Shri Ganesha Puja

(India)

Feedback
Share

Shri Ganesha Puja Date 15th December 1991: Place Shere Type Puja

मी ह्यांना सांगत होते की आज आपण गणेशाची पूजा करूयात. गणेशाचे फार महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरात होते. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर. सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेश. गणेशाने जे आपल्याला विशेष दान दिलेले आहे, ते म्हणजे सुबुद्धीचे आहे. सुबुद्धी जी आहे, ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं, की मी तुला सुबुद्धी देतो, तर कधीच मानलं नाही पाहिजे. (इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मराठीत बोलतांना मला एकदम शब्दच मिळत नाहीत. दोन्ही भाषेत बोलायचे म्हणजे कंटिन्यूटी नाही येत. बरं, तर विज्डमला शब्द नाही मराठीत, काय हो?) सूज्ञता! सूज्ञता जरा गंभीर शब्द आहे. बरं, त्याला आपण सूज्ञता म्हणतो. सुबुद्धीपेक्षा सूज्ञता. त्या सूज्ञतेला आपण आपल्या अंगामध्ये बाणले पाहिजे. ती बाणायची कशी? तर वर्तमान काळांत रहायला शिकले पाहिजे. हे मी शिकवते. आता वर्तमानकाळात, ह्यावेळेला, आपण इथे बसलेलो आहोत. ही पूजा होते आहे. तर ह्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. तर ह्यावेळेला सूज्ञता काय आहे? हे की आता पूजा होते आहे. पूजा करायची आहे. पण ह्याचवेळी आपण जर विचार केला पुढचा, की आता मला बस मिळेल की नाही? घरी जेवायला मिळेल की नाही? काहीतरी असे झाले तर! माझे जाणे झाले नाही तर? किंवा माझ्या मुलाचे असे. हे जर आपण विचार केले तर तुम्हाला पूजा लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला, हे असे झाले, तसे झाले, असे केले, तर मग परत घोटाळा होणार. तर हा जो सूज्ञपणा आहे, हा सूज्ञपणा आपल्यामध्ये बाणला पाहिजे. ते बाणण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक वेळी आपण कुठेही असलो तरी, आता मी वर्तमानात आहे की भूतकाळांत आहे ते पाहिले पाहिजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे आणि भविष्यकाळ काही समोर नाही. ह्या सूज्ञतेमुळे मी अडकले होते. सूज्ञता म्हणता येईल म्हणा, पण तरी सूज्ञामध्ये थोडेसे गहन आहे. त्याच्यात पुष्कळ गोष्टी आहेत. आता इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे, विज्डम. पण आपल्या मराठी भाषेत त्याला सूज्ञता म्हणता येईल. सुबुद्धी म्हणता येईल, समयसूचकता म्हणता येईल किंवा दक्षता म्हणता येईल. दक्षता म्हणू. दक्षता. असे अनेक शब्द त्याला आहेत. ते सगळे एका गोष्टीने आपल्याला सहज साध्य होतात, जर आपण वर्तमान काळात राहण्याची व्यवस्था केली तर. 

