत आणि योगी आहात! तेव्हा आणि तुम्हाला काय परमेश्वराने द्यावं आणि काय नाही द्यावं. तुमच्यासाठी काय करावं आणि काय नाही करावं. आणि ही जी आपल्याला फार मोठी संधी मिळालेली आहे, त्यातून आपल्याला काय मिळू शकतं, काय मिळालेलं आहे आणि काय मिळवायचं आहे. त्या विचारानेच मनुष्य आश्चर्यचकित होईल की केवढं मोठं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण किती केलेला आहे. तेव्हा कृपा करून सहजयोग हे एक जीवन लक्ष्यच नव्हे तर जीवन झालं पाहिजे. माणसाच्या जीवनात सहजयोग आला पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्हाला दुसर्या कोणत्याच गोष्टीची आवड वाटणार नाही. कारण खरोखर अमृताचा अनुभव त्याच्यात येतो.