Dyan Ki Avashakta, On meditation

New Delhi (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Dhyan Ki Avashakta 27th November 1991 Date : Place Delhi : Seminar & Meeting Type Speech

[Marathi translation from Hindi]

आज अनायासे आपण एकत्र जमलो आहोत म्हणून सहजयोगाबद्दल आपण जास्त समजून घेऊया. सहजयोग हा साऱ्या मानवजातीच्या भल्यासाठी आहे आणि तुम्ही लोक त्याचे माध्यम आहात. तुमच्यावर अर्थातच खूप मोठी जबाबदारी आहे. आपण जर झाडाला किंवा दगडाला व्हायब्रेशन्स दिल्या तर त्या प्रवाहित होऊ शकत नाहीत, कार्यान्वित होऊ शकत नाहीत तर तुमच्याच श्रद्धेमधून व कार्यामधून त्या प्रवाहित होणार असतात. सहजमध्ये एक प्रकारचा दोष आहे तो म्हणजे तो सहजच प्राप्त होण्यासारखा आहे पण त्याला सांभाळणे तितकेच कठीण आहे. कारण आपण पोकळीत राहत नाही किंवा फक्त आध्यात्मिक वातावरणात राहत नाही तर तऱ्हेतऱ्हेच्या वातावरणात व लोकांमध्ये आपण राहतो. आपल्या स्वत:च्याही बऱ्याच उपाधी असतात आणि त्यांना आपण चिकटून असतो. म्हणून सहजयोगात आपण शुद्ध बनणे व ही शुद्धता आपल्या अंतरंगात रुजवणे हे कार्य आपल्याला करायचे आहे. शक्तीचे वाहक असणारे माध्यम शुद्ध हवेच. उदा.विजेची तार खराब असेल तर वीज प्रवाहित होणार नाही किंवा पाण्याच्या पाईपमध्ये कचरा असेल तर नळामधून पाणी येणार नाही. त्याचप्रमाणे चैतन्य पसरवणाऱ्या नसा शुद्ध असल्या पाहिजेत आणि ही जबाबदारी तुमची स्वत: ची आहे. एरवी तुम्ही माझ्याकडे श्रद्धा, भक्ती मागत राहता पण ही मुख्य गोष्ट तुम्ही स्वत:च समजावून मिळवायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे नसा शुद्ध झाल्यावर तुम्हालाच आनंद मिळणार आहे. आपण काही कार्य करत आहोत हे ही तुम्हाला जाणवणार नाही. जे काही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल; सर्व काही सहज घडून येईल. सर्व जमून येईल, योग्य प्रकारचे लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदत करतील. इतके की तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपण कसे एका वरच्या स्तरावर येत आहोत. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होत असते, तुमचे सर्व प्रश्न सुटत जातात व तुम्ही उत्तरोत्तर प्रगल्भ होत राहता. पण हे सर्व एक प्रकारचे प्रलोभन आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. नुकतेच एका सहजयोग्याने घटस्फोट घेतला आणि त्यात त्याला बरेच पैसे मिळाल्याचे मी ऐकले, पण असे लोक एकदम इतके खाली ढकलले जातात की त्यांना पुन्हा वर उठवणे कठीण होते. म्हणून नाड्यांच्या स्वच्छतेकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे. त्यासाठी सकाळचे ध्यान आवश्यक आहे. सकाळचे ध्यान लागत नसेल तर आपल्यामध्ये कुठेतरी बिघाड झाला आहे, कसले तरी अशुद्ध विचार आपल्या मनात येत आहेत असे पक्के समजा व त्यामुळे कोणते चक्र खराब झाले आहे हे तपासून त्यावर उपाय केला पाहिजे व चक्रांना स्वच्छ केले पाहिजे. म्हणजेच आत्मपरीक्षण करून स्वत:कडे लक्षपूर्वक बघितले पाहिजे. हे सर्व तुमच्या हिताचे आहे म्हणून मी सांगत आहे. तुमच्यामध्ये आपल्याच सवयींमुळे भोवतालच्या वातावरणामुळे, इतर लोकांबरोबर संबंध येत असल्यामुळे बरेच वेळा दोष येतात आणि ते एखाद्या शत्रूसारखे तुमच्यामध्ये लपून बसतात आणि मधून मधून डोके वर काढतात. म्हणून स्वत:ला कुठल्याही प्रकारे अपराधी न समजता ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमळ कसल्याही घाणेरड्या चिखलातून वर येते आणि उमलल्यावर आपला सुगंध सगळीकडे पसरवते.