आता मी असे ऐकले की इथे भयंकर भांडणं करतात लोक. भांडणं होतात. का होतात? कारण तुझ्या बापाच्या बापानी ह्याला मारलं होतं.  म्हणून भांडायला लागले. आता ते बाप मेले, त्याचे बाप ही मेले. आता ते बापाचं कशाला काढत बसले? नाहीतर तुला मी मारेन, तुला मी ठोकेन असं काहीतरी भविष्यकाळाचे बोलत रहायचे. आत्ता ह्यावेळेला मी काय करणार आहे? तू माझ्यासमोर आला , ह्यावेळेला मी तुझ्याबरोबर काय करणार आहे? तो विचार नाही. काय केले पाहिजे ह्यावेळेला? त्यावेळेला जी समयसूचकता येते, ती समयसूचकता जी आहे, ती खरी. त्यावेळेला लगेच लक्षात येईल, की हे भांडण मिटवा ह्यावेळेला. चांगला चान्स आहे. संधी मिळाली आहे. ही संधी मिळाली असे म्हंटले, की एकदम मनुष्याच्या डोक्यात येते, केवढी मोठी संधी आहे. इतकी आपल्या पूर्वजांची भांडणं संपली आहेत. उगीचच कोर्टकचेऱ्या कशाला? हे कशाला? ते कशाला? संपवा. ही जी एक सुबुद्धी आपल्यामध्ये येते त्या समयसूचकतेला, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये विज्डम असे म्हणतो. पण विज्डममध्ये अनेक अर्थ आहेत. आपल्या मराठी भाषेत ना प्रत्येक ह्याला पर्याय म्हणजे दहा असले पाहिजे. ही अशी आपली फार समृद्ध भाषा आहे. त्यामुळे एका शब्दात नाही सांगता येत. पण तरीसुद्धा त्या समयाला जागृत असणं, त्या वेळेला जागरूक असणं हे फार जरुरी आहे. इतर पुष्कळशा गोष्टी आहेत. आता समजा मला घरून निघायचे आहे. तर मी असा विचार करायचा की आता मला जायचे आहे, तर मला काय काय पाहिजे? जिथे मी राहीन रात्रीचं, तिथे मला काय पाहिजे? बस, त्यावेळेला. पण काय होतं, त्यावेळेला लक्षात येत नाही. त्यावेळेला दुसराच विचार. मग गाडीत बसल्यावर लक्षात येतं, की अरे, हे राहिलं, ते राहिलं. तर ही जी एक समयसूचकता आहे, ही जी सूज्ञता आहे, ही आपल्यामध्ये बाणण्यासाठी आपण आता वर्तमान काळात रहायला शिकले पाहिजे.

 शिवाजी महाराज झाले. ते फार मोठे होते. पण ते वर्तमान काळात रहात होते. आपल्यासारखे नाही त्यांचे. आता आपण शिवाजी महाराजांना मानतो, पण या वर्तमान काळात आपल्यामध्ये शिवाजी महाराजांचे कोणते गुण आलेत? ते काय दारू प्यायचे का? पहिली गोष्ट. त्यांचे वागणे कसे होते? त्यांचे चरित्र कसे होते? तसं आम्ही त्यांना मानतो, पण त्यांचे चरित्र ह्या वर्तमानकाळात, ह्या आयुष्यात आमच्यात आले आहे का? काहीतरी मागच्या गोष्टीचे महात्म्य घेऊन बसायचे. त्याने काही फायदा होणार नाही. महात्मा गांधी झाले. पुष्कळ झाले. आपल्या देशात फार मोठी मोठी कमळे निघाली असं म्हणतात. पण डबकेच आहे ना अजून! बाकी सगळे डबकेच आहे! तेव्हा आपण आता डबक्यात आहोत की कमळात आहोत ते पाहिलं पाहिजे. ह्यावेळेला आपण कुठे आहोत ते पाहिले पाहिजे. ही पाहण्याची सुबुद्धी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत गणेश तुमच्यात कार्य करीत नाही.

 गणपतीचे एक लक्षण सांगितले आहे, की तो तुम्हाला सुज्ञता देतो, सुबुद्धी देतो. कुठे दिसते कां तुम्हाला सुबुद्धी? तिकडे त्या गणपतीसमोर बसूनच भांडतात लोक. गणपतीच्या नावाने पैसे खातात, हे करतात, ते करतात, म्हणजे सुबुद्धी नाहीच. मग गणपती आहे कुठे तिथे? नुसता गणपती करून ठेवलेला आहे. समयसूचकतेला, जे समयावर, जे बरोबर त्यावेळेला जे लक्षात हा मनुष्य आणेल  त्या माणसाच्या स्थितीत एकदम अंतर येणार आहे. हे करून बघा तुम्ही आणि वर्तमान काळातच तुमची जी वाढ होणार आहे ती होणार आहे. आता फूल आहे. फुलाची वाढ भविष्यात होते की भूतकाळात होते? आत्ता ह्यावेळेला वेळेला होईल नां? आपली प्रगती एवढ्यासाठीच होत नाही. कारण आपण पुढच्या गोष्टीचा विचार करतो किंवा मागच्या गोष्टीचा विचार करतो. पण सद्यकालीन आपण विचार करीत नाही. सद्यकालीन स्थिती काय आहे आपली ते पाहिले पाहिजे. मग त्यात काय, सगळेच जेवढे आपले प्रश्न आहेत, आता ग्रामीण प्रश्न आहेत, ते सगळे सुटतील. आज शेती करायची आहे समजा. आज तुम्हाला पेरायचे आहे. तुम्ही म्हणाल, मागच्या वेळेला पेरले होते, असे झाले, तसे झाले. असे करत बसले तर गेले, किंवा म्हटले, उद्या, परवा पेरीन तर तेही गेले. आत्ता, आजचे जे करायचे ते आत्ता केले पाहिजे. ही एक आपल्या भारतामध्ये एक टूम आहे. गेल्याचे फार पोवाडे गात रहायचे अमके झाले, तमके झाले. अरे, तुम्ही काय? तुम्ही कुठे आहात? सहजयोगामध्ये फारच आवश्यक आहे की, ‘माताजींनी आम्हाला जागृती दिली.’ मग, त्याच्या पुढे काय?  पुढे झालं.  आता जागृती दिली आता बसलो आहोत आम्ही. आता दुसरे धंदे करायचे. ‘आज, आता त्याच्यासाठी मला काय करायचे?’ असा विचार डोक्यात आला, तर तत्क्षणी तुम्हाला फायदा होणार आहे.

