Shri Kartikeya Puja, On Shri Gyaneshwara

Mumbai (India)

Feedback
Share

Marathi Transcription of Shri Kartikeya Puja. Mumbai (India), 21 December 1996.

कार्तिकेय पूजा वाशी २१/१२/१९९६ आज आपण सर्वांनी श्री महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे पण या महाराष्ट्रात महालक्ष्मीची पूजा तर सतत चालू आहे आणि स्वत: त्यांनी इथे प्रकटीकरण केले आहे, पण माझ्या मते इथे सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावे अशी आंतरिक इच्छा झाली कारण त्यांनी या महाराष्ट्रातच जन्म घेतला आणि ते म्हणजेच ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितले नाही कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. स्वत: साक्षात कार्तिकेयाने या महाराष्ट्रात जन्म घेतला आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि अमृतावनुभव असे दोन मोठे फारच महान असे ग्रन्थ लिहीले. हे जर तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघू शकाल, तर एकदम महासागरात, आनंदाच्या लहरीत तुम्ही स्वत:ला शोधू शकाल. एवढी मोठी गोष्ट मी महाराष्ट्रात सांगितली नाही. त्याला कारण महाराष्ट्रीयन लोकांची प्रवृत्ती झाली आहे. कदाचित आपल्याकडे राजकारणी लोक पूर्वी इतके भयंकर झाले. त्यांचा भयंकरपणा व घाणेरडेपणा महाराष्ट्रात पसरला असेल आणि कार्तिकेय हे महाराष्ट्राचे. आम्ही कार्तिकेय असे समजणे म्हणजे अगदी व्यवस्थित साधं महाराष्ट्रीयन डोक आहे. आम्ही काहीतरी शिष्ट. आता यांनी सांगितली खरी गोष्ट आहे की चाळीस आय.ए.एस. ऑफिसर्स आले होते आणि मी येतांना बघितल तिथे पोलिसचे तीन घोडेस्वार उभे होते. म्हटलं ‘हे कोण आले होते ?’ तर म्हणे स्वत: चीफ सेक्रेटरी आले होते. तिथल्या गव्हर्नरनी सुद्धा मला पाचारण केले की, ‘माताजी, मी जर तुमचे पाचारण केले नाही तर लोक मला उचलून फेकतील.’ अशी तिथल्या लोकांची जागृती. तिथे ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला नाही. फक्त या महाराष्ट्रात का जन्म घेतला ते आता मला लक्षात येतयं. तेवीस वर्षातच ‘नको रे बाबा हा महाराष्ट्र’ म्हणून त्यांनी समाधी घेतली. जितकं संतांना महाराष्ट्रात छळलं गेलं तितकं कुठेही, कोणत्याही संतांना छळलं गेलं नाही. याच्यात म्हणजे मर्दमकी आहे आमच्याकडे. परत ते मेल्यावर मात्र त्यांची देवळे बांधायची, टाळ कुटत बसायचं नुसते रिकामटेकडेपणाचे धंदे. इतके वर्ष महाराष्ट्र ही माझी मायभूमी. ही माझी मायभूमी. शिवाजी महाराजांनी स्वधर्म जागवावा म्हणून सांगितलं होतं आणि मग ज्ञानेश्वरांनी आधी सांगितलं होतं की ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’ तेव्हा शिवाजी महाराजांनी ते शद्ध म्हटले आणि तेच कार्य आता आम्ही बघतो की आम्ही विश्व, स्वधर्म, सूर्य जागृत झाला पाहिजे आणि तो आधी महाराष्ट्रात झाला पाहिजे कारण हे ज्ञानेश्वरांनी इथे सगळ्यांना सांगितले. काल मी बोलले महाराष्ट्राबद्दल त्याचं वाईट वाटून घेऊ नये. उलट माताजी त्याच्याबद्दल बोलत होत्या, त्याच्याबद्दल बोलत होत्या, त्याच्याबद्दल बोलत होत्या असा विचार करायचा. स्वत:कडे लक्ष घालावे त्याला introspection असा शद्व त्यांनी वापरला. इतका शिष्टपणा यायला आपण अस कोणतं वैशिष्ट्य केलं? माताजीच म्हणाले की इतके साधु संत झालेच नाही. म्हणजे तुम्ही काही साधु संत नाही. जसं डबक्यामध्ये एखाद कमळाचं फुल यावं आणि त्यातल्या बेडकांनी म्हणायचं की वा! वा! या कमळाच्या फुलाच्या दबावात आम्ही केवढे मोठे. तशातला प्रकार जास्त आहे आपल्या महाराष्ट्रात हे लक्षात घेतलं पाहिजे. जे प्रकार मी इथे पाहिले, कुठेही सर्व जगात नाही. पहिलं म्हणजे भांडकुदळपणा. मला इतका कंटाळा येतो कधी कधी की मी म्हटलं एक पूजा घेईन मी फक्त बस त्याच्या पुढे नको. इतका भांडकुदळपणा. आता इथे इतकं सुंदर गणपतीपुळ्याला आम्ही आश्रम बांधला त्याच्या मागे हात धुऊन लागले. इतके गलिच्छ लोकं आहेत. काही समजतच नाही यांना. पण आम्ही संतांच्या भूमीत राहणारे, आमच्याकडे अष्टविनायक, आमच्याकडे साडेतीन देवींचे प्रगटीकरण ते मला वाटतं की एवढ्यासाठी की घाणीत स्वच्छता आणण्यासाठी या लोकांनी हिम्मत केली असेल. तशी आम्ही सुद्धा हिम्मत केली. पण आता एकएक प्रकार बघते तर मला आश्चर्य वाटतं. एका गृहस्थाने माझी परवानगी न घेताना, मी त्याचं तोंड सुद्धा कधी पाहिलेलं नाही त्याने व्यवस्थित मिरवणूक काढली.

