Public Program

Kamhala (India)

1985-01-19 Public Program Marathi, Kamhala Village India DP-RAW, 53'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

 कामहाला गावचे सरपंच साहेब तसेच उपसरपंच ,नंतर इथली जी सेवक मंडळी आहेत ,इथले रहिवाशी आहेत सगळ्यांना आमचा प्रणिपात . हि हनुमानाची जन्मभूमी आणि अंजनी देवीचं  हे स्थान  आहे . त्यामुळे त्या वेळच वर्णन करावं तितकं थोडं आहे . आम्ही सहजयोगा मध्ये अंजनी देवींना महासरस्वतीच स्थान मानतो . फार उच्च स्थानावर आहेत त्या . जी परमेश्वराची शक्ती जी आदिशक्ती जिचे तीन अंग आहेत पैकी जीनी सर्व सृष्टी रचली ती महासरस्वतीची शक्ती आहे . आणि तीच अंजनी देवी आहे असं आम्ही मानतो आणि ते खर आहे . आता त्यांचा इतिहास सांगायची आज वेळ नसली तरी त्यांच्याच कृपेने आणि हनुमानाच्या आशीर्वादाने च आज मला इथे येता आल . त्याबद्दल आता परत दिलगिरी दाखवली पाहिजे कि मी त्या दिवशी म्हंटल होत त्या दिवशी येऊ शकले नाही ,पण आज हि संधी मिळाली आणि तुम्हा सर्वाना भेटून मला आज फारच आनंद झाला आहे . बघितलं म्हणजे अगदी जीव भरून येतो . आणि काय बोलावं आणि कस सांगावं ते समजत नाही . कि आपल्या देशाची काय हालाखीची स्तिती आहे ती लोकांना काही माहीतच नाही असं वाटलं . ते बघतच नाहीत कशे लोक राहतात त्यांची राहणी खाणी कशी आहे ,घरदार कशी आहेत ,कशा परिस्तितीत राहतात ,कस तरी आयुष्य काढून राहिले . ओसाड जमिनी पडलेल्या आहेत ,त्यांनी तरी काय करायचं कस जगायचं ?. पण तिकडे कुणाचं लक्ष दिसत नाही मला वाटत . म्हणून एकच मी असा प्रयोग करायचा ठरवला आहे . तो जर जमला तुमच्या ह्या गावच्या जमिनीत ,जर ती मिळाली वेळेवर, तर पंचानी वैगेरे ठराव ठरवून त्यांची कबुली दिली असली तरी अजून ते व्हायला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही पण जर का वेळेत झालं आणि बरोबर जमलं तर मी असा विचार केलेला आहे कि तिथे पहिल्यादा एक अशा लोकांची शाळा काढली पाहिजे जे पैसे देऊ शकतात . त्यात परदेशातून  ,आपल्या देशातून जी श्रीमंत लोकांची ती मंडळी आहेत ,ज्यांना  इथे आपल्या भारतीय कले बद्दल ज्ञान घ्यायचं आहे अशा लोकांची शाळा काढायची आहे . आणि त्यांना हे ज्ञान द्यायचं . त्यांना पुष्कळस शिकायचं आहे आपल्या पासून . त्यांना अशी देवळ बांधता येत नाहीत त्यांना असं घर बांधव लागत त्यांना अशेच भिकेचे डोहाळे लागलेत . त्यांना हे घर फार आवडेल ,त्यांचे जे बंगले आहेत ते त्यांना आवडत नाहीत . परदेशात जर सांगितलं हे घर असं असं आहे तर बघायला येतील . तेव्हा त्या लोकांना आपली गोष्ट सांगायची ,त्यांना शिकवायचं ,आणि त्याच्या साठी त्यांच्या जवळ पैसे आहेत ते देतील . मग त्या शाळेच्या दमावर आपली आपण  एक शाळा काढू शकतो प्रौढांची ,ज्या शाळे मध्ये आम्ही  आपल्या लोकांना शेतीला उपयोगी  असे  काही धंदे आहेत ,कारखाने आहेत ,मोट्या प्रमाणात नाही पण आता एक म्हंटल तर त्याला आम्ही म्हणू कि आपण इथे सूर्याचा ताप इतका सहन करतो पण या सूर्याच्या तापाला हरण करून त्याच्या शक्तीवर आपण पृथ्वीवर पुष्कळशा गोष्टी करू शकतो . त्या कशा करायच्या नंतर गोबर गॅस प्लॅन कसा करायचा ,झोपड्या किंवा घर कशी चांगली बांधायची ,नंतर अशा अनेक तऱ्हेच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकू शकता . आणि त्या तुम्हाला शिकवता येईल . याच्या द्वारे तुम्ही आपली उन्नती करू शकाल आणि नंतर गावाची उन्नती आपण करू शकू . मला अशी आशा आहे कि हे कार्य पूर्ण पणे संपन्न होईल . परवा आम्ही अंजनेरी गावी गेलो होतो मला आश्चर्य वाटलं ,तिथले लोक इतके विक्षिप्त कि माझ्या बरोबर जे फॉरेनर्स आले होते त्यांना पाहून ते असे म्हणायला लागले कि माताजी आम्हाला ख्रिस्ती धर्मात घेऊन जात आहेत . तर अशा वेड्या लोकांना काय सांगावं ?ह्या आंधळे पणाची कमाल म्हणायची . तेव्हा आंधळे पणा सोडायला पाहिजे . जगामध्ये तीन तऱ्हेचे लोक असतात कृष्णाने सांगितले आहे ,एक तामसिक लोक दुसरे राजसिक आणि तिसरे सात्विक . पैकी जे तामसिक असतात ती आपल्या भारतात आहेत ,म्हणजे काहीतरी खोट्या गोष्टी ना महत्व द्यायचं आणि सगळं आयुष्य त्याच्यावर वेचायच . कोणतीही गोष्ट धरून बसायची ,आता एक घरात म्हणे कि एक गाय आहे . आहे बुवा गाय ,आता गाईची पूजा काढली ,लागले सगळे त्याचा पाठीमागे . स्वतःला खायला नाही आणि त्या गाईचीच पूजा काढली . एक वासरू आहे त्याचीच पूजा काढली . काहीही काढतात टुम आणि त्याच्या नादी लागतात . आता काही नाही तर एखादा बाबाजी आला ,बाबाजी कुठून येतात ?जेल मधून सुटले कि भगवे कपडे घालून यायचं ,लागत काय त्याला ,ढोंगी पणा करायला . ती काय गृहस्थातले लोक आहेत ?. त्यांना कशाला तुमच्या कमाईचे पैसे द्यायचे . आला गावात बाबा आलाय मग त्याच्या मागे लागले वेड्या सारखे . तो बाबाजी म्हणजे सगळं काही झालं . मला तर बघवत नाही लोक इतके वेडे कशे होतात . अगदी वेड्या सारखे अशा बेकार वस्तूंच्या पाठीमागे लागतात . त्यांनी काही मिळालेलं आहे का तुम्हाला ?,काही फायदा झालाय का ?आणि परमेश्वराच नाव बदनाम होत . लोक म्हणतात हि परमेश्वराची माणस . तुम्ही म्हणता इथं योग भूमी आहे ,इथे परमेश्वर राहिले ,इथे हनुमान राहिले ,राम आले होते . आणि मग हे लोक असेकसे ?यांची स्तिती अशी कशी ?अन्न अन्न दशा का ? त्यांना उत्तर सुद्धा देता येत नाही मला . 