 आता पुष्कळांना जागृती झाली, पुष्कळांना त्याचे लाभ झाले, चमत्कार पाहिले. झाले. पण विसरून जातात कि, ‘मला जागृती झालेली आहे.’ प्रत्येक क्षणाला ‘मला जागृती झालेली आहे.’ ह्या क्षणालासुद्धा ‘मला जागृती झालेली आहे.’ असे लक्षात राहत नाही लोकांच्या. मग तसच वागायला लागतात. परवाच एक गृहस्थ आले. त्यांना जागृती दिली होती. चांगले पार झालेले. सगळें काही. पण मला म्हणे, ‘माताजी, आजकाल मला फार भीती वाटते.’ म्हटलं, ‘अहो, तुम्ही सहजयोगी. तुम्हाला कसली भीती? तुम्ही विसरले का?’ ‘अरे हो, खरंच! विसरलो. म्हणे मी पार झालो होतो. मला काही भ्यायला नको.’ काय म्हणाल ते तुमच्यासमोर असतांनासुद्धा! कारण तुम्ही विसरलात. आणि तुम्हाला तेच मागचेच आठवते.  जेंव्हा तुम्ही बेकार होता, तेव्हा तुम्ही नालायक होता. तुम्हाला काही समजत नव्हते. जेव्हा तुम्ही अज्ञानी होता किंवा जेव्हा तुम्ही अंधारात होता किंवा परमात्म्याचा प्रकाश तुमच्यामध्ये आला नव्हता. त्यावेळची गोष्ट ती कशाला         आता चालवायची पुढे? ते संस्कार कशाला पाहिजेत?  अजून आहे तोच.  

आता खेडेगावात गेले की सगळ्यांना पार केलं. केल्यावर पायावर यायचे. कशाला? मी कोणी दगडाची मूर्ती तर नाही, की शंभर लोकांना माझ्या पायावर घेईन. पायावर येऊ नका. बरं, मग पैसे ठेवतो. दहा पैसे ठेवले. ‘अरे,’ म्हटलं, ‘पण माताजी पैसे नाही घेत.’ ‘बरं पंचवीस पैसे घ्या.’ ते ह्यांना समजायचेच नाही, की आज सद्यस्थिती काय आहे आणि त्या सद्यस्थितीमध्ये माताजी पैसे घेत नाहीत आणि कोणीही देवाच्या नावावर पैसे द्यायचे नाहीत. पण ते डोक्यातच घुसणार नाही. ‘असं कसं माताजी, सगळेच सांगतात आम्हाला ‘तुझी आई मेली, मला एक गाय दे म्हणून. आणि तुम्ही आमच्याकडून कसे पैसे घेत नाहीत?’ तर हा धर्मभोळेपणा, हा सुद्धा आता सोडला पाहिजे. आणि तो कसा सुटणार? कारण जो धर्म तुम्ही शिकलेला आहात, तो चुकीचाच शिकलात तुम्ही. ज्याला तुम्ही धर्म म्हणता, तो चुकीचा शिकला. कारण तुम्ही धर्म विकत घ्यायला निघाले आणि विकणारेही आहेत. धर्म विकता येत नाही. विकणारे आहेत आणि तुम्ही विकत घेता. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी चुकलेल्या आहेत. 

