Procession and Public Program

Satara (India)

1984-02-06 Procession and Public Program, Satara, India, DP-RAW, Marathi, 69' Chapters: Procession, Children singing, Talk
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Public Program, Satara, India 1984-02-06

प्रार्थना!

ओम असतो मा सद्गमय। 

तमसो मा ज्योतिर्गमय। 

मृत्योर्मा अमृतं गमय।

ओम शांतिः शांतिः शांतिः।।

ओम तत्सत् श्री नारायण तू, पुरुषोत्तम गुरु तू ।।

सिद्ध बुद्ध तू, स्कंद विनायक, सविता पावक तू ।।

ब्रह्म मजद तू, यहव शक्ती तू, इशू पिता प्रभू तू ।।

रुद्र विष्णू तू, रामकृष्ण तू, रहीम ताओ तू ।।

वासुदेव गो-विश्वरूप तू, चिदानंद हरी तू ।।

अद्वितीय तू अकाल निर्भय, आत्मलिंग शिव तू ।।  

ओम तत्सत् श्री नारायण तू

स्वागत गीत……

श्री माताजी: मागच्या वेळेला आपण म्हटलं होतं “आदिमा”, म्हणाल की नाही या लोकांना फार आवडतं.  फॉरेनर्स तर शिकलेत.

सहजयोगी:  मुली म्हणत असतील तर……

श्री माताजी: यांना येतं का?

सहजयोगी: हे म्हणणारे नाहीत. ते आले नाहीत.

श्री माताजी: नाही. या आमच्या फॉरिनर्सना बोलावून म्हणायला सांगायचं?

सहजयोगी: हो.

श्री माताजी: बोलवा. अलेक्झांडर अलेक्झांडर… Come along here about 2 – 3 persons who could sing with him the “Adima”, the song that they sung last time. ते हल्लीचंच होतं. शिवाजीरावांनी बसवलं होतं. शिवाजीराव, तुमचं गाणं ह्या लोकांनी इतका छान बसवलं होतं. तुमचे भाऊ नाही आले? आलेत?

सहजयोगी:  हार्मोनियम पाहिजे?

श्री माताजी: हो. हार्मोनियम तर पाहिजे. तबला ही पाहिजे. हार्मोनियम पाहिजे.

सहजयोगी: आता कृपा करून कोणी बोलू नये. शांत रहा सगळ्यांनी. श्री माताजींकडे हात करून शांत बसावे. दोन्ही हात मांडीवर ठेवावे आणि शांत बसावे.

श्री माताजी: “आदिमा”, भाऊ कुठे तुमचे? शिवाजीराजांचे भाऊ कुठे आहेत? या बरं.

सहजयोगी: एस. पी. देसाई सर सापडले. कोणीही उभं राहायचं नाही. खाली बसून घ्या कृपा करून.

श्री माताजी: You all could sing wherever you are, I think and you can join him. हे गाणं आपण मागच्या वेळेला माझ्यावर रचून म्हटलं होतं देसाई साहेबांनी आणि ते ह्या लोकांनी शिकून घेतलं आणि जाऊन परदेशात मग ते बसवलं त्यांनी आणि ते म्हणू लागले.  ह्या लोकांपासनं असं शिकायचं आहे की जी गोष्ट एकदा चांगली, अत्युत्तम आहे अशी समजली की त्याच्या मागे लागतात.  हे आपण ह्यांच्यापासून शिकलं पाहिजे. कोणचीही गोष्ट जी छान आहे, उत्तम आहे ती स्विकारायची आणि ते करायचं हा ह्यांचा हिय्या आहे. म्हणून ह्यांच्या देशांमध्ये इतकी प्रगती झालेली आहे. आपल्या देशामध्ये माताजी आल्या, एक भाषण झालं, गेलं. मग दुसऱ्या वेळेला आले, गेले झालं. काय त्याच्या पुढे जायचं नाही. यांना विचारलं किती सहजयोगी आहेत? म्हणे चार-पाचच आहेत फक्त मल्हारपेठेत.  म्हणजे काय? इतक्या आम्ही दुरून येतो, हजारो मैल दुरून आणि तुम्ही लोक दोन-चार माणसं सहजयोग घेता म्हणजे काय नुसतं दर्शन घ्यायचं? आता दर्शनाला देवळं पुष्कळ बनली आहेत आमची. काही मिळवलं पाहिजे ना? You all can sing wherever you are if you know the song.