दुसरे गृहस्थ माझ्या नावाने स्वत: ची पूजा करून घेतात. असे शहाणपणाचे धंदे कुठेच मी पाहिले नाही. अहो, मद्रासला सुद्धा नाही पाहिलं, बंगालमध्ये पाहिलं नाही. देवाची भिती नाही. काहीही करायचं. इतके वाईट लोक होते. जे सहज योग पाळू शकत होते त्यांना म्हटलं तुम्ही सहजयोगात रहायचं नाही सध्या. सहज योगात राहन स्वत:ची स्थिती नीट करा. झालं, माताजी प्रेमाच्या गोष्टी सांगतात आणि मग सगळ्यांवर का रागवतात? मी आई आहे. जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते सांगितलचं पाहिजे आणि ते मी सांगेन. पण कुठे कुठे सांगावच लागत नाही, गरजच नाही त्याची. अत्यंत शिष्ट लोकं आणि ते जे म्हणाले ते खरं आहे पुढे पुढे करणे. मुद्दामुन मी एक फुलं घेऊन मी ठाण्याहून इथे आलो. मुद्दामुन माताजींच्या साठी. ते मी स्वत:च माताजींना देणार. मुद्दामुन. पागलखान्यातुन आलेले दिसतात. तेव्हा का असं आहे महराष्ट्रात? ते मला समजत नाही. संत साधु झाले म्हणून ही पवित्र भूमी. इथे अष्टविनायक म्हणून अगदी पवित्र भूमी आहे, आणि त्याच्यावर साडेतीन देवींचे प्रगटीकरण म्हणजे ही परम पवित्र भूमी. या भूमीत असले घाणेरडे प्रकार का होतात? एक दुसरे गृहस्थ कोणीतरी निघाले, त्यांना भूतबाधा प्रकार प्रकार बरेच झाल्यामुळे त्यांना सांगितलं की बा तुम्ही सहजयोगातुन जा. तर त्यांनी दुसराच सहजयोग काढला आहे स्वत:चा. माझ्यात जे दोष आहे, माझ्यात जे वाईट आहे ते काढायचं नाही. उलट मी काहीतरी विशेष, आता मी दाखवतो, म्हणजे इथपर्यंत की त्यांची बायको सगळ्यांना सांगायची की आमचे हे माताजींपेक्षा फार वर आहेत. वर आहेत की खाली देवाला ठाऊक!

