Shri Mahalakshmi Puja

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Ganesha Puja 21st December 1991 Date : Kolhapur Place Type Puja Speech Language English, Hindi & Marathi

आता मराठी भाषेबद्दल सांगायचे म्हणजे आध्यात्माला मराठी भाषेसारखी भाषा नाही. इतकी ओघवती भाषा आहे आणि जर मला मराठी भाषा आली नसती तर मी सहजयोगाचे वर्णनच करू शकले नसते. आपल्यावर या भाषेची इतकी कृपा आहे. तसेच आपल्या देशात केवढे संत, महासंत झाले. इतके संत हिंदुस्थानातील कोणत्याही भागात झाले नाहीत. जगातही कोठे झाले नाहीत इतके संत झाले. तर असा प्रश्न येतो, हे संत आले, त्यांनी एवढे कार्य केले, पण त्यांना आपण छळून छळून मारले. त्यांची काही कदर केली नाही. महाराष्ट्रात अष्टविनायक आहेत, स्वयंभू अष्टविनायक आहेत. त्याशिवाय इथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या तीनही देवी आहेत. तुम्हाला हे माहितीच आहे. मला सांगायला नको. हे सगळे असतांना प्रत्येक ह्याच्यात आपल्याला जेजूरीचा खंडोबा आठवतो. नंतर रेणूका देवी वगैरे सगळे आपल्याला माहिती आहे. रोजच्या बोलण्यात, भाषणात सगळ्यांना सगळे माहिती आहे. कुठे कोणते आहे. कोणती जागा जागृत आहे. एवढं म्हणजे नुसतं मंदिरासारखे आहे महाराष्ट्राचे. कुठेही जा तिथे कोणतं तरी एखादे जागृत स्थान असेल. इथे वीर म्हणून एक जागा आहे, तिथे मी गेले होते. मला अगदी आश्चर्य वाटलं, काय तिथे अगदी कार्तिकेयाची छाप पडलेली दिसते. नंतर इकडे नीरा नदी आहे. नीरा नदीच्या काठी नरसिंहाचे अवतार म्हणून त्यांनी तिथे नरसिंहाची मूर्ती बसवलेली आहे. नरसिंगपूर म्हणून जागा आहे. ती मूर्ती नुसती वाळूची आहे. अजून जशीच्या तशी. आणि वरून कुठून तरी पाणी पडतं, ते कोणाला माहिती नाही. म्हणजे इथे परमेश्वरी चमत्कार फार आहेत. हे सगळे असतांनासुद्धा आजच्या काळात महाराष्ट्राची अस्मिता काय आहे, ते अजून मला समजलेले नाही. कारण इथे तुम्हाला सांगायला उपटसंभासारखे बुद्धिवादी आले आहेत, की देव, परमेश्वर वगैरे काही नाही. झालं. कोणी काही म्हटलं की झालं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. इकडे हे आहेत महामूर्ख आणि तिकडे ते भोंद लोक आहेत, जे दारोदार गुरू म्हणून फिरतात. ह्या दोन चाकांच्यामध्ये आपला महाराष्ट्र खरोखर अगदी पिंजून निघाला आहे. त्यातली जी विशेषता आहे, की सगळे लक्ष आध्यात्माकडे. आयुष्याला काही दुसरा अर्थ नाही. जोपर्यंत आपण परमेश्वर मिळविलेला नाही, तोपर्यंत आपल्याला काही अर्थ नाही. अहो, आपण इथे कितीतरी अशी कार्ये केलेली आहेत. त्याला आपण म्हणू, की नाथपंथियांनी इतक्या तऱ्हेतऱ्हेने लोकांना समजवून सांगितले आहे आणि त्याच्यानंतर संतांनी एवढे कार्य केलेले आहे. आता मी जे बोलते तसेच सगळे ते बोलले. त्यांनी शिव्या घातल्या एवढच. मला शिव्या काही येत नाही. रामदास स्वामींनी, त्यांना माझ्यासारख्याच शिव्या वरगैरे काही येत नव्हत्या तर काहीतरी मनानेच कुल्लाळ वगैरे असे शब्द अशा लोकांना लावले जे खोटे होते. तर सगळ्यांवर त्यांनी चौफेर हल्ले, दाणादाण केली. पण त्या संगळ्याचा परिणाम अजून आपल्यावर झाला नाही. मला अजून ह्याचे आश्चर्य वाटते, की ज्या महाराष्ट्रात आम्हीही खूप राबवून घेतले आहे स्वत:ला त्या