भजन प्रस्तुतीकरण:   हे आदिमा….. हे अंतिमा……

जयकार:  बोलो श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की जय ||

सहजयोगी: परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी, आजच्या ह्या कार्यक्रमाचे मल्हारपेठचे सहजयोगी बंधू-भगिनी तसेच या श्री संत तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच गुरुवर्य आणि आजच्या ह्या महायोगाच्या कार्यक्रमाकरिता जमलेले भाविक बंधू-भगिनी, आज ह्या ठिकाणी परमपूज्य माताजींचं मल्हारपेठच्या भूमीवर दुसऱ्यांदा आगमन होत आहे. ही आपल्या सर्वांची फार मोठी पूर्वपुण्याई म्हटली पाहिजे. त्याचबरोबर आज ह्या ठिकाणी सुमारे चौदा देशातून शंभर परदेशी सहजयोगी मंडळी इथे आलेली आहे. हा एक फार मोठा योग म्हटला पाहिजे. या जमलेल्या मंडळींमध्ये, आलेल्या मंडळींमध्ये अनेक डॉक्टर्स आहेत. इंजिनियर्स आहेत. वकील आहेत. बॅरिस्टर आहेत आणि एकाहून एक अशी थोर मंडळी आणि राजदूत सुद्धा म्हणून जे काम केलेले महाराष्ट्रामध्ये अशी काही मंडळी, युनोमध्ये सर्विस केलेली काही मंडळी आणि अशी थोर मंडळी या ठिकाणी आलेली आहेत.  तसेच शिक्षण क्षेत्रातली सुद्धा काही तज्ञ मंडळी स्वित्झरलँडहून इथे आलेली आहेत. आणि ते एवढ्या करता या मल्हारपेठसारख्या खेडेगावी येऊन राहिलेत किंवा महाराष्ट्राच्या दौऱ्यात येऊन राहिलेत कि सहजयोगाबद्दल त्यांनी अतिशय ज्ञान प्राप्त केलेलं आहे. परमेश्वराबद्दल संपूर्ण शास्त्र शोधून काढलेले आहे, मोठमोठी पुस्तकं लिहून काढलेली आहेत आणि त्यांना असा अनुभव आलेला आहे की महाराष्ट्राइतकं जगात कुठेही संतांनी कार्य केलेलं नाही. महाराष्ट्र हा जगातला स्वर्ग आहे अशी त्यांची खात्री झालेली आहे. आणि संत महात्म्यांनी या भूमीवर काय काय कार्य केलंय, किती चैतन्य या भूमीवर ओतून ठेवलेलं आहे, हे चैतन्य ग्रहण करण्याकरता जसे माणसाला ज्ञान चक्षू असतात तसे ही आजच्या कलीयुगातली सहजयोगातली चक्षू मंडळी आहेत आणि केवळ परमेश्वर प्राप्त करण्याकरता हजारो मैलांवरून हजारो रुपये खर्च करून ही मंडळी येथे आली आहेत याची आपण सर्वांनी कृपया नोंद घेतली पाहिजे. या मंडळींना काहीतरी यामध्ये प्राप्त झालेले आहे. आणि हे आलेले आहेत.  आता मागे दोन महिन्यापूर्वीच मी युरोप देशाचा दौरा करून आलो आणि तेथील हे सहजयोग कार्य बघून आल्यानंतर थक्क झालो तिथं बघून. एक गोष्ट त्यांना एखादी पटली की ही परमेश्वराच्या विरोधात आहे तर तिचा लागलीच दुसऱ्या दिवशी त्याग करून ही मंडळी जसं चिखलातून कमळं निघावीत अशी ही निघालेली आहेत आणि युरोप देश जर बघितला तर जीवनमान त्याठिकाणी इतकं वाहवलेलं आहे, ग्रहस्वास्थ्य एवढी नष्ट झाली आणि अशा या ठिकाणी परमपूज्य माताजींच्या कृपेने हिऱ्यासारखी ही माणसं तिथं निर्माण झाली आहेत हे पाहून मी स्वतः फार भारावून गेलो. त्यांना तुमची संस्कृती माहिती नाही, काही माहिती नाही. घरद्वार नाही. परंतु सहजयोगाने उद्धार होणार आहे. आणि हे आपण काही प्राप्त केलेलं नाही आणि हा या अशा सहजयोगाचा थोर वारसा भारतामध्ये आहे. विशेष्य करून महाराष्ट्रातून गेलेला आहे याची आपण पूर्णपणे जाणीव ठेवली पाहिजे. आता या ठिकाणी बरीचशी हजारो मंडळी आज विश्वात येतात. परंतु याच्यानंतर आता माताजी सगळ्यांना सहज योगाचा अनुग्रह करतील. कुंडलिनी जागृती करतील. परंतु ही जी आज दिसणारी, श्री माताजींच्या शब्दात सांगायचे तर आज दिसणारी ही जी फुले आहेत यांची फळं केव्हा होणार? सहजयोगाचं असंच होतं. मंडळी येतात, पार होतात. परंतु पुढे मात्र मेहनत करत नाहीत. का मेहनत करत नाहीत, का स्वतःची किंमत अशी वाया दवडतात हे समजत नाही? अजून हे लोकांना कळत नाही की आम्ही परमेश्वराचा धावा केल्यानंतर, परमेश्वर प्राप्ती नंतर, परमेश्वरापासून काय मिळायचं आहे? काय मिळवायचं आहे? कशासाठी आम्ही मानव झालो? याचा आपण विचार ठेवित नाही. तेव्हा सहजयोग आज मिळणं ही फार सोपी गोष्ट आहे. तिथे हजारोच्या संख्येने माणसं पार होतात आणि ती पाहण्याकरता ही मंडळी इथे आलेली आहेत. पण पार झाल्यानंतर जी मेहनत व्हायला पाहिजे, जी ती मंडळी आज करतात, जी ती मंडळी आज दुसऱ्याच दिवशी व्यसनाचा त्याग करतात आणि स्वच्छ होतात. तो एक फार मोठा आदर्श आपण त्यांचा डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आहे. चिकाटी, मेहनत, पहाटे उठून, चारला उठून, एवढ्या थंडीच्या देशामध्ये सुद्धा ते स्नान करून, तास तास, दोन दोन तास ध्यान करतात. मिठाच्या पाण्याची ट्रीटमेंट करतात. एक एक चक्रावर तास-तास मंत्र म्हणत असतील. ही जी त्यांच्यामध्ये चिकाटी आहे, ही शिकली पाहिजे.  मनुष्य पुढे जातो काहीतरी अंगीच्या गुणांनी. त्यांची चिकाटी याच दिशेने जाते. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. The patience and the perseverance overcome the mountains. (दि पेशन्स अँड दि पर्सिवरांस ओव्हरकम दि माउंटन्स).

