Shri Lakshmi Puja

Chalmala (India)

Feedback
Share

लक्ष्मी पूजा – अलिबाग (भारत) १९९१

(श्री माताजींचे स्वागत गीत)

माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले |  माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले ||

आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले |

माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले ||

आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है ||

(श्री माताजींचा जयजयकार)

श्री माताजी निर्मला देवी की जय ………………………….. की जय………………………….. की जय

ह्या चाळमाळ गावात अनेकदा आलोय आम्ही आणि मुंबईकर पण आले आणि सगळ्या जगातले लोक इथे आलेले आहेत. मला ऐकून आनंद झाला, की लोकांची दारू सुटली, हि फार मोठी गोष्ट आहे. ह्या कोकणात दोन त्रास आहेत. एक तर म्हणजे काळी विद्या फार आहे , जशी काय ती एक इंडस्ट्रीच आहे आणि आता ते कमी झालं आहे बरंच. काळी विद्या फारच कमी झाली. ही सहजयोगाची कृपाच म्हणायची की त्या काळी विद्येला बंध पडले. त्या बद्दल प्रचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे, हा पण प्रकार फार झाला होता इकडे, कारण वेळ असला म्हणजे मग आणखीन काय करायचं तर बसून दारू लोक पितात. त्यामुळे किती नुकसान होतं , तिकडे विचार नाही, पैशे किती नासतात तिकडे विचार नसतो. तेव्हा तर सहजयोग असा पसरत गेला; मुंबईकरांनी थोडी मेहनत करायला पाहिजे, निरनिराळ्या इथल्या  खेड्यातन्– पाड्यातून सहजयोगाचा प्रचार केला पाहिजे. लोकांची जागृती झाली म्हणजे आपोआप त्यांच्या ह्या वाईट सवयी सुटून जातील आणि अत्यंत त्रासात आहेत ते. ह्या काळ्या विद्यामुळेच इथे लक्ष्मिचं स्थान, लक्ष्मिची स्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांना पैशाचा त्रास हे ते. तरीसुद्धा आजकाल मी असं ऐकलेलं आहे की परिस्थिती बरी झालेली आहे आणि संसारिक दृष्ट्या सुद्धा लोक चांगले वागताहेत. ही सगळी सहजयोगाची किमया आहे आणि हि किमया सगळीकडे तुम्ही पसरवली पाहीजे. त्याने खूप वाढ होईल. तसे लोक धार्मिक आहेत. देवळं बांधलीयेत, देवाचं नाव घेतात. पण आपल्याला काहीतरी देवासाठी करावं लागतं , याचा विचार लोकांना नाही. ते फक्त सहजयोगानंतर होतं. म्हणून तुम्ही सर्वांनी, जे इथे लोक राहतात त्यांनी आणि इतर लोकांनी सगळीकडे सांगितलं पाहिजे कि आम्हाला ह्याचा काय काय फायदा झाला, सहजयोगात आम्हाला काय काय लाभ झाला, आम्ही काय काय मिळवलं, किती त्याने आम्ही धन्य झालो. जेव्हा सर्व लोकांना हे कळेल, तेव्हा तेही स्वतः सहजयोगात येतील. कारण नाहीतर उद्या त्यांच्या मुलाबाळांची सुद्धा वाट लागेल. असं त्यांच्यासमोर मांडलं तर मग त्यांच्या लक्षात येईल. निदान त्यांच्या मुलाबाळांना तरी सहजयोगात आणलेलं बरं. ह्या चाळमाळ ह्याच्यात अनेकदा आलो आणि फार पवित्र जागा झालेली आहे. आणि आम्हाला सगळ्यांना फार आनंद झाला इथे आल्यावर आणि सगळ्यांना इथे यायला नेहमी वारंवार पाहिजे असते, म्हणतात, “इथे गेलच पाहिजे काहीही असलं तरी माताजी”. तेव्हा तुम्हा सर्वांना अनंत आशिर्वाद आहेत.

