Makar Sankranti Puja

Rahuri (India)

Feedback
Share

Makar Sankranti Puja 14th January 1987 Date: Place Rahuri Type Puja

आजचा हा शुभदिवस आहे, आणि या दिवशी आपण लोकांना तिळगूळ देऊन गोड, गोड बोलायला सांगतो. आपण दुसर्यांना बोलायला सांगतो पण स्वत:लाही सांगितलेलं बरं! कारण दुसर्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड, गोड बोला आणि आम्ही अद्वातद्वा बोलू. या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तींनी आज कुणीच गोड, गोड बोलत नाही असं दिसतं. जिथे जा तिथे लोकं ओरडायला उभे राहतात. समजत नाही, ओरडायला काही कारण नसलं तरी आरडाओरडा केल्याशिवाय लोकांना बोलताच येत नाही. त्याला कारण असं आहे की आपण स्वत:बद्दल काही कल्पना करून घेतलेल्या आहेत. आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची मुळीच कल्पना नाही. परमेश्वराने आपल्याला केवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे या देशामध्ये. बघा, की या देशामध्ये तऱ्हेतऱ्हेचे पॅरासाइट्स स्वच्छतेचा एवढा विचार नाही. या देशामध्ये त्हेतऱ्हेचे किटाणू, आहेत. मी तर म्हणते की साऱ्या जगाचे पॅरासाइट्स आपल्या देशात आहेत. जे कुठेही सापडणार नाहीत ते या देशात आहेत. इतर देशांमध्ये इथून जर काही पॅरासाइट्स गेलेत तर ते मरूनच जातात. तिथल्या थंडीमुळे राहूच शकत नाही. सूर्याच्या कृपेमुळे इथे इतके पॅरासाइट्स राहतात या देशामध्ये आणि त्यांच्यावरती मात करून आपण कसे जिवंत आहोत ! एका शास्त्रज्ञाने विचारले होते मला की ‘तुमच्या इंडियामध्ये लोकं जिवंत तरी कसे राहतात?’ ‘अहो, म्हटलं जिवंतच राहत नाही, हसत-खेळत राहतात. आनंदात राहतात. सुखात राहतात.’ त्याला कारण हा सूर्य. या सूर्याने आपल्याला आपली घरं उघडी करायला शिकवलेली आहेत. आपलं हृदय उघडं करायला शिकवले आहे. इंग्लंडला जर तुम्हाला कुठे बाहेर जायचे असले तर पंधरा मिनीट तुम्हाला कपडे बदलायला लागतात. सगळंे काही घालून, जामानिमा, शिरस्त्राण वगैरे घालून बाहेर निघावे लागते. नाहीतर तिथली सर्दी तुमच्या डोक्यात घुसून तुमचं डोकचं खाऊन टाकते. ही अशी तिथे परिस्थिती आहे. आज तुम्ही जे इथे उघड्यावर बसला आहात अशी इंग्लंडला काही सोय करता येत नाही. सगळे देश नुसते थंडीने गारद झालेले आहेत. आपल्या देशामध्येसुद्धा असे प्रांत आहेत. तिथे आपण म्हणून शकू की मोहाली किंवा त्या बाजूला तुम्ही गेलात नैनितालच्या पलीकडे, डेहराडूनच्या पलीकडे, हिमालयाच्या त्या बाजूला गेलात जसं त्या ठिकाणी आहे तसंच या ठिकाणी आहे. इतकी थंडी तिथे सुद्धा आहे. जसे इंग्लंडला आहे किंवा अमेरीकेला असते तशीच थंडी इथे आहे, पण तिथे चिटपाखरूसुद्धा राहत नाही. तिथे मोठमोठाली वनं आहेत आणि त्या ठिकाणी सुंदर फुलं आहेत. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून लोकं सांगतात, इतकी सुंदर सुंदर फुलं आहेत की असं वाटतं की नंदनवन आहे. पण ते क्षणभरच. तिथे इतकी थंडी असते की ते बघायलासुद्धा, डोळे उघडायलासुद्धा तिथे प्रश्न असतो. डोळ्याला चष्मे लावून जावे लागते नाहीतर डोळ्यालासुद्धा त्रास होतो, इतकी तिथे थंडी आहे. तसच दुसऱ्या देशांमध्ये असूनसुद्धा त्यांनी तिथे वाढ करून घेतली आहे. सबंध वातावरणाशी भांडून, झुंजून त्यांनी आपले देश उभे केले आहेत.