सहजयोग असाच आहे व तुम्ही कमळासारखे व्हायचे आहे. पण हे कमळ सुरभित होण्यासाठी थोडीशी मेहनत करायला हवी. सकाळचे ध्यान हे स्वत:कडे पाहण्यासाठी आहे. माझ्यात काही दोष आहेत, माझा राग कमी झाला आहे का? माझ्या मनात मला हानिकारक असणारे विचार वा इच्छा येतात का इ.गोष्टींकडे लक्ष देत गेल्यास कुठल्या चक्रामुळे हा त्रास होत आहे हे तुम्हाला समजेल व ते ठीक करण्याच्या मागे लागा. ते ठीक करून मग ध्यानात जा. आपले मन व चक्र दोन्ही आधी स्वच्छ ठेवा. स्वार्थ ठेवायचा असला तर आधी ‘स्व’ चा अर्थ जाणला पाहिजे. ध्यान लागत नाही याचा अर्थ अजून एकाग्रता मिळाली नाही. स्वत:शी आधी प्रामाणिक राहायला शिका. सहजयोगात आल्यावर मी पाहते की पुष्कळ लोकांचे आजार बरे झाले आहेत, त्यांना पुष्कळ लाभ झाला आहे. कुटुंबातील प्रश्न मिटले आहेत, सर्व काही ठीक झाले आहे. तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांचे सहजध्यान होत नाही. सकाळी उठून जे ध्यान करत नाहीत त्यांनी सहजचे कितीही कार्य केले तरी ते गहनता मिळवू शकत नाहीत आणि गहनतेतच सगळा आनंद, समाधान, ऐश्वर्य आहे. ही गहनता मिळवण्यासाठीच सतत आत्मपरीक्षण करत राहून स्वत:मधले दोष जाणून ते काढून टाकले पाहिजेत. दुसऱ्यांच्या दोषांकडे आपली चटकन नजर जाते पण ते काम तुमचे नाही तर माझे काम आहे. संध्याकाळच्या ध्यानामध्ये समर्पण महत्त्वाचे आहे. मी सहजयोगासाठी काय केले, शरीर-मन-बुद्धीने मी सहजयोगासाठी काय करतो इकडे बघा. म्हणजे एक प्रकारे सहजयोगाचा विचार करा. तसेच इतर लोक तुमच्यावर किती प्रेम करतात, तुम्हाला किती मदत करतात हे बघा म्हणजे तुमच्या मनातही प्रेम बहरेल. प्रेमाला जर काही निमित्त लागले तर ते सहज प्रेमामधूनच मोठा आनंद मिळत प्रेम नाही. सहज प्रेम निव्य्याज्य असते आणि अशा असतो. दूसर्याचे दोष बघत बसलात, तो किती वाईट आहे असा विचार करत बसलात तर आनंद मिळत नाही. प्रेमाचे आंदोलन बघण्यात फार सुंदर भावना असते व ती प्रेरणादायी असते. त्याचे शब्दांनी वर्णन करणे अवघड आहे. पण त्याचे तेज चेहऱ्यावर येते, तुमच्या वागण्यात ते दिसते व वातावरणात त्याचा प्रभाव पडतो. अशात-्हेने दोन वेळचे ध्यान अवश्य केले पाहिजे. एखादे वेळेस जेवायला मिळाले नाही तरी काही बिघडत नाही, एखादे वेळेस बाहेर फिरायला जायला झाले नाही किंवा आराम मिळाला नाही तरी चालेल पण दोन वेळचे ध्यान हे सहजयोगात अवश्य केले पाहिजे. ध्यानामधूनच सर्व काही मिळणार आहे. सकाळचे ध्यान ज्ञानाचे आहे तर सायंकाळचे ध्यान भक्तीचे आहे. अशा ध्यानामध्ये तुम्ही स्थिरावलात की तुम्हाला कळेल की तुमची महानता केवढी आहे. सहजयोगात जे काही होणार आहे व होत आहे ते तुमच्या माध्यमातून होत आहे. तुम्ही नुसत्या श्रीमंतीकडे बघू नका, जे लोक महालात, चैनीत राहत आहेत ते काही कामाचे नाहीत. तसेच डरपोक लोकांकडून हे काम होण्यासारखे नाही. पूर्वीच्या काळी हजारोंमध्ये एखादा आत्मसाक्षात्कारी असायचा. त्यासाठी फार तपश्चर्या करावी लागायची. पण आता तुम्हाला हिमालयात जाण्याची, अन्न त्याग वा तपस्या करण्याची जरूर नाही. ही आंतरिक स्वच्छता मिळवण्याचा आपला मार्ग कोणता आहे विचाराल तर तो म्हणजे सामूहिकता. ০