आता मुंबईकरांचं सांगायचं म्हणजे, थोडंसं, इतके दिवस मुंबईला मेहनत घेतली आम्ही. पुष्कळ मेहनत घेतली. पण तरीसुद्धा लोकांमध्ये दोन तीन प्रवृत्त्या अजून फार जबरदस्त आहेत. पहिलं म्हणजे कदृपपणा फार जास्त आहे. बक्षिसं घ्यायला पटापट धावतील, पण पैशे द्या म्हटलं की मात्र, जरासा कंटाळा करतील. तसं करू नये. कारण आत्ता पैशे आणायचे कुठून आपण ? आम्ही काय पैशे घेत नाही आणि पैशे कुठून आणायचे ? प्रोग्राम करायचा म्हटला तर त्याला पैशे लागतात, हॉलला पैशे लागतात, थोडेबहुत पैशे देता येतात. आपण त्या सिद्धिविनायकाला इतके जाऊन पैशे घालतो, आला गेला कोणचातरी भोंदू साधू असला त्याला पैशे घालतो. मग देवाच्या कार्यासाठी थोडेसे पैशे आत्ता नाही दिले तर मग कधी देणार ? आणि याचा जाब द्यावा लागेल जर तुम्ही लोकांनी सहजयोगात येऊन त्याची मदत नाही केली. आमच्या आईवडिलांनी देशासाठी फार त्याग केला. घरातलं सगळं सोनं बिनं नाणं सगळं काही दिलं. घरं विकून टाकली, त्यांच्यासाठी आपले कपडे जाळून टाकले, जेलमध्ये गेले. आई माझी पाचदा गेली. वडील माझे कितीदातरी जेलमध्ये गेले, आणि दोन-दोन तीन-तीन वर्षांसाठी. सगळी मुलं होती आम्ही इतकीजणं, आमचं शिक्षण वगैरे सगळं राहिलं एकीकडे. पण तरीसुद्धा त्यांनी एवढा त्याग केला त्यावेळेला. त्या वेळेला नुसता देश स्वतंत्र करायचा होता. त्यासाठी एवढा त्याग केला. आपण सहजयोगासाठी काही त्याग वगैरे करायला नको खरोखर म्हणजे, ह्याच्यात अनंत आशिर्वाद आहेत आणि ते सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळतात, सहज मिळतात. ते आशिर्वाद घ्यायचे असतात. त्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागत नाही. पण जे कार्य होतं त्याच्यात थोडासा बहूत पैशे खर्च करण्यामध्ये मुंबईकरांनी इतका कदृपपणा केलेला मला आश्चर्य वाटतं. आणि सगळ्यात जास्त पैशे त्यांच्याजवळ आहेत. दुसरं असं की महाराष्ट्रामध्येच संत साधूंनी आपलं रक्त ओतलेलं आहे. पण आपल्यात भाऊबंदकी आपल्या पाचवीला पूजलेली आहे ती सहजयोगात दिसते. प्रत्येक ठिकाणाहून पत्र येतं की ह्याचं त्यांच्याशी पटत नाही, त्याचं त्यांच्याशी पटत नाही, हे असं वागतात. तर हे पंचावन्न देशातले लोक एका एका हेच्यात आले आणि आपण एक महाराष्ट्र बघितला की असा प्रकार आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की सहजयोग आता आम्ही दिल्लीला ह्या तीन वर्षात सुरु केला आणि महाराष्ट्रापेक्षा दहा पटीने तरी जादा तिथे सहजयोग वाढलेला आहे. म्हणजे ह्याला कारण काय आहे? संतांनी इथे मेहनत केली, त्यांना छळून छळून मारलं आम्ही, आणि आता आपलं आपापसात भांडून आणि नसत्या गमजा मारून आपण काय करणार आहोत? त्यात काही लोक पैशे बनवताहेत. काही लोक हे करताहेत म्हणजे मला आश्चर्य वाटतं की देवाची काही भीती राहिलेली नाही महाराष्ट्रात. आणि अशा रीतीने लोक वागताहेत, त्याचं मोठं आश्चर्य वाटतं, अजूनही लोक पैशे बनवताहेत. तेव्हा जे कोणी सहजयोगामध्ये पैशे बनवतील त्यांना मुळीच पैशे देऊ नये आणि त्यांच्याकडे लक्षही देऊ नये.

