Public Program

Pune (India)

1999-03-25 Public Program, Velechi Hallk, Pune, India (Marathi), 48'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: View on Youku: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

1999-03-25 Music At Public Program, Pune, India, 73'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: View on Youku: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

1999-03-25 Velechi Hallk Marathi Pune NITL-RAW, 179'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Velechi Hallk 25th March 1999 Date : Place Pune Public Program Type

सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार! पूर्वी अनेकवेळा मी आपल्याला सत्याबद्दल सांगितलं होतं. सत्य काय आहे ? सत्य आणि असत्य यातला फरक कसा ओळखायचा याबद्दल मी आपल्याला बरंच समजावून सांगितलं होतं. आधी या पुण्यात या पुण्यपट्टणम मध्ये पण आपण सत्य का शोधतो ते बघितलं पाहिजे. आज या कलियुगात अनेक असे प्रकार दिसून येतात की मनुष्य घाबरून जातो. त्याला समजत नाही की हे सर्व काय चालले आहे आणि ही कलियुगाची विशेषता आहे की मनुष्याला भ्रांती पडते. त्याला भ्रांती होते आणि त्या भ्रांतीतून तो बावचळून जातो. घाबरून जातो. त्याला समजत नाही की सत्य काय आहे, मी कुठे चाललोय, जग कुठे चाललंय असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात डोकावतात. हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे पण सर्व जगात आहे. सर्व जगाला या कलीच्या महिम्याची फार पूर्णपणे जाणीव झालेली आहे. सांगायचं म्हणजे नल आणि दमयंती यांचा जो विरह केला गेला तो कलीने केला आणि एकदा हा कली नलाच्या हाती सापडला. त्यांनी सांगितलं की मी तुझा सर्वनाश करून टाकतो म्हणजे कोणालाच तुझा उपद्रव व्हायला नको, काही त्रास व्हायला नको तर तेव्हा कलीने त्याला सांगितलं की हे बघ की माझं आधी तू माहात्म्य ऐक आणि ते ऐकल्यावर जर मला मारायचे असेल तर मारून टाक. तर त्यांनी (नलाने) सांगितलं तुझं काय महत्त्व आहे? काय महत्त्व आहे तुझें? तर त्यावर त्याने (कलीने) सांगितले की माझं हे महत्त्व आहे की जेव्हा माझं राज्य येईल म्हणजे जेव्हा कलियुग येईल तेव्हा लोक भ्रांतीत पडतील. हे खरं आहे. पण त्यामुळेच त्यांच्यामध्ये अशी उत्कट इच्छा होईल की आपण शोधून काढावं की मनुष्याचं आयुष्य कशाला इथे आलंय, त्याच्यात पुढे काय आम्हाला करायचंय आणि या शोधात जे आज गिरीकंदरात परमेश्वराला शोधत फिरणं आहे किंवा सत्याला शोधत फिरत आहेत किंवा परम शोधत फिरत आहेत त्यांना सहजच हा लाभ होईल याची प्रचीती मिळेल. प्रचीती मिळणे हीच खरी ओळख आहे. प्रचीती शिवाय कोणत्याही गोष्टीवर भाळून जाणं हे काही बरोबर नाही. तर मी महाराष्ट्रात जेव्हा कार्याला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांनी सांगितलं ‘माताजी, इथे पायलीचे पन्नास गुरू आहेत.’ पायली म्हणजे आपल्याला माहितीच आहे की एक माप असतं. एक माप तुम्ही दिलं तर पन्नास गुरू तुम्हाला मिळतील. म्हटलं ‘अरे बापरे, आता कसं काय होणार? आणि लोकांना काय आमचे हे गुरू, आमचे ते गुरू. अहो, त्यांच्यापासून काही लाभ झालाय का तुम्हाला? त्यांची काही प्रचीती आली का तुम्हाला? त्यांनी काही दान दिलं का तुम्हाला? तेव्हा का तुम्ही त्यांच्या मागे धावता ?’ ‘नाही लिहिलेलं आहे असं की गुरू हा शोधलाच पाहिजे.’ अहो, शोधायला पाहिजे पण जो समोर येऊन उभा राहिला त्याला तुम्ही गुरू कसे म्हणता? आणि असे अनेक गुरू या पुण्यात तर फारच जास्त बोकाळले होते त्याबद्दल काही शंका नाही आणि मी आल्यावर ते सगळे माझ्यावर उसळून पडले. त्याचं मला वाईट वाटलं नाही. कारण मला माहितीच होतं की इथे ন