असले अनेकविध प्रकार ऐकून मी आश्चर्यचकित झाले. हा असला प्रकार सहज योगात कुठेही कुठेही झालेला नाही. परत आपली मराठी वर्तमानपत्रे. त्यापेक्षा ती हिंदी बरी, इंग्लिश बरी. काहीही भरकटायचं, काहीही लिहायचं. काहीही करायचं. भांडकुदळपणा हा पहिला स्वभाव आहे महाराष्ट्राचा. बरं झालं, भांडकुदळपणा हा तुमचा स्वभाव आहे, काहीही असलं तरी आता सहज योगात उतरलाय. हेवेदावे इतके, भांडणं इतकी, कुणाला पाडायला, शिष्टपणा इतका तर आम्ही म्हणे जुने सहजयोगी. हे नविन. त्यांना काही येतच नाही. हळूहळू उत्तर हिंदुस्थानातील लोक सुद्धा सहजयोगात येऊ लागले आहेत. पण इथला चमत्कारीकपणा पाहून तेही परतायला लागलेत. मी जेव्हा पुण्याला गेले तिथे पंजाबी लोक आले होते सहजयोगाला. ते म्हणे ‘माताजी, या महाराष्ट्रीयन कुचक्या लोकांना घेऊन तुम्ही काय चालवलयं. ते कुचकट लोक आहेत.’ मला मोठा राग आला म्हटल, ‘बाबा, असं कसं म्हणतात. यांना कुचकट म्हणतात, ही काय बोलायची पद्धत झाली, तुम्ही स्वत:ला समजता काय ? तुम्ही पंजाबी म्हणजे…. पण आज ते आठ दहा माणसं पक्के सहजयोगी बनलेले आहेत. दिल्लीला आश्रम बांधला. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ध्यानाला रोज सकाळी ऑफीसला जायच्या आधी मोटारीतन येऊन, बसने येऊन निदान शंभर माणसं रोज ध्यानाला बसतात. बाकी सर्व सुंदर आहे. एवढ्या आपल्याजवळ वस्तू आहेत सुंदर, आईची शोभा आहे. समया लावण्यात फार हुशार. सगळे करण्यात आपण फार हुशार आहोत. पण आतला जो दिवा तो कधी पेटवणार? आतला दिवा आधी पेटवू या. आम्ही किती गहन आहोत ते बघण्यासाठी आतला दिवा आधी पेटवून घ्या. जे आत्ता आपल्याला सांगितलं ते मीच त्याला सांगितलं तूच सांग म्हणून कारण मला बोलवत नाही या गोष्टी. आता हे सहजयोगात उतरलेले लोकं दारू प्यायचे, ड्रग घ्यायचे, सगळे धंदे, आणि कुठल्या कुठे पोहोचले आणि महाराष्ट्रातील लोक आपापसात हमरीतुमरीवर येतात म्हणजे म्हणायचं तरी काय? म्हणे माताजी आमच्यावर रागवतात. रागवणार नाही तर काय तुमच्या गळ्यात हार घालायचे. आपापसात भांडण करण्यात एवढे पटाईत लोक आहेत, मग रिकामटेकडेपणा पण फार. इथे असं करतात, ते तसं करतात. करू देत. रिकामटेकडेपणाचे धंदे फार. मग काही नाही सुचलं तर आजकाल माताजी पैसेबिसै देत नाहीत म्हणून आपल्याला जास्तीचे पैसे द्यावे लागतात. अहो मीच सगळ्या गोष्टीचे पैसे देतीये. तुमच्या जेवणाचे, खाण्याचे, पिण्याचे. सगळे देऊन पाहिले. तर आता काही नाही तर अशा गोष्टी बोलायच्या. मी काय या राजकारणी लोकांसारखी आहे की काय? मग म्हणायचे की माताजी इकडे भुकंप का होतात? अमुक का होतं, तमुक का होतं ?

इतके दारूडे महाराष्ट्रात आहेत इतके मी कुठेही पाहिले नाहीत. रस्त्यावर दारू पिऊन फिरणारे महाराष्ट्रात किती लोकं आहेत तुम्ही सांगा? दिल्लीला तुम्हाला असे रस्त्यात एक दिसणार नाही. एकसुद्धा. अहो, परदेशात मी कधी पाहिले नाही. या महाराष्ट्रात तुम्ही कुठे बाहेर जा, दारू पिऊन तयार. हे सुरुवातीपासून चालू आहे बरेच वर्ष झाले. मी राहुरी ला गेले होते एकदा, तर रस्ता असा वर चढत गेला आणि मोठा रस्ता आडवा होता. तिथे जाऊन मी गाडी थांबवल्यावर बघते तर काय ढेकणासारखे पटापट मरत होते तिथे. म्हटलं कॉलरा झाला की काय? पांढरी टोपी मात्र लावायची. पांढरे सदरे, पांढरी विजार घालून खालून वर येऊन ढेकणासारखे पटापट पडले. म्हटलं अहो, झालं काय ? तिकडे म्हणे इंदिरा नगरी आहे. मग पुढे. तिथे म्हणे दारू मिळते स्वस्त. दारू पिऊन तिथून वर यायचे आणि पटापट