Public Program, Adhyatma mhanje atmyala prapt karne

Shrirampur (India)

1990-12-09 Public Program, Marathi Shrirampur India DP-RAW, 118'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Sarvajanik Karyakram Date 9th December 1990: Place Shrirampur Public Program Type

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सत्य आहे ते आहे. ते आपण बदलू शकत नाही. त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की ह्या मानवी चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. आज ‘ग्यानबा तुकाराम’ च भजन ऐकलं, तेव्हा फार आनंद वाटला, की अजून त्यांचं स्मरण लोकांना आहे आणि त्यांचं नाव घेत आहेत. त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी परमेश्वर मिळवला पाहिजे आणि त्यासाठी देवाची आठवण ठेवली पाहिजे. कारण त्यांनी जर एक गोष्ट सांगितली नसती, तर आपण एवढ्या भक्तीच्या मार्गात राहिलो नसतो. कधीच आपली वाट लागली असती. स्वातंत्र्य मिळालं आहे, इतके दिवस झाले, तरीसुद्धा अजून आपण धर्मात उभे आहोत. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. धर्म म्हणजे पैशाचा खेळ नव्हे. धर्मासाठी एवढं जाणलं पाहिजे, की आपल्या अंगात बाणलेलं एक काहीतरी विशेष परमेश्वराने दिलेलं एक महान गुणांचं, एक भांडार आहे. पण ते झाल्यावरसुद्धा आपल्याला धर्म समजत नाही. समजा आपण हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिस्ती असो, कोणत्याही धर्माचे असो, तरी मनुष्य कोणतेही पाप करू शकतो. म्हणजे आश्चर्य वाटतं , की हा मनुष्य स्वत:ला जागृत धार्मिक म्हणवतो, देवळात जातो, घंटा वाजवतो, देवासमोर बसून इतकी प्रवचनं ऐकतो, सगळं काही आहे, आणि तरीसुद्धा हा मनुष्य असे पापकर्म तरी कसे करतो ? म्हणून शंका येते आणि मग लोक म्हणू लागतात, की देवधर्म वगैरे सर्व खोटे आहे आणि ती गोष्ट खरी आहे. पण हे अशास्त्रीय बोलणं झालं. तुम्ही आधी ओळखा, परमेश्वर आहे की नाही. त्याचा आधी पत्ता लावला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पत्ता लावत नाही, तोपर्यंत असं म्हणू शकता की, ‘परमेश्वर आहे की नाही हे मला माहीत नाही.’ पण सगळ्यांनी हे सांगितलं आहे, की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आत्मसाक्षात्कार घेत नाही तोपर्यंत आपल्या ज्या काही देवाबद्दल भ्रामिक कल्पना आहेत, त्या नष्ट होणार नाहीत आणि आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. जीवा-शिवाचा संबंध झाला पाहिजे. असं प्रत्येक संतांनी सांगितलं आहे. संतांचं कार्य अगाध आहे, विशेषत: महाराष्ट्रटरात, एवढं त्यांनी कार्य केलेले आहे, एवढी मेहनत घेतली आहे, अहोरात्र मेहनत घेतली आहे. आणि बाराव्या शतकात, आपल्याला माहिती आहे, की ज्ञानदेव हे पृथ्वीवर अवतरले. त्यावेळेला एक नाथपंथी असा, फार मोठा एक विचार किंवा कार्यक्रम होत असे. पण तो अत्यंत गुप्त रूपाने होत असे. नाथ लोकांमध्ये अशी प्रथा होती, परंपराच होती, की एका गुरूला एकच शिष्य असायला पाहिजे. तेव्हा एक गुरू एकाच शिष्याची कुंडलिनी जागृत करीत असे आणि त्यालाच कुंडलिनीचे ज्ञान देत असत. इतर लोकांना देत नसत. ते ज्ञानदेवांनी शेवटी, आपले जे गुरू निवृत्तीनाथ, त्यांचे मोठे बंधू, त्यांच्याजवळ मागणी केली की, ‘कमीत कमी हे ज्ञान मला सर्व जगाला सांगू द्या. जरी ते देता आलं नाही तरी मला सगळ्यांना सांगू द्या. ती आपली पहिली सामाजिक क्रिया घडली, की त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायात उघडपणे सांगितलं की हे कार्य कुंडलिनीमुळे होतं. त्यानंतर त्यांनी अमृतानुभव म्हणून फार सुंदर, अत्यंत सुंदर ग्रंथ, मला असं वाटतं की ন

तो ग्रंथांचा राजाच म्हटला पाहिजे, असा सुंदर ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये पारलौकिक जेवढं सुख आहे, त्याचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. तेसुद्धा जो साक्षात्कारी मनुष्य नाही, त्याला समजू शकत नाही. त्यानंतर अनेक लोकांनी ह्याच्यावर मेहनत केली. तसं म्हटलं तर कुंडलिनीबद्दल संस्कृतमध्ये बरेच काही आख्यान केलेले आहे. तर आपण म्हणू शकतो, की मार्कंडेय स्वामींनी चौदा हजार वर्षापूर्वी कुंडलिनीचं वर्णन केलं होतं . आणि त्याच्यानंतर मग आदि शंकराचार्यांनीसुद्धा सहाव्या शतकामध्ये ह्याचे वर्णन केलेले आहे. चांगलेच, स्पष्ट रूपाने. पण ते संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे जनसमाजासमोर ते आलं नाही आणि बाकी धर्ममार्तंड जे होते, त्यांना कुंडलिनीचा गंध ही नव्हता आणि तिकडे लक्षही नव्हतं. नुसतं आपलं पांडित्य दाखविण्यापलीकडे त्यांना दूसरं काही येत नव्हतं. अशा लोकांनी तिकडे लक्ष दिलं नाही. आणि ही काही तरी गोपनीय वस्तू आहे असे समजून त्याला एका बाजूला सारून ठेवलं. ज्ञानेश्वरांनी फार मोठे उपकार आपल्यावर केलेले आहेत. त्यांनी हे उघडपणे सांगितलं. हे उघडपणे सांगितलं हे बरं झालं. त्याच्यानंतर अनेक लोकांनी कुंडलिनीवर भाष्य केलेले आहे. पैकी मुख्यत: नानकसाहेब आणि त्यानंतर कबीरदास . नानकसाहेबांनी नामदेवांची महती ओळखली. जेव्हा नामदेव तिथे गेले. त्यांनी त्यांना पाचारण केलं आणि सांगितलं की, ‘तुम्ही थोडीशी पंजाबी भाषा शिका आणि पंजाबी भाषेतही तुमचं थोडसं काव्य करा. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यांची एवढी मोठी गाथा त्यांनी पंजाबीत लिहिली. त्यात अगदी पुष्कळ, शुद्ध मराठीतसुद्धा गाथा आहेत आणि ते लोक जे ग्रंथसाहेब वाचतात, तर मी एकदा त्यांचा दरबार असतो त्याला गेले होते, तर शुद्ध मराठीमध्ये ते ओव्या म्हणत होते. म्हटलं, हे आलं कसं त्यांच्या डोक्यात, पंजाब्यांच्या डोक्यात. तर कळलं की त्या ज्या आहेत, त्या नामदेवांच्या ओव्या आहेत. जनाबाईंच्यासुद्धा ओव्या त्यांच्या ग्रंथसाहेबमध्ये त्यांनी एकत्र केल्या. कारण त्यावेळेला नानकसाहेबांना वाटलं, की सगळ्या तऱ्हेचे भामटे लोक देवावरती कविता करतात, जे संत नाहीत. असंतांनी केलेल्या कविता पुष्कळ बोकाळल्यामुळे त्यांनी असं ठरवलं , की फक्त जे संतांनी, संत म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला असे लोक, ह्या लोकांनी केलेल्या कवितांचं संकलन करावं आणि म्हणून तो ग्रंथसाहेब त्यांनी केला. पण तो ग्रंथसाहेबसुद्धा झाल्यावर, मग कारय त्यांनीच म्हटलं, ‘काहे रे बन खोजन जायी’, कशाला जंगलात जातोस तू, ‘काहे रे बन खोजन जायी, सदा निवासी, सदा आलेपा, तोहे संग समाये’, तुझ्यामध्ये समावलेले आहे, तू इकडे तिकडे का भटकायला जातोस? असं स्पष्ट सांगितलं. ‘कहे नानक बिन आपाची’, ‘आपाची’ ने म्हणजे स्वत:ला ओळखल्याशिवाय, स्वत:चं ज्ञान आल्याशिवाय, आत्मज्ञान आल्याशिवाय, ‘मिटे न भ्रम की खाई’, पण ते ही आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत घोकत बसलो. असं झालं की समजा आपल्याला डोकेदखी झाली, आणि म्हटलं की डोके दुखायचा बाम लावून घ्या डोक्याला. तर ते आम्ही घोकत बसलो, बाम लावून घ्या, बाम लावून घ्या. त्याने डोकेदुखी जाईल की जास्त होईल. तशातला हा प्रकार आहे. वाचून परमेश्वर मिळणार असता, तर ह्यातले किती लोक युनिव्हर्सिटीत गेले असते आणि किती लोकांना वाचायला येत असतं. काहीतरी अशी किमया आहे, की ज्याने आपला संबंध ह्या ब्रह्मचैतन्याशी झाला पाहिजे. मग सत्य काय आहे? सत्य हे आहे, की आपण सर्व आत्मा आहोत. हे शरीर, बुद्धी, अहंकार आदी ह्या उपाधी आहेत. पण आपण शुद्ध आत्मा आहोत. दुसरे सत्य काय आहे, की सर्व सृष्टी एक अत्यंत सूक्ष्म, अत्यंत पवित्र आणि अत्यंत

शक्तिशाली अशा एका शक्तीने व्यापलेली आहे. ह्या शक्तीला आपण ब्रह्मचैतन्य असं म्हणतो. कोणी काय म्हणतं, कोणी रूह म्हणतं. तर कोणी त्याला ऑल परवेदिंग पॉवर ऑफ गॉड म्हणतं. ही प्रेमशक्ती आहे. ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे. आणि त्या शक्तीमुळे जगातील जेवढी आपण रोजची जिवंत कार्य बघतो, ती सर्व घडत असतात. आता हे फूल इतक सुंदर आहे इथे. हे एका बी पासून इतकी सुंदर फुलं, पानं आली, ही बघा कितीतरी फुलं आहेत. आपण विचारसुद्धा करीत नाही, की हे आले कसे ? ही पृथ्वी दिसायला अशी दिसते आणि हे बी दिसायला असं दिसतं. आपण ते पेरलं काय आणि ते झालं काय? आपण विचारसुद्धा करीत नाही. हे सर्व कार्य ही सूक्ष्म सृष्टी करीत असते. तिला सगळे समजतं. आता एक आंब्याचं झाड एका उंचीपर्यंतच वाढेल, एका फळाचं झाड, एका फुलाचं झाड किंवा त्यांना एकच उंची जी असेल ती. त्याच्यावर ती वाढत नाहीत. नारळाच्या झाडासारखे गुलाबाचे झुडूप वाढणार नाही. हे सगळे कोण सांभाळतं ? आपल्यामध्येसुद्धा त्या शक्तीचा आपण अजाणताच उपयोग करीत असतो. आणि ती शक्ती, तिला वैद्यकीय लोक ऑटोनॉमस नव्ह्हस सिस्टीम म्हणजे स्वयंचालित संस्था असे म्हणतात. स्वयं म्हणजे कोण? आता विचारलं त्यांना अहो, तुम्ही स्वयंचालित म्हणता. आता मोटारीला आपण म्हणतो स्वयंचालित. मोटारीत एक ड्रायव्हर असतो नां, मग हा कोण? नुसत स्वयंचालित म्हणून एक नाव तुम्ही दिलं, पण हा कोण स्वयं आहे? हा स्वयं कोण, तर तुमचा आत्मा त्याने चालविलेली ही शक्ती आहे. म्हणून तिला आपण स्वयंचालित संस्था असं म्हणतो आणि तीचा चालविणारा जो आहे तो हा आत्मा आहे. पण हा आत्मा आपल्या हृदयात असतो आणि त्या हृदयातून तो आपल्या सर्व हालचाली बघत असतो. लक्ष असतं त्याचं. पण आपल्या चित्तात त्याचा प्रकाश आलेला नसतो. म्हणून आपण अंध:कारात होतो. आणि म्हणून आपल्यामध्ये जे दर्गण आहेत, दोष आहेत ते त्या अंधारामुळे येतात, त्या अज्ञानामुळे येतात. समजा इथे जर अंधार असता तर आपल्याला कळलंच नसतं कोण कुठे बसले आहे. आपण एकमेकांना चेंगरत गेलो असतो आणि लक्षात नसतं आलं की आपण काय चुका केल्या आहेत. तेव्हा अध्यात्म म्हणजे आत्म्याला प्राप्त करणं आणि परमेश्वराच्या साम्राज्यात वावरणं, हे खरं अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे पारायणं करणं, लोकांकडून पैसे उकळणं आणि खोट्या प्रकारे, दांभिकपणाने लोकांना काहीतरी सांगणं ह्याला अध्यात्म म्हणत नाही. अध्यात्माचा अधिकार फक्त संतांना आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचासुद्धा अधिकार नुसता संतांनाच आहे. कारण त्यांची डोळस श्रद्धा आहे. ज्यांची श्रद्धा डोळस नाही, ते स्वत:च आंधळे असल्यामुळे ते काय अंधश्रद्धा निर्मूलन करणार! तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे, अध्यात्म म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात उतरून मनसोक्त आंनंदात पोहणे ह्याला आपण अध्यात्म म्हणूयात. जे आनंदाच्या सागरी, आनंदाच्या डोही जे म्हटलेले आहे, ते खरं अध्यात्म आहे आणि त्या अध्यात्मामध्ये फक्त त्याची जाणीव, त्याचा आनंद आणि त्यात रममाण होणे हे आहे. त्याच्यावर विचार करू शकत नाही आपण. त्या अनुभवाचा विचार करता येत नाही. अनेक तऱ्हेतऱ्हेने जरी ज्ञानेश्वरांनी एवढी मेहनत करून समजवलं की हा अमृतानुभव आहे, तरीसुद्धा तो अनुभव आल्याशिवाय, ती चव मिळाल्याशिवाय त्याबद्दल सांगणं म्हणजे कठीण आहे. परमेश्वराने आपल्यामध्ये ही व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि ही आपल्यात आहे, हे आपल्याला अनेक वर्षापासून माहिती आहे.

जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा आपल्याला बोध होतो. बोध म्हणजे काही भाषण नव्हे. बोध म्हणजे आपल्या या नसांवर, आपल्या बोटांमधून आपल्याला हे परम चैतन्य जाणवू लागतं. मग या बोटांवर आपल्याला कळू लागतं. जसा कॉम्प्युटर असतो, तसं यंत्रासारखं आपल्याला कळू लागतं या बोटांवरून की आपली कोणती चक्रं धरली आहेत ? दुसऱ्यांची कोणती चक्रं धरली आहेत ? ही सहा जी सूक्ष्म चक्रं आहेत ती आपल्या हाताला लागतातच आणि जे सातवं चक्र आहे तेसुद्धा हाताला लागतं. मग या माणसाला किंवा आपल्याला कोणता त्रास आहे ते आपण समजू शकतो. ते समजल्यावर, जर आपल्याला माहिती असलं की ते नीट कसं करायचं, तर आपली प्रकृतीसुद्धा ठीक होऊ शकते आणि दुसर्यांची प्रकृती आपण ठीक करू शकतो. म्हणजे एवढे आपण शक्तिशाली आहोत. परमेश्वराने आपल्याला फार शक्तिशाली बनवलेले आहे. फक्त हा संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. नामस्मरणाने एवढं मात्र होतं, की लक्ष परमेश्वराकडे असतं. पण जर ते अतिशयतेत गेलं तर मग ते कर्मकांड होऊन बसतं. सकाळी उठले, पूजेला पाटावर बसले, बायकोवर ओरडले, इकडे ओरड, तिकडे ओरड, मग दोन -चार फुले वाहिली देवाला, मग त्याच्यावर ओरडले, हे काही नाही. जर परमेश्वराचं नाव घ्यायचं असलं तर एकदा घेतलं तरी पुष्कळ आहे. कारण ते परमेश्वर आहेत. पण अनेकदा त्यांचं नाव घेणं…. मला असं कळलं की इथे त्यांची सव्वा लाख नावं घेतात. अहो, सव्वा लाख कशाला पाहिजे? एकदा परमेश्वराचं नाव घेतलं की झालं! पण जसं टेलिफोनला कनेक्शन नसलं, मग तुम्ही सव्वा लाख वेळा फिरवा नाहीतर तीन लाख वेळा फिरवा तुमचा काय संबंध होणार आहे? सरळ एक साधी गोष्ट आहे, की आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. साधु-संतांनी एवढ्यासाठी सांगितलं, की आपण देवापासून दूर गेलं नाही पाहिजे. म्हणून देवाची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं, की देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाकडे लक्ष ठेवलं पाहिजे, पण त्यांना काय माहिती, की मनुष्य कसा आहे? खरोखर मला असं वाटतं , की संतांना माणसाची काही माहितीच नाही. जर असती तर त्यांनी असं सांगितलं नसतं. कारण आपण बघतो, की हातामध्ये माळ घ्यायची आणि सगळ्यांचे गळे कापत फिरायचे, हे आपल्याला रोजच दिसत आहे. दांभिकपणा आपल्याला रोज दिसतो. तेव्हा वाटतं की हे कसं काय संतांनी सांगितलं? पण संतांचे ह्याच्यात काही चुकलेले नाही. संतांना माहितीच नव्हती की मनुष्य कसा आहे ? कोणत्याही गोष्टीला अतिशयतेला जातो . त्याचं जे सार आहे, ते तो विसरून जातो . त्याचं सार काय? ते लक्षात घेत नाही. चोखामेळा पासून ज्ञानेश्वरांपर्यंत, रामदासांपासून तुकारामांपर्यंत सगळ्यांची जर तुम्ही एक चादर विणली तर ती सबंध अध्यात्म आहे. आता अशा अध्यात्माचं वर्णन कोणी करावं! आज मला इतका आनंद झाला, की आपण इतक्या उत्साहाने, इतक्या अगत्याने हा समारंभ घडवून आणला. मी एक आई आहे आणि आईच्या दष्टीने जे काही असेल, ते म्हणजे सांगायचं असं, की ही तुमची कुंडलिनीसुद्धा तुमची आई आहे. आई म्हणजे तुमची स्वत:ची व्यक्तिगत आई आहे. प्रत्येकाची आई वेगळी नसते. एका आईला दहा-दहा मुलंसुद्धा असतात. पण ही तुमची आई आहे, फक्त तुमची. आणि सगळं काही तुमच्याबद्दल हिच्यात नमूद आहे. तिला माहिती आहे, की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचे पूर्वजन्म काय, तुम्हाला पुढे काय पाहिजे, तिला सगळी माहिती आहे. आणि आज ती अगदी आतूर आहे, उत्कंठीत आहे, की तुम्हाला हा पुनर्जन्म द्यायचा. ती तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे. माझं ह्याच्यात काही देणं घेणं लागत नाही. आता तुम्ही बघितलं की इथे या इतक्या मेणबत्त्या आहेत. एका मेणबत्तीपासून दुसरी मेणबत्ती पेटते. त्यात तुमचं

देणं-घेणं काय लागतं? तेव्हा आपल्यामध्ये ही जी कुंडलिनी आहे तिचं जागरण करून घेतलं पाहिजे. आता ही तुमचीच आहे. ‘तुज आहे तुजपाशी’ ते काय? ती सत्ता कोणती? ती संपदा कोणती? ती तुमच्याजवळ आहे. ती फक्त एकदा कुंडलिनी जागृत झाली की मग ती ब्रह्मरंध्र छेदून जेव्हा त्या सर्वशक्तिमान ब्रह्मचैतन्याशी एकाकारिता साधते त्यालाच योग म्हटला पाहिजे. बाकीच्या योगाच्या पायऱ्या आहेत. आज त्या पायऱ्यांची गरज नुसत्या नाही. माझे जे काही कार्य असेल, तर ते हेच की मी ह्या सर्व उलाढाली न करता, कारण आजकाल लोकांकडे वेळ कुठे आहे? म्हणून ‘आधी कळस मग पाया’ अशा रीतीची मी व्यवस्था केलेली आहे, की आधी कुंडलिनी जागृत करून द्या. आधी मी तुम्हाला लेक्चर दिले, की हे नका करू, ते नका करू, ते काहीच पटणार नाही. पण काय होईल, की कुंडलिनी जागृत केली म्हणजे त्या अंधूक प्रकाशात तुम्ही बघाल. समजा तुम्ही हातात साप धरला आणि मी म्हटलं की हा साप आहे आणि अंधार असला आणि तुम्हाला दिसत नाही, तुम्ही म्हणाल, ‘कशावरून ? आम्ही म्हणतो दोरखंडच आहे.’ आणि धरून बसले. तो चावेपर्यंत धरूनच बसणार तुम्ही. पण तेव्हा थोडासा जरी प्रकाश आला, त्या अंधूक प्रकाशातसुद्धा तुम्ही बघू शकता की हा साप आहे. मग तुम्ही स्वत:च सोडून द्याल. म्हणून मी म्हणते, की तुम्ही स्वत:चेच गुरू व्हा. काही गुरूंची गरज नाही. काही नाही. तुम्ही स्वत:चे गुरू होऊन जाल. म्हणजे सांगायचं असं, की ही जिवंत क्रिया आहे. जसं आपण जमिनीमध्ये बी पेरतो, तसं परमेश्वराने आपल्यात कुंडलिनीचे बी पेरलं आहे. ती जागृत झाली आणि तिचा संबंध जेव्हा ह्या शक्तीशी झाला, त्याने आपल्याला सर्वप्रथम म्हणजे शारीरिक लाभ होतो. त्याला कारण असं, की ही जी चक्रं आहेत, ती जेव्हा काही कारणाने फार उपयोगात येतात तेव्हा त्यातली शक्ती संपून जाते. आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते, तेव्हा ती त्यांना त्यांची शक्ती देते . शक्ती दिल्यावर मग शेवटी ती त्या शक्तीपूंजाकडे, म्हणजे ह्या सगळीकडे व्यापलेल्या त्या महान शक्तीकडे जेव्हा धाव घेते आणि तिचा संबंध होतो तेव्हा तेथून अव्याहत शक्ती वहात असते. मग काहीही काळजी करण्याचं कारण नाही. हे इतकं सहज आणि सरळ आहे. त्याच्यासाठी काहीही करावे लागत नाही. विशेषत: म्हणजे ह्यांच्या डोक्यावर उभं रहायला नको किंवा त्याच्यासाठी काही पैसे द्यायला नको. म्हणजे असं होईल की आपण जमिनीला पैसे द्यायचे आणि सांगायचं की, ‘बाई, हे पैसे घे. मला आता इथे ऊसाचं पीक काढायचं आहे.’ तशातला हा प्रकार. तेव्हा ह्या शुद्ध कार्यासाठी, ह्या जिवंत कार्यासाठी तुम्ही किती पैसे देणार? आता देवाच्या नावाने. अहो, त्या देवाला काही पैसे समजतात का? त्याला पैसे कशाशी खातात माहिती आहे का ? तुम्हीच पैसे काढलेले आहेत, तुम्हीच बँका काढलेल्या आहेत. देवाकडे काही बँक नाहीये. त्याचं काम एवढेच लोक खूप पैसे देतात. लोकांच्याकडून खूप पैसे उकळतात आहे, की तुम्हाला त्याच्या साम्राज्यात बोलवायचं, प्रेमाने बसवायचं आणि तुम्हाला आनंदाच्या खिरापती वाटायच्या. दुसरा काहीही परमेश्वराचा उद्देश नाही. म्हणून त्याने आपल्याला मानव केले आहे. आता थोडेसेच पुढे जायचे आहे. प्रवास फार लहानसा आहे आणि हा सबंध प्रेमाचा प्रभाव आहे. सगळं प्रेमाचं कार्य आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा व्यापार करता येत नाही. हे प्रेम आहे. आईच्या प्रेमाचा व्यापार कोणी केलेला ऐकला आहे का? तशातलाच प्रकार आहे हा. तेव्हा ही तुमची आई तुमच्यामध्येच स्थित आहे आणि ती तुम्हाला जागृती देते.

