Seminar Part 3

Akurdi (India)

1980-12-09 Seminar India Part 3 Marathi, 43'
Download video - mkv format (standard quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Public Program, Marathi, Penicillin Factory, Akurdi, Pune

1980-12-09 Akurdi session 

     मागच्या वर्षी आकुर्डीला आमचा प्रोग्रॅम झाला, तेंव्हा मी म्हटलं होतं सहजच  की पेनिसिलीन फॅक्टरी मध्ये बघा प्रयत्न करून, बरीच मंडळी पार होतील  . तेंव्हा लोकांच्या लक्षात आलं नाही की माताजींनी पेनिसिलीन फॅक्टरीचं नाव का घेतलं?  त्याला कारण असं की माझ्या भावाच्या लग्नात मी आले होते इथे पुण्याला. आणि तुमच्या गेस्ट हाऊस  मधेच थांबले होते. तेंव्हा सकाळी उठून इकडे खूप अनवाणीने  फिरले, आणि माझी अशी इच्छा होती , की ही जर जागा सुद्धा चैतन्यमय झाली, तर जी कामगार मंडळी इथे येतील, त्यांच्यावर या वातावरणाचा अवश्य परिणाम होईल. आणि त्याचा आज मात्र दृश्य दिसलं. तेंव्हा सीता आणि राम या महाराष्ट्रामध्ये अनवाणी  का फिरले, त्याचंही कारण आपल्या लक्षात येईल.

     परमेश्वरानी  फार कार्य केलेलं आहे. त्याची आपल्याला जाणीव नाही, की आपल्यासाठी परमेश्वरानी काय काय कार्य केलेलं आहे. सबंध सृष्टीच बघा किती सुंदर परमेश्वरानी रचली. रोजच्या आपल्या व्यवहारात सुद्धा आपण बघतो पण आपल्या लक्षात येत नाही की आपण जे अन्न खातो, जी आपण फळं खातो, ही फळंसुद्धा ,परमेश्वरानी आपल्यासाठीच तयार केलेली आहेत. एका फुलातनं आपण फळं काढू शकत नाही. एक सुद्धा आपण जिवंत कार्य करू शकत नाही.

     सायन्सचं असं म्हणणं आहे की आम्ही अमीबा पासनं माणसं झालो. ते तरी परमेश्वरानीच केलेलं आहे. अनेक वेळा या संसारामध्ये परमेश्वराचं अवतरण झालं. विष्णू स्वरूपात . आणि त्यांनी हे उत्क्रांतीचं कार्य हे इवोल्युशनचं कार्य केलेलं आहे. पण जेंव्हा जेंव्हा ही  अवतरण  संसारात झाली तेंव्हा लोकांना हे समजलं नाही की याचा आपल्याला काय लाभ होतो. त्यामुळे आपल्यामध्ये कोणची अशी बांधणी नव्हती. त्यामुळे कोणची आपल्याला अशी वरची पायरी नव्हती. श्री विष्णूनी कशाला दशावतार घेतले, असा आपण का विचार करत नाही. आणि जर व्यवस्थित बघितलं, तर बघा आधी मत्स्यावतार. मत्स्यावतार की घेतला? कारण आधी मासळीच बाहेर आली पाण्यातनं बाहेर. त्याच्यापुढे एक एक अवतार बघितले तरी तुमच्या लक्षात येईल की मग सरपटणारे प्राणी तयार झाले. अशा रीतीने अनेक तर्हेचे जे प्राणी तयार झाले, त्यामध्ये परमेश्वराचा हात आहे. शेवटी आता मानव झाले. हा मानव झाला त्यातसुद्धा ख्रिस्ताचा अवतार सगळ्यात शेवटला आपण मानला पाहिजे. त्यांच्यानंतर बुद्ध झाले, महावीर झाले. नानक, कबीर हे सगळे झाले. मोठे मोठे संत साधू आपल्या या महाराष्ट्रात ज्ञानेशांसारखे झाले.त्यांची नावं  घ्यावी तेवढी थोडी. नामदेव झाले, एकनाथ झाले, तुकाराम झाले. रामदास स्वामींसारखे फार मोठे संत होऊन गेले. ह्या संतांनी काही धर्म स्थापन केला नाही, जसा आपण समजतो. त्यांनी आपल्यामध्ये तो धर्म स्थापन केला. आपल्या आत. मनुष्याचा त्यांनी धर्म बांधलेला आहे. बाह्यात नाही.

       देवळं बांधली, आम्ही हिंदू झालो. मशिदी बांधल्या, आम्ही मुसलमान झालो. व्वा. ख्रिश्चन लोकांनी चर्च बांधले आम्ही ख्रिश्चन झालो. तुम्ही फक्त मानव आहात ही गोष्ट प्रथम मानली पाहिजे. ख्रिस्तानी  सुद्धा म्हटलंय, की जे माझ्या विरोधात नाहीत, ते माझे आहेत. ते कोण? पण त्यांना बोलूच दिलं नाही. तीन वर्षात त्यांना संपवून टाकलं. तीन वर्ष फक्त ते बोलले. त्याच्या नंतर त्यांना बोलू दिलं नाही. साईनाथांसारखं फार मोठं दत्तात्रयांचं इथे वरदान आलं होतं. ते मुसलमान होते. तरी आपण मानतो न त्यांना. ते दत्तात्रय होते हे आपण मानतो नं? ते कसं कळलं आपल्याला? ते दत्तात्रयाचे अवतार होते खरेच, हे आपल्याला कसं कळलं? त्यांच्या शक्तीमुळे कळलं. त्यांच्यात जी शक्ती होती त्यामुळे आपल्याला कळलेलं आहे. पण त्याच्या मध्ये  एक स्थिती आता मानवाची आलेली आहे की तुम्हीच स्वतःची शक्ती जाणून घ्या. अष्टविनायक हे खरे की खोटे, ज्योतिर्लिंग हे खरे की खोटे, इतकंच काय  लंडन मध्ये मी पाहिलंय, तिथल्या लोकांना काही माहिती नाही. तिथे स्टोनहेंच  म्हणून एक जागा आहे. तिथे सुद्धा असे दगड बाहेर निघालेले. आणि त्यांना  व्हायब्रेशन्स, त्या चैतन्य लहरी आहेत. त्यांना काही माहिती नाही हे आहे  काय.  त्याला काय काय नावं देतात हे आहे ते आहे. पण तिथे  बघितलं की कळतं, व्हायब्रेशन्स आहेत. तेंव्हा तुमचा परत जन्म झाला पाहिजे हे प्रत्येकानी सांगितलेलं आहे. मुसलमान लोक त्याला पीर म्हणायचे. की तुमचा “पीर” झाला पाहिजे. नानकांनी त्याला “पार” म्हणून म्हटलेलं आहे. नानक आणि महंमदांमध्ये काहीच फरक नाही. एवढासुद्धा फरक नाही. एकच आहे. ख्रिस्तानी त्याला “यु आर टु  बी  बॉर्न अगेन” स्पष्ट सांगितलेलं आहे. तुमचा परत जन्म झाला पाहिजे. बाप्तिस्मा म्हटलंय बाप्तिझम. हिंदू धर्मात त्याला ब्रह्मत्व म्हटलेलं आहे. ब्राम्हण झाला पाहिजे. आपल्याकडे आता ब्राम्हण जन्मानुसार होतो. तसं काही नाही. जर तसं असतं तर व्यास मुनी हे ब्राम्हण नसते. ज्यांनी गीता लिहिलेली आहे. ते एका कोळीणीचे पुत्र होते. वाल्मिकी हे स्वतः कोळी होते जन्मानुसार धर्म असतो, वगैरे अशा रितीच्या या सर्व भ्रामक कल्पना डोक्यात घालून काहीतरी तुम्ही वेगळे आणि हे वेगळे. 