तेव्हा आपल्या इथं जर काय जर असेल तर चिकाटी नाही इथं लोकांची. बैठक पाहिजे लोकांची. हे प्राप्त झाल्यानंतर आज ही जी मुलं सुंदर सुंदर इथं या ठिकाणी जमलेली आहेत, ही पुढच्या युगामध्ये फार मोठे महामानव बनणार आहेत. ही मुलं चांगली बनण्याकरिता आई वडिलांचे कर्तव्य आहे की त्यांना घरामध्ये तसे वातावरण तयार ठेवले पाहिजे. चांगलं झाड जरी लावलं तरी त्याची निगा ठेवावी लागते.  आज जर तुम्ही जर ह्या मुलांची नीट देखभाल केली नाही परमेश्वराच्या दृष्टीने, तर काळ कोणालाही माफ करणार नाही. आलेल्या परिस्थितीचा माणसाने भरपूर फायदा घ्यावा.  गंगा आलेली आहे. मी भरपूर भरून घेईन. पण आपल्या घागरी त्या गळक्या आहेत, घागरीला जी भोकं पडलेली आहेत अज्ञानाची, ती पहिली आपण बंद करून घ्यावी. परम पूज्य माताजींचे कार्य अनादिकालापासून, अनंत कालापासून आदिमायेचं कार्य चाललेलं आहे, चालत आहे आणि चालणार आहे. तुम्ही आम्ही जे महामानव झालेलो आहे, यांना मात्र काळ माफ करणार नाही हे लक्षात घ्या. काळ हा नेहमी जात असतो.  काळ कोणा करता थांबत नाही. आपल्याकडे म्हटलेले आहे, 

विश्व चक्र हे अविरत फिरते, सारखा काळ चालला हो. 