ठिकाणी अजून भाऊबंदकी आहे. अजून आपापसात भांडणं आहे. तेव्हा हे सहजयोगात सगळे संपले पाहिजे. हे संपायला पाहिजे कारण ह्या महाराष्ट्राची महती मी साऱ्या जगात सांगत फिरते. कारण इथे चैतन्य किती आहे ! इथे आल्याबरोबर एकदम वेगळे वाटायला लागते. हे सगळे असून लोकांवर त्याचा परिणाम नाही. घरोघर आता दारू पोहोचलेली आहे. कोणत्याही खेडेगावात जा, दारू पिऊन सगळे धूंद. ह्याबाबतीत काहीतरी करायला पाहिजे. असे कसे झाले ह्या वीस वर्षात? इतके कसे बिघडून गेले मला समजत नाही! असे बिघडू नये म्हणून काय करायला पाहिजे, ह्याचाही विचार केला पाहिजे. फक्त सहजयोग वाढवायला पाहिजे. सगळ्यामध्ये जास्त महाराष्ट्रीयन लोकांनीच कर्तव्यदक्ष व्हायला पाहिजे. कार्यक्षम झाले पाहिजे आणि करून दाखविले पाहिजे. शेजारच्या खेड्यापाङ्यात जावे. आजकालची तरूणमंडळी आहेत त्यांना भेटावे. त्यांच्याशी बोलणी करावी. त्यांना समजवून सांगावे, की आध्यात्म आहे. अहो, साक्षात महालक्ष्मी ह्या कोल्हापूरात बसली असून इथे लोक काय काय धंदे करतात, हे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांना भीती नाही त्या महालक्ष्मीची! देवळात जायचे. तिथे उगीचच डोके टेकवायचे. वेणी वरगैरे काय द्यायचे ते देऊन चालले परत गुत्त्यावर. बायकांना वाट्टेल तशी मारहाण करायची. शिव्या द्यायच्या, वाट्टेल तसे वागायचे, त्याला काही अंत राहिला नाही. तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे, की आपले कुठेतरी चुकलेले आहे. आपण कुठेतरी विसरलो आहे. तर काय विसरलो आपण ? आपण हे विसरलो, की आपण महाराष्ट्रात राहतो. स्वत:बद्दल आत्मसम्मान राहिलेला नाही. आम्ही कोण! आणि जो राहिला आहे. तो इतका चुकीचा आहे, की नुसती आढ्यता आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही त्हेची सन्माननीय गोष्ट नाही. फक्त आढ्यता. त्या आढ्यतेत बसून राहिले. सगळे शिवाजी महाराज झाले. अहो, त्यांच्या पायाच्या धुळीबरोबर झाले तरी पुष्कळ झाले. तर महाराष्ट्रातल्या सहजयोग्यांना इतर सहजयोग्यांच्या मानाने दहापट कार्य करायला पाहिजे. दहापट मेहनत करायला पाहिजे. कारण आपण सहजयोगात फार मागासलेले आहोत. सहजयोगात पुष्कळ चमत्कार झाले. सगळ्यांना अनुभव आले. सगळ्यांनी मला सांगितले, माताजी, हा चमत्कार झाला. तो चमत्कार झाला. कबूल. खूप चमत्कार झाले. पण हे सारे चमत्कार झाले. हे सगळे तुम्ही पाहिले. पण आता ह्याच्यात लोकांना घेतले पाहिजे. धडाडीने ह्याच्यात वागले पाहिजे. आसपासच्या खेडेगावात जावे. सगळीकडे जावे. सहजयोगाबद्दल बोलायचे. एका गृहस्थाला मी म्हटले, तुम्ही करू शकता. तर त्यांनी मला सांगितले, की मला आठ हजार रूपये महिना द्या. म्हटलं, ‘अहो, महिन्याला आठ हजार रूपये आपल्या प्राइम मिनिस्टरलाही मिळत नाहीत. तुम्हाला कुठून आणून द्यायचे आठ हजार रूपये?’ कळलं का तुम्हाला! तर सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी ह्या महालक्ष्मीच्या बंधनात स्वत:ला, आम्हाला महालक्ष्मीचे तत्त्व मिळाले म्हणजे काय तर आम्ही उच्च पदाला गेलो. आम्ही सगळे संत झालो. आता ह्या महाराष्ट्राला उजवायचे काम आमचे आहे. प्रकाश आणण्याचे काम आमचे आहे. त्याची मेहनत करायची. ती मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही आणि तुम्हाला ते जे सहजयोगाचे समाधान आहे ते तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रात सहजयोग गाजवणार नाही. अहो, त्या हैद्राबादला सात हजार माणसे आली होती. तिथे मला वाटते एक-दोनच -संत होऊन गेलेत आणि इतके लोक तिथे. आपल्या इथे आपण पब्लिक प्रोग्रॅम केला. लोकांना जाऊन साधु