मरायचे. इतके लोक इथे दारू पितात कि ऑफीसर्स. दिल्लीला तुम्ही गेले तर तिथे दारू पित नाहीत. फार कमी लोक. पुष्कळ लोक जिथे दारू असेल तिथे जात पण नाही. पण इथल्या प्रत्येक पार्टीत तुम्ही जा, कुठेही जा पण दारू पिऊन झिंगले नाहीत तर ते महाराष्ट्रीयन कसले. अहो, महाराष्ट्रीयन दारू पितात. आम्हाला लहानपणापासून दारू म्हणजे काय हे माहीत नाही. त्याचा रंगसुद्धा माहीत नाही. बरं कोणाला काही म्हटलं तर ते म्हणतात बघा ते होते सत्तर वर्षाचे आणि तरी दारू पित होते. म्हटलं असं का? आता त्यांचा पुतळा उभारा तुम्ही लोकं. त्या लायकीत आपण आलो आहोत आता का? दारूचे गुत्ते बंद करण्यासाठी आम्ही लहानपणी सात वर्षाचे असतांना भांडणं केली होती. तर आता गुत्ते सोडा. इथे आता कितीतरी लोक असे जमा झाले आहेत की त्यांना आता दारू शिवाय आता होत नाही. दारूच्या विरूद्ध बोललं की लागले सगळे दारूवाले माझ्या मागे हात धुवून. कोणाला काही बोलायची सोय नाही. हेच ते वर्तमानपत्रकार, हेच ते इथले सगळे धंदे करणारे लोकं. आश्चर्याची गोष्ट आहे. लखनौ सारख्या ठिकाणी वाजिद अली शहा सारखा मनुष्य, नवाब होता. तिथल्या लोकांमध्ये इतकी सौम्यता. तशी भाषा नम्र आहे म्हणा. इतकी नम्रता, इतकं सौजन्य, मला आश्चर्य वाटलं. याचं वाईट सांग, त्याचं वाईट सांग, मला पत्रावर पत्र इतकी घाणेरडी पत्र लिहीतात. प्रत्येकाच्या चरित्राबद्दल अमुक तमुक. मला अगदी कंटाळा आला. महाराष्ट्रातून पत्र आलं की म्हणते चला घाला चुलीत. आता त्या ज्ञानदेवांच्या समोर काय म्हणू. स्वतः ते तेविसाव्या वर्षी तुम्हा सर्वांना नमस्कार करून गेले. त्यांनी कुणालाही क्रिटीसाईज नाही केलं. कोण करणार? बेकार वेळ घालवण्यात अर्थ काय? म्हणून त्यांनी (वरची) गोष्ट सांगितली. त्यांनी त्या स्थितीतल्या लोकांची गोष्ट सांगितली. ते यांच्या डोक्यात कुठून येणार? या महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात येण्यासारखं नाही.

असं मी म्हणणार नाही की महाराष्ट्रात लोक मिळाले नाही मला. पण ज्या मानाने मी इथे मेहनत घेतली आणि ज्या मानाने एवढा हा अफाट हा देश महाराष्ट्र त्याच्यात अजून पूष्कळ व्हायला पाहिजे. एक तर की मी मुद्दामुन आलो. कशाला आले ? कुणी सांगितलं यायला? मुळीच येऊ नये. मग मी जर येत असले तर माझ्या दर्शनाच्या वेळी स्वत:चेच दर्शन द्यायला पाहिजे. मग धक्का-धक्की, पुढे या, पुढेऊन मलाच त्यांचे भयंकर चेहरे दिसले पाहिजेत. तुम्ही कितीही म्हटलं तरी आपल्याला अजून पुष्कळ शिकायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ती आणबाण तानाजीची सोडा. ते कुठे गेले मला समजतच नाही. पण निदान नम्रता तर पाहिजे की आम्हाला मिळवायचयं माताजी. आम्हाला उठायचयं वर. कुठयं ते संत साधु? परत जिथे तिथे. मी तर म्हणते की ब्राह्मणांचे कर्दनकाळ सगळे इथेच हजर झालेत कारण हे गुरू, ते गुरू, ते गुरू, ते गुरु, ते गुरू आणि प्रस्थ. भलत्या लोकांचे प्रस्थ करायचे असेल तर एकतर अमेरिकेत तरी करा किंवा महाराष्ट्रात तरी करवा. इतके महामुर्ख आहेत की अजून हे ही माहीत नाही खरं काय आणि खोटं काय.. तुम्ही हे लोकांना सांगायला पाहिजे जाऊन. महाराष्ट्रातील लोकांना जाऊन सांगायला पाहिजे की खरं आणि खोट हे सुद्धा जर तुम्हाला कळलं नाही तर काय कामाचे तुम्ही. आज मी एवढ्यासाठी सांगते की जर तुम्ही सच्चे सहजयोगी असाल तर, आम्ही महाराष्ट्रीयन आणि ज्ञानेश्वरांचे आम्ही नातलग, कुठेही गेले की अहो ते आमचे पूर्वज, आम्ही त्यांचे वंशज. असं का, बरं! दिसतयं.