      संसाराची कशी घडी मोडायची, त्यांना कशा रीतीने विगलित करायचं, तोडून टाकायचं , आपापसामध्ये  कसं वैमनस्य आणि द्वेषाचं राज्य स्थापन करायचं, हे ह्या लोकांनी कार्य केलेलं आहे. पण मानव हा परमेश्वरातला एक अंगप्रत्यंग आहे. परमेश्वर जर एक शरीरयष्टी पूर्ण असली तर त्यातला  प्रत्येक सेल(cell)  हा मनुष्य आहे, प्रत्येक पेशी हा मानव आहे. फक्त तो जेंव्हा जागृत होतो, तेंव्हाच त्याला कळतं की ह्या सबंध विराटाचे आपण एक अंगप्रत्यंग आहोत.  ते झाल्याशिवाय ते कळत नाही.  बाह्यतः आपण काहीही भक्ती केली. तुलसीदासांचं  तसं झालं. तुलसीदासांनी रामाला स्वतः टिळा लावला आणि  राम येऊन  समोर उभे राहिले, त्यांना ओळखले. ख्रिस्ताला कोणी ओळखलं नाही. जर ओळखलं असतं तर त्याला काही क्रॉस वर घातलं नसतं. जो साक्षात परमेश्वराचा पुत्र, गणेशाचं अवतरण आहे, साक्षात ब्रम्हाचं अवतरण, ब्रम्ह साक्षात अवतरले, त्यांना तुम्ही क्रुसावर घातलं. जर त्यांनी ओळखलं असतं की साईनाथ हे, आता परवाचीच गोष्ट आहे. हे दत्ताचे अवतार  आहेत, तर ह्या तुमच्या महाराष्ट्र भूमीतच त्यांना जेवायला सुद्धा नव्हतं. तुम्ही मोठे दत्त भक्त. तुम्ही ओळखलं का दत्ताला. आता ते गेल्यावर मात्र त्यांच्या पूजा पाठ सगळं काही सुरु आहे.पण भामट्यांना मात्र त्यांच्या जीवनातच तुम्ही फार मान्य(मान) दिलेला आहे. तेंव्हा ते अज्ञानात घडलं. तुम्हाला ज्ञान नव्हतं, चक्षु नव्हते. बघायला नव्हतं. त्यामुळे हे घडलेलं आहे. त्याबद्दल परमेश्वरानी सगळ्यांना क्षमा करायचंच ठरवलेलं आहे. जे झालं ते विसरून जा. मागचं पुढचं विसरून गेलं पाहिजे. फक्त आत्ता  काय आहे ते मिळवा. आणि ते मिळवण्यासाठी आपल्यामध्ये परमेश्वरानी ही शक्ती ठेवलेली आहे. ही अनादी कालापासून आपल्यामध्ये, ही आई, कुंडलिनी, जगदंबा तिला म्हटलेलं आहे, आपल्यामध्ये परमेश्वरानी ठेवलेली आहे. ती अंकुरासारखी सुप्तावस्थेमध्ये आहे. त्रिकोणाकार अस्थीमध्ये असते. त्याला इंग्लिश मध्ये सेक्रम म्हणतात. बघा. सेक्रमचा अर्थ ही सेक्रेड. म्हणजे पावन, पवित्र. त्या वेळीसुद्धा लॅटिन भाषेमध्ये लोकांना माहिती  होतं की “ही” म्हणजे काहीतरी विशेष पावन वस्तू. ह्या शक्तीच्या जागृतीने तुम्हाला आत्म्याचं दर्शन होतं, असं लिहिलेलं आहे. ही शक्ती आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. जर ही शक्ती जागृत   झाली तर नुसत्या भाषणाने किंवा कोणचा तरी एक विचार करून घेऊन आम्ही ठीक आहोत, आम्ही जे केलं ते ठीक आहे, आम्हाला हेच पटतं. आपलं आयुष्य वाया जाईल.

     जर आम्ही ह्या मशिनीला मेन्स(mains)  मध्ये लावलं नाही तर ही  चालू होणार नाही. ह्याच्यात शक्ती येणार नाही. जे ह्याला बनवण्यात, मेहनत करण्यात जे काही आम्ही श्रम घालवले ते सगळे वाया जाणार. तुम्हाला मेहनत करून परमेश्वरानी जे बनवलेलं आहे, त्याचा जो पर्यंत तुम्हाला अर्थ लागणार नाही, जो पर्यंत तुम्हाला कळणार नाही तुम्ही काय आहात तो पर्यंत तुम्ही सुद्धा वाया जाणार . तर तुमचा संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. सहज चा अर्थ आहे “जन्मसिद्ध”. परमेश्वराशी योग होण्याचा तुमचा जो संबंध आहे, तो जन्मसिद्ध आहे. तो तुमच्यामध्ये जन्मसिद्ध आहे. हा अंकुर रुपानी, शक्ती रुपानी, कुंडलिनी रुपानी तुमच्यामध्ये वास करतो. पण ही कुंडलिनी सुद्धा सहसा जागृत होत नाही. ही गोष्ट निर्विवाद. जर एखाद्या रानटी माणसाला एक बी दिलं आणि त्यानी कधी वृक्ष कशाशी खातात त्याला माहिती नाही. त्याला सांगितलं की ह्या बी पासून एवढा मोठा वृक्ष झालेला आहे, तर तो म्हणेल हे कसं शक्य आहे हो? तो ते मोडून पाहील, तोडून पाहील. म्हणे आम्ही याच्यात घूसूनही पाहिलं तरी आम्हाला कळलं नाही. ही शक्ती असती तर ह्याच्यात दिसलं असतं. पण एका माळ्याला दिल्यावर त्याला माहिती आहे की ह्या भूमीच्या, भूमी मातेच्या उदरात घातल्यावर ह्याला अंकुर फुटणार कारण त्याच्यात ती शक्ती सुप्तावस्थेत आहे. आणि म्हणूनच आईचं स्वरूप पाहिजे. कारण मेहनत करायला आईच तयार असते. रागावणं , बिघडणं हे फार सोपं काम आहे. पण प्रेम करणं हे लोकांना कठीण वाटतं. आम्हाला काही कठीण वाटत नाही. तसंच कुंडलिनीचं जागरण अशाच लोकांच्या मध्ये होणार आहे, जे स्वतः प्रेमस्वरूप आहेत. ज्यांच्यामध्ये प्रेम नाही, ज्यांच्या मध्ये परमेश्वराचा साक्षात्कार नाही, ज्यांना ह्याचा अधिकार नाही, त्यांच्या समोर कुंडलिनी जागृत होणार नाही. 