आपल्याला तर फार मोठे वरदान असतानासुद्धा आपण त्याकडे लक्ष देत नाही की सूर्याचे आपल्याला केवढे मोठे वरदान आहे! आपल्या देशामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे सूर्याची उर्जा इतकी मोठी आहे. ती जर वापरायला सुरुवात केली तर आपल्याला उर्जेचा त्रासच राहणार नाही. मोटारीसुद्धा या उर्जेने चालू शकतात. पण आपल्याकडे आपले जे सत्ताधीश आहेत किंवा आपल्याकडचे जे लोक आहेत त्यांचे लक्षच दुसरीकडे असल्यामुळे सूर्याचे जे देणं आहे ते वाया जाते. त्याचे त्रास होतायेत. अती होतंय आपल्याला. ते वाचवून आपण पुष्कळ कार्य करू शकतो. पण सूर्यापासून शिकण्यासारखी मुख्य गोष्ट आहे ती त्याची देण्याची शक्ती. सूर्य हा देत राहतो. देतच राहतो. घेत काही नाही. देत राहतो. आणि देण्याची त्याची एवढी शक्ती आहे की त्या शक्तीवर इथे पाऊस होतो. त्या शक्तीवरती शेती होते. त्या शक्तीवरती उपज होते. जर सूर्य नसला तर इथे काहीही होणार नाही. त्याच्या या प्रेमाच्या शक्तीमुळेच आज आपण या स्थितीला पोहोचलेलो आहोत, पण त्याच्यापासून शिकायचं म्हणजे असं की आपल्यातही देण्याची शक्ती आली पाहिजे. पण खालून वरपर्यंत जर आपण पाहिलं तर लोकांना असं वाटतं की याच्यात कसे पैसे वाचवायचे? स्वत:साठी कसे ठेऊन घ्यायचे? आम्ही पैसे दिले समजा काही कार्यक्रमाला तर त्याच्यातही लोकं म्हणतात याच्यातले पैसे वाचवलेले बरे! अहो, तुम्हाला सांगितलं कुणी वाचवायला? वाचवून ठेवा, पण कुणासाठी ? अहो, तुम्हाला खर्चायला दिले तर कुणाला वाचवता ? त्यातलेच पैसे. म्हणजे कसंतरी करून, काहीतरी सोसून घेतले पाहिजे. काहीतरी आपलं रोखून ठेवलं पाहिजे. ही सगळीकडे प्रवृत्ती. कुठे बाजारात गेलं , कुठं गेलं त्याच्यामध्ये आता आम्ही भाव वाढवला. कशाला? ‘त्यांनी वाढवला म्हणून आम्ही वाढवला.’ अहो, पण भाव जर तोच असला तर वाढवता कशाला? कसंतरी करून ती शक्ती शोषून घ्यायची. आता काहीही लहानसं जरी कार्य काढलं तरी लोक म्हणतात ‘माताजी, हे बघा, तुम्हाला ते जमणार नाही.’ म्हटलं का ? कारण ते पैसे खातात. म्हणजे आम्ही काय जेवतो आणि ते पैसे खातात. आमचं काही जमणार नाही की काय ? म्हणजे असा विचित्र प्रकार आहे की देशाचे जे हित करणारे आहेत, देशाचे जे कारभारी आहेत त्यांना सगळी काही सत्ता देवाने दिलेली आहे. त्यांनासुद्धा हे समजत नाही की आम्हाला द्यायचयं. या सूर्यापासूनच शिकलं पाहिजे की आम्ही काही देण्यासाठी आलोत. घ्यायला आलो नाही. जोपर्यंत आमूलाग्र ही स्थिती माणसाची बदलत नाही की आम्ही द्यायला आलोत, घ्यायला नाही. त्याचा शौक असायला पाहिजे. जसा, तुमच्या आईला कसा शौक असतो की आज माझा मुलगा येणार. त्याच्यासाठी काय करायचं बरं ? काय जेवायला करायचं? आज हे करावं की ते करावं. तिला कसा शौक असतो की काहीतरी करुन दोन -चार पैसे -तिकडून एकत्र करून, शेजारून काही तरी घेऊन ती काहीतरी गोड-धोड करून तुम्हाला घालते. तिला इकडून असं वाटतं की ‘कसं देऊ नी कसं नाही.’ तसाच शौक आतून आल्याशिवाय , इतर लोकांबद्दल तशी भावना आपल्यात जागृत झाल्याशिवाय आपल्या देशाचे काय कोणत्याच देशाचे कल्याण होऊ शकत नाही. पण कुणाकडून काय लुटता येईल? कुणाकडून काय घेता येईल? कुणाकडून काय मागता येईल? कुणाला कुठे फसवता येईल? या विवंचनेत आपण असतो आणि त्या विवंचनेमुळे आपल्या मुलांनाही त्रास होणार आहे. आपल्यालाही त्रास होणार आहे. या देशात कोणतही कार्य होऊ शकतं. काहीही म्हटलं तरी.