त्याला कारण आपला आंधळे पणा आहे . जे नको तिथे आपण आपलं डोकं नमावतो आणि जे हव आहे ते घेत नाही . त्यामुळे थोडासा आंधळे पणा आपण सोडायला पाहिजे . पण जे परदेशी लोक आहेत ते राजसिक आहेत त्यांना चांगलं काय वाईट काय तेच कळत नाही . प्रत्येक गोष्ट चांगली आहे कि वाईट आहे ते विचारणार . आणि तिसरे सात्विक लोक आहेत . सात्विक लोक ते जे कि बरोबर ओळखतात खर  काय नि खोट काय . आणि खऱ्याच्या मागे लागतात तेच खरे सात्विक आणि तेच खरे परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊ शकतात . मध्य मार्गी असतात ते ,काहीतरी हट्ट धरून बसत नाहीत ,आमच्या बापदादा नि केलं म्हणून आम्ही करायचं ,अहो पण त्यांनी केलं त्याचा त्यांना काही फायदा झाला का?माझं असं म्हणणं नाही कि जे आपल्या देशात आहे ते सगळं चुकीचं आहे पण काही काही चुकीचं आहेच . आता एक बाबाजी येऊन बसला म्हणे मी ब्राम्हण ,मला इतके रुपये द्या . आता तुमची पालखी निघाली ,आता आम्ही येताना घाटात ढोंगी लोक पहिले ,चालले होते आपले कपडे घालून रस्त्याने ,चांगले हसत चालले होते जोरजोराने ,चांगल लुबाडल  लोकांना . हे गेले तिकडं पालखीला बिचारे गरीब गरीब माणस पायी चालून गेले त्या पालखीला आणि हे लुबाडून चांगले चालत होते व्यवस्तीत हसत खिदळत . खुश होते कि लुबाडत सगळ्या मुर्खांना सगळ्यांना . हे असले धंदे जे चाललेले असतात त्या धंद्यांन मुळेच आपल्या देशां मध्ये प्रगती होऊ शकत नाही . विश्रामत लोक पुष्कळ आहेत .  वरून पैसा आला कि तो चालला दुसऱ्यां खिशात . हे बरोबर नाही . ह्या दोन्ही गोष्टींच्या मधोमध गोष्ट आहे ती लक्षात ठेवली पाहिजे , ती म्हणजे “येऱ्या गबाळ्याचे काम नोहे “.मुर्खात जर उभं राहायचं तर मूर्ख पणाला अंत नाही आहे . पण शहाणपण जर धरायचं असलं तर थोडंतरी त्या माणसाला शिस्त असायला पाहिजे आणि समज असायला पाहिजे . तो शहाणपणा आपल्यात आला तर आपलं कल्याण होऊ शकत हे मी तुम्हाला सांगते .  