तर काळाच्या ओघात आता हे परत घेण्याची वेळ आलेली आहे.  आणि या वेळेला मात्र जर माणसाने शहाणपणा नाही ठेवला, तर आपण असं वाचलेलं सुद्धा भाकीत आहे की पुढं असं काही जगामध्ये घडेल की फक्त परमेश्वर तत्त्वाला असलेली माणसंच फक्त व्यवस्थित राहतील आणि बाकीच्यांचं काय होईल याचा कोणी अंदाज बांधू शकत नाही, असं प्रत्येक धर्म ग्रंथात सांगून ठेवलेले आहे. तेव्हा आता ही परमेश्वराने संधी दिली आहे तुम्हाला, असं वाटायला नको की त्या वेळेला आम्हाला कोणीही सहजयोग दिला नव्हता. मी नेहमी सांगतो की माताजी नेहमी दोन दारं खुली ठेवत असतात. एक स्वर्ग आणि एक नर्क तर आहेच आहे. तेव्हा आता हे माणसाचं शहाणपण आहे आणि ही माणसाला स्वतंत्रता दिली की तुम्ही कोणच्याही दारामध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकता. तेव्हा मला असं वाटतं आता सुज्ञ शहाण्याला सांगणे न लगे. कार्यक्रमाला मुळातच भरपूर वेळ झालाय.  परंतु शेवटी परमेश्वराचं कार्य आहे त्या मुहूर्तावर होत असतं हे आम्ही मान्य बुद्धीतून म्हणलं तरी त्याला काही अर्थ नाही. ज्या वेळेला तुम्हाला आशीर्वाद मिळायचा त्या वेळेलाच मिळणार. पण त्याची किंमत ठेवली पाहिजे. तिथून पुढं वाढवलं पाहिजे. मुलांना व्यवस्थित ध्यानधारणा शिकवली पाहिजे. घरांमध्ये पूजा-अर्चा, ध्यानधारणा, आरती म्हणली पाहिजे. आरती म्हटल्याने किती त्रास निघून जातात याचे पुष्कळ अनुभव आहेत. आता काय आपला फारसा वेळ मी घेऊ इच्छित नाही. सर्वांनी शांत चित्ताने बसावे. उभे राहिलेल्या सगळ्या मुलांना खाली बसवा. कुणीही उभं राहू नये. बघ्यासारखे जे आपण उभे राहतो, बोलत असतो, याचं चित्र हे चौदा देशांमध्ये जाणार आहे हे लक्षात धरा. ही जी आलेली आंतरराष्ट्रीय वारकरी मंडळी मी म्हणतो यांना, एक तुमच्यापासून शिस्त, श्री माताजींचा त्यांना जितका आदर आहे तितक्याच आदराने तुम्ही इथे बसले पाहिजे. एकही शब्द बोलला नाही पाहिजे. शांत बसायचं आहे. ज्या वेळेला श्री माताजी इथे आपल्याला दोन शब्द सांगत असतील त्यावेळेला कृपया सगळ्यांनी असे मांडीवर हात ठेवून बसावे आणि शांत रीतीने चित्ताने जमिनीवर बसून घ्यावे. भूमीला फार चैतन्य आहे. तुम्हाला माताजींचे भाषण ऐकायचं, व्हायब्रेशन जाणवतील. चैतन्य येईल. आणि बोलू नये कोणी कृपा करून आणि शेवटची एक जाताजाता सुरुवातीला सूचना देऊन ठेवतो की आपल्या इकडे सगळं झाल्यानंतर शिजेस्तोवर दम निघतो पण तो नीवेपर्यंत निघत नाही. दर्शनाच्या वेळेला आपल्या इथे एक बेशिस्तीचं प्रदर्शन होतं. हे लक्षात घ्या की इथे कॅमेरे लावलेले आहेत.  या कॅमेऱ्यांमध्ये एक चौदा पंधरा देशांमध्ये जगभर एक चित्र जाणार आहे. तेव्हा भारतामध्ये काय शिस्त आहे मुलांना, काय वळण आहे, याचं फार विचित्र चित्र जाऊ नये अशी मला सर्वांना कळकळीने हात जोडून विनंती आहे. दर्शन घ्यायचं झालं, पहिल्यांदा स्त्रिया मुलांना घेऊन द्यावं. मागची मंडळी तशीच बसून राहावं. आयुष्यात कुठे वेळ जात नाही आपला. एक दहा मिनिटांनी काय दुनिया बुडणार नाही मोठी. परदेशी आले तर जरा शांततेने घ्यावं. एवढा जरा संयम ठेवावा मला असं वाटतं आणि चांगला एक आदर्श आपण मल्हारपेठची मंडळी शिस्तीने तारून नेतील आणि आणि महाराष्ट्रभर वातावरण पसरेल आता गांभीर्याचं, पावित्र्याचं अशी मला आशा आहे. पुन्हा एकदा इथल्या व्यवस्थापन मंडळींना मी धन्यवाद देतो. त्यांनी एवढ्या तळमळीने पुढे येऊन.