सद्यस्थितीमध्ये तुम्हाला आत्मसाक्षात्कार (रियलायझेशन) मिळाला आहे. आता आत्म्याच्या बलावर काय करायचे ते करायचे. ते सोडून तरी शेवटलंच, मागचेच ते. आमचे संस्कार आहेत माताजी. व्वा. आता रस्त्यावर एक दगड मांडला. त्या दगडाला शेंदूर लावला, अमुक तमुक. बसले एक तिथे. चला दोन पैसे घाला. चार पैसे घाला. देवाला घाला. कोणीही मनुष्य निघाला, तर बॉ देवच आहे. द्या दोन पैसे. अरे , तुम्ही सहजयोगी, तुम्ही कशाला देता ? ‘आता माताजी असे आहे नां, आमच्यावर संस्कार आहेत.’ कसले कुसंस्कार आहेत! कशाला देता त्या देवाला? तो काही देव आहे कां? कोणीही दगड मांडायचा, तो काय देव आहे कां? पण ह्या सगळ्या आपल्यामध्ये ज्या जुनाट गोष्टी आहेत, त्या काढाव्या लागतील. त्या एकाच प्रकाराने निघतील, की आज सद्यस्थितीत काय आहे. नाहीतर म्हणतील, ‘माताजी, आम्ही रामाला मानतो.’ अरे, आता राम नाही, आता मी आहे. माझे ऐका. रामाला कशाला मानायचे? कारण राम खिशात घालता येतो. कसेही वागा. दारू पिऊन यायचे आणि म्हणायचे मी रामाचा भक्त आहे. वा वा. राम काही येऊन विचारणार नाही. पण माझे भक्त झाले तर विचारीन मी. म्हणून घाबरायचे! नको. माताजींची भक्ती नको. कारण माताजी आता जिवंत आहेत नां! मेल्यावर बघू. जिवंत आहेत तोपर्यंत मानायचे नाही. कारण जिवंत माणसे विचारतात नां! फैलावर घेतात. ‘का बाबा, तू असे का वागलास?’ कळलं का?

 तर हे ग्रामीण भागातले आपले जे काही आहे, जुनाट पद्धतीचे, त्यातले किती सत्य, किती असत्य ते तुम्हाला सहजयोगात येऊन कळेल. त्यामुळे झालंय काय इतके आपण कुजलो आहोत असं समजलं पाहिजे. जुनाट नाही. कुजून गेलो आहे तेव्हा आपल्या बद्दल ज्या काही कल्पना आहेत, आपले जे काही विचार आहेत, धर्माबद्दलचे तेसुद्धा एकदा पाजळून पहायला पाहिजे. बरं, हे सुटले, तर दुसरे आहे, की ‘आता आम्ही मॉडर्न झालो.’ असं का? म्हणजे काय? डोक्याला आम्ही तेल लावणार नाही. मॉडर्न झालो नां! मॉडर्न झालो म्हणजे काय तर काही तरी वाह्यात गाणी गायची. गणपतीसमोर जाऊन घाणेरडी गाणी म्हणायची. काय म्हणण्याचं? मॉडर्न झाले ना! मग म्हणायचं आम्ही देवालाच मानत नाही. हे मॉडर्न झाले. म्हणजे एक ते त्याने गेले आणि एक ह्याने गेले. ह्याला कारण काय? तर आजकालची मुले बघतात, हे आपले आईवडील वेड्यासारखे चालले आता हरी, हरी टाळ कुटत. जन्मानुजन्म हे केले, पण काय मिळाले ह्यांना? रोजचे जातात त्या वारकरी पंथात. किती मी समजावून सांगितले, बाबा, आता वाऱ्या बंद करा. ज्यासाठी वाऱ्या करीत होते, ते घ्या. ते समजतच नाही त्यांना. तो नशा असतो ना तसा नशा. बस. चालले टाळ कुटत सगळेच्या सगळे. अहो, आता घ्या. तुमच्यासाठी आणलंय सगळे मी. घेत का नाही. ते डोक्यातच येणार नाही त्यांच्या. पण माताजी असे आहे, आमचे बापजादे पण हेच   करतात. अहो, पण त्यांनी जे केले, जे पुण्य जोडलेले आहे त्याची फळं घ्या ना! अजून पुण्य जोडत बसले आहेत का? म्हणजे आजच्या परिस्थितीत काय आहे? आजच्या युगामध्ये सहजयोग हा धर्म आहे. हा धर्म आम्ही स्वीकारला पाहिजे. या धर्मात आम्ही उतरून स्वत:ला स्वच्छ करून घेतले पाहिजे. सर्व धर्माचा जो काही अर्क आहे, तो म्हणजे सहजयोग आहे. आम्ही सर्व धर्मांना मानतो. एका धर्माला मानत नाही. कारण एका धर्माला मानले म्हणजे काय, मी फार चांगला तू वाईट! मग झाले, भांडा. पण सर्व धर्मांमधला जो काही चांगुलपणा आहे तो जर तुम्ही पहायला शिकले तर भांडणच करणार नाहीत. परत महाराष्ट्रात म्हणतात, की भाऊबंदकी पाचवीलाच पूजली आहे आपल्या. त्याला कारण काय आहे? त्याला कारण हे आहे, की आपण नसते आठवत बसतो. जे नको ते आठवत बसतो.  जर कोणी म्हटले, की सोडा ते. तर अहो, काय सांगता तुम्ही! सोडा कसं? आमचं इतकं जुने चालले आहे. सोडायचे कसे? ते जे काही जुनाट आहे, ते एवढे धरून धरून आपण अशा रीतीने वागतो आहे. आता भाऊबंदकी पण जुनाट झाली. ती सोडून द्या. काही कामाची नाही. त्याने काय फायदे झाले महाराष्ट्राचे?

