Dyan Ki Avashakta, On meditation New Delhi (India)

Dhyan Ki Avashakta 27th November 1991 Date : Place Delhi : Seminar & Meeting Type Speech [Marathi translation from Hindi] आज अनायासे आपण एकत्र जमलो आहोत म्हणून सहजयोगाबद्दल आपण जास्त समजून घेऊया. सहजयोग हा साऱ्या मानवजातीच्या भल्यासाठी आहे आणि तुम्ही लोक त्याचे माध्यम आहात. तुमच्यावर अर्थातच खूप मोठी जबाबदारी आहे. आपण जर झाडाला किंवा दगडाला व्हायब्रेशन्स दिल्या तर त्या प्रवाहित होऊ शकत नाहीत, कार्यान्वित होऊ शकत नाहीत तर तुमच्याच श्रद्धेमधून व कार्यामधून त्या प्रवाहित होणार असतात. सहजमध्ये एक प्रकारचा दोष आहे तो म्हणजे तो सहजच प्राप्त होण्यासारखा आहे पण त्याला सांभाळणे तितकेच कठीण आहे. कारण आपण पोकळीत राहत नाही किंवा फक्त आध्यात्मिक वातावरणात राहत नाही तर तऱ्हेतऱ्हेच्या वातावरणात व लोकांमध्ये आपण राहतो. आपल्या स्वत:च्याही बऱ्याच उपाधी असतात आणि त्यांना आपण चिकटून असतो. म्हणून सहजयोगात आपण शुद्ध बनणे व ही शुद्धता आपल्या अंतरंगात रुजवणे हे कार्य आपल्याला करायचे आहे. शक्तीचे वाहक असणारे माध्यम शुद्ध हवेच. उदा.विजेची तार खराब असेल तर वीज प्रवाहित होणार नाही किंवा पाण्याच्या पाईपमध्ये कचरा असेल तर नळामधून पाणी येणार नाही. त्याचप्रमाणे चैतन्य पसरवणाऱ्या नसा शुद्ध असल्या पाहिजेत आणि ही जबाबदारी तुमची स्वत: ची आहे. एरवी तुम्ही माझ्याकडे श्रद्धा, भक्ती मागत राहता पण ही मुख्य गोष्ट तुम्ही स्वत:च समजावून मिळवायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे नसा शुद्ध झाल्यावर तुम्हालाच आनंद मिळणार आहे. आपण काही कार्य करत आहोत हे ही तुम्हाला जाणवणार नाही. जे काही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल; सर्व काही सहज घडून येईल. सर्व जमून येईल, योग्य प्रकारचे लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदत करतील. इतके की तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपण कसे एका वरच्या स्तरावर येत आहोत. Read More …