     आता आपलंच बघा. जर शाळेचा मास्तर आला तर मुलं लगेच उभी राहतील. पण जर शाळेचा एक हमाल आला तर मुलं उभं राहणार आहेत? ज्याचा अधिकार असेल तोच हे कार्य करू शकेल आणि हा अधिकार सुद्धा प्रेमात आहे. ते आपल्याला समजत नाही. अधिकार म्हटलं म्हणजे दंडुकेबाजीच आपल्याला समजते. पण हा प्रेमाचा अधिकार आहे. ज्या माणसाला ह्या प्रेमाचा अधिकार असतो, तोच ही कुंडलिनी जागृत करू शकतो. असं विधान आहे. इतकंच नाही ज्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली, त्याचे प्रेरक होते अशा आदि शंकराचार्यांनी तर हेच सांगितलेलं आहे की योग सांख्य वगैरे करून, त्याच्यावर वादविवाद करून, त्याच्यावर भाषणं देऊन, त्याच्याबद्दल पुष्कळ बोलून किंवा काय डोक्यावर उभं राहून किंवा भजनं म्हणून किंवा काहीही म्हणून परमेश्वर मिळत नाही. कुंडलिनीच्या जागृतीनी मिळतो आणि कुंडलिनीची जागृती ही आईच्याच कृपेने होते. अगदी स्पष्ट लिहलंय. आणि शेवटलं त्यांचं पुस्तक सुद्धा, जे सौंदर्य लहरी म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यात त्यांनी काहीही विवेचन केलेलं नाही. पहिल्यांदा ” विवेक चुडामणी” म्हणून पुस्तक लिहिलं, ज्यात काहीही केलं नाही. फक्त त्यांनी  आईची  स्तुती  केली. तिचे जे एक हजार चक्र त्यांना माहिती होते, त्यांचं सगळं विशद वर्णन, ती “हुं” म्हणते तेंव्हा त्याला काय अर्थ आहे, “हा” म्हणते तेंव्हा त्याला काय होतं, तिचे कसे काय ते फिरतात आणि त्या वेळला कशा रीतीने शक्तीचे मार्ग बनतात आणि कशा रीतीने कुंडलिनी जागृत होते वगैरे वगैरे हेच नुसतं ते वर्णन करत राहिले. तेंव्हा लोकांनी विचारलं की तुम्ही इतके विद्वान असून हे काय? म्हणे  ह्याच्या पलीकडे काहीही नाही. ह्याच्या शिवाय जर कुंडलिनी जागृत होतं नाही, तर मग बाकीचं सांगायचं कशाला? म्हणजे एखाद्या बी ला आपल्याला जर रोपवायचं असलं तर आपण इथे लेक्चर दिलं, आता ह्या बीचं असं आहे, त्याच तसं आहे, अमकंच आहे, तर त्याच्यात काही येणार आहे का? तुम्ही त्याच्यासमोर हठयोग करा नाहीतर डोक्यावर उभे राहा नाहीतर, पुष्कळ लोक जीभ बीभ कापून आतमध्ये  घशात  घालतात. काय काय प्रकार करतात. एका पायावर उभे तासनतास. उपास करायचा  तपास  करायचा. हे करायचं, ते करायचं, नावं  घेत राहायची. पोपटपंची करायची सगळं करतात. करून बघा. ते रोप  येणार आहे का? ते सहजच येईल आपोआप येईल. स्पॉनटेनियस. त्याच्यासाठी काही करावं लागणार नाही. 

    आज तुम्ही झाले मानव, त्याला तुम्ही काय केलेलं आहे. आता हा पेनिसिलीनचा शोध सुद्धा जो मॅडम क्यूरीनी लावला, तो तरी कसा लावला. ते तिच्याच पुस्तकातनं म्हटलेलं बरं. तिचं असं म्हणणं आहे की मी सगळीकडे शोधत होते, मला काही सापडलं नाही.  शांतपणे एकदा बसले होते, तर कुठून तरी अन्नोन मधून, अज्ञातातून मला एकदम कळलं कि पेनिसिलीन हे ह्या ठिकाणी मिळणार. जे ज्ञात आहे ते सगळं आपलं आहेच समोर. लायब्ररीत सगळं ठेवलेलं आहे. जे अज्ञातात  आहे तिथून कळलं म्हणजे ते ज्ञात. आणि सगळ्यात जे  अज्ञातात आहे ते हे सत्य की तुम्ही आत्मा आहात,  तुम्ही आत्मा आहात. हे शरीर – मन, बुद्धी, अहंकार नाही.   तुम्ही आत्मा आहात. हे खरं सत्य आहे. आणि हे सत्य एकदा आपल्यामध्ये मांडलं गेलं, जाणवलं गेलं आणि आपल्यातनं आत्मा वाहू लागला म्हणजे आपल्याला खरा अर्थ  लागेल, म्हणजे आपण समर्थ व्हाल. त्याच्या आधी जर म्हणायचं की तुम्ही हे करू नका, ते करू नका, हे तोडा ते तोडा. काळे कपडे घाला नाहीतर पांढरे कपडे घाला. नाहीतर डोक्यात हे घाला आणखिन संन्याशी बनून फिरा, नाहीतर काय , जगाभरच्या गोष्टी ज्या आहेत, त्याला काय अर्थ आहे? हे सगळं ज्यांनी केलं, हजारो वर्षांपासून तुम्ही पाहिलंय रुढीगत, त्याचा काही अर्थ लागला? जो पर्यंत तुमच्यात जागृती होत नाही, जो पर्यंत तुमच्यात प्रकाश येत नाही, तो पर्यंत परिवर्तन होणं हे अशक्य आहे. 

      अगदी बी चेच उदाहरण परत घ्या. बी मध्ये परिवर्तन तेंव्हाच होतं जेंव्हा त्याच्यातला अंकुर जागृत होतो. तो अंकुर जागृत झाला पाहिजे. जो पर्यंत तो अंकुर तुमच्यामध्ये जागृत होणार नाही, तो पर्यंत तुमच्यांत कोणत्याही प्रकारचं परिवर्तन येऊ शकत नाही. तुमची वाढ होऊ शकत नाही. तुमची वृद्धी होऊ शकत नाही. आणि तुमचं जे काही आंधळ्यासारखं चाललेलं वर्तन आहे, ते बदलू शकत नाही. डोळे आल्याबरोबर तुमच्या एकदम लक्षात येईल की हे इथे काळं, हे इथे  पांढरं, हे इथे निळं आहे. अंधारात सगळेच रंग एकसारखे दिसतात. काहीही समजत नाही आणि  सुचत नाही. आता एक पद्धत अशी कि तुम्ही ह्या खोलीत आले. अंधार आहे. चाचपडत चाचपडत एक खुर्ची धरली. म्हणे खुर्ची म्हणजे खोली. आपल्याला हत्तीची कहाणी माहिती आहे.(सहज योग्यांशी बोलत आहेत , “ थोडं पुढे या …” १६.५ पर्यंत) देवळात जातात. आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. इथेही फार आहे. माताजी आम्हाला दर्शन द्या. हजारो माणसं आली तरी दर्शन पाहिजे. अहो दर्शन दर्शन झालं. कितीदा आले पायावर देवाच्या तुम्ही. इथून पायी जाता पांडुरंगाला. तिथे त्याचे पाय सुद्धा घासून टाकले. पण तुमच्यात काही आलं आहे का? असा स्वतःला प्रश्न विचारायचा. मी बघितलं, त्या बिचाऱ्या  पांडुरंगाचे पाय सुद्धा, त्याचे दगड सुद्धा पायाचे  झिजून   गेलेत. पण इकडे काही झालं का? म्हणे चंदना परी झिजतो पांडुरंग. तो झिजतो पण तुमचं काय झालंय? तुमच्यांत काय चंदनाचा वास आला का? कारण जे चंदन आहे ते अजून जागृत झालेलं नाही. ते जागृत झालं पाहिजे. ते झाल्यानंतर मग बाकीचं बोलू या. आधी तुम्ही प्रकाश तर घ्या. आता ह्या खोलीत तुम्ही जर अंधारात आलात. मागे मी सांगत होते तसं,  तर  तुम्हाला काय दिसेल? एक हे दिसलं ते सत्य, ते दिसलं ते सत्य. एखाद्या पंख्याला  लागलं तर  पंखा  सत्य. त्याच्या साठी भांडत राहायचं. पंखावाल्याने खुर्चीवाल्याशी भांडायचं, खुर्चीवाल्यानी सतरंजीवाल्याशी  भांडायचं. हे सारखं चालू. त्याचं म्हणणं हे सत्य, त्याचं म्हणणं ते सत्य. पण डोळे सगळ्यांचे बंद असल्यामुळे  आता बघा, आई हे सांगणार आहे. तुम्ही जरा शांत बसा. डोळे उघडते मग बघा. त्यातूनही तुम्हाला माहिती आहे की एक बटन दाबलं की सगळीकडे लाईट दिसतो. पण जाणकार पाहिजे. ज्याला हे लाईट माहिती आहे तोच जाणेल. तोच होईल. त्यानी जर सांगितलं की हा दिवा तुम्ही पेटवायचा असेल तर इथे दाबा. लगेच दिवा पेटणार. पण त्या दिव्याच्या मागे केवढी मोठी पूर्वपीठिका आहे. सबंध इतिहास आहे त्याच्या मागे. त्यामुळे नुसतं काही आम्ही  बटन दाबण्यासारखी गोष्ट नाही. म्हणजे ही जी कुंडलिनी आपल्यामध्ये आहे आणि ही जी चक्र आपल्यामध्ये परमेश्वरानी बांधलेली आहेत, आणि जी स्थित आहेत, जी तुम्ही बघू शकता. कुंडलिनीचं चढणं, तिचं स्पंदन पुष्कळ लोकांमध्ये दिसतं. तर हे जे काय परमेश्वरानी कार्य केलेलं आहे ते काही आजचं नाही. ते तुम्ही कार्बन होता, त्याच्याही आधी तुम्ही काय होता, तिथून आहे. आणि  सबंध विश्व आपल्यामध्ये आहे. सबंध विश्व आपल्यामध्ये आहे. पण ते विश्व जाणण्यासाठी प्रथम आत्म्याचा प्रकाश मिळवला पाहिजे.