आज जी संक्रांत आपण करतोय त्याच्यामध्ये ही जी संक्रांती, संक्रांत म्हणजे एक शुभ अशी क्रांती जी करायची आहे ती ही की आमच्यामध्ये देण्याची प्रवृत्ती आली पाहिजे. आता हे सर्व म्हणतात की देण्याची प्रवृत्ती असावी. म्हणजे आता जर तुम्ही भटजीबुवाकडे गेलात की ‘अहो, काहीतरी दान केले पाहिजे.’ दान म्हणजे त्या भटजीला करायचे ? तसं नाही. किंवा कुणी म्हणेल की दान केले पाहिजे. म्हणजे स्वत:चे पोट भरण्यासाठी. दान करावं म्हणून हे लोक अस भाषणं वरगैरे देत असतात. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही आम्हाला दान करा तरी तुम्ही तेच. दान तुम्हाला कशाला करायचे ? म्हणजे दान करायचे तरी कुणाला ? असा ही प्रश्न उभा राहतो. तेव्हा मुक्त मनाने आम्ही आमच्या देशासाठी, आमच्या बांधवांसाठी, आमच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी काय करतोय ते पाहिले पाहिजे. जीव रोखून राहिला नाही पाहिजे. मनसोक्त लयलूट केली पाहिजे. म्हणजे त्याचा एक विशेष आनंद असतो तो आम्ही नेहमी उपभोगत असतो. जीवापलीकडे द्यायचं. याच्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. तो आनंद कशातच नाही. आणि तो आनंद मिळवायचा असला तरच आजचा सण साजरा केला पाहिजे. म्हणजे त्या सूर्यासारखा आपला स्वभाव असला पाहिजे. तो काही करतो असं त्याला काही कळत नाही. त्याला काहीही माहिती नाही. अकर्मात उभा आहे पण सारखा, सतत जळत असतो आणि सारखा तुम्हाला प्रकाश देऊन, हा आनंद देऊन, हे सगळे जीवनतत्त्व देऊन तुम्हाला तो पाळत असतो. रोज त्याला आपण बघतो. पुष्कळ लोक त्याला नमस्कारही करतात, पण नमस्कारापुरते. त्यातलं काही आपल्यात येत नाही. त्याची देण्याची शक्ती, त्याची क्षमता आपल्यात यायला पाहिजे. मी एक लहानशी गोष्ट सांगितलेली होती की सर्व सहजयोग्यांनी झाडाच्या किनाऱ्यावरती वडाची झाडं लावा. त्याला कशाला गव्हर्नमेंट कडून पैसे घ्यायचे? एकतर त्याला कुंपण घालायला काही लागत नाही. चला, यावर्षी हेच एक नुसतं झाडं लावू. त्याला एक कुंपण घालू, त्याला किती पैसे लागतात? अहो, विड्या जरी फुंकल्या तरी जास्त लागतात. एक हेच करून बघा. म्हणजे कुठेतरी काहीतरी करतोय आपण. हे दिसलं पाहिजे. उलट कसं कुणाला लुबाडायचं? कसं कुणाकडून देशाची मुळीच प्रगती होणार नाही. बरं, असे आपल्याकडे पूर्वी लोक नव्हते. मी तुम्हाला सांगते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा देणारेच लोक होते. आम्ही देणारेच लोक पाहिलेत. घेणारे आम्ही पाहिलेच नाहीत. घेतलं की पैसे घ्यायचे ? कसे वाचवून घ्यायचे ? या प्रवृत्तीमुळे आपल्या त्यांना काही आवडायचं नाही. आई-वडिलांना सुद्धा कुणी मुलाने काही घेतलं की देऊन ये ते परत. कशाला घेतलं दुसर्याचं? द्यायचं. आमच्या वडिलांच्या घरी मला आठवतंय की त्यांनी चांदीच्या खुरच्च्या केल्या. आणखीन छत्र-चामरं केलं. तर सगळे म्हणे कशाला केलं. याची काय गरज ? अहो, लग्नबिग्न होतात. सगळे भाड्याने आणतात. त्यापेक्षा आपलं घरातच असलेलं बरं! जाऊ देत . मग आता ते कुठे लग्न असलं मग त्यांनी विचारलं की अहो, ते आम्हाला छत्र-चामरं पाहिजे. अहो, ते मागच्या वेळेला लग्न झालं होत ना तिथे. तिथून घ्या. मग तिथून ते करत करत कुठल्या कुठे गायब झालं देवाला ठाऊक! पण माझे काय म्हणणं की त्याचा सारा विचारच असा. आता हा प्रश्न आहे की आता आपल्याजवळ पैसे आहेत काय करायचं? त्याचं काहीतरी सामूहिक, सार्वजनिकच काढायचं. बॅडमिंटनचं जर तुम्हाला कोर्ट करायचं असलं तर त्याच्यात सगळ्यांनी खेळलं पाहिजे. हे नाही की आमचीच मुलं

खेळतील. माझ्याच मुलाला सगळं. जर त्याने मोटर घेतली आहे तर त्याच्यात सर्वच मुलं शाळेत गेली पाहिजे. मोठी मोटर घ्यायची त्याच्यात सगळेजण गेले पाहिजेत. ही सामूहिकता आणि ही सार्वजनिक एक जे आपली तब्येत बनवणं आहे ते या सूर्यापासून शिकलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी हा विशेष दिवस आहे आणि या दिवशी आपण हे त्त्व घेतलं पाहिजे की आजपासून आपण काहीतरी सार्वजनिक कार्य करू. कसं काय पोटात अन्न जातं लोकांच्या मला समजत नाही. अहो, शेजारी तुम्ही बघत नाही. तुम्ही काहीही असं सार्वजनिक कार्य केलेलं नाही. एक लहानसं मी सांगते तुम्ही एक-दोन झाडेच लावायची सुरुवात करा. तरी किती सहजयोगी आहेत आपले महाराष्ट्रात. आणि या सहजयोग्यांनी प्रत्येकी एक-एक झाड लावून त्याची जर जोपासना केली तरी किती उपकार होतील या लोकांवरती. अशी माझी सर्वांना विनंती आहे की काही ना काही तरी सार्वजनिक कार्य काढा. पण त्यात आम्हाला पैसे जमवायचे आहे, हे करायचे आहे. असले धंदे काय करायचेत? ‘भटजीला पैसे द्या’ सारखा प्रकार नको आपल्याला. सरळ काहीतरी हृदय उघडून, प्रेमाने काही तरी लोकांसाठी करायचे आणि त्याचा आनंद उचलायचा. हे पाहिजे. आता याचं असं म्हणणं नाही की तुम्ही फुकट करा. मी असं कधीच म्हणत नाही की सहजयोगी तिकडून आले आणि फुकट काहीतरी द्या. मुळीच नाही. पण या लोकांमध्ये ही गोष्ट आलेली आहे. आणि येतांना किती बक्षिसं घेऊन आले. अर्थात माझा त्याच्यात पुष्कळ हात असला तरी हे स्वत: कितीतरी घेऊन आलेत तुम्हाला देण्यासाठी. स्वत: आपल्या मनाने इतक्या वस्तू आणल्या यांनी. मला आधी वाटलं की जे मी याला घेतलं होतं, रोमला घेतलं होतं सामान, तर ते सामान मी घेतलेलेच आणलं. तर ते म्हणे ‘नाही माताजी, आम्ही तुमचं नाही आणलं. आम्ही आमचं विकत आणलं. तुमच्यासारखं.’ त्यांना आनंद की आम्ही हे करून आणलं, ते करून आणलं. हे दिलं. बरं, कुणाला काय दिले तिकडे हे कुणाला माहितीच नाही. इथे मी बसून याला दे रे , त्याला दे रे, याचं नाव घे रे, त्याचं नाव घे रे. तिकडे आपले इंडियन लोकं बसून ‘अहो, माझ्या मुलाला अजून काही मिळालं नाही. माझ्या आईला,’ ती आई लंगडत लंगडत आली पुढे. म्हटलं तुमच्या आईला घ्या आता. त्यांना लुगडं मिळालं नाही. आता लुगडी नाहीत माझ्याकडे. मग साडीच घ्या. हे प्रकार. या लोकांच उलट आहे. हे लोक आले जिथून किती सामान घेऊन आले. दोन टन सामान म्हणे लोकांनी आणलं. ते दोन टन, माझे हात दुखले देता-देता. असे दोन टन त्यांना सगळ्यांना वाटण्यात आले. माझंे असं म्हणणं आहे की तुम्ही काही द्या. अशातली गोष्ट नाही की यांना काही द्यायचं नाही. पण यांच्यासमोर एक मोठा कित्ता गिरवण्यासारखं आपलं चरित्र दाखवलं पाहिजे की आम्ही लोकसुद्धा काही कमी नाही. आले तर आम्ही तुमच्या सेवेला उभे आहोत. आले तर तुम्हाला आम्ही बघायला उभे आहोत. आपल्याच्याने जे होईल ते करायला काय हरकत आहे ? त्याला काही पैसे लागत नाहीत. त्याला काही त्रास लागत नाही. फक्त एक मनाची प्रवृत्ती आपली बदलली पाहिजे आणि ती सहजयोगात जर आपण बदलली नाही तर सहजयोगामुळे मन्वंतर होईल असं मला वाटत नाही. सगळ्यात मोठी प्रवृत्ती म्हणजे दुसऱ्याला देण्याची ही यायला पाहिजे. सहजयोगात कुंडलिनी जागृत होते आणि तुम्ही आत्मा स्वरूप होता. आणि आत्म्याचं तत्त्व म्हणजे सूर्यासारखं सगळ्यांना देण्यासारखं. तुम्ही माझा फोटो पाहिला. त्याच्यामध्ये माझ्या हृदयामध्ये एवढा

मोठा सूर्य आला होता. खरोखर माझ्या हृदयात सूर्य आहे. आणि त्या सूर्यामुळेच मला कधीही असं वाटत नाही की यांच्याकडून लुबाडून घ्यावं. म्हणजे कसं काय ते मला समजत नाही. कुठून, डोक्याच्या कोणत्या भागातून हा विचार येतो मला माहिती नाही की हे घ्यावं यांच्याकडून लुबाडून. कसला काय प्रकार आहे. तो तर सहजयोगात आलाच नाही पाहिजे. पण आपल्याकडून काय देता येईल रोज डोकं लावायचं. काय आपण करू शकतो बरं. आता आपण कोणचं हे करू शकतो. केली आहे. त्याचं नाव आम्ही ‘सहज स्त्री तुमच्या राहुरीलासुद्धा आम्ही एक संस्था सुरू ी सुधार, समाज सुधार’ असं काहीतरी नाव दिलेलं आहे. त्याला संस्था अशी केली कारण आमच्या संस्थेतर्फे अशी कार्य होऊ शकत नाहीत, लाइफ इटर्नल ट्रस्टमुळे. तर इथं ती रजिस्टर करून घेतली. सगळं काही झालेलं आहे. ते कॅनडातले लोक पैसे द्यायला बसलेत. तिकडून लोक पैसे द्यायला बसलेत. पण इथं कुणी मिळतच नाही ‘स्त्री इथल्या बायकांनी हे कार्य आपल्या हातात घेतलं तर कार्य होऊ शकतं. इथं जागा आहे, सगळं काही आहे. ‘मग सुधारला. आम्हाला वेळच होत नाही. आम्ही कसं जाणार?’ अहो, हे लोक तिथून पैसे घेऊन येताहेत तुम्हाला द्यायला. इथल्या स्त्री समाजात सुधार करा. चौदा तुमच्यासाठी मशिनी पाठवून दिल्या. तिथे बायकांना बसवून काही शिकवा. तुम्हाला दिसत नाही का उपाशी तापाशी फिरताहेत. त्यांना बसवा, काहीतरी कार्याला लावा. त्यांच्या दोन-चार पैसे हातात पडतील. त्यांचं भलं होईल. थोडंतरी आपण असा विचार केला पाहिजे. स्वत:पुरतं कसं बघायचं? तेव्हा सहजयोगाला पाहिजे की या गोष्टीला आपल्याला वाव नाही. स्वत:पुरते बघण्याला आपल्याला वाव नाही. जगाच्या कल्याणा आपल्याला आलं पाहिजे. आणि मी नेहमी म्हणत असते की ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ जरी असल्या तरी संतांच्या विभूतीच्या कल्याणासाठी जग आहे. म्हणजे मग झालं. त्या संतांचं कल्याणच होतं अशा परिस्थितीत. म्हणून आता तुम्ही जे संत आहात, तुम्ही संतांच्या दृष्टीने वागलं पाहिजे. आणि संतांचं पहिलं लक्षण म्हणजे देणं. देत राहायचे. कोणत्याही संतानी कुणाचे काही लुबाडलेले आपण तरी काही बुवा ऐकलेले नाही. आणि मग तो संतच राहत नाही. ते त्याच्या डोक्यातच येत नाही. तेव्हा आपण आपल्या परीने काय देऊ शकतो, किती प्रेम देऊ शकतो, किती लोकांचं भलं करू शकतो इकडे लक्ष आपण घातलं पाहिजे. आणि आजकालची जशी सार्वजनिक कार्य निघाली आहेत इलेक्शन वरगैरेसाठी तसली काही न करता नि:स्वार्थ भावाने ज्याला आपण आईच्या प्रेमाला निव्व्याज्य म्हणतो, ज्याच्यावरती काही व्याजच नाही. असं जे अतूट वाहणारं, अनंतापर्यंत जाणारं असं जे प्रेम आहे ते देतांना तुम्हाला आपोआप सुचेल मी काय-काय केलं ते. हळूहळू सुधारणा झाली पाहिजे. सर्व सहजयोग्यांतर्फे काही ना काही तरी घटित झालं पाहिजे. आणि या बाबतीत आपण थोडा तरी वेळ दिला पाहिजे. वेळ देऊन त्याच्यामध्ये लागलं पाहिजे. मेहनत केली पाहिजे. ‘माताजी आल्या म्हणजे एकदा लेक्चर झालं. मग संपलं असं नको. या लोकांनी पुष्कळ कामं केली. शाळा सुरू केल्या आहेत आणि पुष्कळ समाजसुधाराचे काम करताहेत. आपणही तशी काहीतरी सुरुवात केली पाहिजे. नाहीतर सहजयोग म्हणजे नुसतं आत्मसाक्षात्कार होऊन आनंदाच्या सागरात पोहोणारे सगळे आळशेश्वर असं नको व्हायला. आपण दूसर्यांची काय मदत घेतली. इकडे तिकडे डोळे चारीकडे फिरवून बघावं. त्यांच्याकडे आपण प्रेमाने दृष्टी घालावी. नीट ০

बघावं की आपल्या हातून काय कार्य होतंय! अजून माझं हिंदुस्थानात येणं झालं नाही. आल्यावर तुम्ही बघाल सगळ्यांना मी कामाला लावणार आहे. तेव्हा आधीच सुरुवात केलेली बरी. सहजयोग म्हणजे नुसते बसून इथे ध्यानधारणा करण्यासाठी सहजयोग मुळीच नाही. नुसतं ध्यान करायला कशाला सहजयोग पाहिजे? मग हिमालयावर जा. इथे राहन जर सहजयोग करायचा असला तर त्या सहजयोगातून लोकांचं भलं झालं पाहिजे. आणि आजकालचे जे सार्वजनिक कार्य आहे त्या पद्धतीचं मुळीच करायचं नाही. खरोखरं कार्य सिद्ध केलं पाहिजे. तरच म्हटलं पाहिजे की आम्ही सहजयोग हा स्थापित केला आहे. आता माझी पुष्कळ स्तुती झाली. मी ऐकली पुष्कळ स्तुती. गाणं ऐकलं. फार बरं वाटलं. सगळं काही संतोष झाला. लोकांनी ओळखलं वगैरे वगैरे, पण एक गोष्ट ओळखली पाहिजे की तुम्ही काय आहात ते जाणण्यासाठी कार्य केलं पाहिजे नाहीतर तुम्ही स्वत:ला आरशात बघू शकत नाही. तुम्हाला काय दिलं ते तुम्हाला दिसलं पाहिजे. जसं तुम्ही पूर्वी स्वयंपाक करत होता. मुलाबाळांना बघत होता तशी जर तुमची परिस्थिती असली आणि त्याला बिलकूल सार्वजनिक किंवा सामूहिक स्वरूप आलेले नाही तर सहजयोग मिळून तरी तुम्ही काय मिळवलं मला समजत नाही. जसेच्या तसे. तेव्हा पुढल्या वर्षी आल्यावरती निदान तरी सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की किती तुम्ही वडाची झाडं लावली पहिली गोष्ट. दुसरी, तुम्ही कोणतं सामूहिक कार्य केलं ते मला ऐकायला मिळालं पाहिजे. कोणतं ना कोणतं सामूहिक कार्य बघितलं तर तुमच्या नजरेत येईल, तुम्ही ते करू शकता आणि व्यवस्थित करू शकता. त्याला काहीही पैशाची गरज लागत नाही. नुसती मनाची तयारी पाहिजे. हा सहजयोग जेव्हा मी उभा केला होता तेव्हा एका बाईवर, तिला पार करून, एका पैशाच्या आधाराशिवाय, घरूनही त्यावेळेला मला मुळीच कोणत्याच तऱ्हेचा सपोर्ट नव्हता, मी सुरू केला. पण त्या कार्याच्या निष्ठेमुळे आणि त्याच्या सत्यतेमुळे तो आज एवढा फोफावला आहे. आता तुमच्या प्रत्येकीवर, प्रत्येक माणसावर, प्रत्येक बाईवर ही एक मोठी जबाबदारी आहे की आम्ही सहजयोगाला लोकांची ओळख करून देतांना काही ना काही तरी त्याचा पडताळा दिला पाहिजे. हातात त्यासाठी काही कायदा घ्यायला नको. त्यासाठी कोणतं गैरवाजवी काम करायला नको. कोणत्याही चुकीच्या गोष्टी करायला नको. सरळ मार्गाने तुम्ही नुसते डोळे उघडून बघा की आम्ही काय करू शकतो. लोकांचं आम्ही कुठे काय हित करू शकतो. ते आणि आम्ही तुम्हाला शक्ती द्यायला बसलेलो आहोत. तुम्ही त्या ह्याच्यात पडावं. आणि या कार्यात आम्हाला काही व्होट नको, आम्हाला काही पैसे नकोत, काही नाही. आम्ही काहीतरी असं कार्य सुरू करणार असं एक वचन द्यायचं. दुसरी गोष्ट त्यात अशी अडचण असते की लोक जर सुरू करतात मग चार ठिकाणी पैसे मागायला जातात. आधी पैसे आणायचे. पैसे मुळीच मागू नका. पैशाशिवाय जे काम होईल ते आधी सुरू करा. आधी पैसे प्रत्येकाला असं वाटतं की पैशाशिवाय काम होत नाही. तुमच्याकडे शक्ती आहे तुम्हाला