पायलीचे पन्नास आहेत. पण पुढे जाऊन लक्षात आलं माझ्या की इथे लोकांना फारच कष्ट आहेत, फारच त्रास आहे, अनेक तऱ्हेचे त्रास आहेत, अनेक तऱ्हेच्या बाधा आहेत आणि अनेक तऱ्हेने जे गांजलेले आहेत तेव्हा या लोकांना जर सत्य मिळाले तर नंतर हे सहजयोगात उतरतील आणि सहजयोगाचा आनंद घेतील. या सागरात उतरल्यावर मग त्यांना कळेल की आनंद काय असतो. तेव्हा कसंही करून जसं जमेल तसं हळू हळू प्रचार सुरू केला मी सहजयोगाचा. आज बघते आपण इतकी मंडळी इथे आहात मला फार आनंद वाटतो ते बघून आणि मी काल आले तेव्हा आपले आगमन तिथे झालं एअरपोर्टला आणि ज्या उत्साहाने आपण माझं अभिनंदन केलं, माझे डोळे भरून आले कारण माझ्या कार्याला एवढी चालना मिळेल, माझ्या आयुष्यातच असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा हे झालं ही तुमची कृपा म्हटली पाहिजे. तुम्हा पुणेवाल्यांची कृपा म्हटली पाहिजे आणि त्यांच्या कृपेनेच हे सगळे घटित झालं आहे. आता सांगायचं म्हणजे, याच्यात कसल्या कसल्या भ्रांती येतात ते लक्षात घेतलं पाहिजे. पहिली तर भ्रांती अशी येते की, पैसा म्हणजे सर्वस्व! पैसा मिळवला म्हणजे झालं! त्याच्यापुढे आणखीन काही नाही. पैसा किंवा आपण म्हणू भौतिकवाद. हा कलीचाच अवतार आहे. भौतिकवाद म्हणजे पैशासाठी वाटेल ते करा. कुणाचे गळे कापा, जे सुचेल ते करा. पैसे मिळाले म्हणजे झालं. हा जो पैसा आहे तो जो आपल्या मानगुटीवर बसला आहे तो म्हणजे सर्व गुरुंच्या पेक्षाही बलवत्तर. तेव्हा हा पैसा मिळविण्यासाठी वाटेल ते धंदे करा, वाटेल तसे वागा. त्याला काही हरकत नाही पण पैसा पाहिजे. एवढं पैसा पैसा करून आज मी बघते की पुण्याला एकही फ्लॅट विकला जात नाही. लोकांजवळ पैसाच नाही म्हणे फ्लॅट विकत घ्यायला म्हणजे गेले तरी कुठे सगळे पैसे. पैसा पैसा करून आज ही परिस्थिती झालेली आहे. निदान पूर्वी एवढी तरी वाईट परिस्थिती नव्हती. ही स्थिती कशी झाली ते मी सांगू शकणार नाही. पण एवढं मात्र नक्की सांगू शकते की पैशानी कोणतेही सुख, समाधान आणि तृप्ती मिळत नाही. कधीही मिळणार नाही. आज तुम्हाला वाटलं एक घर बांधावं. मग बांधलं. ते घर बांधलं त्याचा उपभोग घेतला नाही. मग वाटलं मोटार पाहिजे. मोटार घेतली. आता एरोप्लेन पर्यंत जायचे. ही जी धावपळ आहे पैशासाठी ती सिद्ध करते की सुख नाही पैशामध्ये. सुख कशात आहे, सुख आत्मानंदात आहे. आत्म्याचा जो आनंद आहे तो सगळ्यात जास्त सुखदायी आणि शीतल आहे. बरं आता ही वेळ आलेली आहे. कारण कलियुग संपलेलं आहे, संपलाय त्याचा प्रकार, आता त्याची पकड गेलेली आहे. लोकांच्या लक्षात यायला लागलंय आणि आता मनुष्य आत्मानुभवाला तयार आहे. आपल्या या महाराष्ट्रात अनेक संत व गुरू होऊन गेले. फार मोठे मोठे लोक आले. पण त्यांना छळूनच काढलं. कुणाचं काही ऐकलच नाही आणि सगळ्यांना छळून छळून इतका त्रास दिला की दुसरा कोणी असता तर तो जन्मताच म्हणाला असता मला साधुसंत व्हायचं नाही. अशी परिस्थिती होती. इतकी अक्कलच नव्हती लोकांना की साधू म्हणजे काय? संत म्हणजे काय ? पण भलत्या लोकांच्या नादी लागायचं, भलत्या लोकांच्या मागे धावायचं आणि जे खरे आहेत त्यांच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही. ही अशी परिस्थिती होती पूर्वी. ती आता बदलून एक नवीन परिस्थिती निर्माण होत आहे.

तर हे जे आपले षडरिपू आहेत त्यांचं कार्य फार जोरात सुरू होतं. आता ते हळू हळू निवळत चाललं आहे. कारण समोर दिसतंय की याचा काही फायदा नाही आपल्याला. याने काही सुख नाही, आनंद नाही. पण तरीसुद्धा आनंद कुठे आहे, सुख कुठे आहे ते मनुष्य शोधतो आहे आणि शोधता शोधता त्याला हे कळतं आहे की आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे आणि त्या दर्शनाशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही. माझे म्हणणे असे आहे की आपले एवढे साधू-संत झाले होते आणि त्यांना लोक छळतच होते म्हणा. पण त्यांनी सांगितले बरं काही हरकत नाही, तुम्ही देवाचे नाव घेत बसा पांडुरंग, पांडुरंग, तर टाळ कुटत चालले तिकडे वारकरी म्हणून. अहो, पण झालं ना, तुम्ही बरेच टाळ कुटले, बरंच केलं तुम्ही, सगळी जगभरची देवळं पाहिली पण आता काय तेच करत राहायचे का? आयुष्यभर तेच करत रहाणार का? त्याच्या पुढची पायरी जर तयार असली तर का येऊ नये त्याच्यात? आणि त्याची पुढची पायरी म्हणजे सहज योग आहे. सहजयोगामध्ये आजपर्यंत जे तुम्ही इच्छिले , जे तुम्ही मागितले आणि जिकडे तुमचे लक्ष होते ते सिद्ध करायचे आणि ते तुम्ही काहीही करायचं नाही. कारण तुमच्यातच शक्ती, कुंडलिनी शक्ती आहे. पण तुम्ही हट्ट धरून बसले आता इथे काही मंडळी आली आणि म्हणाली आम्ही एक लाख रुपये देतो आमची कुंडलिनी जागृत करा. म्हटलं तुम्ही दोन लाख रूपये घ्या पण मला कुंडलिनी जागृत करू द्या. कारण पैशानी का कुंडलिनी जागृत होईल ! हे जिवंत कार्य आहे. जर एखाद्या बी ला तुम्ही जमिनीत घातले आणि त्याच्यासमोर सांगितले की मी तुला एक लाख रुपये देते झाड काढं, तर ते म्हणेल अहो परत जा, तुम्हाला अक्कल नाही हे जिवंत कार्य आहे आणि जिवंत कार्य म्हणजे तुमच्या कुंडलिनीचे जागरण. ते कार्य अनेकदा अनेक वेळा या महाराष्ट्रातही झालेलं आहे. पण पूर्वीच्या काळी अशी परंपरा होती की एकाने एकालाच द्यायचं, जास्त नाही. फार अगदी त्यांची सफाई करून हे करून ते करून शेवटी एक मनुष्य दिसला की त्याला जागृती देत असतं. पण श्री ज्ञानेश्वरांची कृपा आहे की बाराव्या शतकात त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट लिहिले आहे, सहाव्या अध्यायात की कुंडलिनी नावाची शक्ती आहे नाही तर त्यांच्याआधी आपल्या इथल्या लोकांना कुंडली आणि कुंडलिनी यांच्यातला फरकच माहीत नव्हता. ही शक्ती आपल्यामध्ये सगळ्यांच्यामधे आहे. तुम्ही कोणत्याही जातीचे असला, ब्राह्मण, शूद्र हे सगळे माणसाने बनवलेलं आहे. तसं कोणीच नाही. मी तर मानतच नाही असं काही आहे जगात आणि कोणीच मानले नाही. साधुसंतांनी कधीच मानले नाही. हे तुम्हाला माहिती आहे. किती तरी साधु-संतांची उदाहरणे आहेत. आता मी ती देत नाही तुम्हाला. पण तुम्हाला माहिती आहे. श्रीराम त्यांची आज नवमी आहे. तेंव्हा त्यांनीसुद्धा एका भिल्लीणीच्या दाताने उष्टी झालेली बोरे किती प्रेमाने खाल्ली. त्याच्यात काय सिद्ध केले त्यांनी की ही जात-पात वर-खाली असं काहीही नाही. सगळे मानव एकच आहेत. सगळ्यांमध्ये ती कुंडलिनी असते. कुंडलिनी सगळ्यांमध्ये असतांना तुम्ही असे कसे म्हणता ? यांची जात अमकी, यांची जात तमकी, त्यांची जात अमकी हे नंतर काहीतरी गौडबंगाल लोकांनी सुरू केलं पण वास्तविक सबंध मानवजात एक आहे हे सहजयोगाने सिद्ध होऊ शकते. कारण सगळ्यांमध्ये कुंडलिनी शक्ती आहे. मग तो विलायतेतला मनुष्य असो वा हिंदुस्थानातला असो. सगळ्यांमध्ये जर कुंडलिनी आहे तर मग तो वर खाली जातीय अमका तमका कसा होईल? मी हे मानतच नाही म्हणजे नाहीच असं! तुम्ही ही मानू नका. त्यासाठी इथे