      संध्याकाळी मी आत्म्यावर बोलणार आहे. आज कुंडलिनीवर बोलते. कुंडलिनी शक्ती ही तुमची शुद्ध इच्छा शक्ती आहे, शुद्ध इच्छा शक्ती. म्हणजे त्या इच्छेत दुसरं काही मिक्सचर नाही. फक्त परमेश्वराला मिळवावं, परमेश्वरात  समावावं, आत्म्याचं दर्शन मिळवून आत्म्यामुळे परमेश्वराला मिळवावं, ही एक शुद्ध इच्छा तुमच्यामध्ये परमेश्वरानी कुंडलिनी रूपानी ठेवलेली आहे. ती  आहे.  पण अंधुक आहे. तिला थोडीशी चालना जर मिळाली, तर ती  पूर्णपणे जागृत होऊन, सगळ्या काही तुमच्या इच्छांवर मात करून, सगळं चित्त आतमध्ये ओढून तुम्हाला आत्म्याचं दर्शन देईल. आता हे चित्त तुम्ही आत्म्याकडे न्या असं म्हटलं तर नेऊ शकता का तुम्ही? नाही नेऊ शकत. तुमचं लक्ष माझ्याकडे आहे, माझ्या भाषणाकडे आहे.पण जर मी म्हटलं हे चित्त तुम्ही तिकडे न्या तर नेऊ शकत नाही. पण एकदा ती घटना झाली म्हणजे आपोआप आतमध्ये चित्त ओढलं जातं आणि मनुष्याला त्या आत्म्याची ओळख होते. जेंव्हा हे घडतं तेंव्हा मनुष्यामध्ये एकदम बदल होतो. एकदम. त्याचवेळी. चेहऱ्यामध्ये एकदम तकाकी येते, डोळे चमकू लागतात, अगदी हिऱ्यासारखे. हातातून थंड थंड असे प्रवाह निघतात. शीशम शिवम. 

     इथे इलेक्ट्रिसिटी आली तर तुम्हाला सांगावं लागतं, की त्याचं चलन वलन कसं करायचं, ती  वापरायची कशी? इथून तिकडे न्यायची ती कशी, त्याचं कसं कनेक्शन करायचं, त्याच्यामध्ये कशी मधे  मधे  रियोस्टॅट वगैरे अशी इंस्ट्रुमेंट्स घालायची, तसंच सहज योगाचं आहे. एकदा पार झाल्यावर त्याचं शिक्षण घ्या. पण ते इतकं सहज साध्य, कारण आपल्या आतमध्ये, आता तुम्हाला काही मला सांगावं लागत नाही की हा निळा रंग आहे. पण एकदा तुम्हाला कुणीतरी सांगितलं होतं, की हा निळा रंग आहे. आता निळा रंग काय आहे हे आपल्याला माहित आहे.  लाल रंग काय आहे ते माहितेय. एकदा सांगावं लागतं. तसं जर का एकदा सांगितलं की हे चक्र  म्हणजे विशुद्धी चक्र  श्रीकृष्णाचं आहे, आणि जेंव्हा हे खराब होतं त्यामुळे सर्दी खोकला वगैरे हे आजार होतात. अति नाम स्मरणाने सुद्धा हे चक्र खराब होतं. तसंच हे चक्र, हे डावीकडचं विशुद्धी चक्र आहे. तंबाखू वगैरे खाल्ल्याने हे चक्र खराब होतं. किंवा एखाद्या माणसानी असा विचार केला की माझं नेहमी चुकतंय, असं म्हणजे, सारखं आपल्याबद्दल काहीतरी न्यूनगंड वापरून जो मनुष्य विचार करतो त्यालाही हे चक्र धरतं. मग त्याला मात कशी करायची वगैरे. कारण कनेक्शन झाल्यावरच तुम्ही करू शकता. त्याच्या आधी तुमचं कनेक्शन नसतांना तुम्ही टेलिफोन तरी कुठे करणार? म्हणे आम्ही परमेश्वराला सारखी आठवण करतो, असच. मग, म्हणे आम्ही हातावरती घेऊन पिंडाची पूजा करतो आणि आम्हाला हार्ट अटॅक आला. हार्ट मध्ये शिव असतांना तुम्हाला हार्ट  अटॅक कसा आला हो? त्याला कारण असं अनधिकार चेष्टा आहे. तुम्हाला अजून परमेश्वराच्या साम्राज्यात जायचंय. जो पर्यंत तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जाणार नाही तो पर्यंत परमेश्वराचे  तुम्ही नागरिक नाही. परमेश्वराचे नागरिक झाल्याशिवाय, त्याच्या साम्राज्यातलं  जे काही वरदान आहे ते तुम्ही कसं वापरू शकणार? त्याच्यावर तुमचा काय अधिकार आहे?  समजा, तुम्ही हिंदुस्तानचे नागरिक असाल तर तुम्ही  हिंदुस्तानचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्यावर तुमचा हक्क आहे. पण जर तुम्ही इंग्लंडला जाऊन आपली निदर्शनं  केली तर तुम्हाला लोक पकडून नेतील. तुम्ही कोण हो? तेंव्हा परमेश्वराच्या साम्राज्यात आधी माणसाला जायला पाहिजे. आणि त्यानंतर मग भक्तीला खरा उमाळा येतो.