श्री माताजी: तसेच विद्यार्थीवर्ग त्याने फार आम्हाला सहयोग दिला. फार मदत केली. ही वेळ आणीबाणीची आलेली आहे. वेळ आणीबाणीची आहे. हे कुणाच्या लक्षात येत नाहीये. म्हणून प्रत्येकाला वाटतं की काय होईल जास्तीत जास्त? ही अशी आणीबाणीची वेळ आलेली आहे की ह्या वेळेला जर तुम्ही जागृत झाला नाही तर नेहमीसाठी राक्षसांची इथे पूर्ण वरात येणार आहे. परमेश्वर आणि राक्षसामध्ये लढाई चालू आहे. आपल्याला ऐकायला येतं काय तिकडे? (अस्पष्ट….. ट्रेनचा आवाज…..अस्पष्ट….)

सहजयोगी: विचार काही करू नका ध्यानात जा सगळे.

श्री माताजी: आपल्या हातामध्ये थंड थंड असं काही वाटलेलं आहे. पुष्कळांना वाटलंय. काही लोकांना नाही वाटलेलं. कबूल आणि डोक्यातनं सुद्धा असं काही तरी गार गार निघाल्यासारखं वाटलं. ते आहे काय? ते काय मिळालं आपल्याला? ही आपल्यामधील जी शक्ति आहे ती जागृत झाली. आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. आता हे बघा की जेव्हा मी आपल्याला भाषण देत होते आणि याचं (माइक) कनेक्शन नव्हतं तेव्हा आपल्याला काही आवाज येत नव्हता. त्याचा काहीच उपयोग राहिला नाही. तसंच माणसाचं आहे. जोपर्यंत परमेश्वराशी संबंध होत नाही, तोपर्यंत त्याला काहीही अर्थ लागत नाही. आपण आतापर्यंत जे काही काम करतो, आंधळ्यासारखं सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे परमेश्वराला दोष देण्यात काही अर्थ नाहीये. फक्त अजून आपलं कनेक्शन लागलेलं नाही, संबंध झालेला नाही, योग झालेला नाही, असं समजून माणसाने शांतपणाने तो योग घ्यावा.  त्यात रमलं पाहिजे. मल्हारपेठला फार थोडे सहजयोगी आहेत हे ऐकून आश्चर्य वाटलं. कारण बहुतेक कुठच्याही ग्रामीण भागात गेलं म्हणजे लोकांना सहजयोग लवकर साधता येतो आणि ते तेथे जमतात.  कारण ग्रामीण भागातले लोक सरळ हृदयाचे असतात. त्यांच्यामध्ये परमेश्वराबद्दल आस्था असते. प्रेम असतं. पण मल्हारपेठेमध्ये तसं झालं नाही याचं मला मोठं आश्चर्य वाटलं. आता आपण असं लक्षात घेऊ की जर आपला परमेश्वराशी संबंध नाही झाला तर काय होईल? काय होईल त्याच्या शिवाय हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की आपल्याजवळ पैशे आले, श्रीमंती झाली म्हणजे आपण सुटलो ही गोष्ट खोटी आहे. आम्ही अशा देशात फिरलोय जिथे फार श्रीमंती आहे आणि लोक अत्यंत दुःखी आहेत. इतके दुःखी आहेत की पटापट आत्महत्या करत आहेत. ही गोष्ट खरीच सांगते मी तुम्हाला. तेव्हा पैशाने काय मनुष्याला सुख मिळत नाही. मग नुसता अहंकार मिळतो. जे लोक साधारणतः सुखवस्तू लोकं आहेत ते स्वतःला फार शिष्ट समजून परमेश्वरापासून दूर राहतात. पण हे सुख त्यांना माहित नाही, उद्या बोचणार आहे त्यांना. तेव्हा जर परमेश्वराशी संबंध नाही झाला तर मनुष्य समाधानी होऊ शकत नाही. त्याला किती मिळालं तरी तो समाधानी होऊ शकत नाही. इथे एक गृहस्थ मला भेटले होते आता. त्यांच्यामुळे जरा उशीरही झाला. ते मला म्हणायला लागले, आता आम्ही धरण योजना करतो आहे. त्याच्यामुळे लोकांना समृद्धी येईल. म्हटलं समृद्धी येऊन लोक सुखी होतील का तुम्हाला असं वाटतं? तुम्ही एका माणसाला शंभर रुपये द्या तो लगेच चालला गुत्त्यात दारू प्यायला. जराशे सुखवस्तू लोक झाले म्हणजे परमेश्वरापासून दूर राहतात ऐटीत. त्यांच्यात नैतिक पातळी राहतच नाही. त्याच्यामुळे अत्यंत नुकसान होतं. तरतऱ्हेचे रोग आहेत. कॅन्सरचा रोग आहे. हृदयाचा रोग आहे. पोटाचा रोग आहे. डोळ्यांचा रोग आहे. डायबिटीसचा रोग आहे. साखर साखर म्हणतात तर लोक साखर खाऊ शकत नाही. त्यांना डायबिटीस होतो. जे लोक जास्त जेवतात ते जास्त जेऊ शकत नाही. त्यांना अपचन होतं. त्यांना लिव्हर झालं म्हणजे त्यांना भूका लागत नाही.  