आणि मराठी पत्रिका वाचूच नका. उपटसुंभ आहेत सगळे. काही माहीत नाही. काय लिहायचे, काय नाही लिहायचे, लोकांना कोणतं पोषक होईल, कोणतं ठीक होईल. कबूल एक- दोन भामटे तुमच्या इथे आले, राजकारणात आले, पण तुम्ही सगळेच तसे होणार आहात का? आता सगळ्यांना, सगळ्या सहज योग्यांना माझी विनंती आहे की आपापसात वाद – विवाद करणे सोडा आणि जे लोक सहजयोग सोडून गेले, असे जेवढे लोकं आहेत त्या लोकांकडे बघायचं नाही, त्यांचा आमचा काही संबंध नाही. परवा एक आले होते भेटायला मला, त्यांच्या डोक्यात मोठे मोठे टेंगळं आहेत. म्हटलं झालं काय? म्हणाले माताजी, आता मी मरतोय. म्हटलं झालं काय? मी ते सहजयोगी होते ना तुमचे त्यांच्याकडे गेलो होतो. कशाला गेले होते? तुमच्यासाठी व्यवस्थित सेंटर्स आहेत तिथे जा. आता कोणीही, कोणाच्या सेंटर मध्ये इंटरफिअरन्स करू नये. मला प्रत्येकाचं बघायचयं कसं काय करतात. कुणीही मध्ये बोलू नये. आता मी हेच सगळ्यांना सांगणार आहे. लोकं मला सांगायला लागले की इकडे तिकडे लोकं बोलतात म्हणून घोटाळे. जिथे जो सेंटर चालवेल तोच त्याचा मुख्य, तोच त्याचा लिडर. परत आपल्या लिडरच्या विरूद्ध काही लिहून पाठवलं तर तुम्हाला सहज योगातून मी काढून टाकेन. ख्रिस्तांनी याला ‘मरमरींग सोल’ म्हंटले आहे. बाष्फळ गोष्टी करत बसायच्या. पूर्वी देवळात बायका वाती करत बसायच्या तेंव्हा म्हणत असत, ‘आजीबाई बसल्यात वाती वळत.’ पण आता तरूण लोक सुद्धा हेच धंदे करतात म्हणजे काय म्हणायचं? एकाने दुसर्याच्या विरूद्ध बोलणं किंवा हे असं का करतात, तसं का करतात ? असा ऊहापोह करायला तुम्हाला इच्छा तरी कशी होते? अहो मी तुम्हाला तिथे न्यायचं म्हणतेय. त्या संत पदाची मी तुम्हाला एक विशेष देणगी देणार आहे. दिली आहे. पण तुम्ही संतांसारखे वागले पाहिजे. काल मी जरा बोलले वारकरी लोकांबद्दल. हे अनेक वर्षापासून सांगायचे होते पण म्हंटले नाही. भलत्या ठिकाणी श्रद्धा ठेवणे हे महाराष्ट्रीयन लोकांचे वैशिष्ट्य आहे. असेच अमेरिकन्स. मी अमेरिकन्सना नेहमी म्हणते की त्यांच्यामध्ये अजून मॅच्यूरिटी नाही आहे. प्रगल्भता नाही. पण इथे तर चांगले परिपक्व लोक रहातात. या परिपक्व लोकांना झालंय काय असं वागायला ? तेंव्हा आजची पुजनाची वेळ मी सुरूवातीलाच सांगते. ज्या भूमीवर तुम्ही इथे बसले आहात तिथे रक्त सांडलंय संतांनी आणि तुम्हाला संत होणे काही कठीण नाही कारण म्हणूनच तुम्ही इथे जन्मले आहात, हे मी सांगते, पण अनुभव आहे. ते ही जरी असले तरी ‘आम्ही सहजयोगी’ म्हणून तुम्ही मिश्यांवर ताव दिला तर तुम्ही कसले हो सहजयोगी. ही अशी भाषा. मराठी सारखी आध्यात्मिक भाषा नाही. महाराष्ट्रात झाले ते एवढं आध्यात्म. अहो, काय त्याची महती गावी तेवढी थोडी! आणि तुम्ही याच्यात जन्माला आले ते पूण्याई शिवाय का ? पण ती वाया गेली. मी काय ज्ञानेश्वरांसारखी समाधी घेतली नाही आणि एवढे सगळे झाल्यावर सुद्धा ‘अति शहाणे त्याचे बैलच रिकामे’ हे आहे बरे. म्हणे आम्ही अंधश्रद्धा निर्मुलन करतो. काल मी सांगितला तो एक प्रकार. कोणी काही बोलले की लागले त्याच्या मागे. हजारोंनी माणसं जातील घाणेरड्या ठिकाणी. अहो, इतके पैसे बनवले माताजी. त्याची बायको रजनीशबरोबर पळाली, असं का? तिला पैसे वर्गैरे दिले नसतील कदाचित. आम्ही त्यांनाच मानत होतो, मग माना. आम्ही त्यांना मानतो म्हणजे तुम्ही आहात कोण? नम्रतेला इथून सुरूवात करायची. मी कोण? मी सहजयोगी. आत्मा स्वरूपतत्वता प्राप्त झालेला मी सहजयोगी आणि मला कसे वागले पाहिजे. अहो, ज्ञानेश्वरांचे उदारहरण समोर आहे. तुकारामांचे उदाहरण समोर आहे. रामदासांचे उदाहरण समोर आहे. एकनाथांचे. ते नाही ऐकलं का तुम्ही? ते नाही पाहिलं का? ज्या नामदेवाला गुरू नानकांनी आपल्या हृदयाशी लावलं तो नामदेव महाराष्ट्रातील शिंपी होता ना! पण या नामदेवाच्या देवळात जाऊन बघितलं टाळ कुटत बसलेत. मोजून दहा शिंपी जरी आले तरी म्हणायचं नामदेवांचं काही तरी सार्थक झालं . आज त्या सर्व संत -साधुंना परत एकच विनंती, परत या देशात जन्म घेऊन सर्वांना ठीक करा.