     कृष्णानी याबद्दल गीतेमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. कृष्ण म्हणजे हा फार मोठा राजकारणी होता. कारण त्याचं  सबंध अवतरणच मुळी एक विशेष लीला होती. लीला करून लोकांना समजवून सांगत असे. तसं सरळ ऐकत नाहीत. मग काहीतरी कुठेतरी फटका द्यायचा म्हणजे कळतं. सरळ बोट घालून जर तूप निघालं नाही तर वाकडं थोडसं  बोट करायलाच पाहिजे. आणि ती वेळ अशी  होती. म्हणून कृष्णानी फक्त अर्जुनाला सांगितलं. दुसऱ्याला  सांगितलं नाही. आणि त्या ठिकाणी जर तेही अर्जुन समजले नाही म्हणून मग त्यांनी बोट उलट करून गोष्टी केल्या.आणि अगदी दोन शब्दात मी तुम्हाला आता  गीता सांगते, त्याचं मर्म काय आहे. मग आता तुम्हीही समजून घ्या. 

      पहिल्यांदा, पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की तू ज्ञानाला प्राप्त हो. ज्ञानाला तुम्ही प्राप्त कसे होणार, पुस्तक वाचून? कबीरानी म्हटलंय ” पढी पढी पंडित मूरख भये” आणि मी इथे बघते नं असे मूर्ख, रोज येतात. पढतमूर्ख  आपल्या मराठीत फार धारदार वाक्य आहे. रामदासांनी पुष्कळ पढतमूर्ख पाहिले असतील. तेंव्हाच त्यांनी त्यांचा पढतमूर्ख उल्लेख केला आहे. आणि हे पढतमूर्ख जे आहेत, त्यानी होणार नाही.                                  

ज्ञान हे  म्हणजे  आतमध्ये आपली जी चेतना आहे ती  जागृत झाली म्हणजे त्या चेतनेत आपण जाणलं पाहिजे. आज आपली मानवाची चेतना आहे. समजा जर इथे घाण असली तर त्या घाणीतनं आपण जाऊ शकत नाही. नाकावर लगेच बोट ठेवू. पण एखादं जर घोडं तुम्ही काढायचं म्हटलं तर त्याला काही घाण यायची नाही. तो आपला सरळ निघेल. त्याच्यामध्ये ती चेतना आलेली नाही. त्याच मन तेवढं चेतीत झालेलं नाही. किंवा त्याच्या व्यक्तित्वाला ती  चेतना  आलेली नाही की ही घाण आहे. ह्या घाणीतनं जायचं नाही. परत तुम्ही कोणत्याही रंगाचं त्याला काहीही दिलं तरी त्याला समजायचं नाही. आपल्याला रंग संगती समजते. सौंदर्य काय आहे ते समजतं. माणसाच्या चेतनेमध्ये ह्या वस्तू आलेल्या आहेत. पण आपल्याला अजून पाप पुण्य नुसतं बुद्धीनी समजतं. आईनी सांगितलं न हे वाईट, म्हणून करायचं नाही. वडिलांनी सांगितलं म्हणून करायचं नाही, किंवा गीतेत लिहिलंय म्हणून करायचं नाही. पण ते अजून आपल्यामध्ये चेतनेत आलेलं नाही. सहजयोगानंतर ते आपल्या चेतनेत येतं. म्हणजे तुम्ही करायचं म्हटलं तरी करू शकत नाही. त्रास होईल. व्हायब्रेशन्स आणा. जर तुम्ही असा प्रयत्न केला की आम्ही काहीतरी करून बघू या. लगेच डोकं जाम धरणार. आपोआप ते घटित होईल. त्याच्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावा लागणार नाही. हा धर्म तुमच्यात जागृत झाल्यावर, तुम्हाला मला सांगावं लागणार नाही. तुम्ही स्वतः सुरु कराल. 

     एक गृहस्थ होते. ते फार तंबाखू घ्यायचे. सहज योगानंतर सुद्धा त्यांनी काही प्रयत्न नाही केला.  एका क्षणात सुटू शकली असती. पण त्यांनी प्रयत्न केला नाही. आता तंबाखू लहानपणापासून  घेत असल्यामुळे त्यांना काही सुटली नाही. शेवटी माझ्या कडे येऊन म्हणाले ” माताजी, मी ध्यानाला बसलो की माझं तोंड असं मोठं मोठं मोठं  होतं असं वाटतं. जसं काही हनुमानासारखं होतोय की काय मला काही समजेना” .आता म्हटलं सांगू का खरं? तुम्ही तंबाखू घेताय मला माहिती आहे. मागे जाता. कधी तरी तंबाखू असं असं करून घेता, खरी गोष्ट आहे की नाही? म्हणे चांगलंच घेतो माताजी. याबद्दल शंका नाही. आता मानतो मी. म्हटलं आता माझ्या समोर नुसतं प्रॉमिस करा, तंबाखू घेणार नाही. माझ्यापासून लपवून ठेवण्यात काय अर्थ?  म्हटल्याबरोबर तंबाखू खट्कन सुटली आणि ते गेलं त्यांचं. तऱ्हेतऱ्हेनी अशा गोष्टी सुटत जातात. आपोआप आतमध्ये धर्म जागृत होतो. सांगायला नको, त्याला मेहनत करायला नको. ही धर्माची जागृती होती हे ज्ञान झालं. ज्ञान म्हणजे तुमच्यामध्ये, जे तुमचं व्यक्तित्व आहे, त्याच्यातच ती  चेतना आहे. ती चेतनाच चेतीत झाली पाहिजे. ह्याला “ज्ञान” कृष्णानी म्हटलंय  आणि म्हणून त्यांनी सांगितलंय  की ज्ञानानीच तुम्ही परमेश्वराला जणू शकता. हे ज्ञान. 

       भक्तीबद्दल  त्यांनी मग सांगितलं की भक्ती करायची तर अनन्य करा. ते फार चांगलं आहे. पुष्पम, फलं, तोयं काय असेल ते मला द्या. घेतो मी. घ्यायच्या वेळेस मी सगळं घेतो. द्यायच्या वेळला अनन्य . आता ह्या शब्दामध्ये तुम्ही बघा त्याची एक फोड आहे.  अनन्य . म्हणजे जेंव्हा दुसरा रहात  नाही तेंव्हा. म्हणजे पार झालेले .पार झाल्यावरच भक्तीला मजा आहे. नाही तर तुम्ही कुणाला टाहो फोडून बोलवता?             

 जसं आता तुम्हाला, मी आपल्याला सांगितलं, सहज योगाचे पुष्कळ प्रकार आहेत. अनंत लोकांना, अनंत आशीर्वाद मिळाले. एक आमच्याकडे आर्किटेक्ट होते. म्हणे माताजी मी एवढी देवाची पूजा करायचो, देवीची एवढी पूजा करायचो पण माझ्याकडे अठरा विश्वे  दारिद्र्य. सहजयोगात आल्यावरती म्हणे पावसाचा पाऊस पडू लागतो. पावसाचा पाऊस म्हणजे कसला? तर म्हणे की ज्या ठिकाणी फार पाऊस पडत होता अशा ठिकाणी त्यांनी स्पेशल तऱ्हेची घरं बांधायला म्हणून मला पाठवलं आणि नुसता तिथे पैसेच पैसे.