 आता आपल्या ग्रामीण भागात मी बघते. मला परिस्थिती फार गंभीर वाटायला लागली. कारण इकडे मॉडर्न झाले, तर दारू पिऊन झुलताहेत. जे नाही ते असे बेकार गेले. म्हणजे सहजयोग सुरू तरी कुठे करायचा? चार माणसेसुद्धा अशी मिळणार नाहीत तुम्हाला की जी बसून समजतील या गोष्टी. म्हणून मी म्हणते की आपल्या मुलांना तरी आता जपा. त्यांना तरी आता सांभाळा. त्यांना हे सांगा, की तू मागची पुढची चिंता न करता, आत्ताची चिंता कर. म्हणजे समृद्धी सुद्धा येणार. आजच्या चितेत तुम्ही असलात तर बरोबर समृद्धी येईल. पण पुढची गोष्ट म्हणजे नुसते मनाचे मनोरे बांधायचे, हे ही बरोबर नाही आणि मागची गोष्ट, ज्याने तुम्हाला जखडून ठेवलंय, तेही बरोबर नाही. तेव्हा मध्यात आले पाहिजे. मध्यमार्गात आले पाहिजे. संतुलनात आले पाहिजे. जेव्हा तुम्ही संतुलनात याल, तेव्हा बघाल तुमच्यात केवढ्या शक्त्या येतील आणि तुम्ही किती कार्य करू शकता. 

महाराष्ट्र म्हणजे चैतन्याचा नुसता पुतळा आहे. कारण विश्वाची कुंडलिनी इथे आहे. महाराष्ट्रातील लोकांना समजवून समजवून मी थकते. ह्या गोष्टी माझे ऐकतच नाहीत. त्यांच्या लक्षातच ही गोष्ट येत नाही. अजूनही मला इतके आश्चर्य वाटते, की मी लंडनला असते आणि महाराष्ट्रातून पत्रं, ‘हा मनुष्य असा, तो मनुष्य तसा’. माझे कान किटले नी डोळे मिटले. ते संपतच नाही. दुसऱ्याचं चांगले दिसतच नाही. म्हणजे ते सगळे लोक सहजयोगी आहेत! आश्चर्याची गोष्ट आहे. जर अशा रीतीने सहजयोग चालला, तर साधुसंतांना काय वाटणार आहे मला सांगा? त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही आलो. तुमच्या महाराष्ट्रांत जन्म घेतला. मराठी भाषा आम्हाला येते. सगळे काही असूनसुद्धा लोकांना काहीही समजत नाही की केवढे मोठे आम्ही घेऊन आलो आहे. 