फार ओरड आहे धर्मांतराची. धर्मांतर नाही करायचं. सहजयोग म्हणजे धर्मांतर आहे पक्का. आधीच सांगून ठेवते धर्मांतर म्हणजे ज्या धर्माच्या नुसत्या भ्रामक कल्पना, नुसत्या भ्रामक कल्पना आहेत त्या तोडून जो खरा धर्म आहे तो आपल्यामधे जागृत होतो. जो सच्चा धर्म आहे तो आपल्यामध्ये जागृत होतो. आत्म्याचा जो धर्म आहे तो आपल्यामध्ये जागृत होतो आणि हे जे वरचे जे आहेत हे अमके आणि तमके, त्याच्यावरती आता पुष्कळसे राजकारणी लोक ही पोट भरत आहेत. सगळे बेकार आहेत. एक दिवस असा येईल की जे लोक पार होतील सहजयोगामध्ये कुंडलिनीचे जागरण मिळेल, त्यांचा संबंध चैतन्याशी आल्यावर कसली जात पात आणि कसले काय हो! मूर्खासारखं ! तेव्हा ही जी गोष्ट आहे एक की आता उत्थानाचा दिवस आला आहे त्याला बायबलमध्ये म्हणतात “it is your last judgement, resurrection’ आणि कुराणात याला ‘कियामा’ म्हटलेलं आहे. आणि त्यांनी जी लक्षणं सांगितली आहेत ती लक्षणं आहेत ती साक्षात होतात. मग कळेल तुम्हाला की मुसलमान, ख्रिश्चन, हिदू हा प्रकार देवाच्या नजरेत नाही. देवानेच सगळे पाठविले एका नंतर एक कबूल पण त्यांनी वेगळे धर्म काढायला सांगितले नाही. आता मी रोमला असते कधी कधी, इटलीला असते तर तिथे त्यांनी मला सांगितले माझ्याशी वाद घातला की, ‘आम्हाला एक धर्म नको आहे.’ म्हटलं वेगळे वेगळे धर्म कशाला पाहिजेत? भांडायला? एक धर्म नको कारण मग भांडताच येत नाही ना! भांडणार कसे एका धर्मात असले तर. आणि हा धर्म म्हणजे स्वत:चा धर्म, स्वधर्म आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलंय की ‘स्वधर्म तो वाढवावा!’ आता ते साक्षात्कारी होते आणि त्यांनी सांगितले आहे की तुम्ही स्वधर्म वाढवावा आणि तेच कार्य आम्ही करत आहोत. स्वधर्म वाढवा. एकदा स्वधर्म वाढविल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही कोणत्या अंधारात बसला होता आणि कोणती कर्मकांडे करीत बसला होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्याने काहीही लाभ होणार नाही. झाला आहे का आत्ता पर्यंत? आत्ता पर्यंत झाला का? टाळ कुटत तुम्ही पंढरीला जा नाहीतर इकडे तुम्ही मक्केला जा. सगळा एकच प्रकार आहे. आंधळ्यासारखे चालले. कुठे चालले तुम्ही? म्हणे मक्केला चाललो. काय आहे मक्केला? आम्हाला गेलचं पाहिजे. गेलं म्हणजे आम्ही हाजी होणार. म्हटलं हाजी-पाजी काही होत नाही तुम्ही. बेकारची गोष्ट आहे. आता आपल्याला सांगितले तर आश्चर्य वाटेल की मक्केश्वर शिव आहेत. मुसलमानांना विचारा तुम्ही त्या दगडाला का पूजता? त्याच्याभोवती का फिरता ? तुम्ही दगडाला मानत नाही ना ? मग कशाला? पण आपल्या शास्त्रात लिहिलं आहे ते मक्केश्वर शिव आहेत. हिंडोलीला देवीचे तिथे मंदिर आहे म्हणजे माझे असे म्हणणे नाही की महम्मद साहेबांनी शिवाला कमी लेखलं आहे. बिलकूल नाही. कारण शिव म्हणजे शाश्वत, आहेत ते त्यांना तुम्ही म्हटलं की ते तुमच्या ख्रिस्ती धर्मात आहेत. अमक्या धर्मात आहेत ते सर्व धर्मात आहेत. पण धर्म कुठे आहे ते मला दाखवा. धर्मच कुठे नाही. सगळा अधर्म आहे. पैसे खाणे, वाटेल ते धंदे करणे, सगळीकडे हा प्रकार सुरू अनंत आहे. म्हणे मला मंदिर बांधायचे आहे. कशाला? काही कमी आहेत का मंदिरे? म्हणे पैसे द्या माताजी आम्हाला मंदिर बांधायचे आहे. म्हटलं मुळीच बांधू नका. तुमच्या हृदयाची मंदिरे बांधा. हृदयामध्ये मंदिरे बांधली पाहिजेत. हृदयामध्ये देवाची मंदिरे जेव्हा बांधली जातील तेव्हा हे सगळे जे मूर्खपणाचे धंदे आहेत ते सुटणार