आता ह्यावर पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे, की मेडिकलमध्ये कुंडलिनीचं नाव नाही. आज नाही तर उद्या येणारच आणि झालेच आहे तसे. आता हळूहळू परदेशामध्ये विशेषतः रशियामध्ये लोकांनी लक्षात घेतलं आहे. शहाणे लोक आहेत. फार शहाणे आहेत. आपल्या इथल्या लोकांसारखे नाही, की अर्धवट इकडे तर अर्धवट तिकडे. ना धड त्या स्थितीला पोहोचले ना धड आपल्या भारतीय परिस्थितीत आहेत. ह्या लोकांना असं वाटतं, की ते लोक अगदी स्वर्गात बसले आहेत. अशातली मुळीच गोष्ट नाही. त्यांनी एकांगीपणाने आपल्या सायन्सला वाढवलं आणि भौतिक प्रगती केली, त्याचे त्यांना इतके त्रास आहेत, इतके त्रास आहेत, की आपण त्यांच्यापेक्षा फार सुखी आहोत. आपल्याला माहितीच नाही, की त्यांना किती त्रास आहेत आणि केवढे भयग्रस्त आहेत ते. कारण काय आहे, की सायन्स हे एकांगी आहे. सायन्सला जोपर्यंत अध्यात्माचा पाया मिळणार नाही तोपर्यंत ते एकांगी स्वरुपाचं तुमचं जे भवितव्य आहे, ते नाशवंत आहे आणि ते सर्वांना नष्ट करेल आणि लोक नष्ट होत आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, अमेरिकेसारख्या देशामध्ये ६५% लोक भयंकर घाणेरड्या आजाराने ग्रासलेले आहेत. त्याचा काहीही इलाज त्यांना मिळत नाही. कसं करायचं ते समजत नाही आणि हे ६५% लोक आहेत. त्याशिवाय बाकीचे जे लोक आहेत त्यांना ही भीती बसली आहे, की आम्हालाही हा रोग लागेल. आणि तिथे नाना प्रकारचे इतके विक्षिप्त रोग आहेत, की त्या रोगांचं काही निदान लागलेलं नाही आणि ते कसं ठीक होईल हे त्यांना समजत नाही. रोगाचीच गोष्ट नाही, तसंच मारामारी. तुम्ही न्युयॉर्कला गेलात तर हातात सोन्याच्या बांगड्या वरगैरे काही घालून जाऊ शकत नाही. मंगळसूत्र राहू शकत नाही. सगळं ओढून घेतील. इतके तिथे हिंसाचाराचे प्रकार आहेत. फार जास्त आहेत. आणि त्या हिंसाचारामुळे ते लोक इतके त्रासले आहेत, की त्यांना आता समजत नाही की करायचं तर काय करायचं? तेव्हा आपला जो अध्यात्माचा पाया आहे, जो आपला वारसा आहे, ही फार मोठी आपल्याजवळ संपदा आहे, फार मोठी संपदा आहे. कारण ती नैतिक मूल्य आहेत. ज्याने आयुष्याला एक तऱहेचं संतुलन येतं, ज्याने मानवाला जनावरापासून वेगळें करू शकतो अशी जी फार मोठी संपत्ती आपल्याजवळ आहे, ती जर आपण पूर्णपणे वाढवली, तर हे सगळे बाहेरचे दोष आपल्या पायावर येतील. येतातच आहेत. पाहिलंत आपण धावून आलेत. हे बिचारे महाराष्ट्रात कशाला आले? त्यांना दिसतंय नां, संत आहेत सगळे. इथं सगळे चैतन्य भरलेलं आहे. सगळीकडे प्रकाश म्हणून आम्ही इथे आलो. आपल्याला दिसत नाही. ‘जिथे पिकतं तिथे विकत नाही.’ त्यातली गोष्ट आहे ही. त्यात काहीतरी दीडशहाणे किंवा रिकामटेकडे लोक असं म्हणायला तयार झालेत की हे सगळं खोटं आहे आणि परमेश्वर नाहीच. त्यामुळे या गळचेपीमुळे आपलं अध्यात्म मागे पडलेले आहे. अध्यात्माचा पाया फार जरुरी आहे. त्याच्यावर तुम्ही वाट्टेल ती प्रगती केली, कोणत्याही तऱ्हेचं तुम्ही पाऊल टाकलं, तरी ते संतुलनात राहील आणि प्रगती सर्वांगीण होईल, एकांगी होणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणार नाही, तोपर्यंत तुम्ही ना धड इकडे ना धड तिकडे अशी आपली परिस्थिती होणार आहे. तेव्हा आपल्याजवळ जे आहे ते आपण आधी मिळवलं पाहिजे. आपली जी संपदा आहे ती मिळवली पाहिजे. सायन्समध्ये आपण कुठवर जाऊ शकतो! शेवटी जाऊन तिथे खड्ड्यात पडले ते दिसतंय. मग आपण कशाला त्यांच्या मागे जायचं. पहिले आपला पाया ठीक केला पाहिजे आणि तो अध्यात्माचा पाया आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टींचं मला आश्चर्य वाटतं. मला जन्मात कधी आमच्या वडिलांच्याकडे, (तेसुद्धा फार मोठे संत होते,) दारू म्हणून काय असतं ते मला माहिती नव्हतं. मी दारू कधी अशी डोळ्याने पाहिली नाही. काही माहिती नव्हतं आणि आमच्या लहानपणी कधी ह्या गोष्टी कानावरसुद्धा आल्या नाहीत. त्या आजकाल होतात. आमचे साहेब जेव्हा मेरठला कलेक्टर होते, तेव्हा लाचलुचपत असे घेतात लोक हे काही आम्ही ऐकलच मला नव्हतं. त्यावेळेला होतच नसे. फार तर एखादा चपराशी वगैरे एक-दोन रुपये घेत असेल तर घेत असेल. पण आम्ही कधी ऐकलं नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, की मी बाहेरून आता इकडे येते तर मला आश्चर्य वाटतं, की जिथे जाल तिथे हा पैसा खातो, तो पैसा खातो, म्हटलं, ‘काही जेवत नाहीत का? नुसते पैसेच खात रहातो! अशा तऱ्हेची स्थिती का आली कारण आपला अध्यात्माचा पाया नाही बसलेला. हे संत-साधू, कधी पैसे खाल्ले असते का त्यांनी? दारू प्यायले असते का ते ? त्यांनी असलं वागणं केलं असतं का? कधीही करणार नाहीत. कारण काय? त्यांची जी पातळी आहे ती किती उच्च होती! ती तुम्ही विचाराने समजू शकत नाही, पण त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटेल की किती आदर्श लोक होते ते सगळे. बरं, त्यांच्यात जात-पात काही नव्हतं. एकनाथ महाराज महारांच्या घरी जेवायला जायचे आणि जेवले. त्यांना काही धर्ममार्तंड मारायलासुद्धा आले. त्यांनी काही कोणाची पर्वा केली नाही. कारण सगळे परमेश्वराने बनवलेले लोक आहेत. जाती-पाती हा मनुष्याने बनवलेला प्रकार आहे. त्यात परमेश्वराचा काय संबंध आहे! परमेश्वराने सगळ्यांना एकसारखे बनवलेले आहे. तेव्हा जात- पात ह्याकडे लक्ष न देता त्यांचं म्हणणं एवढंच होतं, की गरिबांचा फक्त उद्धार झाला पाहिजे. पण गरिबांचा उद्धार तुम्ही कसा करणार? गरिबांचा उद्धार नुसतं बोलून होणार नाही. त्याच्यासाठी सहजयोग घ्यायला पाहिजे. सहजयोगाने अनेक चमत्कार घडले आहेत. त्यातला एक आहे, सहजयोगी कधी गरीब रहात नाही. तो गरीब रहात नाही. कारण त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते. लंडनला आपल्याला आश्चर्य वाटेल की, मी तिथे इतका वेळ घालवते, जितका महाराष्ट्रात घालवते. पण आमच्या सहजयोगात इतके लोक आलेत , सहजयोगी तिथले. इंग्लिश लोक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, किती कठीण आहेत. पण तेसुद्धा इतके वाकून त्याच्यात आले आणि नम्रतेने त्यांनी सहजयोग घेतला. आणि विशेष सांगायचं म्हणजे की इतकी बेकारी तिथे असतानासुद्धा सहजयोगात एकदा आले की त्यांची बेकारी गेली. एकही सहजयोगी बेकार मिळणं म्हणजे कठीण. तेव्हा आश्चर्य वाटेल, की आपल्या देशाची जी दर्दशा आहे तीसुद्धा सहजयोगाने नष्ट होऊ शकते. कारण सर्वशक्तिमान परमेश्वरच जर आपल्या पाठीशी येऊन उभा राहिला, की तर आपल्याला कोण त्रास देणार आहे! तेव्हा मनुष्याची बुद्धीसुद्धा एकदम प्रगल्भ होते, वाढते. इंग्लंडमध्ये दोन लोकांना सायन्समध्ये डॉक्टरेट मिळाली आहे. एकाला फिजिक्समध्ये आणि एकाला केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट मिळाली आहे. सहजयोगी आहेत दोघेही आणि त्यांनी सहजयोगाच्याच माध्यमातून सर्व आमच्या शोध लावले. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये तीन डॉक्टरांना एम.डी. ची पदवी मिळाली. म्हणजे हे सगळं, त्यांनी जे काही केलेले आहे, त्याच्यात फक्त मी त्यांना सल्ला दिला की हे तुम्ही अशा रीतीने प्रयोग करा आणि हे सिद्ध होईल आणि तसेच झाले. तसे झाल्यावरती ते परिमाण मात्र सगळे शास्त्रीय, सायंटिफिकच आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं. तरीसुद्धा हिंदीमध्ये अशी म्हण आहे की ‘बकरी की तीन टाँग’ म्हणजे बकरीच्या मागचे तीन टाँग धरायचे आणि म्हणायचे एक, दोन, तीन. त्याला म्हटलं हा पाय सोड, तर तिकडून धरायचं आणि म्हणायचं एक, दोन, तीन.

तशातले इथे काहीतरी हट्टी लोक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की सायन्स आणि अर्यात्म यांचा काहीही संबंध नाही आणि अध्यात्मात मनुष्य गेला तोच गरिबीत उतरतो. आपल्या हिंदुस्थानातल्या अध्यात्माबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही अध्यात्म घेतला म्हणून आम्ही गरीब झालो. माझं असं म्हणणं आहे, की आपण आत्मसाक्षात्कार घेतला नाही. ज्याला हे लोक अध्यात्म म्हणतात तो चुकीचा आहे. आजपर्यंत जे तुम्ही देवाला आळवत बसले, इतक्या वाऱ्या केल्या त्याचं सार्थक व्हायची वेळ आल्यावर अजून कशाला वा्या करता ? ज्यासाठी तुम्ही वाऱ्या केल्या, ते झालं, पूर्ण झालं. आता आपलं मिळवून घ्या. त्यावर त्यांचं म्हणणं आहे की, ‘नाही आमचा कर्मभोग आहे.’ हे कोणी सांगितलं तुम्हाला ? ‘एक आमचे गुरू आहेत त्यांनी सांगितलं की हा तुमचा कर्मभोग आहे.’ ‘मग तुम्ही गुरूला कशाला ठेवलं ? त्याला म्हणावे आमचा कर्मभोग काय?’ असा जर गुरू आहे, जो तुम्हाला कर्मभोगाच्या गोष्टी सांगतो, तर त्याला म्हणावं की मग तू आमचा गुरू कशाला आहेस? तुझा काय फायदा आम्हाला ? निदान आमची प्रकृती तरी ठीक ठेव. तेही ठेवता आलं नाही, तर अशा गुरूला ठेऊन तुम्ही काय करणार? तर असेही पुष्कळसे लोक आपल्या देशात बोकाळले आहेत. तर एकीकडे असे लोक की जे विज्ञानाच्या नावावर उड्या मारताहेत आणि दुसरीकडे लोक असे आहेत, की जे धर्मभोळे आहेत आणि हे साध्या लोकांना लुटून त्यांना धर्माच्या गोष्टी सांगतात. त्याच्या मधोमध हा सहजयोग सत्यावर आधारलेला आहे. सत्य आहे हे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सत्याचा अनुभव येईल. तुम्ही स्वत:च सांगाल की, ‘माताजी, आमच्या हातात चैतन्य लहरी आल्या.’ तुम्ही स्वत:च सांगाल की, ‘माताजी, आमच्या ब्रह्मरंध्रातून थंड हवा आली.’ आणि तुम्ही स्वत:च सांगाल की, ‘माझी तब्येत ठीक झाली माताजी. आमच्या घरात सगळे ठीक झालं, मुलं नीट वागू लागली.’ सगळं काही स्वत:च सांगाल. तुम्हीच स्वत:च सर्टिफिकेट द्यायचे आहे. मी त्यात बोलणार नाही. आम्हाला आश्चर्य वाटतं, की इतकी मोठी गोष्ट आपल्याला मिळालेली असून, आता त्या रशियामध्ये सोळा-सोळा हजार माणसं येतात आणि चारशे डॉक्टर्स सहजयोग करतायेत आणि दोनशे सायंटिस्टस्, ज्याने स्पुटनिकचा शोध लावला तेसुद्धा, येऊन तुमच्या आईजवळ बसतात आणि सहजयोगाबद्दल विचारतात. आता हे निवडक ५६ देशातले लोक इथे आलेले आहेत. ते काय सगळे मूर्ख आहेत ? हे इथे एवढे मोठमोठाले साधू लोक येतात आणि त्यांनी खूप पैसे कमवले आहेत बाहेर, त्यांचेही शिष्य आहेत, ते कधी आले का तुमच्या खेडेगावी? ते कधी फिरले का तुमच्यात? तुम्हाला भेटले का ? म्हणजे हे कसलं विश्वाचं कार्य आहे? त्या लोकांना इथे आणायचं, नुसतं दाखवण्यापुरतं आणि त्यांना आपल्या संस्कृतीची काहीही कल्पना नाही. त्यांना गणपती काय आहे हे ही माहिती नाही. त्यांना घाणेरड्या गोष्टी शिकवून या देशाची इतकी बदनामी केलेली आहे. हजारो रुपये त्यांच्याकडून लुटून खाल्लेले आहेत. आणि आपण मात्र अजून सहजयोगाला जागृत होत नाही ही गोष्ट चुकीची आहे. तेव्हा आपण लोक ग्रामीण भागात रहाता, तेव्हा ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत आपल्याला भजन म्हणणे किंवा देवाची आरती करणे. पूजा करणे वगैरे हे सगळ माहिती आहे. मग ह्याच्यापुढची पायरी हवी नां! ह्याच्यापुढची पायरी आम्हाला मिळविली पाहिजे. ती मिळवितांना जरी तुमची कुंडलिनी जागृत झाली, तरी ‘माताजी, आमचं असं आहे, थोडसं आमचं असं आहे,’ असं करून लोक निघतात.