निव्व्याज्यपणे जे सामूहिकतेत राहतात त्यांची स्वच्छता विनाप्रयास होत राहते. सामूहिकतेत राहणे ही तपस्या नसून एक प्रकारचा आनंद आहे असे समजा. सहजयोग सर्वांसाठी खुला आहे. म्हणून सामूहिकतेत आल्यावर हे लोक असेच आहेत, अमक्या माणसाला हा त्रास आहे असले विचार करत बसाल तर काम अवघड होईल. अशा लोकांबरोबर जो सहजपणे राहण्याची मजा मिळवतो तो सहज तपस्याच करत असतो. सर्व काही मिळाल्यावर आता काय हवे? तुम्ही आता देव-देवतांच्या स्थितीला आला आहात हे लक्षात घ्या; तुम्ही सांगा अगर न सांगा देव-देवतांचे कार्य चालूच असते. तसे तुमचे झाले पाहिजे आणि हे मुळीच कठीण नाही. इतर कामे व व्यवहार चालू असतांनाही थोडा वेळ तुम्ही स्वत:साठी काढला पाहिजे व रोज सकाळी व संध्याकाळी ध्यान केलेच पाहिजे. मी हे सांगते तो काही नियम असा नाही तर एक समजूतदारपणाचा विचार आहे. ज्यामुळे आपण सहजमध्ये स्थिरावतो. कोण रोज ध्यान करतात व कोण करत नाहीत हे मला चटकन कळते. रोज धुतलेले कपडे चटकन ओळखता येतात व धुतलेले नसले तर त्याच्यावरची घाण लगेच दिसून येते असाच हा प्रकार आहे. तसेच एखादे दिवशी स्नान नाही झाले तरी ध्यान झालेच पाहिजे. हे सर्व आपल्याच सुखासाठी, हितासाठी व सर्व मानवजातीच्या हितासाठी आहे. आपले स्वत:वर जर खरोखरच प्रेम असेल तर आपण किती गौरवशाली व महान स्थितीला आलो आहोत व किती महान कार्य करत आहोत हे तुम्हाला समजेल. मी जे हे सर्व सांगितले त्याचे चिंतन करा, मनन करा, विचार करा, नुसते माताजींनी सांगितले आहे असे म्हणू नका. माझ्यासाठी नाही तर दुसऱ्या लोकांसाठी श्री माताजी सागंतात अशी खोटी समजूत करून घेऊ नका. मी कशी प्रगती करेन याचे सतत भान राखून याचा विचार करा. सर्वांना अनंत आशीर्वाद !