भेटलो, त्यांच्याशी गोष्टी केल्या, त्यांच्याशी बोललो, त्यांना जागृती दिली. तुमच्या सगळ्यांच्या हातात शक्त्या दिलेल्या आहेत. तर हा महाराष्ट्रसुद्धा एका उच्च पदाला जाईल. तुमच्यामध्ये गुण आहेत. तुमचे गणपती चांगले आहे. वाचन आहे. तुम्हाला माहिती आहे. ज्या लोकांना गणपतीचा ग माहिती नाही त्या लोकांना मी सगळे सांगितले आणि तुम्ही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ‘गणपती गणपती’ करत बसतात आणि तरी त्या गणपतीतील काहीही तुमच्यात येत नाही. अहो, त्यांनी आईच्या प्रेमासाठी, श्रद्धेसाठी सगळ्या जगाशी भांडण केले. त्या गणपतीला तुम्ही जर मानता, तर तुम्हीही काहीतरी करायला पाहिजे. निदान माझ्यासाठी तरी तुम्ही करा. पण खरोखर महाराष्ट्रासाठी काहीतरी करायला पाहिजे. अशी कळकळीची मी तुम्हाला विनंती करते. आता इथून गेल्यावर, आपण जाऊच म्हणा आता गणपतीपुळ्याला, पण त्याच्यानंतर मात्र तुम्ही हा विचार करायचा, की काहो, आता आपण चार-पाचजण किंवा जणी मिळून जाऊयात ह्या खेड्यात. जाऊयात. त्यांच्याशी बोलूयात. तुम्ही एकदा त्यांना सहजयोगात घेऊन या, दारू अशी सोडवते मी. पण ते यायला पाहिजेत. मग ही तंबाखू सुटेल, सगळे सुटेल. पण तुमचे भले झाले. तुम्ही चांगले झाले , आनंद मिळाला, मग आता आम्हाला कशाला दुसर्यांचे. नको रे बाबा. असे नाही करायचे. ती प्रवृत्ती आता सोडून मेहनत करायला पाहिजे. तर अशी ह्या महाराष्ट्रात ही मंडळी आली. मी पुष्कळ मेहनत केली. तुम्हाला माहिती आहे, इतकी वर्षे मी ह्या महाराष्ट्रात मेहनत केलेली आहे. खूप मेहनत केली आहे. थोडी नाही. फक्त सांगायचे असे, की एवढी सगळी मेहनत करून परत त्या संतांसारखे नाही झाले पाहिजे. सहजयोग हा वाढविलाच पाहिजे. त्याची प्रगती केलीच पाहिजे. अर्थात गहनतेत तुम्ही जाल. पण गहनता घेऊन तरी काय करायचे ! जर हे पसरविले नाही, तर जसे दूसरे संत झाले, तसेच तुम्ही. तुम्हाला जर सहजयोगाचा प्रसार करायचा असला. तर तुमच्यासाठी ते सोपं असायला पाहिजे. कारण सबंध, जेवढे काही संतांचे कार्य आहे तेच आपण करतो आहे. तेच आपण पूर्णत्वाला आणतो आहे. तेव्हा तुम्हाला त्याबद्दल कधी काही त्रासच व्हायला नको. सगळं समोर आहे, आता दिल्लीकरांना काय सांगायचे! ते ही समजले आणि ह्या परदेशातल्या लोकांना सांगायचे, ते तर फारच कठीण होते ते ही समजले. मग काय महाराष्ट्रातले लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत. असं शक्यच नाही. पण फक्त आपण निघायला पाहिजे. आपल्यापुरता सहजयोग ठेवायचा नाही. ह्याबद्दल सगळ्यांनी एखादी योजना करावी. आणि मला सांगा तुम्ही काय योजना केलेली आहे. तुम्ही कसे करणार? कोणत्या कोणत्या गावाला जाणार? कोणत्या कोणत्या खेडेगावात जाणार? आणि जोपर्यंत हे होणार नाही, तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राचा उद्धार होणे शक्य नाही. असो, सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद! आज महाकालीचे आपण आवाहन करूयात आणि तिची पूजा करूयात.