मग जेवू शकत नाही.  म्हणजे जोपर्यंत परमेश्वराशी संबंध येत नाही तोपर्यंत जीवनाला संतुलन न आल्यामुळे अनेक शारीरिक व्याधी होतात. दुसरं म्हणजे पुष्कळसे मानसिक रोग होऊन जातात लोकांना. ६५ टक्के लोक अमेरिकेमध्ये वेडे आहेत. ६५ टक्के लोक वेडे आहेत. त्यांनी प्रत्येकाजवळ वेड्यांच्या डॉक्टरांकडे जात असतात, सायकॉलॉजिस्ट म्हणतात त्यांना. त्यांना पैशे भरत असतात. म्हणजे जर त्यांना समजा दहा हजार रुपये मिळाले, त्यातले पाच हजार रुपये औषधपाण्यातच जातात मुळी. बाकी दारू. हे असलं शहाणपण माणसाला तोपर्यंत असतं जोपर्यंत त्याला डोळे येत नाहीत. तो डोळस झाल्यावर त्याला सम्यक ज्ञान येतं. आणि मग ऐश्वर्याला सुद्धा मजा येते. आता ज्या लोकांना वाईट सवयी आहेत. त्यांना माहीत आहे वाईट आहे, सोडलं पाहिजे.  त्यांना काही आवडत नाही पण सोडता येत नाही कारण तेवढी इच्छाशक्ती जबरदस्त नाहीये. ती बळावते. समर्थ मनुष्य होतो. त्याला स्वतःची इज्जत येते. आता शिवाजी महाराज आपण म्हणतो एवढे मोठे झालेत? शिवाजी महाराज कोण होते? साधा एक राजा म्हटलं तर चालेल. पण काय त्यांच्यात विशेष होतं म्हणजे ते साक्षात्कारी राजा होते. तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये ताराबाई म्हणून एक फार शूर वीर बाई होऊन गेली. ती सुद्धा साक्षात्कारी होती. (अस्पष्ट…..) ज्यानं सुख दिलं नाही, तुम्हाला आनंद दिला नाही, तर तेव्हा माझं कौतुक करून तरी काय फायद्याचं आहे?  आईसाठी केलं पण आईला एकच पाहिजे. तिच्याकडे जे काही आहे, जी काही तिची शक्ती आहे ती तुम्ही घ्या आणि वापरा. आणि सौख्याने नांदा या परमेश्वराच्या साम्राज्यात. हे व्हायला पाहिजे. दुसरं काही पाहिजे असं नाहीये. एवढं फक्त पाहिजे. थोडं ऐकून घ्यावं. समजून घ्यावं. जी भक्ती केली तुम्ही आतापर्यंत, त्या भक्तीचं थोर म्हणूनच आम्ही आलो आज. पण आता भेटल्यावर तरी दुसरी भक्ती सुरू पाहिजे. तिला अनन्य भक्ती म्हणतात. पराभक्ती म्हणतात. जेव्हा आपली भेट झाली तेव्हा त्या आस्थेला सुद्धा काही अर्थ नाही. त्या दर्शनाला काही अर्थ नाही. त्या भक्तीला काही अर्थ नाही. जोपर्यंत तुम्ही त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेतलेला नाही. आईचं म्हणणं एवढच असतं, की बाबा जे काही तुला आहे, त्याचा तू उपयोग करून घे. त्याच्यासाठी काहीही पैशे द्यावे लागत नाहीत. काहीही करावं लागत नाही. फक्त चित्त परमेश्वराकडे ठेवलं पाहिजे. चित्त कुठे आहे? आपले चित्त कुठे आहे ते पाहिले पाहिजे. सगळ्या आया-बहिणींना पण सांगायचं आहे. जर तुम्हाला आपल्या मुलाबाळांची काळजी आहे आणि उद्या त्यांना काही रोग होऊ नये, काही त्रास होऊ नये, तसेच परमेश्वराच्या साम्राज्याचा सबंध आशीर्वाद त्यांना मिळावा तर