एक अगदी साधारण मनुष्य. शेतकरी. त्याच थोडं लहानसं शेत. अर्ध्या एकराचं सुद्धा नव्हतं आणि कोळी. ते रोज माझ्या दर्शनाला आले म्हणजे एक फुलांचा सुंदर हार करून आणायचे. मी म्हटलं ” दादा तुम्ही एवढा कशाला खर्च करता? फार आहे हे तुमच्यासाठी पाटील.  एवढं करू नका. मला नाही बरं वाटत” . आई म्हणे तुम्हाला माहिती आहे मग असं कशाला मला म्हणता? त्यानी सांगितलं की माझ्या शेताला, शेतातली अर्धी जमीन अगदी पडीक होती. अर्धी जमीन म्हणजे अर्धा एकर जवळ जवळ मी जमीन वापरतो. एक माझ्याकडे मनुष्य आला आणि म्हणाला की ह्या  जमिनीतली मी माती घेऊन जाऊ का ? ह्या मातीला जर मी वापरलं तर ह्या मातीमुळे विटा चांगल्या होतील. म्हणजे थोडीशी  ती   माती जर  मिक्स केली तर आणि म्हणे मला इतका त्याच्यातनं पैसा मिळू लागला, त्याचा एक हार म्हणजे काय आहे?  अशा रीतीने तुमच्या मध्ये जे लक्ष्मी तत्व नाभी चक्रावर आहे ते जागृत झालं. म्हणजे होतं. म्हणून कृष्णानी सांगितलंय की तू अनन्य भक्ती कर. जो पर्यंत परमेश्वराचं  तुमचं कनेक्शन झालेलं नाही तर हे टाहो फोडून काय उपयोग. एवढे वारकरी जातात. बघा त्यांची काय दशा? दारिद्र्य. तब्बेती त्यांच्या खराब. त्यांना कँसर झालेला. थ्रोट मध्ये ट्रबल. काय डोकं फ़ोडलेलं त्या बडव्यांनी. काय काय प्रकार. भिकाऱ्यासारखी त्यांची स्थिती. हे काय विठ्ठलाला आवडत असेल? पण त्यांचा अजून संबंध विठ्ठलाशी झाला नाही . झाल्याबरोबर अगदी सगळं बदललं ! म्हणून त्यांनी सांगितलं की अनन्य भक्ती करा. आधी परमेश्वराला मिळवून घ्या. मग त्या भक्तीला खरी मजा  येते. नाहीतर काहीतरी काल्पनिक असं वाटतं.

         आपल्या मुलांनी तर परमेश्वराचं नावच सोडलेलं आहे. कारण आमच्या इथे सक्काळी चार ला उठायचं, चंदन उगाळायचं, देवाला आंघोळ हे करायचं. करून तरी त्याला काय मिळालं. राग तेवढाच येतो. दारू प्यायची तर दारू पितात, ब्लॅकचा पैसा तर ब्लॅकचा पैसाही वापरतात. सगळे धंदे . सगळे धंदे. फक्त सकाळी उठून मात्र ते उगाळत बसतात. तेंव्हा ह्यांना काय मिळालं. जर ह्यांना काही मिळालं नाही तर आम्ही तरी ही मेहनत कशाला करायची? म्हणून परमेश्वरच नाही असा त्यांनी निकाल काढलेला आहे. 

     अल्जेरिया देशामध्ये त्यांचे जे मोठे म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत, ते मात्र अगदी पक्के खोमेनीसारखे आहेत . फंडामेंटलिस्ट म्हणतात त्यांना. आणि त्यांनी अगदी जो, मनुष्यानी जराशी चूक केली की त्याचा हात कापून टाकायचा. कुणी काही केलं की गळा कापून टाकायचा. त्याला वाळूत गाडून टाकायचं, वरून जोडे मारायचे असे भयंकर भयंकर प्रकार त्यांनी लावले. शर्यत काही तरी काढलीय त्यांनी. सुरु केलंय. अगदी खोमेनी सारखा प्रकार. अति धर्मांधता. ते बघून तिथली जी मुलं आहेत ती कम्युनिस्ट झाली. त्यांनी सांगितलं असा काही परमेश्वर असू शकत नाही. इतका दुष्ट परमेश्वर कसा असेल? पण त्याच्यातला एकच मुलगा आमच्या लंडनला आला आणि पार झाला. एक मुलगा. लगेच त्यानी जाऊन सांगितलं परमेश्वर आहे. तो धर्मांधतेतही नाही आणि त्याला नाही म्हणण्यात  ही नाही  मधोमध होता. आणि आज आपल्याला आश्चर्य वाटेल, इथे पुष्कळ शिकलेले,  सुशिक्षित मुलं मुसलमानांची आहेत. पाचशे मुलं पार झालेली आहेत अल्जेरीया मध्ये. तेंव्हा ह्या तुमच्या समाजात उद्या तुमच्या मुलांचा तुम्ही विचार करा. त्याही पुढे सांगायचं म्हणजे असं की ही निकरीची वेळ आहे. तेंव्हा आम्ही अनन्य भक्ती घेतली पाहिजे.   

     तिसरं म्हणजे “कर्मयोग”, श्रीकृष्णानी सांगितला की जे काही तुला कर्म करायचं आहे, ते तू परमेश्वराच्या चरणी ठेव. बरेच लोक मला विचारतात.” आम्ही माताजी जे काही करायचो ते आम्ही परमेश्वराच्या चरणी ठेवलं”. ह्या अशक्यातल्या गोष्टी आहेत. श्रीकृष्णांची पद्धत होती की अशक्य गोष्टी सांगायच्या. अशक्य. अहो कितीही म्हटलं तुम्ही परमेश्वराच्या ह्याच्यात ठेवलं, पण ठेवलंय का तुम्ही ? कारण जो पर्यंत अहं भाव आहे तो पर्यंत ते सुटणारच नाही. तो अहं भावच सुटला पाहिजे. आता लोक लागले की आता अहं भाव सोडायचा तर याच्याशी भांडायला लागेल. त्या दृष्टीनी लोक लागले. जसा त्या फुग्याला मार बसला की एवढा मोठा मोठा होत जातो. अशा माणसाला आणखी डबल अहं भाव येतो. म्हणतात न आम्ही हे सोडलं ते सोडलं, आम्ही हे सोडलं ते सोडलं . फक्त बुद्धी सोडलेली दिसते. बाकी काही सोडलेलं नाही. असा भलता अहं भाव लोकांना येतो, आणि आम्ही सगळं काही परमेश्वरावर सोडलं असा विचार करून खोट्यामध्ये राहतात. भ्रामकतेत.  ते तेंव्हाच घडतं, हे तेंव्हाच घडतं जेंव्हा तुमच्या हातून हे वाहू लागतं सहज. आणि तुम्ही काय म्हणता? वाहतंय, जातंय, येतंय काही तरी तिसरंच. तुम्ही तिसरेच आहात. हे चैतन्य वाहून राहिलंय, माताजी कुंडलिनी वर येतेय. 

           माझ्याबरोबर एक अमेरिकेला बाई आली होती. ती  म्हणाली  माताजी मी इतक्या ह्याने तुमच्याबरोबर आले की माझ्या मुलाला तुम्ही रियलायझेशन द्या पण तो होत नाही. म्हटलं आता मी काय करू? तुम्ही द्या म्हटलं सर्टिफिकेट. असं कसं द्यायचं सर्टिफिकेट? म्हटलं ते, ते व्हायला पाहिजे . तुमची इच्छा  आहे तशी माझी इच्छा असून तरी ते व्हायला पाहिजे न. घडलं पाहिजे. त्याच्यात काही खोटं बोलता येत नाही. काही पैसे मोजता येत नाही. काही डोक्यावर उभं राहता येत नाही. जे आहे ते आहे ते असंय.         