सत्याची जर कास धरली तर असत्य सोडायला पाहिजे. जर तुम्ही असत्याला अजूनही चिकटून आहात तर तुमची वाढ कशी होणार? ज्यांना ज्यांना उच्च पदाला पोहोचायचं असतं किंवा नाथ होऊन अवधूतपदाला पोहोचायचं असतं, त्या लोकांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, जे काही खोटं आहे ते आम्ही वज्र्य करणार. त्यात आम्ही वाईट वाटून घेणार नाही. आता इतक्या दिवसापासून आम्ही करत आलो, पण इतक्या दिवसापासून चुका झाल्या, त्याने काय फायदा होणार? तुमच्या वाड-वडिलांनी हे केलं आणि तुम्हीही हेच केलंय. तेव्हा हे सोडलं पाहिजे. त्याने सर्वप्रथम म्हणजे तुमची तब्येत तर ठीक होते, पण आता ग्रामीण विभागात सांगायचं म्हणजे की तुमची जी कृषी उत्पादनं आहेत ती भरमसाठ होतील. तुमच्याकडची जी जनावरं आहेत ती ठीक होतील. मुलं- बाळे ठीक होतील, त्यांची अभ्यासात प्रगती होईल. हे सगळं मी आपल्याला सांगते त्याचा पडताळा घ्यावा. आजपर्यंत कोणी असं म्हटलं नाही, की मी आत्मसाक्षात्कार देतो किंवा देते. मी असं म्हणत नाही, की मी देते आहे आत्मसाक्षात्कार, पण एवढं म्हणते की कुंडलिनीचं जागरण होईल आणि तुम्ही सगळेजण त्यात आत्मसाक्षात्कारी व्हाल. आणि ते तुम्ही मिळवावं आणि परमेश्वराच्या आशीर्वादाचा अनुभव घ्यावा. जे काही संतांनी आजपर्यंत वर्णन करून सांगितलेले आहे ते सिद्ध करायला आम्ही आलो आहोत. देव आहेत की नाहीत ते सिद्ध करायला आम्ही आलो आहोत. कोण? कुठे? कसं? ह्या लोकांनी सांगितलेले आहे, त्याबद्दल शंका करण्यापेक्षा जे काही सांगितलं आहे ते सिद्ध होत असेल, तर ते मान्य करायला पाहिजे. ह्याच्यात खरी इमानदारी आहे आणि हा महाराष्ट्राचा वारसा, त्याच्याबद्दल आपल्याला अत्यंत अभिमान वाटला पाहिजे. ही बाहेरची मंडळी फक्त महाराष्ट्रातच यायला तयार आहेत. त्यांना अजून आतली गोम माहिती नाही आपण लोक कुठे पोहोचलो आहोत ते! महाराष्ट्रातले जे काही शाप आहेत तिकडे लक्ष दिले पाहिजे. पहिली म्हणजे भाऊबंदकी! हा आपल्याला शाप आहे. महाराष्ट्राला भाऊबंदकीचा भयंकर घाणेरडा शाप आहे. त्याच्यामुळे होतय काय की राजकारणात तर आहेच, पण ती घाण सहजयोगात आणायची नाही. ‘मराठा तितुका मेळवावा’ सांगितलेले आहे त्यांनी. मी म्हणते, ‘सहजयोगी तितका मेळवावा’ परत हे ही सांगितलं आहे शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे, की ‘स्वधर्म जागवावा’. स्व म्हणजे आत्मा, त्याचा धर्म जागवा. हे सांगितलेले आहे त्यांनी. ते आपण जागरण केले पाहिजे. त्यासाठी अगदी माझी पूर्ण खात्री आहे, की महाराष्ट्राची जमीन फार सुपीक आहे. पण ह्यातल्या ह्या दोन-तीन गोष्टी जर गेल्या, पहिले तर ही भाऊबंदकी आणि ह्या जुनाट गोष्टी की आमची ही जात, आम्ही अमके, तमके, नसत्या फुशारक्या आणि त्याच्यात नुसती बडेजावी. दारू पितील, बायकांना आणतील, हे करतील, ते करतील आणि आम्ही ह्या कुळाचे, आम्ही हे अमके. ह्या सगळ्याला काही अर्थ नाही. महामूर्ख आहात तुम्ही. दुसरं काही नाही. जातीचे महामूर्ख आहात. त्या पलीकडे काही सांगता येत नाही. तुम्ही काय करून दाखविलेले आहे ? तुमच्यातून कोण मोठे संत निघालेले आहेत? तुम्ही काय मोठ्या लायकीचे आहात ? तेव्हा जात-पात धरून चालायचं नाही. आपण सर्व विश्वधर्मी आहोत. आता ही मंडळी आली बघा. तुमच्यासारखेच भजनं म्हणतात. उद्या तुम्हाला ऐकायला मिळतील. चांगली भजनं म्हणतात, सगळं काही म्हणतात, गणपतीची पूजा करतात. हे सगळे विश्वधर्मी आहेत. आपण आता विश्वधर्म काढला पाहिजे. आणि विश्वधर्म निघालेला आहे. अमेरिकेला तर रजिस्टरही झाला आहे विश्वधर्म. पण आपल्याकडे विश्वधर्म काय, तो समजला पाहिजे. तो

सहजयोगाशिवाय येणार नाही. कारण सहजयोगामध्येच ही किमया पण आहे, की आपल्यामध्ये सामूहिक संवेदना येते. सामूहिक चेतना येते. दुसर्यामध्ये काय त्रास आहे तो कळतो, आपल्यामध्ये काय त्रास आहे तो कळतो. ही सामूहिक चेतना येणे म्हणजेच काय आहे तर आपण विराटाचे अंग-प्रत्यंग आहोत, हे सिद्ध होते आणि ते सिद्ध झाल्याबरोबर मनुष्य कुठेही का असेना! जर तुमची ती स्थिती आली तर तुम्ही इथे बसल्या बसल्या जाणू शकाल, की त्या माणसाला काय त्रास आहे आणि त्याचा काय इलाज आहे. ही सर्व विश्वात, चराचरात पसरलेली शक्ती आहे. ती कार्यान्वित होते. पण त्या लायकीला उतरायला पाहिजे. सहजयोगात नुसतं येऊन, एकदा आलो, ‘माताजी, आम्ही आलो होतो दर्शनाला.’ आपल्याकडे महाराष्ट्रात दर्शनाचं फार वेड आहे, ते ही सांगितलेच पाहिजे, की दर्शन, ‘अहो, दर्शनासाठी देव आहेत.’ आता माझ्या पायावर डोके फोडून फोड़ून, माझे पाय एवढे सुजवून ठेवता. जिवंत स्थितीत मी इथे बसले आहे, मी काही दगड नाही. दगडाला ठीक आहे, पण माझ्यावरतीसुद्धा दर्शन. दर्शन कशाला? माझं दर्शन घेऊन तरी काय फायदा! जर तुम्हाला आत्मसाक्षात्कार माझ्याकडून मिळाला नाही, तर बेकार आहे माझं दर्शन. त्याला काही अर्थ आहे का ? एकदा आम्ही लाहोरला कॉलेजमध्ये शिकत असतांना जवाहरलालजी आले होते. त्यांना पुष्कळ उशीर झाला होता. तीन-चार तास लागले त्यांना यायला. सगळे खेड्यावरून, इकडून तिकडून लोक आलेले होते, बसले होते. तर आले जवाहरलालजी इतक्या उशिराने, आम्ही सगळे तिथे व्यवस्था बघत होतो. ते आले, त्यांना बघितलं (लोकांनी), नमस्कार केला आणि निघाले. म्हटलं, ‘झालं काय?’ म्हणे, ‘दर्शन झालं. आता चाललो.’ चार तास बसले. त्यांचं भाषणही ऐकलं नाही आणि निघाले. तशातला प्रकार आहे. दर्शन जे आहे, ते स्वत:चं, आत्मदर्शन हवे. आपल्याला, स्वत:ला ओळखून घेतल्यानंतर मग दर्शनाला अर्थ आहे. म्हणून, माझे जे काही दर्शन आहे ते तुमच्यात दिसले पाहिजे. मी एक आई आहे. आईला काय वाटतं की माझ्या सर्व शक्त्या मुलांना मिळायला पाहिजे. त्याच्या पलीकडे मला काहीही नको. आपापसात प्रेम असलं पाहिजे. भाऊबंदकी सुटली पाहिजे. हे मुख्य. बाकीचे मी बघून घेते. पण भाऊबंदकीला इलाज काय आहे, तो मला समजत नाही. तेव्हा कृपा करून हे लक्षात ठेवलं पाहिजे, की सहजयोग्यांनी भाऊबंदकी करणं हे पाप आहे. कोणत्याही प्रकारची भाऊबंदकी करायची नाही. त्याच्यानंतर पुढचं मी बघून घेते. बाकी जे काही म्हणाल, ते व्यसनमुक्ती म्हणा, आणखीन प्रत्येक प्रकारची मुक्ती ही कुंडलिनी तुमची करून देईल. त्याबद्दल मला शंका नाही. पण त्या कुंडलिनीला भाऊबंदकीचा रोग काही ठीक करता येत नाही असं मला वाटतं. तेव्हा तो तुम्ही लोक ठीक करून घ्या आणि समजून घ्या, की हे प्रेमाचं कार्य आहे. तेव्हा आपण प्रेमाला उतरत असलं पाहिजे. आजच्या आपल्या सोहळ्याला काय म्हणावं ते समजत नाही. असं वाटतंय की कुठेतरी गोकुळात बसून सगळी लीला आम्ही बघतोय. फार सुंदर वाटलं सगळं, आपलं प्रेमाने बोलवणं आणि इतकं करणं. एवढेच माझे म्हणणे आहे, की आता सहजयोगात तुम्ही उतरायला पाहिजे. सहजयोग तुमच्यात उतरायला पाहिजे आणि तुमच्या जीवनात दिसला पाहिजे. तुमच्या वागण्यात दिसला पाहिजे, तुमच्या समाजात दिसला पाहिजे, तुमच्या घरात दिसला पाहिजे. लोकांना समजलं पाहिजे, की सहजयोगाने काय चमत्कार करून ठेवले आहेत तुमच्यात. कारण सगळे जे काही आहे त्याचं परिवर्तन करण्याची शक्ती तुमच्या कुंडलिनीत आहे. सर्वस्व देण्याची शक्ती तिच्यात आहे. एवढी मोठी शक्ती तिच्यात असतांना तुम्हाला कशाची भीती? तुम्हाला कशाचा त्रास आणि असा

निर्भय मनुष्य जो असतो, असा जेव्हा तो तयार होईल त्यावेळेला हे सर्व विश्व बदलू शकतं. विशेषतः महाराष्ट्रावर ही फार मोठी जबाबदारी आहे. नाव महाराष्ट्र ठेवलं आहे, ते कोणी ठेवलं ते कोणाला माहिती नाही, कोणी सांगू शकत नाही, पण या महाराष्ट्रात राहून ती महानता यायला पाहिजे. ती आल्यानंतरच सर्व जगाला कळेल की याचं नाव महाराष्ट्र का आहे! तुमचं जे स्वातंत्र्य आहे त्याची मान्यता मला आहे. तुमच्या स्वतंत्रतेतच तुम्ही म्हटलं पाहिजे की ‘माझी जागृती झाली पाहिजे.’ त्याच्यात जबरदस्ती करता येत नाही. दडपशाही करता येत नाही. कोणत्याही तऱ्हेने ही कुंडलिनी उठणारच नाही जोपर्यंत तुमच्यामध्ये त्याची शुद्ध इच्छा येणार नाही. कारण कुंडलिनी ही शक्ती शुद्ध इच्छेची आहे. तेव्हा ही शुद्ध इच्छा आपल्यामध्ये बाळगून आपण जर बसलात आणि म्हणालात ‘माताजी, आज आम्हाला आत्मसाक्षात्कार हवा.’ मी ही गोष्ट तात्काळ, तत्क्षण आणू शकते आणि म्हणून कृपा करून लक्षात ठेवलं पाहिजे, की ह्याच्यात जोर जबरदस्ती मी करू शकत नाही. कारण शेवटी तुम्ही इतके समर्थ होता, पूर्णपणे स्वतंत्र होऊन जाता. म्हणून ही जी स्वतंत्रता परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे मानवतेत, ती मी पूर्णपणे मान्य करते आणि त्या स्वतंत्रतेला मान्यता देऊन ज्यांना असं वाटत असेल, की आम्हाला जागृती नको, त्यांनी इथून बाहेर जावं ते बरं. दुसर्यांना बघायची भूमिका करायला इथे बसू नये. कृपा करून ज्यांना हे मान्य नसेल की त्यांनी बाहेर जावं. पण एकदा जागृती झाल्यानंतर ‘जे सत्य आहे तेच मी धरेन. दूसरं धरणार नाही आणि ह्या अध्यात्माच्या उच्च शिखराला जाऊन मी पोहोचेन.’ अशी मनामध्ये महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे. त्यापेक्षा आणखीन दुसरं काय मिळवायचं आहे! सगळं त्रिभुवनच त्याच्यात सामावलेले आहे. तेव्हा कृपा करून ह्यानंतर ‘सहजयोगामध्ये मी गहनात उतरून स्वत:ची पूर्ण प्रगती करून घेईन आणि सर्व महाराष्ट्रात, इतकेच नव्हे तर सर्व जगामध्ये एक आदर्श सहजयोगी म्हणून सुशिक्षित असो वा नसो. कोणीही गोरा कुंभार किंवा नामदेव किंवा कोणीही शाळेत गेले नव्हते, कॉलेजमध्ये गेले नव्हते, युनिव्हर्सिटीत गेले नव्हते, काही नाही, कोणीही, तरीसुद्धा काय चमत्कार करून ठेवलेत त्यांनी. आजपर्यंत तुम्ही लोक त्यांची स्तुती करता. तेव्हा अशीच कार्य करा ज्याने जगामध्ये नाव होईल आणि आपल्याबद्दल लोक म्हणतील की, ‘किती मोठे हे साधक आहेत ! किती शक्तिशाली आहेत हे !’ आणि एक, एक माणूससुद्धा हजारो मी वावरेन.’ असा मनामध्ये निश्चय ठेवावा, प्रत्येक मनुष्याने. तो माणसांना जागृती देऊ शकतो. हजारो लोकांचं आयुष्य सुधारू शकतो. ही आपल्यामध्ये शक्ती आहे. तेव्हां आपलं स्वातंत्र्य मी मानते आणि त्या स्वातंत्र्यात आम्ही बसलेले आहोत. तेव्हां एक आणखीन विनंती आहे, की डोक्यावरच्या टोप्या काढाव्यात. कारण आईसमोर आपण काही टोपी घालून बसत नाही. मी काही गुरू नाहीये. मी एक आई आहे आणि आईकडे गेलं , की आईचा हात नेहमी डोक्यावर येतो आपल्याला माहिती आहे. आई काय आहे, ते आपल्याला सांगायला नको. ज्ञानाचा सागर आहेच, पण सर्वात मुख्य म्हणजे क्षमेचा सागर आहे. तुम्ही अशी कोणतीच चूक करू शकत नाही जी त्या सागरामध्ये विलीन नाही होऊ शकत, अशी कोणतीच चूक तुम्ही करू शकत नाही. तेव्हा कृपा करून माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, माझ्यात हे दोष आहेत, ते दोष आहेत असे नको. काहीही असलं तरी तुमची कुंडलिनी ते स्वच्छ धुवून टाकेल. तेव्हा सध्या हा विचार करत बसायचा नाही. ही एक अट आहे. आणि दूसरी अट अशी