आता सहजयोग हा महाराष्ट्रात वाढलाच पाहिजे. त्यासाठी मेहनत करायला पाहिजे. एक तो गायकवाड आहे तो किती ठिकाणी जातो आणि किती त्याने वाढवलेलं आहे. पण आपण हलतच नाही. कुणाशीही आपले भाऊ बंद, आपले मित्र, त्यानासुद्धा आपण सांगत नाही सहजयोगाबद्दल. आपापसातच भांडणं संपत नाही ना! तर ते तर संपलंच पाहिजे, पण इतकंच नव्हे पण सहजयोग वाढला पाहिजे. कारण त्याचं जे काही आहे, ते पुण्य तुम्हाला मिळेलच, पण जर नाही केलं तर त्याचं अपुण्यही मिळेल हे लक्षात घेतलं पाहिजे. जबाबदारी फार मोठी. किती एकवीस वर्षापासनं त्या मुंबई शहरात मी झगडत आहे. तेव्हा मुंबईकरांना माझं असं म्हणणं आहे की सहजयोग हा वाढवला पाहिजे. नुसतं माझ्यापुरताच सहजयोग किंवा सेंटरला गेलेला सहजयोग चालत नाही. सेंटरच्या पलीकडे जायला पाहिजे. आत्ता अनेक सेंटर्स आहेत, पण त्या सेन्टर्समधून काय कार्य होतं? फक्त सेंटरमध्ये लोक आले, ध्यानाला बसले, माताजींची ऐकली वगैरे टेप एवढंच. त्याच्यापलीकडे जायला पाहिजे, लोकांना भेटायला पाहिजे. इतर तिथे बरेच लहान लहान गावं आहेत, त्या गावात जायला पाहिजे. असा काहीतरी एक मोठा भारी कार्यक्रम आखला पाहिजे. आणि असं कार्य करून बांधून घेतलं पाहिजे. ह्याहून तुम्ही जर रशियाकडे लक्ष दिलं तर आम्ही फक्त तिथे तीनदाच गेलो आहेत आणि त्या तीन ह्याच्यामध्ये एका गावात, फक्त एका गावात, तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ, जवळजवळ बावीस हजार सहजयोगी आहेत, एका गावात. आणि आत्ता त्यांनी एक फार मोठी जागा, काहीतरी दहा-बारा एकराची जमीन आम्हाला गव्हर्नमेंटने देऊ केली आहे. आणि त्याहून किती मिलियन? हां, ट्वेंटी मिलियन, म्हणजे किती झाले, दोनशे लाख, हां, दोन कोटी,दोन कोटी रुपये म्हणजे त्यांचे रुबल्स देऊ केलेत त्या लोकांनी. हे त्या रशियाच्या लोकांनी केलं, आपण काय करतोय? एक आश्रम स्थापायचं म्हटलं मुंबईत तर होऊ शकत नाही. त्याचंही कार्य असंच त्रांगड्यासारखं टांगून ठेवलेलं आहे. काहीही होत नाही. मुंबईला जिथ्थे होतो तिथ्थे लोक आहेत. फक्त मुंबईचा फायदा हाच की माताजी आमचा हा रोग बरा करा, आम्हाला हे झालंय हे ठीक करा, होणारच रोग, तुम्ही सहजयोगासाठी जर काही केलं नाही, तर हा रोग होणं प्राप्तच आहे. तर सहजयोग्यांनी किती खर्च करायचे पैशे, आणि किती मदत करायची हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढच्या वर्षी सहजयोग वाढला पाहिजे महाराष्ट्रात, नाहीतर मी महाराष्ट्रात येणारच नाही असं मी ठरवलेलं आहे. आधीच मी तीन-चार गाव कापून टाकलेले आहेत. आता ह्याच्यापुढे जर महाराष्ट्रात इतकी मेहनत करूनही काही होत नाही तर कशाला अशा जागी जायचं? नुसतं पूजेला यायचं, कारण पूजेला मिळतं ना काहीतरी. पण द्यायच्या वेळेला मात्र नाही. द्यायच्या वेळेला कुणी नाही हजर होत, हे बरोबर नाही. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माताजींनी आम्हाला साक्षात्कार दिला, आता आम्ही काय करतोय त्याचं. आम्ही काय केलं देवासाठी? आम्ही काही दिलं का? आम्ही काही मेहनत केली का? आम्ही कोणाशी संबंध केला का? एकतरी माणसाला आम्ही पार केलं का? असा विचार करायचा. एकेक जण तुम्ही हजार लोकांना पार करू शकता, पण नाही, बोलायचं नाही. तिथे संभावितपणा ठेवायचा, नातलगांशी बोलायचं नाही, हळदीकुंकवाला बोलवायचं पण त्यांना सांगायचं नाही माताजींच्याबद्दल, फोटो काढून ठेवायचा तेवढ्यात, नको रे बाबा. हा प्रकार आता चालणार नाही. बेधडकपणे सहजयोगाबद्दल कार्य हे केलं पाहिजे आणि जर हे कार्य महाराष्ट्रात झालं नाही तर त्याची जबाबदारी कोणावर घालणार? संत साधूंच्या आत्म्याला विचारा, त्यांना केवढा तळतळाट होत असेल की हे लोक कसे वागताहेत. इतके स्वयंभू इथे आहेत. महाराष्ट्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिन्ही देवी आहेत. त्याहून इथे अष्टविनायक बसलेले आहेत. हे सगळं असून, कोरडे पाषाण. तेव्हा ह्या आता सुप्तावस्थेतनं जागृत होऊन कार्य हे केलं पाहिजे. आणि आम्ही काहीतरी करून दाखवू असं आज प्रण केला पाहिजे तुम्ही. माझी अगदी तुम्हाला फार मोठी विनंती आहे, कारण असं करू नका, हे फार चुकतं. एक दुसऱ्याचं वाईट बघायचं, एक दुसऱ्याशी पटवून नाही घ्यायचं, पैशाच्या बाबतीत हयगय करायची किंवा पैशे द्यायचेच नाहीत, वगैरे वगैरे प्रकार करायचे नाहीत. मला ते तुमचे पैशे नकोयत, पण सहजयोगाच्या कार्याला लागतात ना हो. म्हणजे इतपर्यंत गणपतीपुळ्याला येतील तर कुठेतरी आम्ही राहून घेऊ माताजी, आमचं जेवण आम्ही करून घेऊ, तेवढंच पैशे वाचवायला कदृक लोक तयार आहेत. इतकं स्वस्त करतो आम्ही, की ज्यांनी तुमच्यावर बोजा नाही पडला पाहिजे. पण तिथे सुद्धा ते बचावण्याच्या मागे असतात. हा कंजूसपणा मग परमेश्वरही दाखवेल तुम्हाला चांगलाच आणि मग तुम्ही म्हणाल माताजी असं कसं झालं. तर आपले जर प्रश्न सोडवायचे असले, तर पहिल्यांदा आपल्या डोक्यातनं हे काढून टाका, की आम्ही कुणी वेगळे आहोत, आपण सगळे एक आहोत पहिली गोष्ट. आणि दुसरी अशी की, काहीतरी सहजयोगासाठी केलं पाहिजे. पैशे  नसले तर लोकांना सहजयोग द्या. ते तरी करता येतं का? ते तरी होतं का? जरा विचार करून बघा आम्ही किती लोकांना आजपर्यंत जागृती दिली? मी किती लोकांशी भांडणं केली? कसा वागलो काय ते लक्षात घेतलं पाहिजे. ह्या वेळेला फक्त मुंबईच्या युवाशक्तीने फार चांगलं कार्य केलंय आणि त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करते. (टाळ्या)