      तेंव्हा कर्मयोगातसुद्धा ते तेंव्हाच घडणार, कर्मयोग खरा तेंव्हाच घडतो जेंव्हा तुम्ही पार होता. मग म्हणतात चाललंय येतंय जातंय. आता आम्ही साक्षी झालो. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत भ्रामकतेत राहून लोकांनी असा विचार केला नाही पाहिजे की आम्ही फार मोठे फार्मिक(?) झालो. मग असं म्हटलं पाहिजे की धर्म इतका जागृत होतो, जसं एखादं फूल फळ  व्हावं अन  फूल सबंध संपून जावं, मनुष्य गुणातीत धर्मातीत होऊन जातो. ती दशा यायला पाहिजे. आजकाल तरतऱ्हा प्रकार, नाना तऱ्हेचे गुरु नाना तऱ्हेचे हे सगळं निघालेलं आहे. पायलीचे पन्नास म्हणतात तसे निघालेले आहेत. पण तुम्हाला काही मिळालं आहे का?   

     आता कालच एक गृहस्थ आले. मला म्हणे मला साक्षात्कार झाला असं मला वाटतं. कुणी दिला? आमचे गुरु. म्हटलं हे बघा. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही हे सांगा की ह्या माणसाची कुंडलिनी कुठे आहे? अहो एवढं तरी ज्ञान पाहिजे. ते नाही सांगता येणार. बरं तुमची कुठंय ते तरी सांगा. तेही नाही सांगता येणार. म्हटलं मग कशाचा साक्षात्कार झाला? समजा एखाद्या आंधळ्याचे डोळे बरे झाले, तर “माझे डोळे बरे झाले” तर डॉक्टर त्यांना विचारेल की किती बोटं आहेत ते सांगा. ते नाही मला सांगता येणार पण डोळे बरे झाले. असं कसं होईल? ते दिसलं पाहिजे न, ते समजलं पाहिजे न, ते जाणलं पाहिजे न नाहीतर तुमचे डोळे कसे बरे झाले? अश्या तऱ्हेचे गुरु  आहेत. म्हणे की मला क्रिया होते. असं का? एक गृहस्थ आले, दोन्ही पाय माझ्याकडे करून बसले. ह्यांनी सांगितलं अहो असं माताजींच्याकडे बसायचं नसतं, दोन्ही पाय. ते माहितीए  मला  पण मी काय करू? असे जवळ पाय केले तर मी बेडकासारखा होतो. असं का? ते काय आमच्या गुरूंनी सांगितलं की तुमची  जागृती झाली तर तुम्ही बेडकासारखे व्हाल. आता तुम्ही काय बेडूक होणार याच्या पुढे मानव झाल्यावर? का काय साप का विंचू. एक साधा विचार घ्या.तुम्ही बेडकासारखे उडता काय, डोक्यावर उभे राहता काय म्हणजे तुम्हाला स्वतःचा तोल सुद्धा रहात नाही. ज्या शरीराचा तोल आतापर्यंत तुम्ही मानव देहामध्ये मिळवला, तो सुद्धा सुटला आणि त्याच्या पलीकडे तुम्ही बेताल होऊन नाचू लागले, वेड्यासारखे उडू लागले, कपडे काढू लागले – म्हणजे हा काय प्रकार आहे मूर्खपणाचा? आणि तो म्हणे आम्ही पार झालो. जर नागवं होऊन मनुष्याला पार व्हायचं असतं तर सगळे जानवर आधी पार करा. माणसं कशाला? काहीच्या बाही काढून ठेवतात. पण मूर्ख लोकांची सुद्धा कमाल आहे. आता तुम्ही जर असा शहाणपणा ठेवला तर तुमच्यासाठी सप्लाय डिपार्टमेंट आहेच. पुष्कळ लोक अशा रीतीने तयार होऊन येतात.  

     आमच्या नागपूरला एक गृहस्थ होते. त्यांना चांगला मी ओळखून आहे. त्यांच्या आमच्या साहेबांच्या कंपनी मध्ये, ते फार वाह्यात होते, त्यांच्या वडिलांनी सांगितलं की कुठेतरी करून टाका म्हणून. त्यांचे वडीलही आमच्या ऑफिस मध्ये होते. तर त्यांना साहेबांनी सांगितलं की बरं तुम्ही, त्यांना मी पाठवतो पर्सनल. तिथे जाऊन पन्नास धंदे केले. ते ब्लॅक मार्केट केलं, काय स्मगलिंग बिगलिंग जेवढं करायचं सगळं करून आले. मग वडील वारले. तर त्यांना प्रॉपर्टी वगैरे मिळाली. बायकोचे दागिने विकले, घर विकलं. अमुक केलं तमुक केलं आणि पळाले. त्यांची आई रडत आली आता काय करायचं, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याला दागिने दिले. सगळे काढून दिले. आता मुलानी चोरी केल्यावर  पोलिसात कसं जायचं अमकं तमकं सगळं काही. तर  बिचाऱ्या  त्या आपल्या कुठेतरी माहेरी जाऊन बसल्या बडोद्याला. आता ह्या गृहस्थाचं फार मोठं नाव झालं. नाव काय तर म्हणे गुलाब बाबा. नाव ठेवलं गुलाब बाबा. त्यांनी , आईनी सांगितलं की माझ्याकडे पुष्कळ पैसे बिसे पाठवले, सगळं काही झालं. परत घर आम्हाला करून दिलं. पैसे पाठवायचा. तर मी त्याला एकदा शपथ घातली. म्हटलं सांग. कोण आहेस तू. कसे पैसे पाठवतो. पत्रात लिहिलं. तर मग कळलं की हे महाराज म्हणजे गुलाब बाबा नावाने प्रसिद्ध आहेत. गुलाब बाबा. म्हणजे धटिंगण आहे तो. तर मी असा निरोप पाठवला की त्या गुलाब बाबाला सांगा की मी नागपूरला येते . त्यानंतर तीन महिने ते कुठे दिसले नाहीत ते गुलाब बाबा कुणालाही. आणि ते सगळ्यांना सांगत काय होते, घोड्याचे नंबर. आणि हे सगळे मारवाडी लोक तिथे जाऊन घोड्याचे नंबर विचारत होते. आता हा विचार करा. परमेश्वराला काय घोड्याचे नंबर माहित असतात? पण तिथे ओळीनी  लोक उभे. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल, हज्जारो लोक त्याच्याकडे. म्हणजे आता हे माणसाचं शहाणपण तुम्ही स्वतः बघा. हे अख्खे सगळे प्रकार. भुताटकीचे. तुम्हाला कुणी हिरा दिला  काय किंवा घोडं दिलं तरी काय? ते काय परमेश्वराला आणखीन काही अक्कल नाहीये? 

    नाहीतर आपल्या बायकांचं म्हणजे अंगात येतं. अंगात. सगळ्या मोलकरण्यांच्या अंगात देवी येते. तिला आणखी काही जागा दिसली नाही बिचारीला.  लागल्या त्यांच्या पूजेला. त्यांच्या पायावर आलं कि झालं. पण ते अंगात येणं किती कठीण आहे. त्यानी किती त्रास होतो माणसाला. वेड्यापिश्यासारखे लोक होतात. हे सगळे भुताटकीचे प्रकार आहेत. आपल्या महाराष्ट्रात विशेषे                                  करून आणि ते देवळात करतात. महालक्ष्मीच्या  देवळात हा प्रकार. त्यांच्या ट्रस्टीनी संगितलं, माताजी तुम्ही साक्षात असून आमच्या  ह्याच्यात हे. आधी म्हटलं हे बंद करा. पहिली गोष्ट. दुसरं ही दुकान बंद करा मग मी येणार. अन सरासर त्यांना बोलवून घेतलं देवळांत. म्हटलं हे पैसे खाण्याचे धंदे परमेश्वराच्या नावावर जे तुम्ही काढलेत ते आधी बंद करा. तर माझ्यावर रागावले. म्हटलं जा. आज रागवाल उद्या रागवाल. गव्हर्नमेंटनी घेतलं दहा दिवसांमध्ये. तेंव्हा तुम्ही स्वतः च्या लोकांना महत्व देता आणि ते तुमचा फायदा उचलतात. त्यानी परमेश्वर मिळणार नाही. परमेश्वर तुमच्यामध्ये आहे, तो मिळवून घ्या.