आहे, की तुम्ही सगळ्यांना एकदम क्षमा करायची. एकदम. म्हणजे अमका, तमका आठवत बसायचं नाही. प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घ्यायचं नाही. ‘सगळ्यांना आम्ही क्षमा केली.’ अहो, क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही करता काय? करत काहीच नाही. पण नाही केली म्हणजे दुसऱ्यांच्या हातात खेळता की नाही. जो मनुष्य तुम्हाला त्रास देतो, त्याला क्षमा न केल्यामुळे तुम्हालाच त्रास होतो. त्याला काही होत नाही. तेव्हा एकदम सगळ्यांना क्षमा करून टाका म्हणजे बघा, किती डोकं हलकं होईल! फार जरुरी आहे. एकदम. विसरून जा सगळ्यांना. तिसरी गोष्ट अशी, की आपल्यामध्ये पूर्ण आत्मवि्वास असला पाहिजे. पूर्णपणे, की ‘मला आत्मसाक्षात्कार मिळेल.’ हा आत्मविश्वास ठेवायचा. मला तर आहेच पूर्ण विश्वास, पण आपल्यालाही आपल्याबद्दल विश्वास असला पाहिजे. ही फार जरुरी गोष्ट आहे. जर आपल्याला आपल्याबद्दल विश्वास नाही की, ‘अहो, असं कसं होऊ शकतं ? आमचं असं आहे. हे, ते.’ काही नाही. ही विशेष वेळ आहे आणि ह्या वेळेला जर तुम्ही जागृत झाला नाहीत तर तुम्ही समजणार नाही. झालं गेलं विसरून जा. काही कठीण नाही. रामदास स्वामींना एकदा विचारलं की, ‘कुंडलिनी जागृतीला किती वेळ लागतो?’ त्यांनी सांगितले, ‘तत्क्षण!’ घेणारा पाहिजे आणि देणारा पाहिजे. आता देणारे तर आहेत, पण घेणारे पाहिजेत आणि घेणाऱ्यांना जर आपल्याबद्दल शंका वाटत असली, तर आम्ही काय करायचं? तेव्हा कृपा करून उत्सुक असलं पाहिजे. उत्साह असला पाहिजे की, ‘आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळणार आहे. परमेश्वराच्या साम्राज्यात आम्ही जाणार आहोत.’ आणखीन इतकेच नाही, परमेश्वराच्या साम्राज्यात तर आपण जाणारच आहात, पण हे सगळं काही आपलेच आहे, स्वत:चेच आहे. तो खजिना आपल्याला मिळणार आहे. बरं, आता आपण सगळेजण डोळे मिटा आणि दोन्ही हात माझ्याकडे करा. नुसते असे हात वर करून घ्या. डोळे मिटून घ्या. (काही मिनिटाने ) आता डोळे उघडा. हळूहळू. आता उजवा हात माझ्याकडे करायचा, पुढे. मान वाकवून घ्यायची आणि ब्रह्मरंध्रात हात असा अधांतरी धरायचा. मान वाकवून. डावा हात असा धरायचा. आता बघा आपल्या डोक्यातून गार वारा येतो का? सगळीकडे गार वारा सुटला आहे. शंका नाही घ्यायची. येतो आहे का? आता डावा हात माझ्याकडे करा. परत मान खाली वाकवायची. परत उजव्या हाताने वर अधांतरी धरून, कोणाकोणाला दूर, कोणाकोणाला जवळ, कोणाला थंड, कोणाला गरम अशा डोक्यातून काहीतरी, वार्यासारख्या लहरी येतील. फार थंड नाही. आता परत उजवा हात माझ्याकडे करा. आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे. शंका घ्यायची नाही. बघा, आणि मान अशी मागे करायची आणि प्रश्न करायचा की, ‘श्रीमाताजी, हे परमचैतन्य आहे का ?’ असा प्रश्न तीनदा विचारा. ‘श्रीमाताजी, हे ब्रह्मचैतन्य आहे का?’ हा प्रश्न कोणताही, तीनदा विचारा. ‘श्रीमाताजी, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का?’ प्रश्न विचारा, तीनदा. आता हात खाली घ्या. बघा किती वारा सुटलाय. इथूनच वारा येतोय तिकडे. ज्या लोकांच्या हातातून किंवा डोक्यामधून थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील अशा सर्वांनी दोन्ही हात वर करायचे. व्वा! त्या अशोकालासुद्धा वाटलं असेल, की अशोकनगर म्हणजे किती आध्यात्मिक आहे ! सगळ्यांना माझा नमस्कार! सगळ्या संत-साधूंना माझा नमस्कार! आणि आपणा सर्वांना नमस्कार!

आता माझ्याकडे बघून निर्विचार व्हा. विचार नाही करायचा. अशी निर्विचार समाधी. सहजयोग जर तुम्ही आपल्यात लक्षपूर्वक जमवून घेतलात, तर दुसरी स्थिती ज्याला आम्ही निर्विकल्प म्हणतो फार लवकर प्राप्त होईल. ही झाली पाहिजे. ती आपली शक्ती, ती मिळवली पाहिजे आणि त्यासाठी जो काही सामूहिक कार्यक्रम होईल तो घ्यावा. आम्ही काही पैसे घेत नाही, त्याच्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे, की ही लहानशी जागा जी अशोकनगरमध्ये आम्हाला मिळालेली आहे, त्यासाठी मी फार उपकार मानते , की ही अशी जागा मिळालेली आहे. इथे इतके धार्मिक लोक आहेत. पण ती लहान असो, मोठी असो, तरी तिथे आपल्याला आनंद मिळतोय, अशा दृष्टीने आपण सर्वांनी यावे आणि सहजयोग समजून घ्यावा आणि आपल्यामध्ये उतरवून घ्यावा. अशी विनंती आहे. दुसरे म्हणजे पायावर येण्याची काही गरज नाही. कारण अजून काहीच झालेलं नाही. एकदा तुम्ही पार व्हा. आपलं पूर्ण दर्शन घ्या. त्यानंतर मग बघता येईल. पण सध्या आपण कोणी माझ्या पायावर येण्याचा प्रयत्न करू नये. काही त्याची गरज नाही.