आहेत. ते सुटलेच पाहिजेत. नाहीतर भोगा त्याची फळं! ते भोग तर चालूच आहेत. आता भोगायचं काय तर परमानंद. परमेश्वर एक वेळ तुमच्यावर कृपा झाली आणि तुम्ही जर त्या परम चैतन्याशी एकरूप झालात तर मग काही नको. या सगळ्या सर्व तऱ्हेच्या विक्षिप्त खोट्या अगरूबद्दल माझे एकच म्हणणे आहे की सगळ्यांनी सायन्सची भेट घ्यावी. सायन्सशी मुकाबला, सायंटिस्टशी मुकाबला करावा. जर सायंटिस्टबरोबर मुकाबला ते जिंकले तर खरे नाही तर खोटे. आमचे तर रात्रंदिवस सायंटिस्ट बरोबरच कार्य चालू आहे. मग ते मेडिकल सायन्स असेना का, फिजीक्सचे सायन्स असेना का कोणचेही सायन्स असले तरी आणि सगळ्यांनी सिद्ध केलं आहे. पण आपल्या इथले सायंटिस्ट अजून खालच्या लेव्हलवर आहेत असे मला वाटते. ते येणार नाहीत तिकडे विचारायला पण मी होते रुमानियाला. त्यांनी एक मेडिकल कॉन्फरन्स केली होती. तिथे मला बोलायला सांगितले. मी हे सांगितले लिव्हरच्या त्रासाने तुम्हाला काय त्रास होऊ शकतात. आता हे सगळे ज्ञान सायन्सच्या पलीकडचे आहे. डोक्याच्या पलीकडचे आहे. बुद्धीच्या पलीकडचे आहे त्यांच्या. तर त्यांनी लगेच मला डॉक्टरेट दिली. खरी खुरी डॉक्टरेट दिली. मी काही त्यांच्या युनिव्हर्सिटीत शिकले नाही, काही नाही. म्हटलं, ‘हे काय करता ?’ म्हणे माताजी, ‘तुमचे माहिती आहे का कॉग्निटिव्ह सायन्सेस आहे.’ आता आपल्या सायंटिस्टना हा शब्दही माहीत नाही की कॉग्निटिव्ह सायन्स म्हणजे काय? पण त्यांची मजल बघा कुठे गेलेली आहे की एक सायन्स असते ते कॉग्निटिव्ह सायन्स आहे. आईनस्टाईन ने सुद्धा म्हटलेलं आहे की एक टॉर्शन एरिया आहे जो असतो तेथून जे नॉलेज येते ते कॉग्निटिव्ह. पण इथे लोकांना समजतं का की कॉग्निटिव्ह सायन्स म्हणजे काय? ते कशाशी खातात ? मोठ मोठे सायंटिस्ट बनून फिरतात. नुसते हे करून तुमच्या तोफा बनवून आणि त्याच्यावर ताण म्हणजे जे बनवतात स्पुटनिक सारख्या वस्तू, त्यांनी काय होणार आहे? त्याचा काय फायदा होणार आहे ? त्यांनी सांगितलं श्री माताजी, तुमचे सबंध ज्ञान कॉग्निटिव्ह आहे. तुम्ही जे बोलता ते आम्ही सिद्ध करू शकतो. म्हटलं हो करा. ते तयार आहेत. ते सिद्ध झाल्यावर ते म्हणतात आम्ही काही मूर्ख नाही. ते तुम्ही जे म्हटलं ते खरे आहे. म्हणूनच आम्ही तुमच्या चरणी आलो. तर जेवढं हे खोटे गुरू आहेत त्यांना म्हणावं, ‘आधी तुम्ही सायंटिस्टच्या पुढे जा आणि सायंटिस्ट दोन दिवसात त्यांना ठीक करून देतील.’ कबूल आहे की सायन्समध्ये नीति-अनीति वर काही लिहिले नाही. अनीति- नीति काय ते लिहिले नाही कबूल. पण सत्य आहे ते खोटयाला मानणारे लोक नाहीत. तेव्हा हे गुरू लोक तुम्हाला दिसतात ना चोहीकडे पसरलेले आणि जेवढे राजकारणी त्या गुरुंच्या मागे फिरत आहेत त्यांना म्हणावे, ‘आधी त्यांची सायंटिस्टशी ओळख करून द्या आणि सायंटिस्ट ना म्हणावे यांना बघा आता.’ हिंदुस्थानातले सायंटिस्ट या लायकीचे आहेत का ते माहिती नाही, पण बाहेरच्या सायंटिस्टची मी गोष्ट सांगते रशियातच तसं आहे. अहो, काय एकामागून एक लोक. असे एकाहून एक सायंटिस्ट आहेत. मी म्हटलं, ‘तुम्ही हिंदुस्थानात या तुमची कदर होईल.’ ते म्हणतात, ‘आम्हाला आमच्या देशातच काम करायचंय.’ काय त्यांची देशभक्ती! ते बघून मला आश्चर्य वाटते. आम्ही वर्षानुवर्षे लढलो. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आता लोकांची देशभक्ती गेली कुठे? ती नाहीच. लुप्तच झाली. पैसे खाणे, ज्याला पाहिले तो पैसे खातो. अहो जेवता का नाही? का पैसेच खातं राहता ?