पैसे कशाला एकत्र, पाहिजे? कोणी आजारी असला शेजारी तर जाऊन बघावं, त्यांच्याकडे आजार आहे, त्यांच्याकडे त्रास आहे त्यांना बघावं. मी बघते ना कुणी आजारी असला तर त्याच दिवशी एक गृहस्थ कुणी आजारी आहे त्यांचा हात हा झालेला. अहो, दोन मिनीटाचं काम. सहजयोगाने कुणीही ठीक केलं असतं. तर घेऊन आले त्याला माझ्याकडे. ते अगदी प्रोग्रामच्या मधोमध. ‘याचा हात ठीक करा.’ आता एवढे तुम्ही सहजयोगी असून, तुमच्या हातातून शक्ती

वाहत असून हे लोक कधीही नाही आले. तेवढ्यातल्या तेवढयात तुम्हाला बरा नाही करता आला तर तुम्हाला सहजयोगी होऊन फायदा काय झाला? तेव्हा ‘माझी आई आजारी, माझा बाप असा आहे. त्याचे पाय मोडले.’ ‘अहो, तुम्ही नीट करा की. तुमच्यात आहे ना शक्ती, करून तर बघा.’ तेव्हा लोकांची मदत केली पाहिजे. काहीही अपेक्षा न करता. आनंदात, त्या भावनेने. ज्याच्यामध्ये खरोखर अत्यंत आनंद आहे. ही आम्ही काहीही नाही. परमेश्वराचे एक साधनमात्र होऊन जगामध्ये , या देशामध्ये, या कुटुंबामध्ये काहीतरी विशेष देतोय. केवढी मोठी ही धारणा. केवढी मोठी गौरवाची गोष्ट आहे असं समजून जर तुम्ही सगळ्यांनी निश्चय केला तर काही ना काही तरी तुमच्या हातून घडेल. आणि मग लोकांना पटेल की सहजयोग म्हणजे काय ? आता सगळे लोक असं सहजयोग म्हणजे काय ? सगळे ध्यानात बसलेत. झालं, आपल्या देशात काही गडबड झाली तर ध्यानातच आहेत. ‘आता आमची बायको म्हणे स्वयंपाक नाही करत.’ म्हटलं ‘का ?’ ‘ती ध्यानच करत बसते.’ ‘असं का? कुणी सांगितलं तिला? स्वयंपाक पहिल्यांदा करायचा.’ ध्यानाला पाच मिनीट पुष्कळ झाली. तुम्हाला शक्ती दिली की तुम्ही उत्तम स्वयंपाक कराल . तेव्हा एक तऱ्हेचा आपल्यामध्ये विश्वास असायला पाहिजे आणि कार्याची क्षमता असायला पाहिजे. शक्ती आम्ही देतो ती घ्या. रोज नुसतं ध्यानधारणा करून काही उपयोगाचे नाही. तुम्ही लोकांचं काय भलं केलं ते बघितलं पाहिजे. तुमचं भलं झालं आमचं भलं व्हावं. माझ्या मुलासाठी करा, माझ्या नोकरीसाठी करा, माझ्या आईला ठीक करा, बापाला ठीक करा, अमक्याला ठीक करा, माझ्या घरी या, अमकं करा, तमकं करा सगळे माझ्यावरच अधिकार आणि तुम्ही काय करणार? आम्ही काहीतरी केलं पाहिजे. माताजींना आम्ही करून दाखवू काहीतरी विशेष असा मनाचा हिय्या करावा. आणि माझ्यासमोर खरोखर असं चित्र उभं आहे की सहजयोगी जाऊन जे वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेले आहे ‘बोल ते पियुषांचे सागर’. ‘पियुषांचे सागर’ ते कुठे आहे ते बघायचे आहे आम्हाला. तर सगळ्यांना आजच्या या सुदिनी गोड गोड आशीर्वाद ! सगळ्यांनी सगळ्यांचं उत्तम करावं, भलं करावं. सगळ्यांना प्रेमाने वागवावं. आणि प्रेमाने बोला.