दुसरी गोष्ट पैशाची कमतरता आहे ,हालाकीची स्तिती आहे ,पाऊस पडत नाही सर्व दिसतंय . आईला दिसतंय सगळं . पण उद्या मी जर १०० रुपये तुम्हाला दिले काही मेहनती शिवाय तर तुम्ही दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसणार . काय करणार ,आईच्या नात्यांनी मी बोलते तेव्हा वाईट नाही वाटून घ्यायचं . तेव्हा आईच म्हणणं काय कि बाबारे मी तुला १०० रुपये दिले तर तू ते सत्कर्माला लाव . बरोबर आहे ना ?तुला जर मी १०० रुपये दिले तर तू तुझ्या बायका मुलांना सांभाळ . बरोबर आहे कि नाही ?. आई तुम्हाला काय म्हणणार आहे कि बाबारे हे पैसे दिले तुला मी जिवाभावाने त्याच तू नुकसान करू नको ना.  नाहीतर ते आणखीन दुःखाचं कारण होत आईला . कुठून याला मी पैसे दिले आणि सत्यानाश झाला याचा . त्याच्या साठी काय आता करायला पाहिजे ? समजा इथे आलो आम्ही भरभराट झाली तुमची ,पैसे मिळायला लागले चांगलं दिसायला लागलं सगळं ,सोन्याची द्वारिका केली समजा . पण मग इथे दारूचे गुत्ते तुम्ही उभे केले तर मी काय करणार ?आता सांगायचं म्हणजे वारणा नगर म्हणून एक फार मोठी संस्था आहे तिथे मी गेले होते ,त्याचे जे मुख्य संचालक होते तो फार चांगला माणूस अत्यंत कार्मिष्ठ ,त्यांनी एव्हडी मेहनत घेतली ,तात्यासाहेब कोरे त्यांचं नाव . ते माझ्या मुद्दामहून पाया पडले म्हंटल झालं काय तुम्हाला तात्यासाहेब ?अहो सगळं काम बघा तुम्ही माताजी माझं ,मी सगळं बघितलं मग ढसा ढसा रडायला लागले . म्हंटल झालं काय तुम्हाला एव्हडं दुःख मानायला अहो तुम्ही इतकं सुंदर सगळ्यांचं केलं ,इतकं सगळ्यांना खायला प्यायला घातलं ,आणि साखरेचे कारखाने काय ,लोकांच्या जवळ व्यवस्थित कपडे ,शीक्षण ,शाळा सगळं छान आहे मग रडता कशाला ?म्हणे हे तुम्हाला आता दिसत रात्री तुम्हाला दाखवतो म्हणे . सगळे झिंगून रस्त्यावर पडतात ,बायका म्हणे फॅशनेबल झाल्या ,नवरे सोडून पळाल्या ,तिकडे म्हणे घाणेरडे धंदे बायकांनी सुरु केलेत ,पोर व्रात्य झाली ,चावटपणा करतात त्यांना अक्कल नाही . हे का मी करायला सांगितलं होत ,एव्हड्या साठी का मी हे सगळं केलं ?आता तुम्ही संत आहात तुम्ही सांगा ,माझ तर कुणी ऐकायचं नाही . एव्हडं सगळं करून तो मनुष्य आता म्हातारपणाला आलेला रडायला लागला . 

तस माझ तुम्ही करायचं नाही . पण याला इलाज आहे आमच्या जवळ ,इलाज असा आहे कि तुम्ही जर आपल्या  आत्म्याला प्राप्त झालात तर मग रस्ता चुकत नाही माणसाचा .कारण तो प्रकाश देतो ,त्या प्रकाशात माणूस सन्मार्गाने जातो . सगळ्या घाणेरड्या सवयी सुटतात . हि मागची खूळ जातात . आणि पुढचे भविष्यातले विचार तेही जातात . आणि माणूस मधोमध आरामात ,सुखात राहतो . घरद्वारावर त्याच्या आशीर्वाद येतो परमेश्वराचा . आणि सर्व तऱ्हेनी तो सुखाला प्राप्त होतो . नाहीतर पैसे म्हणजे सुख हि आपली खोटी कल्पना आहे . पैसे म्हणजे मुळीच सुख नाही आहे . तुम्ही पैसे वाल्याना बघा ते जास्त माझ्याकडे येतात . त्यांच्या कडे इतकी दुःख आहेत कि काही विचारायला नको . आणि आपल्या कडे आहे नाही असं  नाही पण आपल्या पेक्षा त्यांची दुःख अशी आहेत कि उत्तरच नाही माझ्याकडे . तेव्हा तुम्ही फक्त पैसे मिळवायचे आपली आर्थिक स्तिती सुधारायची हे बघायचं नाही तर पहिल्यांदा आपल्या आत्म्याचं दर्शन घ्यावं . 