त्यांना सहजयोगात उतरवलं पाहिजे तुम्ही. आणि थोडीशी मेहनत केली पाहिजे. सहजयोग म्हणजे काही पंथ नाहीये. हे तुमच्यामध्ये असलेलं जे जिवंत तत्व आहे, जे अंकुरायचंय. त्याच्यामध्ये कोणचाही बाह्यातला धर्म, पंथ, जातीभेद काहीही नाहीये. सर्व मानवामध्ये असलेली ही कुंडलिनी जागृत करायची आणि ती जागृत झाल्यावर त्याला त्याच्या आत्म्याचा प्रकाश त्याच्या चित्तात आणून द्यायचा आहे. एवढंच काम आहे. मग बघा तुम्ही किती शक्तिशाली होता.  मग बघा तुमचं किती भलं होतं. सगळं नुकसान तुमचं भरून निघेल. तेव्हा आता टाळ कुटण्याचे दिवस गेले. आता परमेश्वराला भेटण्याची गोष्ट करा. परमेश्वराच्या साम्राज्यात येण्याची गोष्ट करा. जे काही तुम्ही सहन केलं आज पर्यंत, त्रास उचलले, परमेश्वराच्या नावात टाहो फोडला, ते आता पूर्णत्वाला येणार आहेत. तेव्हा मात्र पाठमोरे होऊन बसलेले आहात तुम्ही. आणि व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ घालवता.  तेव्हा कृपा करून शहाणपणा धरला पाहिजे आणि पुढच्या वेळेला मी येईन तेव्हा मला असं ऐकायला नको की चार आणि पाच इथे फक्त सहजयोगी आहेत, मल्हारपेठेत आणि बाकी सगळे आंधळेच्या आंधळे, जशेच्या तशे. डोळस व्हायला पाहिजे आणि डोळस झाल्यावर तुमच्या हातातनं चैतन्याच्या लहरी वाहतात. ही सगळीकडे जी सृष्टी पसरलेली आहे, तिचं चलनवलन करणारी जी जिवंत शक्ती आहे, जिनी या फुलातनं फळं होतात, ती शक्ती तुमच्या हाताला लागली आज. ती ब्रह्म शक्ती आहे म्हणून बरं झालं. ही वीज गेली आहे. म्हणून तुम्ही थोडंसं ध्यान केलं, नाहीतर ध्यानाला कोण येणार होतं? ध्यानात कोणी बसणार नव्हतं. तेव्हा बरं झालं, एका अर्थी हे झालं. त्याने फायदेच होणार आहेत. तरी आता इथून ध्यान कसं करायचं ते शिकले पाहिजे आणि इथे सेंटर आहे आपलं. इतके छान सहजयोगी आहेत. मल्हारपेठेच्या सहजयोग्यांना लोक फार मान देतात. पण इथे मात्र लोकांना ते समजत नाही. तेव्हा इतके संत साधू आले. त्यांनी जे काही कार्य केले, त्याची फळे आम्ही उचलतच आहोत. पण आता तुम्ही ते घ्यावे. त्याचे फायदे उचलून घ्यावे असं माझं तुम्हाला सांगणं आहे कळकळीचं. आईला काही नको, हे तुम्हाला माहित आहे. फक्त एवढंसं देण्याला काय झालं? आई बरं, आम्ही आमच्या आत्म्याचा प्रकाश जागृत करून घेऊ, हे वचन तुम्ही द्यायला पाहिजे मला. आणि हे केलं पाहिजे. आणि मेहनत केली पाहिजे. दोन चार असतात उपटसुंभ, दोन चार गुंडही असतात. प्रत्येक गावात असतात. पण आता त्यांचं चालणार नाहीये. पण जर तुम्ही त्यांचं चालू दिलं, तर मात्र गुंडांचं राज्य येणार आहे. गुंडांचं काय, शैतानाचं राज्य येणार आहे. आणि कुणाच्याही मनामध्ये शांती राहणार नाही. सर्वनाश होईल. तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला शक्तिशाली करूया. ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. बायका-पुरुषांमध्ये आहे. मुलांमध्ये आहे. सगळ्यांमध्ये आहे. वयाचा सुद्धा त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही.  तेव्हा कृपा करून ही गोष्ट प्राप्त करावी. आज सगळ्यांनाच त्याची जाणीव झालेली आहे. पण पुढं काय करायचं? कसं करायचं? ते शिकलं पाहिजे.  आणि इथे सहजयोगाचं सेंटर आहे, तिथे गेलं पाहिजे.  