      मग तिसरी तऱ्हा. नानकानी सांगितलं कि स्वतःमधे  शोध.  स्वतःमधे  शोध तर त्याची अखंड भजनं म्हणायची. स्वतःमधे  शोध रे बाबा, स्वतःमधे  शोध रे बाबा. अरे शोधणार कोण आहे? मी सांगितलं की तुम्ही जर हे पेनिसिलीन घेतलं तर तुम्हाला बरं वाटेल. तर तुम्ही रस्त्याने चालले पेनिसिलीन घेतलं तर मला बरं वाटेल. त्यानी काय तुम्ही पेनिसिलीन घेतलं का? स्वतःचा इलाज केला काय? काय त्यानी तुम्हाला फायदा झाला का? म्हणजे बुद्धीची जोड जी म्हणतात ती भलत्याच ठिकाणी द्यायची. मग बुद्धीची जोड आली की टवाळक्या करायच्या परमेश्वराच्या. परमेश्वर नाही. हे काहीतरी उगीचच खोटं दिसतंय. हे. एक तर दुर्बुद्धी तरी असेल किंवा  सुबुद्धी  तरी असेल. सुबुद्धी नाही.  सुबुद्धी म्हणजे स्वतः साक्षात परमेश्वर आहे. म्हणून आपण विनायकाला आधी म्हणतो की आम्हाला सुबुद्धी दे. सुबुद्धी देणारा हा आपला भोळा विनायक. आणि त्याला आपण विचारतो तू आम्हाला सुबुद्धी दे, तुझ्या सुबुद्धीनी आम्हाला सुद्धा परमेश्वर मिळू दे.

        आता विनायक कोण आहे? शंकर कोण आहे? कृष्ण कोण आहे? आपल्यामध्ये त्यांचं स्थान काय आहे? ख्रिस्त कोण आहेत? महम्मद कोण आहेत? ह्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. एखाद्या हरिदास बुवानी उभं राहायचं, कुठूनतरी डांबर आणलेलं आपल्याला बुक्का लावायचा, आणि तोंडाला काळं  फासून त्यानी काहीतरी लेक्चर द्यायचं. त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं झालं, इतिश्री. अहो केवढं मोठं धन परमेश्वरानी तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे तुमच्यामध्ये. ते मिळवायला नको का. ते मिळवलं पाहिजे. आणि  ते तुम्ही हमखास मिळवून घेणार. विशेषतः या  महाराष्ट्राच्या  पावन भूमीत. आज शिवाजी महाराजांना पाहिल्या बरोबर मला एकदम ते दिवस आठवले. काय ते. ते काय ती त्यांची समज. अवतारच जसा काही. धर्म काय हे त्यांना माहिती. मुसलमानांच्या सुनेचं सुद्धा त्यांनी केवढं महत्व केलं आणि लोकांना पटवून सांगितलं की दुसऱ्यांच्या बायकांवरती आपली दृष्टी कशी असली पाहिजे. राजे महाराजे असून सुद्धा काय दैदिप्यमान लोकं या देशामध्ये झालेले आहेत. ते महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. पण ते पार होते, जागृत होते. सगळ्यात मोठे सहज योगी महाराष्ट्रातले ते. पण त्या वेळला ज्या कार्याची गरज होती, त्या वेळला आपला देश पारतंत्र्यात होता म्हणून त्यांच्याशी भांडायचं होतं, ते कार्य त्यांनी केलं. पण त्यातही ते पार होते. धर्मानी केलं. अधर्म केला नाही. आज ही स्थिती आलेली आहे की आमच्यामध्ये आमचंच जे पारतंत्र्य आलेलं आहे, आम्हीच जे आमच्या पारतंत्र्याचं केलं ते करायचं म्हणून  शिवाजी आमच्याचमध्ये जागृत झाला पाहिजे. हे कार्य फार सोपं सरळ आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळी किमया केलेली आहे. प्रत्येक तऱ्हतऱ्हेच्या लोकांना काय काय प्रकार असतात ते सर्व आम्ही प्रत्येकाच्या कुंडलिनीत घुसून घुसून काढून घेतलेलं आहे. सगळ्यांचं आम्हाला बारीक सारीक माहिती आहे. की हे कळलं. की हे इथल्या धपानातनं आलेले आहेत. ह्यांचं कळलं. हे ह्या नाटकातनं आलेले आहेत. मग त्याची बरोबर कशी व्यवस्था करायची, तेच सांगणारंय. अगदी सोपं आहे. पण स्वतःबद्दल काहीतरी भ्रामक कल्पना नसल्या पाहिजे. पहिली गोष्ट. स्वतःला काहीतरी न्यूनगंड नसला पाहिजे. पुष्कळ लोकांना असतं, माताजी मी पामर आहे, माझ्यात काय आहे, मी कश्या कामाचा आहे. अहो तुम्ही जर असता तर माझ्यापुढे कशाला आला असता तुम्ही इथे? 

        दुसरं हे की मी कोणीतरी आहे. शिष्टम भारती. म्हणे एक सायंटिस्ट फार मोठे आहेत. मी म्हटलं असं आहे का. आता एक प्रश्न विचारा की माताजी तुम्ही साक्षात सायन्सचं सगळं, ज्ञान तुम्हीच आहात का?  खटकन त्यांच्या हातात शक्ती सुरु झाली. ही तरी कुठून तरी शक्ती येते. बाह्यात जे एवढं मोठं आपल्याला झाड दिसतंय त्याच्यात कुठून शक्ती येते, त्या पाळ्या मुळ्यातनं. ते खाली दबलेलं   आहे. जर आपण नुसतं झाडचं बनलो तर जिवंत राहू शकतो का? पाश्चिमात्य देशात हे लोक नुसतं झाड बनण्याच्या मागे लागले आहेत. आता फक्त एकच विचार करत असतात की जीव कसा द्यायचा? सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना हेच एक नाटक असतं की आता जीव कसा द्यायचा. पाळंमुळं शोधून काढल्यावरच ते झाड राहणार आहे आणि ती पाळेमुळे ह्या देशातच आहेत. हाताला लागली. आता सबंध मानव जीवन हे सुखकर होणार. त्याला लागणारी ही शक्ती सहजयोगाने पूर्ण होणार आहे.  

         आज संध्याकाळी मी सगळं काही आपल्याला सांगणारच आहे चक्रांच्या बाबतीत. आणि ह्यानी आपली राजकीय , सामाजिक, आर्थिक आणि मानसिक तशीच आपली शारीरिक सर्व स्थिती कशी सुधारते, ह्याबद्दल मी संध्याकाळी सांगीन. तरी आता पुष्कळ सांगितलं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा.  आणि आता पार होऊन घ्या कारण उशीरही खूप झालेला आहे. तेंव्हा सगळ्यांनी पार होऊन घ्या आधी. पार झाल्याशिवाय काही होणार नाही. तेंव्हा जर काही एखादा प्रश्न असला तर विचारा.