हा प्रकार बघून असं वाटतं की या देशातली अस्मिता ज्याला म्हणतात ती परत नष्ट झाली आहे. नाही तर हे असे कसे घडत आहे? बेचाळीस सालात आम्ही स्वत: लहान असताना आम्ही त्याच्यात उडी मारली असं म्हटलं पाहिजे आणि इतक्या लोकांची इतक्या लहान असूनही मी लीडर होते. मग छळलं , मला त्यांनी मारले कबूल आहे. काय करणार? तुम्ही जर कोणच्या चांगल्या कार्यासाठी आला तर होणारच आहे असं. पण तुमच्या पुण्यालाच कितीतरी भलते गुरू आले आणि इथे त्यांना तुम्ही केवढा वाव दिला. अजूनही लोक भगवी वस्त्रे घालून फिरत आहेत सगळीकडे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण सत्याला धरून नाही आणि असत्याला इतक्या पटकन आपण पकडतो. आणि ते ही महाराष्ट्रात. अहो, काय हे! महाराष्ट्र म्हणजे केवढे मोठे राज्य! जसं नाव आहे महा+राष्ट्र तसेच आहे हे राज्य. मी तर मराठी भाषेचं फार गुणगान गाते. लोकांना सांगते तुम्हाला यायला फार कठीण आहे. पर्याय किती आहेत एक एक शब्द इतका अचूक आहे. पण मराठी माणसाची स्थिती बघून आश्चर्य वाटतं. या गुरुच्या मागे धावले, त्या गुरुच्या मागे धावले काय करताहेत काय ते समजत नाही. आणि सगळे म्हणे ‘आम्ही म्हणे सन्यास घेतला. ‘ कशाला ? आमच्या गुरुंना आम्ही सगळे काही दिलं. तुम्ही गरू असून या गुरुला देता! हा संन्यासी, हा भामटा याला कशाला देता तुम्ही? तर (म्हणतात) ‘आमच्या गुरुंना काही म्हणू नका.’ म्हटलं का म्हणणार नाही? हा भामटा आहे, याला हा भामटा आहे असं मी नेहमी म्हणणार, मला कुणाची भीती नाही. पण सुटले ते, बरेच सुटले. पुण्याचे पुष्कळ ( भामटे) आपले चंबू गबाळे घेऊन पळाले. पण तरीसुद्धा महाराष्ट्रात प्रत्येक गावात एक गुरू महाराज बसलेले आहेत. कधी काय म्हणतात तर कधी काय म्हणतात. पैसे खायच्या मागे. किती पैसे आणलेस बाबा तू? इथून सुरू. तर सत्य जाणायचे म्हणजे अशाच माणसापासून जाणले पाहिजे जो तुम्हाला सत्य देईल. बेकारच्या लोकांच्या मागे जाऊन आपण काय मिळविणार? कधी कधी बघून फार दुःख होत होतं. चांगल्या चांगल्या घराण्यातले लोक, त्यांचे डोळे माझ्यासमोर असे असे फिरायला लागले. अहो, म्हटल, ‘तुमचे गुरू कोण?’ ‘ते फलाणे आमचे गुरू.’ चांगले श्रीमंत लोक, आमचे म्हणे सगळे गुळवणी झाले. काही राहिलं नाही. एक पैसा राहिला नाही. आणि डोळे मात्र आमचे असे असे फिरतात. वा! वा! आता ते गुरू आहेत कुठे? म्हणे ‘परमेश्वराकडे गेले’ का नरकात गेले ते आधी पत्ता काढा. असले प्रकार! पुण्यातले चांगले चांगले, आपल्याला इन्टलेक्च्युअल्स म्हणविणारे त्यांची ही स्थिती, मग बिचाऱ्या गरीबांची काय म्हणायची ? परत किती तरी गोष्टी बोकाळल्या. त्या सबंध या पुण्यात कशा आल्या ते मला समजत नाही. पण याला पुण्यपट्टणम म्हटलेलं आहे. या पुण्यात या घाणेरड्या गोष्टी आल्या कुठून? म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती मूर्खपणाची आहे की काय? हा संस्कृतीचा महासागर आहे. मला सांगितलं फॉरेनर्सनी माताजी, तुम्ही इंडियन कल्चरवर पुस्तक लिहा. म्हटलं झालं! एवढा महासागर कसा मी पोहून काढणार. अहो, एक एक गोष्टीचं इतकं बारीक विश्लेषण आहे म्हणजे हिंदू धर्म वगैरे नाही पण त्यातली तत्त्व विधाने आहेत. धर्म वरगैरे नाही. हिंदू आपल्याला कोणी म्हटलं? अलेक्झांडरने. तो सिंधू नदीवर आला. आता तो होता ग्रीक. त्याला काही ‘स’ म्हणता येईना. तो म्हणाला ‘हिंदू’ म्हणून आपण हिंदू, हिंदूंशी संबंध नाही. ही आपली संस्कृती आहे. आणि आपल्या संस्कृतीत इतकं बारीक बारीक आहे, इतकं बारीक बारीक दिलेलं आहे पण ते रुजलं असलं तरी आता

आपण ते वापरत नाही. त्या संस्कृतीबद्दल सांगताच येणार नाही. कारण हा महासागर आहे. पण आता मी पुण्याला बघते ना सगळ्या बायका अमेरिकन कल्चरला मानतात. आधी अमेरिकेला जाऊन बघा काय स्थिती आहे. किती घरं मोडली ते बघा, तिथली मुलं ड्रग्ज घेतात ते बघा! बायका दारू पितात . ते ऐकल्यावर मला आश्चर्य वाटलं! त्यांची काय स्थिती आहे ती बघा आणि ते आपल्या देशाकडे बघतात की आमची संस्कृती तिथे जायची त्याच्या आधी ते म्हणतील की आमचे साक्षात रूप इथे बसलेले आहे. हे जाणार कसं? आपल्याला म्हणजे अमेरिकन लोक फार चांगले वाटतात. सगळे कर्जाऊ ( कर्जबाजारी ) आहेत. तो देशसुद्धा कर्जाऊ आहे आणि त्या लोकांची डोकी उलटी आहेत. त्यांच्यातलं काहीही शिकायचं नाही. जे काही शिकायचंय ते आपल्या आत आहे. जे काही ज्ञानाचे भंडार आहे ते आपल्या आतमधे आहे. ते मिळवायचे आहे. मला तर आश्चर्य वाटलं रस्त्यामधे मुलींना, बायकांना बघितलं, केस कापून एवढे एवढे स्कर्टस घालून, रंग आपला हिंदुस्थानीच आहे आणि चालल्या. ते म्हणे ‘अमेरिकन आहेत म्हणे या’ असे का! नको रे बाबा, ते अमेरिकन! घाणेरडे लोक आहेत. काही त्यांच्यापासून शिकण्यासारखं नाही. ते आमच्यापासून शिकण्यासाठी येतात. हजारो माणसं या देशात कशाला येतात हा विचार केला आहे का ? सत्य शाोधायला ते हिंदुस्थानात येतात पण त्यांना कोणी नट कोणी गुरू पकडतो. एअरपोर्टवरच पकडतो आणि आले इथे. तुम्हाला आश्चर्य वाटेल आमचे फारेनहून सहजयोगी इथे येतात ते तुमच्या मातृभूमीला वंदन म्हणून वाकून मुके घेतात. महाराष्ट्रातूनच श्री माताजी आलेल्या आहेत. ही त्यांची कमाल बघा, त्यांची ओळख बघा. त्यांची समज बघा आणि आपल्याला आहे ती समज ? सगळं मानलं तरी आपली संस्कृती गेली कुठे? गांधीजींच्या बरोबर मी होते तेव्हा त्यांचं सहजयोगावरचं लक्ष होतं. त्यांनी सांगितलं की सर्व धर्माचं तत्त्व काढून एकत्र केलं तर एक नवीन धर्म बनविता येईल. म्हटलं मी तेच करणार आहे. आणि तो धर्म म्हणजे सहज धर्म आहे. त्याच्यावर गांधीजी म्हणाले होते की हे अशक्य नाही. कारण आपली संस्कृती आहे हे अशक्य नाही. मुळीच अशक्य नाही आणि हे होऊ शकते. हे घटित होईल आपल्या सबंध शास्त्रात आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच प्रत्येक धर्माच्या शास्त्रात हेच लिहीलं आहे. जे खोटं नाटं करीत बसतात ना त्यांचा धर्माशी काहीही संबंध नाही. सर्व धर्मात एकच गोष्ट लिहिलेली आहे की, आत्मसाक्षात्काराला प्राप्त करा. म्हणजे काय की हाच मार्ग असं लिहिलेलं आहे स्पष्ट. सगळं लिहिलेलं असतानासुद्धा इकडे लोक समाजवाद म्हणतात. अहो, त्या समाजवादी रशियाला जाऊन बघा काय वाभाडे निघाले आहेत. कशाला समाजवाद घेऊन बसले आहेत. काही दाखवायला की आम्ही वेस्टर्न आहोत अहो तुम्ही जे आहात ते दाखवा. ते फार मोठे आहे आणि त्याची महत्ता सांगता येत नाही इतकी मोठी गोष्ट आहे ती. मी लहानशी होते, सात वर्षाची तेव्हा गांधीजींजवळ गेले होते तर गांधीजी म्हणाले तुझा सहजयोग सुरू करू आपण. पहिल्यांदा स्वतंत्र व्हा. स्वतंत्र झाल्याशिवाय तुम्ही ‘स्व’ चे तंत्र कसे चालविणार? म्हणून स्वातंत्र्याच्या लढ्यात आम्ही भाग घेतला, मेहनत केली. पण आज बघतेय काय झालंय लोकांना, नवीनच शिंगे निघालीत. पण कसं काय झालं? एक त्याला कारण गांधीजींची एक चूक झाली त्यांनी जवाहरलालना आपल्या डोक्यावर ০

माहिती नाही गंधसुद्धा बसवले. हा काय हिंदुस्थानी होता ? पक्का ब्रिटीश मनुष्य. त्याला काही सुद्धा नाही आपल्या संस्कृतीबद्दल. ज्याला बिलकूल माहिती नाही अशा मनुष्याला कशाला आपल्या डोक्यावर बसवले माहिती नाही. दुसरा त्यांना मिळाला नव्हता का? ही एक चूक गांधीजींनी केली. आणि त्या चुकीची आजपर्यंत फळं आपण भोगतोय. लगेच सुरू झालं वेस्टर्नाइज्ड राहणं. सगळं काही वेस्टन्नाइज्ड असलं पाहिजे. अहो, लोकांना अंघोळसुद्धा करता येत नाही, त्यांच्यापासून शिकण्यासारखं काय आहे ? मला तर समजतच नाही लोक या कसे या सर्व गोष्टींना आणि संस्कृतीला मान्य करतील ? तिथे जाऊन बघा काय त्यांची स्थिती आहे! इंग्लंडला बघा, इंग्लंडला हजारोंनी मुलं ड्रग्ज घेतात. एड्स, ड्रग्ज आणि व्हायोलन्स तिन्ही गोष्टी इतक्या भयंकर आहेत तुम्हाला आता इथे बसलेल्यांना काय सांगावं ! तिथे ! ते त्यातून घाबरून निघाले आणि सहजयोगात उतरले. त्यांनी सांगितलं, ‘माताजी, तुम्ही हे सगळं काहीही आणू देऊ नका!’ म्हटलं, ‘नाही आणू देणार.’ अहो, लहानश्या गोष्टीसुद्धा त्यांना माहीत नाहीत. फ्रान्समध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या मुली पाठविल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘माताजी, यांना काहीही माहिती नाही.’ म्हटलं, ‘असं का!’ काय म्हणजे ? अहो, बाहेरून येतात आणि एकदम पाणी पितात. म्हणजे तुम्ही कश्मीर मध्ये जा की इथे आपल्या महाराष्ट्रात असा, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की केळ्यावर पाणी प्यायचे नाही. अशा लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळे आपल्याला माहिती आहे. मी जे म्हणते सगळं आपल्याला माहिती आहे की हा मूर्खपणा आहे. पण एवढं मात्र खरं की मी जे पाहिलेलं असून ते तुम्ही पाहिलेलं नाही म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची, तसं आहे की तुम्हाला असं वाटतं पण या लोकांमध्ये अक्कल नाही. आणि ती अक्कल येणार कशी? त्यांना संस्कृतीच नाही. एवढ्या महासागराच्या संस्कृतीत राहून आपण जर मूर्खासारखे वागलात आणि उद्या तुमची मुलं जर ड्रग्ज घेऊ लागली आणि हे सगळे धंदे करू लागली म्हणजे मग तुम्ही ओरडत बसाल. तिथे तर मुलांचा काय आई-वडिलांचाही ठिकाणा नाही. फॅमिली म्हणजे नाहीच. आणि अगदी बेशरम लोक आहेत याबाबतीत. येऊन स्पष्ट सांगतील की मी माझ्या बायकोला घटस्फोट दिला. असं का ? मग आमचा नमस्कार. हे असले इंग्लिश भाषा शिकून तुमचे जे वाभाडे निघाले आहेत त्याचं मात्र मला आश्चर्य वाटतं. इंग्लिश भाषा शिकायला काही नको. मी कधीच इंग्लिश भाषा शिकले नाही. मराठी शाळेत शिकले आणि मराठीतच शिकले सगळं. नंतर मग सायन्समध्ये सुद्धा इंग्लिश भाषा नव्हती आणि मेडिकललाही नव्हती. पण ते म्हणतात इंग्लिश बोलते की वा! अहो, या इंग्लिश भाषेमध्ये आहे काय दम! आत्म्याला स्पिरीट, दारूला की स्पिरीट, परत भुतालाही स्पिरीट म्हणजे आत्मा आणि स्पिरीट एकच आहे का ? तर म्हणाले आत्मा आणि स्पिरीट एकच असलं पाहिजे. म्हटलं अहो हे काय ? आणि काय संपदा आहे आपली. बरं या सर्व संस्कृतीतली संपदा किंवा गाभा काय आहे ? तो आहे अध्यात्म. अध्यात्म हा त्याचा गाभा आहे. नुसतं शहाणपण मिरवणं, स्वत:ला काही विशेष समजून घमेंड दाखविणं हा काही त्यातला अर्थ नाही. त्यातला जो गाभा आहे तो अध्यात्म आहे आणि त्या अध्यात्माची जी परिसीमा आहे तो आत्मसाक्षात्कार आहे हे जाणून घेतलं पाहिजे. अध्यात्माशिवाय नुसती बडबड करत रहायची, इकडे तिकडे जाऊन प्रवचने द्यायची, नंतर आणखी

काय काय प्रकार त्यांनी काहीही होत नाही. सतरा प्रवचने ऐकून सुद्धा तुम्ही जसेच्या तसे रहाणार. काही फायदा होणार नाही. कशाने फायदा होईल ? तुमच्या आत्म्याच्या दर्शनाने फायदा होईल ? त्याच्या प्रकाशात त्या आत्म्याच्या प्रकाशात तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा आश्चर्य वाटेल की नीर-क्षीर विवेक, पाणी एकीकडे आणि दूध एकीकडे जसं आहे वेगळं वेगळं अगदी साक्षात होईल तुमचं. तुम्ही चुकीचं काम करणारच नाही. तुमचा रस्ता चुकणारच नाही. म्हणून सांगायचं म्हणजे असं की आज ही वेळेची हाक आहे. आणि सगळेच तुम्ही म्हणताय की आज दोन हजार वर्षे संपत आहेत. त्याच्यानंतर सत्य युग येणार आहे. त्याच्यात जर टिकायचं असलं तर सत्यात उभं रहायला पाहिजे. हे फालतूचे आपले ढोंगीपणाचे प्रकार चालणार नाहीत. अवास्तव बडबडणं बोलणं आणि नुसतं दाखवणं की आम्ही शिक्षणात काहीतरी विशेष आहोत, काही नुसतं चालणार नाही. तुम्ही सत्यावर उभे आहात का हे पाहिलं जाईल आणि जर सत्यावर उभे असाल तर तुम्हाला कोणी हात लावणार नाही. अहो, सापसुद्धा चावत नाही आमच्या सहजयोग्यांना. काही होत नाही त्यांना. ते म्हणतात, ‘माताजी, तुमचे आम्हाला संरक्षण आहे. अहो, कसलं संरक्षण ! तुम्ही स्वत:च पार झालेले, परमेश्वराच्या साम्राज्यात गेलेले, मी कसलं तुम्हाला संरक्षण देणारं! अशी एक नवीन स्थिती येणार आहे, एक नवीन जग तयार होणार आहे. त्या जगात ख़रस्तांनी म्हटल्याप्रमाणे हे लास्ट जजमेंट आहे. जे उचलले गेले ते गेले. बाकीचे जाणार, संपणार, खानदानासहित, सर्व गर्भासहित आणि सर्व मूर्खपणासहित. तेव्हा मी आज मुद्दामहून तुम्हाला विशेष सांगायला आले आहे. विशेषत: महाराष्ट्राला! पुणे शहर म्हणजे सबंध महाराष्ट्राचे हृदय आहे. पण इथे काय काय धंदे आले हे तुम्हाला माहीत आहे. ते सांगायला नको. आता पुढे मात्र याला पुण्यपट्टणम करून सोडायचे आणि पुण्यातच उतरलं पाहिजे. त्याच्यात काही तुम्हाला हे सोडा, ते सोडा, घर सोडा, बायकोला सोडा असं काही मी तुम्हाला म्हणत नाही. मी दारू सोडा असंसुद्धा म्हणत नाही. आपोआप दारू सुटे. आपोआप ड्रग सुटतो. सगळं काही सुटतं ! हे मी काही तुम्हाला म्हणत नाही कारण एकदा स्वच्छ झाले, कमळासारखे वर आले मग काय रहाणार तुमच्यात घाण? अगदी निर्मळ होऊन जाणार. व्यवस्थित होऊन जाणार आणि हीच एक आईची इच्छा आहे. त्यासाठी मी धडपडते. आता माझं एवढं वय झालंय पण तरीसुद्धा मला सारखी धडपड वाटते की अजून काही झालं नाही. पूर्णपणे अजून लोकांच्या डोक्यात शिरलेलं नाही. जेव्हा मी तुमची वर्तमानपत्र वाचते तेव्हा मला वाटते काय चाललंय लोकांचा मूर्खपणा. आपापसात लाथा-बुक्क्या चालू आहेत. अहो, कुठे आलात तुम्ही! झाली ना आता २००० वर्षे पूर्ण व्हायला, अजूनही तेच सुरू. जातीयता, अमकं-तमकं हे काही नाहीच. हे असत्य आहे. कसली तरी ढोंगबाजी आहे. तसं काही नाही आहे. आता हे सिद्ध करायचं तुमच्या हातात आहे. उगीचच माझ्या विरोधात या पुण्यात लोकांनी नुसत्या इतक्या कंड्या उठविल्या होत्या. त्याची मला काही पर्वा नाही. पण त्यांचं स्वत:च त्यांनी काय केलंय ते विचारून बघा. आता आमचा सहजयोग ऐंशी देशात चाललाय असं परवा हे लोक सांगत होते. मला माहिती नाही. तो कसा की एक मनुष्य पार झाला की तो जाऊन मग दुसऱ्याला पार करतो, मग तो दुसर्याला पार करतो असं करत करत ऐंशी देशात चालू आहे. पण ऐंशी देशात कुठेही वादावादी नाही, भांडणं नाहीत, पैसे खाणं नाही, काही नाही. हे कसं

शक्य आहे ? आमचे तर दोन घरात राहत नाही. दोन माणसं एका घरात असली तरी तेही जमत नाही आणि हो ही विशेष पात्रता आली कशी आपल्यामध्ये? सामूहिक चेतना ही नवीन तऱ्हेची चेतना जी मानवी चेतनेच्या पलीकडे आहे ही जागृत झाल्यावर मग दुसरा कोण आहे ? सगळे एकाच परमेश्वराच्या ठायी आहेत. आता परमेश्वराचं नाव काढलं म्हणजेसुद्धा पुष्कळ लोक उठून जायचे. जसा काही यांचा परमेश्वर दुष्मनच आहे की काय! अहो हे नसते बुद्धीचे चोचले बंद करून जे सत्य आहे ते बघा. फार झालं स्वत:ला फार समजण्यात काही अर्थ नाही. दुसरा अनुभव असा आहे, लोकांचं म्हणणं आहे महाराष्ट्रीयन लोक घमंडी आहेत. ते फार गर्विष्ठ आहेत. म्हटलं तसं काही नाही बरं. ते म्हणतात एखादा साधारण तोलाचा मनुष्य कप्तान असला मिलीटरीमध्ये तर तो कसा छाती काढून चालतो पण इकडे नॉर्थ इंडिया मध्ये अगदी उंदरासारखे बसतात तुमच्यासमोर. म्हटलं बाबा, आता मी काय करणार . तिथे म्हणे भयंकर लोकांना स्वत:बद्दल घमेंड. आम्ही म्हणजे कोण? शिवाजीचे दत्तक आहेत सगळे. तेव्हा लक्षात घ्यायचं. जोपर्यंत तुमच्यात आत्म्याचा आनंद येणार नाही, स्वत:चं स्वरूप पुत्र दिसणार नाही तोपर्यंत हे जे दैवी गुण म्हटलेत ते तुमच्यात प्रकाशित होणार नाहीत. एकदा तो प्रकाश तुमच्यात आला, कुंडलिनीच्या जागरणाने तुम्ही जर या चारीकडे पसरलेल्या परमेश्वराच्या साम्राज्यात उतरलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कसं झालं, मी इथे कसा आलो ? अहो, पण तुमच्यात आहेच ते. हे सिद्ध आहे. हा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. हा योग तुम्ही प्राप्त करावा. त्याच्यासाठी काही विशेष करायला नको. काही द्यायला नको. फक्त घ्यायला हवं. घेणं म्हणजे असं की थोडे नम्रपणे बसायला हवं. उद्धट माणूस असला तर त्याची कुंडलिनी कितीही ओढली तरी जागृतच होत नाही. पण तोच नम्र मनुष्य असला तर पटकन जागृत होते. तुम्ही सगळ्यांनी आपली कुंडलिनी जागृत करून घ्यावी ही माझी विनंती आहे. दुसरं मला काहीही नको. हे एकदा पाहिलं मी की मग बस झाल. पुण्यात मी येऊन राहिले त्याच्या आधीसुद्धा बऱ्याच वर्षांपासून मी इथे मेहनत करत आहे. मागल्या वर्षी फक्त आले नाही तरी या वेळेला इतका उत्साह आहे लोकांना. फारच उत्साहात मला एअरपोर्टवर दिसले. फारच आनंद झाला. आणि त्या आनंदातच मी म्हणते तुम्ही सगळ्यांनी असला आनंद उचलावा. प्रेमाचा आनंद उचलायचा असला हे निर्वाज्य प्रेम परमेश्वराचं आहे जे प्राप्त झालं पाहिजे आणि ते अगदी सहज आहे. अगदी सहज आहे ते आपल्या सगळ्यांमध्ये आहे. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे. कृपा करून हा आशीर्वाद स्वीकार करावा. यानंतर श्री माताजींनी सर्वांना कुंडलिनी जागृती दिली. नंतर त्या म्हणाल्या, “आता याची वाढ झाली पाहिजे. बी जरी रुजलं आणि अंकुरित झालं तरी त्याला वाढवलं पाहिजे. फार त्याला मेहनत करायला नको. एक महिन्यात तुम्ही अगदी त्याचे गुरू होऊन जाल. तुम्हीच स्वत:चे गुरू व्हाल. तेव्हा आमची बरीच केंद्रं आहेत इथे पुण्याला. इथली तरुण मुलं फार कार्य करीत आहेत. तसेच बरेच लोक आहेत अनुभवी. ते ही फार कार्य करतात. तेव्हा आपण सर्वांनी पूर्णपणे लक्ष घालून हे कार्य करावं. सांगायचं म्हणजे असं की याला तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. पैशाचा काही संबंध नाही. फक्त आपली जागृती घ्या आणि त्या जागृतीला पुढे वाढवत सहजयोगात या. म्हणजे सा्या जगातले जितके सहजयोगी आहेत ते आणि तुम्ही एक व्हाल. असा एक नवीन संसार एक नवीन जग, एक नवीन आभाळ, आकाश सगळं बनवायचं आहे.’

आता यांनी महाराष्ट्रीय चळवळीची गोष्ट केलीय ही खरी आहे. तेव्हा आम्ही फार लहान होतो. माझे वडील म्हणजे फार मोठे देशभक्त होते. आईसुद्धा. आणखी बेचाळीस सालात जे मी कार्य करीत होते तर त्याबद्दल आई माझ्या वडिलांना पत्र लिहन पाठवीत होती काही तरी. तर ते विनोबाजींनी वाचलं. विनोबाजी समजले गांधीवादी. तर आम्हाला असं कळलं आमची सगळी मंडळी तिथून वेलोर जेलला जाणार आहेत. सगळे जेवढे काही प्रिझनर्स होते ते वेलोर जेलला जाणार आहेत. तर आम्ही लोक स्टेशनवर गेलो. तिथे ते सगळे लोक बसलेले होते. तर विनोबांनी मला बोलावून इतकं लेक्चर दिलं. माझे वडील तिथे उभे राहून ऐकत होते. ते म्हणाले या म्हाताऱ्याचं काही ऐकू नकोस. मला तुझ्याबद्दल फार गर्व वाटतो आणि माझी सर्व मुलं अशी झाली तर मी फारचं आनंदीत होईन. स्वत: जेलला चालले होते आणि असं त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेला त्यांची देशभक्ती म्हणजे भयंकर. ते मला आता कधी कधी फार दुःख होतं. वंदेमातरम् म्हणायचं नाही. अहो, म्हटलं हे वंदेमातरम् म्हणून आम्ही लढाया केल्या. पण आज म्हणतात वंदेमातरम म्हणायचं नाही. म्हणजे काय झालंय तुम्हाला. तुम्ही काय केलं भारताच्या स्वातंत्र्यासाठी, तुम्ही केलं काय ? तुमचा अधिकार काय? उठले आपले वंदेमातरम म्हणायला नको. तर मला आठवलं माझे वडील हातात झेंडा घेऊन हायकोर्टवर चढले. तर त्यांना गोळी लागली इथे इथे गोळी लागली. आणि घळाघळा रक्त वाह लागलं. तसेच ते वर चढले आणि त्यांनी झेंडा लावला आणि जेव्हा फडकला झेंडा तेव्हा खाली उतरले आणि आम्हाला सांगून गेले तुम्ही नुसतं वंदेमातरम म्हणत रहा. त्यांना गाण्याचा फार शौक होता. वंदेमातरम अगदी बरोबर म्हटले पाहिजे. वंदेमातरम आम्ही म्हणत राहिलो आणि ते खाली उतरले आणि आज हे म्हणतात वंदेमातरम म्हणू नका. मला समजत नाही आपल्याला झालंय काय? सगळे विसरूनच गेलोय आपण. तेव्हा हिंदू नव्हता, मुसलमान नव्हता, सगळे मिळून देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे इकडे लागले होते. आता हा सगळा मूर्खपणा कोठून सुचला? वैसे तो मैं हिंदी में हमेशा बाते करती रहती हैँ, पर कम से कम पूना में आकर मराठी में बात करू । नहीं मराठी भाषाही भूल जाऊँगी इसलिए आशा है आपने समझा होगा और आप पूना में इतने दिन से रहते है, आपको मराठी सीखनी चाहिए । ऐसी कठीन है भाषा। मैं जानती हूँ पर कोशिश करने से आप सीख सकते हैं । सीखने मे कोई हर्ज नहीं । सबको मेरा अनंत आशीर्वाद । अभी वंदेमातरम् करो। त्यांचं म्हणणं आधी वंदेमातरम् म्हणून घ्यावं मग कवाली होईल. सगळ्यांनी उभे रहावे. (यानंतर वंदेमातरम् होऊन नंतर कवालीचा कार्यक्रम झाला.