तसेच तुम्हाला तिथे फोटो मिळतील. तुम्हाला काही आजार असेल, तर ते कसे बरे करायचे ते सांगण्यात येईल. त्याच्यातून तुम्हाला काही जर दुसऱ्यांना जागृत करायचं, ते कसं करायचं? ते सांगण्यात येईल.  दुसरे काही प्रश्न असतील ते ठीक करण्यात येईल. तुमच्या सवयी कशा सोडायच्या ते सांगण्यात येईल. हे सगळं सुटून तुम्ही आपले स्वतंत्र होता. कोणचीच सवय नाही. स्वतंत्रतेत बसले आहेत. आता आम्हाला बघा. तसं आम्ही श्रीमंत घरातले आहोत. ऐशो आरामात राहतोही, पण आता मुळात इथे मी जमिनीवर झोपू शकते. मला काही प्रश्न नाही. कारण आम्ही स्वतंत्र राजे आहोत आम्ही. कुठे बसलो तरीही राजे आहोत, जमिनीवर बसलो तरी किंवा पायऱ्यावर बसलो तरीही किंवा सिंहासनावर बसलो तरीही. असा राजापणा आला पाहिजे आणि तब्येत मनुष्याची अशी झाली पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे की उभा आहे कोणीतरी, देवाने केलेला मनुष्य आहे हा, देव माणूस.  त्याचं राक्षसी होऊन जगामध्ये किती तुम्ही मिरवाल, तरी लोक थुंकतील तुमच्यावर. तुम्हाला वाटतं की दोन-चार खोटं बोलून जर तुम्ही लोकांना फसवून काय मिळवलं तर फार मिळवलं, विसरू नका. उद्या तुम्ही मेल्यावरती कोणी तुमचे पुतळे उभारणार नाही आणि उभारले तरी ते पाडून टाकतील, त्याच्यावर थुंकतील आणि तूडवतील ते. लक्षात ठेवले पाहिजे. आपलं आचरण ठीक करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आत्मसाक्षात्कार पाहिजे. म्हणजे तुमच्यात शक्ती येईल. आणि तुमच्यात बुद्धी येईल, सुबुद्धी येईल. तुमच्यात दैवी शक्ती जागृत होईल. आणि तुम्ही एक विशेष लोक व्हाल. तुम्ही महाराष्ट्राचे लोक फार विशेष आहात हे जाणलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा आपल्यासमोर नुसते पुतळे बांधून होणार नाही. आपणही त्यांच्या पुतळ्यात काय ते जाणून त्याप्रमाणे आपलं आचरण केलं पाहिजे.  तुकारामांचे एवढे उपकार आहेत, त्या शाळेत तुम्ही शिकता.  तुकारामांनी जे काही सांगितलेलं आहे त्यातलं थोडंतरी आपल्यात आलंय काय हे बघितलं पाहिजे. पण आत्मसाक्षात्कारानंतर असं वाटायला लागेल तुम्हाला की आपण एक झालोत, तन्मय झालोत तुकारामांच्या बाबतीत. असो. आज फार उशीरही झाला. दुसऱ्या कामात   फसल्यामुळे मी उशीराने आले. मला फार वाईट वाटत होतं की अजून सगळी भक्त मंडळी बसली असतील, किती तहानेली, भुकेली सगळेजण माझी वाट बघत बसतात, कधी पोचते आणि कधी काय?  तेव्हा इथे आल्यावर कळलं की नाही माताजी, हे तर नुसते बघे आहेत सगळे. काही कामाचे लोकं नाहीत. मला फार वाईट वाटलं. असं कसं म्हणताय? इतकी माझी वाट बघतात. मग कशाला वाट बघितली माझी? माझ्यापासनं काही घ्यायचं नव्हतं, तर कशाला वाट बघितली?  हे आईचं प्रेम आहे. आई आपली असते. अगदी आपली जवळची आपली असते. तिच्याबरोबर काही फरक नसतो. आणि तिने म्हटलेलं ते लक्षात ठेवलं पाहिजे. जशी तुम्ही प्रेमाने वाट बघितली, तसेच आम्ही प्रेमाने येथे आलेलो आहोत. तेव्हा ते प्रेम घ्यावं आणि आपल्यामध्ये ते जागृत करून घ्यावं आणि त्याचा उपभोग घ्यावा, हाच माझा आशीर्वाद आहे तुम्हा सर्वांना.

(अस्पष्ट संवाद……..)

सहजयोगी: कुंडलिनी कशी चढवून बांधायची ते लोकांना दाखवतात आणि त्यांच्याकडून करवून घेतात.