सहजयोगाची जी प्रगती व्हायला पाहिजे ती झालेली नाही. फक्त सहजयोग मात्र वाढत चाललाय. म्हणजे जे जास्त पसरतं नं, आणि त्यात ताकद नसली तर ते फाटतं. आता हा ग्रुप वेगळा, तो ग्रुप वेगळा, तिकडे हे ऐकायला मिळत नाही. ही भांडणं तिथे दिसतच नाही मुळी. अहो, सहजयोगात आपला वेगवेगळा ग्रुप कसला? स्वयं साक्षात कार्तिकेयाने तिथे जन्म घेतलाय. तिला, सरस्वतीला सुद्धा ‘स्कंध माता’ म्हणतात. ती त्याची आई नव्हती. ती कुमारी होती पण तीनी स्कंधाला आपल्या हृदयाशी लावून ठेवले होते आणि त्याला मुलगा मानले होते. त्या कार्तिकेयाने शोधून या महाराष्ट्रात जन्म घ्यावा. ज्ञानेश्वरांनी जे काही लिहीले आहे त्याच्यावर सारे जग भाळले आहे, पण आपल्या इथे मात्र ऊलट प्रकार, ना, सांगायचे म्हणजे की अमेरिकेतून काहीजण आले ते इथे एक युनिव्हर्सिटी बनवायची म्हणून. ‘पीस युनिव्हर्सिटी’. आळंदीला होणार. पण झाले काय? आळंदीला तर करणार नाहीत ते. माझ्या चरणी आले आणि म्हणाले, ‘माताजी, तुम्हीच सगळे करा. तुमच्याच हवाली. आम्हाला इकडे महाराष्ट्रात कुणाकडून, काहीही करवून घ्यायचे नाही. We don’t want to deal with them.’ झालं काय, एका शिष्टाने-मोठी आहेत माणसं ती, त्यांनी अडीच कोटी मारले त्यांचे. बिचार्या त्या अमेरिकन्सचे. दूसर्याने साडे तीन कोटी मारले. त्यांनी काढता पाय घेतला. ‘नको रे बाबा या महाराष्ट्रात.’ मला सांगितले, ‘तुम्हीच करा, तुमच्या नावाने करा. आम्ही तुम्हालाच मानतो.’ माझी त्यांची भेट दोन तासांची. ते थक्कच पडले काय लोक आहेत! आणि व्यवस्थित चालू आहे आणि ज्यांनी पैसे मारले ते काही राजकारणी नाहीत. जो दिसला तो पैशावरच झडप. हे सगळे सांगण्याचे कारण असे की गहनता येण्यासाठी आधी स्वत:ला बघायला पाहिजे. स्वतः कडे लक्ष द्या आणि बघितलं पाहिजे माताजीं नी सांगितले ते किती माझ्यात आहे. मी सगळ्यांना सांगते की कुण्डलिनीचे जागरण होते तर सगळ्या याधी, व्याधी, सगळ्या प्रकारच्या उपाधी पडून जातात, सर्व काही सुटून एक सुंदर कमळाचंे फुल येतं. पण महाराष्ट्रात आल्यावर तसे दिसत नाही. परत सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे मला यात कोणता हद्दा मिळाला? हा लिडर कोण? हा सांगणारा कोण? हा कशाला मला येऊन ठीक करतो? मी लिडर मानत नाही मग त्याच्याविरूद्ध लिहा, चरित्राबद्दल लिहा. ‘माताजी, तुम्ही आम्हाला सहजयोगातून काढलं, पण ज्याच्यामुळे काढले त्याचे चरित्रच ठीक नाही, अहो मला अक्कल आहे किंवा नाही. तुमच्या अकलेने मी चालले असते तर काय झाले असते. सगळ्यात जास्त म्हणजे कर्मकांडी फार आहोत आपण. सकाळी चार वाजता उठायचं. आंघोळ करायची, माताजींच्या समोर ध्यानाला बसायचं. मग मी इतकं करुनही माताजी माझं भलं का नाही होतं ? बाई, हृदय पाहिजे, हृदय कुठे दिलस तु मला, तुझ हृदय दे मला. तुझं हृदय मिळाल्याशिवाय मी त्याच्यात भरू तरी काय ? प्रेम भरायला हृदय पाहिजे. भांडकुदळ लोकांना हृदय असते असे मला नाही वाटत .