आता हे पंचावन्न देशातले लोक आहेत. इथे आले धडपडत तुमच्या देशात. येऊन तरी काय? तुमच्यावर त्यांचा काही परिणाम होतो आहे का? त्यांना तुम्ही बघता का हे कसे लोक आहेत ते. हे परदेशातून आले तुमच्या देशात. ते कशाला आले? कां आले? हे बघता का तुम्ही? हे काय करतात? ह्यांना कसला एवढा आनंद झाला आहे? ह्यांनी काय मिळवलं? आपणही तसे मिळविले पाहिजे. असा विचार एक साधारण, समजूतदार माणसाला आला पाहिजे. समज येण्यासाठी फक्त एक गोष्ट करा, की आज आम्ही इथे बसलो आहोत, आज आम्हाला काय केले पाहिजे? आत्ता काय करायचे आहे? ह्यावेळेला काय करायचे? ही वेळ कसली? ही वेळच महत्त्वाची आहे. आणि तेच माणसाला समजत नाही, म्हणून सगळे घोटाळे आहेत.

तर आज श्री गणेशाला स्मरून आपल्या मनामध्ये निश्चय करायचा, की आम्ही वर्तमानकाळात राहू. मला असे होते, की एक भाषा बोलतांना दुसरी भाषा बदलायची म्हणजे त्रास होतो. पण एका भाषेत शुद्ध बोलते मी. पण ती जर भाषा सुटली की मग मला जमतच नाही. म्हणजे हिंदीत (बोलतांना) कुणी म्हटलं की मराठीत बोला तर जमत नाही. इकडून तिकडे. मग मी आपलं शोधत बसते. कुठं जावं म्हणून. कारण शुद्ध आहे नां सगळे. शुद्ध असले पाहिजे. मिक्श्चर करता येत नाही. भाषेतसुद्धा शुद्ध असायला पाहिजे. त्यामुळे ते मला जमत नाही. तशी शुद्धता आपल्या जीवनात असायला पाहिजे .आणि ती एकाच गोष्टीने येते ती म्हणजे मी ह्यावेळेला काय करते आहे? मी ह्यावेळेला काय विचार करते? अगदी तुम्ही जरासे लक्ष दिले ना सटकन सगळे बदलून जाईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या सवयी सुटतील सगळे काही होईल. फक्त, त्यावेळला आहे की ‘मी ह्यावेळेला काय करते?’ माझ्या बोलण्याचे वाईट वाटून घ्यायचे नाही. मी आई आहे. जे खरे ते सांगितले. हे लक्षात घ्यावे आणि आपले आयुष्य सुधारावे. काय आपलं आयुष्य होऊन राहिलंय आज! मुलाबाळांची काय दैनादान होतेय. ते बघायला पाहिजे. त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. 

परत मी येणारच आहे. परत परत शेरेला येणार आहे. निदान शेरे गावचा तरी उद्धार होऊ देत. त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी मला मदत करावी. सहज योग घ्यावा आणि मेहनत करावी. अभ्यासाने आपली कुंडलिनी, जागृत तर मी करून देईन पण त्यानंतर, त्या जागृतीनंतर तुम्हाला अभ्यासाने ती कुंडलिनी बरोबर बसवली पाहिजे. इतके हे दुसऱ्या देशातले लोक पार झाले. ज्यांना गणपतीचे नाव सुद्धा माहीत नव्हते. गणपतीचा ग माहीत नव्हता. तेंव्हा आपल्या इथे अष्टविनायक ह्या पृथ्वीमातेने आणून ठेवले आहेत, आपण काय करतो ते बघायला पाहिजे. आपली काय स्थिती आहे ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने आपल्या सबंध देशाचेच मुळी भले होणार आहे. पण निदान आधी स्वत:चे भले करून घ्या. किती सोपे आहे, हे बघा तुम्ही! किती सोपे आहे. मी काही कठीण काम सांगितलेले नाही, की डोक्यावर उभे रहा, की हिमालयावर जा. काही नाही. सहज साधी गोष्ट आहे. सहजयोग करा. पहिल्यांदा कुंडलिनी जागृत करून घ्या. आणि वर्तमानकाळात रहायला शिका. बस, मग मी येऊन बघते काय होतं ते ! आशा आहे, पुढच्या वर्षी इथे सगळी भांडणं, तंटे मिटून सगळे व्यवस्थित होईल आणि लोक चांगले राहतील. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद!