Public Program

Sonai (India)

1985-01-21 Public Program Marathi, Sonai India DP-RAW, 47'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Public Program, Sonai (India), January 21st, 1985

सोनाईचे सहजयोगी तसेच सोनाईचे भक्त लोक, सत्याला शोधणारे सर्व जीव, सर्वांना आमचा नमस्कार. सहजयोग आज आलेला आहे अशातली गोष्ट नाही, अनादी काळापासून सहज योगाची क्रिया घडत आहे. रामचंद्राच्या वेळेला राजा जनकानी नचिकेतला आत्मबोध दिला असे म्हणतात, त्यानंतर इंद्राला सुध्दा आत्मबोध घ्यावा लागला. म्हणजे जोपर्यंत आपल्या आत्म्याचा बोध आपल्याला होत नाही, तोपर्यंत आपण अर्धवट आहोत. बुद्धासुद्धा जेंव्हा एक राजपुत्र म्हणुन जन्माला आले, तेंव्हा त्यांच्या लक्षात अशी गोष्ट आली की मानवाचा जीव, मानवाचे आयुष्य हे अपूरे आहे. त्याची बुद्धी ही अपूरी पडते. म्हणून काहीतरी ह्याच्या पलीकडे असले पाहिजे, ज्याच्यामध्ये सुख आहे, ज्यांच्यामध्ये आनंद आहे आणि तो आनंद म्हणजे कधीही संपत नाही. असा कधीही न संपणारा आनंद कुठेतरी असलाच पाहिजे, अशा शोधात बुद्धसुद्धा फिरले आणि  शेवटी एक दिवशी ते असे एका झाडाखाली आरामात पडले होते थकून – त्या वेळेला सहजच त्यांची कुंडलिनी जागृत होऊन त्यांना आत्मबोध झाला. अशाप्रकारे आपल्या देशात अनेक लोकांचा आत्मबोध झालेला आहे. तसेच पुष्कळांना जन्मत:च हा आत्मबोध मिळालेला सुध्दा असतो. पण तरीसुद्धा असे साधुसंत फार कमी झाले. अशी फार अवतरण कमी झालेली आहेत आणि त्यामुळे लोकांना असे वाटते की हे काही आपल्या ह्याचे नाही, हे जनसाधारणासाठी नाही. पण आजचा सहजयोग हा समजोंमुख आहे. समाजाकडे लक्ष आहे. कारण ही जी क्रिया आहे ती पूर्वी एक दोन लोकांनाच साध्य होती आणि जे एक दोन लोकच म्हणवून मोठ्या पदाला पोहोचत असत ते आज सगळ्यांना उपलब्ध झाले पाहिजे अशी मला लहानपापासून इच्छा होती आणि म्हणून ती कशी उपलब्ध करून द्यायची, त्याच्यामध्ये काय लोकांना त्रास आहे, कशामुळे लोकांना ही मिळत नाही, ही ज्ञानाची गुरुकिल्ली का मिळत नाही याचा मी बराच विचार केला आणि त्यानंतर माझ्या वयाच्या ४७ व्या वर्षी मला कळले की ह्या लोकांच्या मध्ये किती तऱ्हे तऱ्हेचे प्रकार आहेत. त्याला कारण असे आहे की मनुष्य हा त्रिविध दृष्टीनी बांधलेला आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे तामसिक प्रवृत्तीचा एक मनुष्य असतो. दुसरा म्हणजे राजासिक प्रवृत्तीचा असतो आणि तिसरा म्हणजे सात्विक. सात्विक माणसाला चटकन कळते की कोण गुरू आहे, कोण खरा आहे, कोण खोटा आहे. तो सरळ मध्यमार्गी असतो. कोणत्याही अतिशयतेला नाही जात. एक्स्ट्रीमला नाही जात. मध्यमार्गी असतो, सगळ्यांवर प्रेम करणारा असतो आणि अत्यंत नम्र असतो. अशी माणसे फार कमी असतात. म्हणजे दोन तऱ्हेची माणसं सांगितली आहेत की एक मनुष्य असतो, त्याला असे म्हणता येईल की तो तामसिक आहे. आता तामसिक मनुष्य जो असतो त्याला खर खोटं तर कळतच नाही, म्हणजे खोटं असत त्याच्या मागे धावतो. म्हणजे जी गोष्ट खोटी आहे त्याच्यामागे धावायची. आपल्या हिंदुस्थानात मला वाटते बहुतेक लोक तामसिक प्रवृत्तीचे आहेत. राजासिक प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते पाश्चिमात्य देशांत आहेत आणि पाश्चिमात्य देशातल्या लोकांची जी स्तिथी आहे ती राजसिक लोकांची असते की त्यांना चांगले आणि वाईट समजत नाही. दोन्हीही चांगले. त्यांच्या मते वाईटही चांगले आणि चांगलेही चांगले. अशा संभ्रांत स्तिथीत राहतात. त्याच्यामध्ये संभ्रांतता येते. म्हणजे चांगले काय आणि वाईट काय हेच ज्या माणसाला समजत नाही, त्याच भलं कसं होणार ? आणि ज्याला समजतं की हे वाईट आहे, पण तरीसुद्धा वाईटाकडे ते जातात. असे जे लोक आहेत ते तामसिक असतात. आता आपल्याला कोणीही असे म्हणणार नाही हिंदुस्थानात की दारू पिणे चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण दारू पितात. कारण काय की जरी कळतंय की वाईट आहे, तरी त्या वाईट मार्गाला जाऊन आपण नुकसान करून घेतो. पण परदेशामध्ये जर गेलं तर ते म्हणतात की त्याच्यात काय वाईट? दारू प्याल तर काय वाईट? चोऱ्या केल्या तर काय वाईट? खोटं बोलले तर काय वाईट? म्हणजे त्यांना त्याच्यातल वाईट सुध्दा दिसत नाही. म्हणजे दोन्ही दशा चांगल्या नाहीत. पण तामसिक लोकांचा सगळ्यात मोठा असा त्रास असतो की जे लोक दांभिक असतात, खोटे असतात, फसवतात, त्यांच्याकडे पहिल्यांदा लक्ष जातं. जे खरे लोक असतात, तिकडे जात नाही. तेंव्हा याला उत्तर काय? याला तोड काय? लोकांना अशा भ्रामकतेतून कसे काढायचे? या अंधारातून कसे काढायचे? म्हणजे तामसिक मनुष्य जसा घाणेचा बैल असतो, तसा बांधलेला असतो आणि त्याला झापड असते आणि तो सारखा गोल गोल फिरत असतो. जे करायचं तेच करत राहायचं. सारखं असं करत राहायचं. आता वारकरी मंडळींच सांगितलं तर मी सांगते की सबंध ज्ञानेश्वरी वाचून काढली, पण कुठेही लिहिले नाही की वाऱ्या करा, कुठेही लिहिले नाही की दिंड्या घाला – कुठेही. पण हे कसे काय सुरू झाले ते देवाला माहीत. बरं तो एक मार्ग आहे – भक्तीचा. पण तो जो अतीशय आपण करतो की तोंडामध्ये तंबाखू भरायची आणि तासन् तास वारकरी म्हणून फिरायच. त्यांची स्थिती पाहिली तर रडायला येतं. अगदी पाप्याची पीतर असावी तशी अगदी सगळी आजारी – सगळ्यांना कॅन्सर झालेला, नाहीतर काहीतर क्षयरोग झालेला आणि म्हणे आम्ही वारकरी. असे कसे होईल? जर तुम्ही वारकरी आहात, तुम्ही जर त्या कृष्णाच्या देवळात जाता तर तो कृष्ण साक्षात धन्वंतरी आहे. त्याच्या कृपेने अनेक रोग बरे होऊ शकतात. तेंव्हा तुम्ही इतके रागिष्ट कसे? तुमच्या जवळ एक पैसा नाही, दमडी नाही, फक्त तुम्ही ओरडत ओरडत परमेश्वराच्या नावाने तिथे जाता, मग तुम्हाला असे नुकसान का होते? कोणीही विचारेल. कोणीही बाहेरचा मनुष्य विचारेल अहो हे भक्त तर यांचे चेहरे बघा तर कसे दिसतात? असे कसे होऊ शकते? त्याला कारण असे आहे की ते रस्ता चुकले आहेत. भक्ती हा मार्ग आहे. ते काही ध्येय नव्हे. जर ध्येय तुमचे भक्ती असती तर त्याला मार्ग म्हटल नसत, आणि भक्त तो अभक्त नाही, जो विभक्त नाही, जो परमेश्वरापासून वेगळा नाही तोच भक्त आहे. 

पण हे जे आपण काढले आहे टूम अशी की आता तिथे जायच, टाळ कुटत फिरायच आणि एकेक महिना तिथे जाऊन शेवटी मग लोकांची डोकी फुटतात. त्याचा काहीही फायदा झालेला आपल्याला दिसत नाही, तेव्हा मी आई आहे तुमची, मी तुम्हाला सांगते, थोडासा विचार केला पाहिजे की हा मार्ग आपण अतिशयतेत घातला. अतिशय करून टाकलय त्याच. उपाशी तापाशी कसे करून. परमेश्वराने तुम्हाला कधी उपास करायला सांगितलेला नाही परमेश्वराच्या नावाने उपास करायला नको. त्यांनी सांगितल की तुम्ही आनंदात राहा. सारी सृष्टी मी तुमच्यासाठी केलेली आहे. बघा कृष्णाच्या आयुष्यातच त्यांनी सगळ्यांना लीला सांगितली आहे. सगळी लिला हा खेळ आहे. तो कसा रास आणि सगळी सुंदर लीला रचायचा – लहानपणी सुद्धा त्याने सगळे खेळ रचले होते. तो काय तुम्हाला सांगेल का उपाशी मरा म्हणून. आणि तसेच आपल्या देशात लोक उपाशी मरत आहेत. पण उपास केला पाहिजे. मग आपल्या जीवाचे हाल केले पाहिजे हे कुणी तुम्हाला सांगितले आहे मला समजत नाही. बरं ज्यांनी सांगितले ते मात्र गबर आहेत. तुम्हाला सांगतात उपास करा आणि पैसे खिशात. तेंव्हा आपली जी बुद्धी आहे, तिला थोडेसे उघडले पाहिजे आणि विचार केला पाहिजे की आजपर्यंत आम्ही घाण्याच्या बैलासारखे जे चाललेलो होतो त्याच्यात काही ठीक आहे की त्याच्या पलिकडे काही आहे किंवा नाही, असातरी विचार मनामध्ये घेतलाच पाहिजे, त्या शिवाय आपल्या देशाचं भलं होणार नाही. उलट प्रत्येक गोष्टीमध्ये आपली दृष्टी इतकी कोती झालेली आहे की त्याला कसं बदलायच हेच मला समजत नाही. जातीपातीचे एक भांडण आपण घेऊन बसतो की ह्याची जात ही, त्याची जात ही. अहो तुमची जात म्हणजे तीनच आहे – एक म्हणजे तामसिक, नाहीतर राजसिक, नाहीतर सात्विक. तुम्हाला चौथी जात नाही, आणि जी चौथी जात आहे ती ह्याच्या पलिकडे ज्याला गुणातीत म्हणतात. आत्म्याचे दर्शन झाले आहे. आता ज्ञानश्वरांचे सांगितले, त्यांनी ज्ञानेश्वरांनी दिंड्या घालायला सांगितल्या. पण काय सांगितल? त्यांनी जी भविष्यवाणी केली आहे ती फार सुंदर पसायदान म्हणून. तुम्ही वाचल असेल की त्याच्या मध्ये काय आहे की तुम्हाला एक दान मिळायला पाहिजे – आत्म्याचे. जेव्हा ते ज्ञान मिळेल, त्यांनी फार सुंदर शब्द वापरलेला आहे की स्वधर्म सूर्य विश्व पाहो.  

स्वधर्म हा शब्द शिवाजी महाराजांनी सुद्धा वापरला होता. कारण ते पार मनुष्य होते. तेही मोठे होते. त्यांनी सांगितले की स्वधर्म ओळखावा. स्व म्हणजे काय? स्व म्हणजे तुमचा आत्मा. त्याचा धर्म घेतला पाहिजे. तो विश्वात एकीकडे सगळीकडे एकसारखा आहे. तत्वांमध्ये सर्व धर्मांनी सांगितले आहे – सर्व धर्मांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की आपल्या आत्म्यामध्ये तुमचा जन्म झाला पाहिजे. परत तुमचा जन्म झाला पाहिजे. तुमची जी आज स्थिती आहे त्याच्यापेक्षा तुमचा जन्म आत्म्यामध्ये झाला पाहिजे. त्याच्या प्रकशात झाला पाहिजे असे सर्व धर्मानी सांगितले आहे. सर्व विश्वात सांगितलेले आहे. पण ज्ञानेश्वरांनी साध्या मराठी भाषेमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की असं झालं पाहिजे. दुरितांचे तिमिर जावो – दुरीत कोण ते? दुरित कोण आहे? जे तामसिक लोक आहेत त्यांना तिमिर म्हणजे त्यांचा अंधार गेला पाहिजे, अशी त्यांनी प्रार्थना केली आहे परमेश्वराला. विश्वात्मके – विश्वाचा जो आत्मा त्यांनी ऐकावे. तोषावे. मी जे सगळं यज्ञ केले आहे वाणीचे ते ऐकावे आणि हे प्रभू तू या लोकांचे जे तीमिर आहे, ह्यांचे जे अंधार आहे ते तू दूर कर आणि परत म्हटले आहे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे जे खळ आहेत म्हणजे जे दुष्ट आहेत, त्यांनी आम्हाला जो हा त्रास दिलेला आहे ती सांडो, ती निघून गेली पाहिजे. खळांची व्यंकटी सांडो. तसे आपले काय झालेले आहे आपण खळांच्याच मागे लागलेलो आहोत. एखादा भामटा जर जेलमधून आला आणि त्यांनी जर गेरवे वस्त्र घातले, झाले सगळे त्याच्या पायावर. 

आता ही झाली जुन्या लोकांची पद्धत. रूढी. कोणचीही रूढी असली तरी ती मेलेली रूढी असली तर तिचा गळ्याला गळफास घातला नाही पाहिजे. तसेच जातीच्या बाबतीत आहे की आमची जात. ही जात, ती जात. जातीतच लग्न करायचं. अहो पण उद्या तुमच्या मुलीला कोणी छळल तर तुमची जात उभी राहते का तुमच्याबरोबर. त्यासाठी तुम्ही हुंडा देणार, तुम्ही हे करणार, त्या जातीसाठी तुम्ही दुनिया भरच्या गोष्टी करणार. पण त्या जर मुलीचे हाल झाले तर तुमची जात उभी राहते का की ह्याला वाळीत टाका. उलट त्या मुलीला मारून त्यांनी घरातून काढली की आपली मुलगी त्याच्याकडे राहाते. ही तामसिक वृत्ती आपल्यामध्ये आहे की जे खोटं, जे चुकीचे, तिथे चिकटायचे. मग मार खायचे. मार खाल्ले म्हणजे मग परमेश्वराला दोष लावत बसायचे. पण जे ठीक आहे, ते आपण घ्यायला तयार नाही. आपल्या समाजामध्ये फार जागृती करायची गरज आहे आणि ती फक्त सहजयोगामुळे होऊ शकते. दुसरं कशानेही होऊ शकत नाही. मी पाहिले आहे पुष्कळ लोक लेक्चर देताना पुष्कळदा की जात पात कुछ नहीं .. असं तसं..पण जेव्हा स्वतःच्या मुलाची गोष्ट येईल तर येवढा मला हुंडा पाहिजे, येवढा मला पैसा पाहिजे. त्याला कारण असं की त्याच्या आत्म्याचा प्रकाश अजून त्यांच्यामध्ये आलेला नाही. एकदा आत्म्याचा प्रकाश आला म्हणजे आत बाहेर एक होऊन जातं. मनुष्य बाहेर आणि आत दोन गोष्टी करू शकत नाही. त्या प्रकाशात आपणाला यायला पाहिजे. बर तो आत्मा आपल्या सर्वामध्ये आहे. तो असा नाही की एकामध्ये आहे आणि एकामध्ये नाही. सगळ्यांमध्ये आहे. परमेश्वराने सगळ्यांमध्ये हा आत्मा ठेवला आहे. आणि आता आपण जे म्हणतात की आपण एका जानावरांपासून मनुष्य झालो. 

आता मानवापासून हा अती मानव होण्याचा मार्ग अत्यंत  सहज आणि सुलभ आहे. रामदास स्वामींना एकदा विचारलं की का  बुवा किती वेळ लागतो, त्यांनी सांगितले तत्क्षण. तेंव्हाच झालं पाहिजे. पण माणसामध्ये तेवढी नम्रता पाहिजे. आपल्यामध्ये नम्रता नाही. तसं पाहिलं तर मला आश्चर्य वाटते की परदेशातल्या लोकांना की जे इतक्या नरकात राहतात, त्यांना एवढा अहंकार असायला पाहिजे, त्यांच्यामध्ये जास्त नम्रता आहे. आपल्या इथल्या लोकांना फिकर नाही कितीही सांगितलं तरी ते डोक्यात येत नाही. आता मागच्या वेळेला आपल्याला माहीत आहे की इथे केवढी गर्दी झाली होती. इथे पाय ठेवायला जागा नव्हती. आज कबूल, अचानक झालं . बरं झाल कमी लोकं आहेत. कारण त्या वेळेला केवढे लोक आले होते. त्यातले किती लोक हाती लागले. त्यांनी लक्षच दिलं नाही. त्यांना त्यांच्या आत्म्याची जागृती करुन सुध्दा वाया गेल. जसं एखादं एखाद्या वेळेला एका शेतकरी निघाला, त्याने अशीच काही बिय पेरली आणि ती वाऱ्यावर उडून जावी तशी ती उडून गेली. किंवा ती खडकावर पडली तर ती ही बेकार जाणार. त्याला सुपीक जमीन पाहिजे. आशा आहे मला आज की तुमच्यामध्ये आज जी मंडळी आली आहेत ती खरीच भक्त मंडळी आहेत आणि समजदार आणि शहाणी मंडळी आहेत की तुम्हाला जे आज मिळेल त्यातन तुमचा आत्मा जागृत होऊ देत. त्याच्याशिवाय तुम्हाला काही फायदा होणार नाही. सर्व प्रथम जेंव्हा कुंडलिनीच जागरण होतं तेंव्हा तुमच्या तब्येती ठीक होतात, तुमच्या प्रकृती ठीक होतात. तुमच्या चेहऱ्यावर कांती येते. तुमचं वय कितीही असले तरी, ते मग, त्याच्यामध्ये तरतरी येते. शरीरामध्ये एक तऱ्हेचे अं चैतन्य येते आणि मग मनुष्य त्याला अत्यंत अं.. हलक वाटू लागत की काही शरीरावर बोजा नाही. दुसरं म्हणजे त्याची तब्येत अशी चांगली होऊन जाते की तो दुसऱ्यांनाही ठीक करू शकतो. दुसऱ्यांचेही भलं करू शकतो. दुसऱ्यांचेही रोग हरण करू शकतो. हे सुध्दा अगदी होता होत….आता हे धुमाळ साहेब आहेत, त्यांनी इथे कितीतरी लोकांना बरं केलं. पण शेवटी मग ह्यांनी करायचं सोडलं की लोक नुसतं बरंच व्हायला यायचे. दुसरं काही त्यांना मतलबच नाही. म्हणजे नुसतं मला बरं करा या पलीकडे त्यांना आणि काही विचारच नव्हता. म्हणून यांनी सोडलं की आता मी लोकांना बरं करत नाही, इतक्या लोकांना मी बरं केलं, ते काही कामातन गेले, बेकार लोक आहेत. 

त्यांच्यावरती कशाला परमेश्वराची कृपा करायची. ज्यांनी परमेश्वराची श्रद्धाच नाही अशा लोकांना ठीक करून तरी काय फायदा? असे आणखीन दहा ठीक झाले तर काय फायदा? दुसरं म्हणजे आपलं लक्ष ठीक नसतं. आता कुणी एक आलं की लागले बघायला तिकडे. लक्ष एकीकडे.. एकाग्रता नाही आपल्याला. अगदी एकाग्रता नाही. सारखं चित्त इकडे तिकडे. जरासा काही आवाज झाला की आपलं इकडे तिकडे चित्त जात. पूर्वीच्या काळच्या लोकांचं चित्त पुष्कळ एकाग्र होतं. आता आपलं चित्त इकडे तिकडे फिरायला लागलं . ते चित्त एकाग्र असल तर पटकन होतं. पण तस होत नाही. जेंव्हा तुम्हाला कुंडलिनीच जागरण होतं त्याच्यानंतर तुमचं चित्त एकाग्र होत. अभ्यासात प्रगती होते, प्रत्येक गोष्ट आकलन करण्याची शक्ती येते. अनेक कामं तुम्ही करू शकता आणि तुम्हाला थकवा येत नाही. तिसरं म्हणजे तुमच्या मनाची अगदी शुद्धता येते. मन शुध्द होऊन जातं. दुसऱ्यांच्या विरूद्ध आपण रात्रंदिवस काही ना काहीतरी उलाढाली करत असतो. उचापात्या करत असतो. ते सगळ जाऊन मन अगदी शांत होऊन आपण सगळ्यांना क्षमा करून टाकतो. तसच आपल्यामध्ये धर्म जागृत होतो. सांगाव लागत नाही की हे करू नका ते करू नका. ती जागृती होते. आता तुम्हीच बघा ज्ञानेश्वराना काही सांगाव लागायचं का की काही वाईट काम करू नका. ते करतच नसतं, कारण त्यांच्यात धर्म स्वतः जागृत होता. जेंव्हा तुमच्यात धर्म जागृत होईल तेंव्हा तुम्हीही कोणतीही वाईट कामं करणार नाही. कारण आत्म्याचा प्रकाश आल्यावर हे दिसतं की हे वाईट की हे चांगल. ते मन्युष धरू शकतो कारण तो समर्थ होतो. समर्थ म्हणजे तुमचा जो अर्थ आहे तो तुम्हाला लागतो. तुमचा अर्थ म्हणजे तुम्ही आत्मा आहात आणि तुम्ही आत्मा होता. 

तो शुध्द आत्मा एकदा जर जागृत झाला तर तो सगळ ह्याला शुध्द करत जातो. फक्त पूर्वीच्या  सहजयोगात आणि आजच्या सहजयोगात एक फरक आहे तो असा की पूर्वीच्या काळी आधी स्वच्छता करत असतं. त्यांना सांगायचे तुम्ही आधी नामस्मरण करा, हे करा, ते करा. त्यांनी तुमची आम्ही स्वच्छ्ता करतो. आणि स्वच्छ्ता करून मग जागृती करत असतं. पण आजच्या सहजयोगमध्ये तशी प्रथा नाही. आजच्या सहजयोगामध्ये आधी आम्ही तुमची जागृती करणार. म्हणजे जसा एखादा कंदील आहे, त्याला पेटवायच असल तर आधी कंदील पेटवून घेतला आणि त्या प्रकाशात पाहिलं की कंदील किती घाणेरडा आहे, त्याला किती स्वच्छ करायला पाहिजे. पण कंदील स्वतः च स्वतःला स्वच्छ करतो. म्हणजे तुम्ही स्वतः लाच स्वच्छ करता. तुम्हीच स्वतःचे गुरू होता. आणि तुम्ही स्वतःचे गुरू झाल्यामुळे काहीही मला सांगायला लागत नाही. तुम्ही स्वतःलाच स्वच्छ करता. पण ही इतकी गहन वस्तू आहे आणि ती आपल्याला हरपल्यासारखी आहे. आश्र्चर्य असं वाटतं की आपण कोणच्या गटांगळ्या कुठल्या ह्याच्यात गटांगळ्या खातो आहे आणि कधी आपल्याला मिळवू की हा तुमचा वारसा आहे, ह्या देशाचं वारसा आहे. हा परदेशाचा वारसा नाही. हेच तुम्ही त्यांना द्यायचे आहे. तिथे जसं एखादं झाड वाढव तसे सगळे वाढलेले आहे. पण त्यांनी अजून आपली मुळं शोधून काढलेली नाही. मुळं आपल्या देशामध्येच आहे. ह्या देशामध्येच हे सगळ काही झालेलं आहे. ह्या देशांतूनच आपण त्यांना मुलभूत सगळं देणार आहोत. आणि इथले लोक आहेत की त्यांना त्याची काही खबरच नाही, त्यांना काही माहितीच नाही की ते या केवढ्या मोठ्या योगभुमीत, भारतभूमीत, विशेष करून या महाराष्ट्रात, या पुण्यभूमीत जन्माला आले आहेत. ही कुंडलिनी जागरण करणं फार सोपं काम असल तरी सुध्दा तीचा वृक्ष तयार करण ह्याला थोडीशी मेहनत लागते. तर ज्याला आम्ही म्हणतो की पार होणें किंवा आत्मसाक्षात्कार होणें, हे घटीत झाल्यावरती मग ते बसवाव लागत. आणि त्या बसण्याच्या वेळेला लोक काळजी घेत नाही. तसं पाहिलं तर प्रत्येक माणसातून एक मोठा मोठा गुरू होऊ शकतो. प्रत्येक माणसाला अत्यंत लाभ होऊ शकतो. त्याला पैशाचाही लाभ होतो कारण लक्ष्मी तत्व जागृत झाल्याबरोबर त्याच सगळ ठीक होतं. 

कृष्णाने असं सांगितलं की योग क्षेम व्यहामह. तुमचा आधी योग झाला तरच क्षेम होईल. त्यांनी क्षेम नाही सांगितला की तुमचा मी क्षेम वहन करीन. त्यांनी हे नाही सांगितलं की क्षेम करून मग योग करा. त्यांनी सांगितलं की आधी योग घ्या. मग त्याच्या नंतर तुमचं क्षेम होईल, तुमचं भलं होईल. पण तस आपण करत नाही. आपल्याला आधी भलं पाहिजे. पण तसं होत नाही. आणि म्हणूनच या देशात जरी आपण येवढ्या योगभुमिवर बसलो आहोत, जरी आपली ही पूर्वसुकृत फार पुण्याई आहे म्हणून या देशात आपण जन्माला आलो, तरीसुद्धा आपण जो आत्मबोध आहे तो घेतलेला नाही, त्याच्याच मुळे ही सर्व दुर्दशा आहे. ज्या दिवशी आपल्याला हो आत्मबोध होईल, त्याच्यात रमू, तेंव्हा सर्व दृष्टीने सर्वांचे कल्याण होणार आहे आणि सर्व मानव जातीचा हाच आता एकच उत्तम मार्ग त्यांच्या ध्येयासाठी आहे. दुसरं काहीही त्याला करायचं नाही. आत्मबोध हा झालाच पाहिजे. ज्या आत्म्याचा आत्मबोध झाला नाही, त्याचं आयुष्य पशू सारखं आहे. तो पशू सारखा जीवंत राहतो आणि पशू सारखा मरतो. आणि पुष्कळसे लोक नर्क गतीला जाणार. तेंव्हा कृपा करून ह्याला, तुमच्याकडे मी आले त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा अधिकारी नाही. तुम्ही अधिकारी आहात म्हणून आलात. पण ते दिसायला इतकं स्वस्त वाटतं तसं नाहीये. मी जरी इथे आले आहे ती तुमची पुण्याई बघून. तेंव्हा त्याला तुम्ही स्वीकारावं आणि ते आत्मसात करून आत्मा काय आहे, त्याच्यापासून कसा सच्चीदानंद स्वरूप तो आहे, त्याच्यापासून आपल्याला कसे फायदे होतील आणि दुसऱ्यांना कसे फायदे होतील ते समजून घेतलं पाहिजे. असो, आज कमी मंडळी असली तरी काही हरकत नाही. उलट कमी मंडळी असली म्हणजे  काम बरं होतं असं मी पाहिलेले आहे. तेंव्हा तुम्ही सर्वांनी आता इतक्यानी ऐकून घेतलेले आहे. 

आता आत्मबोधाचा मी थोडासा अनुभव देण्याचा प्रयत्न करते. पण तुम्हाला काय प्रश्न असले तर विचारा. पण जास्त विचारू नका. एक दोनच विचारा. तर कुणाला प्रश्न नसेल तर फार छान गोष्ट आहे. डावा हात असा माझ्याकडे करायचा. सरळ…असा डावा हात करायचा ….. आणि उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा. …..कळलं का…डावा हात असा माझ्याकडे आणि उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा. आता हे असं का करतो हे मी नंतर समजावून सांगेन. पण मी जसं म्हणते तसे करा. मुलांनी शांतपणे बसा. मागेपुढे बघू नये, स्वतः ला बघा. मुलांना पटकन होतंय.  पण शांतपणा पाहिजे मुलांना आणि स्थैर्य पाहिजे. थोडेसं स्थैर्य धरा, थोडीशी शिस्त ठेवा म्हणजे होईल. डावा हात असा साधारण मांडीवर ठेवा, इकडे तिकडे नको. आणि उजवा हात असा..पृथ्वीवर .. असा साइडला… म्हणजे तुम्हाला काही त्रास नाही वाटला पाहिजे. सहज आपलं बसतो तसं बसायच. सहजासनात. सहजासनात पाय अखडायचे नाहीत. सहजासनात पाय उघडे करून बसायचे. …… आता डाव्या हाताकडे लक्ष ठेवा… डाव्या हातामध्ये .. ही बोटं जी आहेत ती अशी बरोबर उघडली पाहिजे. अशी आवळून नाही धरायची किंवा अशी दाबून नाही धरायची. अशी सरळ ठेवा. …….. आता लक्ष इथे टाळूकडे ठेवायचे. इथून कुंडलिनी निघते. टाळूकडे लक्ष पण डोळे वर फिरवायचेत. नुसतं लक्ष ठेवायचे आणि डोळे मिटायचे. आता डोळे मिटा. फक्त डोळे मिटायचे आणि काही करायचं नाही. टाळू कडे लक्ष ठेऊन डोळे मिटायचे. जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. ……. डोळे बंद ठेवा. आता हे बघा की डाव्या हातात गार गार येतंय का. काहीतरी हातामध्ये गार गार वाटतंय का. डोळे नका उघडू. तुम्हाला त्याची प्रचिती येईल, अनुभव येईल की हातामध्ये काहीतरी गार गार गार गार येत आहे. ….. लक्ष स्वतः कडे, दुसऱ्याकडे नाही ठेवायचे.  …… येतंय  ….  असे वाटेल की काहीतरी गार गार असं हातात येत आहे.  …… वाटत आहे? बघा. आता हा अनुभव खरा आहे. ……. आता उजवा हात माझ्याकडे करा. दोन्ही हात. डोळे बंद ठेवा. ……. आता बघा दोन्ही हातात येतय का? ……… मुलांनी हसायचं नाही. सभ्य पणाने बसायचं. तुमचा फायदा होणार आहे त्याच्यात. थोडी शिस्त पाहिजे. बघा आता दोन्ही हात माझ्याकडे करून बघा की हातामध्ये गार येतय का दोन्ही हातात. मागे येतंय का?    (हो) मागच्या लोकांना?  (येतं येतं) मुलांनी नाही सांगायचं. तुम्हाला येतंय का? मागे…. बरं.  आता हा उजवा हात टाळूवर… आता डोळे उघडा. न विचार करता ना माझ्याकडे बघा. उजवा हात असा टाळूवर जरा अधांतरी धरा. डोक्यावर थोडासा.. एक चार पाच इंच.. बघा आता.. लक्ष इथ टाळूकडे. बघा. गार येतंय का तुमच्या डोक्यातन की गरम येतंय. …. येतंय.  (गार येतंय गार) गार येऊन राहिलय. मुलांचं तर फाटकन होतं. पण बाकीच्या लोकांनी बघायचं … डावा हात माझ्याकडे, उजव्या हाताने बघा, उजव्या हाताने …. येतंय?…. (गार येतंय) आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डाव्या हाताने बघा. बघा येतंय का? (येत येतं येतं). परत डावा हात माझ्याकडे करा, परत उजव्या हाताने बघायचं……… आता दोन्ही हात खाली करून बघा .. येतंय का? ही शक्ती आहे, ही ब्रह्मशक्ती आहे. या शक्तीने सर्व जीवंत कार्य होतात. म्हणजे एका फुलापासन आपण फळं काढू शकत नाही, ती ही शक्ती आहे. म्हणूनच ही शक्ती जेव्हां तुम्ही पाण्याला देता आणि ते पाणी तुम्ही जेंव्हा तुमच्या शेताला देता तेंव्हा त्याच्या शेतामध्ये चार पाच पटीनी  किंवा दहा पटिनी सुध्दा अन्न पिकतं. कारण ही शक्ती सबंध शक्तीचा समन्वय आहे. म्हणून ही शक्ती सर्व सृष्टीत आहे आणि ती आता तुमच्या हातातन वाहू लागली कारण तुम्ही त्याच्याबरोबर एकाकार झालात. ही आत्म्याची शक्ती आहे. आता हात असे करून वर असा प्रश्न विचारायचा मनामध्ये की ही ब्रह्मशक्ती आहे का? अगदी वरती असे डोके करून विचारा – मनामध्ये –  की ही ब्रह्मशक्ति आहे का? ही परमेश्वराची प्रेमाची शक्ती आहे का? हिच ऋतंभराप्रज्ञा आहे का? असे विचारायचं आतमध्ये. वाटतंय गार? हं वाटतंय ना गार गार. (वाटतंय गार गार) मलाही लागतंय. बघा आता असे हात करून. बघा तुम्ही आता निर्विचार आहात. ह्या वेळेला आता काही विचार नाही. म्हणजे निर्विचार समाधी साधून झाली. इतक्या लवकर झालेली आहे ती. आता फक्त निर्विकल्पात उतरायचे आहे आणि निर्विकल्पासाठी फार तर फार एक महिना जर तुम्ही आमच्या सेंटरवर वगैरे रेग्युलरली आलात तर तुम्ही नक्कीच, नियमितपणे जर आलात तर नक्कीच तुम्हाला ही निर्विकल्प स्थिती मिळेल. आता हा चमत्कार, हा चमत्कार आहे की तुमच्याच डोक्यातून असं गार गार निघतय. हा चमत्कार आहे. असे काही करू शकत नाही आपण. काही जरी केलं तरी असं करू शकत नाही. हा चमत्कार कसा घटित झाला. कारण ही जीवंत शक्ती आहे आणि ही जीवंत शक्ती जीवंत कार्य करते. ही काही मेलेली शक्ती नाही. ही जीवंत शक्ती आहे आणि आता तुम्हाला लाभलेली आहे. तेंव्हा तुम्ही कृपा करून ह्या शक्तीचा कसा उपयोग करून घ्यायचा, याचा स्वतः करता कसा उपयोग करून घ्यायचा, दुसऱ्याच्या करता कसा उपयोग करून घ्यायचा ते मात्र तुम्ही शिकून घेतले पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही इथं सेंटरवर यायला पाहिजे. इथं सेंटर कधी असतं? ……. कधी असतं सेंटर? ….. निर्विचारतेत बसा असं. हेचं ध्यान आहे. निर्विचारतेत बसायचं… हं… ( मंगळवारी साडेसहा वाजता असतं)…. कुठे?…….. तुम्ही सांगा. हे सांगतील तुम्हाला कुठे असतं ते.  ….. (दर मंगळवारी) हं (दर मंगळवारी) …. हसू नका. शांत बसा.  (दर मंगळवारी सोनई गावात दिलीप जर्नले याचे घरी संध्याकाळी साडे सहा वाजता सहजयोग सेंटर असतं त्या ठिकाणी आपण) ..कुठे राहतात ते?  (जंदले गल्ली, दिलीप जर्नले .. त्याचं आडनांव. त्यांच्या इथे दर मंळवारी साडेसहा वाजता सहजयोगाचे केंद्र असतं त्या ठिकाणी आपल्याला फोटो, पुस्तकं, आणखीन जे काही आपले प्रश्न असतील, ते तिथे सांगाव, ध्यान कसं करावं ते आपल्याला शिकवतील. याच्या उपर जर काही आपल्याला आणखीन सहजयोगाची माहिती लागत असेल तर आपण हा कार्यक्रम झाल्यानंतर एखादा दिवस जेंव्हा ठरवू तेंव्हा येऊ आणि आपल्याला काही अडचण असल तर योग्य मार्गदर्शन करू.) आता जे आम्हाला झालेलं आहे ते फार मोठं झालंय. ज्यांना नाही झालं त्यांच्यात काहीतरी थोडासा दोष असेल, प्रकृती खराब असेल किंवा काहीं न काहीं थोडा बहुत दोष असेल,  तो त्यांनी काढून टाकावा. ज्यांना झालेले आहे ते अगदीच ठीक आहेत. ज्यांचं नाही झालं असं, त्यांनी सुध्दा लक्षात घेतलं पाहिजे की हे व्हायला हवे. बी ला अंकुर फुटले पाहिजे. जर फुटले नाही तर त्याला अर्थ की बी मध्ये काहीतरी थोडीशी मध्ये अडचण आहे. ती अडचण आपण काढून घेतली पाहिजे. कारण ती अडचण उद्या मोठी होणार आहे. म्हणून कृपा करून ज्यांचं झालेलं आहे त्यांनीसुद्धा आणि नाही झालेलं आहे त्यांनीसुद्धा येऊन इथे भेट घेतली पाहिजे. फोटो घेतले पाहिजेत. पुस्तक घेतले पाहिजे. कुंडलिनी म्हणजे काय ? त्याच्यामध्ये चक्र म्हणजे काय? हे सगळे काही सत्य उघडे करून मी सांगितले आहे. त्याच्यात येवढंसुध्दा लपवून ठेवलेले नाही. ते सगळं शिकून घ्या. त्याशिवाय त्यांच्या इथे मंगळवारी एक एक टेप वाजवली जाते, ती टेप ऐका. त्याच्यामध्ये मी अनेक लेक्चर दिलेले आहेत, मराठी भाषेत, हिंदी भाषेत, इंग्लिश भाषेत. ते ऐकण्यासारखे आहेत. त्याच्यावरून तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतः ची उन्नती करून घ्या. …. पायांना हात लावू नका म्हणावं. (याच्यानंतर ज्यांना दर्शन घ्यायचे आहे त्यांनी पुढे येऊन नमस्कार करावा आणि पुढे चालावे आणि कार्यक्रम संपलेला आहे). पण पायाला हात लावू नका म्हणावं.