आता पुष्कळांनी मला प्रश्न विचारला माताजी तुमचं भक्तीयोगा बद्दल काय म्हणणं आहे . भक्तियोग करावा कि नाही ,अहो म्हंटल भक्ती हा मार्ग आहे ,भक्ती हा योग नाही आहे . आणि भक्त म्हणजे कोण कि जो अभक्त नाही . ज्याचा परमेश्वराशी संबंध झाला तोच भक्त आहे . उगीचच देवाच्या नावाने टाहो फोडत तुम्ही चालले आणि रस्त्याने टाळ कुटत आणि एकतारी वाजवत हरी हरी म्हणत चालले तर त्यांनी काही तुम्ही परमेश्वराच्या दारात नाही गेले . परमेश्वराशी तुमचा आधी संबंध झाला पाहिजे . भक्ती हा मार्ग आहे आणि ध्येय आत्मबोध होणे आहे . तो अगदी सहज ,सरळ आहे तुमच्यामध्येच आहे तो अगदी एका क्षणात तुम्हाला होईल . पण तो झाल्या नंतर तो पसररावा लागतो ,समजून घ्यावा लागतो . तुमच्या इथली सरपंच आणि पंच मंडळी मला शहाणी वाटतात . त्यांच्या लक्षात हि गोष्ट आलेली आहे देवकृपेने . जर असं झालं आणि तुम्ही जर आशीर्वादित झालात तर तुमच्यात श्रीमंती येईल तरी इथे लक्षीमीच राज्य आलं पाहिजे पैशाचं राज्य नको . एकदा पैसे आला कि मुलांना आई दिसत नाही ,आईला मुल दिसत नाहीत ,नवऱ्याला बायको दिसत नाही . तसले प्रकार आपल्याला करायचे नाहीत . हे मी आधीच सांगून ठेवते . कारण  मला जस बघायचं आहे ते म्हणजे ,आपण असं म्हणू “सस्यश्यामला भूमी हि भारत माता अशी सुंदर नटली पाहिजे “. जे दुसऱ्या देशानं मध्ये होतंय ते आपल्याला करायचं नाही . आपल्या देशानं मध्ये अत्यंत सुज्ञ ,सुविद्य ,सुशील असे लोक आपल्याला निर्माण करायचे आहेत . साऱ्या जगातले लोक तुम्हाला बघायला येतील . आता ते लोक सुद्धा तुम्हाला इतक्या हेनी भेटायला आले , त्यांना  इतकी नम्रता आहे ,त्यांना वाटलं कि तुम्ही एव्हडे सगळे साधुसंतच आहात . आणि भारतात जन्माला आले . आणि त्यांनी असं पुस्तकात वाचल कि ज्यांनी पुष्कळ अनंत जन्माचं पुण्य केलं असेल म्हणून ते भारतात इथे  जन्माला येतात .तेव्हा  ते म्हणतात कि हे आत्म्याला संतुष्ट करणारे लोक आहेत . आता काय सांगायचं त्यांना . कसे आहोत आपण ते आपल्यालाच माहित ,ते आपल्यातच ठेवलेलं बर . 

तेव्हा जी आपली स्तिती आहे ती जाणून ,जी आहे त्या पेक्षा वाईट स्तितीत आपल्याला जायचं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे . आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचारा . आणि मग मी गेल्या नंतर कुजबुज करायची नाही मागे . हे असं झालं आणि माताजी असं का बोलल्या आणि तस झालं . आता काय ते माझ्या समोर विचार तुम्ही आणि मी आत्ता उत्तर देते तुम्हाला . 

तोंडा मध्ये तंबाकू ठेऊन नुसत्या वाऱ्या केल्या म्हणजे कुणी धार्मिक माणूस होत नाही . आणि त्यात तंबाकूने कँसर झाला कि मग माताजी आठवतात . विठ्लानी काय सांगितलं तुम्हाला तंबाकू खा .?उलट विट्ठलाच्या अगदी विरोधात तंबाकू आहे तुम्हाला माहिती नाही ,राक्षशीण आहे हि ,अगदी राक्षशीण आहे हि तुमचा जीव घेऊन बसेल . तिला पण कस सोडवायचं ते माहित आहे मला पण आत्ता तुम्हाला सांगत नाही नाहीतर अर्धे लोक उठून जातील . ते आम्ही सोडवू . तुम्ही ते सोडून द्यायचं आमच्यावर . नाहीतर अर्धे लोक आताच उठून जातील कि माताजी तंबाकू खायचं सोडवतात तर आता आम्ही काय खायचं ?. बाकी काय खायचं नाही फक्त तंबाकूच खायची का . तस नाही ते आम्ही सोडवू ,  ते प्रेमानी निघून जाईल . 