तेंव्हा आजच्या पूजेत एवढं सगळे सांगितले ते एवढ्यासाठी जसे तुम्ही इथे दिवे लावलेत. मराठीत तो शद्ध असा की ‘दिवे लावू नका.’ मराठी भाषा अशी आहे की तलवारी सारखी. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, हृदयात दिवा लावा. तो लावला की तुम्हाला स्वत: बद्दल कळेल. आम्ही लहानपणी आमची आई म्हणायची, ‘लक्ष कुठे आहे ?’ काही असलं की लक्ष कुठेय? आता त्याचा अर्थ मला कळतो. तुमचे लक्ष कुठे आहे ? तुमचं लक्ष काय ? संथपणा, रागीटपणा, चिडणं, चिडचिडणे, काहीतरी नवीनच काढणे हा सर्व प्रकार सहज योगात चालणार नाही. कसे मनुष्याला शांत चित्त व्हायला पाहिजे. त्याच्यावर वर्णन अमृतानुभवाचं घ्या वा! वा! वाचल की वाटतं कसं ज्ञानेश्वरांनी समजावून सांगितले लोकांना. पण आहेत कुठे समजायला. त्यांना काही कळतचं नाही काय लिहीलंय ते. तेंव्हा अमृतानुभव घ्या. पारायण करू नका. त्यातील एकेका शद्बाला बघा. तुमच्यात ही स्थिती आहे का? . कसा एक सहजयोगी समाधानाने आपल्या मधे सामावलेला, मजेत आलेला. त्याला सत्ता नको, पैसे नको, काही नको. कसा तो मजेत आलेला. तो कसा आनंदात आलेला. त्याचं व्यक्तित्व म्हणजे काहीतरी विशेष. सहजयोगात महाराष्ट्रात मात्र आहेत काही तासलेले हिरे. उत्तम, अति उत्तम. पण ते आणि बाकीचे असेच वाटतात मला. तेव्हा आपापसात हेवेदावे करणे, मला कुणीही पत्र लिह नये आणि त्यात दुसर्यांची निंदा करू नये, मला आवडत नाही ते. मला सोडा ते कुणालाही आवडत नाही आणि त्याचे परिणाम होतील. कृपा करून मला घाणेरडी पत्र लिहू नका. तुमच्या मते ती फार चांगली असतील. ती स्वत:जवळच ठेवा, मला काही सांगायची गरज नाही. मला सगळे माहिती आहे. फक्त तुम्हाला सगळं माहिती असले पाहिजे, तरच, तुमच्यातून हिरे-माणके निघणार आहेत, हे मला माहीत आहे, ही खाण आहे आणि खाणीत जरी कोळसा दिसला तरी त्या कोळशात हिरे-माणके आहेत. इतकी वर्षे झाली आता मेहनत घेतली. आता तुम्ही जर स्वत:ला ओळखलं नाही तर मी काय करू?

ज्ञानेशांचे जे आयुष्य होते ते इतके महत्त्वाचे आयुष्य तेवीस वर्षांचे. त्यांनी कसे घालवले असेल. सन्याशाच्या पोटी मुद्दामुन जन्माला आले, मुद्दामुन. लोकांना दाखवायला हे सगळ वरचं, औपचारिक काहीच नाही. औपचारिकता, वरचे सगळे सोंग आहे. त्या सर्वांच्या विरोधात ते जन्माला आले आणि सोंगाड्या लोकांनी त्रास दिला त्यांना. तसं सहजयोगात ठेऊ नका. माताजींबद्दल एवढं लक्षात ठेवा. मला सगळ्यांबद्दल सगळं माहिती आहे. मला काहीही सांगायला नको, फक्त तुम्ही स्वत:ला मात्र ओळखा. मला ओळखण्यापेक्षा जर स्वत:ला ओळखाल तर आजची पूजा धन्य झाली असं मी म्हणेन, याबद्दल शंका नाही. उत्तर हिंदूस्थानात मात्र कार्य खरोखरच जोरात सुरू झाले. याबद्दल शंका नाही आणि तिथल्या आय.ए.एस. ऑफीसर्स नी आपापसात एक संघ तयार केला की जर कोणी corrupt असेल, कोणीही ऑफीसर, कितीही मोठा असला तरी त्याच्याबद्दल आपण कारवाई करायची. सगळा मागमूस काढायचा, काय झालं ? कसे पैसे कमावतो ? कुठून पैसे कमावतो? आणि मग त्याला कोर्टात घालायचं. मी त्यांना म्हटलं, “तुम्ही आले कसे सहजयोगात आय.एस.ची मंडळी? ‘अहो माताजी, त्रास असा आहे, आम्ही लोक ईमानदार आहोत. आम्हाला बेईमानी करताच येत नाही.’ ऐका तुम्ही. माझे यजमानही तसेच. मला माहितीये. माझा जावई तसाच. आम्हाला बेईमानी करताच येत नाही. ‘आम्ही करायचं काय ? लोकांबरोबर रहायचं कसं? ते आम्हाला म्हणतात बेईमानी करा. मग शेवटी आम्हाला मार्ग मिळाला. सहजयोगी झालो आम्ही आणि हे आम्ही सगळे सहजयोगी असे सगळे एकजूट झालो. कुणी भांडत नाही, काही नाही.’ तशीच संघटना व्हायला पाहिजे सहजयोग्यांची इथे. आम्ही सत्यावर उभे आहोत आणि आम्हाला कुणीही हलवू शकत नाही. अडीक आम्ही उभे आहोत त्या सत्यावर. पण त्या सत्याचा प्रवाह किंवा त्या सत्याचा प्रकाश प्रेम आहे आणि प्रेम, तेची सोयरिक होती स्पष्ट सांगितले आहे ज्ञानेश्वरांनी. तेच तुमचे नातलग. पण नाही. आमच्याकडे हळदी-कुंकू आहे. बरं मग. माझ्या काकू येणार आहेत त्या अमक्या देवाला मानतात, त्या येणार आहेत त्या तमक्या देवाला मानतात. सगळ्या साळकाया-माळकाया येणार आहेत. सहजयोगी येणार आहेत का? तुमचे नातलग कोण? हेच. हे तुमचे भाईबंद आहेत. यांच्याविरूद्ध त्यांच्याशी भांडण करण्यापेक्षा स्वत:शीच भांडण करा. या सबंध जगात आज एक जीव एकवटलेला आहे सहजयोगात. ज्याला मी सामूहिकता म्हणते ती जागरूक झाली आहे. ६५ देशातून त्याचा निनाद मी ऐकते आहे, पण महाराष्ट्रात तसा प्रकार दिसत नाही. एकजूट झाले पाहिजे. काही असले तरी आम्ही सहजयोगी आहोत आणि बाकी सगळे दुसरे आहेत आणि हे जोपर्यंत तुमच्यात येणार नाही तोपर्यंत तुम्ही सहजयोगात उतरणार नाही कारण तुम्ही सामूहिक नाही. तुम्ही सामूहिक झाल्याशिवाय हे कार्य होणार नाही. समुद्राकडे लक्ष दिले तर दिसेल एक जर लहर चालली तर ती सबंध समुद्रात फिरते. कारण समुद्र सामूहिक. सगळे बिंदू एकत्र आहेत. एखादा बिंदू बाहेर पडला तर उन्हाच्या तापाने तो नष्ट होतो. तसेच आपले सहजयोगाचे आहे. सहजयोगात जो आहे तो पूर्णपणे आहे, नाही तर नाही. एक दुसऱ्या विरूद्ध बोलणे, एक दुसर्याच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणे हे शोभत नाही. आज पूजेच्या दिवशी आपले हृदय स्वच्छ करा व त्या हृदयात प्रेम गंगा वाहू द्या. महाराष्ट्राचा शिष्टपणा बंद झाला पाहिजे.मला माताजींना भेटलचं पाहिजे. माताजींना निरोप करा, मुळीच नाही. मला भेटायचे असेल तर तुम्ही फक्त आपल्या हृदयात मला बघा. तिथेच भेटणार आहे मी तुम्हाला आणि हे फार जास्त आहे. प्रतिष्ठानला आलं की भडीमार. सगळी मंडळी हजर. आम्हाला भेटलच पाहिजे. मी कुणीतरी विशेष. मी डॉक्टर आहे. असाल! असाल! मी वकील आहे. मी अमका, मी तमका आहे. अहो, मी चीफ मिनिस्टरचा चपराशी आहे. अहंकाराचे प्रकार असे जितके महाराष्ट्रात दिसतील तितके कुठे दिसणार नाही. तेंव्हा तो आपल्याला चिकटायला नको. जासाठी तुम्हाला महाराष्ट्रीयन म्हणवतात ज्यासाठी तुम्ही महाराष्ट्रीयन आहात. या महाराष्ट्रात जन्मलेले तुम्ही महान आहात, ते अशा चिखलात का? समोरासमोर करणे, सारखे पुढे येणे. मंडळी आलेली आहेत इथे यातले लिडर कोण तुम्ही ओळखणार नाही. ते त्याच्यात नाहीच आहे कारण नम्रतेने सहजयोगी होता येते हे त्यांना माहीत आहे. आजच्या पूजेत मी तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद देते की तुम्ही स्वत:च्या आत्म्याच्या अनुभूतीने परिपूर्ण व्हा. अर्धवटपणा नको. परिपूर्ण व्हा हा अनंत मी आशीर्वाद तुम्हाला देते