आता पहिल्यांदा सगळे जण डोळे मिटा , आणि हा विचार करा कि परमेश्वर हा प्रेमाचा सागर आहे ,तो दयेचा सागर आहे ,तो क्षमेचा सागर आहे . तेव्हा माझं असं चुकलं ,मी असं नाही करायला पाहिजे होत ,तस करायला नको होत ,मी उगीचच हे करतो ,ते करतो ,असं झालं ,तस झालं हे आपण जे रात्रंदिवस आपल्याला म्हणत असतो ते आधी बंद करायचं . मी कोणचाच दोष केलेला नाही असा विचार करा . तो क्षमेचा सागर आहे तुम्ही अशी कोणती चूक करू शकता कि ज्याला तो क्षमा करू शकत नाही . त्यामुळे मी काही पाप केलं असा विचार असेल तर पहिल्यांदा काढून टाका . कारण आपल्याला परमेश्वराच्या साम्राज्यात जायचं आहे आणि तिथे जाणारी माणस असा विचार करून चालली तर त्यांना कसा प्रवेश मिळेल तिथे . स्वतः बद्दल कोणतीही वाईट कल्पना करून घ्यायची नाही .जे झालं ते झालं ,विसरून जा ,आत्ता आम्ही फक माताजीन समोर बसलो आहोत . असा विचार करून वर्तमानात राहा . अगदी स्वच्छ मनाने बसलो आहोत हा विचार करा . 

आणि परत इथे आता आम्ही माणस पाठवू ते तुम्हाला शिकवतील कि सहजयोग काय आहे ते . आणि जर लवकरच आपल्याला जमीन मिळाली तर पुढल्याच वर्षी आपण सगळं कार्य व्यवस्तीत सुरु करूयात . आणि तुमच्यासाठी ते फार सुंदर सहजयोगाचं कार्य होईल . याच्या मध्ये सर्व विश्वाचा धर्म सामावलेला आहे . यात माणसाची अशी एक विशेष जात म्हणा किंवा ,विशेष अशी उच्च श्रेणी ,उच्च विचारांची ,उच्च कोटीची अशी एक नवीन संस्थाच आपल्याला स्थापन करायची आहे . आणि ती ह्या तुमच्या गावामध्ये इथे आता लोकांचं असं म्हणणं आहे कि फारच वाईट परिस्थिती आहे ,पण तुम्ही सगळ्या जगाला दाखवू शकता कि कितीही वाईट परिस्थिती असली तरी परमेश्वरच खर दर्शन झालं तर त्या दर्शना मुले तुम्हाला किती लाभ होऊ शकतो . तुम्हाला सगळ्यांना अनंत आशीर्वाद . 

आता याचे लाभ लगेच व्हायला लागतील , त्याला वेळ लागणार नाही . पण तरी सुध्दा खरे लाभ जे आहेत ते नंतर आम्ही एका वर्षातच सगळ्या स्कीम सुरु करू तेव्हा तुम्हाला कळतील . कारण जमीन मिळाल्या शिवाय आम्ही काही करू शकत नाही . एकच प्रार्थना करायची कि आम्हाला हि जमीन लवकर मिळूदे . आणि एकदा का जमीन मिळाली कि मग लगेच कार्याला सुरवात होईल . बर आता मी येते सकाळ पासून कामातच होते तरी सुध्दा मला वाटलं कि आज भेटलंच पाहिजे तुम्हाला . हि भेट झाली फार छान झालं . तर मी परत येईन ,सर्व प्रथम मात्र आता   तुम्ही सहजयोग बसवून घेतला पाहिजे . हे लोक येतील तुमच्या कडे ,सहजयोग समजावून सांगतील ,सगळ्यांनी भेटायचं . बी ला जस अंकुर फुटाव तस आता झालेलं आहे . त्याचा वृक्ष झाला पाहिजे आता . म्हणजे बघा तुम्ही काही आता सर्वसाधारण अशी माणस नाहीत . परदेशात मला जर अशी जागृती द्यायची असली तर निदान एक तास तरी नुसती कुंडलिनी उचलावी लागते . आणि तुम्ही किती सहज पार झालात बघा , किती सुपीक जमीन आहे आपली . आता हेच्या नंतर मेहनत करायला पाहिजे खरी . हि लोक सगळं समजावून सांगतील . कुणी कुर बुर सुरु केली तर त्याच तोंड बंद करा . तुम्ही आमचं काय भलं केलं ?. तुम्ही आम्हाला सांगू नका . असं म्हणायचं . नेहमीच सगळ्या संतसाधुना त्रास दिला आणि भामट्यांचं राज्य पसरवलेलं आहे . तेव्हा अशा लोकांचं काही ऐकायचं नाही . कळलं का ?. अनंत आशीर्वाद .